कामथे काका (भाग 13)

Marathi Story
कामथे काका (भाग १३ वा )
---------------------
काका घरी गेले. पण त्यांना आपल्याला लवकरच पुढच्या दृष्टीने जागा शोधावी लागेल हेही लक्षात आलं. आता वेळ फार नव्हता. शनिवारपर्यंतचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा होता. पण त्यांनी याचा विचार केला नाही की त्यानंतरचे सगळेच दिवस नवीन नवीन घडामोडी घेऊन येणार आहेत. ते त्यांना कसं कळणार म्हणा. सगळीच सामान्य माणसं जवळचा विचार करतात आणि लांबचं स्वप्न पाहतात त्या साठीचा विचार मात्र कमी करतात. स्वतःची क्षमता प्रत्येक वेळी तपासून पाहणं हे काकांसारखी माणसं करताना दिसत नाहीत. म्हणून तर ते काका होते. असो. ते आले तेव्हा आठ वाजून गेले होते. रमेश नुकताच आलेला होता. पण त्याचा मूड चांगला असल्याने तो नीटच बोलला. त्यांना सध्या ऑफिसला जाण्याचा खास असा काही ताण नव्हता. तरीही ते सकाळी उठून ऑफिसला गेले. आज नेमका किशा नव्हता. आत सूर्या होता. त्याने त्यांच्या येण्याकडे दुर्लक्ष केलं. एखाद तासाभराने किशा आला. काकांना नमस्ते म्हणत तो केबिन मध्ये गेला. आज त्यांची खास मीटिंग होती. किशाने पण काकांना बोलवले नाही. किशा आत आल्या बरोबर सूर्याला बरं वाटलं. आज फेसला नक्कीच होणार. काका राहणार की जाणार. ते जाणार याची त्याला पक्की खात्री होती. ते दोघेही मग सूर्याला मिळालेल्या माहिती बद्दल विचार करीत बसले. सूर्याने अजून बॉंम्ब फोडला नव्हता. त्यामुळे किशा म्हणाला, " बस इतनी सी बात ? और तुमने मेरा टाइम बरबाद किया. " मग सूर्या शब्द जुळवीत म्हणाला, " आगे सून पाओगे ? " .....थोडावेळ जाऊन देऊन त्याने विचारले, " तुम अंदर क्यू गये थे ? किसकी वजहसे ? ..... याद है ? " किशा वैतागून म्हणाला, " देख साफ साफ बोल. मुझे पता है तुम काकाजीको पसंद नही करते. इसलिये उनके बारेमे तुम्हारी फालतू बाते मै नही सुननेवाला. जलदी बोल और वट ले. " ...अजूनही दादाला आपल्यावर भरवसा नाही असे वाटून सूर्या म्हणाला, " साधनाबेन याद है ? " किशाची कानशिलं तापली. छातीचे ठोके वाढले .दातावर दात दाबून तो म्हणाला ," उसका क्या? " ...... कुत्सितपणे सूर्या म्हणाला, " ये हरामी उसके पास जाता है. और वो उससे शादी करनेवाला है . ........" (प्रतिक्रियेसाठी थांबून तो म्हणाला) "अब कुछ नही बोलेगा क्या? " काही वेळ किशा काहीच बोलला नाही. मग तो दबक्या आवाजात म्हणाला, " मतलब तूने उसपर नजर रखी थी? " ...... "और क्या करता? तू तो सुननेवाला है नही. काकाका भूत तेरे दिमागसे उतरता कहां है? उस दिन तूने अकडाको भी नही बक्शा? अकडा अपना आदमी है. वो बहोत नाराज है तुमसे. " मग किशा म्हणाला, " देख, पहले तो क्या करना कया नही करना, किसपर भरवसा रखना और किसपर नही ये मै तय करता हूं. तुम अपना दिमाग काम पे लगाओगे तो ठीक रहेगा. अब निकल. " सूर्या नाराजीने उठला. केबिनच्या दरवाज्यापाशी गेल्यावर त्याला दादा म्हणाला, " तुम्हारे जैसे लोग तो मेरे उपरभी नजर रखेंगे. कुत्ता तो तेरेको नही कहूंगा, क्योंकी वो वफादार होता है. अब एक काम कर आज रात को श्रीपतको गुड्डीके यहां छोडकर, उसको बता दे, अगर श्रीपत कुछ करेगा तो उसकी पूरी जिम्मेदारी उसकी होगी. उसको उसने अपने ताबेमे रखना है, और वो होटल छोडके कही नही जाना चाहिये,... घरभी. ..... अभी ये हफ्ता पूरा होने तक मुझे कोई परेशानी नही होनी चाहिये. अगले हफ्ते फिरसे देखूंगा. " सूर्या बाहेर आला, पण त्याच्या कानशिलावरील शिरा रागाने थडथड उडत होत्या. तो किशाच्या जागी असता तर त्याने काकांना केव्हांच उडवलं असतं. नेहमीप्रमाणे तो काकांकडे दुर्लक्ष करून बाहेर पडला. ते पाहून दादाने काकांना आत बोलवले.
त्याने काकांकडे रोखून पाहिले. पण तो काहीही बोलला नाही. त्याने मनोमन काहीतरी ठरवलं. त्यांना बसायला सांगून तो म्हणाला, " काकाजी, कैसा राहा आपका नया बेटा? बेटा है ना आपको?.... अपना? " त्याने विचारले. काका हो म्हणाले. पण घाबरले होते. किशाला आपला संशय आलाय का? पुढचा प्रश्न काय असणार? त्यांची घालमेल ओळखून किशा म्हणाला, " कितने डरते है आप? छोडीये सब परेशानियोंको. "त्याच्या मनात संशय आलाय हे त्यांना चांगलंच कळलं होतं हे त्यालाही कळलं होतं. पण आता आपण समजुतीने वागावे हे बरे असे वाटून त्याने ठरवले की एकदा का यांना बाहेर घेऊन गेलो की या गोष्टी करायला वेळच वेळ आहे. ते बसले. मग तो ड्रॉवर मधून एक पाकीट काढीत हसून म्हणाला, " ये रखिये, जगा ढूंढनेके लिये लगेंगे. और ये भी काम कलही कर लेना. किरदार निभाने के लिये स्टेज तो तयार करना पडता है ना? ".... त्यांचा ताण त्याने थोडा कमी केला. आत्ता तरी किशाला बोलायचे नव्हते. पण साधनाचं नाव ऐकून त्याची सूड घेण्याची भावना उसळून आली. आता प्रत्येक दिवसाचं त्याला फार महत्त्व होतं. काका जाण्यासाठी उठले आणी तो म्हणाला, " काकाजी आप जा सकते है, लेकीन कलके कल ये काम होना चाहिये. कुछ दिक्कत पैदा होगी तो मुझे फोन कर दीजीये. और एक बात अपना एक आदमी मुंब्रा साईडमे है उसको जाके मिलो. जानेसे पहले मेरेसे उसका पता ले जाना, उसका नाम है बूढा चाचा. "..... काका हे सगळं कसं करणार अशी त्याला जरा शंका आली. पण अशा सगळ्यांच्याच अडचणी बघत बसलो तर कोणतंच काम होणार नाही. काका बाहेर आले, त्यांनी पाकीट उघडलं. आत हजाराच्या नोटांची दोन बंडलं होती. म्हणजे दोन लाख होते. त्यांनी पटापट ते पाकीट खिशात घातलं आणि दादाकडे जाऊन पत्ता घेतला.
ते बाहेर पडले. दुपारचे साडेबारा वाजत होते. आत्ताच कशाला जायचं? आधी घरी जाऊ. चालता चालता त्यांच्या मनात आलं. आत्ता आपल्याजवळ दोन लाख आहेत, बँकेतले लाख सव्वालाख. एवढे पैसे घेऊन पलायन केलं तर काय बिघडणार आहे? त्यांची परिस्थिती पासून पळण्याची उबळ जबरदस्त होती. काही सेकंदासाठी ते रस्त्यात थांबले. सव्वातीन लाख आणि आपण एकटे, साधना, रमेश, नीता, किशा त्याची टोळी आणि होणाऱ्या घडामोडी याच्यापासून सुटका. आपण आत्ताच जाऊन वाळकेश्वरच्या फ्लॅटमध्ये ठेवलेला आपला पासपोर्ट, व्हिसा आणि इतर काही कागदपत्रं घेऊन भारता बाहेर गेलो तर? साधनाचा विचार करण्याची गरजही नाही. पण ते असं करून एकटेच राहणार होते. त्याचं काय? माणसाला एकट्याला मजा करायला आवडत नसते किंवा जगायला आवडत नसते, तर इतर लोकही लागतात, बाजूचा समाजही कितीही तक्रार केली तरी हवाच असतो. त्यांच्या ह्या बालिशपणाला त्यांचं मन हसलं....... दुष्टपणे. जणू काही ते अडकलेत हे त्याला आवडत होतं. असलं दुष्ट मन प्रत्येकाच्या मनात असतं की काय असा विचार त्यांच्या मनाच्या चांगल्या भागात येऊन गेला. ते परत चालू लागले. त्यांना वाटलं आपण आधी जेवून घ्यावं. भूक लागल्याची त्यांना जाणीव झाली. म्हणजे जरा मन ताळ्यावर येईल. ते तसेच रस्ता बदलून नेहमीच्या हॉटेलमध्ये शिरले. काउंटरवरचा मॅनेजर त्यांच्याकडे पाहून ओळखीचं हसला. त्यांना बरं वाटलं. आपण जर पळून गेलो तर अशी ओळखीची माणसं आपल्याला भेटतील का? ते परत आहे त्या परिस्थितीचं समर्थन करू लागले. पुढील अर्धातास त्यांनी जे काही खायला मागवलं, ते खाऊन ते आरामात खुर्चीला टेकून बसले. आता त्यांचे विचार पुष्कळच स्थिर झाले होते. पळण्याचे विचार काहीवेळ तरी पळून गेले असावेत किंवा दडून बसले असावेत. त्यांना मनाचं हसू आलं. मनच सगळं निर्माण करतं. आणि आपण यशस्वी किंवा अयशस्वी ठरतो. त्यांना एकदम फार महत्त्वाचा शोध लागल्यासारखे वाटले. आणि सगळ्या विचारांतून सुटका झाल्यासारखे वाटले. म्हणून त्यांनी साधनाला फोन लावला. ती कामात गर्क होती तरी तिने त्यांचा फोन घेतला. "राग गेला वाटतं. " ती म्हणाली. त्यावर त्यांना ओशाळवाणी झालं. आपण किती लहानश्या गोष्टींवरून नाराज होतो असं त्यांना वाटू लागलं. ते काहीच बोलत नाहीत असं वाटून ती म्हणाली, " ऐकू येतंय ना? (ते हो म्हणाले) मग उत्तर का देत नाही आहात? " तिने विचारले. ते म्हणाले, " सॉरी. " मग ती म्हणाली, " आज येणार आहात का? उद्या मी सुटी घेतल्ये. सोनाला पण तुमची आठवण येत्ये " ....... ते सवयी प्रमाणे हो म्हणाले असते. पण उद्या त्यांना जागा शोधायची होती. ते आठवून म्हणाले, " मी आलो तरी उद्या येईन. " तिने फोन बंद केला. तिला राग आला असावा असं वाटून त्यांनी तिला परत रात्री फोन करायचं ठरवलं. आणि ते घरी निघाले. दोन वाजले होते. ते आत शिरले आणि नीताने त्यांना श्रेयाला पुन्हा ताप आल्याचे सांगितले. त्यांच्या मनात आत्ता ठाणा, कल्याण मुंब्रा येथे जागा पाहण्याचे होते. त्यासाठी त्यांना पेपरातल्या जाहिराती पाहाव्याश्या वाटल्या. पण नीताने त्यांना सांगितले, की जसे ते मित्राच्या मुलगी आजारी असताना त्याच्या घरी राहायला जातात तसेच त्यांनी आत्ता कुठेही जाऊ नये. तसेच इतर काही करू नये. श्रेयाला संध्याकाळी डॉक्टरांकडेही घेऊन जावे म्हणजे ती जेवणाची तयारी व इतर कामं करू शकेल. त्यांना बोलायला पर्याय ठेवला नव्हता की त्यांची इच्छाही विचारली नव्हती. त्यामुळे त्यांनी फ्रेश झाल्याबरोबर श्रेयाकडे पाहण्याचे ठरवले.
........ ................... ............... ................. ..................

संध्याकाळचे सहा वाजत आले होते. सूर्याने दादाच्या मदतीने केबिनमधले कार्पेट गुंडाळायला सुरुवात केली. आतल्या पायरीवर बसलेल्या श्रीपतला वरची हालचाल जाणवली. त्याने पटकन ज्या भोकशात तो हातापायांची जुडी करून झोपला होता तिथेच एक सापडलेलं लहानसं पिस्तूल चांगल्या हाताने भुयाराच्या दरवाज्याकडे रोखून आतल्या पायरीवर तयार होऊन तो बसला. नक्कीच कोणीतरी आत येत होतं. बरं झालं पिस्तूल सापडलं होतं. त्यात फक्त एकच गोळी आता उरली होती. बाकीच्या दोन गोळ्या त्याने रात्री उंदरांना घालवण्यासाठी वापरल्या होत्या. एक तर पोटात काहीही नव्हतं. अंगात तापही होता. सगळी कडे अंधार होता. तहान लागल्यामुळे त्याने एकदाच पाणी पिण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने ते फेकून दिले होते. मग तिथेच पडलेली एक दारूची चपटी बाटली त्याच्या मदतीला धावली होती, म्हणून बरं. बाकी गटाराच्या पाण्याचा वास त्याला घेऊन घेऊन दोन रात्री काढून एक दोन वेळा उलटीही झाली होती. प्रथम तो जाम घाबरला होता. सारखे उंदीर त्याच्या अंगावर उड्या मारीत होते. त्यांचा चिर्र चिर्र आवाज ऐकून त्याचे कान किटले होते. कुणाही माणसाचा आवाज येत नव्हता. आपण आता इथेच मरणार, याची त्याला खात्री झाली होती. हरामी लोकांनी जे काही ढकलण्यापूर्वी त्याला खायला घातलं होतं तेवढंच अन्न त्याच्या पोटात होतं. बाहेर दिवस असला तरी आत अंधारच होता. त्यात आणखी काल रात्री त्याला दिसलेला एक कुरतडलेला मानवी पाय पाहून तर त्याची झोपच उडाली होती. तरीही त्याला वाटलंच होतं, की काडेपेटीची काडी ओढल्यावर त्याच्या समोरच्या भोकशामध्ये काहीतरी पांढऱ्या कपड्यात लांबच लांब गुंडाळून ठेवलेलं दिसलं होतं. अर्थातच तो मुडदा होता. तोंडाचा भाग आतल्या बाजूला असल्याने त्याला तो कोणाचा मुडदा होता ते कळले नव्हते. म्हणजे या हराम खोरांनी कोणाला तरी मारून आत ठेवलेलं आहे. त्यामुळे काल रात्रीची झोप जी गेली होती ती अजून लागली नव्हती. त्याने रात्र बसूनच काढली होती. आता काडेपेटीतल्या काड्या संपल्या होत्या. काडीच्या पिवळट अंधुक प्रकाशात त्याला लांबवर कुठेतरी जाळी लावल्याचं दिसलं होतं. पण चावणाऱ्या उदरांना चुकवून तो तिथपर्यंत तो जाणार कसा. त्याने जाण्याचा प्रयत्नही केला नाही. अत्यंत घाणेरडं गटाराचं भयानक वास मारणारं पाणी ओलांडणं त्याच्या सारख्या सामान्य माणसाला जमणारं नव्हतं. म्हणून तो होता तिथेच बसून होता. त्यात समोरच्या भोकशातला मुडद्याचा कुरतडलेला पाय. ........ तो बदमाश असला तरी , सामान्य माणूस होता. खून , चोरी , जेल असल्या सापळ्यात तो कधीच सापडण्या इतका तो वाईट माणूस नव्हता. त्याच्या मनात आलं होतं भडवेगिरीची गोष्ट वेगळी . त्याच्या दृष्टीने तो गुन्हा नव्हता . कारण त्याला फक्त कमिशन खायचं असायचं. आपण फक्त केलेल्या मेहनतीचे पैशे घेतो , असा त्याचा सरळ हिशेब होता. दादामुळे त्याचं आज हॉटेल होतं हे खरं पण त्यालाही आता दादाबरोबर राहणं आवडत नव्हतं. आत्ता कुठे गुड्डीची आणि त्याची दोस्ती सुरू झाली होती. जास्तीचा माल ते दोघेही वाटून घेत होते. एकूण तो जिवाची आशा सोडूनच बसला होता. अचानक वरून झालेल्या हालचालीमुळे त्याला आशा निर्माण झाली होती. वरचा दरवाजा उघडला आणि बाहेरचा प्रकाश आत येण्याऐवजी विजेरीच्या पडलेल्या लखलखीत प्रकाशाने त्याचे डोळे दिपले. वरून सूर्या डोकावीत होता. तो काही म्हणायच्या आधीच श्रीपत म्हणाला, " देखो हरामी के पिल्लो मै अभी के अभी तुमको सबक सिखाऊंगा " त्याच्या हातातलं रोखलेलं पिस्तूल पाहून सूर्या आश्चर्याने मागे झाला आणि म्हणाला, " अरे गोली उड जायेगी, कुत्ते, हम तुझे छोड रहे है" त्याची घबराट पाहून श्रीपत म्हणाला, " मौतसे डरते हो हरामी " असे म्हणून त्याने चाप ओढला. दणदणीत आवाज करीत सुटलेली गोळी सूर्याने चुकवल्याने त्याच्या मागच्या भिंतीत घुसली. सूर्याच्या हातातली विजेरी सुटून भुयारात पडली. गटारात दिसेनाशी झाली. मग दादाने सूर्याला तो घाबरल्याचा बहाणा करायला सांगितलं, आणि स्वतः पिस्तूल काढून बाजूला उभा राहून श्रीपत बाहेर येण्याची वाट पाहत बसला. श्रीपत जवळही गोळी नसल्याने तो ते पिस्तूल तसेच रोखून सूर्यांच्या मदतीने बाहेर आला. पण आल्याबरोबर त्याला झडप घालून दादाने घट्ट पकडला. हातातलं पिस्तूल रोखून दादा त्याला म्हणाला, " सूर्या निकाल ले उसका पिस्तूल और ये ज्यादा बात करेगा ना तो मै पुरे छे बार उसके भेजेमे डाल दूंगा. " त्याच्या हातातलं पिस्तूल तर गेलं. मग थोडावेळ त्याची लाथाबुक्क्यांनी मरम्मत झाली. तेव्हा धापा टाकीत दादा म्हणाला, " तेरेकू जैसा बोला है, वैसा कर. ले जा साले को. और एक बात , उसने बूढ्ढी का मुरदा देखा होगा. उसे , सही तरहसे ताकीद देना की वो ऐसा कुछ बाहर नही बके. और वो किसीसे बके नही इसका ध्यान गुड्डीको रखनेको बोलना. गुड्डीको ये बात बोलनी पडेगी. अगर ये बात बाहर आ गयी तो दोनोंको ठिकाने लगाना, समझे . "
असं म्हंटल्यावर सूर्याने त्याला उचलून बाहेर हॉल मध्ये आणलं. हिराने गाडी बाहेर आणलीच होती. दोघांनी मिळून त्याला गाडीत घातला. आणि गाडी फोकलंडरोडच्या दिशेने निघाली. जाताना सूर्याला ओळखणाऱ्या फुटपाथवरील म्हाताऱ्याने सभ्य माणसं गुन्हा करणार नाहीत अशी खात्री असल्याने विचारले सुद्धा, "बीमार है क्या? " पण त्याच्याकडे दोघांपैकी कोणीही लक्ष दिले नाही. बाहेर पलीकडचा फुटपाथवर गेले एक दोन दिवसापासून पाळत ठेवणाऱ्या सावंतला आता कंटाळा आला होता. घडत काहीच नव्हतं. तरीही श्रीकांत सरांनी सांगितलंय म्हणून तो सूर्याच्या ऑफिसवर पाळत ठेवून होता. अचानक त्याने सूर्याला दरवाजा उघडून कोणाला तरी धरून आणल्याचे आणि ड्रायव्हरच्या मदतीने त्याला गाडीत ठेवलेलं पाहिलं. तेव्हा कुठे त्याला इतका वेळ पाळत ठेवल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. मग सूर्याची गाडी निघाल्यावर तो त्या फुटपाथवर गेला. आणि ज्या म्हाताऱ्याने सूर्याला विचारले होते त्याला म्हणाला, " आत्ता गाडी गेली त्यात कोणाला धरून नेलं? ". सावंत हुशार होता. अशा कामाला तो गणवेश कधीच वापरीत नसे. त्याची एकूण चर्या पाहून म्हातारा म्हणाला " काय बा, काय म्हाईत? असल कोनीतरी. तुमी कोन म्हनायचं? " जास्त संशय येण्याच्या आतच सावंत काहीच उत्तर न देता, म्हाताराही त्यांना सामील असला पाहिजे असा निष्कर्ष काढून मोकळा झाला. मग त्याच्या डोक्यात आलं. आपण टॅक्सी करून पाठलाग केला
असता तर बरं झालं असतं. लांब जाऊन दिसेनाशा होणाऱ्या त्या गाडीकडे पाहत तो हळहळला. आपण साधा नंबरही नोट केला नाही याची त्याला जाणीव झाली. जाऊ द्या, म्हणत तो त्याला दिलेल्या भागात गस्त घालण्यासाठी निघून गेला. त्याचा भागही हॉटेल डिलाइटच्या बाजूचाच होता. पण सावंतने हॉटेल डिलाइटचा संबंध त्या गाडीशी लावण्याचं काहीच कारण नव्हतं. तो गेला आणि म्हातारा स्वतःशी म्हणाला, " वकील साहेबांना सांगितलं पायजेल.

वीसेक मिनिटात गाडी डिलाइटला आली. संध्याकाळची वेळ असूनही हॉटेलात गर्दी बेताची होती. खरंतर ही ह्या हॉटेलची गर्दीची वेळ नव्हती. गर्दी रात्रीच असते. गाडी थांबल्या थांबल्या गुड्डी स्वतः बाहेर आला. उगाच चौकश्या आणि तमाशा नको म्हणून श्रीपतला तिघांनी मिळून मागच्या रस्त्याने आत नेले. नाही म्हंटलं तरी तो हॉटेलचा मालक होता. त्याला त्या भागातले सर्व थरांचे लोक ओळखत होते. तिथला थर खालचा असला तरी..... अंगावर ब्लँकेट पांघरलेला श्रीपत मनोमन शिव्यांची लाखोली वाहत आत गेला. गुड्डीने त्याला आधीच तयार ठेवलेल्या लहानशा खोलीत जिथे एक दिवाण, टेबल, बेसीन आणि संडासची सोय होती, तिथे नेऊन बसवले. मग ते तिघे बाहेर आले. दरवाजा उघडा होता. पण त्या खोलीकडे कोणीही फिरकणार नसल्याने गुड्डीने तो लावून घेतला नाही. पण सूर्याने दादाच्या सूचना सांगितल्यावर त्याने तो लावून कुलूप घातले. पण आतून श्रीपतच्या शिव्यांचा आवाज येऊ लागला. आता तर तो गुड्डीलाही शिव्या देत होता. खरंतर गुड्डी त्याचा यार होता. मग गुड्डीला दादाच्या सूचनेप्रमाणे न वागल्यास श्रीपतबरोबर त्याचीही वाट लावली जाईल अशी धमकी देण्यास सुर्या विसरला नाही. त्याला गुड्डीही थोडा खटकत असे. काकांएवढा खटकत नसे कारण एकतर तो त्यांच्या ऑफिसपासून दूर होता आणि त्यांच्यामध्ये म्हणजे पैशाच्या वाटपामध्ये किंवा निर्णयाच्या आड येत नसे. गुड्डीला परिस्थितीचे गांभीर्य जाणवले. तरीही त्याने श्रीपतला मदत करण्याचे ठरवले. त्याने त्यांच्या टोळीच्या डॉक्टरला दाखवण्याचे ठरवले. श्रीपतकडे काहीतरी महत्त्वाची जानकारी होती अशी त्याला शंका आली. त्याने त्या दोघांसाठी फायद्याचा प्लान बनवण्याचे ठरवले. सूर्या आणि हिरा निघाल्याबरोबर, प्रथम त्याने श्रीपतच्या खोलीचा दरवाजा उघडला. आत येत तो म्हणाला, " माफ करना यार. ये लोगोंके सामने नाटक तो करनाही पडता है. तू मेरेको ये बता दे ये सब कैसे हुवा और तेरे पास कुछ खास जानकारी है क्या. " श्रीपत हाताच्या वेदनांनी तळमळत होता. तशीच एक जोरदार शिवी देऊन तो ओरडला, " पयले डाक्टर को बुलाना, भोसडिके, मेरी जान जा रही है और कुछ खानेका इंतजाम करना, इन हरामी लोगोने मुझे भूखा प्यासा रखा है. जा जल्दी. " त्याचा तडफडाट पाहून गुड्डी नुसताच दरवाजा लावून बाहेर गेला आणि त्याच्यासाठी त्याने जेवण पाठवले.
काकांची रात्र श्रेयाच्या तापामुळे जागरणात गेली. त्यांना त्याचं काही वाटलं नाही. पण ते साधनाला मात्र फोन करू शकले नाहीत. बुधवार उजाडला. त्यांच्या मनात आलं, दरोड्याला फक्त दोन दिवस (की रात्री? ) बाकी आहेत, जणू लग्न दोन दिवसांवर आलंय. आज काय घडणार काय माहीत? कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. काम दिलेलं होतं. सकाळी श्रेयाचा ताप उतरला. तिने काकांना पुन्हा धरून ठेवले. ती बागेत जाण्याचा हट्ट करू लागली. आता मात्र नीता वैतागली. "काही जायचं नाही बागेबिगेत. काल ताप कोणाला आला होता.? परत डॉक्टर काकांकडे जाऊन इंजक्शन कोणाला घ्यायचंय. " मग मात्र ती त्या भीतीने गप्प झाली. काल डॉक्टर म्हणालेच होते, " जर उद्या ताप उतरला नाही तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल". पण तसं काही झालं नाही. काकांची एक काळजी तर नाहीशी झाली. मग ते अकरा वाजेपर्यंत निघाले. मुंब्र्याला जायचं म्हणजे सगळा दिवसच जाणार, आपल्याला साधनाकडे जायला कितपत जमणार आहे कोण जाणे . जाताना नीता म्हणाली, " जरा लवकरच या. हे पण आज जरा लवकर येतो म्हणालेत. खरंतर यांना कितपत जमेल कोण जाणे .. " ते जास्त वेळ रेंगाळले नाहीत , नाहीतर ती दुसरं काही कामं मागे लावायची. ते बाहेर पडले. गाडीत बसले आणि त्यांनी साधनाला फोन केला. आज यायला जमणार नसल्याचं त्यांनी तिला कळवलं. " मुंब्रा! " इथे आपण कधीच गेलो नाही, सगळीच मुसलमान वस्ती. त्यांच्या मनात आलं. तासाभराने ते मुंब्र्याला पोहोचले. पत्ता विचित्र होता. : "मुंब्रा शीळफाटा. खडी सेंटर के पीछे. " हा काय पत्ता आहे? ते वैतागले. नावही बूढा चाचा. पावसाळा असल्याने चिखलराड जमली होती. त्यातून रस्ता काढीत ते निघाले. ते असेच करायचे एखादा विभाग सापडला की ते चालत सुटायचे. कुठे तरी माग लागेल आणि अचानक सापडेल असा त्यांचा अंदाज असायचा. पण डोक्यावरचं ऊन आणि वातावरणातला ओलसरपणा यांनी ते घामाघूम झाले. मग त्यांच्या लक्षात आलं, आता विचारलं पाहिजे. म्हणून समोरच्याच एका हार्ड्वेअरच्या दुकानात शिरले. तिथे बसलेला लांडा दाढी कुरवाळीत म्हणाला, " कहिये चाचा, क्या दे दूं.? " मग त्यांनी विचारलं. " ये खडी सेंटर कितना दूर है? और कैसा जानेका? "...... त्यांना न्याहाळीत तो म्हणाला, " ये पता पूछनेवाले तुम दुसरे आदमी हो. अभी अभी एक जनको बताया मैने. पर आप जरा अलग दिखते हो. " काका काहीच बोलले नाहीत. इकडे तिकडे पाहून तो दबक्या आवाजात म्हणाला" क्यूं बूढा चाचासे मिलना है क्या? उसको मिलने सदियोंमे कभी कोई आता है. आप जैसे जंटलमॅनको उससे क्या काम पडा? " काकांना कळेना बूढा चाचा हा असा काय माणूस आहे की ज्याच्याबद्दल हा माणूस खालच्या आवाजात बोलतोय आणि दुसरा माणूस कोण? ज्याने हा पत्ता विचारला. त्याने काकांना रस्ता दाखवला. सरळ डोंगरावर जायचं पार खडी तयार करण्याचा ड्रम लागे पर्यंत आणि तिथे विचारायचं. आत्ता कुठे त्यांना त्या पत्याचा अर्थ लागला. बचक बचक असा चिखलात आवाज करीत ते निघाले. पंधरा वीस मिनिटं चालल्यावर एका डोंगराच्या पायथ्याशी ते आले. तिथे मनुष्य वस्ती अशी नव्हतीच. मग मात्र त्यांना सुरुंगाच्या स्फोटाचे आवाज आले. काही माणसे ते काम डोंगर माथ्यावर करण्यात गुंतली होती. तर काही माणसे खडी तयार करण्याच्या यंत्राजवळ काम करीत होती. म्हणजे ही दगडाची खाण होती तर. एका पायवाटे वरून जाताना त्यांना एक रंगवलेली पाटी दिसली. त्यावर खडी पाडणाऱ्या कंत्राटदाराचे नाव लिहिलेले आढळले. " मोहम्म्द इम्रान झैनुद्दिन खान " असं होतं. खाली एक लाल रंगातील सूचनावजा ताकीद पण लिहिलेली आढळली. "ये रास्ता आम आदमीके लिये बंद है. ब्लास्टिंग होती है. जानको खतरा. जख्म होनेपर कॉंट्रॅक्टर जिम्मा नही लेंगा. " तिथे दोन हाडकं आणि कवटी पण रंगवलेली होती. तरीही ते पुढे गेले. दोन चार मिनिटं चालल्यावर कोणीतरी ओरडले, "ए, कौन जा राहा है? बोर्ड पढा नही क्या? " तो एक ब्लास्टिंग करणारा कामगार होता. मग काका त्याच्या जवळ जात म्हणाले, " मुझे बूढा चाचासे मिलना है. " त्याने त्यांच्याकडे आपादमस्तक पाहिले. आणि डाव्या हाताने त्याने रस्ता दाखवला. "वहां उधर बोगदा है, उधरीच है. " तो निघून गेला. आता खडीच्या ड्रमचा मोठा "रगड, दगड, रगड दगड " हे शब्द उच्चारताना जो आवाज होतो तसा आवाज येत होता. मध्येच सुरूंगाच्या स्फोटाचे आवाज येत होते. जवळ जवळ साडे बारा वाजत होते. ऊन भाजून काकाढीत होते. एकही झाड नसलेला तो भाग काकांना लवकरच आवडेनासा झाला. जी झाडं होती ती पण निष्पर्ण. कदाचित पावसाळ्यात त्यांना पालवी फुटत असावी.

ते चढत चढत पाय वाटेने पुढे निघाले. खडीच्या ड्रमच्या डाव्या बाजूने वळले. वरती थोड्या अंतरावर डोंगरावर एक काळसर गुहे सारखा भाग त्यांना दिसला. लांबून उंच दिसणारा डोंगर अजून बराच उंच होता. उंचीवर आल्याने म्हणा, किंवा काहीही म्हणा त्यांना वारा वाहत असल्याची जाणीव झाली. पण गरम वारा.... त्यांच्या अचानक डोक्यात आलं, आपल्या आधी कोण आलं असावं. त्यांनी आठवून पाहिलं. सूर्या? स्वतः दादा? की अकडा? की आणखीन कोणी? त्यांचा संशय विरेना. पण ते चालत असलेल्या खालच्या अंगाने काण्या चालत होता. ज्याला सूर्याने त्यांच्या पाळतीवर ठेवलं होतं. आता ते दमले होते. त्यांना तहान पण लागली होती. खडीचे आवाज थोडे विरळ झाले होते. त्यांना आता बोगद्यासारखा दिसणारा भाग दिसला. तो बोगदा नव्हताच. नैसर्गिक रित्या तयार झालेला खिंडीसारखा भाग होता. त्यालाच लोक बोगदा म्हणत असावेत. आणखी दहापंधरा मिनिटात ते खालून न दिसणाऱ्या पण एका मध्यम आकाराच्या झोपड्यापुढे उभे राहिले. झोपड्याला दरवाजा असा दिसला नाही. बाहेरच्या ओटीसारख्या भागात एक मुसलमान म्हातारा दात कोरीत बसला होता. त्याचं जेवण झालं असावं किंवा सारखं दातात काहीतरी अडकत असावं. अंगावर निळ्या रंगावर निळ्याच रंगाच्या उभ्या रेघा असलेला एक दोन ठिकाणी उसवलेला शर्ट आणि त्याच रंगाची किंवा मूळ रंग हरवत चाललेली लुंगी त्याने गुंडाळली होती. बाजूला विड्यांचं बंडल पडलं होतं.
भुंवया कानाकडे उंचावलेल्या उभट नाकाच्या ब्रिजवर जुळलेल्या होत्या. थोड्या पांढऱ्या होत्या. खालचे अनुभवी तपकिरी रंगाचे लपवाछपवीत तज्ञ असलेले डोळे काडीवर आलेल्या दातातील घाणीकडे बघत होते. जिवणी बरीचशी आत वळलेली आणि सुरकुत्यांच्या डिझाइनमध्ये लपलेली होती तिथल्या लहानश्या चौथऱ्यावर पडलेल्या काकांच्या सावली मुळे म्हाताऱ्याने वर पाहिले. आपल्या वृद्ध डोळ्यांनी समोरच्या काकांना अजमावीत त्याने "आइये, तश्रीफ रखीये. म्हणून तिथेच पडलेल्या जुनाट खुर्चीकडे बसण्यासाठी बोट दाखवले. काका बसले. मग म्हाताऱ्याने आत तोंड वळवून म्हंटले, " अरे झीनत बेटी, जरा पानी ले आना और परदा करना. " आतल्या दरवाज्याच्या पडद्या आडून एक बालिश हात जर्मन सिल्व्हरचा पेला धरून पुढे आला. चाचाने तो घेऊन काकांच्या हाती दिला व म्हणाला, " मेरी नातीन, है गांवसे आयी है. लीजिये. "......... पाण्याची गरज त्यांना होतीच. ती जास्त असणार हे जाणून त्याने परत आतून पाणी मागवले. ते पिऊन काका म्हणाले, " मुझे दादाने भेजा है. " म्हाताऱ्याने तर्जनी आणि अंगठा एकमेकावर चोळीत विचारले, " कुछ दिया है? " ....... काका समजले. खिशात हात घालून त्यांनी दोन लाख रुपये असलेले पाकीट काढून त्याच्या हातावर ठेवले. बुढ्ढ्याचे डोळे लकाकले. जमेल तेवढे गोड हसून म्हणाला, " कहने की जरूरत नही. सब मालूम है मुझे. इंतजाम हो जायेगा. आप सिर्फ कभी चाहिये वो बता दीजिये. बाहेर काण्या, काका कुठे गेल्येत हे पाहून परतीच्या रस्त्याला लागला सुद्धा. त्याचं काम एवढंच होतं की ते कुठे जातात, हे पाहणं. निदान सध्यातरी त्याला असच सांगण्यात आलेलं होतं. बुढा चाचा केवळ जबाबी माणूस होता. तो सवाल करीत नसे. फक्त जबाब देत असे. मग तो म्हणाला, " आप इतने दूरसे आये है, खाना खाके जाईये. जलदीही तयार होगा. " पण काकांना या लोकांकडे जेवण्याची संवय नव्हती. त्यांचे आढेवेढे पाहून तो म्हणाला, "शायद आप हमारे साथ खाना नही चाहते. कोई बात नही. " मग काकांनी त्याला त्यांना रविवार पासून खोली हवी असल्याचे सांगितले. "आप बेफिकर रहिये, लेकीन चाय तो पिते जाईये. " त्याने आत चहा करण्यास सांगितले. आता तरी आतल्या मुलीचं दर्शन होईल असं त्यांना वाटलं पण परत चहाही तसाच दिला गेला. मग काका उठले. त्याने सलाम केला. आता खाली जाताना ऊन पाठीवर पडणार असल्याने त्यांना बरं वाटलं. त्यांनी विचार केला, मगाशी चेहरा भाजून निघाला, आता पाठ. असो. त्यांनी उतरताना काळजी घेण्याचं ठरवलं. त्यांच्या अनुभवानुसार डोंगर चढायला सोपा पण उतरायला कठीण. केव्हा पाय सरकेल, नेम नाही. परतताना ते लवकरच स्टेशनला पोहोचले. मगाचची उघडी दुकानं आता बंद झाली होती.
इकडे काण्याने सूर्याला फोन करून तपशीलवार माहिती दिली. सूर्याला संबंध लागेना. काका आणि मुंब्र्याला? कशाला?.... तो विचार करीत राहिला. त्याला समजेना. मग त्याने गुड्डीकडे जायचे ठरवले. परंतू दादाने आत बोलावल्याने त्याने सध्या ते रहित केलं.

********* ******** ******** ******** ******** ******** ******** ******** **********

कॉन्स्टे. सावंत स्टेशनला पोहोचला तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत होते. तो बराचसा भिजला होता. त्याच सुमारास एसीपी खंडागळेना कमिशनर ऑफिसमधून त्यांच्या पीएचा फोन आला. त्यांना कमिशनर साहेबांनी भेटायला बोलावलं होतं. एरव्ही कडक शिस्तीने वागणाऱ्या खंडागळेना जरा आश्चर्य आणि थोडी भीती वाटली. तरीही ते स्वतःवर ताबा ठेवीत महत्त्वाच्या प्रकरणांचा अद्ययावत तपशील घेऊन व काही सांख्यिकी विवरण पत्रं ( म्हणजे गुन्ह्यांची एकूण संख्या, तपास पूर्ण झालेली प्रकरणे, तपासांतर्गत असलेली प्रकरणे वगैरे ) घेऊन निघाले. तसे ते व्यवस्थित होतेच. त्यांना कोणत्याही मीटिंगच किंवा वरिष्ठांच्या भेटीचं टेन्शन येत नसे आणि ते असल्या गोष्टींमध्ये यशस्वी होत. त्यामुळे असल्या बाबतीत त्यांच्या सल्ल्यानुसार बरेच अधिकारी वागत असत. असेच ते आत्ता आत्मविश्वासाने निघाले होते. पण आज मन कुठेतरी त्यांना चावत होते. कारण अचानक फोन करून बोलवून घेणं. ते गाडीत बसले. आणि सीपी ऑफिसकडे निघाले. ते आल्याची वर्दी कमिशनर साहेबांना दिली गेली. एक दोन सेकंदात ते केबिन मध्ये प्रवेशले. कडक सलाम ठोकीत ते योग्य अंतर ठेवून उभे राहिले. कमिशनर साहेब जितके ऊग्र असायला हवेत तितकेच ऊग्र होते. पण त्यांचंही मत खंडागळेंबाबत बरं होतं. सहजासहजी ते कोणालाही चांगलं म्हणत नसत. त्यांनी बरं आहे, असं म्हंटलं की ती कारवाई चांगली झालेली आहे असं समजावं. खाली मान घातलेल्या साहेबांनी मान वर केली. आणि बसण्याची खूण केली. खंडागळेंनी महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आणलीच असेल, याची त्यांना कल्पना होतीच. पण त्यांनी त्याबाबत काहीही विचारणा न करता त्यांना मिसिंगच्या तक्रारींबाबत विचारलं. नेमकी तेवढीच माहिती खंडागळेंकडे रिक्त होती. म्हणजे अशा तक्रारी निकालात काढलेल्या होत्या. म्हणून खंडागळे म्हणाले, " सध्या तरी आमच्याकडे एकही मिसिंगची तक्रार प्रलंबित नाही सर. " त्यांच्याकडे न पाहता साहेबांनी बाजूचा खण उघडला. एक पाकीट पुढे केले. म्हणाले, " मग हे काय आहे? वाचा"... पाकिटातून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आलेलं पत्र होतं आणि त्याला जोडलेली मिसिंगची तक्रार होती. ते पाहून खंडागळे साहेबांना धक्काच बसला. त्यांच्या कार्यालयाकडून मिसिंगची तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार होती. ते पत्र होतं. साठे मामांचं. त्यात परत शेवटी सदर प्रकरणी काही कारवाई न झाल्यास ते वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याची धमकीपण दिली होती. साठे मामा त्यांना भेटलेच नसल्याने ते याबाबत अनभिज्ञ होते. मग त्यांना आश्चर्या बरोबर राग येत गेला. म्हणजे हे साठे मामा आपण सोडून कोणाला भेटले आणि त्यांना कोणी पिटाळले हे त्यांना कळेना. खंडागळेंचा चेहरा वाचीत साहेब म्हणाले, " काय? कसं वाटतंय? अशी कामं करता का? एका ज्येष्ठ नागरिकाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याची ती तक्रार आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? " त्यांच्या आवाजाला धार होती....... खंडागळे निः शब्द झाले. ते पाहून साहेब पुढे म्हणाले, " मला दोन दिवसात अहवाल हवाय तुमचा, तोही कारवाईसहित. "...... खंडागळेंना हलका घाम येत असल्याची जाणीव झाली. बाहेर पावसाला ऊत आला होता. बोलणं पूर्ण झालं असलं तरी उठताही येत नव्हतं. ते शिस्तीला धरून झालं नसतं. त्यांच्याकडे न पाहता साहेब म्हणाले, " यू मे गो नाऊ. " मग खंडागळे उठले. शिरस्त्या प्रमाणे सलाम ठोकला आणि केबिन बाहेर आले. प्रथम त्यांनी खिशातला रुमाल काढून घाम पुसला. ते पीएच्या समोर जरा वेळ बसले. ते रिकामे झाल्यावर म्हणाले, " टेक केअर, संधी साधून मी बोलीन साहेबांशी. काळजी करू नका पण अहवाल लवकर येऊ द्या. " चहा पाणी इकडच्या तिकडच्या बातम्या झाल्यावर खंडागळे जायला निघाले. तेव्हा पीए साहेब म्हणाले, " प्रमोशनला ड्यू आहात, सांभाळून राहा " असा प्रेमाचा सल्लाही त्यांनी दिला.

सणसणत्या डोक्याने खंडागळे आपल्या ऑफिसमध्ये परत आले. आल्या आल्या त्यांनी सगळ्याच हाताखालच्या अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावली. त्यात त्यांना साहेबांनी दिलेलं पत्र सगळ्यांकडे दिले. तेव्हा इन्स्पे. श्रीकांत चांगलेच घाबरले. उरलेल्या अधिकाऱ्यांना जायला सांगून त्यांनी इन्स्पे‌. श्रीकांतची खबर घेतली. शेवटी ते म्हणाले, " तुम्हाला काय वाटलं? मी तुम्हाला भविष्याचा सल्ला देण्यासाठी घरी बोलावलं याचा अर्थ तुम्हाला कामांमधून सूट मिळाली? " श्रीकांत काहीच बोलले नाहीत. मग खंडागळे म्हणाले, " मी तुम्हाला या प्रकरणाबद्दल कारणे दाखवा नोटीस देऊ शकतो, पण तसं न करता तुम्हाला या तीन दिवसांच्या अवधीत कारवाई करायला सांगतोय. मला शुक्रवारी तुमचा अहवाल पाहिजे. तो नुसता मोघम नको तर योग्य कारवाई करून प्रकरण निकालात काढल्याचा पाहिजे. निघा आता. " श्रीकांत आपल्या जागेवर आले. त्यांना काहीही सुचत नव्हते. हे काय होऊन बसलं. सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यांनी सकाळी साठेमामांना भेटण्याचं ठरवलं. आणि सावंतला हाक मारली. सावंत जणू काही वाटच बघत होता. रात्रीचे आठ वाजत होते. तरीही न कंटाळता तो श्रीकांत सरांकडे आला. त्याने सगळीच माहिती त्यांना तपशीलवार दिली. त्यावर ते म्हणाले, " सूर्याच्या ऑफिसवर नजर ठेव. नक्कीच लवकरच काहीतरी घडेल. आणि हो, उद्या आपण साठे मामांना भेटायला जाणार आहोत त्या म्हातारीची जागाही पाहून येऊ. " सावंतची थोडी निराशा झाली. त्याला वाटलं साहेब परत त्याचं कौतुक करतील. त्याने पण आता काहीतरी अशी माहिती घेऊन येतो की जिचा चांगलाच उपयोग होईल, असं ठरवून तो बाहेर गेला.

******** *********** *********** ************ *********** ***********

काका आज साधनाकडे न जाता सरळ घरी गेले. दुपारचे तीन वाजत होते. इथेही त्यांचा पाठलाग काण्याने केला, कारण त्याला ते कुठे कुठे जातात हे कळवायचं होतं. त्यांच्या लवकर येण्याने नीताला जरा बरं वाटलं. अजून तरी श्रेयाला ताप आलेला नव्हता. आत्ता
मात्र त्यांनी श्रेया करता कॅडबरी आणली होती. आल्या आल्या ते आत जाऊन श्रेयाला भेटले, आणि त्यांनी तिला चॉकलेट दिले. ती फारच खूश झाली. मग नीता म्हणाली, " बरं झालं आलात, हे अजून आलेले नाहीत. काय माहीत येतात की नाही? " पाच वाजल्यापासून अचानक पावसाला सुरुवात झाली. दोन तीन तास चांगलाच पाऊस पडला.पावसामुळे चांगल्या आणि सरळ कामांची पंचाईत होते, पण वाईट कामांसाठी तो फायदेशीर असतो. लपून छपून करण्याची कामं चांगली होतात. याचा फायदा घेऊनच तर काण्या काकांच्या मागे लागायचा. तो सूर्याकडे गेला, तेव्हा दादा आणि सूर्या केबिन मध्ये बसले असल्याने तो त्याला भेटू शकला नाही. खरंतर आत्ता तसं त्याच्या जवळ सांगण्यासारखं काही नव्हतं. पण त्याला सूर्याकडून पैसे घ्यायचे होते. आजचं केलेलं कामही तसंच होतं. सूर्याचं लक्ष फारसं नाही असं पाहून दादा म्हणाला, " आज तेरा ध्यान नही है. कुछ खबर आनेवाली है क्या? " त्याने मानेनेच नाही म्हंटले. कारण आजच त्याला बूढा चाचा आणि काका यांच्या भेटीबद्दल बोलायचे नव्हते. त्याला पुढे काय होणार ते पाहायचं होतं. आजकाल दादाचं लक्ष एकूणच टोळीकडे कमी होतं असं त्याला वाटत होतं. टोळीची सूत्रं आपल्या हातात आली तर बरं होईल. असा विचार त्याच्या मनात इतक्या वर्षात प्रथमच आला. काहीतरी सोय केली पाहिजे. दादाचा काहीतरी वेगळा प्लान असला पाहिजे. आता काण्याला दादाच्या मागे लावावा म्हणजे बरं. दादाला झापणारा कोण आहे? त्या दिवशी मीटिंगमध्ये कोणाचा तरी फोन आला होता. हा पंधरा नंबरचा लॉकर दादाच का उघडणार आहे? कोणी सुटून येणार आहे की बाहेरून कोणी महत्त्वाचा माणूस येतोय. नक्कीच एकटया काकावर पाळत ठेवण्यापेक्षा दादावरची ठेवावी, हे बरं. असा विचार करून तो केबिन बाहेर पडणार तोच दादाला फोन आला. आवाज ऐकून दादाने सूर्याला बसण्याची खूण केली. तो दिवाणजींचा फोन होता. प्रिन्स साहेबांचे दिवाणजी खरंतर पेश्तूच्या रोजच्या मागण्यांना कंटाळले होते. कधी एकदा काय व्हायचा तो विधी होऊन गेला की पेश्तू नावाची भुमका बाहेर काढता येईल. प्रिन्स साहेबांना त्यांनी खूप समजावून सांगितलं होतं पण ते पुत्रप्राप्तीच्या नशेने पछाडलेले असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही...... "दादाजी सर, थोडी हिम्मत करके पूछता हूं, हमारे काम का क्या हुवा? कहां तक आया है? आप बूरा नही मानना. पेश्तू साबको आके अब दो महिना हो गया (नक्की किती महिने झाले हे त्यांना लक्षात नव्हतं) आप व्यस्त हो तो बादमे.... " त्यांनी वाक्य अर्धवट सोडले. त्याबरोबर दादा म्हणाला, " देखिये पैसा परसू पहुंचा दो, आपका काम सोमवार को पक्का हो जायेगा. लेकीन पहले दाम बादमे काम, ये ध्यानमे रखना. " आणि त्याने फोन बंद केला. मग सूर्याशी बोलण्या आधी त्याने हे काम ज्याला सांगितलं होतं त्याला फक्त मिस कॉल दिला. सूर्याला म्हणाला, " परसू दिवाणजी पैसा दे देंगे, मेरा मतलब है दो करोड. काम तो सोमवार तक हो जायेगा. " सूर्याला जरा बरं वाटलं. तो म्हणाला, " लेकीन दादा इस बार काकाजीको इसमे मत लेना. " त्यावर दादा त्याची कीव करीत म्हणाला, " तुम समझोगे नही, देख पाप हमेशा बाटना चाहिये". म्हणजे तो पाप करीत होता हे त्याला मान्य होतं. त्यावर सूर्या फक्त मनात म्हणाला तेरेकोही मालूम, मै तो ये बैंकके कामके बाद तेरेको उडा दूंगा. तो बाहेर पडला. रस्त्यावर आल्यावर त्याला भेटलेल्या काण्याने त्या दिवसाची माहिती दिली. आणि पैशांसाठी हात पसरला. मग ते दोघे समोरच्या फुटपाथावरच हॉटेल मध्ये गेले. तिथे सूर्याने त्याला पैसे दिले आणि दादावर लक्ष ठेवण्यास आणि त्याच्या हालचालींची माहिती देण्यास सांगितले........ ते ऐकल्यावर मात्र काण्या घाबरला. "ये मुझसे नही होगा. डायरेक दादापर नजर रखनेका. "..... ‌ सूर्या मग म्हणाला, " ठीक है तू अब काकाजीपर कभी कभी नजर रखना, लेकीन दादा पर हमेशा रखना " नंतर प्रथम काण्या हॉटेलच्या मागच्या दरवाज्याने बाहेर पडला. सूर्या मात्र पुढूनच बाहेर पडला. त्याला जायचं होतं गुड्डीकडे.

रात्रीचे साडेआठ होऊन गेले होते. साध्या कपड्यातला सावंत सूर्याच्या ऑफिसच्या समोरच्या फुटपाथवरच उभा होता. त्याला कल्पना नव्हती आल्यापासून दहा पंधरा मिनिटांच्या आतच सूर्या ऑफिसातून बाहेर पडेल. कुणा जेमतेम पाच फुटी माणसाबरोबर सावंत उभा असलेल्या फुटपाथवरच्या हॉटेलात गेलेला त्याने पाहिला. हॉटेलचे नाव पाहिले, "कॅफे रश्मीन ". तो बुटका त्याला बिलकुल आवडला नाही. अशी बुटकी माणसं लबाड असतात, असं त्याचं स्वतःचं मत होतं. त्याचा मेव्हणाही असाच बुटका होता. त्यामुळे त्याची सारखी भांडणं होत असत. असो. जवळ जवळ अर्धातास गेला. मग सूर्या एकटाच बाहेर आलेला दिसला. बुटका कुठे गेला कुणास ठाऊक. पण सूर्यावर लक्ष केंद्रित करणं भाग होतं. आता सूर्या पुन्हा ऑफिसजवळ आला. कालच्याच गाडीत तो बसला. आणि गाडी निघाली. आज मात्र त्याने पटकन टॅक्सी पकडली. ड्रायव्हरने त्याला ओळखून विचारले, " क्या साब पीछा करना है क्या? आप डरना नही, आप चाहे तो हम रुकेंगे आप के लिये, हमे ऐसा काम बहोत अच्छा लगता है. आखिर देशकी सेवा है. क्या बोलते है? " बोलणारा सरदार होता. प्रतिसादासाठी त्याने सावंत कडे पाहिले. सावंत म्हणाला, " जितना बोला है वही करना. " सूर्याची गाडी फॉकलंडरोड नाक्याकडे गेली आणि हॉटेल डिलाइट जवळ थांबली. हे पाहिल्यावर सावंतने टॅक्सी सोडली. भाड्याबरोबर ड्रायव्हरला निराशाही मिळाली. सावकाश चालत सूर्या हलता दरवाजा ढकलून आत शिरला. आत जाऊन एखाद पेग मारायला हरकत नव्हती. पण सूर्या कुठे गेला हे शोधणं एवढं सोपं नव्हतं. म्हणून त्याने नाद सोडला. नंतर केव्हातरी दुसऱ्या कारणाने आतला भाग बघता येईल. आज बरं काम झालंय. त्या दिवशी पण ज्या कुणाला आणलं त्याला इथेच आणलं असणार. ज्याला आणलं तो कोण असावा? त्याने डोकं हलवून पाहिलं, पण त्याला कोणी आठवेना. किशा दादा तर नाही? त्याच्या मनात आलं. का तो म्हातारा ? (म्हणजे काका ), काका ती बाई जिची बांगडी मिळाली होती? खूप प्रयत्न करून पाहिला. पण सावंतला सुचेना. श्रीकांत सरांना नक्कीच सुचेल, नाहीतर त्यांनी सूर्यावर नजर ठेवायला कशाला सांगितलं असतं.? सबंध सेवेमध्ये श्रीकांतसरांनीच कौतुक केलं होतं. म्हणून तर तो मनापासून काम करीत होता. एका कौतुकाचा केवढा परिणाम होतो. असो. पण तो जर धोका पत्करून आत गेला असता तर त्याला फार महत्त्वाचं असं आज काहीतरी हाती लागलं असतं.
आत शिरलेला सूर्या तडक गुड्डीच्या केबिन मध्ये शिरला. तुकतुकीत चेहऱ्याचा गुड्डी अचानक आलेल्या सूर्यामुळे दचकला. तो कॉंप्युटरमध्ये अश्लील सीडी बघत होता. सूर्या त्याची लगबग पाहून म्हणाला, " किधर है श्रीपत? चल मेरे साथ, मै देखना चाहता हूं. " .... खरंतर गुड्डीला आत्ता श्रीपतकडे जायचं नव्हतं. त्याला एकदम आठवलं की श्रीपतच्या खोलीला कुलूप घातलेलं नाही. त्याला आज दुपारी जेवण त्याने पाठवलं होतं. पण तो जेवणारच या खात्री मुळे तो बघायला गेला नाही. आज रात्री जाऊच असा विचार करून तो हॉटेलचा धंदा बघत राहिला, आणि त्यात विसरला. नाहीतरी श्रीपत बरोबर आता यारी झालीच आहे मग धंद्याचंही ठरवू. तसा तो वाईट नाही हे त्याला जाणवले होते. पण अचानक सूर्या येईल आणि जावं लागेल असं मात्र त्याला वाटलं नव्हतं. आता काही उपाय नाही असं पाहून तो उठला उगाचच कोणतीतरी किल्ली घेत तो सूर्यामागे निघाला. ते बाजूच्या दोन तीन रूम सोडून अगदी एका कोपऱ्यात असलेल्या वाकड्या तिकड्या बांधलेल्या रुमकडे गेला. दरवाजा सताड उघडा होता. तो पाहून सूर्या भडकून म्हणाला, " लगता है दादाकी ऑर्डर की कोई पर्वा नही है तुम्हे" असे म्हणून सूर्याने पिस्तूल काढले. आतल्या बेडवर श्रीपत होता. त्याला पाहून गुड्डीचा जीव भांड्यात पडला. पण दुपारचं जेवण मात्र तसंच होतं. त्यांनी लाइट लावला. दिव्याच्या प्रकाशात सूर्याने बेडवरच्या श्रीपतकडे पाहिलं. मागून गुड्डी म्हणाला, " गल्ती हो गयी लेकीन वो भागा नही.
सूर्याला वेगळीच शंका आली. श्रीपतचे डोळे आढ्याकडे पाहत स्थिर झालेले दिसत होते. हात पाय ताठ झालेले होते. छळामुळे झालेल्या यातना आणि जखमेने निर्माण केले विष सबंध शरीराभर पसरलेले असावे. हात पूर्ण काळा निळा आणि सुजलेला होता. ठिकठिकाणी भुयारातल्या उंदरांनी कुरतडलेल्या जखमा दिसत होत्या. ते पाहून सूर्या म्हणाला, "अबे बेवकूफ वो भागा नही, उड गया है. अब इसका जिम्म कौन लेंगा? इसको ठिकाने कौन लगाएगा? दादाको क्या बोलेंगे? " ते दोघे बराच वेळ तसेच उभे राहिले.

हॉटेलमधल्या कामगारांना श्रीपत गेल्याची माहिती नव्हती. सूर्याने दादाला फोन लावला, " दादा, श्रीपत ऊड गया. गुड्डीने बराबर ध्यान नही दिया. क्रियाकरम इसी रात कर लेता हूं. ज्यादा लोग नही है तभीच करना मुनासिफ होगा. नही तो इस बातकी फालतू चर्चा होगी. " सूर्याला ही संधी चांगली वाटली. त्याने घाईघाईने सगळं बोलून टाकले..... त्यावर दादा म्हणाला, "ऐसे कैसे मर गया? गुड्डी क्या उधर बैठके.... रहा था? उसको बोलना नंगी तस्वीरे कम देखा कर. अब गुड्डीको भी पर आ गये है. तुम लोगोंको एक काम ढंगसे करनेको नही होता है. अब सब मेरेकूच करना पडेगा. बेवकूब साले....... " दादाला खरंतर त्यांचा राग आला होता. तरीही ताबा ठेवून तो म्हणाला, " देख जीवनरामके बारेमे जो गलती किया वो अभी नही करना. और मशानमे क्या तेरा चाचा बैठा है? अपने डाक्टरको बुलाके कागज (म्हणजे सर्टिफिकेट) ले पह्यले. और उसके घरवालोंको लेके आ, उनको देखने दे. नही तो गजब हो जायेगा. ". मग सूर्या थोडा वरमून म्हणाला, " कागज बनाना पडेगा ये मालूम है, लेकीन उसके घरवालोंको बुलानेमे टाइम जायेगा. रातमेही सब खतम कर लेंगे तो कोई पूछेगा भी नही. " मग मात्र दादा भडकून म्हणाला, "पागल हो गया क्या? सब कुछ तेरेको बोलना पडता है. अबे तू नही समझेगा. जैसा बोला है वैसा कर, अपना दिमाग मत चलाना . "..... गुड्डी घाबरलेला दिसला. त्याचे हात पाय थरथरायला लागले. फोन बंद झाला. सूर्याने मग टोळीच्या डॉक्टरला फोन केला. आणि श्रीपतचा पत्ता गुड्डीलाच विचारून त्याच्या बायको पोरांना आणायला त्यालाचं पाठवलं. . त्याच्या मनात आलं, या साल्या भैया लोकांची बायका पोरं तर गावी असतात. मग कशाला ह्या पंचायती करायच्या. पण दादा म्हणतोय तर करावं झालं. श्रीपत भैया नव्हता. राजस्थानी होता. आणि तो लालबाग भागातच राहत होता. . आश्चर्य म्हणजे त्याच्या खोलीत त्याच्या मित्रांशिवाय कोणीही नव्हते. सूर्याच्या समजाप्रमाणेच त्याचे कुटुंब गावी होते. त्याच्या मित्रांना सांगितल्यावर त्यातले एक दोन जण तयार झाले. त्यांना गुड्डी घेऊन आला. पण त्याला रात्रीचे तीन साडेतीन झाले. ते दोघेही श्रीपतचे दूरचे भाऊ लागत होते. ते आल्या आल्या श्रीपतच्या खोलीत डोक्याला हात लावून खाली बसले आणि गळा काढून रडायलाच लागले. त्यापैकी एक जण म्हणाला, " हम कमसे कम श्रीपत के घर तो फोन लगा लेते है . उसकी औरत और दो बच्चे है. वो आ जायेंगे , भाईजी. " त्याने सूर्याला नमस्कार केला.

त्यावर भडकून जाऊन सूर्या म्हणाला, " चूप एकदम चूप करो कमीनो. इधर रोनेका नही. हम रो रहे है क्या? (तो कशाला रडेल? )और क्या रे उसकी औरत राजस्थानसे हवाई जहाज पकडके आयेंगी क्या? भूखे, नंगे साले. बात करता है. एक तो यहां टाइम बरबाद हो राहा है. " त्याला एक तासाभरात सर्व खेळ खलास करायचा होता. चार वाजेपर्यंत डॉक्टर आला. (आधा अधूरा, खोटी डिग्री असलेला डॉक्टर. ) त्याची तपासणी होईपर्यंत अर्धा तास अजून गेला. गुड्डी अस्वस्थतेने फेऱ्या मारीत होता. आत्ता हॉटेल मध्ये गिऱ्हाईक अजिबात नव्हतं. पण उद्या सकाळी काय सांगणार? निदान सकाळ पर्यंत तरी वाट बघायला हवी. हॉटेलमधल्या कामगारांना हे कळायला हवं. मग तो सूर्याला म्हणाला, " देखो, सूर्याजी, हम सुबे दस बजेतक रुकते है. हॉटेलमे काम करनेवालोंके सामने ये सब होगा तो अच्छा होगा. " सूर्याचं डोकं आता शिणलं होतं. तो चवताळून म्हणाला, " सुबे क्या बैंड बाजेके साथ जानेका इरादा है? दोन तीन तासात उजाडणारच होतं....... नुसतंच इकडे तिकडे फिरून सूर्या कंटाळला होता. काही काम नसलं म्हणजे माणूस कंटाळतोच, मग ते काम चांगलं असो का वाईट. अर्धवट झोप झाल्याने तो सारखा श्रीपतच्या भावांवर डाफरत होता. डॉक्टर "रेस्पिरेटरी ऍरेस्ट "असं प्रमाणपत्र देऊन सटकला होता. श्रीपतला गुड्डीने हॉटेल मधल्या एका कामगाराच्या मदतीने पांढऱ्या चादरीत गुंडाळला. त्याचा "टॉर्चर केलेला हात त्याने शिताफीने त्याच्या शर्टाच्या आत घातला होता. हळू हळू श्रीपतचे अवयव आता कडक होऊ लागले. हा नक्की किती वाजता गेला कोणास ठाऊक? आपण सूर्या आला नसता तर सकाळशिवाय कदाचित पाहिलंही नसतं अशा विचाराने गुड्डी थोडा अस्वस्थ झाला. आपण याच्या मृत्यूला काही प्रमाणात जबाबदार तर ठरणार नाही असंही त्याला वाटलं. मग त्याला सूर्या करीत असलेली घाई पटू लागली. तरीही त्याचं म्हणणंही चूक नाही....... आता साडेसात वाजायला आले होते. आठ वाजल्यापासून हॉटेलचे स्वैपाकी कामगार येत असत. गुड्डीला जरा दिवस उजाडू लागल्यावर बरं वाटू लागलं. त्याने शववाहिनी मागवली...... तरीही ती येईपर्यंत एकदीड तास गेला. आलेल्या कामगारांना हळूहळू बातमी लागली. ते श्रीपतचं दर्शन घेण्यास येऊ लागले. जवळ जवळ दहा कामगार होते. आता तर नऊ वाजत होते. मग सूर्याने तिथून काढता पाय घेतला. गुड्डीवर सर्व जबाबदारी सोपवून आणि काहीही कमीजास्त झाल्यास त्याला ताबडतोब कळवण्यास सांगून तो निघाला. तो तिथून निघाला तर इकडे इन्स्पे. श्रीकांत आणि कॉन्स्टे. सावंत साठे मामांना भेटण्यासाठी निघाले. त्यांची जीप अर्थातच हॉटेल डिलाइट वरून गेली. डिलाइटच्या फुटपाथवर थोडी फार गर्दी पाहून कॉन्स्टे. सावंत म्हणाला, " सर या हॉटेल जवळ काहीतरी घडलेलं नक्कीच आहे. " मग त्याने आदल्या दिवशीची सगळी हकीकत थोडक्यात सांगितली. पण श्रीकांत म्हणाले, " सध्या वेळ नाही येताना पाहिजे तर तू इथे उतरून जा. "सूर्याची गाडी नुकतीच गेलेली असल्याने सावंतला चटकन संबंध लावता आला नाही. त्याला आता संशय येत होता. या हॉटेल मध्ये आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत. पण लवकरात लवकर चौकशी केली पाहीजे नाहीतर काहीच कळणार नाही. त्याला खरंतर साठे मामांना भेटण्यात अजिबात रस नव्हता. पण मोठ्या साहेबांना रिपोर्ट पाहिजे म्हणून जावं लागत होतं. त्याची घालमेल श्रीकांत सरांच्या लक्षात आली. त्यांच्यामते आत्ता बुधाचा होरा होता. म्हणजे आपल्याला बारीक सारीक माहिती लक्षात घ्यावी लागणार.

समोरच्या फुटपाथजवळ त्यांची जीप थांबली. मग सावंतला ते म्हणाले, " आपण पायीच जाऊ. म्हणजे लोकांचं लक्ष जाणार नाही. " रस्ता ओलांडून ते दोघे श्रीकांत सहकारी बँक असलेल्या त्या इमारती जवळ आले. इमारत जुनी होती. दहा वाजत होते. त्यांनी मुख्य गेटमधून प्रवेश केला आणि समोरच उतरणाऱ्या एका माणसाला साठे मामा कुठे राहतात ते विचारले. लवकरच ते साठे मामांच्या दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅट समोर आले. त्यांनी बेल वाजवायच्या आतच दरवाजा उघडला गेला. साठे मामा दारात होते. श्नीकांत सरांना आश्चर्य वाटलं. (बुधाचा होरा नक्कीच फायदा करून देणार म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आला)जणू काही त्यांना आधीच फोन केला होता आणि त्यांनी खिडकीतून पाहिलं होतं. पण तसं नव्हतं. साठेमामा कापसे बाईंनाच भेटायला निघाले होते. इन्स्पे. श्रीकांतना दारात पाहून आश्चर्य वाटले. मग साठे मामा म्हणाले, "तुम्ही कसे काय? " पण मनातून त्यांना बरं वाटलं. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, असा विचार करीत त्यांनी त्या दोघांना आत घेतलं. मग अर्धा तासा त्यांची चर्चा झाली. साठ्यांनी आपण कसे जागरूक नागरिक आहोत हे इन्स्पे‌. साहेबांना दाखवून दिले. खरंच सध्या मात्र जे घडत होतं ते त्यांच्याच प्रयत्नांनी झालं होतं. शेवटी मामा म्हणाले, " म्हणजे तुम्ही सर्च वॉरंट बरोबर आणलंच नाही, काय उपयोग? चला आपण कापसे बाईंकडे जाऊ. त्यांच्या शेजारचाच तर आजींचा फ्लॅट आहे. " ते मग तिघे बाहेर आले, त्याबरोबर बाजूच्या फ्लॅटमधले एक दोन शेजारीही, काय झालं असं मामांना खुणेने विचारीत त्यांच्या मागे आले. पहिल्या माळ्यावरच्या कापसे बाईंच्या फ्लॅटची बेल वाजवली. कापसे बाई पोलिसांना बघून आपलीच चौकशी करायला आल्येत की काय म्हणून घाबरल्या. जरा वेळ चर्चा करून ते सगळेच बाहेर आले. श्रीकांत सरांनी मग जवळ जाऊन कुलूपाचं निरिक्षण केलं. तशी दारावर कुलुपाचा आवाज झाला. ते म्हणाले, " बघतो मी, काय करता येतंय ते. उद्या परवा पर्यंत करूच काहीतरी. असं म्हणून ते निघण्यासाठी वळले. तशी मामा म्हणाले, " अजूनही फक्त बघणार की काय? अहो तुम्हाला सांगतो आत नक्कीच आजींबद्दलचा काहीतरी सुगावा हाती लागेल. " इन्स्पे. म्हणाले, " अहो जरा धीर धरा. कायद्याच्या कारवाईला जरा वेळ जरुर लागतो पण शेवटी अपराधीच पकडला जातो "..... आणि ते निघाले. साठ्यांच्या मनात आलं. आत काहीतरी नक्कीच महत्त्वाचं सापडेल. काहीतरी वाईट होणार, असं त्यांना सारखं वाटू लागलं. पण काय हे त्यांना सांगता येईना. आजींचं काही बरं वाईट तर झालं नाही? या शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकू लागली आणि आता मात्र सोसायटीचे पैसे बुडाले असंच म्हणावं लागेल. तरीही काही न बोलण्याचं ठरवून ते निघाले. आजींच्या दरवाज्यावरचं कुलूप हलत हलत स्थिरं झालं. जणू काही घडलंच नाही अशा थाटात ते लोंबकळू लागलं.

***** ********* ******** ******* ****** ******* ****** ******** ******* *******

इकडे आजींच्या फ्लॅटमध्ये दडून बसलेल्या तिघांनी मिळून आता बँकेतल्या त्या खोलीच्या वरचा स्लॅब इतका कोरून ठेवला होता. की एखाद दोन घण मारले तर तो तुटून खाली पडला असता. अकडा कामाबद्दल खूश होता. पण अजून दादाचा आदेश येथून जाण्याचा नसल्याने त्याच्यासहित ते तिघे तिथेच थांबले होते. असं तासनतास एखाद्या न आवडणाऱ्या जागेत स्वतःला कोंडून घेणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच होती. अर्थातच ते संध्याकाळपासून रात्रभर थांबत असत. ते आताशा काम झाल्यामुळे आळीपाळीने बाहेर जात व जेवून किंबा चक्कर मारून येत. पण फार काळजी घ्यावी लागत होती. अकड्याच्या मनात आलं, एक बरं होतं की आता रात्रीच काम करावं लागत होतं. पण त्याला भुयारात पडलेल्या आजींच्या मृतदेहाची काळजी होती. त्यांना ठिकाणी लावण्याची शक्कल फक्त दरोड्याच्या रात्रीच वापरता येणार होती. एकाच वेळी किती गोष्टी घाईघाईत करणार? त्याला कळेना. त्याला अजून जरी सांगितलं असतं तरी तो इतर कुठे तरी आजीची विल्हेवाट लावू शकला असता, म्हणजे फक्त दरोड्याचा विचार करता आला असता. त्यामुळे तो जरा अस्वस्थ होता. सध्या झमझम कंट्रोल मध्ये होता. त्याने आजींच्या बाबतीत केलेल्या चुकीमुळे त्याला आणि दुसऱ्या सहकाऱ्याला आता फक्त सावध राहून आपापले घोडे तयार ठेवण्याचं काम होतं. अकड्याच्या मनात आपणच स्वतः इथे राहून बाकीच्यांना दादाकडे पाठवण्याचं होतं. पण दादा म्हणाला होता, कभी जरूरत पडी तो दूसरे दो काम आयेंगे. तरीही त्याच्या आग्रहाखातर दादाने एकाला परत येऊ दिले. बाहेर जरा जरी आवाज झाला तरी ते तिघे सावध होत आणि ठरल्याप्रमाणे फायर कव्हर तयार करीत. पण त्यांच्या सुदैवाने अजून तरी कोणीच आले नव्हते. त्यांच्या दैवाची पण परीक्षा लवकरच होणार होती. हे त्यांना चांगलंच माहिती होतं. पण कशी ते माहीत नव्हतं. आज गुरुवार उजाडलेला होता. तिघांपैकी दोघे पहाटेच्या सुमारास आळीपाळीने जात. आज बसण्याची अकड्याची पाळी होती. दुसरे दोघे गेले होते. अकडा शांतपणे दुसऱ्या दोघांनी आणून दिलेला नाश्ता करीत होता. बाजूच्या स्टुलावर त्याचं पिस्तूल पडलेलं होतं. ते सहाबारी पूर्णपणे लोडेड होतं. त्यावरील सेफ्टी कॅच त्याने सरकवून ठेवला होता. न जाणो कोणी आत आलंच तर विचार न करता फायरिंग करायचंच, पूढचं पुढे बघायचं. त्या तिघांची हीच एक योजना होती. हळू हळू साडे दहा वाजत आले. अचानक बाहेरच्या बाजूला काही माणसांचा बोलण्याचा आवाज आला. म्हणून त्याने दरवाज्याच्या खराब झालेल्या पीपहोल मधून बाहेर पाहीलं. त्याला पोलिसी गणवेशातला माणूस आणि इतर माणसेही जेमतेम दिसत होती. अर्थातच त्यांचे चेहरे दिसत नव्हते.

तो घाबरून मागे सरकला. दरवाज्याच्या बिजागरीच्या भागात लपला. त्यातून दरवाजा उघडलाच तर आपल्याला हळूच आणि भोळेपणाने पळून जाता येईल. बाहेरच्या माणसाने जर फायरिंग केले तरच आपण करू. कारण दुसरे दोघे नसल्यामुळे फायर कव्हर कोण देणार . मग तो बाहेरचे बोलणे ऐकू लागला. म्हणजे पोलिसांना संशय आलाय तर. त्याला फारसं काही ऐकू आलं नाही तरी वॉरंट हा शब्द ऐकू आला. म्हणजे एक दोन दिवसात पोलिस आत येणार हे नक्की. दादाला सांगितलंच पाहिजे. दुसरे दोघे संध्याकाळी येतील म्हणजे आपण दादाला भेटायला जाऊ शकतो. संध्याकाळ व्हायला अजून बराच वेळ होता. नुसतं बसून त्याला आता मोड येऊ लागले होते. आतमध्ये फार जोरात फेऱ्या मारूनही चालणार नव्हते. खाली बँकेत ऐकू गेलं असतं. अर्थात, त्याने काहीही फरक पडणार नव्हता. त्यांना थोडंच माहीत होतं की वर आजी नाहीत. असो जेमतेम एक वाजत होता. त्याला आता चांगलीच भूक लागू लागली., पण सध्या कोणीच येणार नव्हते, आणि तो बाहेरही जाऊ शकत नव्हता. अचानक त्याच्या खिशातल्या मोबाईलची बारीक शिट्टी वाजली, आणि तो सावध झाला. पटकन तो आजींच्या खोदलेल्या बाथरूममध्ये गेला. तो दादाचा फोन होता. " क्या कर राहा है?, अगर कुच कर नही राहा तो सबकुछ ठीक है या नही ये देखकर यहां चले आना. बात करनी है. श्रीपत ऊड गया है. (दादाने सूर्याचा शब्दप्रयोग मुद्दाम केला. त्याला तो करण्यात गंमत वाटली ) " अकडा म्हणाला, " मेरेको भी आपसे बात करनी है. मै हो सके तो आता हूं. वरना शामको तो आउंगाही. " आ जाओ, असं न्हणून दादाने फोन बंद केला. त्याच्या मनात आलं, आता अकड्याला विश्वासात घेऊन आणि काहीतरी प्रलोभन दाखवून आपल्या बाजूला करून घ्यावा. नाहीतरी त्याने म्हातारीला मारल्याबद्दल त्याला धडा शिकवायचाच आहे. म्हणजे सूर्या जास्त शहाणपणा करणार नाही. सूर्याच्या वागण्याचा आजकाल त्याला आता वेगळाच वास येऊ लागला होता. टोळीची सूत्रं हातात ठेवणं जरूर होतं. देशाबाहेर जर जाता आलं नाही तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. काका पण वाटतो तितका साधा नाही. साधनाबेन कडे तो का जात असावा. ती त्याच्या कशी काय ओळखीची होती? त्याची तिच्याशी लग्न करण्यापर्यंत मजल कशी काय गेली? म्हणजे हा बऱ्याच दिवसापासून तिला ओळखत असावा. माणसाच्या बाहेरच्या वागण्यावरून काहीच कळत नाही. सूर्या अगदीच खोटं बोलणार नाही. तसंही एकदा का माणूस आवडेनासा झाला की माणूस जास्तीत जास्त त्याच्या वाईट गोष्टीच शोधून काढतो. आपल्या धंद्यात तर हे असच चालतं. आपण पण आधीच्या कनू दादाचं काय केलं? जास्तीत जास्त माहिती मिळवून शेवटी पाठवलाच की ढगात. तरीही त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. सूर्याकडून आयतीच माहिती मिळत्ये ते बरंच झालं. सध्या जसं चाललंय तसं चालूच द्यावं. एकीकडे सूर्यालाही झुलत ठेवायला हरकत नाही. काकाला आपल्याला समजावून सांगता येईल,

आणि एकदा का त्याने सगळे पैसे दुबईच्या बँकेत पाठवले की काकाचा विचारही करता येईल. त्याला अचानक आठवलं, उद्या शुक्रवार, दिवाणजीकडन पैसे येतील. यावेळी सूर्याला खूश करावा. नाहीतरी त्याला नाहीसा केल्यावर ते पैसे पुन्हा आपलेच होणार आहेत. मग त्याला एकदम आठवलं. दिवाणजींसाठी जे काम करायचं होतं ते ज्याला सांगितलं होतं ते कुठवर आलय ते पाहावं. त्याने फोन लावायचा प्रयत्न केला पण लागला नाही. मग त्याने त्या व्यक्तीला मेसेज पाठवला. या पेश्तू किंवा दिवाणजीला काय कळतंय खोपड्या केव्हांच्या आहेत? पण नको, या काळ्या जादूवाल्यांचा आपल्याला अनुभव नाही. या व्यवहारात काकाला थोडीशी रक्क्म दिली तरी चालणार आहे त्याने काहीच प्रयत्न केला नाही. बँकेत मात्र त्याचा वाटा जास्त आहे. तसंही मी शेवटी या सगळ्यांपासून दूर तरी जाईन नाहीतर या सगळ्याना मारीन तरी. पण अजून एक प्रश्न राहतो. त्या पंधरा नंबरच्या लॉकरमध्ये असं काय आहे?....... त्याने बऱ्याच शक्यता पडताळून पाहिल्या. पण त्याचं डोकं चालेना. एकूण सगळी योजना पाहता, श्रीपतचं जाणं, या म्हातारीचं मरणं जरा विचित्र वाटतंय. अजून आवाज करणारं रस्ता खोदणाऱ्या मशीनचं इंजिनियर्नी काय केलय? त्याची जरूरी आहे का? हे अकडा आल्यावरच समजेल. तो वाट पाहत बसला. त्याने आता येणारं कोणी नाही असं समजून आतली बाटली काढली आणि तशीच तोंडाला लावली. त्याला थोडं समाधान वाटलं. तसं आपल्याला काही माहीत नाही असं नाही. दरोड्यापर्यंतच्या सगळ्या घडामोडींवर आपली अजून तशी हुकुमत आहे, हे नक्की. त्याच्या मनात आलं. तो खुर्चीत रेळला. अचानक त्याच्या स्क्रीनवर काकांची आकृती आली. हा म्हातारा, आता कशाला आला असेल? येऊ दे. नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. दादा सहसा जास्त तपशिलात प्रतिक्रिया देत नसे. म्हणजे सगळे गाफिल राहतात आणि आपल्याला हल्ला करणं सोपं जातं असं त्याचा अनुभव होता. आता आपण सूर्या, अकडा आणि हा काका यांना गाफिलच ठेवायचंय. काका आत शिरले आणि त्यांच्या टेबलावरचा फोन वाजला. दादाने त्यांना तिथे न बसता ताबडतोब आत यायला सांगितलं.

काका आत गेले. त्यांनी बूढा चाच्याचा वृत्तांत विशद केला. दादाचं काका येण्यापूर्वी अकड्याशी बोलणं झालं असल्याने तो सावध होता. त्याच्या तोंडावर समाधान दिसलं. त्याच्या मनात आलं, पढे लिखे आदमीका यही तो फायदा होता है. इतनाही देखना पडेगा की वो ज्यादा होशियार नही निकले. मग त्याने त्यांना सूर्यासे बचके रहना असा इशाराही दिला. म्हणजे आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे वाटावं. काका म्हणाले, " अभी मेरे लिये क्या आदेश है? " मग थोडा विचार करून म्हणाला, " कल मीटिंग है लेकीन, आपको आनेकी जरुरत नही. परसूके मिटिंगमे आपको आना होगा वो भी जरा जलदी. " त्याने शिताफीने दिवाणजींबद्दल बोलण्याचे टाळले. काकांनाही मीटिंगला नकोच होतं. त्यांना आत्ता तरी साधनाकडे जायचं होतं. आपण लवकर गेलो तर तिला घरी थांबण्याचा आग्रह करावा, म्हणजे तिच्याशी पुढचं बोलता येईल. कारण पुढच्या आठवड्यात काय होईल सांगता येत नाही. पण तिच्याशी फार मोकळं बोलायचं नाही असा विचार मात्र त्यांच्या मनात आला नाही. ती काय बोलते ते ऐकणं खरंतर जरूरी होतं. त्यांना आता एकदम आणीबाणी जाणवू लागली. त्यांच्या मनात हे असले अस्थानी विचार येत असत. आणि मग त्यांचं लक्ष समोरच्या परिस्थितीवरून उडत असे. मनाच्या त्याच अर्धवट अवस्थेत त्यांनी दादाला विचारले, "फिर मै निकलूं तो चलेगा? "....... दादाने चेहरा त्यांच्याकडे वळवला. खरंतर त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलेलं होतं. पण चेहऱ्यावरचे प्रश्न तोंडात न आणता त्याने त्यांना जाण्याची अनुमती दिली. ते वळले. तशी तो म्हणाला, " फिर भी कही नजदीकही रहना, अगर लगे तो मै आपको बुलवा लूंगा. " ते बाहेर आले. थर्मास उचलून बाहेर आल्यावर त्यांनी साधनाला फोन लावला. एक वाजत होता. ती घरीच होती, पण कामावर उशिरा जाणार होती. त्यांनी तिला थांबायला सांगितलं. ती नाईलाजाने हो म्हणाली. खरंतर तिला राग आला होता. आपण घरी बसलो तेव्हा हे आले नाहीत आणि आज थांबवतायत. एवढी काय घाई आहे? तिच्या मनात आलं. जाऊ द्या थोडं थांबूया. सोना येण्याची पण वेळ झाली होती. थोड्याच वेळात बेल वाजली. काका येणार तिला माहिती होतं. पण सोना आली होती. आज प्रथमच तिने लक्ष देऊन सोनाकडे पाहिलं होतं. सोनाची उंची चांगलीच वाढली होती. तशी ती लहानच होती. पण तिच्या वडिलांची उंची तिने घेतली होती. तिला आश्चर्य वाटलं की इतके दिवसात तिने सोनाकडे प्रथमच खऱ्या अर्थाने पाहिलं होतं. बरं आहे, ती आपल्यासारखी साधारण उंचीची नाही. सोनाच्या लक्षात आलं ही आज अशी काय बघत्ये? म्हणून मग तिने साधनाला विचारलं, " हे काय अशी काय बघत्येस, जसं कधी पाहिलंच नाही. " त्यावर ती म्हणाली, " तुला नाही कळणार ते, त्यासाठी आई व्हावं लागतं. " मग सोनाने आनंदाने विचारलं, " हे काय तू आज जाणार नाहीस? "..... साधना म्हणाली, " अग जाणार आहे, पण काका येतायत, म्हणून थांबल्ये". सोना म्हणाली, " खरंच? मग आज तू दांडी मारच, आपण तिघे बाहेर जाऊ या ना आज........... मम्मी जायचं ना? " साधनाच्या उत्तराची वाट न बघताच खूश होऊन म्हणाली. इतका आगाऊपणा साधनाला आवडला नाही. तिने उत्तरच दिलं नाही. त्या दोघी आत जाण्यासाठी वळल्या, तेवढ्यात परत बेल वाजली. सोनाने दरवाजा उघडला, बाहेर काका उभे होते. त्यांना आत येऊन देण्यासाठी ती बाजूला झाली. दरवाजा बंद करीत, आत येत, त्यांनी तिला जवळ घेतलं. तिला खूपच बरं वाटलं. आत गेलेली साधना पुन्हा हॉलमध्ये आली. ती ऑफिसला जाण्याच्या तयारीत असल्याने तिचा चेहरा चांगला दिसत होता. काकांना लगेचच तिला जवळ घ्यावंसं वाटलं. पण सोनाचं भान त्यांनी ठेवलं.
ती परत आत जात त्यांना म्हणाली, " एवढं काय काम आहे की मला थांबवून घेतलंत? ". ते काही बोलण्याच्या आधीच सोना म्हणाली, " मम्मी, अजिबात जायचं नाही हं आज. आधी फोन कर ऑफिसमध्ये. " आणि तिने कॉर्डलेस आणून दिला. तिला सोनाचा राग आला. ती कोरडेपणाने म्हणाली, " तुला दुसरं काही काम नाही का? पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे ना?, जेवायला वाढत्ये, नंतर अभ्यासाला बैस. थोडं थांबून तिने काकांना विचारलं, तुम्ही जेवणार आहात ना? " जेवायला या वगैरे न म्हणता ती आत गेली. थोड्याच वेळात पुन्हा बेल वाजली. आता काकांनी दरवाजा उघडला. बाहेर अतिशय घाणेरडा दिसणारा एक बुटका माणूस उभा होता. तो सोनापेक्षा थोडाच उंच होता. त्याचा एक डोळा वर आणि एक डोळा खाली होता., तसंच त्याच्या चेहऱ्यावरही लहान लहान जखमांच्या खुणा होत्या. लहानपणी बऱ्याच व्रात्य मुलांची तोंडं सतत खोक पडल्याने जशी मोठी झाल्यावर खराब दिसतात तशी आणि असे व्रण जर जास्त असतील तर चेहऱ्याला एक प्रकारचा विनाकारण उग्रपणा येतो आणि कधी कधी त्यावर निर्दयपणाची छटा येते. त्याचा एका पायाला कसला तरी मार बसला असावा त्यामुळे तो थोडा तिरका उभा होता. काकांनी त्याला रागाने विचारलं, " काय काम आहे रे? ". तो न घाबरता म्हणाला, " नही कुछ नही, भोजने साब यही रहते है ना? "

त्याची नजर आत फिरली.. आतल्या दारात साधना आणि सोना उभ्या होत्या. तो तसाच मागे वळला आणि निघाला. एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखा, भराभर(फास्ट फॉरवर्ड) हालणाऱ्या चित्रासारखा नाहीसा झाला. तो होता "काण्या चित्ता". त्यामुळे काकांना विचार करून बोलण्याचा वेळच मिळाला नाही. तो खाली उतरला. पण भोजने तर वर राहत होते, मग हा खाली का गेला? काकांच्या मनात शंका आली. याच बिल्डिंगच्या गच्चीवर जाण्यासाठी काका मागे आल्याने त्यांना हे माहीत होतं. एखादी न पटणारी गोष्ट गळ्याखाली उतरावी तेव्हा होणारा चेहरा करून ते दरवाजा बंद करून आत गेले. लवकरच त्यांची जेवणं झाली.. काकांना कळेना साधनाशी कसं बोलायचं, की त्यांना पुढचं ठरवायची गरज आहे. कारण ती जेवणं झाल्याबरोबर सोनाच्या खोलीत गेली आणि तिला अभ्यासाला बसवू लागली. खरंतर आपल्याला फार वेळ नाही. उद्या रात्री रमेश कॅनडाला जाणार आहे म्हणजे आपण आज लवकर घरी गेलेलं बरं. ते अस्वस्थ झाले. नुसत्या जेवणासाठी तर ते आलेले नव्हते. त्याच अवस्थेत ते हॉल मध्ये आले आणि सोफ्यावर बसले. त्यांचा तिथे बसण्याचा इंटरेस्ट अचानक गेला. पण थोड्याच वेळात ते एकटे बसले असतील याची जाणीव झालेली साधना बाहेर आली. ती म्हणाली, " मला वाटतं, मी आता ऑफिसला येत नाही, असं सांगावं हे बरं. " त्यांना ऐकून जरी बरं वाटलं, तरी काय बोलायचं आणि बोलण्याची आणि निर्णयाची एवढी घाई का? यावर काय उत्तर द्यायचं, याचा त्यांनी विचारच केला नव्हता. त्यामुळे ते गोंधळात पडले जवळ जवळ तीन वाजत होते. निदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी जायलाच हवं. उद्या शुक्रवार, आणखीन काही प्रश्न निर्माण झाले तर काय करायचं? त्यांना समजेना. साधना जरी फोन लावण्यात गढलेली होती तरी तिला त्यांचं काहीतरी बिनसलंय एवढं कळलं होतं. तिने फोनवरून जे कारण सांगायचं ते सांगितलं. मग ती त्यांच्यासमोर येऊन बसली. हळुवार पणे म्हणाली. " काय झालंय, तुमचा चेहरा असा बारा वाजल्यासारखा का दिसतोय? माझं काही चुकलं का? "...... ते पडेल आवाजात म्हणाले, "साधना, परिस्थिती फारशी चांगली नाही. "..... "कोणाची? " तिने अधीरपणे विचारलं....... त्यांची एवढी ओढाताण का होत्ये? ती विचार करू लागली. आपण काहीच निर्णय दिला नाही म्हणून तर नाही? अशी कोणती "निकड " निर्माण झाली होती की त्यांना लग्नाबद्दलचा आपला निर्णय लगेच हवा होता. तिला मागच्या आठवड्यातले दिवस आठवले. ती म्हणाली, " समजा तुम्ही आज रात्री इथे राहिलात तर आपल्याला नक्कीच बोलता येईल. " आता मात्र त्यांनी तिला त्यांना का राहता येत नाही हे सांगितलं. पण अजूनही त्यांनी पुढच्या आठवड्यात घडणाऱ्या घटनांबद्दल सांगितलं नाही. तसंच दरोड्याबद्दलही सांगितलं नाही. चार वाजेपर्यंत ते बसले आणि अचानक निघाले. ते पाहून तिला घाबरल्यासारखं झालं. जाताना ती म्हणाली, " तुम्ही नक्की कारण न सांगताच चाललेले आहात, हे बरं आहे का? मला किती काळजी लागेल याची तुम्हाला कल्पना कशी येत नाही?. "............. मग मात्र ते घाईघाईने म्हणाले, " साधना तू मला आत्ताच्या आत्ता नक्की उत्तर दे. तू माझ्याशी लग्न करशील? मला आत्ता या लग्नाची अतिशय निकड आहे. " आपलं मन परत डळमळीत व्हायला नको म्हणून त्यांनी एकदम बोलून टाकलं.

आता मात्र ती वैतागून म्हणाली, " समजा, मी नकार दिला तर? "........... त्यांनी यावर उत्तर म्हणून बूट घातले. आणि ते उठले. त्यांना आता लक्षात आलं. आपल्याला कोणावरही अवलंबून राहता येणार नाही आणि आपला कोणावरही हक्क नाही. आपल्याला कोणालाही धरून का राहता येत नाही? सगळ्या गोष्टी एकदम व्हाव्यात हा आपला अट्टहास का? ते चडफडू लागले. हे सगळं घडून जाण्याची आपण का वाट पाहत नाही? फार तर आपण जगणार नाही, फार तर आपण इथे राहणार नाही. फार तर ती आपल्याबरोबर राहणार नाही. पण आपोआप तिच्या बरोबर संबंध जुळून आल्येत तर ते का पूर्णत्वाला नेऊ नयेत? आपल्याला फार घाई आहे. सारासार विचार हरला आणि भावना पुन्हा प्रबळ झाल्या........ ती त्यांच्याकडे अवाक होऊन फक्त पाहत राहिली. जणू काही ते फार मोठा गुन्हा करीत आहेत. खरोखरीच ते तिला दुखवूनच जात होते. सगळी जवळीक आणि संबंध एका क्षणात नाहीसे होणार होते. ती अडवण्यासाठी उभी राहिली. पण तिला अचानक निराशेने घेरल्यामुळे अस्वस्थ वाटू लागलं.. नाही म्हंटलं तरी गेले काही महिन्यांचा त्यांचा घनिष्ठ संबंध होता. आता त्यावर पूर्णतेचा शिक्का मारायची वेळ आली आणि हे असे सोडून काय चालल्येत म्हणून तिला एक प्रकारचा धक्का बसला. स्वतःला सावरीत ती दरवाज्याकडे गेली. त्यांना अडवीत ती म्हणाली, " काय चालवलंय तुम्ही हे? सगळं नष्ट करायला निघालात, तेही एका क्षणात? "....... मग काकांना तिच्या भावना तीव्रतेने जाणवल्या. कदाचित तिला आपल्याशिवाय कोणीही नसेल. कदाचित तिच्या एकाकी आयुष्याला थोडा तरी अर्थ आपल्या येण्यामुळे आला असावा. (खरी परिस्थिती उलट होती. )तिच्या चेहऱ्यावरचे ते निराशेचे भाव पाहून त्यांनी तिला एकदम कवेत घेतलं. तिला कुरवाळीत म्हणाले, " साधना, मला सुद्धा तुझी आणि सोनाची तितकीच जरूरी आहे जितकी तुला. (त्यांनी बोलण्यात सोनाचं नाव मुद्दाम घेतलं, म्हणजे एक प्रकारची भावनात्मक मांडणी तयार व्हावी. ) असला भावनिक खेळ खेळण्याची त्यांना सवय झाली होती. तिच्याही डोळ्यात पाणी आलं. मग ते म्हणाले, " साधना सध्या ज्या परिस्थितीतून मी जातोय ती कदाचित तुला आत्ता सांगणं बरोबर ठरणार नाही यातच काय ते समजून घे. पण लवकरात लवकर लग्न करणं मला तरी योग्य वाटतंय. प्लीज मला समजून घे. "........ आता तिने परत त्यांना आत यायला लावलं. काहीतरी नक्कीच घडलंय. तिच्या मनात, का कोण जाणे धोक्याची घंटा वाजू लागली. ती म्हणाली, " माझी शप्पत आहे तुम्हाला, खरं काय झालंय ते सांगा".... मग थोडावेळ थांबून ते म्हणाले, " आधी कोणत्याही परिस्थितीत मी म्हणेन तेव्हा लग्न करण्याचं वचन दे. तर सांगतो. आणि हे तू कोणालाही सांगणार नाहीस, आणि कोणतीही कृती तू याबाबतीत करणार नाहीस........ दे वचन " असं म्हणून त्यांनी आपला हात पुढे केला. तिने त्यांच्या हातावर हात ठेवीत म्हंटले, " ठीक आहे दिलं वचन, पण कृतीबद्दल मी वचन देणार नाही. "....... आत्ता जरी काका थांबले असते तरी चाललं असतं. पण मूर्खपणा करायचाच असं ठरवलेला माणूस आंधळा झालेला असतो हेच खरं....... त्यांचंही तेच झालं.
मग मात्र त्यांनी अथ पासून इति पर्यंत काहीही न लपवता तिला सगळं सांगून टाकलं. त्यांनी सांगायला सुरुवात करून संपेपर्यंत तिचे डोळे आश्चर्य आणि भीती यांनी मोठे होत गेले. त्यांनी सगळं संपवल्यावर ते लहान मूल जसं आईच्या तोंडाकडे आशेने बघते, त्या भावात तिच्याकडे बघत राहिले. तिचा या सगळ्यावर विश्वासच बसेना. अचंब्याने तिचा हात तोंडावर गेला. तिच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. आणि पहिला विचार आला, तो तिच्या आणि सोनाच्या सुरक्षिततेचा. आपण या सगळ्या पासून दूरच राहिलेलं बरं. हे सगळं आपल्याला माहीतच नाही असं वागलो तर जास्त सुरक्षितता वाटेल हा विचार तिला बरा वाटू लागला. ती जवळ जवळ पंधरा वीस मिनिटे गप्पच बसली. खालच्याच बँकेत असलेल्या खात्यावरच्या पैशांची तिला आठवण झाली. काही डिपॉझिटसही होती.. हे सगळेच पैसे आपण उद्याच्या उद्या बँकेतून काढून घ्यायचे आणि दुसरीकडे ठेवायचे, किती कठीण गोष्ट आहे, वेळ फार कमी आहे. तिच्या मनाने विचार केला. काकांचा विचार तिच्या मनाला शिवलाही नाही. खरंतर ती भीतीच्या तूर्यावस्थेत गेल्यासारखी झाली. समोर काका बसले आहेत हे भानही तिला राहिलं नाही. त्यांना तिच्याकडून दिलासा हवा होता. मग आणखी काही वेळाने ती भानावर आली. तिला आपण या अशा माणसाबरोबर उरलेला जन्म काढणार आहोत, याची तिला भयावह जाणीव झाली. यांच्यामुळे आपल्या आणि सोनामागे काही भलत्याच गोष्टी मागे लागू शकतात याची तिला धास्ती वाटू लागली. यांच्या बाबतीत आपण फारच वाहवत गेलो, हेच खरं. ती अगदीच सगळं झुगारून देण्याइतकी कोडगी नव्हती. सुरक्षित आयुष्याची अपेक्षा असलेल्या तिला काही सुचेचना.

ती काहीच बोलत नाही असं पाहून काका म्हणाले, " साधना, मलाही या सगळ्यापासून दूर राहावंसं वाटलं आणि वाटतंही. मला तुझ्या मदतीची गरज आहे. आपण खूपच जवळ आलेले आहोत, म्हणजे आपण एकमेकांना चांगलेच ओळखतो. त्यामुळे आपापली सेव्हिंग्ज घेऊन इथून निघून जाऊन नवीन आयुष्य सुरू करू शकतो. सोनाही मला आवडते आणि बहुतेक सोनालाही मी. तुझा प्रश्नच नाही. तुझं काय म्हणणं आहे? इतके दिवस मी तुझ्यामागे यासाठीच लागलो होतो. पण तुला ते जाणवलं नाही. आता दिवस राहिलेच नाहीत, काय ते आजच ठरवावं लागेल............. " ती हताश होऊन, खांदे पाडून बसली होती. तिच्या मनात आलं हे मला असं गृहीत का धरतायत? की मी हे सगळं ऐकल्यावर लग्न करीन...... पळून जाण्याची योजना? छे, छे, शक्यच नाही. हळूहळू तिने स्वतःला सावरलं. मग म्हणाली, " मला विचार करावा लागेल. " ते ऐकून काका आणखीनच अस्वस्थ झाले. मध्येच सोना आली आणि म्हणाली, " माझा अभ्यास झालेला आहे. आपण सगळेच आता बाहेर जाऊ शकतो ना? " तिला नक्की काय घडलंय याची जाणीव नव्हती. पण वातावरण तंग असल्याचं मात्र चांगलंच जाणवलं. दोघांचेही चेहरे पाहून "काय झालंय काय मम्मी, तू बोलत का नाहीस? " तिने अधीरतेने विचारले. पण तिला उत्तर देण्याऐवजी ती काकांना म्हणाली, " निघा तुम्ही. "................. काका दरवाजा उघडून बाहेर पडले. आकाशात काळ्या ढगांनी चांगलीच दाटी केली होती., पडला तर कोणत्याही क्षणी प्रचंड पाऊस पडला असता. आणि ते खाली उतरे पर्यंत पावसाला दणकून सुरुवात झालीही. दीर्घ उसासे टाकीत ते रस्त्यावर आले. त्यांच्या भविष्यावर जणू परमेश्वराने पाणी फिरवले, असं त्यांच्या मनात आलं. कोणतीच गोष्ट आपल्या बाजूने घडत नसल्याची त्यांची भावना आता प्रबळ झाली. पावसात भिजणं हे काकांना नवीन नव्हतं. ते छत्री क्वचितच वापरीत. कशीतरी बस पकडून ते एकदाचे घरी पोहोचले. पाच वाजून गेले होते. बेल वाजल्यावर रमेशनेच दार उघडले. ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. पण तो लवकर येणार होता, हे त्यांना माहीत होतं.

ते भिजलेल्या अवस्थेत आत शिरले. रमेश म्हणाला, " छत्री घेऊन जाणं आवडत नाही की काय तुम्हाला. तुमची जुनी सवय आहे म्हणा. चला, आज आपण बाहेर जेवायला जाऊ. त्याला जरी बरं वाटत होतं. तरी त्यांचं काहीच स्थिरस्थावर न झाल्याने तो थोडे फार चिडल्यासारखे झाले होते. त्यांनी कोणतीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नाही. ते पाहून रमेशने विचारले, " आज असे नाराज का दिसताय? काही झालंय का? " साधनाकडे नंतर जायचं ठरवून त्याला म्हणाले, " नाही असं काही नाही रे, पण कामावर फारच चिकित्सा करतात कधी कधी, त्याचा त्रास होतो. उद्या मला खरंतर जायचं नाही, तूही जाणार आहेस दिवस भर घरी राहीन म्हणून ठरवलं. पण उद्याही बोलावलंय, लवकर जा म्हणाले, पण सुटी देत नाहीत. "......... तो लगेचच म्हणाला, "ठीक आहे, पण मी तरी उद्या घरी कुठे आहे? मी सुद्धा दुपारी दोन वाजेपर्यंत घरी येणार आहे. जाऊन या थोडावेळ कामावर". फारसं गंभीर बोलणं झालं नाही. ते श्रेयाशी यांत्रिकपणे खेळले, तिला बागेतही घेऊन जाणं पावसामुळे जमलं नाही. पाऊस बहुतेक चारी महिन्यांचा आजच पडू पाहत होता. इतक्या गंभीर पणे तो पडत होता.

जरा थांबला असता तर काही बिघडलं असतं का? त्यांच्या मनात आलं. तसंही पाऊस थांबून आपल्या थांबलेल्या आयुष्याला काय मोठी गती येणार आहे? असंही त्यांच्या मनात आलं. चांगला बदल होणार होता, तो होता होता राहिला. मग त्यांच्या मनात, उशिरा का होईना आलं., आपण उगाचच साधनाला सगळं सांगितलं, निदान दरोड्याचं तरी सांगायला नको होतं. असले पश्चात्तापाचे विचार येऊ लागले. रमेश आणि नीता आत उत्साहाने गप्पा मारीत होते. थोड्यावेळाने त्यांनीही त्यात सामील व्हायचे ठरवले. पण मनातलं सगळं सांगणार कोणाला? त्यांना एकदम रघुमलची आठवण झाली. त्याला सांगून काय उपयोग? पण त्याला आपल्याबद्दल सहानुभूती वाटते, हे नक्की. मग त्यांच्या मनाने त्यांना परत टोचले, वाटेल ते रघुमलशी बोलून चालणार नाही. सध्या स्वस्थ बसून पाहावं. आता इतके दिवसाचं नाटक तरी आपल्याला साधनासमोर करावं लागणार नाही. असं म्हणून त्यांनी स्वतःचं आणि स्वतःच्या चुकीचं समर्थन करून घेतलं. आता जे काही ठरवायचंय ते साधनाला ठरवायचंय. या विचाराने त्यांना चुकीच्या कृतीतूनही थोडा हलकेपणा आला. ते लगेच विसरू लागले, की त्यांनी काय चूक केली आहे आणि ती किती गंभीर आहे. साधनाने काही विचित्र कृती केली तर, असा विचार त्यांच्या मनाला शिवला देखिल नाही. असो. ते सगळेच मग आठ साडे आठच्या दरम्यान जेवायला म्हणून बाहेर पडले.

**** ***** ****** ***** ******** ********** ************ **************** ************ ************ **

संध्याकाळची सातची वेळ. कॉन्स्टे. सावंत घाईघाईने पो. स्टेशनला पोहोचला. इन्स्पे. श्रीकांतच्या केबीन मध्ये तो हजर झाला तेव्हा चक्क धापा टाकीत होता. त्याला दम लागलेला पाहून श्रीकांत सर म्हणाले, " एवढं दमसा लागलाय रे तुला? काय डोंगर ओलांडून आलास की काय? "............ मग तो म्हणाला, " सर काम बी तसंच झालंय. तुम्ही मला हॉटेल डिलाइटजवळ सोडलं होतं ना? तिथे आज काय झालंय? " श्रीकांत वैतागून म्हणाले, " लवकर बोल. मला वेळ नाही. "....... " काही नाही सर, आज सकाळी त्या हॉटेल जवळ जो माणूस गेला तो होता श्रीपत राय. त्या हॉटेलचा मालक. "........... "त्याचा आपल्याशी काय संबंध? ", अवो सर, परवा सांगितलं होतं ना की तो सूर्या वकील कुनाला तरी रात्रीच्या टायमाला रग पांघरून घेऊन गेला ते. तो श्रीपत राय होता. म्हणजे अचानक कसा काय ग्येला? हाय का नाय? "......... "सावंत, आपल्या केसशी या सगळ्याचा काय संबंध? श्रीपतराय की कोण तो गेला असेल, त्याचा सूर्याने मर्डर केला असं म्हणायचंय का तुला? पुराव्याशिवाय आपल्याला कसं चालेल हे? याचा संबंध सरडे आजींच्या केसशी कसा असेल? चल चालायला लाग, काहीतरी कुठेतरी पाहतोस आणि सांगायला येतोस. " त्याला त्यांनी घालवला. सावंत चरफडत बाहेर आला. एवढी महत्त्वाची इंफर्मेशन, पण सायबाला त्याचं काय नाय. त्याला नाराजी आली. पण इथे नक्कीच पाणी मुरतंय. सूर्या, श्रीपत राय आणि तो बुटका माणूस. हे सगळं काय आहे? त्याला कळेना. मग त्याचं डोकं चालू लागलं. म्हणजे श्रीपतराय, सुर्या आणि दादाच्या टोळीशी संबंधित होता. म्हणजेच आजीला पळवण्यात त्याचाही हात असणार. त्याला ही लिंक आवडली. तो जो जो विचार करू लागला, तो तो त्याला ते विचार आवडू लागले. पण श्रीपतरायला का मारला असेल?......... ̮ इन्स्पे. श्रीकांतच्या टेबलावरचा फोन खणखणला. ते, साठे मामा, सरडे आजींचं नाहीसं होणं, किशाची टोळी, सावंतचे विचित्र अनुभव (म्हणजे बांगडी सापडणं इ. ) अनिच्छेने पण श्रीपतरायचे मरण त्याचाही काय संबंध असेल याचा ते विचार करीत होते. उद्या कोर्टाकडून सर्च वॉरंट मिळवण्याचा प्रयत्न करणं भाग आहे. फोनच्या बेलने ते दचकले. त्यांनी पटकन फोन उचलला. तो एसीपी खंडागळेंचा होता. श्रीकांत उठले आणि एसीपींच्या केबीन कडे निघाले. आत शिरल्यावर सलाम वगैरे झाल्यावर खंडागळे म्हणाले, " उद्या कमिशनर साहेबांना अहवाल द्यायचाय, काय द्यायचा? " तुम्ही काय कारवाई केलीत दोन दिवसात? "........... श्रीकांत म्हणाले, " आजच मी साठे मामांना भेटून आलो. सरडे बाईंचा फ्लॅटही पाहून आलो.. आणि......... " त्यांना मध्येच तोडीत खंडागळे साहेब म्हणाले, " साठे मामांनी काय जेवायला बोलावलं होतं का?"...... उत्तरादाखल श्रीकांत म्हणाले, " सर त्यांना भेटून काही जास्त माहिती मिळते का ते पाहिलं. आणि सर उद्या कोर्टाकडून सर्च वॉरंट घ्यायचाही प्रयत्न करणार आहे म्हणजे लवकरच आजींच्या फ्लॅटचा सर्च घेऊन पाहता येईल. काही सुगावा लागला तर........ " त्यांनी आपलं बोलणं अर्धवट सोडलं. खंडागळे म्हणाले, " वा बंद कुलूप कोणत्या कंपनीचं आहे हे बघितलंत का जाऊन? मग काय केलंत काय? " ते कडाडले. हा अहवाल पाठवून देतो आणि आपण दोघेही मग घरी बसू. काय हेच करणार ना तुम्ही? " खंडागळेंचा आवाज आता केबिनच्या बाहेर येऊ लागला. श्रीकांतनी मान खाली घातली. मग खंडागळे म्हणाले, " हे सगळं मला प्रोसिडिंगवर लिहून द्या आणि ती फाइल तुम्हीच कमिशनर साहेबांना सादर करा. गेट आऊट. तुम्हाला मी कामात कुचराई केली म्हणून "कारणे दाखवा नोटिस " देऊ शकतो हे कळतंय का तुम्हाला? " चला निघा. आणि पुढच्या कारवाईशिवाय मला तोंड दाखवायला येऊ नका. ती फाइल इकडे पाठवून द्या. " तिथे फार वेळ थांबण्यात अर्थ नाही असं पाहून त्यांनी सलाम ठोकला. आणि ते निघाले. केबिनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा चेहरा पडला होता.