Oct 24, 2021
कथामालिका

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे भाग ३रा

Read Later
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे भाग ३रा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे...भाग ३रा

त्या दिवशी राधा प्राचीला हर्षवर्धनबरोबर प्रवासाला जायला सांगते. प्राचीला कळत नाही राधा असं का सुचवतेय.
"राधा हे काय नवीन? मी आणि हर्षवर्धन नी टूरवर कशाला जायला हवं?"
"मॅडम आपण लग्नं झाल्यावर हनीमूनला गेला होता का?राधानी विचारलं
"कळलं मला राधा तुला काय म्हणायचं आहे..पण कसं शक्य आहे?" " का नाही शक्य? आता हर्षवर्धन बराच ठीक झाला आहे.अजून तुझ्यात नि त्याच्यात इतके हळूवार बंध कुठे तयार झालेत? त्यासाठी जा."
" हं.कल्पना तुझी चांगली आहे." " आहे नं मग पुढचं सगळं मी प्लॅन करते.तिथे गेल्यावर तू आणि तो एकाच पातळीवर आणायचा प्रयत्न कर." " एकाच पातळीवर म्हणजे?"

"अगं अजूनही तो तुझ्यापेक्षा सगळ्याबाबतीत कमी आहे. त्याची तुझ्याकडे बघण्याची दृष्टी तू त्याची गाईड आहेस अशी आहे.ती बदलायला हवी.नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी अशी भावना त्याच्या मनात आली पाहिजे.तशी आली तर त्याच्यात आणखी जास्त झपाट्यानी प्रगती होईल.आणि तो तुझ्याशी वागताना नवरा म्हणूनच लागेल. यानंतर तुमच्या संसाराला खरी सुरुवात होईल."

" हं तू म्हणतेस ते बरोबर आहे. आत्ता कामाच्या गडबडीत खरच त्याच्याशी खूप बोलल्याच जात नाही.पुढच्या ज्या टूर आहेत त्याचं नियोजन एकदा मार्गी लावते मग ठरवते."

"ठरवते नाही ठरलं.तुझ्या टूरचं मी प्लॅनिंग करणार. लग्नानंतर इतक्या ऊशीरा का होईना हनीमूनला जाऊन या. मनसोक्त गप्पा मारा. प्राची मला मनातून वाटतंय की या टूर मुळे हर्षवर्धन मध्ये खूप बदल होईल. तो तुझ्या खूप जवळ येईल. त्याच्यात खूप सकारात्मक बदल येईल."

प्राचीला राधानी ही कल्पना मांडली तेव्हापासून आनंदाच्या लाटांवर पोहतेय असं वाटू लागलं होतं. हर्षवर्धनमध्ये आता बरीच सुधारणा झालीय तरी तो स्वतःला तिच्यापेक्षा कमी समजतो. हे त्यांच्या मनातून काढायला हवं. बरोबरीचं नातं तयार झाल्यावरच नं खरा संसार सुरू होणार.

प्राची स्वतःशीच हसली.मनातले हे विचार बाजूला ठेऊन तिनं कामावर लक्ष केंद्रित केलं.

घरी आल्यावर प्राचीनी कामीनी बाईंना राधाची कल्पना सांगीतली.त्यांनाही खूप आनंद झाला हे ऐकून.त्या म्हणाल्या

"प्राची खरच जाऊन या. लग्न झाल्यापासून तू हर्षवर्धनला सुधारण्याचीच जबाबदारी पार पाडली. अगं या जबाबदारीमुळे तुमच्यात नवरा बायकोचं नातं निर्माणच झालं नाही. आता त्यासाठी प्रयत्न करायला हवे. आता हर्षवर्धन ब-यापैकी या सगळ्यातून बाहेर पडलाय.आता दोघं स्वतःला वेळ द्या.अजून तुझ्याशी बोलताना हर्षवर्धन बिचकतो. हे बिचकणं तेव्हा जाईल जेव्हा तू जास्तीतजास्त त्याच्या सहवासात येशील."

"हो मला पटतंय तुमचं म्हणणं.आज मी हर्षवर्धनशी बोलते. बघू काय म्हणतो."

जेवण झाल्यावर मागचं आवरून प्राची खोलीत आली तेव्हा हर्षवर्धन वहीत काहीतरी लिहीत होता.ते बघून प्राचीला आश्चर्य वाटलं.पण तिनी एकदम काही विचारलं नाही.

प्राची झोपायला जाणार तेवढ्यात हर्षवर्धननी तिला वही दिली.म्हणाला "मी काहीतरी लिहलय."
"अरे वाह! बघू." प्राचीनी वही हातात घेतली तर त्यात लिहीलं होतं

मी हर्षवर्धन पटवर्धन.माझ्या बायकोचं नाव प्राची आहे.प्राची माझ्या आईची खूप लाडकी आहे.माझीपण लाडकी आहे.या वाक्यावर हर्षवर्धनने काट मारला होता.तिला कळलं नाही असं का केलं असेल.तिनी विचारलं हर्षवर्धन मी तुलापण आवडते नं

हर्षवर्धन एकदम लाजून खाली बघू लागला.प्राचीला गंम्मत वाटली.तिच्या मनात आलं आपला रोमान्स जगावेगळाच असणार आहे. तिनी विचारलं "मी आवडते नं मग या वाक्यावर काट का मारला?"

बराच वेळ हर्षवर्धन काही बोलला नाही.थोड्या वेळानी हळूच म्हणतो "मला लाज वाटली सांगायची." "का लाज का वाटली?" " तू रागावशील तर." " अरे मी तुला आवडते यावर मी का रागावीन. मलापण तू आवडतोस." " हो खरच मी आवडतो." " हो खरच आवडतोस." " पण मी ढ आहे नं.तरी आवडतो?" "तू ढ नाहीस आणि असता तरी आवडला असता." " का?"

"कारण तू मनानी खूप चांगला आहेस.तुझ्या मनात वाईट विचार नाही येत. तूला माझी खूप काळजी वाटते हे मला माहिती आहे." प्राचीच्या या वाक्यामुळे तर तो खूपच लाजला. आणि हसू लागला.
प्राचीला हे सगळं नवीन होतं. ती हळुच हर्षवर्धनला म्हणाली

"आपण दोघचं दोन चार दिवस कुठे फिरायला जावं असं माझ्या मनात आहे.जायचं नं. तुला कशी वाटली माझी कल्पना?"
"छान आहे.तू जे करते ते सगळं छानच असतं. म्हणून तर तू सगळ्यांना आवडते."

"तुला किती आवडते? सगळ्यांपेक्षा जास्त की कमी?"
"मला तू सगळ्यांपेक्षा जास्त आवडते." असं त्यानी म्हटल्याबरोबर प्राची त्याचा हात हातात घेऊन हलकेच थांबते.एक वेगळीच संवेदना आपल्या शरीरात भिरभिरली हे प्राचीला जाणवलं.ही जाणीव प्रत्येक मुलीला लग्नानंतर लगेच येते.आपल्याला इतकी वर्ष वाट बघावी लागली.पण आता लवकरच पूर्ण केली पाहिजे.

तिथे फक्त आपण दोघच असणार तेव्हाच हर्षवर्धनमध्ये माझ्यावरच्या प्रेमाची वेगळी जाणीव होईल. नव-याच्या मनात जी ओढ बायको बद्दल असते ती निर्माण होईल.जी सध्या त्याच्यात नाही.आपल्यालाच या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा.

यातून एक सामान्य हर्षवर्धन पुढे येईल.राधा म्हणते ते बरोबर आहे आम्ही दोघं एका पातळीवर आलो तरच आमचा संसार सुरू होईल नाहीतर आत्ता जितकं अंतर दोघांमध्ये आहे तितकंच अंतर आयुष्यभर राहील.

हर्षवर्धन तर नुसता त्याचा हात पकडलेल्या तिच्या हाताकडेच बघत बसला होता. त्याच्या मनात खूप खळबळ माजली होती पण ती खळबळ म्हणजे काय आहे हे त्याला नीट उमगत नव्हतं. तो बावरलेल्या नजरेनी तिच्या हाताकडे बघत होता.

प्राची त्यांच्या गोंधळलेल्या चेह-याकडे बघून म्हणाली
" हर्षवर्धन जायचं नं आपण फिरायला?" " तू म्हणशील तसं."
"तिथे फक्त आपण दोघं असू. आपण खूप फिरायचं,फोटो काढायचे आणि तुला मी आवडते तसंच मलापण तू आवडतोस हे आवडणं आत्ता कसं आहे. एकमेकांना मित्र मानतो नं तर आपली ही मैत्री आता नवरा बायकोची मैत्री व्हायला हवी.हो नं.आपलं लग्न झालंय. हे मंगळसूत्र तूच माझ्या गळ्यात घातलय म्हणजे आपण एकमेकांचे कोण?"

"आपण मीत्र नाही?" हर्षवर्धननी गोंधळून विचारलं. "मीत्र आहोतच पण या मंगळसूत्रामुळे मी तुझी कोण झाले?" हर्षवर्धन गोंधळतो.

"तुझ्या आईनी पण हे घातलय नं. मग तुझी आई तुझ्या बाबांची कोण आहे?" "बायको." "बरोबर मग मी तुझी कोण?" " बायको." हर्षवर्धन हे म्हणाल्या बरोबर प्राचीच्या शरीरातून आनंद लहरी फिरू लागल्या.आणि तिच्याही नकळत तिनी हर्षवर्धनला मिठी मारली.

अशी मिठी प्राची साठी पण नवीन होती. नवरा म्हणून हर्षवर्धनला तिनी अशी मिठी कधीच मारली नव्हती. मीठी मारल्यानंतरचा अनुभव तिच्यासाठी सुद्धा नवीनच होता.

एक सुखाची लहर तिच्या अंगात भन्नाट वेगानी दौडत गेली. तो आवेग सहन करतांना आनंदाचा सोहळा तिच्या मनानी आणि शरीरानीपण अनुभवला.


तिच्या अश्या वागण्याने हर्षवर्धन फारच अवघडला.हर्षवर्धन अवघडला पण त्याला जाणवलं की आपल्या शरीरात काहीतरी बदल घडतोय.काय ते नक्की त्याला उमगत नव्हतं.

इतक्या जवळून हर्षवर्धनने इतक्या वर्षात प्राचीला कधीच बघीतले नव्हतं. मिठी मारणं तर दूरच.त्याला ती नेहमी आपली गाईड आणि संरक्षणकर्ती वाटायची. आपल्याला एवढ्या मोठ्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढलं म्हणजे ती खूप शक्तीवान आहे हेच त्याच्या मनावर ठसलं होतं. एक स्त्री म्हणुन त्याची तिच्याकडे कधीच नजर गेली नव्हती.

प्राची आपल्याला आवडते हे त्याला हळुहळू लक्षात येऊ लागलं होतं.पण नवरा बायकोचं जे नातं असतं ते कधीच त्याच्या डोक्यात आलं नाही कारण ही इतकी संवेदनशील गोष्ट आहे की ती समजायला मेंदू पुर्णपणे तयार असायला हवा. आज त्याच्या मनात आलं की आपल्याला ती आवडते हे तिला सांगायचं कसं? म्हणून त्याने लिहून दाखवलं.

ते वाचल्यावर जी प्रतीक्रिया प्राची कडून झाली ती हर्षवर्धन कडून नाही झाली. कारण भावनांची आंदोलनं अजूनही त्याच्या मनात इतकी खोल आणि प्रकर्षानी येत नव्हती.प्राचीच्या लक्षात आलं आत्ताच आपण दोघच जणं फिरायला जायला हवं.तरच हर्षवर्धन एक प्रियकर आणि एक नवरा म्हणून आपल्याला सापडेल.आता ऑफीसचं आणि कामाचं कारण पुढे येऊ द्यायचं नाही.

हर्षवर्धनच्या मनात तिच्याबद्दल प्रेम प्रेम आणि प्रेमच उफाळून यायला हवं.त्यासाठी फक्त दोघच असणं आवश्यक आहे. दोघांचे डोळे, दोघांचं मन आणि दोघांची शरीरं एकमेकांशी बोलली पाहीजे तेव्हाच हे शक्य होईल. त्याच्या मनात आणि डोळ्यात आपल्याबद्लच्या प्रेमाचा उगम तेव्हाच होईल.

प्राचीनी हर्षवर्धनला मारलेली मिठी सोडली आणि एका वेगळ्याच ऊर्मीने तिला साद घातली. हर्षवर्धन अजूनही गोंधळलेलाच होता. त्याला तसाच गोंधळलेला ठेऊन त्याची वही जवळ घेऊन ती झोपली.

हर्षवर्धन या घडलेल्या गोष्टींमुळे गोंधळला असल्याने कसले कसले विचार त्यांच्या डोक्यात येत होते. त्याला केव्हातरी झोप लागली.


सकाळी प्राची उठली तेव्हा तिला खूपच ताजतवानं वाटतं होतं. तिचं हर्षवर्धनकडे लक्ष गेलं.एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो झोपला होता. प्राची आपलं आवरून खोलीबाहेर आली.

कामीनी बाई स्वयंपाकघरात चहा करत होत्या.प्राचीकडे लक्ष जाताच म्हणाल्या " आज गडी खूष दिसतोय.काॅफी करु का तुझी?" त्यांच्या प्रश्नावर प्राचीनी त्यांना घट्ट मिठी मारली.कामीनी बाईंच्या लक्षात आलं आजचा आनंद काही वेगळाच आहे. हिची मिठी थरथरतेय. ही थरथर एक संवेदनशील गोष्ट आनंदाने आपल्यापर्यंत काहीतरी पोचवते आहे.

कामीनी बाईंनी हळूच प्राची ची मिठी सोडवली.तिच्या हनुवटीला पकडून अलगद चेहरा वर केला. तिचा चेहरा गोड संवेदनांनी भरला होता. तिला काही न विचारता त्या म्हणाल्या." प्राची कळलं मला सगळं.आता लवकरात लवकर फिरायला जाऊन या." मानेनी हो म्हणत प्राची हसली.


हा क्षण फक्त दोघींचा होता. त्यात दुसरं कोणीही त्यांना नको होतं.कामीनी बाईंनी प्राचीला अलगद टेबलजवळील खुर्चीवर बसवलं.प्रेमानी तिचा हात हाती घेऊन म्हणाल्या.

"प्राची तू अर्ध्याहून जास्त हे युद्ध जिंकली आहेस.याला पूर्णपणे तुझी ओळख करून द्यायची वेळ आली आहे.तुम्ही फिरायला जा. तिथे निवांतपणा मिळेल.तुम्ही परत आल्यावर मला हर्षवर्धन पुर्वी सारखा दिसेल याची खात्री आहे.इथली काळजी करू नकोस.तुझं जे धेय्य होतं ते आता तुझ्या खूप जवळ आलं आहे. आता प्रयत्न न सोडता धेय्य गाठ.माझा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे."

प्राची मनातून इतकी सुखावली होती की मान वर करून कामीनी बाईंना काही उत्तर देणं तिला अशक्य झालं होतं. मान खाली घालूनच प्राची कितीतरी वेळ नुसतीच बसली होती.

कामीनी बाईंनी तिच्यासाठी काॅफी केली.दोघींचे काॅफीचे कप आणि बिस्कीटे घेऊन त्या तिच्यासमोर खुर्चीवर येऊन बसल्या."प्राची काॅफी घे बेटा. आज तू इतकी छान बातमी दिली आहेस आज देवाला प्रसाद म्हणून शीरा करते.

"हर्षवर्धनमध्ये झालेला हा बदल तू तुझ्या आईला पण सांग त्यांनाही आनंद होईल. सांगशील नं " " हो." मान खाली घालूनच प्राची बोलली.
"अगं किती लाजशील.माझ्याकडे बघशील की नाही?"
"आई हा क्षण आला आहे यावर माझा अजून विश्वास बसत नाही. हां क्षण इतक्या अचानक माझ्यासमोर आला म्हणून माझी जरा तारांबळ उडाली आहे."

"असंच असतं.आता आलाय तर या क्षणाचं तुम्ही तितक्याच ऊत्साहानी स्वागत करायला हवं."
" हो आई.मी आजच ऑफीसला गेले की राधाला टूरचं प्लॅन करायला सांगते.पुढच्या आठवड्यातच आम्ही जाऊ. आई पण माझी छाती अजून धडधडतेय."

"बाळा असं होतं.ज्या क्षणाची आपण वाट बघत असतो तो अचानक समोर आला की धडधडायला होतच. त्यानी आपण आणखी उत्साहीत होतो.तो उत्साह संपण्या आधी नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी.तशी झाली की माझी हर्षवर्धन बद्दलची काळजी खूपच कमी होईल."

"आई काळजी करू नका. आता आपले चांगले दिवस आलेत.आता सगळं नीट होईल." " तुझ्या तोंडात साखर पडो." कामीनी बाई म्हणाल्या.

प्राची आनंदानी नाश्ता तयार करायला लागली. तिच्या चेह-यावर वेगळाच आनंद होता. तिच्या आनंदाचं प्रतीबिंब कामीनी बाईंच्या चेहे-यावर पडलं होतं.
----------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now