कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ३रा

एका धाडसी मुलींची कथा आहे.


कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ३रा

सकाळी सकाळी कामीनी बाईंच्या आईचा फोन येतो.तिही कामीनी बाईंना खूप सुनावते.कामीनी बाईंच्या आईचा आवाज चिरका होता आतातर रागानी आणखी चिरकला होता.

"काय ग दिनूला काल काय वाट्टेल ते बोललीस. लाज नाही वाटत. मामा आहे तुझा तो. त्याच्यामुळे तुझं त्या श्रीमंत भय्यासाहेबाशी लग्नं झालं आता त्यालाच उलटून बोलते. त्याने तुझ्याकडे थोडे पैसे मागीतले तर काय बिघडलं?"

"आई ओरडायची गरज नाही. दिनूमामामुळे माझं लग्नं जमलं हे तू मला आयुष्य भर ऐकवणार आहेस का? आणि का म्हणून त्याला मी सतत पैसे देऊ? मला माझा. संसार नाही का?"

" वा ! आता फार जोर आला तोंडात.तेव्हा चिकटपट्टी लावून बसली होती. आम्हाला गरज असेल तेव्हा पैसे देत हैतीस. मला माहिती आहे हा जोर तुझ्यात कुठून आला? तुझ्या सुनेची फूस आहे तुला कळतंय मला."

"आई प्राचीला मध्ये आणण्याची गरज नाही. हा वाद आपल्यातला आहे."
" अगं वाद तू घालतेय.तुझं भलं केलं आम्ही आणि आम्हाला विसरली."

"विसरली...आई गजू, सदा आणि रागीणीच्या शिक्षणाचा खर्च यांनीच केला आहे हे तू विसरलीस का?त्या विश्वासला सुद्धा यांनी पैसे दिले होते.काय ढंग केले त्यानी?"

भय्यासाहेबांनी अचानक तिथे येऊन कामीनी बाईंच्या हातातला फोन घेतला. मघाचपासून ते बाहेर बसून सगळं ऐकत होते.त्यांचा पारा चांगलाच चढला होता.

" अग तुझ्या बापानी मला अर्धपोटी ठेवलं तू सुद्धा अर्धपोटी आणि फाटक्या कपड्यात राहत होती. मी आणि दिनूनी तुझं त्या श्रीमंत भय्यासाहेबाशी लग्नं लावून दिलं.म्हणून अंगभर कपडे मिळू लागले तुला ,आणि पोटभर जेवायला मिळायला लागलं विसरू नको हे. आता आम्हालापण चार पैसे हवे आहेत. पण तू हलकट निघालीस."

" मी कामीनीपेक्षा हलकट आहे कळलं का तुम्हाला? पुन्हा कामीनीला पैशासाठी फोन करून त्रास द्यायचा नाही. तरी दिलात तर मी बघतो."

" मला कसली धमकी देताय?.मीच तुमच्या विरूद्ध पोलीसात तक्रार करीन. तुम्ही आवाज चढवला म्हणून मी घाबरणार नाही."
" करा. तुम्हाला जे करायचं ते करा.मी घाबरत नाही कोणाला. ठेवा फोन .दीडदमडीची माणसं तुम्ही."

एवढं बोलून भय्यासाहेब खटकन फोन बंद करतात.

"कामीनी यानंतर या लोकांचे फोन घ्यायचे नाही.त्यांनी सतत फोन केला तर सांग.त्यांच्याविरूद्ध पोलीस कंप्लेंट करू.तुझी आई तिची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत तरी तिच्या तोंडांत जोर बघ किती आहे."

" जाऊ द्याहो. पण मला कळतच नाही अशी विचीत्र इच्छा कशी ठेवतात हे लोक?"

"अगं त्यांना पैसा दिसतो आपला. यापूर्वी आपण कधी कुठलंही कारण न देता त्यांना पैसे दिले. त्यांच्या गरजेच्या वेळा पैसे दिले.त्यामुळे त्यांना ती सवय झाली. फुकटाचं मिळालेलं उत्पन्न बरं वाटतंय. आपलच चुकलं."

"अहो तुम्ही फार चिडून नका.तुमचं बीपी लगेच वाढतं.चला थोडं आराम करा." कामीनी बाईं भय्यासाहेबांना म्हणतात.

"हो. अगं हे असे नातेवाईक असतील नं तर कोणाचंही बीपी वाढेल. घरची गरीबी म्हणून मदत करायला गेलो आणि जन्मभर शुक्लकाष्ठ मागे लावून घेतलं.आता कानाला खडा लावला मी.कोणाचीही कीव करून मदत करायला जायचं नाही.

हे सगळं प्राचीला घरी आल्यावर कामीनी बाईंकडून कळतं.तीलाही त्या लोकांची चीड येते.ती विचारात असतानाच राधाचा फोन येतो.
"राधा तुला मी थोड्यावेळाने फोन करु का?"
" अगं कामात असशील तर नंतर बोलू"राधा म्हणते.
" हो नंतर फोन वर तुला सगळं सांगते.ठेऊ फोन" " हो."

" आई त्या सुबोध जावडेकरांना फोन करते.हे प्रकरण फार गंभीर होत चाललं आहे." प्राची म्हणते
" हो ग मलाही खूप चीड येते आहे. ते काय करतील?"कामीनी बाई म्हणतात.

" या लोकांची बित्तंबातमी काढायला सांगते.मग त्यांच्यावर काय कारवाई करायची ते बघू." एवढं बोलून प्राची जावडेकरांना फोन लावते.
"नमस्कार जावडेकर.मी प्राची पटवर्धन बोलतेय.मला दोघाजणांची संपूर्ण माहिती हवी आहे.त्यांचा दिनक्रम,त्यांचं मित्रमंडळ आणि त्यांचा गुन्हेगारी जगताशी काही संबंध आहे का?"

" हो होईल तुमचं काम.मला त्या व्यक्तींचे फोटो आणि ते कुठे राहतात हे माहिती असेल तर त्यांचा पत्ता लागेल."


" हो पाठवते सगळं.या व्यक्ती आमच्या नात्यात आहेत. पण त्यांचा सध्या त्रास वाढला आहे म्हणून त्यांच्याबद्दल माहिती हवी आहे. त्यामुळे हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागेल."


"काळजी करू नका.माहिती गुप्तच ठेवतो आम्ही."
" कधीपर्यंत हे काम होईल?"
" दोन दिवसात देतो."
" अॅडव्हान्स ऊद्या ऑफीस उघडल्यावर पाठवते."
"अहो पैशाची घाई कशाला करता?पैसे कुठे जातात?"
" ठीक आहे.काम झालं की फोन करा."
" हो."
प्राची फोन ठेवते.

कामीनी बाईं तिच्याकडे बघतात.प्राची त्यांना सगळं सांगते.
***

दुस-या दिवशी नाश्त्याच्या वेळी प्राची भय्यासाहेब आणि हर्षवर्धनला जावडेकरांशी झालेलं बोलणं सांगते.
"काल एवढा तमाशा केला तरी आज आजी आईला असं बोलली?" हर्षवर्धन रागातच बोलला.

"हर्षवर्धन चिडून नको.आपण चिडून आपलीच तब्येत खराब होईल." कामीनी बाईं हर्षवर्धनच्या हातावर थोपटत म्हणाल्या.

"कामीनी इतक्या लाईटली हे सगळं घ्यायचं नाही.प्राचीनी त्या जावडेकरांना सांगीतलं आहे नं माहिती काढायला.त्यानंतर बघू काय करता येईल." भय्यासाहेब पोहे खाता खाता म्हणाले.

"भय्यासाहेब जावडेकरांनी माहिती दिल्यावर जयंत काकांना घेऊन आपण ए.सी.पींकडे जाऊ. ते जयंत काकांचे मित्र आहेत असं काहीतरी ते बोलल्याचे मला आठवतंय."प्राची म्हणाली.

"अगं हो खरच की जयंताचे ते चांगले मित्र आहेत.आपण जयंताला बरोबर घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकतो.पण आता या प्रकरणाचा निकाल लावलाच पाहिजे. डोक्यावरून पाणी चाललेय." भय्यासाहेब म्हणाले.

" बाबा तुम्ही यावर खूप विचार करू नका.तुमचं बीपी वाढलं तर तुम्हाला त्रास होईल.मी आणि प्राची आहोत नं" हे बोलताना हर्वर्धनचा आवाज आणि डोळे दोन्ही केविलवाणे झाले होते.सगळ्यांनाच हर्षवर्धनचं बोलणं आणि व्यक्त होणं नवीन होतं.

असा तो कधीच बोलत नसे. कामीनी बाईं आणि प्राची यांच्या दृष्टीने हर्षवर्धनमध्ये झालेला हा बदल सकारात्मक होता.यामुळे दोघीही आनंदल्या.दोघींनी एकमेकींकडे बघून आपल्या डोळ्यातूनच आनंद व्यक्त केला.
***

ऑफीसमध्ये आज प्राची खूप आनंदात होती.कारण सकाळचं हर्षवर्धनचं वागणं तिच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. निवांत वेळ मिळाल्यावर प्राचीनी राधाला फोन करून हे सांगीतलं.

"प्राची तुझी सकारात्मक साथ हर्षवर्धनमध्ये बदल घडवते आहे. अजूनही तुला तुझी जबाबदारी पार पाडायची आहे."

" हो कळतंय मला. पण आजपर्यंत भय्यासाहेबांबद्दल त्याला इतकी काळजी असेल असं कधी दिसलं नाही.कदाचित त्याला व्यक्त करण़ जमलं नसेल. आत्ता जे घडलंय आमच्या घरी ते एक शाॅक ट्रीटमेंट सारखं झालं असेल."

"होऊ शकतं प्राची. माणसाच्या मनाचा अंदाज येत नाही. हर्षवर्धनच्या मनात काय उलथापालथ चालली असेल हे आपल्याला कळलं नाही. कितीही झालं तरी भय्यासाहेब त्याचे वडील आहेत. त्याला मनातून कुठेतरी त्यांच्याबद्दल प्रेम असेलच. मधल्या काळात त्याचं नशेत बुडल्यामुळे या जाणीवा बोथट झाल्या असतील.असं मला वाटतं."

" बरोबर बोललीस राधा.त्या नशेमुळेच योग्य अयोग्य यातील फरक त्याला कळलाच नसेल." बोलणं संपताच प्राचीनी एक सुस्कारा सोडला.

"प्राची जावडेकरांनी माहिती दिल्यावर काय करणार आहेस?"

"तुला माहिती आहे का भय्यासाहेबांचे मित्र जयंत सरदेसाई. त्याचे मित्र आहेत एसीपी जगदीश महाले.त्यांना भेटणार आहोत.सगळं रितसर होऊ दे."
." होग खरच हे सगळं थांबायला हवं मी म्हणते दुस-याकडे खूप पैसा आहे म्हणून तुम्ही त्यांचा पैसा मागायला जोर जबरदस्ती कसे करू शकता?"

" हे आपल्या सारख्या शहाण्या माणसाला समजतं. या लोकांची वृत्तीच दुस-याचा पैसा वापरायची आहे. त्यांना कसं कळणार? त्यांना तो आपला हक्क वाटतो."

"प्राची किती इरीटेटींग आहे ग हे. कसं तुम्ही हॅंडल करता ग.सॅलुट तुम्हाला."

"भय्यासाहेबांचं म्हणणं आहे इतकी वर्ष आईंच्या भावा बहिणींना या मामांच्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची मदत केली तेच चुकलं.आईंचे सावत्र बहिण भाऊ जेमतेम मॅट्रिक झाले पण या मामाच्या मुलांनी तर नुसता पैसा उडवला.वाईट लोकांच्या संगतीत लागले.हे जेव्हा भय्यासाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांना मदत करणं बंद केलं.एकदा फुकट खायची सवय लागली तर तुम्हाला कष्टाचा पैसा मिळवायला जिवावर येतं."
" अगदी बरोबर बोललीस. या प्रकरणाला आत्ताच थांबवलं नाही तर ते वाढत जाणार."

"त्यासाठीच जावडेकरांना सांगीतलं आहे.दोन दिवसांत माहिती गोळा करून देणार आहेत.मग आम्ही एसीपी जगदीश महाले यांच्याकडे जाऊ.सध्या तन्मयचं अभ्यासात हवं तसं लक्ष लागत नाहीय. दहावीचं वर्ष आहे त्याचं.त्या दिवशी विश्वास नी जो तमाशा केला घरी येऊन तेव्हापासून तन्मय जरा बावरला आहे." प्राची ताणयुक्त स्वरातच बोलली.

"अगं ते होणारच.घरात सध्या तुमच्या बोलण्यात हाच विषय असतो.तन्मय आता लहान नाही त्याला पण थोडी काळजी वाटतच असेल.प्राची या सगळ्या गोष्टींबरोबरच तन्मयकडे लक्ष दे." राधा म्हणाली.
" होग ते करावच लागेल.चल ठेऊ फोन.अरेपण तू फोन कशाकरता केला होता?" अचानक आठवल्यामुळे प्राची नी विचारलं.
" अगं आमचं जागेचं जमतंय .एक दोन जागा ब्रोकर नी दाखवल्या आहेत.तू येशील का आमच्याबरोबर हे विचारायला फोन केला होता."

"अरे वाह ही तर छान. बातमी आहे.पण हे विश्वास प्रकरण नीट हाताळावे लागेल.त्याचवेळी जर तुम्हाला जागा बघातला जावं लागलं तर तुम्ही जा.मला हे मामा प्रकरण लवकर तडीस न्यायचं आहे."

" हो ग ते महत्वाचं आहे ते आधी कर. तुला जमलं नाही तर आम्ही बघून येऊ.तू शांतपणे झोप.चल गुडनाईट"

" गुडनाईट" प्राची फोन ठेऊन झोपायला जाण्यापूर्वी एकदा तन्मयच्या खोलीत डोकावली. तन्मय शांतपणे झोपला होता.त्याच्या अंगावरच पांघरूण नीट करून. त्याच्या चेह-यावरून हलकेच हात फिरवताना स्वतःशीच हसली. पायाचा आवाज होऊ न देता हळूच त्याच्या खोलीबाहेर पडली.
***
प्राची खोलीत आली आणि बघते तर हर्षवर्धन जरा चिंतीत वाटला. त्यांच्याजवळ बसत प्राची म्हणाली "हर्षवर्धन काय झालं?"

" मला या मामांच्या प्रकरणामुळे बाबांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली आहे. खूप राग येणं चांगलं नाही त्यांच्या तब्येतीसाठी."
"फार विचार करू नको.आपण लवकरच यातून मार्ग काढू. आपण स्वस्थ बसणार नाही.मी जावडेकरांना सांगीतलं आहे माहिती काढायला.ती माहिती आली की जयंत काकांना बरोबर घेऊन एसीपी महालेंना भेटू. बऱ ऊद्या आपल्याला ऑफीसमध्ये लवकर जावं लागणार आहे. यावेळी एका वेळी चार टूर काढायचं ठरवलंय नं आपण. त्याचं सगळं नियोजन करायला हवं.तू माझ्या बरोबर येशील ऑफीसला की नंतर येशील?"

"तुझ्याबरोबर च येईन." हर्षवर्धन म्हणाला.
" चल झोपूया." प्राची नी हळूच त्याचा हात थोपटला आणि दिवा मालवून ती झोपायला गेली.
------------------------------------------------------
क्रमशः
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व ३रे भाग ३रा.

🎭 Series Post

View all