कामथे काका (भाग २६)

आता फक्त एकच दिवस मधे होता..........

आता फक्त एकच दिवस मध्ये होता. इन्स्पे. डावले, खुशीत असले तरी केसमधले इतर शासकीय उपचार बरेच बाकी होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे गुड्डी मारहाणीपुढे फार टिकला नाही. त्याने सगळं काही पोपटासारखं बोलण्यास सुरुवात केली. त्याचं या धंद्यातलं आगमन ते पार अगदी हॉटेल डिलाइट मधून पळून पकडला जाईपर्यंत त्याने सगळ्याच गोष्टी सांगितल्या. त्यात श्रीपतरायला मारण्यापर्यंतचा तपशीलही आला. जे काकांना माहीत नव्हतं. तो फारसं काही करू न शकणाऱ्यांपैकी होता. त्याला दुसऱ्याच्या आधाराची सवय होती. त्यामुळे तो ऐष प्रथम आणि त्यासाठी लागली तर गुन्हेगारी अशा तत्त्वाचा माणूस होता. अर्थातच सरळ मार्ग त्याने कधीच वापरला नव्हता आणि वाईट मार्गाचाही अवलंब दुसऱ्याच्या आधारावर जितका कमी करता येईल असा तो करीत असे. थोडक्यात तो आळशी होता. त्यामुळे तो अंग सांभाळून होता. असे लोक इतके हलके गुन्हे करतात की लोकांच्या लक्षात येत नाहीत , त्यामुळे ते साधारण जीवन जगू शकतात. त्यांना पोलिसांचाही त्रास फारसा होत नाही ,जोपर्यंत मोठा गुन्हेगार सापडत नाही ,ज्याच्या संरक्षणाखाली गुड्डीसारखे लोक गुन्हे करतात. मग त्याने सांगितलेल्या वाळकेश्वरच्या पत्त्यावर सर्च वॉरंट घेऊन जाऊन तपास करणं गरजेचं होतं. त्याबद्दल काकांनी फक्त ऐकलं होतं.खरंतर त्यांना किशाने नरिमन पॉइंटचा फ्लॅट म्हटलं होतं. पण ते घाबरले होते म्हणून म्हणा किंवा त्यांना आठवलं नाही म्हणून म्हणा त्यांनी वाळकेश्वर सांगितलं होतं. आपल्याशी किशा खोटं बोलला असावा. पण गुड्डीनेही वाळकेश्वर सांगितल्याने त्यांचा ताण कमी झाला. मग नरिमन पॉइंटचा फ्लॅटही होता की काय कोण जाणे. नशीब गुड्डीला तसं काही माहीत नव्हतं. नाहीतर विनाकारण काका संशयाच्या भोवऱ्यात सापडले असते. त्यांची सुटकाही लांबली असती. ....... त्यांना किशाने फ्लॅटचा पत्ता देण्याच्या आतच टोळीची दशा झाली होती. मग काकांनी सांगितलेला मुंब्र्याचा जबाबी चाचा तेवढा शिल्लक राहत होता.पण त्याच्याशिवाय केस रंगवता येत असल्याने डावलेंनी केस चालू होईपर्यंत त्याचा शोध सावकाश घेण्याचं ठरवलं. शनिवारच्या दिवशी त्यांनी वॉरंट मिळवलं. आणि रात्री शेवटचा प्रयत्न म्हणून परत सगळ्यांना आत घेतलं आता मात्र त्यांनी मारहाण केली नाही, तर त्या सगळ्यांनाच किती भयंकर शिक्षा होऊ शकते याची कल्पना दिली. सोल्या तेवढा बोलला, " साहेब जरा माझा बी विचार करा की माफीचा साक्षीदार म्हणून. " पण त्याला फार कमी माहिती असल्याचं डावलेंनी त्याला सांगितल्याने तो निराश झाला. रविवारचा दिवस केसच्या तपासावर फायनल शिक्का मोर्तब करणारसं दिसत होतं. रविवारी सकाळी वाळकेश्वर फ्लॅटमध्ये जाण्याचं ठरलं. तरी सगळा दिवस डावलेंचा अहवाल तयार करण्यात गेल्याने डावले आणि पार्टी काकांसहित रात्री आठ साडेआठच्या सुमारास वाळकेश्वरच्या सुमती सोसायटीच्या जवळ पोहोचली. गेटवरचा नेपाळी त्यांना पाहून अचंबित झाला आणि काहीसा घाब्रलाही. त्याला कळेना पोलिसांना कोणी बोलावलं. डावलेंनी फ्लॅट नंबर १२०३ सांगितल्यावर मात्र तो म्हणाला, " शाब वहां तो कोई नही रहता. वो तो चार पाच सालसे बंद पडा है. मग डावल्यांनी विचारल्यावर तो फ्लॅट कोणाच्या मालकीचा आहे ते त्याने सांगितले. तो कोणी फारुख रझा नावाच्या असामीच्या नावाचा होता. पण फारुख रझा या माणसाला आजपर्यंत कोणीच पाहिले नसल्याचे त्यांना कळले. मग लवकरच सोसायटीचे सेक्रेटरी आले त्यांना विचारल्यावर कळलं की रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यांना जे पाहिलं होतं, ते परत त्यांनी त्याला कधीही पाहिलं नव्हतं. पण सोसायटीचे मेंटेनन्स बिल मात्र वेळेवर भरले जात होते. त्यांना डावलेंनी किशाचा फोटो दाखवून हाच तो माणुस का हे विचारल्यावर ते हो म्हणाले. सोसायटीच्या ऑफिसमधल्या करारनाम्याच्या प्रतीवरचा किशाचा फोटो पाहून त्यांनी खात्री करून घेतली. तेव्हा मात्र सेक्रेटरी म्हणाले, " आप ऐसे कैसे सर्च कर सकते है ? " त्यावर डावले म्हणाले, " आप चाहिये तो कंप्लेंट करो. और ये देखो सर्च वॉरंट, और आप ज्यादा बात करेंगे तो ये फारुख रझासे आपका ताल्लुक है ऐसा मै समझूंगा , चलेगा आपको " त्यावर तो काही न बोलता निघून गेला. तेवढ्यात वॉचमनने बरोबर येण्याबाबत विचारले. तेव्हा जास्त वेळ जात असलेला पाहून डावले चिडले आणि म्हणाले, " वहां पार्टी है क्या ? " मग मात्र तो चुपचाप निघून गेला. लिफ्ट पकडून सगळेच जण बाराव्या मजल्यावर आले. एका मजल्यावर तीन फ्लॅटस असलेली ती बिल्डिंग होती. प्रथम आपापली पिस्तुले काढून कोणताही धोका न पत्करता त्यांनी बरोबर आणलेल्या चावी तज्ज्ञाला कुलूप उघडावयास सांगितले.
आत शिरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथे कोणतेची फर्निचर नव्हते. की कोणी राहिल्याच्या खूणा होत्या. तो एक चार बेडरूम हॉल कीचनचा प्रशस्त फ्लॅट होता. सर्वच खोल्या रिकाम्या होत्या. तिथे आतल्या एका खोलीत मात्र एक कपाट होतं. तिथे लॉकर उघडल्यावर काकांचा आणि किशाचा असे दोन खोटे पासपोर्ट होते. त्यावर त्यांचं नाव मात्र कामथे ऐवजी " जांभळे " असं लिहिलेलं आढळलं. मात्र तिथे व्हिसा नव्हता. खोटा व्हिसा बनवता आला नसावा. एक भरलेलं पिस्तुल आणि एका मोठ्या पाकिटात एक लाख रुपये ठेवलेले आढळले. इथेही काकांना किशाने फसवल्यासारखं वाटलं. व्हिसा नव्हताच. ते काहीही बोलले नाहीत. रितसर पंचनामा करून साऱ्या गोष्टी ताब्यात घेऊन डावले साहेब आल्या मार्गाने परत निघाले .
आता केस अगदी एखाद्या गऊ बाईसारखी सरळ झालेली होती.दरोड्या संबंधीत सगळे धागे आता गुंफ़ले गेले होते. पो. स्टेशनला डावले रात्री अकरा वाजता आले. मग काकांना म्हणाले, " बहुतेक तुला जामीन लागणार नाही, उद्या पासून तू सुटशील. फक्त केस पूर्ण होईपर्यंत कुठेही जाऊ नकोस. " त्या रात्री काकांना ते पोलिसस्टेशनमध्ये असूनही शांत झोप लागली. बरेच दिवसात त्यांना सुटल्यासारखं वाटू लागलं. पण त्यांनी त्यावर स्वप्नरंजन केलं नाही. कारण स्वप्नरंजन आजपर्यंत त्यांना घातक ठरलं होतं. त्यांना परत एकदा आपल्या निकालाची आदली रात्र आठवली. आता रोहीणी नव्हती आणि साधना असून नसून सारखीच होती. त्यांचा एक मित्र त्यांना सांगत असे त्याची त्यांना अचानक आठवण झाली. "क्रिमिनल केस आहे ना बरोबर कोणीही जवळचा नातेवाईक घेऊन जाऊ नकोस. विरुद्ध निकाल लागतो. आणि त्याच्या समोर आपली शोभा होते ती वेगळीच. आपण एकटे असलो की आपला हीनदीनपणा पाहायला कोणीही नसतं हे लक्षात ठेव. " त्यांना आता ते अनुभवाचे बोल वाटत होते. शिक्षा झाली तेव्हा रोहिणी बरोबर होतीच की. आता फक्त एकच जुना प्रश्न त्यांना राहिला होता. सुटल्यावर रमेशच्या घरी कसं जायचं . नीता त्यांना घरात घेणार नाही हे नक्की होतं. पण तिने एकदा हाकललं की मग तेच निमित्त धरून ते साधनाला कायमचं राहण्याच्या दृष्टीने विचारता येईल. आता कदाचित तिचा लग्नाला विरोध होणार नाही. काकांना
साधनाशी लग्न या विचारानी एवढं झपाटलं होतं की साधारण आयुष्य जगण्याची त्यांना अतिशय घाई झाली होती. आणि गेल्या सात आठ वर्षात पाहिलं असतं तर त्यांचा आग्रह योग्य होता अस कोणीही म्हंटलं असतं. पण आजूबाजूचे सगळेच लोक तसे नसतात. ज्या व्यक्तीबरोबर राहायचं , तिचाच मुळात विरोध असेल तर असल्या आग्रहाला कोण विचारणार. असले विनाकारण ओघळणारे विचार त्यांना परत परत अस्थिरतेच्या
जगात घेऊन जात होते. तरीही त्यांना सुटकेच्या विचाराने झोप लागली. उद्याचं उद्या पाहू असा त्यांनी विचार केला. त्यांना अजून हे माहीत नव्हतं की घरी रमेश आणि निलू पण आले होते. मग तर ते जास्तच अस्वस्थ झाले असते. अज्ञानात सुख असतं हेच खरं. ............ सकाळ झाली . आरोपींना घेऊन इन्स्पे. डावले , नेटके, देखणे कोर्टात जाण्यास निघाले. तत्पूर्वी अहवालाची प्रत उपायुक्तांकडे त्यांनी पाठवली. आता त्यांना रिमांड नको होता. कोर्टात उभे केल्यावर काकांना वेगळे बसवले गेले. सरकारी वकीलांनी सविस्तर वर्णन करून पोलिसांनी घेतलेल्या कष्टाचे यथोचित गोडवे गाइले. लवकरच कोर्टाने पुढील कारवाईसाठी म्हणजे केस उभी करण्यासाठी तारीख दिली.

काकांचं नाव अधिकृत रित्या माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले. परंतु त्यांना आठवड्यातून एक दिवस पोलिस स्टेशनला हजेरी देण्यास फर्मावले. त्यांना कोणताही जामीन लागला नाही . त्यांनी फक्त केस पूर्ण होईपर्यंत बाहेर गावी जाऊ नये व इतर कायदेशीर अटीही त्यांना सांगण्यात आल्या. आता काका मोकळे होते. त्यांनी इन्स्पे. डावलेंचे आभार मानले . त्यांना त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा डावले म्हणाले, " अरे एवढा मोठा बनवू नकोस मला. मी माझं कर्तव्य केलं कोणीही तुला माफीचा साक्षीदार केलं असतंच. अशा रितीने आभार प्रदर्शन संपल्यावर ते घरी जाण्यासाठी वळले. तर समोरच त्यांना सोना आणि साधना आलेल्या दिसल्या. सोना धावत येऊन त्यांना बिलगली. " आता

घरी येणार ना ? " त्यावर त्यांनी तिला कुरवाळत म्हंटले, " नक्कीच ,पण तुझ्या मम्मीला चालेल ना ? " तेव्हा सोना म्हणाली, " असं नाही म्हणायचं. तिला नाही चाललं तरी तुम्ही घरी यायलाच पाहिजे. " त्यावर साधना फक्त हसली. मग ते तिघे साधनाच्या घरी गेले. काकांचा राहण्याचा प्रश्न सुटला होता. पण एकदा तरी घरी जाऊन आलंच पाहिजे. म्हणजे नीताच्या रागाला वाट तरी मिळेल. त्यांना रमेशच्या घरी
असण्याची कल्पना नव्हती . त्यामुळे या गांभिर्याची त्यांना जाणिव नव्हती. उद्याच्या पेपरात केसबद्दल सगळं येईलच. लगेचच नीताला भेटायला जावं का नाही, त्यांना कळेना. केव्हाही गेलं तरी तिच्या नकारार्थी बोलणं ऐकावच लागेल. त्यांनी या बाबतीत साधनाचा सल्ला घ्यायचं ठरवलं. तिचा सल्ला कशासाठी घ्यायचा , तिचा या गोष्टीशी संबंधा नाही. जाताना सोनाला बरोबर घेउन गेलं तर , नीताच्या बोलण्याची धार थोडी कमी होईल. नाहीतरी मित्राच्या मुलीचा उल्लेख आपण केलाच होता. मग त्यांनी हे सगळे विचार बाद करून टाकले. सोनाला नेणं म्हणजे क्रिमिनल केसला जवळचा नातेवाईक नेण्यासारखं होतं. कुठलं तर्कट त्यांनी कुठेही लावलं. नीता म्हणजे कोर्ट थोडंच होतं. असो. अशा विचित्र विचारांमध्ये ते साधनाच्या घरी पोहोचले. गेल्या गेल्या सोना म्हणाली, " मम्मी आज आपण बाहेर जेवायला जाऊ. काका सुटून आलेले आहेत. आपण सेलिब्रेट करायलाच हवं. साधनाला ते फारसं आवडलं नाही. पण ती काहीच बोलली नाही. ते पाहून सोना काकांना म्हणाली, " आपण ना त्या हॉटेल गुडडे मध्ये जाऊ या. " ते हो म्हणाले, पण त्यांनी खुणेने तुझ्या मम्मीला विचार असे सुचवले.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all