कामथे काका (भाग २७ अंतिम)

आज प्रथमच काकांना स्वस्थता वाटत होती......

आज प्रथमच काकांना स्वस्थता वाटत होती. साधना चहाचे कप घेऊन बाहेर आली . ते पाहून ते म्हणाले, " साधना मला खरंतर घरी जाऊन यायला हवं. उद्या पेपरात बातमी आली की कदाचित नीता जास्तच चिडण्याची शक्यता आहे. " त्यावर ती म्हणाली, " मी काय बोलणार ? तुम्ही ठरवा. आता तुमच्या मागच्या रोजच्या कटकटी तरी थांबल्या. मात्र तुम्ही कुठे राहायचं हे ठरवावं लागेल. " काकांना आश्चर्य वाटून ते म्हणाले, " म्हणजे मी इथे राहू नको का ? " साधना काहीच बोलली नाही. इकडे तिकडे करणारी सोना मध्येच येऊन म्हणाली, " आता काका कुठेही जाणार नाहीत. " ......... म्हणजे साधनाला अजूनही आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही तर. त्यांचं हिंदोळणारं मन पाहून साधना म्हणाली, " म्हणजे आपलं लग्न होईपर्यंत तुम्ही कुठे राहायचं असं मला म्हणायचं होतं. तुम्ही तुमच्या घरचं सगळं निपटून आलात की मग खरोखरीच स्वतंत्र झालात असं म्हणता येईल. एकदा तो तटका तोडून या म्हणजे झालं. आपल्या मध्ये पुन्हा पुन्हा तुमच्या मागच्या आयुष्यातले संदर्भ यायला नकोत. " ...... काकांना त्यातही थोडं हायसं वाटलं. म्हणजे ती लग्नाला तयार आहे हे नक्की. मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी जायचं ठरवलं. नाहीतरी सामान आणावंच लागणार होतं. रोहिणीची एक ट्रंक आपली एक बॅग एवढ्या आठवणी तरी हव्यातच. पण नीताने त्या दिल्या पाहिजेत. अजूनही त्यांना रमेश आल्याचं माहीत नव्हतं. आजचा दिवस मात्र चांगला गेला.
गेल्या सात आठ वर्षांचा आढावा घेता काकांची अनिश्चितता संपुष्टात येऊ लागली होती. संध्याकाळी ते सगळेच बाहेर फिरायला गेले . ते जेव्हा साधनाच्या घरी आले तेव्हा साठे मामांनी मात्र त्यांना येताना पाहिलं होतं. त्यांना आश्चर्य याचं वाटलं , की काही दिवसांपुर्वी साधनाला त्यांनी या गृहस्थांचा संबंध काय असं विचारल्यावर तिने उत्तर देण्याचं टाळलं होतं. तरीही ते काकांना दरोड्याशी संबंधित असल्यामुळे ओळखत नव्हते. साठे मामांनी मात्र मनोमन ठरवलं की आता त्यांना जर हे गृहस्थ साधना बरोबर राहणार असतील तर मेंटेनन्सचं बिल वाढवावं लागेल आणि त्या निमित्ताने साधनाचा त्यांच्याशी काय संबंध आहे तेही कळेल. साठेच ते, लवकरच त्यांनी चौकशी करावयाची ठरवली. संध्याकाळचं फिरणं ही एक बऱ्याच वर्षातून काकांना मिळालेली पर्वणी वाटली. रात्री बोलणं वेगवेगळ्या विषयांवर झालं. पण लग्नाबद्दल साधना एक अक्षरही बोलली नाही, की त्यांच्या इथल्या राहण्याबद्दलही. ते झोपी गेले. साधनाशी सलगी आजच करणं त्यांना बरं वाटेना आणि घरच्या झोपेचं एक सूख असतं तेही त्यांना टाळावंसं वाटेना. वेगवेगळ्या विचारांमध्ये सकाळ उजाडली. चहा नाश्ता झाल्यावर काकांनी साधनाला घरी जाऊन येतो असं सांगून ते बाहेर पडले. पण त्यांना अचानक भीती वाटू लागली. रमेश घरी नसणारच याची त्यांना खात्री होती. म्हणजे नीताचे विरोधी शब्द
ऐकले की झालं. असं त्यांनी स्वतःच्या मनाला बजावलं. तरीही त्यांना रुखरुख वाटू लागली. जाताना श्रेयासाठी ते खाऊ घेऊन जाण्यास विसरले नाहीत. बसमधला वेळही उत्साहात गेला. पण बिल्डिंगच्या गल्लीच्या तोंडाशी आल्यावर मात्र त्यांच्या तोंडाला भीतिने कोरड पडली. त्यांना जाऊ नये असं वाटू लागलं . इतके काय आपण घाबरतो. आपलं वय नीताच्या वयापेक्षा कितीतरी जास्त आहे. लहान मुलासारखं आपण घाबरू लागलो तर आपण यापुढे जगू शकत नाही. आत शिरावं किंवा नाही या विचारात ते गल्लीच्या तोंडाशी घुटमळत राहिले. नेमकं रघुमलचं लक्ष गेलं. आणि तो त्यांना दुकानातू हाका मारू लागला. इतर कोणी बघू नये म्हणून ते पटकन त्याच्या दुकानात शिरले. बातमी जरी सगळ्यांनी वाचली असली तरी हेच ते कामथे हे कोणालाच माहीत नव्हतं. बहुतेक सगळे नवीन होते. आल्या आल्या रघुमलने त्यांचे स्वागत केले. " अरे काकाजी चाय पिओ नी. तुमी वापस आला लई चांगला जाला. ते तुमचा डिक्रा आनि डिक्रिबी आली घरी. " न कळून काका म्हणाले
" म्हणजे ? " .... त्यावर रघुमल म्हणाला, " अरे असा काय करते, रमेश भाई अने निलू बेनबी हाये " अचानक काकांच्या तोंडात चहा फिरायला लागला. मग घाबरत ते म्हणाले, " तू पाहिलयस का त्यांना ? " ....... "अरे सौ टका काकाजी. पण तुमी घबरते कशाला . तेनी तुमाला ठेवला नाय तर मी ठेवेल. "

ते रघुमलचा निरोप घेऊन त्यांच्या बिल्डिंगकडे निघाले. कपाळावरचा घाम पुशीत ते चवथ्या माळ्यावर आले. दरवाज्याची बेल वाजवली. आणि त्यांना पुन्हा एकदा मागे वळून पळून जावंस वाटलं. पण दरवाज्या एका स्त्रीने उघडला. दारात निलू उभी होती. त्यांना न ओळखून निलू म्हणाली, " कोण पाहिजे ......? " मग तिला अचानक आठवलं. चेहरा ओढलेला असला तरी डोळ्यात तीच ओळख होती. तिला ती जाणवली . आणि म्हणाली, " बाबा , तुम्ही ? ...... या ना आत ". आत मधून रमेश आणि नीता डोकावले. निलूचा मुलगा आणि श्रेया आत खेळत होते. आत आलेल्या काकांकडे नीता नुसती पाहत बसली. पण या म्हणाली नाही. रमेशची प्रतिक्रिया काही वेगळी नव्हती. तोही काहीच बोलला नाही. काका आत शिरले. सोफ्यावर बसले. त्यांना श्रेया कुठे आहे विचारण्याचं धैर्य झालं नाही तिच्यासाठी घेतलेलं चॉकलेट खिशात विरघळत होतं. काकांची मान खाली होती. आतून रमेश आला. त्याला पाहून काका काही बोलणार एवढ्यात तोच

म्हणाला, " मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि काहीही ऐकायचंही नाही. तुमच्यासारखा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. चोऱ्या आणि दरोडे घालण्याचंच बाकी होतं. तेही केलत. पेपराचे रकानेच्या रकाने तुमच्या कारागिरीने भरलेले आहेत. आणखी किती मान खाली घालायला लावणार आहात कोण जाणे. तुम्ही आता इथे राहू शकत नाही. तुमचं सामानसुमान जे असेल ते घेऊन चालायला लागा. " त्याला तोडीत निलू मध्ये म्हणाली, " अरे पण ते जातील तरी कुठे ? " . ....... " का ? तुला पुळका आलाय , जा त्यांना घेऊन अमरावतीला. गुन्हेगारी जगात आता त्यांचं नाव गाजतंय. कुठे जाणार ? अवघं जग त्यांना मोकळं आहे. " (अवघे विश्वची माझे घर, वेगळ्याच अर्थाने खरं ठरत होतं. ) ...... काका खाली मान घालून नुसतेच बसले होते. काय बोलायचं जिथे कोणी ऐकायलाच तयार नाही . रमेशच्या तोंडावर इतकी तुच्छता होती की , त्यांनी काही हालचाल केली असती किंवा ते बोलले असते तर त्याने मारायलाही कमी केलं नसतं. असं वाटून ते थिजल्यासारखे बसले होते. त्यांना लहानपणची आठवण झाली. त्यांची आई फार शिस्तप्रिय होती. ती ओरडायला लागली की लहानशी हालचाल देखील ते करायला घाबरत असत. याला आपण लग्न करणार आहोत असं सांगितलं तर हा गावच गोळा करील. मध्येच श्रेया बाहेर डोकावली. पण तिला नीताने मागे खेचली. आता सामान कसं गोळा करणार ? आणि सांगणार कसं की ते कोणाकडे राहणार आहेत . बरं झालं सोनाला आणली नाही. ही तर कोर्टातल्यापेक्षा वाईट अवस्था होती. ....... त्यांनी मग बोलायचा प्रयत्न केला. " मी ... मी बोलू का ? त्यांनी भीत भीत विचारलं ." पण त्यांचं न ऐकता रमेश आत गेला. नीताही आतच बसून राहिली. निलू म्हणाली, " काहीतरी सांगणार होतात . " इतके वर्षांनी ते दिसत असल्याने ती गंहिवरली. त्यांनी आपल्याला जवळ घ्यावं असं तिला वाटू लागलं. तर त्यांना तिने आपली विचारपूस करावी असं त्यांना वाटलं. प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. मग त्यांनी धीर करून निलूला आपण सामान घ्यायला आल्याचं सांगितलं. निलू आत गेली.

आतून रमेशचा आवाज येत होता. काय घ्यायचंय ते घ्या , म्हणावं पण मला बोलायला सांगू नका. निलू बाहेर येत म्हणाली, " काय काय हवय तुम्हाला. " घरातून हाकलून दिलेल्या माणसाचा भाव काकांच्या तोंडावर होता. मग ते गॅलरीतल्या कपाटाकडे गेले. ते उघडून त्यांनी आतले काही कपडे घेतले. पैसे तर किक्ला केव्हाच घेऊन गेला होता. निलूला त्यांनी वरची एक ट्रंक आणि त्यांची जुनी बॅग त्यांनी आणायला सांगितली. मग त्यांनी खिशात हात घालून श्रेयाला चॉकलेट देण्यासाठी ते निघाले. पण हाताला विरघळलेले चॉकलेट लागल्याने त्यांनी खिशातच हात कसातरी पुसून , तो विचार बाजूला सारला. ते दोन्ही बॅगा आणि पिशवी घेऊन निघाले. मागे वळून देखील त्यांनी पाहिलं नाही. निलूला सुद्धा ते जवळ घेऊ शकले नाहीत. खरतर ती बऱ्याच वर्षांनी त्यांना दिसत होती. ते लिफ्टजवळ आले आणि श्रेयाने हाक मारली, " आजोबा ..‌....." . त्यांनी मागे वळून पाहिलं. पण रमेशने तिच्या तोंडावर हात ठेवलेला दिसला. आता मात्र त्यांना लक्षात आलं की त्यांची रक्ताच्या नात्यांना गरज उरली नव्हती. ते डोळ्यातलं पाणी मागे सारीत साधनाच्या घरी जाण्यासाठी निघाले. .........


साधनाकडे तर ते पोहोचले. आता साधनाची पाळी होती , की यांच्याबरोबर आयुष्य काढायचं नक्की ठरवायल हवं. वेगवेगळी आंदोलनं चालणाऱ्या मनाला स्थिर करणं तेही वास्तवाचा विचार करून घट्ट बनवणं इतकं सोप नव्हतं. मग तिने स्वतः पुरता विचार केला. आपण यांना स्वीकारलेलं आहे मग विचार स्थिर का होत नाहीत. यांना आपण कोणत्या कारणांनी नाकारतोय. तिने कारणं शोधायला सुरुवात केली. तिला नक्की कारण सापडत नव्हतं. याचाच अर्थ आपण फक्त भितोय, असं तिच्या लक्षात आलं. जे काही वाईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलेलं आहे. मग उगाच पाय मागे का घ्यायचा . कामं करता कारता असले विचार करणं कठीण होतं. नकळत काकांसाठी चहा बनवताना तिने चुकून दोनदा साखर घातली . तिच्या ते लक्षात आलं नाही.,,,,,म्हणजे आपल्याला भविष्याबद्दल फक्त चिंता आहे . तीही खोटी . कारण आपण लग्नाचा निर्णय ताबडतोब घेतलेला नाही. जसा तिने तो तिच्या नवऱ्याच्या बाबतीत घेतला होता. त्यामानाने तिने आत्ता लग्नाच्या निर्णयाप्रत यायला भरपूर वेळ घेतला होता . हे तिच्या लक्षात आलं. इतकं मंथन केल्यावर तिने विचार करणं सोडून दिलं . आता फक्त" आर या पार " खरंतर "पारच." आता तिच्याजवळ दुसरा विकल्प नव्हता. आणि विचारही भरपूर करून झाला होता. आता आपण लग्न करायचं म्हणजे करायचंच. नंतर तिच्या लक्षात आलं, की सोनालाही ते घरात असणं फार महत्त्वाचं वाटत होतं. चहा गाळून तिने तो हॉलमधे आणला. काका थोडे निराच मनस्थितित बसले होते. तिच्या लक्षात आलं की मुलाकडे काहीतरी गंभीर घडलेलं आहे. ती चहाचे कप घेऊन त्यांच्या शेजारी येऊन बसली. तिने हळूवारपणे विचारले, " रमेश फार बोलला का ? " ...... आपला चेहरा साफ करीत ते म्हणाले, " साधना तो बोलला असता तर बरं झालं असतं. म्हणजे त्याला लग्नाबद्दलही सांगता आलं असतं. आणि तिथे निलूही आली होती. " मग थोडा वेळ जाऊन देऊन म्हणाली, " मग तर फारच छान झालं. तिला आता तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही. आणि तिने परिस्थिती पाहिलीच आहे. सोडून द्या. मागचं सगळं विसरून आपण नवीन सुरुवात करू या. " त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला होता. तिला वाटलं, साखर जास्त झाल्ये म्हणून ते तक्रार करतील. पण चालू वास्तव त्यांनी स्वीकारलं असल्याने तशी तक्रार केली नाही. आता मीठ जास्त काय आणि साखर जास्ती काय. आपलंच आहे. ते तोंडावरून नॉर्मलला आल्यासारखे वाटले. त्यावर ती म्हणाली, " आपण आज गणपतीचं दर्शन घेऊ, आणि प्रथम त्याला आपल्या लग्नाला येण्याचं बोलावणं करू, कशी वाटते आयडिया ? " ते तिला जवळ घेत म्हणाले, " फारच छान. पण जाताना सोनालही घेऊन जायला हवं. " नकळत ती त्यांना बिलगली. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवीत ते काही वेळ तसेच बसले. सगळंच नक्की झाल्याने आयुष्याचे नवे रंग उद्यापासून पाहायला मिळतील याची त्यांना खात्री वाटू लागली. रमेश , नीता, निलू, श्रेया, दरोडा, किशाची टोळी हे सगळंच त्यांनी आता विसरण्याचं ठरवलं. ते त्यांनी भूतकाळात जमा केलं. आता भूतकाळ फक्त संदर्भासाठीच वापरायचा आणि एरव्ही विसरायचा. अशा अनेक चांगल्या विचारांनी त्यांच्या मनाला उभारी आली. अचानक पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडलं. थोडं गरम होऊ लागलं. पण सगळं कसं स्वच्छ झाल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. ते शांतपणे सोफ्यावर लवंडले. त्यांना नावं ठेवणारी आता नीता समोर नसणार होती. आता हे घर त्यांचं स्वतःचं झालं होतं. सगळ्याच वस्तू नव्याने झळकत असल्याचा त्यांना भास झाला. लग्नापूर्वी एखादी मुलगी सासरी जावी आणि नव्या घराच्या आपलेपणाने हरखून जावी तशी त्यांची अवस्था झाली.


लवकरच चांगला दिवस पाहून त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यात साधनाला ओळखणारे काही जण आणि काकांना ओळखणारा म्हणून रघुमल आणि त्यांचा एक जुना मित्र जगन्नाथ मिरगीकर एवढेच उपस्थित होते. वधूवरांचं त्यांनी अभिष्ट चिंतन केलं . एक लहानशी पार्टी एका हॉटेल मध्ये दिली. फरक एवढाच होता. त्यांची मुलगी सोना आपल्या आईवडीलांच्या लग्नाला हजर होती. साठेमामांना बातमी लागली, त्यावर ते म्हणाले, " साधनाबाई तुम्ही अगदी पत्ता लागू दिला नाही. काही का असेना सोसायटीच्या इंकममध्ये वाढ झाली. " त्यावर सगळे हसले. केस बद्दल अर्थातच कोणीच काही बोलले नाही. आता काकांचा केसशी संबंध सध्या तरी पोलिस स्टेशनला हजेरी देण्या इतपतच होता. अशीच दोन तीन वर्ष गेली . एकदाची केस कोर्टात उभी राहिली. लंगडणाऱ्या माणसाच्या गतीने केस चालू लागली. साधारणपणे प्रत्येक तारखेला काकांना जावं लागे. त्यांचा जबाब कोर्टापुढे नोंदला जाईपर्यंत त्यांना जावं लागणार होतं. असे
इन्स्पे. डावले म्हणाले. त्यांचीही बढती होऊन ते बदलून गेले. पण केस करता त्यांना यावं लागत असे. प्रत्येक तारखेला सूर्या आणि त्याचे सहकारी येत असत. तो काकांकडे सूडाच्या भावनेने पाहत असे. पण आता तो काहीही करू शकत नव्हता. त्यामुळे काकांना भीती नव्हती. सूर्या आणि इतर यांनी कोणीतरी "गोंड " नावाचा वकील केला होता. तो गुन्हेगारांच्याच केसेस लढत असे. केसच्या प्रगतीची सुरुवातीला बातमी पेपरात येत असे. पण काकांना कधीही नीताने फोन केला नाही. रमेश परत कॅनडाला निघून गेला. आता ते इथली जागा विकून सगळेच तिकडे कायमचे जाणार होते. काकांना अर्थातच माहीती नव्हती. पण त्यांचा खबऱ्या रघुमल त्यांना भेटत असे म्हणून त्यांना माहीती होत असे. हळू हळू त्याचंही भेटणं बंद झालं. कधी कधी सोना कोर्टात जाण्याचा हट्ट काकांजवळ करायची , मग तिला ते समजावीत की ही जागा लहान मुलांसाठी आणि चांगल्या माणसांसाठी नाही. अजून बँकेने कोणत्याच खातेदाराचे पैसे परत केलेले नव्हते. रिजर्व बँकेच्या सूचनेनुसार लहान लहान रकमा काढता येत असत तेवढाच काय तो दिलासा. असो. आयुष्या संथ पण सरळ गतीने चालू होतं. इतक्या वर्षांच्या त्रासानंतर आत्ताचे सरळ आयुष्य काकांना आकर्षक वाटत होतं. आता त्यांची तब्बेतही सुधारली. पण श्रेयाची त्यांना अधूनमधून आठवण येत असे. निलूचाही परत संबंध आला नाही. तिने तरी निदान आपल्याला फोन करायला हरकत नाही . असं त्यांना सारखे वाटे. मग साधना त्यांना समजावीत असे.
आता मागे वळून पाहू नका. झालं ते झालं. खंतावत बसून हाती काहीच लागणार नाही. सोनाही मॅट्रिकच्या वर्गात होती. लहान वाटणारी सोना आता मोठ्या माणसांसारखी बोलायची. काकांना फार कौतुक वाटे. मध्येच साधनाला तिच्या मागच्या नवऱ्याच्या भावा कडून पत्र आलं , की नवऱ्याच्या नावाची जमीन होती , ती विकली गेल्याने आलेल्या पैशातील वाटा तिला ड्राफ्टने पाठवणार आहे. त्याप्रमाणे तिला अडीच लाख रुपये मिळाले. दिवस पालटत होते.

............यथावकाश काकांचं कोर्टापुढे स्टेटमेंट झालं. गोंड वकिलाने उलट तपासणीमध्ये काकांना पोलिसांनी पैशाचं आमिष दाखवल्यामुळे काका माफीचे साक्षिदार झाल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न केला. पण कोर्टाला तो दृष्टिकोन पटला नाही. त्या नंतर मात्र त्यांना कोर्टात जावं लागलं नाही.


दहा वर्षानंतर.............................................
****************

एक दिवस काकांना इन्स्पे. डावले यांचा फोन आला . " कामथे , उद्या केसचा निकाल आहे, आलात तरी हरकत नाही. नाही आलात तरी चालेल. तुम्हाला गोवणाऱ्या साऱ्यांनाच कशा शिक्षा होतात ते पण पाहायला मिळेल. शेवटी जगात न्याय असतोच. " यावेळी बोलताना त्यांनी अरेतुरे केलं नाही. आता ते आरोपीही नव्हते किंवा भावी गुन्हेगारही. काकांनी जायचं ठरवलं. साधना नाही म्हणतच होती. पण सोनानेही आग्रह धरला. म्हणून साधना आणि ते गेले. कोर्ट खच्चून भरलं होतं. नाही म्हणायला साठेमामा आले होते. ते कसे आले याचं काकांना आश्चर्य वाटलं. बरोबर अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली. काकांचा हा निकालाच्या दिवसाचा दुसरा अनुभव होता. सूर्या , गुड्डी , अकडा, सोल्या, इंजिनियर, राजासाब आणि इतर दोघे या सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा झाल्या. सूर्या, अकडा , सोल्या यांना जन्मठेप झाली. इंजिनियर , राजासाब आणि इतर दोघे यांना चार ते पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. गुड्डीला मात्र साधी कैद आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. तो फार मोठ्या गंभीर गुन्ह्यात गुंतल्याचे सिद्ध झाले नाही. पोलिसांचे कौतुक झालं. त्यांच्या अंगावर मूठभर मास चढलं. निकाल पत्राचं वाचन संपल्याने सगळेच पांगले. तेवढ्यात कोणाचंही लक्ष नाही असं पाहून बेड्या घालणाऱ्या हवालदराचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून सूर्या काकांच्या अंगावर धावला. दात ओठ खात म्हणाला, " साल्या तुझ्यामुळे आमची ही अवस्था
आहे. त्याने त्यांचा गळा धरण्याचा प्रयत्न केल्याने इन्स्पे. डावले आणि इतर पोलिस त्याच्या अंगावर धावले आणि त्याला जेरबंद केला. मग मात्र काका साधनासहीत कोर्टरूममधून त्वरेने बाहेर पडले. पुन्हा मागे वळून त्यांनी पाहीलं नाही. त्यांना त्यांचेच शब्द आठवले. सोना बेटा ही जागा लहान मुलांसाठी आणि चांगल्या माणसांसाठी नाही. ते लहान नव्हते. पण चांगले होते हे परिस्थितीनेच सिद्ध केले म्हणून बरे झाले. कोर्टाबाहेर
आल्याबरोबर त्यांना वार्ताहारांनी गराडा घातला. पण कसे तरी त्यांना हात जोडून ते चक्क पळाले. टॅक्सी पकडून ते घरी आले. सोना आज घरीच होती. तिने काय झालं विचारलं. तिला आता मात्र सगळं सांगणं भाग होतं. ती आता मोठी झाली होती. मग तिने आपला मनसुबा बोलून दाखवला. " मी कायद्याचा अभ्यास करणार आणि न्यायाधीश होणार, म्हणजे मला रोज कोर्टात जाता येईल. " काका हसले. तिला जवळ घेत म्हणाले, " हरकत नाही बरं. "

आता मात्र काकांचं मन मुंबईच्या आणि सुटकेच्या विचारांच्या गर्दीत हरवून गेलं. ...............


(संपूर्ण संपूर्ण संपूर्ण संपूर्ण संपूर्ण संपूर्ण संपूर्ण संपूर्ण)

आता क्रमशः नाही. 


लेखक: अरुण कोर्डे 

----------------
🎭 Series Post

View all