नंतर दादाने डीसीपी गर्दम ना फोन लावला. "सलाम, बडे चाचा! " दादा नम्रतेने म्हणाला. डीसीपींनी ओळखलं असावं. " कोण किशा? " ते तुच्छतेने म्हणाले....... " हां हां किशा, आपको पार्टीमे आमंत्रित कर राहा हूं. आज रात पार्टी है. आप आयेगे तो झगमग आ जायेगी. राह देखता हूं. गाडी भिजवा दूं क्या? ".... "किशा, तूने मुझे क्या तुम्हारा गँगमन समझके रखा है क्या? तुमने मुझे फोन करनेका डेअरींग कैसे किया? क्या समझते हो अपने आपको?.... " ते पुढेही काही बोलणार होते पण किशा मध्येच म्हणाला, " अरे चाचाजी, आप तो नाराज हो गये. ठीक है साब गलती हो गयी. " त्याने निराशेने फोन खाली ठेवला. आत जाण्या आधी त्यांनी त्याला समजावलं होतं. तेवढ्यावरून त्याने त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती असल्याचं गृहीत धरलं होतं..... आठ वाजून गेले. दादाने सूर्याला गाडी काढायला सांगितली. मग ते तिघे अर्ध्या तासात हॉटेल डिलाईटला पोचले. काकांनी सहज नजर मागे वळवली. एरवी थुंकण्याच्या लायकीचाही नसलेला वेश्यांचा विभाग एखाद्या स्वप्न नगरी सारखा झगझगीत दिसत होता. रात्रीच्या उजेडात एखाद्या हिरॉईन सारख्या त्या सजल्या होत्या. भसाड्या आवाजात लागलेली गाणीही ऐकू येत होती. हवा जरा थंड होती. मग ते तिघे एकेक करून आत शिरले...... आतला हॉल खच्चून भरलेला होता. किशा आत आल्याबरोबर मॅनेजर कमरेत वाकला. लवकरच त्यांना कॉरिडॉर मधून येणारा अन्वरमिया दिसला. तो थेट दादाजवळ आला. दादाने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, " अरे यार गुड्डी, तेरा गाल तो साला चूमनेके बजाय खाने को दिल करता है रे. क्या खाता है तू, की तेरा गाल बन मस्का बन गया? " तो लाजून हसला. मग सगळेच वरच्या मजल्यावर गेले. दादाचे इतर भक्तही येऊ लागले.
दादासाठी एक लहानसं स्टेज उभारलेलं होतं. तिथे तीन खुर्च्या मांडलेल्या होत्या. तिथे त्याला श्रीपतरायने आदरपूर्वक बसवले. दादाच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी बार होता. टेबलावर, इतर टेबलांप्रमाणे एक शँपेनची बाटली होती. हॉल मधल्या खुर्च्या अशा रितीने मांडल्या होत्या की मधला एक गोलाकार भाग मोकळाच राहील. अचानक सगळे लाइट पेटले. मधल्या गोल भागावरचा आणि दादाच्या स्टेजवरचाही लाइट प्रखरतेने पेटला. बाकी लाइट मंद झाले. मालक श्रीपतरायने हातात माइक घेतला. स्वागतपर भाषणाला सुरुवात केली. " आज दादाके छूटनेकी खुशीमे ये पार्टी दी जा रही है. इसमे हमने अपनी तरफसे कैब्र्रे डान्स रखा है. मुझे तो लगता है, की अब दादाकी मौजुदगीमे अपून सबका धंदा सौ गुना वधारेगा. मुझे याद है की दस पंदरा बरस पहले मै इस माया नगरीमे नया आया था तो केवल दादाके बलपरही यहाँ पर एक चाय की छोटीसी टपरी लगायी थी जिसका आज ये रूप आप देख रहे है. दोस्तों जम के पार्टी का मजा लुटाइये. ज्यादा टाइम नही लूंगा. " असं म्हणून तो गर्दीत मिसळला. मग दादासहित सगळ्यांनी फेसाळ शँपेन उडवली. वेगवेगळे आवाज आणि शिट्या मारून आनंद व्यक्त केला आणि सलामी दिली. काकांना तर साधारण पार्टीचाही अनुभव नव्हता. नाही म्हणायला, एकदा एका पियक्कड सहकाऱ्याने त्याच्या घरी पार्टी दिली होती. तेव्हा तो मित्र इतका प्यायला होता की जेवण खाण विसरून पार्टीतल्या सगळ्यांनाच त्याला सांभाळावं लागलं होतं. तसंच पार्टीला जाताना रोहिणीने शंभरवेळा तरी बजावून न पिण्याबद्दल सांगितलं होतं. फार काय ते घरी आले तेव्हा तिने त्यांच्या तोंडाचा वास घेऊनच त्यांना घरात घेतलं होतं. कुठे ती पार्टी कुठे ही पार्टी.... काकांना हळूच हसू आलं. ते पाहून दादा म्हणाला, "अरे काकाजी यहां आईये स्टेजपर....... " असं म्हणून तो खाली येऊन त्यांना घेऊन गेला. सूर्यनारायणला अजिबात आवडलं नाही. काकांचा हात धरून किशा स्टेजवर येऊन उभा राहिला. एका हातात ड्रिंक आणि दुसरा हात काकांच्या खांद्यावर ठेवून तो मोठ्याने म्हणाला, " सब अंटर पंटर लोग यहां ध्यान दो. खाना पीना बादमे होता रहेगा. ये है हमारे \"काकाजी \"(काकांचा एक हात वर करून तो म्हणाला). हम दोनो एकसाथ अंदर थे. हमने इतना शरीफ और जंटलमन आदमी आज तक नही देखा. " तेवढ्यात कोणीतरी ओरडला, \" अंदर जाके आया तो कायका शरीफ? \". लगेचच दादा म्हणाला, " ज्यादा बात या आवाज नही. ये काकाजी आजसे धंदेमे बराबर के पार्टनर है. ये मेरे ही नही हम सबके काकाजी है. उमर और तजुर्बेके हिसाबसेभी इनको मानना होगा. "...... परत कोणीतरी ओरडला, " इस बुढ्ढेको कौनसा तजुर्बा है, बताओ तो. " मग मात्र दादा ओरडला, " कौन बोला रे? मेरे सामने बात करता है!.... " इकडे तिकडे नजर फिरवीत तो म्हणाला, " कौन काली?, अरे तू तो चोर उचक्के की अवलाद, तू क्या जाने गुडका स्वाद? बकवास बंद कर. हां और एक बात, अगर कोई भी काकाजी के बारेमे कुछ बोला तो जबान खींच लूंगा! समझे?, अपना खाना पीना जारी रखो.
सगळेच खाण्यापिण्यात लागले. अचानक लाइट मंद झाले. मधल्या गोलाकार भागावर सर्च लाइट पडतो तसा फिरणारा प्रकाशाचा झोत पडला. एखादं वाद्य फोडल्यागत संगीत चालू झालं. गर्दी बाजूला सारीत, सर्वांना आश्चर्याचा धक्का देत एक अर्ध नग्न तरुणी नाचत नाचत आली. तिच्या कमरेभोवती आणि हातांना लहान लहान फुगे लावले होते. ती प्रत्येकाच्या गळ्यात हात टाकीत गिरक्या घेत येत होती. ती गोलावर आली आणि गाणं चालू झालं:
....... ख ल्ला स!
जीवनरामने धडपडत पुढे होऊन दादाचे पाय धरले. म्हणाला, " गलती हो गयी, माफ करना, एक बार माफ करना. " दादा म्हणाला, " ये क्या अदालत है? जहां पहिला गुनाह माफ होता है. आं?.... " सूर्याने त्याला कॉलर धरून उचलला, त्याबरोबर टर्रकन आवाज आला. त्याची कॉलर मागच्या बाजूला लोंबू लागली. तोंडातलं रक्त पुशीत तो काकांना म्हणाला, " काकाजी, आप बुजुर्ग है. रहम करनेको कहो दादाको. मेरे बच्चे छोटे छोटे है. " किशा काकांकडे पाहत होता. तो मध्येच म्हणाला, " काकासे क्या बात करता है, ये क्या हायकोर्ट है? ". स्वतःच्या छातीला हात लावीत तो म्हणाला, "हायकोर्ट वगैरे सब इधर है. "..... नंतर थोडा विचार करून दादा म्हणाला, " ऐसा करते है, \"सोल्या \" को बुलाते है, रुको जरा. " तो फोन लावू लागला. तशी पुन्हा जीवन त्याचे पाय धरून म्हणाला, " दादा, चाहिये तो मेरी जान लेलो, लेकीन सोल्याको मत बुलाना "
दादा हसून म्हणाला, " सोल्याका नाम सुनते ही लोग इतना घबरते क्यूं है. " काकांना प्रश्न पडलेला पाहून तो म्हणाला, " आपको सोल्या मालूम नही है. लेकीन सूर्या को मालूम है..... क्यूं सूर्या काकाजीको बता तेरा पाव. " सूर्याने उजव्या पायातला मोजा काढला त्याचा पाय कापलेला होता. काका म्हणाले, " मै समझा नही. " दादा म्हणाला, " सूर्याने भी शुरूमे ऐसाही किया था. तभी सोल्या आया, उसका क्या तरीका है, मालूम नही, लेकीन अपने नाखून से वो चीर के शरीर की पूरी की पूरी नसे निकालता है. सूर्याके पावकी नसे निकाली थी. दस पंधरा दिनतक सूर्या डरसे सोया नही था..... " त्याने जीवनकडे पाहिले, तो चांगलाच थरथरत होता. मग विचार करून म्हणाला, " ऐसा करते है, इसको फिलहाल नीचे वाले सुरंगमे बंद करते है. सोल्याको बुलाते है, काकाजीको भी आयडिया आयेगी, चलो कार्पेट उठाके डाल दो उसे सुरंगमे". सूर्याची तयारी दिसली नाही. त्याने काकांसमोर नको असा डोळ्याने इशारा केला. ते पाहून तो म्हणाला, " तेरेको पटता नही क्या? काकाभी अभी अपनेही है. चल चल जल्दी कर. सबको सोना है. उसे बांध ले. " असं म्हणून दादाने बाजूचे कपाट उघडून जाडसर दोरी काढली आणि सूर्याच्या अंगावर फेकली. सूर्याने जीवनरामचे हात पाय बांधले. आणि कार्पेट गुंडाळायला सुरुवात केली. काका आश्चर्याने पाहत राहिले. अर्धं कार्पेट गुंडाळून झाल्यावर सूर्याने सराईत पणे लाद्यांच्या सापटीत हात घालून कळ दाबली. आस्ते आस्ते चार लाद्यांचा तो चौकोन उचलला गेला. प्रखर दिव्याच्या प्रकाशात काकांना आतल्या दगडी पायऱ्या दिसल्या. सूर्याने मग जीवनच्या तोंडात बोळा कोंबला. आणि ओढत ओढत, स्वतः आधी आत शिरून, त्याला आत ओढला. आणि तिथेच असलेल्या एका दुसऱ्या दगडावर त्याला बसवला. सूर्या बाहेर आला. पुन्हा चारही लाद्यांचा तो दरवाजा त्याने बंद केला..........
मग दादा म्हणाला, " काकाजी आप अभी घर जाईये, रात बहोत हुइ है. आप कल शामको ऑफिस आईये. तबतक छूटी समझिये. तबतक सोल्याभी आया होगा. इतनी रात आपको शायद जानेमे तकलीफ होगी. मै हिराको आपको छोडनेको बोलता हूं. " पण काका म्हणाले, " नही दादा, मै चला जाउंगा. " पण दादाने हिराला फोन करून बोलावले होते. लवकरच काका घरी पोचले.....
काकांनी बेल वाजवली. रमेशने दरवाजा उघडला. तो चिडलेला दिसला. पण त्याच्याकडे लक्ष न देता ते आत शिरले. आपल्या जागेवर जाऊन झोपले.
काका सकाळी उशिरा उठले. जवळ जवळ दहा वाजले होते. नीताच्या चेहऱ्यावर नापसंती होती. पण तरीही तिने चहा दिला. साडेबारा एकला जेवणं झाली. ते थोडावेळ श्रेयाशी खेळले. त्यांना जरा बरं वाटलं. सहज म्हणून गॅलरीत डोकावले, तर त्यांना पाटकर येताना दिसला. त्याचा अगदी सुकट बोंबील झाला होता. पुष्पा गेल्यापासून त्याची तब्येत ठीक नसावी. त्याने अजूनही पोलिस कंप्लेंट केली नव्हती. याचं काकांच्या दृष्टीने कारण अगदी साधारण होतं. म्हणजे, तो घाबरला असेल, किंवा उगाच कशाला कटकटी? म्हणूनही स्वस्थ बसला असेल. आपल्याला काय करायचय म्हणा. आपल्याला काही धोका नाही. काकांसारखी माणसं असं म्हणतात, तरीही विचार करतातच. त्यांना स्वस्थ बसवेना. एकदा केव्हातरी रघुमलला विचारलं पाहिजे. त्याच्याकडे बातम्या असतात. हाताच्या वाटीत हनुवटी ठेवून ते विचार करू लागले. जेवले तरी त्यांचं डोकं चढलेलंच होतं. रात्रीचं जागरण, हिडीस पार्टी आणि जीवनरामचा छळ, यांनी ते मरगळले. त्यांना एकदम "सोल्या " आठवला. कोण हा सोल्या? ते मनातल्या मनात म्हणाले. एकेक नग आहेत झालं. आज त्यांना कामावर जावंसं वाटत नव्हतं. जीवनचा छळ काय पाहायचा? एखाद्याला त्रास देणं तर दूर, पण त्याचा त्रास ऐकण्याचीही सवय नसलेल्या काकांना यात अजिबात रस नव्हता. मग त्यांना आपण या लोकांमध्ये राहायलाच पाहिजे का, असं वाटू लागलं. दुसरी एखादी लहानशी नोकरी आपण पाहावी का? पेपरात कितीतरी जाहिराती येतात. मागे एकदा हा विचार त्यांच्या मनात आला होता. त्याप्रमाणे त्यांनी पेपरातली जाहिरात वाचून ते एका सोसायटीच्या ऑफिसमध्ये, अकौंटंटच्या जागेसाठी गेले होते. तिथल्या सेक्रेटरीने त्यांना हिशेबाची काम सोडून इतर कामांचीच मोठी यादी सांगितली, ज्यात, पाण्याचा पंप चालवणं, त्याचा पुरवठा वेळेवर करणं, पैसे चुकवणाऱ्या सभासदांविरुद्ध कारवाई करणं, सगळा पत्रव्यवहार करणं, अशा सभासदांवर कोर्टात केसेस दाखल करणं, त्यासाठी लागल्यास वकिलाकडे किंवा कोर्टात जाणं शिवाय हिशेब लिहिणं इत्यादी कामं पाहून ते घाबरले. परत ते वकील, कोर्ट वगैरे त्यांना नको होतं. दुसऱ्यासाठी असलं तरी. इतकी त्यांनी दहशत घेतली होती. तसंच त्यांना पूर्वीच्या अनुभवा बाबत खोटं बोलावं लागलं होतं. नाहीतर त्यांना कोण काम देणार होतं. त्यांना काम मिळत होतं पण आवडलं नव्हतं, आणि पैसेही कमी होते. सध्यातरी त्यांना दुसरा पर्याय नव्हता. कंटाळून ते सोफ्यावर स्वस्थ बसले. हळू हळू पाच वाजत आले.
मग ते सहा वाजायच्या सुमारास ऑफिसला जायला निघाले. नीताला त्यांनी जातो असे सांगितले पण तिच्या चेहऱ्यावर त्यांना आश्चर्याचे भाव दिसले. तिकडे लक्ष न देता ते निघाले. नेहमीप्रमाणे ते ऑफिसला पोचले. आल्या आल्या त्यांना दादाने आत बोलावले. दादाच्या समोरच्या खुर्चीत एक उंच माणूस पाठमोरा बसला होता. त्याच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाची हॅट होती. जणू काही त्याला ऊन लागत होतं. अंगात एक पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट होता. त्यातून त्याची सडसडीत पण लोखंडी कांबेसारखी शरीरयष्टी डोकावत होती. माणसात चिवटपणा फार असावा असं त्यांना वाटलं. शर्ट हिरवट दगडी रंगाच्या पँटमध्ये खोचला होता व पँटचे पट्टे गळ्यात अडकवले होते. पँटचे पाय गुडघ्या पर्यंत येणाऱ्या कातडी बुटांमध्ये खोचले होते. काकांना तो एखाद्या मासेमारी करायला निघालेल्या ख्रिश्चन माणसासारखा दिसला. हातात फक्त मासे पकडण्याचा गळ नव्हता. त्याचा चेहरा उभट, उंच कपाळ, त्याखाली असलेले तपकिरी रंगाचे डोळे, ज्यात क्रौर्याची झाक होती. पण जगाला पिळून काढण्याचा भाव तोंडावर होता. लोकांना मी माझ्या तालावर नाचवीनच, असं त्याच्या मनात असावं. अधून मधून त्याच्या तोंडावर एक प्रकारचा दुःखी भावही यायचा, जणू काही त्याचं बालपण उपासमारीत हरवलं असावं. पण तो हसला की लहान लहान दात आणि त्यावरच्या मोठाल्या हिरड्या दिसत आणि त्याच्या वरच्या ओठाची कमान होत असे. मग गालाच्या गोट्या डोळ्यांपर्यंत सरकल्याने, डोळे अर्धवट झाकले जात. आणि तोंडातून खुनशी हास्य बाहेर पडे. डोळे मात्र क्रूर काम करायला मिळणार या भावनेने मोठे होत..... तो नक्कीच " सोल्या" होता. काकांच्या मनात आलं, हे काय नाव आहे? त्याचा खुलासा पुढे दादाने केलाच. " आईये काकाजी,.... " असं दादाने म्हटल्याबरोबर सोल्याने आपली मान डाव्या बाजूला वळवली. तो वर वर्णन केल्याप्रमाणे तो हसला. "........ ये है, सोल्या, और, सोल्या ये हमारे काकाजी, साला एकदम झाटलीमन आदमी " असं म्हटल्यावर सोल्याने आपला उजवा हात त्यांच्यापुढे केला. काकांनी हात मिळवला. त्यांचा हात एका घट्ट पकडीत अडकल्या सारखा त्यांना वाटला. हातातून त्यांना जरब जाणवली. विशेष म्हणजे, हाताची नखं जास्त जाड, रुंद, मोठी आणि मुद्दाम आणि वरचे भाग टोकांमध्ये रूपांतरित केलेले होते. त्याचा उपयोग काकांना कळेना. काकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून दादा म्हणाला, " डरना नही, ये तो अपना यार है. इसका असली नाम सोलकर है, लेकीन ये आदमीको बढिया तरीकेसे छीलता है इसलिये हम इसे सोल्या बोलते है. है̮लेकीन साला मराठीमे बात करता है. वो ऐसाच है. इसका काम अभी आपको देखनेको मिलेगा. " समोरच्या कोपऱ्यात बांधलेल्या अवस्थेत जीवन उभा होता. तो थरथरत होता. हातातलं पिस्तूल बाजूला ठेवून सूर्याने त्याचे हात सोडले. आणि त्याला सोल्याकडे ढकलला. पण घाबरून तो जवळच्या एका भिंतीजवळ उभा राहिला. त्याला निरखित सोल्या म्हणाला, " दादा तुला तर माहीत आहे, आपल्याला कामाशिवाय बोलावलेलं चालत नाय. आपन काम झालं नाही झालं, तरी ठरलेले पैसे घेतोच. पैसा तयार आहे ना? "..... दादा म्हणाला, " अरे यार, तू भी क्या पैसा पैसा करता है? पैसेको तो साला कुत्ताभी मूंह नही लगाता. देख, ज्यादा टाईम खाना नही, ये आदमीने गद्दारी की है, इससे क्या करना है, तूही कर ले..... " सोल्याने जीवनरामकडे भक्ष्याकडे पाहतात तशा पद्धतीने हसून पाहिलं आणि म्हणाला, " म्हणजे नक्की काय केलं. माज्या जवल पण टाइम नाय. मी नेहमी जरुर तेवढंच काम करतो. सोल्यासमोर कोणी टिकला नाय. " अरे सालेने पुलिसको इघरकी जानकारी दी. मतलब फोन घुमाया. "..... विचार करून सोल्या म्हणाला, " याचा कान सोलू, का जीभ फाडू, नाहीतर ज्या हातानी फोन लावला तो हात सोलू. " दादा वैतागून म्हणाला, " शुरुवात तो हाथसे कर. " जीवनराम परत घाबरून ओरडला, " तुम लोग मुझे मार डालो, लेकीन ये मत करना मेरे साथ. अरे तुम लोग जानवर हो क्या? " त्याची भीती पाहून आनंदित झालेला सोल्या म्हणाला, " बघतो त्याच्याकडे ".... आणि तो जागेवरून उठला.
अजून सोल्याने काही केलं नाही तरी जीवनराम घाबरून ओरडला, " ए. ऽ. ऽ मेरेको हाथ मत लगाना. तुम लोग जानवर हो क्या? " असं म्हणून त्याने गाफीलपणे बाजूलाच उभा असलेल्या सूर्याला जोरात धक्का दिला. तो दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन धडपडला. जीवनराम केबिनच्या दरवाज्याकडे धावला. मग खुनशीपणे हसत सोल्या लांब लांब टांगा टाकीत त्याच्याकडे धावला आणि पाठमोऱ्या जीवनरामच्या खांद्याला जोरात फिरवून त्याला आपल्या समोर आणून तुच्छतेने म्हणाला, " किती घाबरतोस रे कुत्र्या? गद्दारी करताना नाही घाबरलास. डरपोक साला. मी फक्त कोशिश करणार आहे. या हातानेच फोन घुमवलास ना? " त्याचा उजवा हात धरून तो म्हणाला. त्याच्या मनगटावर आपल्या डाव्या हाताची पक्की पकड ठेवून ते वर केले व आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचे आणि पहिल्या बोटाचे टोकदार नख त्याच्या आत घुसवायला सुरुवात केली. जीवनरामने अक्षरशः लोळण घेतली. पण सोल्याच्या हातून त्याचा हात सुटला नाही. जीवन जिवाच्या आकांताने ओरडत होता, " ए, छोड दे मुझे. मत करना...... " जीवनरामचे डोळे वेदनेने पांढरे झाले. सोल्याच्या हातावर रक्ताचं कारंजं उडाल आणि त्याचा हात रक्ताळला. काकांचेही डोळे भीतीने वटारले गेले. त्यांनी पटकन डोळ्यावर हात ठेवला आणि तोंड फिरवले. दादाला म्हणाले, " बस करो ये सब. मै नही देख सकता. मै बाहर बैठता हूं. रक्ताने माखलेला हात बाजूला करीत सोल्या थांबला. मग दादाने चिडून काकांना विचारले, " फिर गद्दारीकी क्या सजा होनी चाहिये, बोलिये. ".... काका काकुळतीने म्हणाले, " कुछ भी हो, ये बंद कीजिये. चाहिये तो उसे भूखा पेट रखिये, लेकीन मेरे सामने ये मत करना... " दादा पुन्हा चिडून म्हणाला, " बडा तरस आ राहा है आपको, आपका भाई है क्या? आपको मालूम है, आज आप सब लोग अंदर जाते, अगर आपने उस दिन सुना नही होता तो. फिर भी आपको ऐसा लगता है? " सोल्या म्हणाला, " दादा, मी काम करू का नको? मला काय पन फरक पडत नाय. मला पैसे तर पूरे मिलनार हैत...... दादाचे डोळे तांबारले, तो भडकून म्हणाला, " अरे तू तो पैसा पैसा करता है. पैसा कभी देखा नही क्या? " दादाच्या डोळ्यातला विखार पाहून सोल्या घाबरला, पण सावरून म्हणाला, " टाइम फुकट जातोय. "..... दादाने थोडा विचार केला. "ठीक है, काकाजी आप घर जाओ, आगे क्या करना, वो हम देख लेंगे. आप कल सुबे आना. " सूर्या तापून म्हणाला, " ये भी कोई बात है दादा? काकाजीको भी यहां रहना चाहिये, सबक तो सबके लिये है. मेरा पाव तो सबके सामने छिला था. " पण दादा म्हणाला, " तू चुप कर. तू नही समझेगा. आप जाईए काकाजी. " असं म्हटल्यावर काका बाहेर आले बरोबर आणलेला रिकामा थर्मास घेऊन ते घाईघाईने एकदाचे रस्त्यावर आले. रात्रीचे आठ वाजत आले होते. तरीही रस्त्याला गर्दी होती. ते स्टेशन कडे निघाले. ते चांगलेच भडकले होते आणि घाबरलेही होते. या असल्या कामावर जाण्यात काय अर्थ आहे? ते स्वतःशी म्हणाले. आता त्यांना किशाचा राग यायला सुरुवात झाली. सूर्यनारायण तर त्यांना पहिल्यापासूनच आवडला नव्हता. मग आस्ते आस्ते त्यांच्या लक्षात आलं, की आपण कशात अडकलोय. ही एक मोठी टोळी आहे. आपल्या हातून काही चूक झाली तर हे लोक सोल्याला बोलावतील. विचार करता करता त्यांनी घाबरून आपल्या हाताकडे पाहिलं. ते शहारले..... जीवनच्या वेदना जणू त्यांना होत होत्या. घाईघाईने त्यांनी आपल्या शर्टाच्या बाह्य बंद केल्या. मी काही झालं तरी माझ्या शर्टाची बाही वर करू देणार नाही. ते स्वतःशी म्हणाले. त्यांचा चेहरा उत्तेजित झाला होता. ते पुन्हा स्वतःशी बडबडू लागले. जीवनरामने काय कमी विरोध केला? त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. पण "आता काही उपयोग नाही " हे वाक्य त्यांनी दहा पंधरा वेळा तरी आतापर्यंत उच्चारले असेल. प्रतिध्वनी सारखं ते वाक्य त्यांच्या मनाच्या सर्व कोपऱ्यांतून परत येऊ लागलं. परत परत सांगून मन काही वेगळी उत्तरं देणार नव्हतं. त्यांच्या समोरून येणाऱ्या लोकांकडे त्यांचं अर्धवट लक्ष होतं. मग त्यांना एकदम भीती वाटू लागली....... " पण उपयोग काय? " ते मोठ्याने म्हणाले. वाक्याची फक्त रचना बदलली होती. मनाच्या उत्तेजित अवस्थेमध्ये त्यांना समोरून येणारी स्त्री दिसली नाही. तिच्या बरोबर तिची मुलगीही हात धरून चालली होती. ते सरळ त्या स्त्रीला जाऊ धडकले. घाबरून ते तिला सॉरी म्हणाले आणि पुढे जाऊ लागले.
त्या स्त्रीने त्यांना वळून चिडक्या आवाजत विचारले, " ओ मिस्टर, जरा इकडे या, काय झोपेत चालता की काय?..... असं म्हटल्यावर आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे धावले. काहींनी म्हटलं सुद्धा "साला बुढ्ढा है फिर भी औरत को छेडता है. " काकांनी थांबून चेहरा वळवला आणि तिच्याकडे पाहिले. ती साधनाबेन होती. तिनेही त्यांना ओळखले. चिडक्या आवाजाचं रूपांतर आश्चर्यात झालं आणि ती म्हणाली, " अरे तुम्ही?.... तुम्ही आहात होय? (जणू काही त्यांनी धक्का दिला तरी हरकत नाही असं कोणालाही वाटलं असतं ) काकांनी तिला हात जोडले. आजूबाजूची माणसं निराशेने निघाली. नाही तर एका स्त्रीला धक्का मारून वयस्कर माणूस पुढे जातोय, याच्यासारखी मसालेदार घटना काय असू शकते?.... तमाशा करायला?....
पण त्याच्याबद्दल थेट विचारणं बरं वाटलं नाही. मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती. ताकाला जाऊन भांडं कसं लपवायचं त्यांना कळेना. रघुमल बोलत होता तिकडे त्यांचं अर्धवट लक्ष होतं. रघुमल त्यांना त्याच्या सून आणि मुलाबद्दल सांगत होता. " काकाजी, ये साला जवान बच्चा लोगला काम नको. मेरा सोकरा ना बहू, दोनोंको मैने राजस्थान भेज दिया. बहुत तक्रार करता था. ये लोगोंको बडे लोगसे बात करनेका ढंगहीच नही है........ " तो पुढेही बोलत होता. पण काकांचं लक्ष तिकडे नव्हतं. त्यांना रमेशची आठवण झाली. मी थोडाच त्याला कुठे पाठवू शकतो? तोच मला घराबाहेर जायला सांगेल. त्यांना पाटकरचा विचार स्वस्थ बसू देईना. रघुमल म्हणाला, " अरे काकाजी, थोडा चाय तो पिओ नि. ".... असं म्हणून तो वळला आणि त्यांनी हो नाही म्हणायच्या आतच समोरच्या भटाला त्यांनी चहा सांगितला. मग ते बसले. थोड्याच वेळात चहा आला. अर्धा अर्धा करून दोघांनी पिण्यास सुरुवात केली. काका चुळबुळत होते. त्यांनी सहज वाटण्यासारखा प्रश्न फेकला. "समोरच्या चाळीची काय खबर? बिल्डिंग कधी होते. " हे खरं तर त्यांनी उगाच विचारलं. त्यांना बिल्डिंगमध्ये बिलकूल रस नव्हता. त्यांना पाटकरची माहिती हवी होती. चहा झाल्यावर चहाचं भांडं बाजूला ठेवून तो चहाच्या पोऱ्यावर उगाचच भडकला, " अरे ए, भाय तेरेको क्या उठानेके लिये बुलाना पडेगा क्या? हमारी बाते सुनना चाहता है क्या? चल चल.... जल्दी उठा चल. " तो गेल्यावर तो म्हणाला, " अरे काकाजी हे चालचा काय पन होनार नाय. तू गुस्सा मत कर हां. पण हे मराठी माणसला चांगला जिंदगी नको असते. " आता काकांनी विचारलं, " का! पाटकर काय म्हणतो? ".... रघुमलने इकडे तिकडे पाहत दबक्या आवाजात म्हटलं, " हे साला पाटकर है ना, लई चालू मानस. तेनी पोलिसच्या धमकी दिला होतानी....? " तो पुढे बोलण्याच्या आधीच काकांनी धडधडत्या छातीने त्याला विचारलं, " का... काऽ य झालं? " त्यांचा हात हातात घेऊन तो म्हणाला, " तु सांबळ तो, ते काय पोलिसमध्ये जानार नाय, साला पोताच्या सोकरीलाच हात लावते, बाप है.... या जानवर?. ते काय नाय करत "....... काका सुन्न ़झाले,.
मुंबई सेंट्रलला "प्रीतम " बिल्डिंगच्या तळमजल्यावर ती बँक होती. त्यांना तो पत्ता कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला. पण त्यांनी तसं काही दर्शवलं नाही. त्याने काकांना बसायला सांगितलं आणि म्हणाला, " सिर्फ हाथपर हाथ रखकर तो कुछ होने वाला नही, है ना? आप अंदर जाके सब देखके आना. खाता खोलनेके बहाने आप वहां जाइये. फिर इघर आकर आपको नक्शा बनाना है. सेफ, मॅनेजरका केबीन, आने जानेके लिये कितने दरवाजे है, चिपकके कौनसी दुकान है क्या, बँकका टाइमिंग, किधर अर्धा माला है, किधर सेफ डिपॉझिट व्हॉल्ट है, कॅश कब बाहर जाती है, जानेका तो एक दो बार जाकर देखना. वहां बारबार नही जाना. सोच समझके जाओ. ज्यादा पूछताछ नही करना. लेकीन सब जगह ध्यान रखना. कितने लोग काम करते है, जरा होशियारीसे काम करना. ये काम आपको अकेलेही करना है. जितना जल्दी होगा उतना अच्छा होगा. "..... ते बाहेर आले. त्या दिवशी काही खास मेसेज आले नाहीत. आजकाल सूर्या आणि दादा कायम आत बसलेले असायचे. एक दिवस सूर्या म्हणाला, "दादा, ये काकाजीके बारेमे सोचो ये अपने लाईनका आदमी नही है. त्यावर विचार करून दादा म्हणाल, " मुझे मालूम है, लेकीन तेरेको इसकी वजह नही समझेगी. तेरे पास ऐसी चीजे समझनेका दिमागही नही है. तू अपना काम कर. परसू एक मेसेज डायरेक्ट तेरे पास आया, वो क्या था? "....... थोडा विचार करून दादा खूष होईल असं समजून सूर्या म्हणाला, " अपनेको सिर्फ एक पार्सल पहुचाना है, दस लाख मिलेगा. अगर हम हाँ बोलते है तो वो अपना नाम बतानेको तैयार है. सोचो. " दादाने डोळे मिटले, काही वेळ विचार केला. सूर्याला काही अंदाज येईना. दादा म्हणाला, " तेरे दिमागमे भूसा भरा है. इतना पैसा वो देता है, इसका मतलब कुछ तो भी डेंजर पार्सल पहुंचाना है. सोचना अगर उस पार्सलमे कुछ विस्फोटक भरा होगा तो सबके साथ पहुंचानेवाला भी गया कामसे. कितने लोगोंकी जान जा सकती है, अंदाजा है तुम्हे? अपून साधारण आदमीका दुष्मन नही है. ये साले टुच्चे पैसेवालेके साथ अपना दुष्मनी है. पहले ही पुलिस अपने पीछे है. फिर पब्लिक भी अपने पीछे लगेगी. "..... "लेकीन दादा ये काम काकाको करनेको बोलनेका और पैसे पर थोडाही अच्छा या बूरा काम करके आया ऐसा लिखा रहता है? पैसा पैसा है. और फिर ये काकाजी अपने कितने काम आयेगा ये भी समझेगा.
त्याच्याकडे रोखून पाहत दादा म्हणाला, " दिमाग तो बडा जोरसे दौड रह है रे तेरा. " देख, अब तेरेको बोलता है, ध्यान से सून. काका जैसे पढे लिखे साधारण आदमीके पीछेसे हम अपना बहोत सारा धंदा कर सकते है. पुलिस को काकापर कभी शक नही होगा और उसके पीछे हम भी सेफ रहेंगे. ".... सूर्या विचारात पडलेला पाहून दादा म्हणाला, " अव समझ गये ना, काका अपने लाईनका आदमी नही तो भी क्यूं चाहिये...... " त्याच्या डोक्याला हात लावून दादा म्हणाला, " सोच, सोच.... अछी तरहसे सोच. अब जा अपने काम पे लग जा. मेरा मगज मत खाना. "
शनिवार उजाडला. बँकेच्या कामाला सध्या तरी हात लावण्याची जरूरी नव्हती. काकांनी साधनाबेनचा पत्ता पाहिलाः
त्याच्या मागे एक नोकरासारखा दिसणारा माणूस लहानशी ब्रीफकेस घेऊन उभा होता. तोही काही कमी नखरेल नव्हता. डोक्यावर विदूषकासारखी उंच टोपी, सतत हालणारे चंचल डोळे, उंदरासारखे बारीक नाक, लबाड जिवणी, छोटे छोटे कान, अंगात सिल्कचा शर्ट, त्यावर घट्ट बसणारं जाकिट खाली टाइट पँट घातलेली. तो ड्रायव्हर असावा. ते दोघेही सूर्याच्या मागून केबिनमध्ये शिरले. काही क्षणातच काकांच्या टेबलावरचा फोन पेटला. त्यांनी तो उचलला. दादाने त्यांना आत बोलावले होते. काका केबिनच दार उघडून आत शिरले. सूर्याने त्यांना तिरस्काराने विचारले, " क्या है? आपका क्या काम है? " पण दादा लगेच म्हणाला, " मैने बुलाया है" आणि त्यांना आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. सूर्याला ते अजिबात आवडलेलं दिसलं नाही. आलेलं कोणीतरी मोठं गिऱ्हाईक असावं, आणि अशा बाबतीत काकांना मध्ये घेणं त्याला मान्य नव्हतं. पण तो गप्प बसला. मगाशी आत आलेले दोघे दादाच्या समोरच्या खुर्च्यांमध्ये बसले होते. त्यातल्या चिटणिसाने आपला हात मिळवण्यासाठी दादापुढे केला. त्याच्या चारी बोटातल्या हिऱ्या माणकांच्या अंगठ्या चकाकल्या. त्याबरोबर काकांचे आणि दादाचेही डोळे चमकले. दादाने हात मिळवताना अर्थपूर्ण नजरेने सूर्याकडे पाहिले. पण त्याचा राग गेलेला नसल्याने त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. चेहऱ्यावर येणारी नापसंती टिकू न देता दादाने विचारले, " कौन है आप और कहांसे आते है? "....... थोडा वेळ जाऊ देत (जणू काही सांगावं की नाही असा विचार करून ) तो म्हणाला, " जी हम है जयसिंगजी महाराजजीके दिवाणजी साबरमल उदेपुरवाले. आपसे कुछ काम है........ " मग त्याने काका आणि सूर्या बद्दल नापसंती दर्शवित म्हंटले, " हम अकेलेमे बात कर सकते है क्या? ". दादाला असं बोललेलं आवडलं नाही, पण तो म्हणाला, " हम सब एक है, जो भी कहना है इनके सामने बिना झिझक बताईये "..... दुसरे दोघे जाणार नाहीत असं पाहिल्यावर तो स्थिरावला आणि शब्द जुळवीत म्हणाला, " देखिये, हमारे महाराजजीको संतती नही है. इसलिये....... " तो पुढे बोलण्याच्या आत दादा म्हणाला, " तो क्या हम पैदा करे?. तरीही न चिडता नम्रतेने दिवाणजी म्हणाले, " नही, नही, आप गलत समझ रहे है, हमारा वो मतलब नही. देखिये, भगवानकी क्रिपासे राजासाब के पास कई अरबोंकी दौलत है. लेकीन संतती नही. उनके पास इस सिलसिलेमे आफ्रिकासे एक तांत्रिक आये है. वो कुछ काला विधी करना चाहते है. जिसके लिये एक बरसके कम उमर वाले बच्चोंकी पांच खोपडियोंकी जरुरत है. और वो भी विधीके तारीखसे एक दिन पहलेतक की ताजी होनी चाहिये. हमे आपका नाम किसीने सुझाया, इसलिये हम यहं आये. "..... मग दिवाणजीने थोडा वेळ जाऊ दिला. दादाला त्याच्या लहानपणची आठवण झाली. त्याच्या गावात मुलं पळवणारी टोळी आली होती. मुलांना पकडून त्यांचे हात पाय तोडून एक तर भीक मागायला लावीत किंवा अघोरकर्मांसाठी त्यांचा बळी देण्यासाठी विकत. आई वडलांनी दादाला घरात जवळ जवळ आठवडाभर लपवलं होतं. अशी टोळी गावात काही महिने तरी कार्यरत होती. ते दादाला आठवलं आणि त्याने तो अस्वस्थ झाला. मग विचार करून म्हणाला, " आपको हम बच्चोंकी जान लेनेवाले गुनहगार लगते है? और ये कालाविधी वगैरे हम नही जानते, ना जानना चाहते है. आप यहांसे दफा हो जाईये, जाईये यहांसे.... " दादा एकदम एवढा चिडेल असं काकांना वाटलं नाही.
बॅग तिथेच ठेवून ते बाहेर आले. त्यांना अचानक हे काम सोडून पळून जावंस वाटू लागलं. उद्या साधनाकडे जायचंय, तिला हे सांगणं किती कठीण आहे. कुणाला सांगावं, कुणाचा सल्ला घ्यावा. अस्वस्थता सुचू देईना. त्यात दादाने त्यांना पुन्हा आत बोलावलं. ते आत शिरले. दादा म्हणाला, " ये रखिये.... " असं म्हणून त्याने त्यांना शंभराची पाच बंडलं दिली. कपाळावरचा घाम पुसत त्यांनी ती घेतली. आणि ते बाहेर आले. इकडे दादा सूर्याला म्हणाला, "देख, ये काका जैसे लोग मजबूर रहते है इनको अपने अंडर रखनेका एकही तरीका है...... पैसा! " पैशाची तरफदारी करीत काकांनी स्वतःच्या मनाला समजावलं. हे काही त्या पूर्ण कामातले पैसे नाहीत. "धिस इज वेलकम मनी ". आणि तसंही हे घेतले नाहीत तर आत्ताच बरेच बखेडे होतील, त्यापेक्षा मध्येच पलटी मारणं बरं पडेल. तरीही मन ठसठसत राहिलं. मन परत म्हणालं, " तो म्हातारा असला प्रस्ताव घेऊन आला नसता तर हे पैसे मिळाले असते का? म्हणजेच हे पैसे त्या कामाचेच आहेत, आणि तू हे काम मान्य केलंस. तू पाच तान्ह्या बाळांचा जीव घ्यायला जबाबदार आहेस. हे आधी मान्य कर. "अप्रत्यक्षपणे आपण ह्या पापात भागीदार होणार. होणार का? आणि का होणार?..... बाहेर एकटेच असल्याने काका स्वतःशीच मोठ्याने ओरडले, " नाही, मी जबाबदार नाही. मागे घेतले ते पैसेही अशाच कोणत्या तरी गुन्हेगारीतले होते ना? मग ते कसे चालले? " खिशातलं पैशाचं ओझंही तेवढं वाईट नव्हतं. पैसा असणं आणि नसणं यात केवढी तफावत आहे. मनातले टोचणारे विचार हळू हळू बोथट झाले. काकांनी मनापासून सध्यातरी सुटका करून घेतली होती. त्यांनी मग आत फोन लावला. दादाला सांगितलं, आणि ते घरी निघाले. पैशाचं कितीही आकर्षण वाटलं तरी "पळा पळा, कोण पुढे पळे तो? " या उक्तीप्रमाणे बाहेर पडले. सोमवारी परत कामावर जायचं होतं. तेव्हाचं तेव्हा बघू.
मग त्यांनी सर्व दैनंदिन विधी उरकले. ठेवणीतला जोधपुरी सूट काढला. तो घालून त्यांनी गुलाबाचा सेंट फवारला. डोळ्यावर गॉगल चढवला. गुळगुळीत दाढी केल्याने ते आता स्मार्ट दिसू लागले. नाही म्हटलं तरी मिळणाऱ्या पैशामुळे त्यांच्या तोंडावर थोडा सुखवस्तूपणाचा कोशेटा चढला होता. रोहिणीला ते हा सूट घातल्यावर आवडत असत. आरशात पाहिल्यावर त्यांना हा सूट नवीन शिवला आणि घातला, तेव्हाची आठवण झाली. अशीच दाढी करून, गॉगल वगैरे लावून आरशा ते समोर उभे होते. आई कुठेतरी बाहेर गेली होती. रमेश खेळायला गेला होता. रोहिणी कणीक मळत होती. तिने बाहेर येऊन त्यांच्याकडे पाहिले. तिच्या तोंडावर काकांना हा सूट छान दिसतोय असे कौतुकाचे भाव होते. दरवाजा उघडा होता, तरी काकांनी तिला मिठीत घेऊन तिची चुंबनं घेतली. तिलाही भान राहिलं नाही. मग लक्षात आल्यावर दिसलं की काकांच्या सुटावर आणि तोंडावरही कणीक लागलेली आहे. ते पाहून ते दोघेही बराच वेळ हसत सुटले होते. आत्ता मात्र रोहिणी नव्हती....... काका भानावर आले. ते आरशात एखाद्या मंत्र्यासारखे दिसत होते. फक्त गुलाबाचं फूल खिशाला नव्हतं. तेही घेऊन लावू, असं त्यांच्या मनात आलं. ते दरवाजा बंद करून बाहेर निघाले. दहा वाजून गेले होते. साधनाकडे जाण्यासाठी त्यांनी मुंबई सेंट्रलला जाणारी बस पकडली..... एक मंत्री आज बसने जात होता.
ते जेवढे बसमधून जाताना उल्हसित होते, तेवढे ते उतरताना राहिले नाहीत. साधनाबद्दलचं शारीरिक आकर्षण आत्तापर्यंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. पण प्रत्यक्षात ते तिने दिलेल्या पत्त्यावर पोचल्यावर त्यांना जाऊ नये असं वाटू लागलं. नाहीतरी साधना एक परकी स्त्री. अशी किती मोकळेपणाने वागणार ती? आपल्याला आकर्षण वाटायला तिची आपली ओळख फार जुनीही नाही. त्यापेक्षा नाही गेलो तर? परत एकदा बोलवेल तेव्हा पाहू. असं म्हणून ते प्रीतम बिल्डिंगबाबत विचारणार इतक्यात त्यांची नजर समोरच्या फूटपाथवर गेली. "प्रीतम बिल्डिंग " असं मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं आढळलं. पण परत त्यांच्या मनातला विचार एका आणखी गोष्टीने बदलला. ती म्हणजे तळमजल्यावर असलेल्या बँकेच्या नावाने. बँकेचं नाव होतं " श्रीकांत सहकारी बँक लि. " त्यांची एकदम ट्यूब पेटली. हीच ती बँक, जिची माहिती आपल्याला काढायची आहे. आज रविवार होता. बँक बंद होती. तसंही माहिती कशी काढायची हे त्यांनी काहीही ठरवलं नव्हतं. मग मात्र नकळत ते बिल्डिंगच्या प्रवेशदाराजवळ आले. आत कुठेतरी उत्सुकता होती म्हणा, किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा निर्माण झाल्याने म्हणा, ते बिल्डिंगमध्ये शिरले. बिल्डिंग पंधरा वीस वर्षे जुनी असावी. पूर्वी रंग निळसर असावा. तिथे राहणाऱ्या लोकांनी परत कधी रंग देण्याचा विचार केला नसावा. ते दुसऱ्या मजल्यावर पोचले. फ्लॅट नं. १४ पुढे ते उभे होते. दरवाज्यावर कोरीव नक्षीकाम होते. नेम प्लेट होती. "जितेंद्र आर. मेहता. " त्यांनी बेल वाजवली. आतून " आले, आले... ऽ " असा आवाज आला. दरवाजा उघडला. साधनाबेन दारात उभी होती. ती आज न्हायली असावी. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा मॅक्सी होता. डोक्याला टॉवेल गुंडाळला होता. तिने त्यांचं हसून स्वागत केलं. त्यांनी आत यावं म्हणून ती दरवाज्यातून बाजूला झाली. काकांनी डोळ्यावरचा गॉगल काढला आणि ते आत शिरले. आत सगळीकडे सेंटचा सुगंध भरला होता.
सेंटरचा मंद सुगंध आणि साधनांचा गोड हसणं यांनी काकांना खूपच बरं वाटलं.बरेच वर्षांनंतर रोहिणी सारखं कोणीतरी आपल्या स्वागतासाठी उभं होतं.काय बोलावं याचा विचार करीत असतानाच तिने विचारलं, " आज मूड ठीक आहे ना? मध्ये भेटलात तेव्हा अस्वस्थ वाटलात म्हणून विचारलं. " काकांनी सगळं ठीक असल्याचं सांगितलं. अचानक त्यांना तिच्या मुलीची आठवण होऊन त्यांनी विचारलं, " सोनाली दिसत नाही कुठे? आहे ना आत? ".... मग तिने मुलीला हाक मारली, " सोना बेटा बाहेर ये. बघ कोण आलय ते..... " अंगावर निळसर रंगाचा बेबी फ्रॉक घातलेली सोनाली बाहेर आली आणि साधनाला चिकटून उभी राहिली. "बेटा काकांना हॅलो कर.... " त्यावर ती अधिकच लाजली आणि तिने तोंड लपवले. साधना म्हणाली, " तू गुड गर्ल आहेस ना, मग काकांना हॅलो कर. " मग तिने हळूच हॅलो म्हटलं. काकांनी तिला जवळ बोलावलं. पण ती लाजून आत पळाली. काकांच्या मनात आलं, आपण तिच्यासाठी काहीच आणलं नाही. ते म्हणाले, " अगं, मी हिच्यासाठी काहीच आणलं नाही, सॉरी. " साधना मान तिरकी करून केस पुशीत म्हणाली, " ठीक आहे हो, एवढं काय त्यात? पुन्हा याल तेव्हा आणा. " काकांना जरा ओशाळवाणी झालं. खरंतर आपण इथे येण्याचं नक्की केलं नव्हत. त्यांना साधना म्हणाली, " या ना आत, घर दाखवते. " काका एका हातात गॉगल धरून तिच्या मागून आतल्या खोलीत गेले. बाहेरचा हॉल साधाच होता. त्यात एका कोपऱ्यात टीव्ही होता. हॉलला दोन खिडक्या होत्या. एक बिल्डिंगच्या मागच्या रोडवर उघडत होती, तर दुसरी पुढच्या भागाकडील मुख्य रोडवर. खिडकीच्या बाजूला सोफा सेट होता. आणि छोट्या टिपॉय सारख्या टेबलावर बांबूच्या काड्यांपासून बनवलेलं बुद्धिबळातल्या घोड्याचं तोंड होतं. त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी काचेच्या निळ्या रंगाच्या गोट्या वापरलेल्या होत्या. त्याने तो जास्त उग्र आणि निर्जीव वाटत होता. काकांना त्या शिल्पाचा अर्थ लागेना. काकांना वातावरणाची एक वेगळीच जाणीव होत असे. ते पुढे गेले खरे, पण आतल्या खोलीच्या दरवाजातच उभे राहिले.
आतली खोली म्हणजे एक लहानशी बेडरूमच होती. त्या खोलीला मागच्या बाजूला एक खिडकी होती. आतली खोलीही नीटनेटकी आणि बेताची सजावट केलेली होती. खोलीत समोरासमोरच्या भिंतींवर एकेक मोठा आरसा लावलेला होता. त्या आरशात बेडचं प्रतिबिंब पडत होतं. याचा अर्थ झोपल्यावर आरशात दिसलं असतं. असाच एक आरसा काकांच्या बेडरूम मध्ये रोहिणीने सहज म्हणून लावून घेतला होता. तो त्यांनी तिला काढायला लावला होता. त्यांना बेडवर झोपल्यावर आरशात दिसू नये असं वाटायचं. आणि मुख्य म्हणजे, रात्री बेरात्री उठावं लागलं तर आरशातलं प्रतिबिंब पाहून माणूस एखाद वेळेस घाबरू शकतो असा त्यांचा समज होता. मध्यभागी असलेल्या बेडवर आकाशी रंगाची चादर घातलेली होती जिच्या चारही टोकांना गुलाबी रंगाचे फुलांचे गुच्छ रंगवलेले दिसत होते. आत एक दोन कपाटं होती. स्वैपाकघरातल्या खिडकीतूनही थोडंफार ऊन त्या खोलीतही येत होतं. मध्येच साधना म्हणाली, " ही एक रूम आणि बाजूला आणखीन एक रूम आहे. ती जरा मोठी आहे. " तिलाही दोन खिडक्या होत्या. ज्याने त्या घराचं आर्किटेक्चर केलं होतं तो खिडक्यांचा शौकीन असावा. दुसऱ्या बेडरूममध्ये एक डबलबेड होता. एका भिंतीवर एका माणसाचा फोटो चंदनाचा हार घालून टांगलेला होता. बहुतेक साधनाच्या मिस्टरांचा असावा. काका तिकडे पाहत आहेत असं जाणवून साधना एक खिडकी उघडीत म्हणाली, " हा मिस्टरांचा फोटो आहे. त्यांना जाऊन आता बारा वर्ष होतील. " फोटोतला माणूस फुगीर नाकाचा पण वर्तुळाकार चेहऱ्याचा होता. डोक्यावरचे केस विरळ झालेले दिसत होते. एक टिपीकल गुजराथी लुक त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण डोळ्यांमध्ये प्रेमळ भाव होता. चेहऱ्यावर कोठेही उग्रतेचं चिन्ह नव्हतं. काकांचं तरी प्रथमदर्शनी मत बरं झालं होतं. अर्थातच त्यांच्या मताला किंमत नव्हती. फोटोतला माणूस काही जिवंत नव्हता...... साधनाने बोलता बोलता केस झटकले आणि दोन्ही हात वर करून ते मागे बांधले. काकांना मॅक्सीमधून तिची फिगर पडणाऱ्या उन्हामुळे स्पष्ट दिसत होती. उगाचच गैरसमज नको म्हणून काकांनी कष्टाने मान वळवली. तिने त्यांच्याकडे सहज पाहिलं पण काकांना त्यांच्या भावना जाणवल्या असल्यासारखं वाटलं. त्यांनी मुद्दामच मागे मान वळवली. सोनाली अजूनही आतल्या खोलीच्या दारा आडून त्यांच्या कडे चोरून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर अनोळखी छटा होत्या. पण हा माणूस कधी जाणार असा भाव नव्हता. तिने काकांना ओळखलं होतं, पण कुठे पाहिलं ते तिला आठवत नव्हतं.
साधनाला एकदम आठवण झाली. आपण काकांना काही थंड पेय वगैरे घेणार का असंही विचारलं नाही. ती घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. फ्रीज मधून तिने मँगोलाची बाटली काढली, आणि तीन ग्लास भरून ट्रे मधून ती घेऊन आली. काका हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसले. जवळच्याच टिपॉयवर ठेवलेल्या ग्लासेस मधून एक ग्लास त्यांना देत ती म्हणाली, " आमच्याकडे केव्हाही पेय घ्यायचं म्हटलं तरी सोनासाठी पण ग्लास तयार ठेवावा लागतो. सोना, इकडे ये. हे घे " म्हणत तिने सोनाला ग्लास हातात दिला. मग तिने स्वतः चा ग्लास संपवून ती घाईघाईने स्वैपाक घरात जात म्हणाली, " बसा हं जरा. स्वैपाकाकडे बघते, म्हणजे आपल्याला जेवायला बसता येईल. समोरच्या कपाटात पुस्तकं आणि बाहेर आजचा पेपर आहे पाहा. म्हणजे तुमचा वेळ जाईल. " काकांनी सहज म्हणून समोरचे कपाट उघडले. पुस्तकं चाळायला सुरुवात केली. बहुतेक पुस्तकं मराठी होती. काही इंग्रजी, तर थोडी गुजराथीही होती. कादंबऱ्या, गूढ कथा, वेगवेगळे कथासंग्रह आणि एक बायबलची प्रतही दिसली. त्यांना आश्चर्य वाटलं.
(क्रमश:)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा