कामथे काका (भाग ८)

फोन अर्थातच लंच टाईम मधे........


                     फोन अर्थातच लंच टाइम मध्ये लावला. पलीकडून आवाज आला, " नरेश गडा अँड कंपनी. कोण बोलताय? क्षणभर काका बावचळले, कसं बोलावं त्यांना सुचेना. तशी तिची आणि त्यांची काही फार ओळख नव्हती. ते झटकन म्हणाले, " मी कामथे बोलतोय. "...... "कामथे? कोण कामथे? " ती तटस्थपणे म्हणाली. मग ते म्हणाले, " मी आपल्याकडे कामासंदर्भात आलो होतो, आठवतं का?........ " थोडावेळ शांततेत गेला. ती म्हणाली, " अरे हो हो! मी विसरलेच होते. पण तुम्ही आला नाहीत ते? का बरं?..... आवडलं नाही का इथलं काम? " काका म्हणाले, " खरं आहे, मला एवढ्या सकाळी रोज येणं जमलं नसतं. " तिचा आवाज एवढा गोड होता, की त्यांना तिने बोलतच राहावं असं वाटलं. आणि विशेष म्हणजे, तिचा आवाज रोहिणीशी मिळता जुळता होता. अचानक ती म्हणाली, " काय करताय मग? येताय का?, तुम्हाला जर सरांशी बोलायचं असलं तर सध्या ते इथे नाहीत. ते दोन तीन महिन्यांकरता बाहेरगावी गेल्येत. तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपण पाहू या काय करता येईल ते. " त्यावर काका घाईघाईने म्हणाले, " नाही मॅडम मी सध्या दुसरीकडे जातोय. " ती बरं म्हणाली आणि तिने फोन ठेवला. काकांना जरा बरं वाटलं, म्हणजे खरोखरीच नरेशभाई बाहेरगावी गेलाय तर. आपण बोललो ते खोटं नाही निघालं. पण त्याचाच फोन रमेशला आला तर? कारण आता साधनाबेन त्याला सांगितल्याशिवाय राहील का? पण मन "आपलं खरं निघालं" या नशेत असल्याने, मनाने ती शंका धुडकावून लावली.
कामावर काही वेगळं घडत नव्हतं. असेच काकांना आता तीन चार महिने होत आले. गडाकडून कोणताच फोन आला नसावा, नाहीतर रमेश त्यांना वाटेल ते बोलला असता. किंवा आला असला तरी आपण आता पैसे आणतोय ना, असा विचार करून रमेश गप्प बसला असावा, असं त्यांना वाटलं.
परंतु एक दिवस विचित्र उजाडला. तसा तोही दिवस इतर दिवसांसारखाच होता. सकाळपासूनची त्यांची दिनचर्या तीच राहिली. अचानक तीन साडेतीनच्या सुमारास एक फोन आला. काकांनी सवयीने तो उचलला. पलीकडून आवाज आला, " नीला शर्ट फट गया ". काका फोन बंद करणार होते. बोलणारा गाफील होता म्हणा किंवा मूर्ख होता म्हणा, कारण कोणीतरी दुसऱ्या फोनवरून बोलत असलेलं त्यांना ऐकू येऊ लागलं. "मैने जो बोला वो सही है, माल मिलेगा, रेड करो पूरा पता लिख लो, इस टाइम मां कसम आप निराश नही होगे, पता लिख लो साब, लॅमिंग्टन रोड, २३ए...... " पुढे बोलणं चालू होतं. पण आधीच्या बोलणाऱ्याने आता फोन खाली ठेवला होता. काकांना ही माहिती नवीन होती. या जास्तीच्या माहितीचा ते विचार करू लागले. त्यांनी आलेला मेसेज प्रथम आत मध्ये दिला, तशी तो म्हणाला, " अंदर आओ ". काका कामात असताना सीट सोडून प्रथमच केबिनमध्ये गेले. तो काही पेपर्स चेक करीत होता. तो थोडा उद्विग्न झाला असल्याचं, त्याच्या कपाळावरील आठ्या दाखवीत होत्या. वर मान करून तो म्हणाला, " अरे काकाजी मै थोडा बाहर जाके आता है..... " काका त्याला मध्येच तोडीत म्हणाले, " साब, और एक जानकारी है. त्याला असं मध्येच थांबवलेलं आवडलं नाही, तो थोडा वैतागून म्हणाला, " क्या है? "....... मग काकांनी त्याला सगळं सांगितलं. तो बसल्या जागी ताठ झाला. त्याचे लहानसे डोळे विस्फारले गेले. तो म्हणाला, " अरे काकाजी, ये तो आपने बहोतही इंपॉर्टंट इंफर्मेशन दी है. ठीक है, आप जाओ मै बोलता हूं क्या करना है. " ते बाहेर आले. खुर्चीवर त्यांना अचानक बसावसं वाटेना. फार काय, ऑफिसमध्येही राहू नये असं वाटू लागलं. का कोण जाणे, त्यांना त्या माहितीचा अर्थ लागला. म्हणजे इथे पोलिसांची रेड होणार आहे तर........ पण का?..... एका वकिलाच्या ऑफिसात हरकत घेण्यासारखं काय असणार?...... काय माहीत?..... एक नक्की इथे आपण आता पूर्णपणे अडकलो आहोत.


त्यांची नजर उंचच्या उंच काचेच्या कपाटांकडे गेली. कायद्याची निर्जीव पुस्तकं त्यांच्याकडे स्थिर नजरेने पाहतं होती. त्यांना कळेना या पुस्तकांमध्ये काय आहे? ही कायद्याचीच पुस्तकं आहेत ना?...... छतापर्यंत रचलेली पुस्तकं त्यांना काढून पाहावीशी वाटली. पुस्तकांच्या मागे तर काही नाही?.... मग त्यांना त्यांच्या घरी आलेली पोलिसांची रेड आठवली............ सकाळची दहा साडेदहाची वेळ होती. काका चक्क जांग्यावर पुजेला बसले होते. कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. निलंबन चालू होतं. त्यांना रंगेहात पकडल्यापासून ते अस्वस्थ होते. त्यांचा दिवस धाकधुकीतच उजाडायचा. आज काय होणार? ते स्वतःला विचारायचे. पण होत काहीच नव्हतं. घरी बसून सहा महिने झाले होते. बहुतेक आता कोर्टातच जावं लागेल, अशी त्यांची कल्पना होती. त्यांचा वकील पण त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहायचा. असो. रोहिणी आत काहीतरी करीत होती. ती धुणं वाळत घालीत असावी. रमेश बाहेर गेलेला होता. काकांची आई आजारी असल्याने पलंगावर झोपली होती. खरंतर काकांना दुसऱ्या दिवशीच त्यांच्या मावसभावाच्या लग्नासाठी नागपूरला जायचं होतं. लग्नाची सगळी तयारी एका बॅगमध्ये केलेली होती. दोन खोल्यांच्या जागेमध्ये सामान खच्चून भरलेलं होतं. बसायला आणि उभं राहायला सुद्धा जागा जेमतेमच उरत होती. पुढचा दरवाजा उघडाच होता. चाळच ती, सर्वांचीच पुढची दारं उघडी असायची.
अचानक दारावर थाप पडली. कोण आलंय म्हणून बघायला रोहिणी पुढे झाली. तिलाच पोलिसांनी विचारलं, " रामचंद्र कामथे इथेच राहतात? ती हो म्हणाल्यावर ते पुढे म्हणाले, " आहेत का ते घरात? " परत चाचरत ती हो म्हणाली. " मी इन्स्पे. वागळे, इथे तलाशी घ्यायला आलोय. हे पाहा सर्च वॉरंट, " असं म्हणून तिच्या परवानगीची वाट न बघता ते चार पाच पोलिसांसहित आत घुसले. काकांनी चटकन टॉवेल गुंडाळला. ते दाराशी येऊन म्हणाले, " काय झालं? " त्यांनी वागळेना ओळखलं. त्यांची चौकशी वागळेच करीत होते. त्यावर वागळे म्हणाले, " तुला काय वाटलं, आता आपली भेट कोर्टातच होईल, काय? तुझ्याकडे ऑफिसची कागदपत्रं असणार म्हणून तर तलाशी घ्यायला आलोय........ " मग त्यांच्याकडे लक्ष न देता ते म्हणाले, " चला जाधव तुम्ही ही रूम पाहा. शिंदे आतली रूम पाहतील आणि दानवे तुम्ही पंचनामा लिहायला घ्या. इथे फारसं काही सापडेल असं वाटत नाही. यानी आधीच लपवली असतील कागदपत्रं कुठे तरी. " काकांना राग आला. पण ते काही बोलले नाहीत. त्यांनी रोहिणीकडे पाहिलं. ती धुणं वाळत घालायच्या काठीवर रेळून फक्त पाहत राहिली. काय करणार बिच्चारी.........
कपाटातले सगळे कपडे, इतर वस्तू बाहेर काढल्या गेल्या. आईला उठवून गादीखालचा भागही तपासून झाला. मग तिला वागळे म्हणाले, " तुमच्या मुलाने पैसे खाल्लेत, आणि काही कागदपत्रं लपवल्येत असा आम्हाला संशय आहे. " त्यावर आई काहीच बोलली नाही. नशीब लग्नाची बॅग तपासली गेली नाही, नाही तर त्यातले दागिने (जे घरचेच होते), किमती साड्या कुठून आणल्या विचारलं असतं, किंवा जप्त करून घेऊन गेले असते. स्वयंपाकघरातले धान्याचे डबे, इतर वस्तू सगळ्या विखरून पाह्यल्या. पण काही सापडलं नाही. शेवटी वागळे कुत्सितपणे म्हणाले, " सगळे कागद आम्ही यायच्या आधीच नष्ट केले, काय कामथे? बरोबर ना?..... " काका काहीच बोलले नाही. पंचनामा झाला. पंच म्हणून सलीम टेलरही होता. त्याची नजर काकांनी चुकवली. सह्या झाल्या. त्याही परिस्थितीत रोहिणीने चहा केला. तो निर्लज्जपणे घेऊन रेडिंग पार्टी बाहेर पडली......... या प्रकारानंतर आई फार दिवस राहिली नाही. एखादा प्रसंग काय काय निर्माण करू शकतो सांगता येत नाही.
कपाळावर आलेले घर्मबिंदू पुसत काकांनी इकडे तिकडे पाहिलं. त्यांना घरावरच्या रेडचा धक्का बसलाच होता. इथेही आपण अडकतो की काय? पण तेवढ्यात त्यांना सूर्यनारायणने आत बोलावले. तो म्हणाला, "काकाजी आज आप जाइये. पुलिस यहां कभीभी आ सकती है. कल मै आपको फोन करूंगा तभी ऑफिस आना". ते हो म्हणाले. आणि थर्मास घेऊन निघाले. चार वाजून गेले होते. त्यांना सुटल्यासारखं वाटलं. पण आपण इथे काम करतो हे पोलिसांना कळलं आणि ते घरी आले तर? रमेश काय म्हणेल? आपल्याला घरात ठेवील का?. या काळजीत ते घरी पोचले. घरी नीता होती. आजकाल ती दार उघडल्यावर त्यांच्याकडे पूर्वीइतकी तुच्छतेने पाहत नसे, असं त्यांना वाटलं. ते आत गेले, कपडे बदलून ते फ्रेश होऊन आले. मग त्यांनी नीताला चहा करायला सांगितला. उत्तर मिळालं नाही तरी चहा मिळाला. काकांच्या डोक्यातून विचार जाईनात. ऑफिसमध्ये नक्की काय चालतं? वकिलीचा धंदा हा निव्वळ देखावा असावाअ. कोणीही ज्युनियर्स, किंवा असिस्टंट इथे काम करीत नसावेत. नाहीतर केव्हातरी डोकावले असते. आजपर्यंत आलेल्या मेसेजेसचा अर्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना तो लागेना. मग त्यांना आठवलं आपण पहिल्याच दिवशी डायरी ठेवायचं ठरवलं होतं. आपण सुटून आल्यापासून आठवेल तशी डायरी लिहिण्याचं ठरवलं. ती आज रात्रीपासूनच लिहावी अशी त्यांना निकड वाटू लागली. पण डायरी तर हवी.......

तेवढ्यात नीता श्रेयाला घेऊन बाहेर निघाली. त्यांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. श्रेया हळूहळू दोन वर्षाची होत आली. तिचा जन्म दिवाळीतला होता. आता ती काही काही शब्द बोलू लागली होती. अधून मधून ती चालत चालत हॉल मध्ये येत असे. पण तिला तशीच उचलून नीता आत नेत असे. काकांशी संबंध तिला आणायचा नसावा. नीताच्या हातावर असलेली श्रेया नकळत त्यांच्याकडे पाहून हसली. त्यांना फार बरं वाटलं. नक्कीच तिनी आपल्याला ओळखलं असावं. अशी गोड भावना निर्माण झाली. पण एवढ्या लहान मुलांना काय कळतंय? ती सहजच गाल वाकडा करतात आणि आपण समाधान करून घेतो, ती हसतात म्हणून. नीता तिला घेऊन बाहेर पडली. आणि काकांनी प्रथम दरवाजा नीट लावून घेतला. आतून बोल्ट लागत नसल्याने त्याचा काही उपयोग नव्हता. ते थोडावेळ थांबले. त्यांचा एक सिद्धांत होता. न आवडणारा संशयी माणूस बाहेर पडल्यावर काही ना काही कारणाने लगेचच परत घरात येतो. म्हणून त्याच्याबद्दल बोलणं किंवा काही करणं लगेच करू नये, तर थोडं थांबावं. हा त्यांचा सिद्धांत बरेच ठिकाणी खरेपणा दाखवून गेला होता. ते थांबले.......... आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला. लवकरच फ्रंट डोअर मध्ये किल्ली घातल्याचा आवाज आला. ते सोफ्यावरच बसले होते. नीता श्रेयाला घेऊन परत आत आली. त्यांनी तिला खोट्या आश्चर्याने विचारलं, " काही राह्यलंय का? " तिला पाह्यजे ती वस्तू घेतल्यावर ती बाहेर येऊन म्हणाली, " आता घराची झडती घ्या, मी नाहीच आहे सध्या ". ते काहीही बोलले नाहीत. ती निघून गेली. दरवाजा बंद झाला. ती खरोखरीच खाली गेल्याची त्यांनी गॅलरीतून पाहून खात्री करून घेतली. आता ते बेडरूम मध्ये आले. आज रूम आवरलेली दिसली. त्यांनी पटकन वरची बॅग काढली. ती उघडून ते जुनी डायरी शोधू लागले. त्यांना वरच्या इतर बॅगांमध्ये कुठेही डायरी मिळाली नाही. सगळं जसच्या तसंच त्यांनी ठेवलं. ते निराश झाले. पण नवीन डायरी विकत आणण्याचं त्यांनी ठरवलं. डायरी घरीच लिहिता येईल, कारण कामावर काहीच करता येत नव्हतं.

इकडे ऑफिसमधून काका गेल्यावर सूर्यनारायणने बाहेरील दरवाजा लॉक केला. आणि सावकाश लाकडी घोडा ओढत आणला. त्यावर चढून त्याने एकदम वरच्या खणापासून ते खालच्या सहाव्या खणापर्यंतची सगळी पुस्तकं खाली काढली., ती जवळ जवळ दीडेक शे भरली. सगळीच पुस्तकं अतिशय जड होती. एका कोपऱ्यात काही रिकामे कार्टून्स ठेवले होते. त्यात त्याने ती पुस्तकं भरायला सुरुवात केली. एकूण रिकामे कार्टून्स पंधरा होते. कसेतरी भरलेले कार्टून्स त्याने ओढत ओढत केबिनमध्ये त्याच्या टेबलाजवळ आणले. हे सगळं भराभर करणं जरूर होतं. तेही एकट्याने. तो चांगलाच दमला. एसी असूनही त्याला घाम फुटला. मग त्याने बाहेरच्या हॉलमधील घोडा जागेवर ठेवला. अधून मधून तो सारखा स्क्रीन पाहत होता. पोलिस तर नाही आले? रेड केव्हाही येऊ शकत होती. सध्यातरी काकांची मदत त्याला घेता येत नव्हती. दादाचा विश्वास असला तरी त्याला फारसा वाटत नव्हता..... त्याने केबिनचं दारही लॉक केलं. जमिनीवरचं मऊशार कार्पेट त्याने सावकाश गुंडाळायला सुरुवात केली. अर्ध्याहून अधिक कार्पेट गुंडाळलं गेल्यावर खालचा खोटा कोबा बसवलेली जमीन दिसू लागली. तीत दोन बाय दोन फुटाचा कोब्यातल्या डिझाइनमध्ये बसवलेली खाच होती. तीत थोडं दाबून त्याने बोटं घातली, त्याबरोबर तो दरवाजा उघडला गेला. आतल्या काळोख्या भागात दोन तीन दगड अशा रितीने ठेवले होते की त्यांचा पायऱ्यांसारखा उपयोग करता येत होता. दरवाजा उघडल्याबरोबर एक प्रकारची कुबट आणि उबलेली हवा बाहेर आली. एखाद्या मोठ्या गटाराच्या तोंडाशी जसा घाण वास येतो तसा आला. त्याचा घसा घुसमटला. केबीन मधल्या दिव्याचा परावर्तित प्रकाश खालच्या पायऱ्यांवर झिरपत होता. मग त्याने एक प्रखर प्रकाशाचा टॉर्च चालू केला. त्याबरोबर आतला अंधार पेटून उठला. आतून उंदरांचा चुंई चुंई चिर्र चिर्र असा आवाज आला. त्यांना बहुतेक एकदम येणारा प्रकाश आवडला नसावा. पण सूर्यनारायणला त्याची पर्वा नव्हती. टॉर्च आत प्रकाश पडेल अशा रितीने त्याने वर ठेवला. प्रथम एक कार्टून कसाबसा उचलला आणि तो तोल सावरीत आत उतरला. हळू हळू एकाच माणसाच्या रुंदीची जागा आता मोठ्या बोगद्यात रूपांतरित झाली होती. त्या सबंध बोगद्याने केबीन खालचा सगळा भाग व्यापला होता. आत उतरताना त्याने सवयीने बाजूच्या भिंतींमध्ये असलेल्या कोनाडेवजा भोकशांमध्ये पाहिले. ते माल ठेवण्यासाठीच बनवले होते. पहिला कार्टून घेऊन तो बोगद्यात शिरलेल्या गटाराच्या पाण्यातून चालत बोगद्याच्या दुसऱ्या तोंडाशी आला. जे म्युन्सिपालिटीच्या मोठ्या गटारात उघडत होतं. सर्व कोनाड्यांमध्ये, योग्य तेवढा पिस्तुलांचा साठाही ठेवण्यात आला होता. त्यात शेवटच्या कोनाड्यात त्याने तो कार्टून ठेवला. असं करीत पंधराच्यापंधरा कार्टून्स त्याने शेवटून ठेवत आणले. न जाणो तेवढ्यात जर पोलीस आले तर काही माल तरी वाचेल. त्याच गणित
त्यालाच माहीत होतं. कार्टून्स ठेवताना त्याच्या अंगावर लहान लहान उंदीर उड्या मारीत होते. पण त्याला त्याची सवय असावी. त्यांना घाणेरड्या शिव्या देत तो बाहेर आला.
मग त्याने बाहेरचं कार्पेट नीट नेटकं केलं. जणूकाही काही घडलंच नव्हतं. मग त्याने बाथरूम मध्ये जाऊन हात पाय स्वच्छ धुतले. कपडे, केस नीट केले. अंगावर सेंटचा फवारा मारला. केबीन मध्ये फ्रेशनरचा फवारा उडवला. तरीही त्याला गटाराचा घाण वास आला. मग त्याच्या मनात आलं, आपण इतका वेळ तो वास घेतलाय, म्हणूनच येतोय. नवीन माणसाला संशय सुद्धा येणार नाही. तो केबीन बाहेर आला. विस्कटलेल्या वस्तू साफ करून जागेवर ठेवल्या. इथेही त्याने फ्रेशनर मारला. मग केबिनचे दार उघडून त्याने तिऱ्हाईत माणसासारखी नजर फिरवली. त्याची खात्री पटली, तेव्हा तो आपल्या मऊ मऊ खुर्चीत बसला, आणि निवांतपणे रेळला. हळू हळू रात्रीचे आठ वाजत आले त्याने डाव्या हाताचा खण उघडून दुपारीच आणून ठेवलेलं चिकन सँडविच तोंडात घातलं. रोडवरची बहुतेक दुकानं बंद होत होती. सूर्यनारायणच्या ऑफिसच्या गल्लीच्या तोंडाशी एक पोलिस व्हॅन येऊन उभी राहिली. त्यातून तीन चार हवालदार, एक एसीपी, दोन सिनी. इन्स्पेक्टर उतरले. त्यांनी जाऊन काचेचा दरवाजा हातातल्या काठीने वाजवला,
मग बेल वाजवली. सूर्यनारायणला स्क्रीन वर पोलिसी वेषातली आकृती दिसली. त्यांना एक शिवी देत, तोंडातला तुकडा घाईघाईने त्याने चघळला आणि गिळला.
प्रथम त्याने स्क्रीन बंद केला. टेबलाच्या खणात ठरलेल्या जागी ठेवला. मग त्याने बाहेर येऊन फ्रंट डोअर उघडले. दार उघडल्या उघडल्या एसीपी, खंडागळे, रिव्हॉल्व्हर काढून, त्याला धक्का देत आत घुसले. रिकामं ऑफिस
पाहून ते सूर्यनारायणला म्हणाले, " खबर लागल्या बरोबर स्टाफला सुटी दिलीस काय? " त्याची कॉलर धरून त्याला हालवीत ओरडले, " माल कुठे लपवलायस? "..... स्वतःचा तोल सांभाळीत त्याने त्यांना निबरटपणे तो म्हणाला, " कौनसा मा ल साब? यहां कोई माल नही. "...... चिडून ते म्हणाले, " दुसऱ्या जागी ठेवलायस का? आं? काय रे काय विचारतोय मी? मराठी कळतं ना? " कुणाला मराठी येत नाही म्हटलं की त्यांचा अर्धा पारा आधीच चढायचा. त्यावर तो नाही म्हणाला. मग ते इतरांना म्हणाले, " घ्या याला पह्यले ताब्यात घ्या".
आता मात्र तो करवादून म्हणाला, " साब लेकीन मैने क्या किया? "
..... त्याला सणसणीत शिवी देत ते ओरडले, " चूप, एकदम चूप!, आम्हाला आमचं काम करू दे. चला सुरू करा सर्च " त्यांनी सहकाऱ्यांना ऑर्डर दिली. तरीही सुर्यनारायण म्हणाला, " साब आप वॉरंट दिखाईये, आप बिगर वॉरंट कुछ नही कर सकते. पुन्हा त्याच्यावर खंडागळे ओरडले, " हे बघ वॉरंट, नीट पाहून घे. " मग स्टाफवर नजर फिरवून म्हणाले, " चला बघा लवकर शिंदे, साबळे, नेटके, देखणे, सुरुवात करा. " मग त्या सगळ्यांनी मिळून सगळं फर्निचर अस्ताव्यस्त करून टाकलं. टेबलांचे खण उघडून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. काही न सापडल्याने एसीपींनी टेबलांना लाथ मारून उडवले. मग म्हणाले, " अरे ती सगळी पुस्तकं काढा, चक्क खाली फेका. आपल्याला आवरण्याचं काम करायचं नाही जाताना. याचा काही भरवसा नाही. पुस्तकांमध्ये सुद्धा हा माल लपवील " काही न मिळाल्याने त्यांनी सूर्यनारायणच्या एक कानफटात मारली. तो एका बाजूला भेलकांडला. स्वतःचा गाल चोळीत तो कसातरी उभा राह्यला. कोपऱ्यातला लाकडाचा घोडा आणून स्टाफने सगळी पुस्तकं ओढून खाली टाकली. ते पुस्तकं चाळून पाहू लागले. त्यात बराच वेळ जाणार हे ओळखून सिनी. इन्स्पे श्रीकांत म्हणाले, " सर केबिनमध्ये नक्कीच काहीतरी असणार. एक दोघांना पुस्तकं आंणी कपाटं तपासायला सांगून बाकीचे सगळेच सूर्यनारायणचे बकोट धरून केबीन मध्ये शिरले........
सूर्यनारायणचं बार शेप टेबल त्यांनी आडवं पाडलं. सगळे खण उघडले स्क्रीन बाहेर टाकला. पण आत काहीच सापडलं नाही. शिवाय इंपोर्टेड दारूच्या बाटल्या....... मग त्यांची नजर कार्पेटकडे गेली. ते ओरडले, " नेटके कार्पेट गुंडाळा. पाहा खाली काय लपवलंय ते. कार्पेटखाली मारलेल्या फवाऱ्याने सुगंध येऊ लागला. पण खाली काही सापडलं नाही. त्यांना जराही संशय येणार नाही अशा रितीने खालच्या कोब्यावरचं डिझाइन त्यांच्याकडे पाहू लागलं. निराशेने आता त्यांनी सूर्यनारायणच्या दोन तीन कानफटात मारल्या. त्याचा गळा धरून म्हणाले, " बोल लवकर, लवकर बोल, माल कुठे आहे? खबरदार तुमच्यातलाच आहे. नाव सांगू?... सूर्यनारायणच्या तोंडावर उत्सुकता दाटली. मग त्यांनी नाव सांगितलं. " जी व न रा म "..... सूर्यनारायणला मेसेज आठवला. " जीवनराम बाहर है " गद्दार साला! सालेको उडाना पडेगा! तो मनातल्या मनात म्हणाला. तेवढ्यात इन्स्पे. श्रीकांत म्हणाले, " सर हा असा बोलणार नाही. याला कस्टडीत घेऊन बोलता करावा लागेल. मग मात्र मार खाणारा सूर्यनारायण त्यांच्याकडे पाहून म्हणाला, " अरे साब कायकू तकलीफ देता है? आपको गलत खबर मिली है. दिवाली को दो महिना बाकी है, मंगता है तो दिवाली एडवान्समे देगा और दिवालीके टाइम फिरसे दिवाली देगा, लेकीन फालतू का परेशान मत करना. आपून कंप्लेंट करेगा. " त्यावर चिडून एसीपी म्हणाले, " आम्हाला धमकी देतोस कारे ए...... (शिवी). " तरीपण त्यांनी विचार केला. त्याला म्हणाले, " आत्ता चाललोय, पण पुन्हा येईन ना तेव्हा तुला मुद्देमालासहित बांधून घेऊन जाईन, काय समजलास? " तो म्हणाला, " समझ गया साब. " मग केबिनमधल्या कार्पेटकडे पाहून ते म्हणाले, " साले, काय लॅव्हिशली राहतात लेकाचे, असलं कार्पेट आपण आपल्या आयुष्यात पाहणार नाही. त्यांनी विनाकारण एक शिवी हासडली. त्यावर इन्स्पे श्रीकांत म्हणाले, " सर निदान आपण त्याला ताब्यात तरी घेऊन जायला हवं होतं " त्यांना समजावीत ते म्हणाले, " पुढच्या वेळेला मी तुमची इच्छा पुरी करीन. सध्या मीडियाच्या हातात आपल्याला कोलित द्यायचंय का? चला आता. " मग ते सगळेच एकेक करून इकडे तिकडे संशयाने पाहत बाहेर पडले.........

दहा वाजून गेले होते. ते गेल्याची खात्री करून प्रथम सूर्यनारायणने दरवाजा लॉक केला. कपडे ठीकठाक केले. हॉलमधलं फर्निचर नीट केलं. पुस्तकं, परत घोडा घेऊन जागेवर लावली. आतली केबीन नीट लावली. सगळं करण्यात त्याचा तास भर गेला. मग तो स्वस्थ होऊन आपल्या मऊ खुर्चीत बसला. बाजूच्या भिंतीतलं बटण दाबून बाहेर आलेल्या खणातली व्हिस्की त्याने कच्ची च घेतली. तेव्हा कुठे त्याला जरा बरं वाटलं मग त्याने दादाला फोन लावला. " दादा बर्थ डे पार्टी हो गयी (म्हणजे रेड). काकाने पह्यले बोला था.... ". त्याने सगळी कथा त्याला सांगितली. त्यावर दादा म्हणाला " मेरी बात ध्यानसे सून. कल रात ठीक तीन बजे जग्याके पास पहुचाना. वो पीछे का पैसा भी देगा. इस टाइम काकाजीको खूष करना, मै बोलूंगा, समझा. " असं म्हणून फोन बंद झाला. सूर्यनारायणने काकांना फोन लावून नेहमीप्रमाणे यायला सांगितलं. आणि मग तो एकदम मराठीत बोलला, " वा, काय मस्त काम झालं. असं व्हायला पायजे. "


(क्र म शः)

🎭 Series Post

View all