कामथे काका (भाग १५)

शुक्रवार उजाडला.......

शुक्रवार उजाडला. प्रत्येकासाठी वेगळी सकाळ घेऊनच. लहान असली तरी समोरच्या पेपरातली बातमी पहिल्या पानावर असल्याने इन्स्पे. श्रीकांत वैतागले होते. "वृद्धा बेपत्ता. पोलीसांनी हरवल्याची तक्रार नोंदवून घेण्यास फार उशीर केला " या मथळ्याखाली बातमी फार तपशिलात नसली तरी तक्रारदार साठे  मामांचं नाव होतं आणि आजींचंही. पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत मौन पाळले असल्याचे लिहिले होते. सदर बातमी वाचून काकांची हबेलहंडी झाली. त्यांना उगाचच घाम फुटू लागला. जणू काही त्यांनीच आजींना गायब केले होते. दादाने वाचल्यावर त्याला आपण त्वरित घेतलेल्या निर्णयाबद्दल आनंद झाला. पोलिसांच्या कारवाईला वेळ लागेलच असं माहीत असल्याने तो सुखावला. पण गाफील राहिला नाही. त्याने थोड्याच वेळात आलेल्या अकड्याला सावध केले आणि कालचा सगळा वृत्तांत ऐकून घेतला. आज मीटिंगचा दिवस. ही फायनल मीटिंग होती. नंतर एकत्र येता येईल की नाही सांगता येणार नाही याची खात्री असलेल्या दादाला थोडं का होईना टेन्शन आलं. नाही म्हंटलं तरी सूर्या आणि इतर सगळे यांच्याबरोबर आज दहा बारा वर्षांपासूनचा सहवास होता. कितीतरी गोष्टी त्यांनी एकत्र केल्या होत्या.


**** ******* *********** *********** ************* ****

सकाळी सकाळी साठे मामा पेपर घेऊन कापसे बाईंना बातमी दाखवण्यासाठी निघाले. ते आजींच्या मजल्यावर आले. आपण केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे त्यांना कापसे बाईंकडून कौतुक करू घ्यायचं होतं. उत्साहाच्या भरात त्यांनी पायाखाली न बघता कापसे बाईंच्या फ्लॅटची बेल वाजवली. त्यांचा पाय एका मऊ अशा वस्तूवर पडला आणि त्यांनी खाली पाहिले. त्यांना तिथे कुत्रं मरून पडलेलं दिसलं. त्यांचं अंग त्या स्पर्शाने शहारलं. ......कापसेबाईंनी ,एवढ्या सकाळी कोण असेल ? असा विचार करीत घड्याळाकडे पाहिलं. सात वाजत होते. दारावर पेपर तसाच अडकवलेला होता. त्यांनी अनिच्छेनेच दार उघडले. दारात साठे मामांना पाहून त्यांना खरं तर राग आला होता. पण त्यांचं लक्ष साठे मामांच्या खाली असलेल्या नजरेकडे वळले. त्या पण शहारल्या. एकदम" शीः ! " असं म्हणून किळस आल्याने त्या मागे सरल्या. दारातलं मेलेलं कुत्रं पाहून कोणालाच आनंद झाला नसता. तसाच तो त्यांनाही झाला नाही. मग साठे मामांनी डिटेक्टिव्हगिरी केली . कुत्रं प्रथम आजींच्या दरवाज्याजवळ गेलं असलं पाहिजे आणि मग कापसेंच्या दरवाज्याशी येऊन मेलं असलं पाहिजे. पण ज्याअर्थी ते आजींच्या दरवाज्याजवळ आधी गेलं होतं, कारण तिथपर्यंत रक्ताचे डाग होते, त्याअर्थी त्याला संशयास्पद असं काहीतरी आढळलं असावं असं त्यांना वाटलं. त्यांनी ते बाईंना बोलूनही दाखवलं . ते बाईंच्या घरात आले. त्यांनी त्यांना पेपरातली बातमी आणि आपले पत्रही दाखवले. त्यामुळेच हे पेपरात आलं आणि वाचा फुटली. अर्थातच कापसेबाईंनी त्यांचं कौतुक केलं. मग मामा म्हणाले, " दुसरं कोणालाही काही पडलेलं नाही. आपण त्या दिवशी गेलो नसतो तर काहीही झालं नसतं." हे कापसे बाईंनी मान्य केलं. पण त्या समोरचं कुत्रं काढण्याच्या विवंचनेत होत्या. ते कुत्रं पहाटे आत शिरणाऱ्या झमझमनेच त्यांच्या दारापुढे सरकवलं होतं. मामा कौतुक करून घेऊन निघाले , पण कुत्रा मेल्याचं पोलिसांना सागण्याचं ठरवूनच .

इन्स्पे. श्रीकांत स्टेशनला आले. तेव्हा दहा वाजले होते. मिडियावाल्यांना बातम्या कशा लागतात कोण जाणे असा विचार करीत त्यांनी कॉन्स्टे. सखारामला बोलावलं. कोर्टात जाऊन वॉरंट मिळवायचं होतं त्यासाठी सरकारी वकिलांना भेटून बरेच उपचार पूर्ण करावे लागणार होते. सगळ्या नुसत्या वेळ खाऊ गोष्टी. सखाराम अजून आला नसल्याचं त्यांना कळलं. तो असता तर आजींच्या फ्लॅटवर लक्ष ठेवायला सांगायचं होतं, निदान वॉरंट घेऊन झडती घेई पर्यंत तरी. त्यांच्या मग लक्षात आलं आजींची फाइल खंडागळे साहेबांकडे आहे. आता त्यांच्याकडे जायचं म्हणजे स्वतःचा मूड खराब करून घेणं आहे. त्यामुळे ते विचारात पडले. त्यांना काही सुचेना. तेवढ्यात त्यांच्या केबिनचं दार लोटून शिपाई आला. त्याच्याकडे गोपनीय टपाल होतं. त्याने श्रीकांतना सीलबंद पाकीट देऊन त्यांची सही घेतली. तो गेला. अचानक त्यांची धडधड वाढली. सकाळी सकाळी गोपनीय टपाल. काहीतरी भानगड असली पाहिजे. त्यांनी सावकाश पाकीट उघडलं. आत डीसीपी गर्दम साहेबांचा मेमो होता. आजींच्या केसमध्ये योग्य कारवाई करण्यात कुचराई केल्याबद्दल लिहिले होते आणि स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यांच्या लक्षात आलं. कमिशनर साहेबांपुढे त्यांचा बळी दिला गेला होता. ते हतबुद्ध झाले. त्यांचा कामातला रस नाहीसा झाल्यासारखं झालं. त्यांना रागही आला. भीतीही वाटली. बढतीची आशा असलेल्या त्यांना धक्का बसला . ते अगदीच वाईट काम करीत नसत. मग हे काय? ते स्वतःशी पुटपुटले. हे घेऊन खंडागळे साहेबांकडून फाइल मागणं म्हणजे "आ बैल मुझे मार " सारखं होतं. फाइलशिवाय कोर्टात जाणार कसं?.. ̱... त्यांच्याकडे गेलो तर फालतू ऐकत बसावं लागेल. म्हणून त्यांनी स्वस्थ बसून पुढे काय होणार याचं निरीक्षण करायचं ठरवलं.त्यांना फार वेळ थांबावं लागलं नाही. फोन वाजला. तो खंडागळे साहेबांचा होता" ताबडतोब या. " श्रीकांतना जरा बरं वाटलं. आता निदान विषयाला परस्पर तोंड फुटेल. त्यांच्याकडे तसं कोणतंही स्पष्टीकरण नव्हतं. फाइल मिळाली तर कोर्टाचं काम होणार होतं. ते घाबरतच खंडागळेंच्या केबिनकडे गेले. आत कोणीतरी बाहेरचं बसलेलं होतं. त्यांना जरा बरं वाटलं. अशा वेळी तरी वाटेल ते नक्कीच बोललं जात नाही. ते साठे मामा होते. त्यांना पाहून तर श्रीकांत अधिकच घाबरले. या म्हाताऱ्याला आपण सौजन्य म्हणून भेटायला गेलो तर, हा परत तक्रारच करायला आला. खंडागळे श्रीकांतकडे न पाहताच म्हणाले, " पाहा ते काय म्हणतायत. " मग साठे मामांनी कुत्रा आजींच्या दाराशी मरून पडल्याचे सांगितले. आणि त्यांचे अंदाजही सांगितले. श्रीकांत काहीच बोलले नाहीत. ते पाहून खंडागळे म्हणाले, " तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊन जरा पाहूनच या, म्हणजे काही माग लागतोय का ते कळेल. पाहिजे तर श्वानपथक घेऊन जा. मी सांगितलं म्हणून घेऊन जा असं नाही, तर स्वतः काय ते ठरवा. बघा, आता तरी काही करता येतंय का ते पाहा. कोर्टात पाहिजे तर दुसऱ्या कोणाला तरी पाठवा किंवा थोडं उशिरा जा. "..... त्यांचा रोख दिलेल्या मेमोकडे होता. साठे मामांना घेऊन श्रीकांत केबिनकडे आले तेव्हा सखाराम बाहेर आलेला होता. त्यांना त्याचा राग आलेला होता. खरंतर, त्यांना मेमो मिळाल्याने त्यांचा मूड खराब होता. ते कोणावर बरसतील याची त्यांनाच भीती वाटू लागली. साठे मामांना त्यांनी बसायला सांगितले. ते म्हणाले, " काय आहे मामा, शिकवलेल्या कुत्र्याला एखादा माग लागला तर वेगळी अनुमानं निघतात, पण साधारण कुत्र्याच्या बाबतीत अशी खात्री देता येत नाही. तुमचं म्हणणं अगदीच चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. (खरंतर त्यांना तेच म्हणायचं होतं) आम्ही आमचं श्वान पथक आणून मगच ठरवू. साधारण कुत्री काय खाण्यासारखी एखादी वस्तू असेल तरी वास घेत बसतात. "...... मग मामा जास्त काही न बोलता निघाले. त्यांना अजूनही खात्री होती की कुत्र्याला मृत व्यक्तीचीच चाहूल लागली होती. ते निघाले. ते बिल्डिंगमध्ये शिरले आणि लिफ्टने न जाता जिन्यावरून निघाले. ते ताराबाईंच्या फ्लॅटकडे जाऊन दरवाज्याला कान लावून थांबले. काही आवाज येतो का, ते पाहत थांबले. पण तसा काहीच आवाज आला नाही. असं उभं राहणं बरं दिसणार नाही म्हणून ते बाजूला झाले. आता कचरा गोळा करणाऱ्याने कुत्रं उचललं होतं. त्यांच्या मनात आलं, नाहीतरी पोलीस आपल्या म्हणण्याप्रमाणे थोडंच काम करतात ? त्यांचे अंदाज आणि प्राधान्य वेगळी असतात, हेच खरं. त्यांनी कापसे बाईंकडे न जाण्याचे ठरवले आणि ते पुन्हा खाली जाऊन लिफ्टने त्यांच्या फ्लॅटकडे निघाले. सगळं झाल्यावर पोलीस येतात हेच खरं. आता नक्कीच आजींच्या फ्लॅटमध्ये काहीतरी झालेलं असणारच. प्रयत्न करूनही उपयोग होणार नाही अशी निराशा त्यांना आली. पण त्यांना कोण विचारणार? त्या दिवशी श्रीकांत मामांकडे गेलेच नाहीत. तिथे जाण्यापेक्षा कोर्टाचं काम केलं तर दोन्ही कामं एकदम होतील. उद्या वॉरंटसहीत तिकडे जाऊच. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की उद्या शनिवार आहे. कोर्टाकडून वॉरंट मिळवणं तेवढं सोपं नाही. आता खंडागळे साहेबांच्या घरी रविवारी जाणं बहुतेक रद्द होईल. ज्योतिषशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यांची बायकोही त्यांच्या ह्या छंदाला कंटाळत असे. त्यामुळे ते कोणी त्या बाबत सल्ला विचारला तर आपली सगळी शक्ती पणाला लावून ते मनापासून सल्ला देत असत. त्यांनी मग सखारामला बोलावून त्याला आजींच्या फ्लॅटवर लक्ष ठेवायला सांगितलं. पण तो म्हणाला मी आधी सूर्याच्या ऑफिसवर लक्ष ठेवतो, कारण जे काही होतंय ते आधी तिथे होतं, त्यावर त्यांना थोडा राग आला पण ते घाईघाईने फाइल घेऊन कोर्टात निघाले. आता मात्र खंडागळे साहेबांनी त्यांना डिवचले नाही. पण फाइल देताना त्यांच्याकडे संशयाने पाहिले.

इकडे साधनाने बँकेत जाऊन आपल्या बचत खात्यावरची शिल्लक काढून घ्यायचं ठरवलं. निदान तेवढे पैसे तरी नक्कीच कुठेही जाणार नाहीत, असं तिला वाटलं. आज परत तिला कामावर जाऊ नये असं वाटू लागलं. कसंतरी तिने सोनाला शाळेत पोचवली होती. मग नक्की काय करायचं हे ठरवता न आल्याने तिने अंघोळ केली. ती तयार झाली. तिने अनिच्छेनेच ऑफिसमध्ये फोन लावला. तो नेमका गडाने घेतला. तो म्हणाला, " अरे साधनाबेन शूं बात छे? तमे कालेपण ऑफिसमा आव्या नथी, आजे पण आवतू नथी? तबियत तो सारू छे ना? " तिला आयतच तब्येतीचं कारण मिळालं. मग तिने सोमवारी कामावर येईन असे सांगितले, आणि तो काही हरकत घेण्याच्या आतच फोन कट केला. असं करताना तिला फार वाईट वाटलं. तिच्याशी गडा फार चांगला वागायचा आणि तिच्या बौद्धिक क्षमतेवर त्याचा फार भरंवसा होता. म्हणूनच तिला असलं खोटं कारण सांगायला वाईट वाटलं. बाराच्या आसपास ती बँकेत गेली. आणि अगदी मोजकेच पैसे शिल्लक ठेवून तिने बाकी सर्व पैसे काढून घेतले. पास बुक भरून देणारी सुगंधा म्हणाली, " काय मॅम कुठे बाहेर गावी चाललात की काय? एवढे पैसे एकदम काढलेत? मी असं विचारणं बरोबर नाही, पण कुतूहल म्हणून विचारते. राग मानू नका. " त्यावर साधना म्हणाली, "अगं त्यात रागावण्यांसारखं काय आहे? आपली ओळख आहे म्हणून तर तू विचारलंस. पण तुझं म्हणणं बरोबर आहे " असं म्हणून साधना घरी गेली. तिच्या मनात आलं, हिला काय कल्पना आहे की सोमवारी बँक साफ होणार आहे ते? खरंतर बँकेतल्या सगळ्याच खातेदारांनी पैसे काढून घ्यायला हवेत. तिने काढलेले पैसे अगदीच कमी नव्हते. तरी जवळ जवळ पन्नास हजार होते. इतके पैसे घरी किती दिवस ठेवणार आहोत आपण? तिचं मन तिला खायला लागलं. नव्हते काढले तरी भीती होतीच, आणि काढलेत तरी भीती आहेच. ह्या काकांमुळेच ही अशी वेळ आली. मग तिने विचार केला. पोलिसांना कसं कळवायचं? आता किशावर सूड उगवायची संधी चालून आली होती. तिने विचारांच्या भोवऱ्यात पैसे तसेच हॉलमधल्या टीपॉयवर ठेवले, आणि ती स्वैपाक करण्यास आत गेली....... ती एवढी मग्न झाली होती, की तिला फोनची बेल ऐकूच आली नाही. बराच वेळ फोन वाजत असावा. मग तिला ती वाजल्याचा भास झाला. खरंतर ती तिला ऐकू आली होती, पण अशा वेळी माणसाला तो भास वाटतो, तसाच तिला तो वाटला. ती बाहेर आली. तिने फोन घेतला. तो काकांचा होता. त्यांनी फक्त हॅलो म्हटलं होतं आणि ते तिच्या प्रतिसादाची वाट पाहत होते. तिने जास्त न बोलता फोन ठेवला. काकांबद्दल तिचे विचार चांगलेच डळमळीत झाले होते. मग तिला एक बरा विचार सुचला. काकांशी संबंध ठेवले हे खरं आहे, पण ते कायम ठेवलेच पाहिजेत असं थोडंच आहे? आता आपल्या आयुष्यात त्यांच्यामुळे वादळ येणार आहे तर हे संबंध काय कामाचे? थोडे दिवस वाईट वाटेल, पण नंतर सगळं ठीक होईल. हा व्यवहारी विचार तिला आवडला. पण फार टिकला नाही. कारण त्यात सोनाचा विचार नव्हता. मग मनाने तिला परत तेच सुचवले, सोनाला कशी विसरायला लावणार आहेस? आपण इथून कायमच्या जाऊ पण शकत नाही. अगदी काका म्हणाले होते तसं जरी करायचं म्हटलं तरी ते कठीण होतं. दुसरीकडे गेल्यावर आपल्याला काम कोण देणार? शिवाय जागा, सोनाची शाळा, वगैरे गोष्टी तिच्या मनात आल्या. म्हणजे इथे राहणं आलंच. दुपारचे अडीच वाजून गेले होते. मध्येच सोना आल्याने तिचा थोडा तरी वेळ गेला. मग जेवणं झाली. ती जरा आतल्या खोलीत पडणार तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सोनाने दार उघडले. दारात काका उभे होते. त्यांनी आल्या आल्या सोनाला जवळ घेतले. तिला जरी आई आणि त्यांच्यात काहीतरी बेबनाव झाला असल्याचे कळले होते तरी त्यांनी जवळ घेतल्यावर बरे वाटले. ते आत आले, पण साधना त्यांना भेटायला बाहेर आली नाही. त्यांनी मग सोनाला खुणेनेच ती कुठे आहे, ते विचारले. ते आतल्या खोलीत गेले. साधना कसलेसे कागद पाहत होती. ते तिच्या नवऱ्याच्या शेवटच्या दिवसांमधले होते. ते आत आले आणि तिने फाइल घाईघाईने बंद केली. एरव्ही तिने फाइल त्यांना दाखवली असती. समोरच उभ्या असलेल्या काकांना पाहून ती काहीच बोलली नाही. त्यांना तिला राग आला असेल याची कल्पना होती. पण तिने रागात चार गोष्टी बोलल्या तर बरं होईल असे वाटून ते तिच्या जवळ बेडवर बसले. मग तिने त्यांना तुटकपणे विचारले,"आता काही नवीन गुंता घेऊन आला असालच. " ते म्हणाले, " साधना, तुला खरंतर हे कितीतरी वेळा सांगण्याचं मनात आलं. पण जमलंच नाही. पाहिजे तर मी पुन्हा येणार नाही. पण थोडा माझ्या बाजूने विचार कर. " थोडावेळ थांबून ती म्हणाली, " आपण एखादवेळेस बाजूला झालो तरी फारसा फरक पडत नाही. पण सोनाचं काय? तिला एवढा लळा लावलात, आता काय करायचं.? समजा मी हे पोलिसांना सांगितलं, आणि त्यांनी तुम्हाला पकडलं तर सोनाला काय वाटेल ? म्हणजे माझी पंचाईत झालीच ना? " काका जास्त बोलले नाही, ते एवढंच म्हणाले, " मी सोनाची जबाबदारी घ्यायला कधी नाही म्हटलं का?. माझं ऐक, काहीही होत नाही. मी या सगळ्या प्रकारात तू समजतेस तेवढा गुंतलो नाही. ऐक माझं अजूनही विचार कर. आपण सुखाने जगू शकतो. " ती उठली. आणि म्हणाली, " मला यावर काही बोलायचं नाही. " पण ती त्यांना जा म्हणूनही म्हणाली नाही. ते थोडावेळ सोनाबरोबर बोलत बसले. आणि शेवटी उठले. कारण त्यांना घरी जायचं होतं.. आज रमेश जायचा होता. नीताला कामावर जातो असं सांगून ते बाहेर पडले होते. आपल्याला एकटंच राहावं लागणार आहे ह्या निराशाजनक विचारांनी घेरलेल्या अवस्थेत ते दरवाजा उघडून बाहेर पडले. सोनाची निराशा झाली. तिलाही ते परत येणार नाहीत हे जाणवलं. साधना स्वयंपाकघरातून त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही. तिच्या मनाने तिला सांगितलं असल्या मूर्ख माणसाबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. काका घरी जायला निघाले खरे पण त्यांना दादाचा फोन आला, त्याने त्यांना लगेचच येण्यास सांगितले. एखाद तासभर आपण ऑफिसमध्ये काढू असं ठरवून त्यांनी बस पकडली. ते पोहोचले तेव्हा साडे तीन वाजून गेले होते. आत आल्याबरोबर ते स्वतःहून केबिनमध्ये शिरले. आत जवळ जवळ सात आठ माणसं बसली होती. बहुतेक उद्याच्या दरोड्यातले संगी साथी असावेत असे त्यांना वाटले. काही चेहरे त्यांना माहीत होते, बाकीच्यांकडे नवखेपणाने पाहत ते दादासमोर उभे राहिले. सूर्याला ते असे बीन बोलवता आलेले आवडले नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरच्या नाराजीकडे दुर्लक्ष करीत दादाने त्यांना बसायला सांगितले. तसे दादा आणि सूर्या खूश होते. कारण सकाळीच दिवाणजींनी दीड कोट रुपये आणून दिले होते. पन्नास लाख काम झाल्यावर देण्याचे ते बोलले होते. खरंतर दादाला आवडले नाही. पण उद्या बँकेतून काही रोकड नक्कीच मिळेल या भरवशावर त्याने दिवाणजींना नाराज केले नाही. मात्र त्याने त्यांना इस हाथ ले उस हाथ दे या बोलीवर खोपड्या देण्याचे वचन दिले. जर काही दगा फटका झाला तर सगळ्यांची जान घेऊ ही धमकी द्यायला तो विसरला नाही. मग त्याने काकांना उद्याचा प्लान समजावून सांगितला. काकांचं काहीच काम नसल्याने त्यांना निदान रविवार सकाळ शिवाय ऑफिसला येण्याची गरज नाही असे त्याने ठरवले होते. पण त्यांनी जेव्हा तो बोलवेल तेव्हा त्यांनी जवळपासच राहावे व ती वेळ कोणतीही असू शकेल. सगळेच जण म्हणजे तो स्वतः, जीवनदान, रमजान आणि मिस्चिफ सोडून बाकीचे आज रात्री नऊ पासून आजींच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसतील. त्यांच्या बरोबर एक गॅस कटर असेल. तो स्वतः आणि तिघे शनिवारी रात्री साडेनऊ पासून जातील. शनिवारी संध्याकाळी सात वाजता, आजींच्या फ्लॅटमध्ये लपलेले चौघे सुरक्षितता पाहून बँकेत उतरतील. सर्व जण तोंडाला प्राण्यांचे मुखवटे घालून शिरतील. प्रत्येकाकडे एकेक घोडा असेल. शिवाय एकेक धारदार सुराही असेल. फ्लॅटमध्ये असलेल्या दोऱ्या, पोती, पहार, घण, गॅस कटर बँकेत सुरक्षित पणे उतरवतील आणि ठरल्याप्रमाणे आपापल्या जागा धरून ठेवतील. वरच्या फ्लॅटमध्ये फक्त अकडा असेल (हे त्याला व सूर्याला आवडले नव्हते). हालचाली व काम करताना कोणताही आवाज केल्यास त्याला ताबडतोब गोळ्या घालण्यात येतील. आजींच्या फ्लॅटची चावी जीवनदान कडे असेल. सगळं काम रात्री दोन वाजेपर्यंत पुर करावं लागेल. मग ऑफिसमध्ये बसलेल्या काकाला सगळा माल आणून दिला जाईल. तो सगळा हिशेब करून पुढे त्याच्या बरोबर बसून तो स्वतः त्याचं वाटप आणि विल्हेवाटीचा प्लान ठरवील. यात सूर्याला कुठेही स्थान न दिसल्याने, त्याने आधीच थोडाफार हात मारायचा ठरवला होता. त्यात अकडाही सामील होता. पण अकड्याला आजींच्या फ्लॅटमध्ये बसायचं असल्याने तो नाराज होता. अशा रितीने सगळा प्लान काकांसाठी थोडक्यात सांगितला गेला. सगळ्या गोष्टी नीट होतील आणि कोणतीही अडचण आली नाही तर बनवलेले वेळेचं पत्रकही त्याने काकांना दाखवलं. एकूण पावणे दोनशे लॉकर्स होते. त्यात ए, बी आणि सी प्रकारचे लॉकर होते. ए, सर्वात मोठा, बी त्यापेक्षा लहान आणि सी, सर्वात लहान. इंजिनियर आणि राजासाब यांनी ही माहिती कुठून मिळवली कोणास ठाऊक.आता फक्त कुठल्या लॉकर मध्ये काय आहे आणि कोणते रिकामे आहेत, ही माहिती मिळवणं त्यांना शक्य झालं नव्हतं. आणि तेवढा वेळही नव्हता. काही लॉकर्स रिकामे निघतील अशी अटकळ होती. पण नक्की किती हे नशिबाचा भाग होता. त्यात पंधरा नंबरचा लॉकर महत्त्वाचा होता. पण तो मोठा होता की लहान? खरंतर पंधरा नंबरच्या लॉकरसाठीच या बँकेत प्रयत्न केला जात होता. नाहीतर अशा भुक्कड बँकेवर दरोडा म्हणजे चक्क टाइम पास, असं दादाने त्याचे मत मीटिंगमध्ये सांगितले. दादाने सगळ्यांसमोर काकांना दोन लाखाची बंडले दिली. सूर्याला आवडले नाहीच. ती सगळ्यांसमोर देण्याचा दादाचा हेतू काकांना समजला नाही. काकांनी ती बंडलं लगेच उचलली नाहीत. ते पाहून दादाला आपण कमी पैसे देत आहोत असे वाटून त्याने आणखी एक हजाराच्या नोटांचं बंडल दिलं. पण काकांना खरा प्रश्न होता, तो हे सगळं घरी घेऊन जाण्याचा. आज रमेश जायचा होता. त्यांची अडचण ओळखून दादाने त्यांना एक पिशवी दिली. जी अतिशय मळकट रंगाची आणि भाजीची म्हणून खपली असती. पाच वाजायला आले होते. काकांची जाण्याची इच्छा पाहून दादाने त्यांना परवानगी दिली. काका पिशवी घेऊन बाहेर पडले. किंचित येणाऱ्या पावसाने बाहेरचे वातावरण धुंद केले होते. आत्ता खरंतर त्यांना साधनाकडे जाण्याची इच्छा झाली होती. पण ती शक्यता आता संपली होती. साधनाने संबंध संपवायला नको होते. आणि म्हणूनच इतके पैसे कशासाठी आणि कोणासाठी घ्यायचे या विचाराने ते पैसे घेताना थांबले होते.


काका घरी पोहोचले तेव्हा सहा वाजून गेले होते. जाताना ते ताजी भाजी घेऊन जाण्यास विसरले नाहीत. पिशवी खरोखरीच भाजीने भरलेली दिसत होती. म्हणजे संशयाला कारण नको. गेल्या गेल्या रमेशने दार उघडले. नीता तिथेच उभी होती. तो नाराज दिसला. " हे काय तुम्ही दुपारी येणार होतात ना? आता काय रात्री दहा वाजेपर्यंत निघावे लागेल. फार थोडा वेळ मिळतो हो पुढच्या बोलण्यासाठी. तुम्ही जर असे ठरल्या वेळी येणार नसाल तर नीताला तुमच्यावर सोपवून जाणं म्हणजे धोकादायक आहे "...... काका सॉरी म्हणाले. हातातली पिशवी आत नेऊन भाजी त्यांनी काढून ठेवली. आणि पिशवी त्या दोघांचं लक्ष नसताना डबल बेड खाली फेकली. आज रात्री तरी रमेश घरी झोपणार नाही. नीताचं लक्ष नसताना आपण पिशवी काढून आपल्या कपाटात ठेवून देऊ. पण आज रात्री जर ऑफिसला जायला लागलं तर.....???? या प्रश्नाने ते बावचळले. ते बाहेर आले. आणि श्रेयाला घेऊन उभे राहिले. सामानाचं पॅकिंग चालू होतं. हॉलमध्ये सगळं सामान इतस्ततः पडलं होतं. मग ते त्यांना सामान भरायला मदत करू लागले. त्यांचं मन अर्थातच थाऱ्यावर नव्हतं. पण विषय बदलण्यासाठी दुसरं कोणतंही निमित्त त्यांना सध्या दिसत नव्हतं. नाहीतर रमेश भांडणाच्या वाटेवर कधीही येत असे. सगळं करेपर्यंत त्या सगळ्यांना आठ वाजले. जेवणं झाली. जायच्या आधी त्या दोघांना मोकळेपणा मिळावा म्हणून ते बाहेर निघाले. रमेश लगेचच म्हणाला, "अर्ध्या तासाचे दोन तास होणार नाहीत ना? " ...... काहीतरीच काय? असे हातवारे करून ते बाहेर पडले. त्यांनी खाली जाऊन सिगारेट घेतली. ते मेन रोडवर आले. नाही म्हटलं तरी ते दरोड्याशी संबंधित होतेच. त्यांना जरा काळजी वाटू लागली. एक दोन दिवसात आयुष्य परत जुगारावर लागल्यासारखं झालं होतं. त्यांच्या केसच्या निकालाचा आदला दिवस त्यांना आठवला. ते असेच बाहेर पडले होते. विश्वनाथ शेट्टीला भेटण्यासाठी. तेव्हा जेमतेमच जेवण गेलं होतं. पण घरी गेल्यावर रोहिणी होती. या असल्या परक्या वातावरणात किती आयुष्य अजून काढायचंय कोण जाणे. असले निराशेने घेरणारे विचार त्यांना नको होते. म्हणून ते तडक घरी गेले. जाताना त्यांना वाटले नीता रमेश येईपर्यंत माहेरी का जात नाही? म्हणजे तेवढी जबाबदारी कमी होईल. त्यांना लवकरच आलेले पाहून रमेश काहीच बोलला नाही. सगळेच जण साडेनऊ पर्यंत तयार झाले. जाताना रमेशने त्यांना नमस्कार केला. केवळ उपचार म्हणून. मग ते म्हणाले, " अरे तू नसताना नीताला जर माहेरी जावंस वाटलं तरी माझी काही हरकत नाही. " त्यावर त्यांच्याकडे न पाहता रमेश म्हणाला, " म्हणजे तुम्ही मोकळे केव्हाही जा ये करायला? काय? " मग ते म्हणाले, " अरे मी आपलं सहज म्हटलं. तू नाही आहेस, ती कंटाळेल. " रमेशने ते तेवढ्यावरच सोडलं.आता फक्त कुठल्या लॉकर मध्ये काय आहे आणि कोणते रिकामे आहेत, ही माहिती मिळवणं त्यांना शक्य झालं नव्हतं. आणि तेवढा वेळही नव्हता. काही लॉकर्स रिकामे निघतील अशी अटकळ होती. पण नक्की किती हे नशिबाचा भाग होता. त्यात पंधरा नंबरचा लॉकर महत्त्वाचा होता. पण तो मोठा होता की लहान? खरंतर पंधरा नंबरच्या लॉकरसाठीच या बँकेत प्रयत्न केला जात होता. नाहीतर अशा भुक्कड बँकेवर दरोडा म्हणजे चक्क टाइम पास, असं दादाने त्याचे मत मीटिंगमध्ये सांगितले. दादाने सगळ्यांसमोर काकांना दोन लाखाची बंडले दिली. सूर्याला आवडले नाहीच. ती सगळ्यांसमोर देण्याचा दादाचा हेतू काकांना समजला नाही. काकांनी ती बंडलं लगेच उचलली नाहीत. ते पाहून दादाला आपण कमी पैसे देत आहोत असे वाटून त्याने आणखी एक हजाराच्या नोटांचं बंडल दिलं. पण काकांना खरा प्रश्न होता, तो हे सगळं घरी घेऊन जाण्याचा. आज रमेश जायचा होता. त्यांची अडचण ओळखून दादाने त्यांना एक पिशवी दिली. जी अतिशय मळकट रंगाची आणि भाजीची म्हणून खपली असती. पाच वाजायला आले होते. काकांची जाण्याची इच्छा पाहून दादाने त्यांना परवानगी दिली. काका पिशवी घेऊन बाहेर पडले. किंचित येणाऱ्या पावसाने बाहेरचे वातावरण धुंद केले होते. आत्ता खरंतर त्यांना साधनाकडे जाण्याची इच्छा झाली होती. पण ती शक्यता आता संपली होती. साधनाने संबंध संपवायला नको होते. आणि म्हणूनच इतके पैसे कशासाठी आणि कोणासाठी घ्यायचे या विचाराने ते पैसे घेताना थांबले होते.

काका घरी पोहोचले तेव्हा सहा वाजून गेले होते. जाताना ते ताजी भाजी घेऊन जाण्यास विसरले नाहीत. पिशवी खरोखरीच भाजीने भरलेली दिसत होती. म्हणजे संशयाला कारण नको. गेल्या गेल्या रमेशने दार उघडले. नीता तिथेच उभी होती. तो नाराज दिसला. " हे काय तुम्ही दुपारी येणार होतात ना? आता काय रात्री दहा वाजेपर्यंत निघावे लागेल. फार थोडा वेळ मिळतो हो पुढच्या बोलण्यासाठी. तुम्ही जर असे ठरल्या वेळी येणार नसाल तर नीताला तुमच्यावर सोपवून जाणं म्हणजे धोकादायक आहे "...... काका सॉरी म्हणाले. हातातली पिशवी आत नेऊन भाजी त्यांनी काढून ठेवली. आणि पिशवी त्या दोघांचं लक्ष नसताना डबल बेड खाली फेकली. आज रात्री तरी रमेश घरी झोपणार नाही. नीताचं लक्ष नसताना आपण पिशवी काढून आपल्या कपाटात ठेवून देऊ. पण आज रात्री जर ऑफिसला जायला लागलं तर.....???? या प्रश्नाने ते बावचळले. ते बाहेर आले. आणि श्रेयाला घेऊन उभे राहिले. सामानाचं पॅकिंग चालू होतं. हॉलमध्ये सगळं सामान इतस्ततः पडलं होतं. मग ते त्यांना सामान भरायला मदत करू लागले. त्यांचं मन अर्थातच थाऱ्यावर नव्हतं. पण विषय बदलण्यासाठी दुसरं कोणतंही निमित्त त्यांना सध्या दिसत नव्हतं. नाहीतर रमेश भांडणाच्या वाटेवर कधीही येत असे. सगळं करेपर्यंत त्या सगळ्यांना आठ वाजले. जेवणं झाली. जायच्या आधी त्या दोघांना मोकळेपणा मिळावा म्हणून ते बाहेर निघाले. रमेश लगेचच म्हणाला, "अर्ध्या तासाचे दोन तास होणार नाहीत ना? " ...... काहीतरीच काय? असे हातवारे करून ते बाहेर पडले. त्यांनी खाली जाऊन सिगारेट घेतली. ते मेन रोडवर आले. नाही म्हटलं तरी ते दरोड्याशी संबंधित होतेच. त्यांना जरा काळजी वाटू लागली. एक दोन दिवसात आयुष्य परत जुगारावर लागल्यासारखं झालं होतं. त्यांच्या केसच्या निकालाचा आदला दिवस त्यांना आठवला. ते असेच बाहेर पडले होते. विश्वनाथ शेट्टीला भेटण्यासाठी. तेव्हा जेमतेमच जेवण गेलं होतं. पण घरी गेल्यावर रोहिणी होती. या असल्या परक्या वातावरणात किती आयुष्य अजून काढायचंय कोण जाणे. असले निराशेने घेरणारे विचार त्यांना नको होते. म्हणून ते तडक घरी गेले. जाताना त्यांना वाटले नीता रमेश येईपर्यंत माहेरी का जात नाही? म्हणजे तेवढी जबाबदारी कमी होईल. त्यांना लवकरच आलेले पाहून रमेश काहीच बोलला नाही. सगळेच जण साडेनऊ पर्यंत तयार झाले. जाताना रमेशने त्यांना नमस्कार केला. केवळ उपचार म्हणून. मग ते म्हणाले, " अरे तू नसताना नीताला जर माहेरी जावंस वाटलं तरी माझी काही हरकत नाही. " त्यावर त्यांच्याकडे न पाहता रमेश म्हणाला, " म्हणजे तुम्ही मोकळे केव्हाही जा ये करायला? काय? " मग ते म्हणाले, " अरे मी आपलं सहज म्हटलं. तू नाही आहेस, ती कंटाळेल. " रमेशने ते तेवढ्यावरच सोडले.

काका परत खाली गेले, आणि उस्मान टॅक्सी वाल्याला भेटले. तो ओळखीचा असल्याने तयार झाला. बरोबर दहा वाजता सगळेच जण विमानतळाकडे निघाले. टॅक्सीत असताना त्यांना फोन आला. ते घाबरले. आता दादाने तर बोलावले नाही? पण तो दादा नव्हता. तो होता संजीव जांभळे. रमेशने नापसंतीदर्शक आठ्या आणीत कोण आहे विचारले. काकांनी राँग नंबर म्हणून फोन बंद केला. विमानतळावर पोचल्यावर रमेशने त्यांना लगेचच जायला सांगितले. कारण तो आत गेल्यावर हे बाहेर उभे राहून काय करणार? तो गेला. त्याला पुन्हा पुन्हा हात करीत ते तिघे काही वेळ उभे राहिले. ते उस्मानच्या बोलावण्याने जागे झाले. "चलिये काकाजी, बच्चे बडे होते है तो इतनाही रिश्ता रहता है, इनके साथ, सब खुदा का किया कराया है. " भारतातला हिंदू असो वा मुसलमान, तो तत्त्वज्ञान झाडल्याशिवाय राहत नाही. पण तो म्हणाला ते खरं होतं. काकांना ते चांगलंच जाणवलं. ते मनात म्हणाले, " हमारा रिश्ता टूटकर अब जमाना हो गया भाई. "......... ते घरी पोहोचले तेव्हा जवळ जवळ

बारा वाजत होते.
त्यांचं नशीब जोरावर होतं. घरी आल्याबरोबर नीता फ्रेश होण्यासाठी आत गेली. तेवढ्यात त्यांनी बेडखाली वाकून आपली पिशवी काढून घेतली. बाल्कनीत जाऊन आपल्या कपाटात ठेवली. एवढ्याश्या कामाने त्यांचा श्वास वर खाली झाला. जसं काही घडलंच नाही असा चेहरा करून ते बाल्कनीत जाऊन उभे राहिले.

****************************************************************************************************

सखारामला आश्चर्य वाटलं . हे साहेब लोक नेहमीच डोकेबाज असतात असं नाही. त्याला कळेना आजींच्या फ्लॅटवर लक्ष ठेवून काय मिळणार. कटीलच्या ऑफिसवर लक्ष ठेवलं तर नक्कीच काहीतरी हाती लागेल. सखारामने त्याला सांगितलं म्हणून आजींच्या फ्लॅटकडे जायचं ठरवलं . पण त्याने प्रथम कटीलच्या ऑफिसकडे काय हालचाल आहे ते पाहूनच जाण्यासाठी तिकडे मोर्चा वळवला. तो तिथे पोहोचायला आणि काका त्याच्या ऑफिसमध्ये शिरायला एकच गाठ पडली. त्याने स्वतःची पाठ थोपटली. हा म्हातारा जेव्हां आपल्याला बांगडी सापडली तेव्हां तिथेच होता. कोणी काही म्हणो पण म्हाताऱ्याचा किशाच्या टोळीशी संबंध असलाच पाहिजे. आपण आणखी थोडावेळ थांबू या. तो ज्या बस स्टॉपजवळ उभा होता, तिथल्या हॉटेलवाल्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने वेटरला पाठवून सखारामला बोलवून घेतलं. " काय साहेब ? आज इकडे ड्यूटी लागली वाटतं ? खुर्ची देऊ का बसायला ? " मालकाने मनापासून विचारलं होतं. साध्या कपड्यात असूनही ह्याने कसं ओळखलं. पण सध्या त्याला त्या हॉटेलमालकाची अडचण वाटली. मग सखाराम म्हणाला, " कसली आल्ये ड्यूटी ? बसची वाट पाहतोय. " ....... मग मात्र मालक म्हणाला, " अहो काय सांगता हवालदार साहेब, दोन चार वक्ताला इथंच दिसलात की. आमची काय मदत पायज्ये अशेल तर सांगा. वाईच बसा की, चाय पानी घ्या. " .... ‌ सखारामच्या लक्षात आलं , ह्याला फक्त संशय आलाय, आपण नक्की कोणावर नजर ठेवतोय हे त्याला कळलेलं दिसत नाही. आता जागा बदलली पायजे. " चला , मी निघतो. ड्यूटीवर जायला उशीर होतोय. असं म्हणून तो पुढचे प्रश्न सुरू होण्याच्या आत सटकला. जवळ जवळ तास दोन तासानंतर काका बाहेर आलेले दिसले. त्यांच्या हातात पिशवी होती. ती कशाने भरली असेल ? जाताना पिशवी म्हाताऱ्या जवळ नसावी. काय बरं असेल पिशवीत ? सखारामने डोकं खाजवून पाहिलं . पण त्याला सुचेना. आणखी अर्धा तास त्याने बदललेल्या जागेवरून लक्ष ठेवलं. पण काही हालचाल दिसली नाही. तो कंटाळला. आता मात्र आजींच्या फ्लॅटकडे मोर्चा वळवावा. असा विचार करून तो निघाला. पण त्याला अजूनही आजींच्या फ्लॅटवर लक्ष ठेवण्याची गरज वाटत नव्हती. तेव्हां सहा वाजत होते. आज स्टेशनला केव्हा जायचं ते त्याला कळत नव्हतं. त्याने साधारण तासभर आजींच्या बिल्डिंगवर लक्ष ठेवण्याचे ठरवले. तो बस पकडून निघाला . साडेसहा वाजून गेल्यावर तो तिथे पोहोचला. आजींच्या फ्लॅटचं मुख्य दार दिसेल अशा रितीने तो समोरच्या फुटपाथवर उभा राहिला.
जवळच बस स्टॉप होता. अर्थातच कुलुपाचा भाग त्याला दिसत नव्हता. तिथे काहीच हालचाल होणार नाही याची त्याला खात्री होती. सात वाजायला आल्यावर त्याने इन्स्पे. श्रीकांतना फोन लावला.


त्यांनी त्याला किमान रात्री दहा वाजेपर्यंत पाळत ठेवायला सांगितलं. त्याला खरंतर कंटाळा आला होता. आपण उगाचंच फोन केला. निदान पो. स्टेशनला तरी जाऊन बसता आलं असतं. सूर्याच्या ऑफिसमधून निघालेल्या म्हाताऱ्याच्या पिशवीत काय असावं ? तो विचार करू लागला. तो आत गेला तेव्हां पिशवी नव्हती. म्हणजे आत काहीतरी असणारच. माल असेल का ? किशा अमली पदार्थांचा धंदाही करीत असावा. या म्हाताऱ्या सारख्या माणसाचा कुणाला संशय येणार नाही हे लक्षात घेऊन त्याचा मालाची डिलिव्हरी करायला उपयोग करून घेत असतील. त्याचे विचार धावू लागले. पण आत पैसे असतील असं त्याच्या मनात आलं नाही. चुकलंच ! आपण त्या म्हाताऱ्याचा पाठलाग करायला हवा होता. मग त्याने जवळपासचं हॉटेल पाहून स्वतःची पेटपूजा करून घेतली . आणि एक दोन पेग रिचवून तो कामावर परत आला. आता जरा त्याला आत्मविश्वास वाटू लागला होता. बस स्टॉप जवळची एक जागा त्याने पक्की केली. तिथे एक झाड असल्याने समोरच्या फूटपाथवरून कोणालाही दिसलं नसतं. त्याने एक जांभई दिली . सकाळी तो घरी होता, तरी त्याला फारशी झोप लागली नव्हती. बायको अशी विचित्र होती की ती काही ना काही काम मागे लावायचीच. त्याने तिला खूप सांगून पाहिलं होतं. पण ती एकच उत्तर द्यायची, " तुमचं राहू द्या हो. तुमचा कमिशनर तरी एवढं काम करतो का ? तो मस्त घरी जाऊन झोपत असेल. एकट्यावरच तुमचं खातं चालतं वाटतं ? जास्तीच्या कामाचा काही पगार तर बाजूलाच राहिला. " तिचं ऐकण्यापेक्षा त्याने तिने सांगितलेलं काम करणं पसंत केलं. खरंतर हा संवाद त्यांचा सारखा होतच असे. पण कधी कधी ती फारच छळायची, तो तिला एखादी तरी ठेवून द्यायचा. मग चार दिवस तरी विश्रांती .....
आठ वाजले होते. कुठूनतरी त्याला आठाचे ठोके ऐकू आले. अजून दोन तास , तेही काही घडण्याची शक्यता नसलेल्या रस्त्यावर, त्याने निराशेने तोंड वाकडं केलं. असं कितीही झालं तरी तो तिथे उभा राहणार होता . कामचोरी आपल्या रक्तातच नाही असे , त्याने मरगळलेल्या मनाला उभारी येण्यासाठी सांगितले. अजून काहीच घडत नव्हतं. पावसाला मात्र सुरुवात झाली. हातातली छत्री उघडत त्याने बस स्टॉप वर एक जागा निश्चित केली. आणि छत्री बंद करून थोडं पेंगण्याचं ठरवलं. त्याला केव्हा गुंगी आली ते कळलंच नाही. ........

******* *********** ***************** ******************** *

मीटिंग संपल्यावर सूर्याने काण्याला भेटायला सांगितलं होतं. त्याला फोन करून जवळच एका अंधाऱ्या गल्लीत असलेल्या छोटेखानी " माय डियर बार " कडे यायला सांगितलं. दहा मिनिटातच ते दोघे बारजवळ आले. इकडे तिकडे पाहत ते दोघे बारमध्ये गेले. बारला नक्की किती कोपरे होते कुणास ठाऊक . लहानश्या जागेत जास्तीत जास्त कोपरे वापरून तयार केलेल्या गिचमीड बारमध्ये आधीपासून दोन तीन गिऱ्हाईकं बसली होती . ते सगळे नशील्या स्वर्गात डुंबत होते. त्यांना उरलेल्या तीन चार टेबलांवर कोण बसलंय याची पर्वा नव्हती. सूर्या आणि काण्या आत आल्याबरोबर मालक सॅमसन पुढे आला. सूर्याला ,तो दादाचा माणूस म्हणून ओळखत होता. लहानशी ,लालसर ओठांभोवती कोरलेली दाढी आणि त्यात मिसळलेली बारीक मिशी आणि लहान बारीक बारीक तपकिरी डोळे त्याची या धंद्यातली ज्येष्ठता दाखवीत होती. त्याचं बुटकेपण आणि टक्कल या दोन दोषाना त्याने बॉडी बिल्डिंग करून लपवलेलं होतं. जो पाहील त्याचं लक्ष त्याच्या शरीर सौष्ठवाकडे आधी जात असे आणि त्या आकर्षणातून सुटल्यावर त्याचं टक्कल आणि बुटकेपण पाहणाऱ्याला जाणवत असे. निळा गर्द खोचलेला फुल शर्ट आणि त्यावर त्याने लावलेला जाळीचा पांढरा टाय त्याला शोभून दिसत होता. कोणत्याही गिऱ्हाईकाकडून पैसे कसे वसूल करायचे हे त्याला चांगलंच अवगत होतं. एक तर त्याच्या शरीराकडे पाहून पैसे न देण्याचं धाडस कोणी करीत नसे. त्याचीही एक लहानशी पण टोळी होती. चांगला परदेशी माल बाटली आणि बाईचा कसा आणायचा त्यात त्याचा हातखंडा होता. त्याला सूर्या आणि दादा बद्दल एक प्रकारचा भीतियुक्त आदर होता.त्याच्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला सूर्याला बिलकूल वेळ नव्हता. किंबहुना तो बारमध्ये पिण्यासाठी आलाच नव्हता. पण सॅमसनने लवून अभिवादन केल्यावर त्याच्या नम्रतेला मान म्हणून सूर्याने क्वार्टर रम मागवली. त्यांचं पेय टेबलावर ठेवल्यावर आदबीने वाकत सॅमसन मागे झाला आणि कौंटरवर गेला. बारमध्ये बेताचा उजेड असल्याने कोणालाच एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते. काण्याने आणि त्याने पेय तोंडात घोळवलं. मग सूर्या म्हणाला " कल रातको तेरेको जो फ्लॅट दिखाया था वहॉ दस बजे आना है. जहॉ अपना गाडी खडा रहेगा वहॉ छुप जाना और मेरे फोनका वेट करना . जो बैग या अटॅची मै दूंगा वो लेकर मेरे फ्लॅटपर जाना. मै कहा रहता हूं , तुम्हे तो मालूम है. ये मेरे घरकी एक चाबी दे राहा हूं. संभालके रखना. गुम मत करना. " काण्या मानेनेच हो म्हणाला. उरलेलें पेय संपल्यावर सूर्याने खिशातून नोटांचं बंडल काढीत त्याला दिले, आणि म्हणाला, " ये ते रा मेहनताना , एड्वान्समे दिया है. " त्याने काण्याकडे पाहिले. ते कमी आहेत असे वाटून त्याने , " उससे ज्यादा पूरा काम होनेके बाद दे दूंगा. होशियारीसे काम करना. अब पहले तू बाहर जायेगा दस मिनिटके बाद मै जाउंगा. असं म्हणून त्याने सॅमसनला खूण केली , तो तत्परतेने पुढे झाला. नवीन लहानसं पेय त्याने आणण्यास सांगितले. बोलल्याबरोबर पेय त्याच्या टेबलावर हजर झाले. पेय संपल्यावर तो जायला निघाला. बिल देण्याचा प्रश्नच नव्हता. सॅमसन कधीही बिल विचारीत नसे, पण अधून मधून मिळणाऱ्या हप्त्याची वाट बघत असे. बदल्यात त्याला तोंड बंद ठेवावं लागे. सूर्या बाहेर पडला. पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन बसला. आठ वाजून गेले होते. काण्याचं काम आता वाढत होतं. पण त्याला पैसे चांगले मिळत होते. फक्त काम करताना पूर्वीची चपळाई कमी पडत होती. त्याचा पाय अधू झाला होता. त्याने साधारण तासाभराने आजींच्या फ्लॅटकडे जाण्याचं ठरवलं. आता दादावरही नजर ठेवायची होती. पण दादा ऑफिसमधून क्वचितच बाहेर पडत असे. हा ऑफिसमध्येच राहतो की काय असं काण्याला वाटायचं त्यामुळे त्याला अजून वाळकेश्वरला असलेल्या दादाच्या फ्लॅटचा अजून पत्ता लागत नव्हता. म्हणजे त्याला तसा पत्ता माहीत होता. पण तिकडे विनाकारण जायला मिळालेलं नव्हतं. दादा फार फार तर त्याच्या फॉकलंडरोडवरच्या मावशीकडे जायचा. अजूनही दादाचा त्याला थांग लागत नव्हता. पुढे वेगळ्या काही सूचना नसतील तर आजींच्या फ्लॅटकडे जायला हरकत नाही. आता तो परत ऑफिसबाहेरच्या एका पान टपरी जवळ उभा राहून सूर्याचा मधल्या वेळेतल्या काही सूचना असतील तर वाट पाहत होता.


******* ********** ******** ********* ********** ******** ********* ********* ********* ********

ठरल्याप्रमाणे अकडा , इतर तिघे आजींच्या फ्लॅटमध्ये जाऊन बसण्यासाठी लागणारे सामान गोळा करण्यात गुंतले होते. आणखी एका नव्या वस्तूची आठवण दादाला झाल्याने त्याने प्रथम सूर्याला विचारले. "बैंकमे उतरनेके बाद लाइट कहांसे जलाओगे ? या टॉर्च वापरेंगे ? कुछ सोचा है इसके बारेमे ? " ..... थोडावेळ विचार करून सूर्या म्हणाला, " इसमे क्या बडी बात है. अंदर जाके लाइट तो लगाही
लेंगे " त्याच्या म्हणण्याला बाकीच्यांनी होकार भरला. ते ऐकून दादा म्हणाला, " तुम लोगोंका दिमाग कभी चलता भी है ? वहां जाके लाइट जलाओगे तो बाहरसे दिखेगा नही ? सिर्फ झपटा मारके लूटनेके सिवाय तुम लोगोंको आता भी है कुछ ? " जाने दो टाइम बरबाद मत करो. जाकर बाहरसे "हॅट लाइटस "खरीदके लाओ. " ....... अकडा म्हणाला, " ये क्या चीज है दादा ? " त्यावर दादा वैतागून म्हणाला, " पहले लेके आओफिर बताता हूं. किसीने भी इसपर सोचाही नही. सिर्फ गैंगका दादा बनके कुछ होता नही है, समझे ? " शेवटचा शेरा सूर्या करता होता. त्याला तो जाणवला. याचा अर्थ दादाला आपल्या हेतूची कुणकुण लागली असावी. पण तो काही न बोलता गप्प राहिला. अकडा हॅट लाइटस आणायला गेला अर्ध्या तासाने तो ते लाइटस घेऊन परत आला. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाने ते लाइटस डोक्यावर लावून पाहिले. काहींना ते फारच आवडले. त्यांनी घरच्या साठी असे लाइटस आणायचे मनोमन ठरवले. काहीच्या अडाणी डोक्यात , घरात लाइट नसताना असे लाइट लावून फिरण्याचंही मनात आलं. ते त्यांनी बोलूनही दाखवलं. दादाला त्यांच्या ज्ञानाची कीव आली. खरंतर कामाला जायला उशीर होत होता. मग दादानेच आजींच्या फ्लॅटमध्ये जाण्याची वेळ बदलली. तो म्हणाला, " ऐसा करो फीर एक बार प्लान पर सोचो. ज्यादा टाइम अभी गया तो फिकीर नही . लेकीन काममे पॉब्लेम ( म्हणजे प्रॉब्लेम) नही आना चाहिये. " असं म्हंटल्यावर त्या सगळ्यांनी दादा बरोबर प्लानची उजळणी केली. कोणत्या कामाला किती वेळ लागला पाहिजे त्याचं वेळापत्रक जसं बँकेत आजकाल सापडतं तसं. आता सव्वादहा झाले होते. एकेक करून सगळेच बाहेर उभ्या असलेल्या गाडीमध्ये सामानासहित जाऊन बसले. बरोबर जीवनदान होता. तो फ्लॅट बंद करून परत येणार होता. म्हणजे त्याच्याकडे फ्लॅटची चावी राहिली असती. पाच दहा मिनिटातच गाडी निघाली. पावसाची बुरबुर चालूच होती मध्ये एखाद तासभर पाऊस येऊन गेला असावा असे त्यांना वाटले. अर्ध्या पाऊण तासात ते आजींच्या बिल्डिंगच्या खाली असलेल्या एका मोठ्या झाडाच्या सावलीत
पोहोचले. हिराला कोणतीही गोष्ट सांगावी लागत नसे. तो होताच तसा. प्रसंगानुरूप तो हल्ला करण्यातही तरबेज होता. दूर बस स्टॉपवर पेंगणाऱ्या सखारामची झोप गाडीच्या आवाजाने मोडली. रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती. म्हणून सखारामचं लक्ष समोरच्या फुटपाथकडे गेलं. पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियोला थांबताना पाहून त्याला बरं वाटलं. ही गाडी कटीलची आहे आता यातून कोण उतरतंय हे पाहण्यासाठी तो आतुर झाला. पण जवळ जवळ पंधरा मिनिटं तरी कोणीच उतरलं नाही. त्याला नक्की खात्री होती की काहीतरी घडणार आहे. त्याने एकदा घड्याळाकडे पाहिलं, साडेदहा वाजून गेले होते. आपल्याला स्टेशनला जायला हवं याची त्याला जाणीव झाली. आणि आपण बराच वेळ झोपलो याचीही त्याला खंत वाटू लागली.

गाडीत बसलेले चौघेजण विचार करीत होते सामानासहित फ्लॅटमध्ये जायचं कसं ? बँकेभोवती दोन वॉचमन फिरत होते. अर्धी फेरी मागच्या बाजूचा वॉचमन मारी आणि तिथे त्याला पुढच्या बाजूचा वॉचमन भेटला की तो जागेवर जाई. बँकेच्या कुलूपबंद आणि सील केलेल्या दरवाज्यावर एक लाइट जळत होता. त्याचाच प्रकाश आणि रस्त्यावरच्या बीएमसीच्या लाइटांचा येणारा मंद प्रकाश एवढाच काय तो उजेड होता. मध्येच एखादं वाहन गेलं की रस्ता उजळायचा. त्यात पावसाच्या पडणाऱ्या तुरळक धारा दिसत. ते गेल्यावर मात्र काही प्रमाणात विरघळत जाणाऱ्या अंधाराचं साम्राज्य पसरत होतं. रस्त्यावरून वाहणारे पावसाचे पाणी खळखळाट करीत गटारांमधून वाहत होते. बँकेच्या बिल्डिंग मधील काही फ्लॅटच्या खिडक्यांमध्ये अजूनही जाग होती. पण असे फ्लॅट दोन तीनच होते. त्यात साठ्यांचा फ्लॅट होताच. त्यांची मुलं अमेरिकेत असल्याने दोघे म्हातारा म्हातारी बारा साडे बारापर्यंत बहुतेक वेळा जागत. साठे मात्र अधून मधून कॉरिडॉरमधून फेऱ्या मारायचे. त्यांनीही गाडीचा जवळून येणारा आवाज ऐकून रस्त्यावर पाहिले होते. आणि ती गाडी झाडाखाली थांबल्याचे पाहिले होते. पण लक्ष दिले नाही अश्या कितीतरी गाड्या इथे थांबतात. शेवटी ही मुंबई आहे. जे असेल ते फक्त तुम्ही पाहू शकता. क्वचित साठ्यांसारखी कारवाई पण करू शकता पण त्यासाठी तुम्ही साठे असायला हवं. असो . गाडीतली पार्टी अजूनही उतरत नव्हती. हिरा मांजराच्या पावलांनी खाली उतरला आणि झाडाच्या सावलीच्या भागात उभा राहिला. त्याचं लक्ष रात्र असून कावळ्यासारखं होतं. समोरच्या फुटपाथवरच्या सखारामने हिरा उतरल्याचं टिपलं. त्याने बस स्टॉपच्या सावलीतून , रस्त्याच्या अंधाऱ्या भागातून रस्ता ओलांडण्याचं ठरवलं. एकही वाहन येत नव्हतं. पावसाचा जोर थोडा वाढला. सखारामने हातातली दोन घड्या होणारी छत्री गुंडाळून खिशात कोंबली. आणि तो सापासारखा निघाला. बिल्डिंगमधले उरले सुरले लाइटही बंद झाले. अगदी साठे मामांसहित. पूर्ण बिल्डिंग अंधारात बुडाली. हिराने झाडाच्या सावली सारख्या भागात आस्ते आस्ते आवाज न करता एकेक पोत काढायला सुरुवात केली. त्याला मागून कोणी येणार आहे याची कल्पना नव्हती. त्याने काही नग काढले. तेव्हा सखारामने रस्ता लांबून ओलांडला होता. समोरासमोर रस्ता ओलांडून चालणार नव्हतं. दबक्या पायांनि चालत असलेला सखाराम आता झाडापासून फक्त पन्नास एक फुटांवर होता. त्याचं सगळं लक्ष हिराच्या हालचालींकडे आणि त्याने बाहेर काढलेल्या पोत्यांकडे होतं. हिरा हुशार होता. त्याने फार सामान बाहेर काढलं नव्हतं. तो गाडीच्या सावलीच्या भागात लपला. सखाराम सावकाश पावलं टाकीत येत होता. त्याला आपण कशावर पाय देतोय हे लक्षात आलं नाही . त्याचा पाय एका अती मऊ वस्तूवर पडला .ते शेण होतं . काही कळायच्या आतच तो घसरून "च्या मारी " म्हणत रस्त्यावर पडला. त्याची शिवी आणि पडण्याचा आवाज ऐकून हिराने मागे पाहिले. सखाराम आणि तो यांच्यात आता अंतर कमी होतं. तो परत लपला. सखाराम पुन्हा दबक्या पावलांनी गाडीकडे सरकला. हातातली छत्री खांद्यावर धरीत तो गाडीजवळ आला. त्याला आता आत बसलेले चौघेजण सावल्यांसारखे दिसत होते. हिराने त्याची हालचाल पाहिली आणि मागच्या बाजूने येऊन त्याच्यावर केव्हा झडप घातली त्याला कळलं नाही. मानेभोवती पडलेला विळखा सोडवण्यासाठी सखारामला चांगलीच धडपड करावी लागली. श्वास घुसमटू लागला. सर्व बळ एकत्र करून त्याने आपली कोपरे विळखा घालणाऱ्याच्या बरगड्यांमध्ये मारली. हिरा थोडा सटपटला. पण असल्या खेळांवरचे उतारे त्याला माहीत होते. त्याने आपली पकड सखारामच्या गळ्याभोवती अधिक घट्ट केली . एवढं सगळं होताना फारसा आवाज येत नव्हता. पण अकड्याने ते पाहिले आणि तो रिकामं पोतं घेऊन उतरला. त्याने शिताफीने सखारामच्या डोक्यातून ते घालून हिराच्या मदतीने त्याचे हात पाय बांधले. त्याला मग आतल्या सगळ्यांनी मिळून गाडीत ओढला. त्याला जास्तीत जास्त बांधला. काही दोऱ्या त्यात वापरल्या गेल्या. समोरच्या वॉचमनना आवाज थोडा फार ऐकू गेला. पण कुठून आला ते कळलं नाही. आणि ड्यूटी सोडून कोण बघणार ? असे कितीक आवाज येतात. त्यामुळे ते गंभीरपणे त्यांनी घेतलं नाही , की त्यांना संशय आला नाही. त्यांच्या फेऱ्या चालूच राहिल्या. मग हिरा आत बसला आणि दबक्या आवाजात म्हणाला, " इसकी फिकीर नही करना, इसको मै ऑफिस ले जाउंगा. थोड्याच वेळात एकेक करून ते सगळेच आजींच्या फ्लॅटमध्ये सामानासहित घुसले. जीवनदान कुलूप लावून खाली आला. तो गाडीत बसला. आणि गाडी वेगाने कटीलच्या ऑफिसकडे निघाली. अशा रीतीने त्यांनी दरोड्याचा पहिला टप्पा तर ओलांडला.

पो‌ स्टेशनला नुसते बसून श्रीकांत सर कंटाळले. कोर्टातही पाहिजे तसं काम झालं नाही. उद्या दुपारशिवाय वॉरंट मिळण्याची शक्यता नव्हती. ते मिळणार कधी आणि आपण जाणार कधी. त्यात पुन्हा खंडागळे साहेबांची भीती होतीच. ते केव्हा कशाकरता बोलावतील , काही नेम नाही. त्यांना सखारामचं आश्चर्य वाटलं . हा अजून कसा आला नाही . त्याला तर ऑफिसला दहा वाजता यायला सांगितलं होतं. त्यांनी घाईघाईने त्याला फोन लावला. पण बेल वाजत राहिली . शेवटी उत्तर आलं. " नॉट रीचेबल. " त्यांनी दोन तीन वेळा पुन्हा प्रयत्न केला. उत्तर तेच. ..... ते वैतागले. पण त्यांच्या मनात हे आलं नाही की तो अडचणीत सापडला असेल. ते त्याच्या पिण्याला शिव्या देत राहिले. मग त्यांनी नाद सोडला. सध्या काहीच काम नसल्याने त्यांनी या केसमधल्या वेगवेगळ्या घटना पाहण्याचा ठरवलं. तश्या त्या फार नव्हत्या. किंबहुना अधिकृत अशा घटना कमी होत्या. बाकी सर्व अंदाज होते. तरीही सखारामला आलेला संशय, कटीलच्या ऑफिसमध्ये त्याचं जाणं, साठे मामांची तक्रार, किशाबद्दल आलेला खबऱ्याचा फोन. या सर्व घटनांची त्यांनी उजळणी केली. त्यांच्या मनात अचानक एक संशय रेंगाळत आला. किशा बँकेवर दरोडा घालण्याच्या विचारात तर नाही ? मग आजींचा काय संबंध ? अजूनही त्यांना आजींच्या फ्लॅटखाली
असलेली बँक या घटनांमध्ये जोडण्याचं सुचत नव्हतं. त्यांचं डोकं चालेना. नक्की असं अनुमान निघत नव्हतं. खरंतर खंडागळे साहेबांशी चर्चा करायला हवी. पण खंडागळे आपल्याला अगदीच कः पदार्थ समजतात. आपल्या तर्कांना ते महत्त्वच देत नाहीत. ते जरा मनातले विचार झटकतात न झटकतात तोच टेलिफोनची घंटी वाजली. ते केवढे दचकले. आता खंडागळे साहेब नसले तर बरं होईल. त्यांनी घाबरतच फोन घेतला. तो खबऱ्याचा फोन होता. " अरे साब, एक पक्की खबर है. किशा बैंक पर दरोडा डालनेवाला है. अभितक बैंकका नाम पता नही है, वो
भी जल्दही समझेगा.. " आणि फोन बंद झाला. सखारामचं नक्की काय चाललंय हे कळावं म्हणून त्यांनी आता त्याच्या घरी फोन केला. तो घरीही न आल्याचं त्याच्या बायकोने सांगितलं. आता तर त्यांना सखारामला काही दगाफटका तर झाला नाही ना अशी शंका येऊ लागली. आपण स्वतः जाऊन पाहिलं पाहिजे, पण आपण जाणार कुठे ? इतर काही विचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच फोन खणखणला. तो खंडागळे साहेबांचा होता. त्यांनी श्रीकांतना बोलावले होते. श्रीकांत अनिच्छेनेच त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्याकडे कुत्सितपणे बघत खंडागळे म्हणाले, "" उद्या सकाळी खबरीप्रमाणे बरोबर सहा वाजता आपल्याला वर्सोव्याला डॅनियलच्या बारवर रेडसाठी जायचंय. तयारीत राहा. आणि हो, आजींच्या फ्लॅटची केस इन्स्पे. डावलेंकडे द्या . ते जातील कोर्टात आणि करतील सगळं काही. फाइल त्यांना देऊन टाका. ओ. के ? यू मे गो नाऊ. " श्रीकांत
निराशेने निघाले. डावले त्यांना ओळखत होता आणि त्यांचा चाहता पण होता. त्यांनी घरी जायच्या आधी त्याला बोलावून केस समजावून सांगितली. सखारामबद्दल पण सांगितले. त्यांचे संशय , आडाखे, कमिशनर साहेबांना तात्काळ लागणारा अहवाल याचीही कल्पना दिली. त्यावर डावले म्हणाले, " सर तुम्हाला सांगतो, मी कोर्टात जाऊन वॉरंट मिळवण्याचं काम करीन . तुम्ही या केसला पहिल्या पासून हँडल केल्यामुळे निष्कारण तुमचं क्रेडिट मी घेणार नाही. काळजी करू नका. " मग श्रीकांत म्हणाले, " डावले सांगितलंय तसच करा , खंडागळे
साहेबांपासून सावध राहा. माझ्या क्रेडिटचा विचार करू नका, नाहीतर केस अंगाशी येईल. " डावल्यांना लक्षात आलं. प्रकरण गंभीर दिसतंय. तरीही त्यांनी श्रीकांत सरांना मदत करायचं ठरवलं. श्रीकांत सर सरळ घरी निघाले. त्यांनी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून सखारामला फोन केला. आणि तो घेतला गेला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्या उलट त्यांंना काहीतरी सरकवल्याचा आवाज आला. ते सावध झाले.
त्यांनी हॅलोही म्हंटलं नव्हतं. मग फोन वंद झाला आणि सरकवण्याचा आवाजही बंद झाला.

(क्र म शः)


🎭 Series Post

View all