Oct 18, 2021
कथामालिका

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे... भाग २ रा

Read Later
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे... भाग २ रा
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे भाग २रा

ट्रॅव्हल्स कंपनीत सुरवातीला एक आचारी त्याचा असीस्टंट, एक टूर लीडर एवढेच होते. ऑफीस घरीच होतं पेपरमध्ये टूर लिडर हवे म्हणून जाहीरात दिल्या गेली. त्याला प्रतीसाद छान मिळाला. त्या मुलाखती मधून चारजणं निवडल्या गेले.


त्या चार जणांना टूर कसा न्यायचा?,त्यातील प्रवाशांशी कसं बोलायचं?,त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या कशा शांतपणे ऐकून घ्यायच्या,त्या सोडवायचा प्रयत्न कसा करायचा? याचं प्रशिक्षण दिल्या गेलं. हे प्रशिक्षण अर्थातच मंगेशभय्यांनीच आयोजीत करून दिलं होतं.

हे प्रशिक्षण देणारे वल्लभ पाटकर ही मोठ्या लेवलची व्यक्ती होती. सध्यातरी एवढ्या मोठ्या व्यक्तीला छोट्याश्या कामीनी ट्रॅव्हल्सला प्रशिक्षणासाठी बोलावण्याची कुवत नव्हती. मंगेश भय्यानी ती अडचण सोडवली. मंगेश भय्या कामीनी ट्रॅव्हल्सच्या म्हणजेच हर्षवर्धन आणि प्राचीच्या मागे खंबीरपणे उभे होते.


टूरमध्ये वेगळेपण आणण्यासाठी क्रियेटीव्ह माईंड असलेली व्यक्ती प्राचीला हवी होती. त्यासाठी पेपरमध्ये मुलाखतीची जाहीरात देण्यात आली. प्राची ग्राफिक डिझायनर असल्याने क्रिएटीव्हीटीला तिच्या दृष्टीनी महत्व होतं.

प्रवासाची रूपरेषा जेव्हा नाविन्यतेची कास धरून आखली जाते तेव्हा त्या प्रवासातील गंम्मत आणखी वाढते.ही गोष्ट प्राचीने लक्षात ठेऊन तशाच प्रकारचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले. त्यात दहा उमेदवारांपैकी दोघं तिघांकडे कल्पकता होती .त्यांना तिनी निवडलच पण त्यांच्यावरच्या पदासाठी प्रिया हणमंते हिची निवड प्राचीनी केली.

प्रिया आऊट ऑफ द बाॅक्स जाऊन विचार करणारी होती. हा तिचा गूण प्राचीला आवडला. मुलाखतीद्वारे प्रिया हणमंते हिची निवड प्राचीनी केली. तिच्या भन्नाट कल्पना प्राचीला फार आवडल्या.


प्राचीनी इतर तिघांना तिच्या हाताखाली काम करण्यास सांगीतलं. त्या तिघांवर कोणती आणि कशी जबाबदारी सोपवायची हे प्रियाने प्राचीशी चर्चा करून ठरवायचे हे प्राचीनी निश्चीत केले.


प्रियाला वेगवेगळ्या कल्पना सुचाव्या म्हणून प्राचीनी तिला पूर्ण वैचारीक स्वातंत्र्य दिलं. तिच्या कल्पना अमलात आणायच्या की नाही यावर मात्र प्राचीच निर्णय घेणार होती.


प्रियाच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी त्यावर प्राचीलाच विचार करावा लागणार होता.कामीनी ट्रॅव्हल्स ची प्रतिमा खूप उंच न्यायची होती पण हे करत असतांना भावनेच्या किंवा उत्साहाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये म्हणून प्राची सावध होती.

प्रियाकडून आलेल्या कल्पनेवर प्राची राधा आणि शशांकशी चर्चा करत असे. काही वेळेस कागदावर असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं कठीण असतं तर कधी अशक्यच असतं.हे लक्षात घेऊन प्राची त्या कल्पनांवर खोलवर विचार करत असे.
प्रियाच्या काही कल्पना प्रत्यक्षात उतरवणं शक्य नसेल तर प्राची आणि प्रिया चर्चा करून त्यातला सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न करायच्या.

बाॅस म्हणून न पटलेल्या कल्पना प्राची एकदम झीडकारत नसे. कारण अश्या कल्पना डोक्यात येणं ही दैवी देणगी असते हे प्राचीला मान्य होतं. म्हणून ती सुवर्णमध्य काढत असे. प्राचीच्या याचं वागणुकीमुळे प्रियालाही नवीन कल्पना शोधायला, त्या प्राची समोर मांडायचा उत्साह असायचा.


कामीनी ट्रॅव्हल्स मधील कर्मचा-यांची संख्या आता वाढत चालली होती. प्रिया प्रत्येक प्रवासात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करायची. त्यासाठी तिला त्यांचा टूर जिथे जाणार असेल तिथली सगळी माहिती म्हणजे भोगोलिक, ऐतीहासिक, परंपरेने येणा-या चालीरीती हे जाणून घ्यावं लागायचं.

त्यानुषंगाने ती काही खेळ घ्यायची. प्रश्नमंजुषा सारखे खेळ पण घ्यायची.जेणेकरून जिथे टूर गेला आहे तिथली सगळी माहिती प्रवाशांना मिळाली पाहिजे.हे ज्ञान त्यांच्याजवळ नेहमीसाठी राहीलं तर प्रवाश्यांना प्रवास केल्याचा आनंद मिळेल.असं प्रियाला वाटतं असे.काहीअंशी ते खरं होतं.

प्राची नेहमी आपल्या टूर लीडरला सांगत असे की आपल्याबरोबर प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी हा नेहमीसाठी आपल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर कुठल्याही आकर्षणाशिवाय कायमचा जोडला गेला पाहिजे.

यासाठी त्यांच्याशी प्रेमानी बोला. त्यांच्या प्रश्नांनी कंटाळून जाऊ नका. विशेषत: वृद्ध प्रवाश्यांनी कितीदा ही प्रश्न विचारले तरी हसत मुखाने उत्तर द्या.

तुमची प्रवाशांबरोबर असणारी वागणूक आपल्या कंपनीचं भविष्य ठरवणार आहे. प्रवासी आपली जमा केलेली पूंजी आपल्याला देऊन एक सुखद आणि आनंददायी यात्रेचा अनुभव घ्यायला आलेले असतात. त्यांना आपण निराश करायचे नाही.

ऐनवेळी आलेली आपत्ती ही त्यांना सुद्धा कळते. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या प्रयत्नांबरोबर तेही सामील होतात. प्रवासी आहोत आम्ही काय करणार म्हणून ढिम्म बसत नाहीत. तेव्हा त्यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यायचं आहे.हे लक्षात ठेवायचं.कामीनी ट्रॅव्हल्सचे जे नियम आहेत ते हवं तसं दाखवायचे नाहीत.प्रसंगाचं गांभीर्य बघून ठरवायचं.

प्राचीने काही वर्षांतच आपल्या निरीक्षण शक्तींनी ब-याच गोष्टींचं ज्ञान करून घेतलं होतं.ती माणसं वाचायला शिकली होती.या मुळेच प्रवाश्यांची काळ्जी कशी घ्यायची आणि प्रवासाचा पूर्ण आनंद त्यांना कसा मिळेल हे ती बघत असे.

कामीनी बाई, हर्षवर्धन आणि कामीनी ट्रॅव्हल्स या तीन गोष्टी तिच्या मनाच्या खूप जवळ होत्या.

प्राची एक व्यावसायिक असली तरी त्याला एक भावनिक पदर होता.जो तिच्या कंपनीसाठी उपयोगी पडायचा.आर्थिक व्यवहारात ती सतर्क असायचीच.तिला माहिती होतं की प्रवाश्यांना वाटतं असतं पैसे भरलेत तर आपल्याला चांगली वागणूक मिळाली पाहिजे. आणि प्रवास केल्याचं मनाला समाधान मिळालं पाहिजे. ही प्रवाशांची इच्छा संयुक्तिक आहे हे तिला कबूल होतं.

हे विचार कदाचित आधीच्या प्राचीत सापडले नसते पण हर्षवर्धनशी लग्नं केल्यावर त्याला यातून बाहेर काढताना तिची रिहॅब सेंटर कडून हीच अपेक्षा होती. हर्षवर्धनशी वागताना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सुरवातीला प्राची मेटाकुटीला येत असे. पण प्रत्येक वेळेला स्वतःला समजावून ती हसत मुखाने हर्षवर्धनच्या प्रश्नांना उत्तरं देत असे.

हीच सहनशक्ती कामीनी ट्रॅव्हल्सच्या टूर लीडरनी अंगी बाणवायला हवी असं तिला वाटायचं.

त्या दिवशी कामीनी बाईंनी प्राचीला म्हटलं " तुला एक सुचवू का?""सुचवा नं." "आपल्या ऑफीस मध्ये अकाऊंट सांभाळणारे आहेत का कोणी?" "सध्या बाहेर देतोय आपण अकाऊंट तपासायला. शशांक ठेवतो सगळे अकाऊंट. पण त्याला त्याच्या ऑफीसचं कामपण असतं. बाहेर सगळं व्यवस्थित आहे नं हे बघायला देतो.म्हणूनच मी विचार करतेय अकाऊंटट हवा अशी जाहीरात द्यावी."

" मला वाटतं जाहीरात देऊन नवीन कोणी माणूस घेतला तरी त्यांच्यावर कोणीतरी आपला माणूस हवा. मी म्हणत होते.तुझे बाबा रिटायर्ड झालेत त्यांना द्यायची का जबाबदारी.त्यांना आपण पगार देऊ.फुकट नाही करायचं त्यांच्याकडून काम." कामीनी बाई एवढ्या बोलल्या पण जरा घाबरतच बोलल्या.

प्राचीच्या हे लक्षात आलं.ती म्हणाली " आई तुम्ही किती छान पर्याय सांगीतला. माझ्या डोक्यातच आलं नाही.मी आजच बाबांना विचारते.बाहेरचा माणूस ठेऊच म्हणजे बाबांवर खूप लोड येणार नाही आणि शशांकलाही त्यांच्या ऑफीसच्या कामाकडे लक्ष देता येईल." " मला वाटलं माझी कल्पना तुला आवडेल की नाही."

"ते आलं लक्षात माझ्या. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून. तुम्हाला असं का वाटलं की तुमची कल्पना आवडणार नाही. तुम्ही आपल्या कंपनीचाच भाग आहात नं माझ्यासारखा. तुम्हीपण आपल्या कंपनीच्या भल्याचाच विचार करणार.इथून पुढे तुमच्या मनातलं काही सांगायचं असलं तर नि:संकोचपणे सांगत जा. कंपनी बद्दल असो किंवा आपल्या घरातलं असू दे." एवढं बोलुन तिनी सासूच्या खांद्यावर थोपटलं

त्यादिवशी प्राची रात्री घरातलं आवरून झोपायला आपल्या खोलीत गेली. तेव्हा हर्षवर्धन एक ट्रॅव्हल्सचं मासिक वाचत होता.ते बघून प्राचीला आनंद झाला.

हर्षवर्धन आता ऑफीसमधे पण वावरतांना सराईतपणे वावरत असतो.आता पुढचे टूर आखण्यासाठी जेव्हा मिटींग घेतल्या जाते तेव्हा तोही हजर असतो. तो सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. शेवटी प्राची मुद्दाम त्याचं मत विचारत असते.


हळूच थांबत थांबत तो आपले विचार मांडत असतो. त्याने मांडलेला विचार योग्य नसेल तर तो लगेच टाकाऊ म्हणून बाजूला टाकल्या जात नसे तर त्यावर चर्चा होत असे. तो विचार आपल्याला का घेता येणार नाही हे हळुहळू हर्षवर्धनला या चर्चेतून कळायचं पण समजायला थोडा वेळ लागायचा.तो यावर विचार करतोय असं दिसल्यावर प्राची टी ब्रेक घ्यायची आणि खुणेनीच सगळ्यांना गप्प रहा सांगायची.

या वेळेत त्यांच्या चेह-यारचे बदलते भाव सगळे बघायचे. तो विचार करतोय हे सगळ्यांच्या दृष्टीनी आनंदाचं होतं. हळुहळू हर्षवर्धनला आपलं व्यक्तीमत्व गवसतय हे प्राचीसाठी महत्वाचं होतं.

आजूबाजूला खूप आवाज असतील तर त्यात हर्षवर्धनचा मेंदू सारासार विचार करू शकत नसे. म्हणून तो विचार करतोय असं दिसलं की टी ब्रेक व्हायचा आणि सगळे गप्प असायचे. त्याने सुचवलेल्या पर्याय एकदम टाकाऊ ठरवला तर त्याला आपला अपमान वाटू शकतो आणि असं झालं तर तो बोलणंच सोडेल. असं होऊ शकतं असं आशूनी प्राचीला सांगीतलं असतं.

ती हेही म्हणाली त्यांचे विचार चुकत असले तरी प्रत्येक मिटींग मध्ये त्याला घ्या.हळुहळू त्यांच्या मेंदूला विचार करण्याची चालना मिळेल.त्याचा विचार चुकलात हे एकदम न सांगता हळूहळु चर्चेतून सांगा. त्याला कळेल.पण वेळ लागेल.तो ज्या पद्धतींनी आपले विचार व्यक्त करील त्याने कुणाच्याही चेह-यावर हास्य येऊ देऊ नका.त्याला थोडी जरी शंका आली तुम्ही हसतात अशी तर तो बोलणं बंदच करेल. याबाबतीत सगळेच काळजी घ्या. आशूचं बोलणं लक्षात ठेऊन प्राची हे करत असे.

प्राचीची इच्छा असते की हर्षवर्धनला एक सामान्य व्यक्ती म्हणून उभं करायचं. हे हळुहळूच होणार असतं त्यासाठीं एवढा वेळ आणि संयम ठेवण्याची प्राची ची तयारी होती.


आजकाल अधून मधून जेवतांना हर्षवर्धन मनातल्या शंका प्राचीला विचारत असे. कामीनी बाई पण कधीतरी त्यांच्या शंकांना उत्तरं देत असत. आपल्या व्यवसायाबद्दल त्याच्या डोक्यात सतत विचार चालू असतात ही दोघींसाठी आनंदाची गोष्ट होती.


प्राची नी तिच्या वडलांना म्हणजे अशोकला फोन करून विचारलं की त्यांना कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसला रोज येऊन अकांऊट बघणं जमेल का? त्यांच्या हाताखाली ती असीस्टंट देणारच होती.

रिटायर्ड झाल्यामुळे अशोकला काहीच हरकत नव्हती. त्याचा वेळ छान जाणार होता. आपल्या मुलीला मदत करण्याचं समाधान मिळणार होतं. प्राचीनी मात्र त्यांना पार्ट टाईम करायला सांगीतलं. ऊरलेला वेळ तुमचे छंद जोपासा असं म्हणाली.

अशोक तयार झाला. दुस-या दिवशी पासूनच तो कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये जाऊ लागला.

अशोक आता नियमीतपणे कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये जाऊन लागल्याने शशांकचं काम कमी झालं. तो त्याच्या ऑफीसमध्ये लक्ष घालू लागला. प्राची नी एवढा मोठा व्यवसाय उभा केला याचं अशोकला कौतुक वाटतं होतं.

कालपर्यंत अवखळ असणारी प्राची आज किती बदलली आहे.एक ठहराव आला आहे तिच्या वागण्यात बोलण्यात. हर्षवर्धनची जबाबदारी संयतपणे ती पेलत होती.एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळणं सोपं नाही.

अशोक ऑफीसला जायला लागल्यानंतर दोन-चार दिवसांनी घरी चहा घेत असतांनाच अशोक वासंतीला म्हणाला." वासंती आपली प्राची लग्नानंतर खूप बदलली. किती शांत आणि संयमी स्वभावाची झाली आहे." "होनं.मला जेव्हा हर्षवर्धन बद्दल कळलं तेव्हा खूप वाईट वाटलच पण त्याहीपेक्षा आपण तिच्या म्हणण्याचे लक्ष दिलं नाही याचं वाईट वाटलं."

"वासंती खरंतर आपली चूक नाहीच.आपण भय्यासाहेबांच्या वरवरच्या चेह-याला भुललो.तो चेहरा त्यांचा मुखवटा आहे हे आपल्याला कसं कळणार? आपण सरळ साधं आयुष्य जगत आलो. छक्के पंजे आपल्याला नाही जमले कधी." "हो खरय. आणि भय्यासाहेब अशा नीच पातळीवर विचार करणारे असतील हे तरी डोक्यात कशाला येईल?"


"वासंती तसं बघीतलं तर प्राची खूप मोठ्याच संकटात सापडली होती.ती धीट आहे म्हणून आणि तिच्या सासूबाई तिच्या बाजूने असल्यामुळे ती खंबीरपणे भय्यासाहेबांना तोंड देऊ शकली."
"हो तुम्ही खरं बोलताय.पण आता संकटांचे ढग निवळत चालले आहेत.हर्षवर्धन जेव्हा पूर्वीसारखा होईल तेव्हा प्राची संकटातून बाहेर पडली असं म्हणता येईल."


"वासंती मी रोज प्राचीला बघतो तेव्हा मला लग्नाआधीची प्राची आठवते.अवखळ मस्तीखोर आता खूपच शांत झाली आहे." " अहो परीस्थिती माणसाला शिकवते.हर्षवर्धन चांगला असता,भय्यासाहेब असे नसते तर कदाचित प्राची अशीच अवखळ राहिली असती. तुम्ही रोज तिला भेटता त्यामुळे माझ्याही जीवाला शांतता आहे."


" वासंती मला वाटतं एकदा रवीवारी या तिघांना जेवायला बोलावू. त्या निमीत्तानी तुला प्राची आणि कामीनी बाईंशी बोलता येईल. हर्षवर्धनशीपण आपल्याला बोलता येईल. ऑफिसमध्ये बोलतो माझ्याशी पण कामापुरतं."

"कल्पना छान आहे.ऊद्या ऑफीसला गेलात की बोला प्राची शी." " नाही ऑफीसमधे असं बोलणं बरं दिसत नाही.आत्ताच करतो तिला फोन."एवढं बोलून अशोक प्राचीला फोन लावतो.

"हॅलो बाबा काय झालं ? एवढ्या रात्री फोन केलात?" " अगं काही झालं नाही. या रवीवारी तुम्ही तिघं इकडे याल का जेवायला हे विचारायला फोन केला. ऑफीसमध्ये इतक्या पर्सनल गोष्ट बोलायला बरं वाटतं नाही म्हणून आत्ता फोन केला."

"हरकत नाही आत्ता केलात फोन तरी.एवढ्या रात्री तुमचा फोन आला म्हणून जरा घाबरले.तुमची तब्येत तर बिघडली नाही असं वाटलं."
"साॅरी.तुला असं वाटतं स्वाभाविक आहे. मला वासंती म्हणताही होती. पण.." "जाऊ द्या.मी ऊद्या आईंनाविचारते आणि सांगते ऑफीसला भेटल्यावर." "ठीक आहे" असं म्हणून अशोक नी फोन ठेवला." अगं मी म्हणत होतो राधा आणि शशांकला पण बोलावू राधा प्राचीची चांगली मैत्रीण आहे आणि शशांकला बोलावता येईल.कसं वाटतं तुला?"
"बोलावू काही हरकत नाही.".वासंती म्हणाली.

रवीवारी काय बेत करायचा आता याबद्दल अशोक वासंती बोलू लागले.वासंती म्हणाली " अहो प्राचीला ऊद्या विचारा. हर्षवर्धनला कोणता पदार्थ आवडतो. तो आता थोडा सावरलाय तर त्याच्या आवडीचा पदार्थ बघून आणखीन मोकळा होईल असं मला वाटतं."

" वासंती तुला वाटतंय ते बरोबर आहे .मी ऊद्या विचारतो. तुझा स्वयंपाक व्हायचा आहे नं.मी कोप-यापर्यंत जाऊन येतो.येतांना काही आणायचं असेल तर सांग.आणि किराणा दुकानात जर बन्सल भेटला तर उशीर होईल मला यायला. फार गप्पीष्ट आहे.आणि बरेच महिने आम्ही भेटलो नाही. त्यामुळे सांगता येत नाही.चल निघतो."

यावर वासंतीनं फक्त मान डोलावली.बोलण्यासारखं काहीच नव्हतं.बन्सल प्रकरण तिला माहिती होतं.मनातच म्हणाली तुम्ही घरी येईपर्यंत माझा दोनदा स्वयंपाक होईल. वासंतीनी समोरचं दार लावलं आणि स्वयंपाकाला लागली.

-------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now