कामथे काका (भाग २०)

निलूचा फोन म्हणजे नीताला एक संकटच वाटलं......

निलूचा फोन म्हणजे नीताला एक संकटच वाटलं. जिला आपण कधी पाहिलीही नाही ती आता का येऊन उभी राहते ? तिला कळेना या बाबतीत काय विचार करावा आणि या नवीन संकटाचा सामना कसा करावा. रमेश आल्यावर बोलता येईल असं ठरवून तिने विषय मनातून काढून टाकायचा ठरवला. पण विषय असे संपत नसतात, निदान नको असलेले तरी. मग तिच्या मनात आलं रमेश यायच्या आतच ही बया येऊन उभी राहिली तर ? जसं जमेल तसं करीन असं म्हणून तिने कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. पण पोळी जळायची ती जळलीच. काकांची मात्र तिला कमाल वाटली. असल्या माणसाशी संबंध नकोच. मध्येच श्रेया आली आणि म्हणाली, " आजोबा आले ? " तिला मात्र त्यांची आठवण येत असावी. नीताने उत्तर दिले नाही. पण तिच्या डोक्यातून हे आजोबा काढायलाच पाहिजेत हे नक्की. कसे ते तिला सध्या सुचत नव्हतं. निलू हे संकट येणार हेच तिला भारी वाटू लागलं. आपल्या लग्नातही ती आली नाही. .....कसातरी नीताने दिवस ढकलला. रमेशचे फोन येतच होते. तेवढीच एक चांगली बातमी. अजून काकांचा पत्ता नव्हता. निदान फोन तरी करायला काय हरकत होती. पण घराची सवय नसलेल्या माणसाकडून अपेक्षा तरी ती किती करणार ? दिवस तर गेला. अजून असे एकटीने किती दिवस काढायचे , कोण जाणे. ह्याच निलूची पत्र सुद्धा भांडणं निर्माण करीत . का येत्ये ही ? तिला खरंतर निलूने उगाचच पछाडलेलं होतं.

रात्री झोपण्याच्या गडबडीत असतानाच दारावरची बेल वाजली. या वेळी कोण असावं , असा विचार करीत नीताने घड्याळ पाहिलं. दहा वाजत होते. तिने कोण आहे विचारलं . पण बाहेरच्या व्यक्तीने उत्तर दिले नाही. मग थोडं घाबरतच तिने दरवाज्या उघडला. दारात एक प्रौढ स्त्री उभी होती. आणि बरोबर एक दहा बारा वर्षांचा मुलगा होता. बरोबर सामान होतं. सामानावरून हीच निलू असावी असं तिला वाटलं. मग नीता उगाचच हसली. आणि या म्हणाली. आत येत निलू म्हणाली, "सॉरी वहिनी , पण गाडी सहा तास लेट झाली . रमेश दादा घरात नाही का ? " नीताच्या उत्तराची आणि प्रतिक्रियेची वाट न पाहता ती आत शिरली . नीताला रमेश घरी नाही का असं विचारलेलं आवडलं नाही. एखादा माणूस कुठे आहे विचारणं ठीक आहे. पण सुरुवातीलाच नकारघंटा वाजवणारी माणसं तिला आवडत नसत. अर्थातच ती काही बोलली नाही. निलू सोफ्यावर बसली . स्वतःचे आणि मुलाचे जोडे काढीत ती म्हणाली, " सौरभ ही तुझी मामी आहे, ती आली की तिला नमस्कार कर बरं का ? " तो मानेनेच हो म्हणाला. नीता आतून एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास आणि खायला एका प्लेटमध्ये फरसाण घेऊन आली. ट्रे टीपॉयवर ठेवून तिने निलूला नमस्कार केला. निलूला जरा बरं वाटलं. ती आत वळणार तोच सौरभने तिला नमस्कार केला. त्यावर नीताने "अरे राहू दे. " असं म्हटलं. आत लपून बसलेल्या श्रेयाला घेऊन ती बाहेर आली. आणि श्रेया आत्याला नमस्कार कर असं म्हणाली. नवखी स्त्री पाहून तिने नकार दिला. त्यावर निलू म्हणाली, " अगं राहू दे. मी कधी आलेली नाही ना. पण शिस्त लावायलाच हवी. " या शेऱ्याची गरज काय होती नीताला कळेना तिला फारसं आवडलं नाही. तिने मग त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं. आणि ती जेवणार की पोहे किंवा उपमा खाणार ? असं विचारलं. निलू म्हणाली, " काहीही चालेल. तुला मी अवेळी आलेलं आवडलं नाही का ? " ....... खरंतर नीताला आवडलं नव्हतं. पण तिने "अहो काहीतरीच ! " असं म्हटलं. असो. संवाद तेवढ्यावरच थांबला. अर्ध्या तासात मग नाश्ता झाला. सगळ्यांनीच मग झोपेची तयारी केली. अजूनही नीता अस्वस्थ होती. निलूने निदान केव्हा येणार ते कळवायला हवं होतं. सरळ येऊन आपली उभी राहिली. किती दिवस ही राहणार , कोण जाणे. तिला झोप लागेना. काही वेळातच तिला ग्लानीसारखी झोप लागलीं. निलूने येऊन वातावरण खराब केलं . 

....... या विचारासरशी ती थोडी स्थिरावली. तो येण्याची नक्की तारीख कळवीन म्हणाला होता. मग अचानक तोच तर आला नाही ? परदेशातून अचानक घरी येतात तेव्हा घरी बसवलेलं असतं , असं तिला कोणीतरी म्हणाल्याचं आठवलं.. निदान निलूच्या येण्यामुळे निर्माण झालेली निराशा नक्कीच नाहीशी होईल. पण तिला जरा शंका होती. आता बाहेरील व्यक्ती निघून गेली असावी कारण बाहेर दिव्याचा प्रकाश अडथळ्याशिवाय येत होता. पण ती व्यक्ती पीपहोलपासून बाजूला झाली असावी , असं तिच्या मनात येऊन तिची छाती परत धडधडू लागली. बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने पीपहोलला लागलेला डोळा पाहिला. मग तिच्या लक्षात आलं आत कोणीतरी आहे. मग नीता वळून सोफ्यावर बसावं असा विचार करीत वळली. पण पुन्हा वेल वाजली. आता मात्र बेल निलूला ऐकू गेली असावी. तिने उठून सोफ्याकडे निघालेल्या नीताला कोण आलंय असं दबक्या आवाजात विचारलं. पण तिने काहीही उत्तर दिले नाही. आता मात्र बेल दोन तीन वेळा सलग वाजली. मग भीतीवर कसा तरी ताबा ठेवीत नीताने लाइट लावला. ती सावकाश चालत दरवाज्याकडे निघाली . एका डोळ्याने पीपहोलमधून दिसेल तेवढे पाहत तिने आवाज कमीत कमी होईल अशा बेताने लॅच उघडला. बाहेर उभी असलेली व्यक्ती कुत्र्याचे कान घेऊन जन्माला आलेली आहे हे नीताला माहीत नव्हते. दरवाज्याचा लॅच बाजूला होताच बाहेरच्या व्यक्तीने जोरात लाथ मारली. नीता मागच्या मागे भेलकांडली, पण जवळच्याच टीपॉयचा आधार घेत तिने तोल सावरला. आता दरवाज्यात उभ्या असलेल्या व्यक्तीच्या धिप्पाडपणामुळे सबंध दरवाज्या भरून गेला. भीतीमुळे मागचे दोघे त्या दोघींना दिसलेच नाहीत. आत येत किक्लाने हातातले पिस्तूल नीताकडे रोखीत विचारले, " काकाजी कहां है ? जलदी बोल हरामी . " नीता आणि निलू घाबरल्या. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. पिस्तूल ही वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची सवय नसलेल्या त्यांना घाम फुटला. नीताच्या मानेवरून घामाचा एक थंड थेंब ओघळत खाली आला आणि तिच्या कमरेपर्यंत पोहोचला. निलूची अवस्था काही वेगळी नव्हती. मुलं गाढ झोपली होती. किक्ला आत आल्याने आत्ता कुठे नीताला त्याच्या मागे उभे असलेल्या दोघांना पाहता आलं. ते होते. मिस्चिफ आणि काण्या. डोळ्यावर आलेली झुलपं बाजूला सारीत हातातलं पिस्तूल पुन्हा खिशात ठेवीत नीताऐवजी तोच म्हणाला, " लेडीस को क्या मालूम अपून अपना काम करके निकल जाते है. " किक्लाला त्याचा चोंबडेपणा आवडला नाही. घाणेरड्या ओठांच्या कोपऱ्यातून तो म्हणाला, " तुम चूप रहो. " ..... मग काण्याला इशारा करीत त्याने घरात शोधायला सांगितले. काण्या लंगडत लंगडत त्या दोघींना ओलांडून आत डोकावून आला आणि " बूढा यहां नही है बॉस ".
असे तत्परतेने म्हणाला. मग घाणेरड्या चेहऱ्यावर किंचित मार्दव आणीत किक्ला म्हणाला, " देखो, हम खून खराबा नही चाहते. चुपचाप पैसा हमारे हवाले कर दो. 

" ............ त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या भपका टाळीत सगळं धैर्य एकवटून नीता म्हणाली , " यहां पैसा वगैरे कुछ नही है . और काकाजी पुलिसके ताबेमे है. आठ दिनसे घर आयेही नही. " तिच्यावर दुसऱ्या दोघांचा विश्वास बसला. पण किक्लाचा बसला नाही. तो म्हणाला, " देख. घरमे जितना भी पैसा है , हम लेके जायेंगे , खुद होकर देदो, वरना इस कबूतरको ढूंढनेको बोलेंगे. ". पण घरात पैसे नव्हतेच. किंबहुना काकांचे पैसे नीताला माहीत नव्हते. काण्याने न सांगताच सगळी कपाटं रिकामी करायला सुरुवात केली. त्याला काहीच सापडले नाही . आत जाऊनही त्याने सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त भिरकावल्या. थोडेफार दागिने मिळाले. आणि तो गॅलरीत शिरला. तिथले लहान कपाटाचे कुलूप त्याने जोर लावून उघडले. कुलुपात फार जोर नव्हता. अजूनही त्या दोघी त्यांच्या जागेवरून हलल्या नव्हत्या. अचानक लहान कपाटात काण्याला एक पिशवी मिळाली , ती उघडल्यावर नोटाच नोटा बाहेर पडल्या. तो आनंदाने पिशवी घेऊन बाहेर येऊन म्हणाला, " बॉस आपका अंदाजा सही निकला. इसमे एक दो लाख तो जरूर मिलेंगे. " असे म्हणून त्याने पिशवी जमिनीवर उलटी केली. शंभराची वीस बंडलं बाहेर पडली. ती पाहून नीताला काकांचा राग आला. आपल्यापासून हे सगळं लपवतच आले. कोणत्यातरी गुन्हेगारी टोळीमध्ये ते

सामील झाले असणार हे नक्कीच. तिला आता पेपरातल्या बातमीचा अर्थ लागू लागला. म्हणजे हे दरोडा घालणाऱ्या टोळीत काम करीत होते तर. पण पैसे घरी कधी आणले ते तिला कळेना. ते सगळं पाहून किक्ला म्हणाला, " इसका मतलब घरमे ज्यादा रकम होगी. " पण त्याला विरोध करीत मिस्चिफ म्हणाला, " बॉस ऐसा कुछ नही है. ये औरते काकाजीके कारनामोसे अनजान है. " ....... त्यावर थोडा विचार करून किक्ला म्हणाला, "शायद तुम ठीक कहते हो "

असे म्हणून दागिने आणि पिशवीतले पैसे घेऊन ते तिघे बाहेर पडले. इतक्या सहजासहजी यांना सोडायला नको होतं , असं काण्या किक्लाला म्हणाला. त्यावर गाडी स्टार्ट झाल्यावर किक्ला म्हणाला, " पैसेसेभी ज्यादा अपनेको काकाकी जरूरत है. वो अपनेको डकैतीसे मिला हुवा पैसा कहां रखा है बताएगा. और किशाका अगला प्लान क्या था वो भी. " पण काका पोलिसांच्या ताव्यात असल्यामुळे ही सगळी माहिती सध्या किक्लाला मिळणं कठीण होतं. वेगात गाडी रस्ता कापीत डिलाइटला पोहोचली.ते तिघे आत पोहोचले. गुड्डीच्याच रूममध्ये बस्तान मांडलेल्या किक्लामुळे गुड्डीची चांगलीच अडचण होत होती. हा किक्ला कधी जाणार ? आणि आपण केव्हा आपला धंदा सांभाळणार ? रंडीका धंदा वैसे ठीक चल राहा था. जे जे म्हणून तो पोर्नसाईटसवर पाहत होता त्याची त्याला आता तालीम करता येत होती. त्यात चांगलाच मजा येत होता. स्वतःच्या बायकोने कधी नीटपणे साधा हातही लावून दिला नव्हता. तरी जबरदस्ती केल्याने त्याला तीन मुलं होती. आहे त्या बायकोला तलाक देण्याचा विचार आता त्याच्या मनात पूर्वीसारखा येत नव्हता. कारण कोणाच्याच लुडबुडीशिवाय तो मस्त "एंजॉय " करू शकत होता. पण थोडेच दिवस झालेले होते. मध्येच हा किक्ला आला आणि सगळं वेळापत्रक कसं विस्कटलं. दादा जगायला हवा होता. असं त्याला फार वाटू लागलं. असले त्रासदायक विचार मनात घोळवत असतानाच त्याला किक्लाने एका वेटरकरवी बोलवले. तो एवढ्या रात्री कंटाळून जायला निघाला. शाळा न आवडणाऱ्या विद्यार्थ्याला अचानक प्रिन्सिपॉलने बोलवावं अशी त्याची अवस्था झाली. तो पाय ओढीत त्याच्याच केबिन कडे निघाला. आत येताच त्याला किक्ला म्हणाला, " क्यूं बे , ये सोल्या किधर मिलेगा ? चल उसको फोन लगा. " किक्लाला हा लांडा आवडत नसे. त्याला तो फुकटखाऊ वाटत होता. किशाने कोणाकोणाला पाळलेलं आहे कोण जाणे. फोन फिरवणाऱ्या गुड्डीचा त्याला अतिशय राग येत होता. बरेच प्रयत्न केल्यावर एकदाच फोन लागला. गुड्डीने त्याला डिलाइटला यायला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, " अरे मेरे बनपाव, किसकी चमडी छिलनी है ? कितना पैसा मिलेगा.? ....... " बोलणं मुद्द्याचं होत नाही असं पाहून किक्लाने त्याच्या हातातून फोन खेचून घेतला. आणि जोरात शिवी देऊन म्हणाला, " ए सोल्या, जलदी आ जाना. मीटिंग बैठी है. मै तेरा लाड प्यार करनेवाला किशा नही. समझे ? और एक बात उस डाक्टरके बच्चेको भी साथ लाना. अब किशाका राज खतम हो गया. " मग त्याने फोन ठेवून दिला. सोल्याला किक्लाचं बोलणं आवडलं नाही. त्याच्याशी असं कोणीही आजपर्यंत बोललेलं नव्हतं. इस हरामीकी तो मै जीभही उखाड दूंगा असा विचार करीत राहिला. गुड्डी नुसताच उभा होता. त्याला पाहून किक्ला म्हणाला, " जा खाने पीनेका बंदोबस्त कर. " पुढचं काही करायला लागू नये म्हणून तो लगेचच सटकला. बाहेर आल्यावर त्याने एका वेटरला बोलावून सगळी व्यवस्था करायला सांगितली. आणि मग तो श्रीपतला ठेवलेल्या रूमकडे गेला. खरंतर त्याला ह्या रूममध्ये भीती वाटत असे. श्रीपत इथेच तर मेला होता.अर्ध्या पाऊण तासात सोल्या आणि डॉक्टर आले. सोल्याला गुड्डी कुठेच दिसला नाही. कधी मधी तो गुड्डीलाही वापरीत असे. गुड्डी त्यातही मजा मानीत असे. त्याने सोल्याशी संबंध चांगले ठेवले होते. वेळ आलीच तर सोल्या इतरांसारखे आपले हाल करणार नाही याची त्याला खात्री होती. असो. सोल्या आणि डॉक्टर केबिन मध्ये शिरले. दोन रिकाम्या खुर्च्यांवर बसले. खरंतर सोल्याला ही जागाच आवडली नव्हती. दादा असताना कशी त्याच्या मोठ्या केविनमध्ये मीटिंग होत असे. जास्तीचे इतर विचार बाजूला सारून त्याने किक्लाला विचारले, " भाई अभी ये मीटिंग कायकू बुलाएला है ?....... " फालतूकी किचकिच असं त्याला म्हणायचं होतं. पण किक्लाची तिरसट नजर पाहून त्याने शब्द गिळले. किक्ला हातातला चिकनचा तुकडा बाजूला ठेवून म्हणाला, " सब लोग सून लो , अब मै तुम लोगोंका लीडर हूं. और मै बोलता है वैसाही होगा. अब हम ऐसा करते है के अपना माल पहुंचानेका धंदा जारी रखेंगे. यानेकी चरस,गांजा, अफीम . इसमे ज्यादा पैसा है. चार पाच महिनेतक ये काम हम कर लेंगे. बादमे देखेंगे क्या करना है. बैंक लोकरसे मिला हुवा कागजाद अभी अपने पास होते तो भी हम लोग मालामाल होते. लेकीन तकदीरने साथ नही दिया. मेरे पास अभी एक दो करोडका माल पहुचानेका काम है. जलदीही उसका आता पता मिल जायेगा . कोईभी कही नही जायेगा. मेरे संपर्कमे रहना. समझे?..... . फिर मिलते है दो दिनके बाद. किसीको कोई शक या सवाल ? " ....... असं म्हणून त्याने पंधरा वीस मिनिटे घालवली. तीन वाजत होते. खरंतर कोणालाच फारसा उत्साह नव्हता. किशाकडे कसं हरतऱ्हेचं काम होतं. या चोट्ट्या कामातून असं काय मिळणार , असा भाव प्रत्येकाच्या तोंडावर होता. तो किक्लाने ओळखला. तो त्या बाबत बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात केबिनच्या बाहेर काही तरी हालचाल जाणवून किक्लाने आपलं पिस्तूल बाहेर काढलं. मग प्रत्येकाने आपापले पिस्तूल बाहेर काढून हालणाऱ्या दरवाज्याकडे रोखले. दरवाज्या उघडून काकाजी आत शिरत होते. सगळेच एकदम स्तंभित झाले. जिसका जिकर किया वही सामने आ गया. असं किक्लाला वाटलं आणि हा शुभ शकुन मानून त्याने सगळ्यांना पिस्तुलं खाली वळवायला सांगितली. तिथेच तो चुकला. त्याचं नेटवर्क किशासारखं स्ट्राँग नव्हतं. नाहीतर त्याला खबर लागली असती. काकाजी आत आले आणि काही न बोलता उभेच राहिले........ ते पाहून किक्ला म्हणाला, " क्यूं बे काकाकी अवलाद तू है किधर. साले पूरे गैंगको तकलीफ हुई और तू गुम हो गया क्या ? किधर है सब पैसा ? जलदी बोल. " काकांना हा माणूस नवीन होता. ते घाबरले. पण चाचरतं " मा.. मा....मालूम नही " एवढंच म्हणाले. त्यावर सोल्या किक्लाला अडवीत म्हणाला, " ये ऐसा नही बोलेगा. मै मेरा ट्रीटमेंट देता हूं. " परिस्थिती आपल्या हातातून जाऊ नये यासाठी किक्ला म्हणाला, " अभी तेरी सजा देनेका वक्त नही है. इसको तो मै संम्हालूंगा. " असे म्हणून उठत हातातले पिस्तूल काकांकडे रोखून तो काही बोलणार तेवढ्यात बाहेरून एक दोन गोळ्या केबिनच्या दिशेने झाडल्याचे आवाज आले. मग पुन्हा आवाज येतच राहिले. याचा अर्थ बाहेर कोणीतरी आहे. सगळ्यांनीच मग आपापली पिस्तुले रोखून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने गोळ्या झाडल्या. एवढ्या जवळून काकांना पिस्तुलाचा आवाज ऐकायची सवय नव्हती . ते दरवाज्याच्या बाहेर धावत सुटले. आता मात्र इन्स्पे. डावले, देखणे, श्रीकांत , नेटके गोळ्या झाडीत पुढे आले. दरवाज्यातून आता सगळेच गोळ्या झाडीत पुढे आले. पोलिसांच्या गोळ्या अडवीत जो तो पळू लागला. त्यात कशावर तरी पाय घसरून किक्ला पडला आणि त्याच्या हातातून पिस्तूल दूर जाऊन पडले. पोलिसांचा गोळीबार कमी झाला. समोरून गोळीबार होत असतानाही झेप घेऊन इन्स्पे. डावलेंनी नेटक्यांच्या मदतीने किक्लाला घट्ट पकडून धरले. आता आपली काही खैर नाही असं समजून पोलिस पुन्हा गोळीबार करणार तेवढ्यात त्यांना सोल्या , काण्या, डॉक्टर , मिस्चिफ आणि गुड्डी पळताना दिसले. पळण्यात डॉक्टर ,मिस्चिफ आणि गुड्डी यशस्वी झाले. तिघेही तीन दिशांना पळाले. त्यातल्या त्यात मिस्चिफ डॉक्टरच्या मागावर राहिला, त्याच्या हाताला गोळी चाटून गेल्यामुळे जखम झाली होती. मरणाची आग त्याच्या हाताची होत होती. कसंतरी डॉक्टरला पकडून तो त्याच्याच गाडीतून पळाला. गुड्डी हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या भट्टी जवळच्या रस्त्यावरून फॉकलंड रोडकडे पळाला. त्याला स्वत:ची स्कूटर मात्र नशिबाने चालू करता आली. तो एका मावशीच्या घरी धडधडत्या छातीने पोहोचला. पोलिसांनी सोल्या, किक्ला आणि काण्याला ताब्यात घेतले. कसेतरी जेरबंद करून व्हॅनमध्ये घातले. त्यांच्या हातात घट्ट बेड्या घातल्या आणि गाडी पोलिस स्टेशनकडे विजयी मुद्रेने निघाली. मुख्य म्हणजे डावलेंना हवा असलेला किक्ला पकडता आला होता. गाडी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचत आली तेव्हा किक्ला म्हणाला, " अरे इन्स्पेक्टर साब कमसे कम बिडी शिडी तो पीने दो, थोडा तो हाथ ढिला करो. " पण डावले एवढे उत्तेजित झाले होते की ते म्हणाले, " अब बिडी क्या तेरेको तो पानी भी मिलना मुष्किल करूंगा " त्यावर किक्ला म्हणाला, " सोच लो . फिर बात करो. आपको पता है आप किससे बात कर रहे है . " आता मात्र सहन न होऊन डावलेंनी त्याला एक सणसणीत कानफटात मारली. श्रीकांतसर म्हणाले, " डावले कूल डाउन, आपण याला आत घेऊ, मग आपलंच राज्य आहे. " काण्या थोडा घाबरलेला दिसला. पण सोल्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता. त्याला किक्ला सारखा टुकार माणूस गँगचा प्रमुख झाल्याचा राग आला होता. याच्याजवळ काहीच उपाय नाही. किशा असता तर सगळ्यांनाच वाचवलं असतं. आश्चर्य म्हणजे काकाजी पण आत बसले होते. त्यांना पाहून किक्लाला ते पोलिसांना मिळालेले आहेत याची खात्री झाली. आपल्याला पाहिजे असलेली माहिती त्यांनी पोलिसांना दिली असणार हे त्याला उमगलं. स्टेशन जवळ आल्याबरोबर आणखीन दोन चार हवालदार पुढे आले. बसलेल्या तिघांची बकोटं धरून त्यांना आत घेऊन इतर लोकांना जिथे ठेवले होते. त्या कोठडीत ढकलले. किक्ला आत आलेला पाहून सूर्या उठला आणि त्याचे पाय धरून म्हणाला, " ये सब लफडा काकाजीने किया . हरामजादा. " किक्लाने त्याला उठवीत म्हंटले, " अब यहांसे निकलेंगे जभी सोचेंगे. " मग त्याने जवळच असलेल्या बाकड्यावरून दोघे तिघे बसले होते. त्यांना जरब दाखवीत उठवले, आणि तो स्वतः एखाद्या बादशाहसारखा बसला. सूर्याने पाण्याने भरलेला ग्लास त्याच्यापुढे धरला आणि आपली वफादारी अदा केली. तो ग्लास तोंडाला लावणार एवढ्यात कोठडीचं दार खाडकन उघडून इन्स्पे. डावले , नेटके आणि श्रीकांत आत आले. त्याच्या हातातला पेला हाताने उडवीत ते म्हणाले, " मैने बोला था न ? तेरेको पानीभी पीने नही दूंगा. " आता तिघांनी त्याची मरम्मत चालू केली. किक्लाच्या डोळ्यात विखार आला. त्याने अंगातला सर्व जोर एकवटून डावले आणि नेटकेना ढकलले. त्यासरशी ते दोघे समोरच्या भिंतीजवळ जाऊन पडले. आता मात्र त्या तिघांनी त्याला चार्जरूममध्ये आत्ताच घेण्याचे ठरवले. त्याला पकडून धरीत ते म्हणाले, " चल तेरेको बताता हूं , पुलिसपर हाथ उठानेका नतीजा. "


******** ************ **************** **************** ************** ********

बराच वेळ झाला पण नीता आणि निलू यांना झोप लागेना. लाइट मालवून अर्धा तास होऊन गेला होता. खरंतर लगेचंच घरातलं विस्कटलेलं सामान नीट लावायला हवं होतं. पण नीताला काही सुचेना. तिला निलूचा रागही आला होता. हिच्या समोर हे सगळं घडलं. काही वेळ तरी ती तिला शिव्या शाप देत राहिली. मग मात्र मनाने तिच्यापुढे एक विचार सरकवला. ती होती म्हणून जास्त काही घडलं नाही . नाही म्हंटलं तरी" एकसे भले दो ". ती बोलो का न बोलो तिचं अस्तित्व थोडा फार तरी दबाव त्यांच्यावर आणीत होतं. कदाचित हेच बरोबर असेल , आता असं तिला वाटू लागलं. मग तिने थोडा वस्तुनिष्ठ विचार केला. सध्या आपण झोप घालवून आवरणार आहोत का ? मग आपण कांगावा कशाचा करत आहोत ? हे सगळं या काकांमुळे घडलं. त्यांच्यामुळे असली लोफर माणसं आपल्या घरी आली. त्यांची तोंडं एकेक करून तिच्या डोळ्यासमोर आली तसतशी तिला किळस वाटू लागली. पुन्हा एकदा भावनांना दाबून तिने निदान आत जाऊन

आतले अस्ताव्यस्त पडलेले कपडे कपाटात घालावेत असं ठरवलं. आता ती इथला लाइट लावणार नव्हती. निलू झोपली होती. ती उठली. कशी तरी पाय ओढीत आतल्या खोलीत गेली. एकदाचे कपडे तिने एकत्र गुंडाळले आणि समोरच्याच कपाटात कोंबले. तेव्हा कुठे तिला जरा खोलीकडे बघावंस वाटलं. मग एकदम आपले सगळे दागिने नाहीसे झाल्याचं तिच्या लक्षात आलं. नाही म्हंटलं तरी पस्तीस चाळीस हजाराचे दागिने होते. त्यात आठवणीने सांभाळलेलं रमेशच्या आईचं जास्तीचं मंगळसूत्र होतं. सासरा फालतू निघाला तरी तिला आपल्या न पाहिलेल्या सासू बद्दल सहानुभूती होती. रमेशने तिच्याबद्दल तिला बरंच सांगितलं होतं. त्यांचा फोटोही फार सोज्वळ आणि मायाळू दिसत होता. तिचं लक्ष सहज म्हणून सासूच्या फोटोकडे गेलं.ती बराच वेळ फोटोकडे पाहत राहिली. मग तिला आठवलं. आपण पोलिसात तक्रार नोंदवायला हवी. पण आपण कशा जाणार ? कधी गेलोच नाही . रमेश आला की पाहू. पण दोन तीन दिवस रमेशची वाट पाहून तिने तक्रार नोंदवायचं ठरवलं.त्यामुळे तात्पुरती का होईना मनाची समजूत काढली गेली. तरीही ती दोन तीन दिवसांनी रमेश नसला तर जाणार नाही हे मन दाखवू लागलं. तिने तिकडे लक्ष दिलं नाही. ती वळून बिछान्याकडे जाणार तोच फोनची बेल वाजली. ती एकदम घाबरली. जवळ जवळ तीन वाजून गेले होते. एवढ्या रात्री कोण असणार ? रमेश ?, काका ? की आलेले गुंड ? बेल थांबेना. आणि निलू उठली तर उगाचच चर्चा . म्हणून तिने घाबरत फोन उचलला. तिचा घसा कोरडा पडला होता. पलीकडून रमेशचा चिडका आवाज येत होता. " नीता किती वेळ फोन उचलायला. काही झालंय का ? त्यावर घसा खरवडत ती म्हणाली, " छे, छे काही नाही. " तो म्हणाला, " मी उद्या रात्री दहा वाजेपर्यंत येतोय. जागी राहा. " आता मात्र तिला बरं वाटलं आणि हुंदकाही फुटला. पण रमेशने फोन बंद केल्याने तो त्याला ऐकू आला नाही . मग बराच वेळ विव्हळल्यानंतर तिला हलकं वाटलं. मग ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी त्या दोघी आठ साडेआठ पर्यंत उठल्या.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all