Login

कामथे काका

"कामथे काका" हे केवळ इतर कोणत्याही नावासारखे प्रातिनिधिक नाव आहे. वास्तवाशी या नावाचा व कथेचा काहीही संबंध नाही. तो आढळल्यास केवळ योगायोग समजावा. लेखक त्यास जबाबदार नाही. ही कथा मनोगत या संकेतस्थळावर प्रथम लिहीली. नंतर मायबोली या संकेतस्थळावर प्रकाशित झाली. त्यालाही तीन-चार वर्षं उलटली. या कथेतील काका हे सामान्य माणूस असून सरकारी नोकरीतून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे तुरुंगात गेले आणि बडतर्फ झाले. पुढे त्यांचं आयुष्य कसं गेलं ते यात दाखवलं आहे.

सकाळची दहा साडेदहाची वेळ होती. मध्यवर्ती तुरुंगाच्या बाहेर आज थोडीशी गर्दी होती. म्हणजे दहा पाच माणसं. जवळून जाणारा लहानसा रस्ता मुंबईला जाणाऱ्या हमरस्त्याला मिळायचा. दिवस उन्हाळ्याचे होते. सूर्य नारायण प्रसन्न होते. आपली पॉवरबाज किरणं पृथ्वीवर टाकून स्वतःच्या अस्तित्वाची ते जाणीव करून देत होते. मुख्य गेटच्या बाहेरची गर्दी सकाळी आठ पासूनच होती. आज काही कैद्यांच्या सुटकेचा दिवस होता. नेमकी गांधी जयंती होती. कुणाची बायको पोरांसहीत आपल्या नवऱ्यासाठी आली होती, तर कुणाची बहीण, तर कुणाचे मित्र व नातेवाईक, आपल्या माणसाच्या सुटकेसाठी आले होते. काही वर्षांपासून बिचाऱ्यांनी वाट पाह्यलेली होती......... अचानक, मुख्य दरवाजा उघडला गेला. आतून तीन चार कैदी आपापले सामान घेऊन बाहेर आले. बाहेरील माणसांशी त्यांची गळाभेट झाली. डोळ्यातले आनंदाश्रू लपवता लपवता बाया माणसांची पुरेवाट झाली. एकूण बाहेर आनंदाचे, निदान स्वागताचे तरी वातावरण होते. नंतर आणखीन एक कैदी बाहेर आले. चार वर्षांचा कारावास भोगून त्यांनी आज बाहेर पाऊल ठेवलं होतं. त्यांना न्यायला किंवा भेटायला मात्र कोणीही आलेलं नव्हतं. त्यांचं नाव होतं........... " का म थे का का ".

साधारण छप्पन सत्तावन वर्षांच वय. ओढलेला सुकलेला चेहेरा. डोळ्यांवर जाड आणि गोल भिंगाचा, लाल काड्यांचा चष्मा त्यांच्या जरा फुगीर नाकावर घट्ट बसलेला होता. त्यांनी भुवया आक्रसून बाहेरच्या जगाकडे पाह्यलं. मग चेहेरा पुसायचा म्हणून त्यांनी चष्मा काढला आणि जुनाट मळकट रुमालाने तो पुसला. जणूकाही चार वर्षांचा काळ त्यानी झटकन पुसून टाकला. डोक्यावरचे केस पांढरे होतेच. पण डोक्याच्या मध्यापासून ते मागेपर्यंत टकलाचा एक लहानसा पट्टाच तयार झाला होता. काकांचा मुळचा चेहेरा चांगला भरलेला आणि रुंद होता. गेल्या दहा वर्षातल्या दगदगीने इतका ओढला गेला होता की तो ओळखीचा माणूसही चटकन ओळखू शकला नसता. अंगावर तेच जुने चार वर्षांपूर्वीचे कपडे होते. एक साधारणसा हलक्या निळसर रंगाचा ओपन शर्ट आणि काळी पँट. डाव्या हातातली पिशवी सांभाळत त्यांनी पुन्हा एकदा चष्मा चढवला. कपाळावरचा घाम पुशीत ते जरा थांबले. त्यांनी एकदा आलेल्या माणसांवर नजर फिरवली. अर्थातच रमेशच्या येण्याची त्यांना अपेक्षा नव्हतीच. नाही म्हंटलं तरी निराशा आलीच. आता त्यांना प्रश्न होता, जायचं कुठे?.... रोहिणी तर ते तुरुंगात गेल्या गेल्याच काही दिवसात गेली होती. आता घरी रमेश, त्यांचा मुलगा, त्याची बायको नीता आणि दीड एक वर्षाची श्रेया एवढीच माणसं होती. त्याना रोहिणी च्या आठवणीने गलबलून आलं. त्यांची बाजू घेणारी, त्यांना निर्दोष मानणारी, त्यांची काळजी घेणारी रोहिणी आता हयात न्व्हती. काकांनी भावना दाबल्या. अश्रू आवरले....... निदान निलूनी तरी यायला हवं होतं. आपुलकीनं चौकशी करायला हवी होती. आपल्याला किती त्रास झाला तिला सांगता आलं असतं. आतला एकाकीपणा, जगापासून दूर राहणं आणि त्यामुळे आलेला कडवटपणा तरी तिला सांगता आला असता. पण आजकालच्या मुलांना माया नसते हेच खरं.
निलू त्यांची एकुलती एक मुलगी अमरावतीला होती. ती येऊ शकत नाही हे त्यांनाही माहित होतं. पण माया वेडी असते. त्यांना कोणाजवळ तरी जाऊन मन मोकळं करायचं होतं. त्यांच्या मनात आलं. जावयाचं ठीक आहे. पण मुलींना बापाबद्दल माया असते असं त्यांनी वाचलही होतं आणि पाह्यलंही होतं. पण त्यांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. जवळ जवळ पाच सात मिनिटं झाली. काका गेट जवळच उभे होते. आतल्या हवालदाराने विचारलं, " काय काका, कोणी आलं न्हाई का न्यायाला? " त्यांना तुरुंगात पण काकाच म्हणत. ते आत आले त्या दिवशी भेदरलेल्या मनस्थितीत होते. त्यांना पाहून अट्टल चोर दरोडेखोर, किशा दादा त्याचे पाय दाबित बसलेल्या जेबकतऱ्याला म्हणाला " अरे ए, बघ बघ, अस्सल वरण भात आलाय. " मग त्यांच्याकडे वळून तो म्हणाला, " खाया नही पिया नही गलास त्वोडा बारा आना. किती मुक्काम? " मग जेलर ओरडला. "किशा थोबडा बंद कर. चारच वर्षासाठी आलाय. तुझ्यासारखा वारकरी नाही. " काकांचं मन शब्दा शब्दाला भूतकाळ पूढे आणू लागलं. भानावर येत काका गेटावरच्या हवालदाराला म्हणाले, " अरे बाबा, मी काय तीर्थयात्रा करून थोडाच आलोय, की माझं दर्शन घ्यायला आणि अशिर्वाद घ्यायला कोणी येईल?...... चालायचच, " असं म्हणत जड आणि थंड पावलं टाकित ते रस्त्यावरून चालू लागले. घरी गेल्यावर रमेश काय म्हणेल? आज तो घरीच असणार. दोन ऑक्टोबर म्हणजे "गांधी जयंती ". खरतर आज तुरुंगात जरा वेगळं. जेवण असतं. बाहेरून मिठाई येते. रमेश घरी असणार या विचारानी त्याना बरं वाटलं. निदान, त्याची बायको, चिमुरडी श्रेया पण दिसेल? कोणासारखी दिसत असेल बरं? रोहिणीसारखी?, त्याच्यासारखी? की माझ्यासारखी? मग त्यांची मान मनातल्या मनात खाली गेली आणि स्वतःशीच म्हणाले, " माझ्यासारखी कशाला? अपशकुनी, आपल्यात घेण्यासारखं काय आहे? " ते आत असतानाच रमेशचं लग्न झालं. त्यांची लग्नाला जाण्याची इच्छा पण होती. जेलरनी एक दिवसाची रजा पण मंजूर केली होती........ मुसलमान असूनही. सहृदय गृहस्थ होते ते. काकांची केस त्यांना माहिती होती. पण लग्ना आधी दोन दिवस तो त्यांना भेटायला आला. त्यांना वाटलं आग्रहाचं बोलावण बापाला करायलाच हवं या भावनेनी तो आलाय. पण भेटण्याच्या रुम मध्ये बसलेला रमेशने त्यांनी लग्नाला न यावं हे सांगायला आला होता. तो म्हणाला, " आई नाहीच आहे. तुम्ही येऊन निष्कारण कार्याची शोभा वाढवू नका. सासुरवाडच्या लोकांना थोडी फार कल्पना दिलेली आहे. ते तयार झालेले आहेत. त्यात खोडा घालू नका. " बस. एवढीच वाक्य. पण किती तटस्थ होती.... तो त्यांना पुढे काही बोलायला न देताच जायला वळला देखील.

त्यादिवशी रात्री काका अंथरूणावर पडल्या पडल्या किती रडले होते. हे फक्त त्यांना आणि जेलर साहेबांनाच ठाऊक. कारण राउंडवर असलेले जेलर साहेब रडण्याचा आवाज ऐकून जवळ आले होते. पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले होते, " अरे आयुष्य असच असतं, जीव ज्याच्यावर लावा आणि अपेक्षा करावी तोच नेहेमी फिरतो. रडू नकोस काही उपयोग व्हायचा नाही. " मग ते थांबले. खरच रडून उपयोग नाही. भावनाना वाट वगैरे कथा, कादंबऱ्यांमध्येच ठीक असतं. काका समजायला लागेपर्यंत जे काही रडले असतील तेवढेच. मग लक्षात आलं की रडणं हे नामर्द पणाचं लक्षण समजतात. आई वडील गेले तेव्हाही ते रडले नाहीत. उलट त्यांची बायको रोहिणी मात्र रडत होती. तिचं त्यांनीच सांत्वन केल होतं. तिचं मात्र कौतुक झालं, "सासू सासऱ्यांसाठी रडणारी सून" म्हणून. असो. कोणी येणार नाही याची खात्री झाल्याने म्हणा किंवा दुसरं कुठे जाणार, ही लाचारी असल्याने म्हणा, ते विचारांच्या वादळातून बाहेर येऊन, त्यांनी बस स्टॉप शोधला. त्यांना परळला जायचं होतं. बस आली. ते बस मध्ये चढले. तिकिटासाठी पैसे देण्याकरता खिशात हात घातला आणि एक घडी घातलेला कागद चुकून खाली पडला. कंडक्टर म्हणाला, " काका, असे कागद खाली पाडू नका, महत्त्वाचा असला तर पंचाईत होईल. " त्याने वाकून तो कागद त्यांच्या हातात दिला. त्यांना जरा बरं वाटलं. निदान कोणीतरी आपल्याशी नीट बोललय.... ̱ घडी घातलेला कागद म्हणजे त्यांची तुरुंगातून सुटल्याची रिलीव्ह ऑर्डर होती. हा कागद सांभाळून काय करायचाय? त्यांच्या मनात आलं. त्यांनी अहेतुक पणे तो उलगडला. त्यात त्यांचं पूर्ण नाव होतं.........

"रामचंद्र भास्कर कामथे वय ५७, राहणार,........... त्यात त्यांचा परळचा पत्ता होता. आजची तारीख... वेळ..... कंसात मध्यान्ह पूर्व असं लिहिलेलं होतं....... यांना मध्यवर्ती तुरुंगातून..... सोडण्यात येत आहे. त्यात त्यांच्या जवळच्या वस्तूंची यादी होती. ज्या त्यांना परत दिल्याचे व त्यांचे तुरुंगातिल कामाचे पैसे दिलयाचे ही लिहिले होते. त्यांचच संपूर्ण नाव मोठ्या आवाजात घुमलं. असच नाव त्यांना शिक्षा ठोठावताना कोर्टात घुमलं होतं. काका व्यथित झाले. त्यांच्या मनात आलं. हे प्रशस्तिपत्र की सुटकेची परवानगी? त्यांनी घाईघाईने चोरासारखा तो कागद घडी घालून खिशात ठेवला. आणि बाजूच्या प्रवाशाकडे पाह्यलं. त्यांच्या मनात आलं. त्याने वाचला तर नसेल? त्याला काय वाटलं असेल? एक कैदी त्याच्या जवळ बसलाय. पण बाजूच्या प्रवाशाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. तो खिडकीतून बाहेर बघत होता. मग काकांना त्याचा विनाकारण राग आला. मनात म्हणाले, " डांबरट लेकाचा. पाहूनच्या पाहून आणखीन खिडकीतून बाहेर पाहतोय. " बस धावत होती. शेवटी परळ आलं. सगळ्यांबरोबर काका स्टॉपवर उतरले.......

बस परळ स्टेशन जवळ थांबली. स्टेशनच्या समोरच एक लहानसा गल्लीवजा रस्ता जात होता. काका त्याच्या तोंडाशी आले आणि थबकले. गल्लीचं तोंड लहान असलं तरी ती आत मध्ये रुंद होत होत एका मोठ्या रस्त्याला मिळाली होती. काकांनी इकडे तिकडे पाह्यलं. चार वर्षापूर्वी ते सोडून आले होते त्या वातावरणात बराच बदल झाला होता. खरंतर काकांना आपण त्याच गल्लीच्या तोंडाशी उभे आहोत की नाही याची शंका वाटली. पण कोपऱ्यावरच्या रघुमल किराणा स्टोअर्स आणि सलीम टेलर्स च्या दुकानामुळे त्यांची खात्री झाली. रघुमल सामानी त्यांना एकटाच दोन चार वेळा आत असताना भेटायला आला होता. त्याच्याकडूनच त्यांना घरच्या गोष्टी समजल्या होत्या. रमेश, त्याची बायको आणि त्याची मुलगी यांची जुजबी माहिती त्यांना मिळाली होती. आणि आपल्या चाळीला चांगला बिल्डर मिळाला असून लवकरच एक सात मजली टॉवर तिथे उभा राहणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. अर्थातच बिल्डिंग पूर्ण होऊन काही महिने झाल्याने उरली सुरली कामं चालू होती. रघुमल आणि सलीम यांना त्यातच दुकानाचा गाळा मिळाला होता. मग त्यांना एकदम आठवलं ते आत गेले.

त्या दिवसा नंतर दोन चार महिन्यातच रोहिणी गेली होती. तिला धक्का सहन झाला नव्हता. निकाल लागल्या नंतर ती त्यांना म्हणाली होती, " देवाच्या दरबारी न्याय नाही. मी आता देवाची पुजा करणार नाही, फार काय पण देव कपाटात ठेवून देईन" त्यावर त्यांनी तिला समजावलं होतं. ते म्हणाले होते, "अगं हे सगळं त्याच्या इच्छेनंच तर चालतं. म्हणून त्याच्यावर रागावून कसं चालेल? " त्यावेळी त्यांना "देवावरी का रुसावे, देव ठेवील तैसे राहावे " हा अभंग आठवला होता, पण तिला ते सांगण्याचं त्यांना धैर्य झालं नव्हतं. रोहिणी एक दोन वेळ त्यांना भेटायला आली होती. जेव्हा जेव्हा आली तेव्हा तेव्हा रडण्याशिवाय फारसं बोलणं असं तिचं होत नसे. उगाच तिला त्रास नको म्हणून मग काकांनीच तिला न येण्याचं सांगितलं. ती आली नाही पण त्यांच्या आयुष्यातून कायमचीच गेली. तेव्हा एका दिवसासाठी त्यांना हवालदार घरी घेऊन आला होता. ती गेली तो दिवस त्यांनी अक्षरशः उपवास केला. त्यांना आपला आधार गेल्यासारखंच वाटलं. जामीन न मिळाल्याने काकांना थेट कोर्टातूनच तुरुंगात जावं लागलं होतं. रोहिणीनं तर शिक्षा ऐकल्यावर डोळेच मिटले होते. नंतर काकांना पोलीस घेऊन जाईपर्यंत ती डोळे पुसत बसली होती. काकांना निकालाचा दिवस आठवला. वकिलांचे वाद विवाद संपले होते. निकालाच्या दिवसापर्यंत काकांना जामीन मिळाला नव्हता. रमेशला विचारलं तर तो म्हणाला, " मी आताच नोकरीला लागलोय, त्यात भानगड कशाला?, मला जमणार नाही. " मग त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला विचारलं, तो बायकोला विचारून सांगतो म्हणाला. पण त्याने काहीच सांगितलं नाही.

काका काय समजायचं ते समजले. असच ओळखीच्या एक दोघांना त्यांनी विचारलं. समजावलंही होतं, की हा जामीन म्हणजे फक्त व्यक्तिगत असतो, यात दिलेल्या रकमे एवढीच रक्कम भरावी लागते. त्यात फार मोठी कर्जासारखी रक्कम वसूल करणार नाहीत. आणि मी काही कुठे पळून जाणार नाही, कारण मी काही गुन्हेगार नाही. तुम्ही घाबरू नका. पण छे, ते कुणालाच पटत नव्हतं. सगळ्यांचं म्हणणं एकच. "कोणत्याही कारणास्तव कोर्टाची पायरी आम्ही चढणार नाही. ते पोलीस, न्यायाधीश, वकील या लोकांची आम्हाला भीती वाटते. आमचं आपलं साधारण आयुष्या आहे तेच बरं आहे. तर काहींनी घरी विचारून कळवतो, वगैरे सबबी दिल्या. शेवटी काकांना लक्षात आलं, आपण तरी आपल्याला शिक्षा होईल, हे धरूनच का चाललोय?.... कदाचित..... कदाचित आपण निर्दोष सुटूही. पण त्यांना शंकाच वाटली. त्यांनी वकिलांना सांगितलं तर ते म्हणाले, "बघा बुवा, तुम्हाला शिक्षा झाली तर घरी जाता येणार नाही. थेट तुरुंगात जावं लागेल. हे असच असतं. साधारण माणसांचं सर्कल साधारण माणसांचं असतं, आणि साधारण माणसं घाबरट असतात. त्यामुळे त्यांना जामीन मिळत नाही. पाहा काय ते....... " ते बोलणं तेवढ्यावरच राहिलं. मग थोड्यावेळानं ते हळू आवाजात म्हणाले, " याचेही दलाल असतात. ते जामीन राहतात. त्यांचा धंदाच असतो. काही कमिशन घेतात असं ऐकलंय. पाहा असं कोणी मिळतंय का ते. म्हणजे त्याला थोडे पैसे देऊन तुमचं काम होईल. " मग ते घरी आले होते. त्यांना कोणीतरी "विश्वनाथ शेट्टीचं " नाव सांगितलं.......

तो एक कुप्रसिद्ध भाईच होता. गल्लीच्या दुसऱ्या तोंडाला लागून असलेल्या मेन रोडवर त्याचं दारूचं दुकान होतं. मग ते रात्री त्याला जाऊन भेटले. तो म्हणाला होता, " अरे इतना घबरता कायकू है? तुमने किसीका खून तो नही किया ना? एक काम कर तू पचास हजार रुपैया लेकर कल सुबे आठ बजे आना. मै डायरेक्ट अदालत मे डॉक्युमेट लेके पहुच जाता हूं. " काकांना विचारात पडलेले पाहून तो पुढे म्हणाला, " अपने मुहल्लेमे रहता है इसलिये पचास हजार बोला, दुसरेके लिये अपून एक लाख के नीचे काम नही करता है. समझा., तुम साला मिडलक्लासका लोग ऐसाही होता है, एक तो गलती करता है और बादमे रोता फिरता है. हमेशा गुन्हा करनेका, गलती कभी नही करना, कमसे कम कुछ गुन्हा किया है इसलिये, सजा भुगतनेमे बूरा तो नही लगता है ना? समझा क्या? " त्याचं हे तर्कट काकांच्या गळी उतरेना....... काकांना सगळं जग आपल्या विरुद्ध कट करीत असल्याचा भास होत होता. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. रोहिणी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवीत बसली होती. त्यात त्यांना ते निर्दोष सुटल्याचं स्वप्न पडलं होतं. थोडा वेल का होईना ती दोघं आनंदून गेली. त्यांनी रोहिणीला मिठी मारली होती.......... मग कशीतरी तास दोन तास झोप लागली. पन्नास हजार कसले? काकांना दोन हजाराचीही सोय करणं शक्य नव्हतं. ते आणि रोहिणी तसेच जळजळत्या डोळ्यांनी कोर्टात गेले होते........

सकाळीच निकालपत्र डिक्टेट करण्यास जज साहेबांनी सुरुवात केली होती. सुरुवाती सुरुवातीला ते सुटणार असं वाटू लागलं. पण अचानक पारडं फिरलं. ते दोषी असल्याचा कोर्टाने निकाल दिला. त्यांच्या बरोबरच ज्या शिपायाने नोटा उचलल्या होत्या त्यालाही शिक्षा झाली होती. बसलेले, एसीपी माटे, इतर पोलिस इन्स्पेक्टर्स आणि एसीबीचे अधिकारी आनंदित झाले. नंतर काकांना जज साहेबांनी पिंजऱ्यात बोलावलं. काका कठड्याला धरून थरथरत, श्वास रोखून उभे राहिले होते. त्यांची छाती धडधडत होती. त्यांच्या मनात आलं, नुसताच दंड झाला तरी कसातरी तो भरून मोकळे होऊ. पण जज साहेब म्हणाले, " मि. कामथे तुमच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झालेले आहेत. मग त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांखालची वेगवेगळी शिक्षा सांगितली. त्यातली जास्तीत जास्त शिक्षा चार वर्षांची असल्याने ती भोगावी लागेल, असे सांगितले. आणि शेवटी ते म्हणाले, " तेव्हा, रामचंद्र भास्कर कामथे, तुम्ही दोषी आहात, म्हणून हे कोर्ट तुम्हाला चार वर्षांची शिक्षा ठोठावीत आहे. तसंच आपण साठ दिवसांच्या आत या आदेशाविरुद्ध अपील करू शकता. व त्या साठी आपणास दीड लाख रुपयांचा जामीन हे कोर्ट मंजूर करीत आहे. "

निर्णय ऐकल्यावर काकांचे वकील उभे राहिले. म्हणाले, " युवर ऑनर, आमचे अशील हे साधारण आर्थिक परिस्थिती असलेले संसारी गृहस्थ आहेत व त्यांच्याशिवाय घरी कमावणारं कोणी नाही. तेव्हा मी अशी विनंती करतो की त्यांची शिक्षा दोन वर्षांवर आणावी आणि उपकृत करावे. " त्यावर कोर्ट म्हणालं, " जी शिक्षा दिलेली आहे ती त्यांचं वय, आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची प्रत पाहूनच दिलेली आहे. नाहीतर त्यांना सक्त मजुरी आणि दंडाचीही शिक्षा दिली असती. हे तुम्ही लक्षात घ्या. यावर आपल्याला काही म्हणायचं आहे का? "....... ते ऐकल्यावर वकील साहेब फक्त कमरेत वाकले आणि खाली बसले. मग जज साहेबांनी आदेशावर सही केली. काकांची सही पण शिरस्तेदाराने घेतली, आणि त्यांना समोरच्या शिक्षा झालेल्या आरोपींच्या पिंजऱ्यात बसायला सांगितलं. रोहिणी थिजून बाकड्यावर बसली होती. काका रडले नाहीत, पण त्यांचे डोळे मानहानी आणि होणारी बदनामी लक्षात येऊन लाल झाले होते. आदल्या रात्री तशीही झोप नव्हतीच. काही पत्रकार बंधूंनी सरकारी वकिलांना गाठून केसची सर्व माहिती घेतली. काकांच्या लक्षात आलं की उद्याच्या पेपरात आलेलं आपलं नाव बरेच लोक वाचणार, आता आपल्याला लोकांमध्ये मिसळणं वाटतंय तितकं सोपं जाणार नाही. ते चूप वसले. लगेचच एक हवालदार त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बसवला गेला. जामिनाची व्यवस्था न झाल्याने त्यांना दिवस भर पिंजऱ्यात बसून राहावे लागले. लंच टाइममध्ये त्यांना हवालदाराने विचारलं, पण ते काही नको म्हणाले. संध्याकाळच्या सुमारास त्यांना रजिस्ट्रार साहेबांपुढे पेश करण्यात आलं. मग तयार झालेले पेपर्स आणि काका यांना घेऊन पोलिस त्यांना बेड्या घालून जेलरच्या ताब्यात देण्यासाठी निघाले. मुंबईचंच सेशन्स कोर्ट होतं..... समुद्रावरून येणारा थंड वारा खरं तर सुखद होता. पण काकांच्या संवेदना आता बधिर झाल्या होत्या. रोहिणीला एकटीलाच घरी जावं लागलं होतं. तिनी बरोबर आणलेली अंगाऱ्याची पुडी पर्समधून काढून फेकून दिली..................

विचारांच्या भरात काका गल्लीच्या दुसऱ्या रुंद तोंडाकडे आले. त्यांनी डोळ्यात तरळणारं पाणी पुसण्यासाठी रुमाल बाहेर काढला. तेवढ्यात " ओ काका, ओ काका असे ओरडत रघुमल आला आणि म्हणाला, " अरे काका, तुमी सुटून आला काय? त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो म्हणाला, " कुछ नही सोचना, सब भगवान की इच्छा है. विचार नको कर. आता आपल्या चालीचा बिल्डिंग जाला. रमेशभाई चौ थे मालेपर रयता है. " असं म्हटल्यावर काकांनी त्याच्याकडे पाहून कसबस हसत एका सात मजली बिल्डिंगच्या गेटमधून प्रवेश केला. ते लिफ्टने चौथ्या माळ्यावर पोचले. एका लांबलचक कॉरिडॉरमध्ये बरेच दरवाजे होते. फ्लॅट नंबर माहीत नव्हता म्हणून ते सगळ्या दरवाज्यांवरच्या पाट्या पाहत निघाले. शेवटच्या फ्लॅटवर नाव होतं. "रमेश आर. कामथे. "....... त्यांनी बेल वाजवली. आतून एका स्त्रीने दार उघडलं. काकांचा ऐकून अवतार पाहून आणि हातातली पिशवी पाहून तिने कोण हवंय विचारलं. ते म्हणाले, "रमेश आहे का? " "हो, आहेत ", ती म्हणाली. तिनी विचारलं. " तुम्ही कोण? " त्यांना विचित्र वाटलं. आता काय उत्तर द्यावं? ते घसा खाकरून म्हणाले, " तो.... तो माझा मुलगा आहे. " अशी चाचरत त्यांना स्वतःची ओळख करून द्यावी लागली. ती आत गेली. थोड्या वेळाने आवाज आला "कोण गं?.... तिने मग सांगितलं असावं. मग रमेश पटकन आतून आला कपाळावर आठी घालून तो या म्हणाला....... काका आत शिरले. हातातली मळकट पिशवी भिंतीशी ठेवून म्हणाले, " जराअ पाणी दे रे. " तो आत गेला. आतून पाणी आणलं. ते घेऊन कॉटवर बसत ते म्हणाले, " रमेश मी आलेला आवडलं नाही का? "

तो पटकन म्हणाला, " छे! छे.! असं काही नाही. " पण ते तसंच होतं. मग ते म्हणाले, \" श्रेया कुठे आहे? " ती झोपल्याचं त्याने सांगितलं. तो आत गेला. आतमध्ये त्याची बायको म्हणाली, "हे असे अचानक आलेत, किती दिवस राहणार हे? " रमेश म्हणाला, " म्हणजे? आता ते इथेच राहणार. ते जाणार तरी कुठे?, आपल्याला जमवून घ्यावं लागेल. जा, चहा ठेव आणि त्यांना नमस्कार कर. जे आवश्यक आहेत ते सोपस्कार करावेच लागतील. " ती आत गेली. तिने चहा ठेवला. तिच्या मनात आलं, आता सगळंच विस्कटणार. खर्च वाढणार. आपणही नोकरी केली तर बरं. मग तिनी सध्या थांबायचं ठरवलं. चहा बराच वेळ उकळत राहिला. तिच्या लक्षात आलं आणि तिनी तो पटकन जवळच्याच फडक्यानं उतरला. थोडा हात भाजला. कपात चहा गाळून ती बाहेर आली. तिने चहाचा कप बाजूच्याच टेबलावर ठेवला. आणि अनिच्छेनेच त्यांना नमस्कार केला. नंतर आत जाऊन ती जेवणाच्या तयारीला लागली. एक वाजायला आला. भराभर आवरून श्रेया झोपली आहे तोच त्यांची जेवणं झाली. काहीही झालं तरी काकांना घरचं जेवण बरेच वर्षांनी मिळालं होतं. जेवताना रमेश फारसं काही बोलत नव्हता. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी थोडक्यात देत होता. काकांना ते जाणवलं. केव्हातरी वेळ पाहून त्याच्याशी सविस्तर बोलणं भाग होतं. जेमतेम जेवणं झाली. श्रेया उठली. रमेशनी तिला उचलून बाहेर आणली. काका तिला प्रथमच पाहत होते. तिला पाहून त्यांनी हात पुढे केले. म्हटले, " या, या, या. येतेस माझ्याकडे? " पण रमेशनी ते आजोबा आहेत त्यांच्याकडे जा अस काही म्हटलं नाही. त्यांना पाहून श्रेयाने भोकाड पसरलं. ती त्यांना ओळखत नव्हती. श्रेया अगदी रोहिणी सारखी दिसते, असं काकांना वाटलं. रमेश तिला थोपटून पुन्हा झोपवण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात नीता आली आणि तिला घेऊन आत गेली. नीता गेलेली पाहून रमेश म्हणाला, " बाबा, आता तुम्ही आलाच आहात तर सध्यातरी मी घरी नसताना बाहेर राहायचं काम करा. "..... " म्हणजे? " काका एकदम ओरडले, माझ्यापासून काय त्रास होणार आहे? उलट मी श्रेयाकडे पाहीन, घरातली चार कामंही करीन. " मग रमेश जरा खालच्या आवाजात म्हणाला, " काय आहे की नीताला तुमची सवय नाही आणि या जागेत म्हणजे, वन बीएच्के फ्लॅट आहे, यात तुम्ही झोपणार कुठे?... " तो काकांच्या प्रतिक्रियेसाठी थांबला. ते म्हणाले, " कुठे म्हणजे? मी हॉलमध्ये नाहीतर बाल्कनीत झोपेन. मला काही पलंग, गादी वगैर नकोय. "......

मग त्यांना एकदम त्यांची तुरुंगातली पहिली रात्र आठवली. (लोकांना स्वतःच्या लग्नाची पहिली रात्र आठवते) त्यांच्या खोलीत त्यांना आणखीन तीन कैद्यां बरोबर बंद केल्यावर जेलर म्हणाले, " इथे काही तुला पलंग, गादी, उशी मिळणार नाही. एक सतरंजी दिलेली आहे तिच्यावरच झोपावं लागेल. खोली कसली गुरांचा गोठा सुद्धा स्वच्छ असेल. एका कोपऱ्यात मोरी होती. तिथेच बाजूच्या कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा मटका होता. त्यावर झाकण नव्हतं. एकच पेला. सगळ्यांनी त्यातूनच पाणी प्यायचं. शिवाय थुंकणं आणि लाघवी करणंही त्या मोरीतच व्हायचं. पाणी ओतण्या साठीचा गंजलेला एक ड्रम होता. त्यातून पाणी ओतायचं. बहुतेक जण पाणी कमीच ओतायचे. त्यामुळे सतत घाण येत राहायची. त्या घाणीतच जेवायचं आणि झोपायचं. कसं शक्य आहे? पण काकांनी तिथे चार वर्ष काढली. सुरुवातीचे सहासात महिने त्यांना फार जड गेले. बरोबरीचे दुसरे कैदी म्हणजे एक घरफोड्या, एक अट्टल खिसेकापू आणि तिसरा साखळी चोर होता. सगळेजण विड्या सिगारेटी ओढणारे होते. वॉर्डनला पैसे देऊन ते चोरून ओढायचे. पहिल्या रात्री तर त्यांना झोप लागलीच नाही. बाकीचे तिघे लवकरच घोरत पडले. काका मात्र रात्रभर बसून राह्यले. सकाळी चुरचुरत्या डोळ्यांनीच पाच वाजता उठावं लागलं........ मग ते भानावर आले. त्यांनी पाह्यलं. हॉल मध्ये झोपणं रमेशला मान्य नसलं तर आपण बाल्कनीत झोपू. बाल्कनी पाच बाय दोनचीच होती. निदान स्वच्छ होती. रमेश म्हणाला, " नुम्हाला आता कुठच्याच गोष्टींची गरज नसेल म्हणा. पण आम्हाला संसार चालवायचाय. बघा, तुम्हीच ठरवा. नाही म्हटलं तरी तुमच्या येण्यामुळे आमच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण झालंच आहे, नाही का? "...... काका त्यावर काहीच बोलले नाही. रमेश आत गेला. मग ते दिलेल्या सतरंजीवर बाल्कनीत झोपले.

नंतर त्यांचे पंधरावीस दिवस असेच गेले. घरच्या माणसांमध्ये राहूनही ते तुरुंगात राहिल्यासारखे राहत होते. काकांना जेवण झाल्यावर मसाला सुपारी खायची सवय होती., जी त्यांना रोहिणी आणून देत असे. पण रमेशच्या घरात तसलं काही नव्हतं. दोन वेळचं जेवण जास्त संबंध न ठेवता त्यांना मिळत होतं. संवाद झालाच तर तो फक्त रमेशशीच होत होता. होही तो कामावरून आल्यावर. आणि त्याचं वादात रुपांतर होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागत होती. दिवस भर सूनबाई आतल्या खोलीत श्रेयाला खेळवीत असे. पण बाहेर येऊन तिला काकांकडे देत नसे. असे एकाकी दिवस जात होते. काकांना खूप वाटायचं की श्रेयाला घ्यावं तिच्याशी खेळावं, तिच्या मऊ मऊ गालांचे मुके घ्यावेत. पण ती त्यांच्या वाट्याला येणार नाही याची दक्षता मात्र नीता घेत असे. दुपारचा चहा मिळत नसे. तो संध्याकाळी रमेश आल्यावर मिळायचा. जेवण मात्र टेबलावर वाढून ठेवलं जायचं. वाढलं, तेवढंच खावं लागे. त्याची सवय त्यांना तुरुंगात होतीच. आणखी मागण्यासाठी सुनेशी बोलणं आलं. ती तर काही हवंय का असंही विचारीत नसे. त्यातून ते बोलायला गेले तर ती उत्तरच देत नसे. जणू काही ती बहिरी होती. एकदा केव्हातरी तिनी केलेली शिमला मिरची ची भाजी त्यांना फार आवडली, म्हणून त्यांनी ती आणखीन मागितली, तर तिनी न बोलता आतून पातेली आणून त्यांच्या पुढे ठेवली आणि ती निघून गेली. कधी कधी त्यांना ओरडावंसं वाटायचं. पण धैर्य झालं नाही. यापेक्षातर आत होतो ते परवडलं. पंधरा दिवस होत आले अजूनही त्यांनी स्वैपाकघर आणि रमेशची रूम आतून पाहिली नव्हती. हॉल आणि आतली रूम यांना जोडणाऱ्या बोळात संडास बाथरूम होतं. पण तिथून आतलं काहीच दिसत नसे. त्यांना मुळी तिथे जाण्याची अलिखित मनाईच होती. त्यापुढे तर तुरुंगात खूपच मोकळे पणा होता. सगळेच गुन्हेगार, पण एकमेकांशी बोलत असत. ते तसे घराबाहेर पडलेले नव्हते..... जायचं तरी कुठे? आणि कोणी विचारलं तर सगळंच सांगावं लागेल. माहिती सगळ्यांना आहे, पण लोक मुद्दाम विचारतील. आपण आता काहीही करीत नाही हेही त्यांना खाऊ लागलं. खरंतर त्यांना रमेशशी खूप बोलायचं होतं. पण ते मनात राहिलं. एक प्रकारची घुसमट होत होती. आपली सजा आणखीन जास्त असती तर बरं झालं असतं अस त्यांना वाटू लागलं. ही कोंडी फुटण्याची ते वाट पाहू लागले.

श्रेया रात्रीची कधी कधी खूप वेळा रडायची. पण मनात असूनही काकांना तिला घेऊन गप्प करण्याची संधी मिळत नव्हती. दुसऱ्या साठी काहीतरी करावं. आणि दुसऱ्याने तुम्ही आम्हाला हवे आहात म्हणावं अशी त्यांवी फार इच्छा होती. पण त्या दोघांना त्यांची मदतच काय त्यांचं अस्तित्व सुद्धा नको होतं. त्यांनी त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं........... आणि मग एक दिवस असा उजाडला....... श्रेयाला बरं नव्हतं, म्हणून नीता तिला घेऊन डॉक्टरांकडे निघाली होती. त्यांनी काहीतरी विचारायचा प्रयत्न केला, पण आपण भिंतीशी बोलत असल्या सारखं त्यांना वाटलं. त्यांना न सांगता ती बाहेर पडली. सकाळचे अकरा वाजत होते. ती कुठे जात्ये, केव्हा याची त्यांना कल्पनाच नव्हती. ती फ्रंट डोअर लावून गेली. आता काकांना बरं वाटलं. त्यांना फ्लॅ ट आतून पाहता येईल म्हणून ते आनंदले. त्यांनी प्रथम लॅच उघडून बाहेर पाह्यलं. बाहेर कोणीच नव्हतं. सगळ्यांचीच दारं बंद होती. कसली ही फ्लॅट सिस्टिम, त्यांना राग आला. चाळीत कसं मोकळं वाटायचं. कोणाकडेही जाता येत होतं. त्यांनी दार नीट बंद केलं. आतून बोल्टही लावला. पण तो लागला नाही
. त्याला सामावून घेणारा पुढचा भागच तुटलेला होता. ते तसेच वळले........ प्रथम ते रमेशच्या रूममध्ये डोकावले......