कामथे काका (भाग ७)

नेहमी प्रमाणे काका ऑफिसला गेले....

नेहमीप्रमाणे ते ऑफिसला जायला निघाले. आज जरा लवकरच निघाले. त्यांची मानसिक अवस्था काल रात्रीच्या प्रसंगा पासून फार नाजुक झाली होती. ते कसेतरी ऑफिसला पोहचले. त्यांचं आज कामावर अजिबात लक्ष नव्हतं. किंबहुना त्यांचा आज मूडच नव्हता. पण घरी बसून काय करणार? म्हणून ते आले होते. त्यांच्या डोळ्यासमोरून पुष्पाचा चेहरा हालत नव्हता.......... पुष्पाचा फायदा सहज घेता आला असता. नाहीतरी ते रोहिणी गेल्यापासून बऱ्याच सुखांना पारखे झाले होते.


त्यात हे महत्त्वाचं सुख समोर उभं असतानाही त्यांना काही करता आलं नाही. मग काल रात्री आपण संयमाचं नाटक तरी का केलं? त्यांनी स्वतःला विचारलं. थोडक्यात आपल्यात निभावून नेण्याची ताकद नाही, हेच खरं. कितीतरी लोक विवाहबाह्य संबंध ठेवतातच की. त्यातून आपण तिच्याकडे गेलो नव्हतो. त्यांनी जिभल्या चाटणाऱ्या मनाच्या बाजूने विचार केला. मग मोह टाळताना होणाऱ्या यातनांना ते स्वतःच जबाबदार असल्याचं त्यांनी कबूल केलं. माणूस चांगुलपणाचं बंधन स्वतः च घालून घेतो असंही त्यांना वाटू लागलं. आपण रमेशशी एवढे चांगले वागतोय, काय मिळतंय आपल्याला?..... थोडक्यात त्यांना मोह टाळण्याचा पश्चात्ताप होत होता. अधून मधून मेसेज येत होते, ते निर्विकारपणे आत पाठवीत होते. मग त्यांना एकदम आठवलं. त्याने ते घाबरले...... पुष्पा काल रात्री धावत खाली गेली, ती घरी गेली असेल ना?..... आपण हा विचारच केला नाही. निदान सकाळी तरी थोडं थांबायला हवं होतं......... थांबून आपण काय करणार होतो? पुष्पाच्या घरी जाणं म्हणजे रात्रीच्या प्रसंगाचा बभ्रा करण्यासारखं होतं...... कदाचित...... कदाचित पुष्पा घरी गेली नसेल तर?.... मग कुठे जाणार होती ती?...... छे, छे. ती घरी गेली असलीच पाहिजे.... तिनी स्वतःचं काही "क रु न घे त लं " तर नसेल? अचानक त्यांना हलकासा घाम येत असल्याची जाणीव झाली. किती किती गोष्टींना आपण अप्रत्यक्षपणे जबाबदार राहणार आहोत. दिवस मुंगीच्या पावलाने सरकत होता. त्यांनी हातावरच्या घड्याळात पाहिले, जेमतेम साडे अकरा होत होते. सकाळपासून त्यांनी सात आठ वेळा तरी घड्याळात पाहिलं असेल. हे काटे आपण फिरवले तरी काळ पुढे जाणार नव्हता. सबंध दिवस अजून भुतासारखा एकट्याने काढायचा होता. नुसतं बसून बसून आता मऊ खुर्ची त्यांना काट्यांसारखी टोचू लागली होती. कपाळावर हात ठेवून त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला. रात्री नीट झोप न झाल्याने थोडी डुलकी त्यांना लागली. नाही म्हणायला बारा वाजून गेले. ते जागे झाले. पुन्हा एक दोन फोन आले. निरोपादाखल फक्त कोणीतरी आकडे सांगितले. ते स्वतःवरच चिडले. काय हे काम? मग एक वाजला. ते जेवायला म्हणून बाहेर पडले. जेवणावर त्यांची वासना नव्हती. अर्धवट जेवून ते उठले. नेहमीचा वेटर त्यांच्याकडे पाहात राहिला. त्यांनी त्याची पर्वा केली नाही. ते बाहेर आले, संत्र्याचा रस घेऊन परत ऑफिसमध्ये आले. वेळ चालला होता. आज त्यांनी आणलेला थर्मास मधला चहा सुद्धा घेतला नाही. चार वाजले. जांभया देऊन देऊन ते वेळ घालवू लागले. पाच वाजत आले. काकांचा पेशन्स आता संपला होता. त्यांनी आत फोन लावला आणि सूर्यनारायणला म्हणाले, " मुझे आज जरा जलदी जाना है. क्या करूं?....... " असं म्हणून त्यांनी प्रश्न अर्धवट ठेवला. जाऊ का असं विचारलं नाही, तो नाही म्हणाला असता तर?..... पण सूर्यनारायणने परवानगी दिली. ते निघाले. जाता जाता त्यांना रोहिणी गेली तो दिवस आठवला.

दोन कॉन्स्टेबल त्यांना घरी घेऊन आले होते. दुपारची वेळ होती. रोहिणीचं पार्थिव शरीर घरात ठेवलं होतं. चाळीतल्या त्या लहानशा जागेत पंधरा वीस नातेवाईक तरी आले होते. काही लोक खाली उभे होते. रमेश एकटाच थिजल्यासारखा रोहिणीजवळ बसून होता. पोलीस बाहेर थांबले होते. काकांनी प्रथम रमेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले होते, " बाळा, मी काय बोलणार? ती अशी जायला नको होती रे. थोडी थांबली असती तर बरं झालं असतं. " पण रमेशवर काहीच परिणाम झाला नाही. त्याचे डोळे कोरडे होते. रागाने त्याने त्याच्या खांद्यावरचा त्यांचा हात बाजूला काढला, आणि म्हणाला, " एक अक्षरही बोलू नका. तुमच्या मुळे ती गेली. तुम्ही तिला मारलीत...... माझ्या आईला मारलीत तुम्ही, समजलं? " आणि नंतर तो हुंदके देऊन रडू लागला. काका बघतच राहिले. आलेले सगळेच स्तंभित झाले होते. त्यावेळी शांततेचा भंग करीत शेजारी राहणारे देसाई आजोबा म्हणाले होते, " असं कुणी कुणालाही मारू शकत नाही. हे केवळ प्रारब्ध होतं तिचं. थोडं दुःख आवर. पुढचं सगळं तुलाच करायचंय ना? मग शांत राहा बरं. " असं म्हणून त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला होता. स्मशानात अग्नी दिला तेव्हा सुद्धा काका परक्या सारखे उभे होते. तेव्हापासून रमेशने त्यांना आयुष्यातून बाजूला काढलं होतं. रोहिणी गेल्याचा दोष त्यांनाच दिला गेला...... ते गल्लीच्या तोंडाशी आले. गल्लीत एक प्रकारची गढूळ शांतता होती. लोक गटा गटाने उभे राहून दबक्या आवाजात चर्चा करीत होते. मग पाटकराच्या खोलीपाशी त्यांना गर्दी दिसली आणि ते बावचळले. मग गर्दीतल्या एकाने त्यांना माहिती पुरवली. पुष्पाने काल रात्रीच जवळच कुठेशी विहीर होती ती जवळ केली होती....... म्हणजे काल रात्री ती गेली....... ती गेलीच.... कदाचित तिला पाहिजे तसे आपण वागलो असतो तरीही तिने आत्महत्या केलीच असती..... असती का? ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांना विचारांनी बांधून ठेवले. त्यांची बुद्धी चालेना. गर्दीतून वाटत काढीत रघुमल येताना त्यांना दिसला. तो त्यांच्याकडेच येत होता. "अरे काका, हे बग, काय जाला. साला साडेदस अग्यार वागे तो इसका बोडी किसी बच्चेने देखा. बादमे पुलीस आयी. (म्हणजे आपण ऑफिसला निघाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासातच सगळं झालं म्हणायचं. त्यांच्या मनात आलं. ) सब हुआ, पंचनामा हुआ. सब हुआ. बोडी अभी ताबेमे मिला. ये पागल थी ना इसलिये पुलिस ने जादा तकलीफ नही दी. " मग रघुमलने त्यांना दाखवलं. पुष्पाला खाली आणत होते. तिला तिरडीवर ठेवलं̱. घरात पाटकर आणि त्याची आई असे दोघेच राहात. थकल्यासारखा पाटकर खाली आला. त्याची नजर गर्दीत उभ्या असलेल्या काकांकडे गेली आणि तो त्यांच्या अंगावर धावून येत म्हणाला, "अरे हरामखोर माणसा, माझ्या मुलीचा बळी घेऊन तू पाहायला आलास काय?. खरं बोल, काल ती तुझयाकडे आली होती की नाही? " काकांना कळेना याला कसं कळलं? पण तो अंधारातही तीर मारीत असेल कोणी सांगावं. मग खालच्या आवाजात ते म्हणाले, " पाटकर सध्या तू दुःखात आहेस, म्हणून असं म्हणतोस. तिची शपथ घेऊन सांगतो ती नव्हती आली. " पाटकर चिडून म्हणाला, " अरे आता तिचीच शपथ घेणार तू, गेली ना ती? तू.... तू मारलीस तिला. मी पोलिसात तक्रार करणारच आहे..... " रघुमल मध्ये पडून म्हणाला, " अरे पाटकर, साला ती काकाकडे कशाला जाएल?. आता तिला मशान मदे, जलदी जलदी घेऊन चला. ये काका तो चीटी को भी नही मारेगा. कैसी बात करता है तू भी. ".......

अर्ध्या पाऊण तासातच यात्रा निघाली. काका घरी जाऊन कपडे बदलून आले. तिला पोचवून यायला त्यांना रात्रीचे आठ वाजले. त्यांच्या मनावर मळभ आलं. आता हा पाटकर खरच पोलिसात तक्रार करतो की काय?. मग त्यांनी विचार केला. करील तेव्हा पाहू. त्याच्याजवळ तरी पुरावा काय आहे? या सर्व प्रकारात नीता त्यांच्याशी एक अक्षरही बोलली नाही. ती त्यांच्याकडे संशयाने पाहात मात्र होती. काही काही कुत्री कशी तुमच्यावर भुंकत नाहीत, पण लक्ष ठेवून असतात तशी. रमेशही काही बोलला नाही. पाटकर आता एकटाच राहत होता. त्याने आईला गावी दुसऱ्या भावाकडे पाठवली. पुष्पाला जाऊन आता दोन महिने होत आले. अजून तरी पाटकरने तक्रार केली नव्हती. काका आता त्या बाबतीत बधीर झाले होते. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना अपराधीपणाची जाणीव होत होती. अप्रत्यक्षपणे आपण जबाबदार आहोत असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी विचार केला, आपण जरी तिच्या इच्छेप्रमाणे वागलो असतो तरी वेगळेच प्रश्न उभे राहिले असते, आणि ते जास्त तीव्र स्वरुपाचे असते. होतं ते बऱ्याकरताच होतं. आपल्या हातून निष्कारण पाप घडलं असतं. मग त्यांनी आपली चूक नाही याची खात्री पटवली आणि दैनंदिन आयुष्यात झोकून दिलं. परंतु पुष्पा मात्र मनात रोहिणीसारखी बसून राहिली. तसं अजून काही घडत नव्हतं. घडू नये अशीच त्यांची इच्छा होती. मात्र अधुनमधून ते नैराश्याने ग्रासले गेले. मन कोणाशीही उघड करता येत नव्हतं किंवा काही विरंगुळाही नव्हता. एक दिवस रमेश म्हणाला, " तुम्ही एखादा ग्रुप का जॉईन करत नाही? किंवा भजनाला वगैरे का जात नाही? " खरंतर त्यांना वेळच नव्हता. तरीही हळूहळू त्यांची बिल्डिगमधल्या अमराठी लोकांशी ओळख झाली. गंमत म्हणजे त्यांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल काही विचारलं नाही. काकांना बरं वाटलं. थोडेसे संपर्क वाढले, चार लोक त्यांना ओळखू लागले. हे चांगलं की वाईट त्यांना कळेना.

असाच पुन्हा एक दिवस सूर्यनारायण कामानिमित्त बाहेर गेला. तो चांगला दोन तीन तासांनी आला. त्या अवधीत काकांनी फ्रंट डोअर लॉक केलं. घोडा सरकवला. त्यावर उभं राहून त्यांनी एकदम वरच्या खणाच्या काचा सरकवल्या. एक पुस्तक उचलण्यासाठी त्यांनी आत हात घातला. एवढं मोठं पुस्तक जडच असणार, असं वाटून ते उचलायला गेले. पण ते इतकं हलकं होतं की बाहेर काढताना काचेच्या दरवाजाला लागून ते खाली आवाज करीत पडलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ते खाली उतरले. पडलेल्या पुस्तकाचा वरचा भाग झांकणासारखा उघडला गेला होता. पुस्तक नव्हतंच ते. पुस्तकाच्या आकाराचा, रंगाचा आणि डिझाईनचा एक पत्र्याचा डबा होता. त्याचं वरचं झाकण आतली स्प्रिंग दबल्याने उघडलं होतं. " म्हणजे असं आहे तर! " ते स्वतःशी मोठ्याने म्हणाले. ही पुस्तकं नाहीतच. मग त्यांनी जिथून पुस्तकं चालू होतात, त्याच्या जवळचा डबा बाहेर काढला. तो उघडायचा प्रयत्न केला. पण उघडला नाही. पण रिकामा होता. केवळ पुस्तकाच्या आकाराचे रिकामे डबे. डिझाइन एवढं बेमालूम होतं की वरच्या भागावर पानं असल्यासारख्या ओळी काढलेल्या होत्या. भरलेले असताना कोणी च हात लावला नसता. प्रत्येक डब्यावर सोनेरी अक्षरात "ऑल इंडिया रूल मॅन्युअल " वर्षासहित लिहिलेलं होतं. उघड्या डब्याचा वास त्यांनी घेऊन पाहिला, पण काहीच वास आला नाही. मग काही डबे तपासून त्यांनी ते रिकामे असल्याची खात्री करून घेतली आणि जागेवर ठेवले. ते खाली उतरले. घोडा जागेवर ठेवला. जागेवर बसून ते विचार करू लागले. आत काय माल असेल? जो किमती नक्कीच असणार. कॅमेऱ्याने त्यांची ही कृती पण टिपली असणार हे त्यांना लक्षात आलं. पण त्याची पर्वा केली नाही. माल काय होता हे शोधायलाच पाहिजे. कोणताच माग लागत नव्हता........


मध्येच कर्कशपणे फोन वाजला. पलीकडून आवाज आला. "तीनसो " आणि फोन बंद झाला. ते स्वतःशीच म्हणाले, " तीनसो " पण काय? मग त्यांना थोडासा संदर्भ लागल्यासारखा वाटला. तीनसो म्हणजे तीनशे डबे माल हवा असावा....... कदाचित पैशाचाही हिशोब असावा...... किंवा आणखीन काही...... ते केबिनमध्ये शिरले. सहज नजर फिरवून पाहिली. काही समजेना. त्यांची नजर स्क्रीन कडे गेली. बेल वाजली. दारावर सूर्यनारायण आल्याचे त्यांना दिसले. त्यांनी बाहेर येऊन दार उघडलं. का कोण जाणे पण सूर्यनारायण त्यांच्याकडे शोधक नजरेने पाहात होता. त्याला संशय आला असावा, असं त्यांना वाटलं. त्यांनी आलेला मेसेज त्याला दिला. निर्विकार चेहऱ्याने तो आत गेला. नंतर फोन सारखे येतच राहिले. दिवस तसा कामात गेला. संध्याकाळी ते घरी आले. आल्या आल्याच आज ते घरात शिरतात न शिरतात तोच रमेश त्यांच्या अंगावर ओरडला. " बाबा, हे तुम्ही काय चालवलंय? आत्ताच पाटकर येऊन धमकी देऊन गेला. खरं सांगा, जायच्या आदल्या रात्री पुष्पा आपल्याकडे आली होती की नाही? " त्यांना प्रथम पाटकरचा राग आला. मग त्यांनी विचार करून सांगितलं, "नाही!, अजिबात नाही! " खो टं बोलायचंच असं ठरवून ते ठासून म्हणाले, " अरे त्याच दिवशी पाटकरने खाली तमाशा केला. मी त्याला तेच उत्तर दिलंय. " रमेश तापून म्हणाला, " त्याला दिलेलं उत्तर नकोय मला. खरं काय ते सांगा. " मग ते खाली मान घालून म्हणाले, "सांगितलं ना एकदा, ती आली नव्हती. हेच खरं आहे. विश्वास ठेव, नाहीतर ठेवू नकोस. " रमेश आत गेला. ती चर्चा तेवढ्यावरच थांबली.

डिसेंबर उजाडला. साधारण थंडीसाठी मुंबईकरांनी स्वेटर बाहेर काढले. काका एक दिवस संध्याकाळी बाहेर पडत होते. जवळच्याच एका दुकानाबाहेर एक आठ दहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. अधून मधून ती सारखी "मम्मी, मम्मी "... ऽ असं ओरडायची. काकांना एकदम निलूची आठवण आली. एकदा केव्हातरी ते तिला घेऊन जत्रेला गेले होते. रोहिणी दोन चार दुकानं पुढे गेली होती. काका बरोबर असूनही निलूने रडून गोंधळ घातला होता. इथे तर ही मुलगी एकटीच होती. काका थांबले. तिला म्हणाले, " अगं तुझी मम्मी पुढे गेली असेल तर येईलच. चल शोधू या का आपण तिला? कुठे गेली तुला माहीत आहे का? " उत्तरादाखल ती म्हणाली, " नाही माहीत म्हणून तर ना! पण मी तुमच्याबरोबर नाही येणार. " त्यावर काका म्हणाले, " बरं असू दे हं! " आणि तिथेच थांबले. दुसऱ्या कोणी तिचा फायदा घेऊ नये म्हणून. मग त्या मुलीला तिची मम्मी दिसली असावी. म्हणून ती रस्ता ओलांडण्यासाठी धावत निघाली. रस्त्याला वाहनांची गर्दी होतीच. एका टॅक्सी खाली ती येणार असं दिसल्याबरोबर काका धावले आणि वेळेवर बाजूला खेचल्यामुळे ती वाचली. टॅक्सीवाला वैतागून म्हणाला, " स्साला बच्चीको सम्हालनेको आता नही तो पैदा कायकू करते हो? " असं म्हणून तो निघून गेला. तिला परत फुटपाथवर आणले तोवर तिची मम्मी जवळ आली. ती साधनाबेन होती...... बहुतेक साधनाबेन रस्त्याच्या पलीकडे गेली असावी. मुलगी साधनाबेनला बिलगली. काका म्हणाले, " अरे साधनाबेन तुम्ही? " ती हसून म्हणाली, " अहो केव्हातरी बाहेर पडावंच लागतं. आणि मला साधना म्हणा हो. बेन काय? मी गुजराथी नाही, चांगली मराठी आहे. तुम्ही इकडे कसे? " मग त्यांनी ते ऍडव्होकेट कटील कडे काम करतात असं सांगितलं. त्यावर ती म्हणाली, " काय सांगता? कटील फार मोठा माणूस आहे, असं ऐकलंय.... अं! ही माझी मुलगी सोनाली. " ती मुलीकडे पाहून म्हणाली, " काकांना हाय कर बेटा. " पण मुलीने तसं काहीच केलं नाही. तिचा मूड नसावा....... मग काका म्हणाले, " घरीच चाललो होतो. मध्येच ही एकटी दिसली. म्हणून थांबलो. आणि तुमची भेट झाली. कुठे राहता तुम्ही? "..... " मुंबई सेंट्रल.... तुम्ही परळला राहता ना? " ते "हो " म्हणाले. " या, आपण कॉफी घ्यायची का? " ते आशेने म्हणाले. तिची मुद्रा थोडी विचारमग्न झालेली पाहून ते म्हणाले, " म्हणजे तुमची हरकत नसेल तर. " ती म्हणाली, " सध्या घाईत आहे. पुन्हा कधी भेटलो ना की नक्कीच घेऊ., थांबा हं! " असं म्हणून तिने त्यांना स्वतःचे कार्ड दिले. आणि म्हणाली, " हे घ्या. माझा पत्ता आहेच. या एकदा घरी. "

 " हो, हो! येईन. निघा तुम्ही. मिस्टरांची येण्याची वेळ झाली असेल ना? " ते सहज म्हणाले. ती म्हणाली, " मिस्टर? अहो, मी एकटीच राहते. त्यांना जाऊन पाच एक वर्ष झाली. चला निघू मी? बस आली बहुतेक. असं म्हणून ती लगबगीने समोर येणारी बस पकडण्यासाठी गेली. तिने बस पकडेपर्यंत काका तिथेच उभे राहिले. तिच्या आकर्षक आकृतीकडे त्यांना पाहात राहावंस वाटलं. त्यांना ती परत रोहिणीसारख्या स्वभावाची वाटली. बस दिसेनाशी झाली तेव्हा ते निघाले........ जानेवारी महिना उजाडला. नवीन वर्षाची सुरुवात झाली. खास काही घडत नव्हतं. आयुष्य ठीक चालू होतं. मग ते एकदा एका बँकेत खातं उघडण्यासाठी गेले. सर्व अर्ज भरून झाल्यावर दुसऱ्या खातेदाराची ओळख पाहिजे असं तिथला अधिकारी म्हणाला. आता ओळख कोण देणार? काकांनी त्याला विचारलं, "समजा ओळख नसेल तर? "..... "खातं उघडता येणार नाही " तो तत्परतेने म्हणाला. ते घरी आले. रमेशला सांगण्यात अर्थच नव्हता. शेवटी त्यांनी रघुमलला विचारलं. तो त्यांच्याशी नीट बोलायचा. त्याच्या ओळखीने एकदाचं खातं उघडलं गेलं. सध्या जवळचे पैसे खर्च होऊनही त्यांच्याजवळ \"पन्नास पंचावन्न हजार होते. ते पैसे त्यांनी दहा दहाच्या हप्त्याने भरायचे ठरवले. एकदम एवढे पैसे कुठून आले असं कोणी विचारू नये असं त्यांना वाटलं.


मग एक दिवस ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांना किशा दादाचा फोन आला. "कैसा चल राहा है, काकाजी? दस मार्च ध्यानमे रखना, आ राहा हूं. सूर्याको भी बोला है...... पार्टी करेंगे. काम भी बहुत है, तयार रहना. "

फेब्रुवारी चालू झाला. आताशा काकांना घरात मुक्त प्रवेश झाला होता. कशामुळे ते त्यांना कळलं नाही. बहुतेक ते दर महिन्याला पैसे आणत होते म्हणूनही असेल. ते आजकाल श्रेयाला खेळवीत. पण रमेश किंवा नीता हरकत घेत नसत. सगळं स्वीकारलं गेलं असेल, असं त्यांना वाटू लागलं. त्यांना पण आता संध्याकाळी घरी जावंसं वाटायचं. कोणी नाही तरी श्रेया त्यांची वाट मात्र खरंच बघायची. अजून तिला बाहेर घेऊन जाण्याचं धैर्य होत नव्हतं. काही असलं तरी ते तिच्यासाठी चॉकलेटं फुगे, खेळणी वगैरे आणू लागले. फक्त अजून नीता बोलत नव्हती. आश्चर्य म्हणजे त्यांना सुटून आल्याला हळूहळू वर्ष होत होतं. परंतु एकही शब्द न बोलणारी घरात फक्त नीता होती. रमेश तिरकस का होईना, पण बोलायचा. श्रेयासुद्धा आता त्यांना चांगली ओळखू लागली होती. नीता अजूनही "हुप्प " होती. असं आपण काय घोडं मारलंय, की ही बोलायला पण तयार नाही? त्यांनी स्वतःला विचारलं. त्यांना वेगळीच शंका येत होती. असही असेल, की तिला बोलायचं असेलही. पण माणूस एकदा घेतलेली भूमिका पटकन सोडत नाही, कारण त्याला आपण हार मानतोय असं वाटत असावं. म्हणूनही ती भूमिका तो सोडत नसावा. नीताच्या बाबतीत तेच असावं. आपण बोललो तर इतके दिवस का बोललो नाही याचा संदर्भ केव्हातरी येईल, आणि आपली कुचंबणा होईल. नाही बोललो तर काही कारण नसताना आपण अढी धरली आहे हे आपल्याला माहीत आहे. विनाकारण अढी धरणाऱ्यांची अवस्था अशीच होते. काकांनी त्यांच्या दृष्टीने तिच्या वागण्याचं विश्लेषण केलं होतं. काही प्रमाणात ते बरोबर होतं. पण नीताला एवढं माहीत होतं की हा माणूस एकदा तुरुंगात जाऊन आलाय. त्यामुळे हा संबंध ठेवण्याच्या लायकीचा नाही, आणि तेच तिचं भांडवल होतं.

उगाचच आपल्या मुलीवर नको ते संस्कार व्हायचे. असल्या खुळचट कल्पना तिच्या मनात येत होत्या. काही झालं तरी तिला त्यांच्या संसारात त्यांच्यासारखं तिसरं माणूस आलेलं नको होतं. विनाकारण जपलेला ग्रह तिरस्कारच वाढवतो हेच खरं, पण तिला याची कल्पना नव्हती. कारण अशा माणसांचं तिरस्कार करणं हेच उद्दिष्ट असतं..... काकांची तब्येत आता बरी होती. तोंडावर थोडा सुखवस्तूपणा आलेला होता. आता त्यांचं आयुष्य पूर्वीइतकं अनिश्चित नव्हतं. निदान सध्यातरी शरीराला आणि मनाला मिळालेल्या स्थैर्यामुळे ते अंग धरू लागले. आजकाल ते बेताचं खात. स्थैर्याच्या समाधानाने त्यांचं पोट भरलेलं होतं. खंत आणि अभाव होता, तो फक्त "रोहिणीचा " आणि तिच्याकडून मिळणाऱ्या सुखाच्या सहवासाचा. त्यांना त्याचा एवढा नाद होता की कधी कधी त्यांची झोप चाळवली तर ती परत त्यांना येत नसे. पण त्याला इलाज नव्हता. रोहिणीसारखी स्त्री सापडल्याशिवाय काही खरं नाही, असं त्यांना सारखं वाटे. मग ते साधनाबेनचा विचार करू लागत. तिचं सभ्य वागणं त्यांना मनातून आवडू लागलं होतं. तशी ती त्यांना दोनदाच भेटली होती. पण सूर जुळायला नुसतं दिसणं सुद्धा कधी कधी पुरेसं असतं. माणूस कोणामध्ये लिप्त होईल काही सांगता येत नाही. हल्ली ते तिच्याबद्दलची स्वप्नं रंगवीत. त्यात दंग राहत. कधीकधी त्यांना दिवसासुद्धा ती रोहिणीच्या रूपाने आजूबाजूला फिरत असल्याचा त्यांना भास होई. पण त्यापुढे मात्र गाडी गेली नाही. त्यांनी तिच्या घरी जाण्याचा किंवा तिला फोन करण्याचा प्रयत्नही केला नाही.........

असो. नऊ मार्च उजाडला. उद्या दादा येणार. सूर्यनारानयणने त्यांना आत बोलावले आणि म्हणाला " काकाजी दादाके लिये कल रात को पार्टी करनी है. फॉकलँड रोड नाकेपे \"डिलाईट\" होटल है. वहॉ जाके अन्वर मियासे मिलिये. वो सब इंतजाम करेगा. उसको ये खानेकी लिस्ट दे दो. और ये पैसा. " असं म्हणून त्याने खणातून शंभराचं एक बंडल काढून दिलं. " जादा लगा तो बाद मे दे देंगे. पूरा कॅब्रे पार्टीका इंतजाम करने को बोलो. कमसे कम बीस पचीस लोग तो होगा. शायद पुलिस अफसर भी आयेगा.. आज आप यही काम करना. " काकांनी मान डोलवली. ते बाहेर पडले. हा भाग त्यांना फारसा माहीत नव्हता. त्यांनी टॅक्सीला हात केला. त्याला पत्ता सांगितला. तो काकांकडे पाहत राहिला. काकांसारखा चेहरा या भागात आणि अवेळी जाणारा वाटल्याने तो बघत राहिला. काका वैतागून म्हणाले, " अरे देखता क्या है? चल जलदी.....! " ते टॅक्सीत बसले. काकांना हा भाग नवीन असल्याने ते जाताना दोन्ही बाजूंनी बघत होते. शेवटी फॉकलँड रोड नाक्यावर ते पोहोचले. ड्रायव्हरने टॅक्सी बाजूला लावली, आणि म्हणाला, " ये राहा नाका. " ते उतरले. बाजूच्या सर्वच चाळी म्हणजे मोठाल्या वेश्यावस्ती होत्या. आता इथे कोणाला विचारणार? मग त्यांनी चारी रस्त्यांच्या तोंडाशी जाऊन पाहिलं. त्यांना एका ठिकाणी डिलाईट हॉटेलच्या नावाचा बोर्ड दिसला. ते एक "ए" ग्रेड हॉटेल होतं. आजूबाजूला तशी घाणच होती. बऱ्याच ठिकाणी निरनिराळ्या धातूंची दुकाने होती. एकूण वातावरण खालच्या पातळीचे होते. सकाळचे साडेबारा वाजले होते. हॉटेल थोडं आतल्या बाजूला होतं. त्याच्या बाजूचा रस्ता कामाठीपुऱ्यात जात होता. हॉटेलची निऑन पाटी मुख्य रस्त्यावर होती. चार पाच पायऱ्या चढून हॉटेलचा मुख्य दरवाजा होता. जो दुधी रंगाच्या काचेचा असल्याने आतलं काही दिसत नव्हतं. ती एक तीन मजली इमारत होती. बाहेरून हॉटेलला हिरवा रंग होता. बाजूला पानाची गादी होती. ती अशा ठिकाणी असतेच. दार ढकलून काका आत शिरले. तो हॉल म्हणजे परमिट रूम होती. बऱ्यापैकी गर्दी होती. एसी असल्याने काकांना जरा बरं वाटलं. प्रत्येक टेबलावर टांगलेला टेबल लॅंप सारखा दिवा असल्याने लोकांची तोंडं अर्धवट दिसत होती. मांसाहारी खाद्य पदार्थ आणि लीकर यांमुळे मसालेदार पण आंबूस असा मिश्र वास वातावरणात भरलेला होता. काही काही टेबलांभोवती बायकांना घेऊनही लोक बसले होते. बहुतेक जण पीत होते. एकटा माणूस नुसतं पिण्यासाठी अशा ठिकाणी येणार नाही, असं त्यांच्या मनात आलं. सगळीच टेबलं लाल रंगाच्या रेक्झिनने आच्छादलेली होती. खुर्च्याही लाल भडक रंगाच्या होत्या. काकांना हॉटेल फारसं आवडलं नाही. अतिखालच्या दर्जाच्या आणि अतिउच्च दर्जाच्या हॉटेल मध्ये साधारण माणूस "मिस फिट " ठरतो. त्याला दोन्हीकडे असुरक्षित वाटतं. ते इकडे तिकडे बघत होते. तेवढ्यात अंधारातून एक माणूस आला, काळसर, बुटका, टकला आणि फ्रेंच दाढी राखलेला. बेश कोट सूट घातलेला होता, पण काकांना त्याची खालची पातळी जाणवली. तो म्हणाला, " आईये जनाब, साथमे कितने लोग है? औरत साथ है? ( त्याने डोळा मारीत विचारले ).... तो बाजूमे रूम है, आप वाहा बैठ सकते है" काकांनी हलक्या आवाजात त्याला सांगितलं, "अन्वर मियासे मिलना है, किशा दादाने भेजा है. "त्यावर त्या वेटरने त्यांना खूण करून पाठोपाठ येण्यास सांगितलं. तो त्यांना हॉल मधून घेऊन गेला. एक कॉरिडॉर ओलांडून गेल्यावर आत मधल्या जिन्याने तो पहिल्या माळ्यावर गेला. एका केबिनच्या दरवाजा त्याने वाजवला, आणि तो आत शिरला. काका त्याच्यामागून आत गेले. एका टेबलामागे बसलेल्या माणसाला म्हणाला, " भाई, दादाके यहांसे आये है. " अन्वरभाईने त्यांना हाताने बसण्याची खूण केली. दरवाजा बंद झाला. खिडक्या बंद होत्या तरी रहदारीचा आवाज कमी येत नव्हता. अन्वरभाई बसलेल्या टेबलावर एक टेबल लॅंप होता. त्यामुळे बसलेल्या माणसाचा थोडा अंधारात आणि बराचसा उजेडात होता. तो एक अतिशय गोरा, उंच शरीरयष्टीचा, पण सडसडीत बांध्याचा माणूस होता. त्याने पांढरा कोट, पांढरी पँट घातली होती. कपाळावरचे केस दोन्ही बाजूंनी आत शिरलेले होते आणि मधल्या केसांचा कपाळावर लोंबणारा कोंबडा त्याच्या लांबट चेहऱ्याला शोभून दिसत होता. थंड चेहरा असलेल्या त्या माणसाचं नाव "अन्वर अली उस्मान अली हैदर " असं होतं. हे काकांना नंतर कळलं. लाल कुशन असलेल्या पांढऱ्या रंगाच्या खुर्चीवर काका बसले. ती सूर्य नारायणच्या खुर्चीसारखी होती. त्यांनी समोरच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या भुवया अतिशय गडद काळ्या पण कोरलेल्या होत्या.... फेशियल केल्याप्रमाणे. डोळे थोडे निळसट रंगाचे होते..... पण थंड होते कोणतीही गोष्ट त्याला गंभीरपणे करण्याची सवय असावी, असं दिसत होतं. बुबळाच्या बाजूचा पांढरा भाग एवढा पांढरा होता की त्यांना ते डोळे कृत्रिम वाटले. पातळ पण लांब बाकदार नाक, त्याखालची मुडपलेल्या ओठांची गुलाबी जिवणी, त्याच्या कावेबाज पणाची कल्पना देत होती. चेहऱ्यावर रेघेसारखी रेखलेली काळी कुळकुळीत दाढी हनुवटी मध्याजवळ दोन्ही बाजूंनी मिळत होती. त्याचा चेहरा मोंगलकालीन गुळगुळीत चित्रांमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींसारखा दिसत होता. सहा फुटाच्या आसपासची उंची त्याच्या सडसडीत शरीराला रुबाब आणत होती. तो तोंडात काहीतरी चघळत असावा. समोरच्या पेपरांतून डोके बाहेर काढीत त्याने गोड आवाजात विचारलं, " कैसे है दादा, कभी आनेवाला है? " काकाही आवाजात मार्दव आणत म्हणाले, " कल सुबे. " ओठाच्या कोपऱ्यातून हसत तो म्हणाला, " क्या हुक्म है दादाका? ".... "कल रात दादा पार्टी करना चाहते है. उसका इंतजाम अन्वरमिया करनेको बोला है. बीस पचीस लोग होगा और एखाद दुसरा पुलिस अफसर भी हो सकता है. कैब्रे का भी इंतजाम करनेको कहा है. " काकांनी त्याला ओळखलं नसल्याचं त्याने ओळखलं. मग तो म्हणाला, " दादाकी पार्टी कैब्रे के बिना होती नही है. मैही अन्वर हूं. जनाब फिक्रकी कोई बात नही. आनेसे पह्यले एक घंटा मुझे फोन करो. " असं म्हणून त्याने आपलं कार्ड त्यांच्याकडे सरकवलं. काकांनी मग त्याला जेवणाचा मेनू आणि शंभराचं बंडल दिलं. मेनुकार्ड एकदा डोळ्याखालून घालीत त्याने नोटांचं बंडल उजवीकडच्या खणात ठेवलं...... मग हातातलं काम बाजूला सरकवीत म्हणाला, " क्या पियेंगे आप? " असं म्हणून त्याने बाजूचे छोटेखानी कपाट उघडलं. त्यात वेगवेगळ्या आकर्षक आकाराच्या दारूच्या बाटल्या होत्या. त्याने एक लहान सोनेरी रंगाची दारू असलेली बाटली बाहेर काढली. पण काका म्हणाले, " मै नही पीता " आपल्या सुंदर आकारलेल्या भुवया थोड्या चढवून आणि ओठांचे कोपरे खाली वाकवून म्हणाला, " कमाल की बात है.! दादाभी क्या चुनचुनके आदमी लाते है. मतलब हमारा पाला आज किसी पंडीतसे पडा है क्या? " असं म्हणून तो हसला. आणि त्याचे कवळीत बसवल्यासारखे पांढरे स्वच्छ दात चमकले. "...... काका नम्रतेने हसले. काकांच्या मनात आलं, परमेश्वराला या माणसाला बाई बनवायचं होतं की काय, कोण जाणे. मग तोच म्हणाला, " ठीक है, आज आपके साथ हम भी ज्यूस पियेंगे. " त्याने मागे हात करून कुठलंसं बटण दाबलं. आत मघाचचाच वेटर डोकावला. त्याला "दो संतरा ज्यूस "अशी ऑर्डर देऊन, तो परत काकांकडे पाहून हसला. मग म्हणाला, " और कैसा चल राहा है? " काकांना लक्षात आलं, काहीतरी संभाषण करायचं म्हणून तो वोलत होता. काका त्याला काही उत्तर देण्याच्या आतच दार उघडलं. मघाचचाच वेटर आत आला. त्याने ज्यूसचे दोन जंबो ग्लास आणून ठेवले. तो गेल्यावर काका म्हणाले, " ठीक चल राहा है. " तो हसला मग त्या दोघांनी रसपान केलं........ काका उठले, त्याच्याशी हात मिळवत त्याची सुंदर छबी मनात घोळवत ते बाहेर पडले. खाली आल्यावर दारावर मगाच्याच वेटरने त्यांना अदबीने सलाम ठोकला. त्यांच्या लक्षात आलं, आता आपण किशा दादाचे "आदमी " झालो आहोत. अशा रितीने त्यांना या जगातली पदवी प्राप्त झाली. रस्त्यावर चकचकीत ऊन पडलं होतं. ही जेवणाची वेळ होती. थोड्याच दूरवर असलेल्या चाळींच्या खालच्या भागात या वेळेलाही मेक अपचा अतिरेक करून विक्षिप्त कपडे घातलेल्या वेश्या दिसल्या. त्यांना माणसाच्या लाचारीचं वाईट वाटलं.

त्यांनी फार वेळ न रेंगाळता टॅक्सी बोलावली. ते ऑफिसमध्ये पोचले तेव्हा दीड वाजत होता. केविनमध्ये जाऊन त्यांनी सूर्यनारायणला तपशीलवार माहिती दिली. तो खूश दिसला. मग ते लंचसाठी म्हणून बाहेर पडले. अडीच वाजता ते परत आले. आल्या आल्या सूर्यनारायणने त्यांना फोन करून सांगितलं की आज ते पाहिजे तरी लवकर जाऊ शकतात मात्र उद्या सकाळी त्यांनी लवकर यावं. काका बाहेर पडले. चार वाजत होते. दुकानं उघडी असली तरी गर्दी फार नव्हती. त्यांना श्रेयाकरिता कपडे बघायचे होते. पण त्यांनी नंतर येण्याचं ठरवलं. आता त्यांना वेळ होता आणि कुठेही जाता येत होतं. पण कोणाकडे जायचं?..... रोहिणी असती तर तिला बोलवून घेऊन ते बाहेर फिरले असते किंवा तिला आणि रमेशला घेऊन ते एखाद्या पिक्चरलाही गेले असते..... पण ही जर तर ची परिस्थिती झाली.. असं मनात येऊन ते अस्वस्थ झाले...... आता घरी जाऊन काय उपयोग? नीता बोलत नव्हतीच. मग त्यांना साधनाबेनची आठवण झाली. पण तीही कामावर असणार. तिला फोन करावा असा विचार त्यांनी केला. पण फार संबंध येत नसल्याने त्यांनी ती कल्पना बाद केली. चला! घरी जावं झालं! असा विचार करून ते घरी जायला वळले. बिल्डिंगमध्ये शिरताना त्यांना पाटकर दिसला. तो त्यांच्याकडे खोचून पाहत होता. पण काहीच बोलला नाही. ते खालच्या मानेने घरी गेले. नीताने दार उघडलं. तिच्या तोंडावरचं आश्चर्य पाहून ते म्हणाले, " आज जरा लवकर सुटलो. उद्या मात्र उशीर होईल. " त्यावर ती काहीच बोलली नाही. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण घरी यायला नको आहोत, हे त्यांना नेहमीच जाणवत आलं होतं. तसंच ते आजही जाणवलं. श्रेया आत झोपली असावी. त्यांनी आत जाऊन कपडे बदलले. आणि गॅलरीतल्या आरामखुर्चीत ते बसले. त्यांनी शांतपणे डोळे मिटले. त्यांच्या मनात आलं. आपण ह्या कामात स्वतःला झोकून दिलं, हे ठीक आहे का? नाही म्हटलं तरी दादाचे व्यवहार चोरटेच होते..... पण आपल्याला तरी कोण चांगलं काम देणार आहे? सगळा इतिहास कळल्यावर लोकं फायदा घेणारच. दादाचं काम सोडायला हरकत नाही, पण आपण फार पुढे आलो आहोत. तेवढं सोपं जाणार नाही...... मग एक लांब सुस्कारा टाकून ते म्हणाले, "आता शेवटपर्यंत आपल्याला त्याच्याच बरोबर बॅटिंग करावी लागेल. पैसाही चांगला मिळेल. कोणी सांगावं, एखादी जागाही घेता येईल..... " आणि.... आणि साधनाबेनशी संबंधही ठेवता येईल..... संबंध कशाला? जमल्यास लग्न सुद्धा करता येईल. खरंतर हा विचार तिला पाहिल्यावर प्रथम आलाच होता. पण तो वर आणायला ते भीत होते. निदान कोणीतरी हक्काचं माणूस ज्याच्याकरता कमावायचं, ते तरी असेल? मग त्यांनी मनातल्या मनात तरी खोटं न बोलण्याचं ठरवलं. एकट्याने दिवस काढणं किती कठीण आहे...... ते पुन्हा अस्वस्थ झाले. मग ते बराच वेळ साधनाबेनचा विचार कुरवाळू लागले. पण त्यांनी त्या विचारांवर स्वप्नं रंगवली नाहीत. असं केल्यावर गोष्टी स्वप्नातच राहतात असा त्यांचा अनुभव होता. ते मोठ्या कष्टाने थांबले. आज तसं काही विशेष घडलं नाही. पण रात्री त्यांनी डायरी मात्र श्रद्धेने लिहिली. रोहिणी पण त्यांना डायरी लिहायला सांगून थकली होती. पण आता त्यांना ते पटलं होतं आणि आवश्यक वाटलं. निदान डायरीत तरी मन मोकळं होत होतं.


दहा मार्च उजाडला. ते आज साडेनऊलाच ऑफिसमध्ये गेले. त्यांचे कपडेही बरे होते. सूर्यनारायणने काही पुष्पगुच्छ दादाच्या स्वागतासाठी आणले होते. एवढे गुच्छ पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मग एकेक नवीन माणूस ऑफिसमध्ये येऊ लागला. त्यातले महत्त्वाचे चार पाच जण होते. थोडक्यात ती "कोअर माणसं " होती. ते दादाचे अंतरंगिचे भक्त होते. सूर्यनारायणने त्यांना आत बोलावले. त्यांना वाटलं, बहुतेक दादाला आणायला तो बरोबर घेऊन जाणार असेल, किंवा त्यांनाच तो त्याला आणायला सांगेल. पण झालं वेगळंच. तो म्हणाला, " काकाजी, दादाको लानेको "हिरा जायेगा" हिरा, दादाच्या ड्रायव्हरचं नाव होतं. दहा वाजता दादाचा फोन आला. " साडेदस बजे बाहर आ राहा हूं. हिराको भेजना. "............

मध्यवर्ती तुरुंगातून दादाला बाहेर सोडण्यात आलं. त्याला मिळालेले कामाचे पैसे पाहून तो जेलर साहेबांकडे कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, " साला, ये पाच दस हजारसे क्या होगा? मै तो ये पैसे पर थूकता हूं. इतना पैसा तो मै बीएमसी के झाडूवालेको दिवालीका बक्षिश देता हूं. " जेलर साहेब म्हणाले, " किशा, हे तुझे कामाचे पैसे आहेत आमचं देण्याचं काम आहे. तू थुंकतोस, का त्याच्या बिड्या पितोस, आम्हाला काय करायचंय?.... नीघ आता आणि आत न येण्याची खबरदारी घे. " किशा निघाला, मेन गेटवरच्या हवालदाराने त्याला सलाम ठोकला. किशाने घेतलेले पैसे मोजण्याची तसदीही न घेता अर्धे अर्धे करून वॉर्डनला आणि गेटवरच्या हवालदाराला दिले, म्हणाला, " जा, बेटा ऐश कर. दादाके नामपे. तूभी क्या याद रखेगा. " त्यावर हवालदार परत सलाम ठोकत म्हणाला, " अब कभी आयेगा? ".... तशी किशा चिडून म्हणाला, " स्साला ये क्या मंदिर है, या मस्जिद है, बार बार आनेको? चूप बेवकूफ कहींका. " मग किशा बाहेर आला. त्याने पहिल्याने दोन्ही हात वर करून एकदा आळोखे पिळोखे दिले. समोर हिराला पाहून, त्याच्या पाठीवर हात मारीत म्हणाला, " कैसे हो दोस्त? " त्यावर सलाम करीत तो म्हणाला, " बस. आपकी मोहब्बत है दादा, चलिये ". आणि ते दोघे जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या "स्कॉर्पियो " कडे वळले.


किशा दादा, जेमतेम साडेपाच फूट उंचीचा सडसडीत पण सणसणीत बांध्याचा पंचेचाळिशीला पोचलेला जवान होता. चेहऱ्यावर एक प्रकारची बेपर्वाई होती. उलटे फिरवलेले केस, सध्या ते कमी होते, नाहीतर ते मानेपर्यंत रुळत असत. साधारणपणे भुवया खाली वळलेल्या असतात, पण किशाच्या भुवया नुसत्याच तिरक्या होत्या. परमेश्वरानं त्याच्या पुरते तरी भुंवईआख्यान तिथेच थांबवलेले होते. त्यावर पट्टीसारखं अरुंद कपाळ होतं. सापासारखे चपटे पिवळट डोळे त्याच्या थंड पणाची खूण दाखवीत होते. डोळे अधिक अरुंद असते तर तो चिनी वाटला असता. मोठे ओबड धोबड नाक, खाली मिशा मात्र तलवार कट होत्या. मोठाले काळे ओठ, आणि तोंडातले मोठे दात, तो सतत बडबड करणारा असणार, हे को णीही ओळखले असते. त्याच्या डाव्या कानाच्या पाळीचे भोक मात्र चांगलंच मोठं होतं. जणूकाही तांब्याचा भोकाचा पैसाच पाळीच्या जागी बसवलाय. त्यामुळे त्याला ओळखणं सोपं होतं. हे त्यालाही माहीत होतं. त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्याच्या विचारात तो होता........ त्याने अंगात निळा भडक सिल्कचा शर्ट घातला होता. खाली काळी पँट होती. असली रंगसंगती त्याच्यासारखा हीन पातळीचा माणूसच करू शकत होता. अर्थातच, त्याला त्याची पर्वा नव्हती. किशा रुबाबात गाडीत बसला. बरोबर काहीही सामान नसल्याने हात मोकळे होते. गाडी वेगात निघाली. बाहेरून येणारी हवा छातीत भरपूर भरून घेत तो बाहेर पाहत होता. पाच सहा वर्षात आजूबाजूला झालेले बदल तो टिपत होता. मुंबईत तसा बदल काहीच झाला नव्हता. मुंबई मात्र बऱ्याच लोकांना बदलण्याचं काम निष्ठेने करीत आली होती. जुन्या इमारती तशाच होत्या. फुटपाथवरचे लहान लहान धंदेवाले मात्र बदलले होते. त्याला ग्रँट रोड स्टेशनजवळ किशा तुरुंगात जाईपर्यंत उभा असणारा अंडा बुर्जीवाला त्याला दिसला नाही. आणखी काही सरबतवालेही नवीन होते. किशाने खिशातून सिगरेट काढली डॅशबोर्डवर ठेवलेल्या लायटरने ती शिलगावली. दोन तीन लांब कश मारले आणि त्याला अधिक बरं वाटलं. किशा ड्रायव्हरशी काही बोलणार, एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याचा रिंगटोन होता, ".... मेरी जिंदगी है तो पागल हवा, आज इधर कल उधर.... " त्याने फोन घेतला. तो सूर्यनारायणचा होता. "दादा, कहां हो? " किशा थोडा वैतागून म्हणाला, " अरे यार, समझ लो पहुच गया, इतना उताविल होनेके लिये, मै क्या दुल्हन हूं? ". त्याने फोन बंद केला. लवकरच गाडी कटीलच्या ऑफिसजवळ थांबली. बाहेर उतरणाऱ्या किशाला पाहून समोरच बसणारा म्हातारा ओरडला, " नमस्ते दादा! " त्याला पाहून दादा म्हणाला, " अरे बुढ्ढे, दुनिया बदल गयी, अब तक तू जिंदा है?, जब देखो साला सबको घूरता रहता है. " त्यावर तो शरमून म्हणाला, " बस, दादा जी राहा हूं तुम्हारे राजमे. "

ऑफिसच्या दाराजवळ जाऊन किशा उभा राहिला. दरवाजा उघडला गेला. सूर्यनारायणने किशाला सुगंधी फुलांचा मोठा हार घातला. बाजूला उभा राहून अदबीने म्हणाला, " आईये, दादा., वेलकम...... " किशा थेट केबीन मध्ये गेला. आत काका शिवाय सात आठ माणसं त्याच्या स्वागतासाठी उभी होती. काकांना आश्चर्य वाटलं, एका गुंडाच्या स्वागतासाठी ही माणसं जमली होती. आपल्याकडे कोणाचं स्वागत साजरं केलं जाईल, काही नेम नाही. कर्तबगारी वाईट असली तरी चालते. त्यामानाने आपलं आयुष्य अगदीच चाकोरीतलं जातं. जरी आपल्यामागे केस लागली नसती तरीही आपण अशा स्वागताचे धनी कधीच झालो नसतो. त्यांच्या मनाने कुरबुरीला सुरुवात केली. त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. किशा मऊ मऊ कार्पेटवरून चालत सूर्यनारायणच्या खुर्चीत बसला. कार्पेटच्या स्पर्शाने खूश झालेला किशा स्वतःशी म्हणाला, " बहोत दिनके बाद ये देख राहा हूं. आतल्या सात आठ माणसांना पाहून काकांच्या मनात आलं. हे दादाचे अंतरंगीचे भक्त दिसतात. एखाद्या संताचे कसे जवळचे भक्त असतात तसे. मग उभ्या असलेल्या काकांना पाहून गालातल्या गालात हसत तो म्हणाला, " क्यों काकाजी, कैसे है आपके मिजाज? " काका हसले. बाकी सगळ्या जणांनी एकेक करून दादाला नमस्कार सलाम केला. आणि पुष्पगुच्छ दिले. काकांनी ही एक गुच्छ दिला. नाही म्हटलं तरी किशा आता "नरक का राजा " होता. त्याचं स्वागत त्यांना करावंच लागणार होतं. काकांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून किशा म्हणाला, " अरे सूर्या, काकाजीको इन लोगोंकी पहेचान करवाई की नही? " तो काहीच बोलत नाही असं पाहून किशा म्हणाला, " तू तो साला कामचोर है. अब, मैं ही करा देता हूं. " मग एका कडे बोट करून म्हणाला, " काकाजी, ये है \"अकडा चेतन\". साला बहुत अखडता है, इसलिये उसका ये नामसे बुलाते है. " दुसऱ्याकडे बोट दाखवून म्हणाला, " ये है \"राजासाब\", राजाके माफिक दिखता है इसलिये,... ये है \"झमझम \" नामका झमझम, इसे खामोष रहने की आदत है, इसलिये. इसे पुलिसने पकडा ना तो पुलिस कामसे जाएगी, लेकीन ये कभी नही बोलेगा..... ये है \"मिस्चिफ\", अपना खास शूटर इससे तो हमको भी डर लगता है, इससे जरा दूरही रहना.... ये है \"नानुभाई\" साला शेअरबाजारमे \"शेर \" है इसलिये..... ये है \"जीवनदान\", उसको अपून \"दान \" करके पुकारता है, ये बहुरुपिया है. अपना एकदम खास खबरी है. पुलिसकी हर चाल से वाकिफ है..... और ये है \"निंजा\" औरतका दलाल, हमेशा अत्तर लगाके घूमता रहता है...... इन सबके चरित्रपर एक एक पिक्चर तो जरूर निकलेगी..... और भी एक दो जन है. अन्वर मियासे तू मिला है. उसको तो हम \"गुड्डी \" कहते है, देखने के बाद चूमनेको दिल करता है. "..... प्रत्येकाचे चेहरे पण खास होते.

ओळख झाली, दादा म्हणाला, " अरे सुर्या, सबके लिये ड्रिंक बनाओ. " त्याने आठ दहा ग्लास बनवले. प्रत्येकाला दिले. काकांनी घेतलं नाही. दादा म्हणाला, " सूर्या, इनके लिये ठंडा लेके आना. "..... का कोण जाणे, पण सूर्यनारायणला काका फारसे आवडत नसत. असा काकांनाही संशय होता. त्याने अनिच्छेनेच त्यांच्यासाठी थंड पेय आणलं. लवकरच, एकेक करून दादाला नमस्कार करीत सगळेच निघाले. रात्री डिलाईट मध्ये येण्याची दादाने आठवण दिली. "बाकी छोटे मोटे लोग तो आ जाएंगे " दादा सूर्यनारायणला म्हणाला, ".....


म्हणजे अजून बरीच \" पिलावळ \" आहे तर, काकांना वाटलं. पण ते काही बोलले नाहीत. दुपारी मग तिघांनी जवळच्याच हॉटेल मध्ये लंच घेतला. घासाघासाला दादा समाधानाने भरून जात होता. त्याला, आता आपण काहीतरी करू शकतो, याचं कौतुक जास्त होतं. आता धंदा वधारलाच पाहिजे, असं तो मनाशी म्हणाला. काकाला मुद्दाम आणलं होतं. सूर्या हल्ली डोईजड होत चालला होता. त्याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या. पैशाचा हिशोबही तो नीट ठेवत नव्हता. प्रत्येक व्यवहारात त्याला स्वतःचा "क ट " हवा असायचा. दादा आत गेल्यापासून सूर्या जरा जास्तच शेफारला होता. त्याची बदली (रिप्लेसमेंट) करायलाच हवी असं दादाला वाटू लागलं. नेमके काका त्याच्या संपर्कात आले होते. आत असताना काकांचं वागणं त्याने पाहिलं होतं. शेवटी शिकलेला माणूस आहे नक्कीच काम नीट करील. लंच नंतर दादाने दोघांना घेऊन ऑफिसची पाहणी केली. काका बाहेर बसले होते. सूर्या आणि दादा आत धंद्याच्या एकूण परिस्थिती बाबत बोलत होते. तेवढ्यात सूर्यनारायणने त्याला काकांनी त्याच्या गैरहजेरीत ऑफिसची तपासणी केल्याची सीडी दाखवली. आणि म्हणाला, " मेरे ख्याल मे ये काका अपने धंदे के लायक नही है, वो जहांसे आया है वही फेक दो. " दादाच्या लक्षात आलं. तो सूर्याला म्हणाला, " फेकना तो पडेगा..... " मनात म्हणाला \" उसे नही तुझे. \"..... दादा काहीच बोलत नाही असं पाहून आपलं म्हणणं दादाला पटलं असल्याचं त्याला वाटलं........ तो संवाद मग तिथेच थांबला.

ऑफिसमधला फोन सारखा वाजत होता. किशासाठी अभिनंदनाचे फोन येत होते. आज मात्र काका फोन घेऊन आत पाठवायला कंटाळले होते. त्यांनी अन्वरमियाला फोन करण्याची दादाला आठवण दिली. त्यांना वाटलं, दादा आपल्यालाच फोन करायला सांगेल, पण तसं झालं नाही. दादाने स्वतःच अन्वर मियाला फोन केला. " अरे गुड्डी, दादा बोलता हूं. " अन्वरने घाईघाईने त्याला सलाम म्हटला. " कैसी है तबियत ". दादाने त्याला पार्टीमध्ये तीस पस्तीस माणसं येतील असं सांगितलं आणि फोन बंद केला.

(क्र म शः)

🎭 Series Post

View all