कामथे काका (भाग १९)

लॉंचवर एकुण पाच सहा माणसं होती.......

लाँचवर एकून पाच सहा माणसं होती. तिच्या इंजिनाचा आवाजही स्पष्ट ऐकू येऊ लागला. कुणीतरी फेटेवाला पुढेच उभा होता. पण अजून त्याचा चेहरा दिसत नव्हता. लाँचमधल्या लोकांनीही पिस्तुलं सरसावलेली होती . अचानक पाण्यावर मोठ्या लाटा उसळू लागल्या. समुद्राला काय झालंय कोणालाच कळेना. बऱ्याच अंतरावर दिसणारी लाट अचानक किनाऱ्याजवळ आली. तीनचार फुटांवर आल्यावर किक्लाने अंधारातच दिवाणजींना बॅग फेकायला सांगितली. त्यांनी बॅग फेकली. काण्याने शिताफीने पार्सल लाँचवर फेकले. ते लाँचमधे जाऊन आदळले. . तरंगणाऱ्या बॅगेवर काण्याने झडप घातली. स्वतःकडे खेचली. पण पोलिसांच्या दोन्ही गटांकडून फायरिंग सुरू झालं. शिताफीने लाँच वळली . आणि अंधारात वेगाने पाणी कापीत निघून गेली. पण झालेल्या गोळीबारामुळे लाँचवरचे दोघे जण जखमी झाले. आणि काण्याने खेचलेली
बॅग त्याला लागल्यामुळे पुन्हा पाण्यावर तरंगू लागली. आता किक्ला आणि मिस्चिफ दोघांचाही बेधुंद गोळीबार चालू झाला. दोघेही पोलिसांना घाबरणारे नव्हते. पण ते स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात किनाऱ्यापासून दूर जाऊ लागले. बॅग मात्र तशीच तरंगत राहिली. मागे पाहत गोळीबार करीत दोघेही कसे बसे जिथे ते गाडीने उतरले होते तिथे आले. किक्लाच्या हाताला गोळी लागल्याने तो ओरडू लागला. गुड्डीच्या नावाने तो शिव्या देत होता. त्यांना आता गाडी नक्की कुठे उभी होती. कळेना. पण मोठ्या शिताफीने गुड्डीने गाडी पुढे आणली. कसे बसे ते गाडीत शिरले. शिरले कसले , लुढकले. गाडी वेगाने विरुद्ध दिशेत धावू लागली. तरीही मिस्चिफने फायरिंग चालूच ठेवलं. त्याच्या गोळीबारात एक दोन पोलिस जखमी झाले. डावले पाण्यावर तरंगणाऱ्या बॅगेकडे धावले. त्यात नक्कीच पैसे असणार. त्यांनी बॅग घेतली. उघडली. पण ..... ती रिकामी होती. म्हणजे किशाच्या टोळीला फसवायचा त्यांचा विचार असावा. बहुतेक किशाच्या लोकांना कशाला पैसे द्या ? किंवा किशाने
त्यांना आधीच लुटले असावे, म्हणूनही असेल. मग सगळेच जण गाडीत बसले. प्रथम जखमी पोलिसांची व्यवस्था केली. आणि ते पोलिस स्टेशनकडे निघाले. किक्ला आणि मिस्चिफ दोघेही डिलाइटला पोहोचले , तेव्हा पाच वाजत होते. त्यांनी प्रथम टोळीच्या डॉक्टरला बोलावले. मग बिछान्यावर पडल्या पडल्या किक्लाने गुड्डीला यथेच्छ शिव्या दिल्या. एवढ्या प्रयत्नांचा शेवट काहीही न मिळण्यात झाल्याने त्याला निराश आली. सध्या तरी सूर्याच्या ऑफिसपासून त्यांनी दूर राहण्याचे ठरवले.


*********** *************** ************* **************** ******

सोमवार उजाडला. नवीन मोठी बातमी घेऊन . प्रत्येक पेपराच्या पहिल्या पानावरच गडद मथळ्याखाली श्रीकांत सहकारी बँकेवर पडलेल्या दरोड्याचे तपशीलवार वर्णन आणि ताब्यात घेतलेल्या किशाच्या टोळीतील सगळ्या गुन्हेगारांची नावं आली होती. त्यात काकांचंही नाव होतं. पण त्यांना ओळखणारे फार थोडे होते. तसंही बाकीच्यांना ओळखणारे फार होते असं नाही. पण गुन्हेगारी जगतात ते
प्रसिद्ध असल्याने तिथे त्यांनी खळबळ उडवून दिली. किक्ला, मिस्चिफ , सोल्या आणि काण्या आता सावध झाले होते. आदल्या रात्रीच्या अपयशानंतर त्यांनी नवीन प्लानला सुरुवात केली. त्यात मिस्चिफला मजा वाटेना. दाखवत होता , तेवढा काही किक्ला हुशार नव्हता. दादासारखा तर मुळीच नव्हता, असं त्याची कल्पना झाली. अजून सोल्याला संपर्क होत नव्हता. साधनाला धक्का बसला नाही. पण वाईट वाटलं. तरीही बँकेतले पैसे आता गेल्याने तिला काकांचा राग आला. त्यांनी टोळीचा आश्रय का घेतला तिला समजेना . नरेश गडा कडे तिने त्यांना नक्कीच सांभाळून घेतलं असतं. पण असतं एकेकाचं नशीब . पण आपलं नशीब मात्र बिघडलं असं तिला वाटू लागलं. काका कसे होते याचा तिला अनुभव होता. मात्र पोलिसांना खबर कशी मिळाली याचं तिला आश्चर्य वाटत होतं. सोनाला अर्थातच तिने काही सांगितलं नाही. नाही म्हणायला एक दोन वेळा तिने काकांची आठवण काढली होती. पण दोष मात्र साधनाला दिला होता. मम्मी काहीतरी बोलली असेल म्हणूनच ते आले नाहीत असं तिला वाटत होतं. साठे मामा , कापसे बाई आणि इतर रहिवासी यांना चांगलाच धक्का बसला होता. पण आपण तक्रार केली हे बरं झालं, असं मामांना वाटत राहिलं.ते लहानसहान धागे जोडत राहिले. पोलिसांनी बोलावलं तर त्यांना पूर्ण मदत करण्याची त्यांनी तयारी ठेवली. जाणारा येणारा बँकेच्या सील केलेल्या दरवाज्याकडे पाहू लागला. नीताने मात्र रमेशला ताबडतोब फोन करून सगळी इत्थंभूत माहिती दिली. म्हणजे काकांचं त्याच्या जाण्यानंतरचं वागणं , दोन तीन दिवसांपासून अदृश्य होणं आणि पेपरातली बातमी . आता तिला पक्की खात्री झाली , की काकांना घरी यायला तोंड नाही. म्हणजे त्यांचा मित्र आणि त्याची मुलगी वगैरे सर्व खोटं होतं तर. त्यांना कोणत्याही प्रकारे इथे ठेवून पाठिंबा देणं घातक होतं. श्रेयाच्या दृष्टीनेही ते चांगलं नव्हतं. ती अधून मधून आठवण काढीत होती ,पण नीताने तिला काहीबाही सांगून गप्प बसवली. आणि ते आता कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले असल्याचे तिने सांगितले. रमेशच्या बिल्डींगमध्ये कोणी चौकशी केली नाही. कारण बहुतेक सगळे नवे होते. रघुमलला मात्र आश्चर्य वाटलं. तसा नीताला काही त्रास झाला नाही. सोमवारी रात्री मात्र एक फोन आला . बोलणारा कोण होता काही कळलं नाही . त्याने फक्त एवढंच विचारलं काकाजी है. ती नाही म्हणाली. इथेच ती चुकली. बोलणाऱ्याला कोण काकाजी असं विचारलं असतं तरी त्याला संबंध जोडता आला नसता. बोलणारा किक्ला होता. आता त्याची खात्री झाली की हा काकांचाच दूरध्वनी आहे. त्याने पत्ता शोधून काढला. त्याचा पुढचा विचार काय असेल ते नीतासारख्या साधारण स्त्रीला काय कळणार ?

इकडे, घरी थोडी फार झोप काढलेल्या डावलेना सकाळी लवकरच पो. स्टेशनला जावं लागलं. डीसीपी गर्दम साहेबांकडे मीटिंग होती. ताराबाई सरडेंची केस फाइल तयार करून खंडागळे, डावले आणि नेटके साहेबांपुढे उभे राहिले. सगळं ऐकून घेतल्यावर आणि चर्चा पूर्ण झाल्यावर गर्दम साहेब म्हणाले, " ठीक आहे, आज रिमांडसाठीचा प्रयत्न करा आणि जरा लक्ष ठेवा. किशाच्या विरोधात असणाऱ्या पेरियरच्या टोळीत काय बदल होतोय आणि किशाची जागा घेणारा कोणी नवीन तयार होतोय की काय तेही पाहा. "
मग डावले न राहवून म्हणाले, " सर त्या कामथेचं काय करायचं? " ...... मग सर म्हणाले, "आधी रिमांड तर मिळवा. आणि त्याला आणखीन सडवा जरा. एकदम त्याच्यावर विश्वास ठेवून कारवाई करू नका. पण तो सांगतोय ते प्रत्यक्ष त्याला बरोबर घेऊन जाऊन तपासून पाहा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ऍप्रूव्हर करायला हरकत नाही, पण सावधानतेने सर्व करा. खंडागळे साहेब तुम्ही पण जरा डावलेना मदत करा. त्यांना थोडी तरी विश्रांतीची गरज आहे. नाहीतर फोर्सवर त्यांच्या तब्येतीची जबाबदारी येईल. आजच्या पेपरात आलेली बातमी पुष्कळच संतुलित होती. मिडियाने प्रथमच पोलिसांवर दोषारोपण केलेलं नाही. डावले साहेबांचं काम ठीक चाललंय. इन्स्पे. श्रीकांतनाही बरोबर घ्या. पण त्यांचं ज्योतिष बरोबर घेऊ नका. "...... ‌ सगळेच जण बेताने हसले आणि बाहेर आले. खंडागळे जरा नाराज दिसले. वरिष्ठांनी कनिष्ठांबरोबर काम करायचं मग ह्यांनीही बरोबर यायला हवं, असं त्यांच्या मनात आलं. पण ते काहीच बोलले नाहीत. ते आपल्या केबिन मध्ये गेले..... डावले, नेटके आरोपींना घेऊन कोर्टात गेले. पुढचं सगळं उरकणं भाग होतं. एकदा का श्रीकांत सर आले की जरा तरी विश्रांती मिळेल याची डावलेना खात्री वाटू लागली. काका आणि इतर आरोपी वेगवेगळ्या कारणाने निर्धास्त होते. काका सोडून इतर सगळेच पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असल्याने त्यांना ते सगळं दैनंदिन वातावरण वाटलं. त्यांचा जन्मच मुळी पोलीस, कोर्ट, जेल यासारख्या संस्थांशी निगडित होता. काकांचं तसं नव्हतं. काकांना थोडी आशा होती. पण माफीचा साक्षीदार होणं याची काय प्रक्रिया आहे ते त्यांना माहिती नव्हतं. त्यांना वाटत होतं की आजच्या आजच कोर्ट हे मंजूर करील आणि ते सुटून घरी जातील. पण कोर्टात फक्त,प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार मिळाल्याचा उल्लेख मात्र सरकारी वकिलाने केला होता. परंतु पुढील तपासावर ते नक्की ठरेल असं कोर्टाला मोघम सांगण्यात आलं. अर्थातच नावं सांगीतलं गेलं नाही. पण त्यासाठी पंधरा दिवसाचा रिमांड मात्र मागितला होता. तो कोर्टाने दहा दिवसांचा दिला. आणि नंतर तपासाची गरज पाहून तो वाढवला जाईल असही म्हंटलं. त्यामुळे पोलिसांना बरं वाटल्याचं दिसलं. काकांच्या लक्षात आलं की अजून निदान दहा दिवस तरी सुटका नाही. घरचं कोणीही भेटायला येण्याचा प्रश्नच नव्हता. साधनाचा अधिकृत रित्या संबंध नव्हता आणि नीता संबंध असूनही तो ठेवू इच्छित नव्हती. जगण्याला काही अर्थच नव्हता. सगळा प्रकार साधारणपणे चार वाजेपर्यंत चालला. जेवण खाण मिळालं नाही. मग ते सगळे पो. स्टेशनला पोहोचले. मात्र काकांनी आणखी एक चांगलं काम केलं. रात्री जेवण झाल्यावर ( आता त्यांना ते कदान्न सुद्धा हवं हवंसं वाटू लागलं. भुकेला कोंडा हेच खरं. ) त्यांनी डावले साहेबांची भेट मागितली. पण नेटकेंनी त्यांना काय सांगायचंय ते आपल्यालाच सांगावं असं म्हंटल्याने काका गप्प बसले. ते अर्थातच नेटकेंना आवडलं नाही. पण ते सध्या काहीही बोलले नाही. रात्री दहाच्या सुमारास डावले आले तेव्हा सगळ्यांनाच पुन्हा चार्जरूममध्ये घेण्यात आलं. त्यात काका नव्हते. बाकीच्यांची चौकशी नेटके आणि इतर दोघा तिघांना करावयास सांगून काकांना डावलेंनी बोलावले. तेव्हा काकांनी त्यांना संजीव दीनानाथ जांभळे याच्याबद्दल सांगून किशाचा देशाबाहेर जाण्याच प्लान आणि त्याचा वाळकेश्वरला असलेल्या फ्लॅट संबंधी सांगितले. तेव्हा डावले जरा रागावून म्हणाले, " हप्त्या हप्त्याने माहिती सांगतोस काय ? परिस्थितीचा अंदाज घेतोस आणि मग सांगतोस की काय ? " तेव्हा काका हात जोडून म्हणाले, " तसं नाही सर, पण जेव्हा जे जे आठवतंय ते तस तसं सांगतो. " मग डावले म्हणाले , " साधारण किती पैसे दिले रे तुला ह्या किशाने ? म्हणजे आमचा तपास चुकीच्या मार्गाने होऊन आम्ही गोंधळात पडावं यासाठी " मग मात्र काका पाय धरून म्हणाले, " सर तसं काही नाही, मला खरंच आठवतंय तसं सांगतोय. " ...... थोडावेळ जाऊन देऊन ते म्हणाले, " बरं बरं. समोर त्या खुर्चीवर उभा राहा. मी उतर सांगे पर्यंत. " ते आज्ञाधारकपणे उभे राहिले. आतून होणारा आरडाओरडा ऐकू येत होता. डावले आज जरा विचार करणार होते. हे सगळं श्रीकांत सरांशी चर्चा करून ठरवावं असं त्यांना वाटू लागलं.

डावले साहेब वाचण्यासाठी फाइल काढणार एवढ्यात त्यांचा फोन वाजला. तो खबरीचा फोन होता, "साबजी खबर है, लेकीन पीछे की बक्षिशी बाकी है, वो कब मिलेगी? " डावले वैतागून म्हणाले, " खबर देनी है तो दे, नही तो रह्ने दे. पैसा कही नही जाएगा. जलदी बोल और बंद कर. " ते ऐकून खबरी म्हणाला, " सर किक्ला छूटके आया है और कहां छिपा है इस जानकारी के लिये आप मिलिये. " फोन बंद झाला. " किक्ला "! डावलेंनी स्वतःशी नाव उच्चारलं. मग त्यांना तो आठवला, लाल तात्याचा साथीदार. ते जरा विचलित झाले. हा तर किशाची जागा घेणार नाही ना? मग तर सगळंच वाईट. आपल्याला खबरी कडून त्याच्या बिळाची माहिती करून घेतली पाहिजे. कोणत्या बिळात लपलाय साला, कोणास ठाऊक. तो आणखी कोणाकोणाबरोबर आहे तेही कळलंच पाहिजे. स्वतः जाण्यापेक्षा त्यांनी बेंजामिनला जायला सांगितलं. साडेबारा एकच्या सुमारास सगळ्यांना परत कोठडीत ठेवण्यात आलं. अजूनही काका त्या सगळ्यांमध्येच होते. सूर्याला अधूनमधून ताव येत होता. काका सोडून बाकी सगळेच विव्हळत होते. आज मात्र सूर्या सोडून इतरांकडून बरीच माहिती मिळाली होती. काकांच्या डोळ्यांमध्ये झोप तरळत होती. ते सगळेच मग झोपेच्या आधीन झाले....... सकाळ झाली, पेपरातली बातमी आता शिळी झाली होती. आता या नंतर येणाऱ्या संबंधित बातम्या फार धुरळा उडवणार नाहीत. याची काकांना कल्पना आली. अर्थातच पेपर पाहिला मिळालेला नव्हता........ पण आपलं काय? पुन्हा प्रश्नोत्तरांचा तास मनाने सुरू केला. आजूबाजूला बसलेल्यांशी काही बोलण्याची सोय नव्हती. पोलिसांचं लक्ष खूप होतं. काकांना आपल्याला वेगळं ठेवावं असं वाटत होतं. पण तशी शक्यता कमी होती. नाही म्हणायला एक वेगळीच घटना घडली. परमेश्वराला जुन्या गोष्टी पुनरुज्जीवित करण्यात काहीतरी समाधान मिळत असावं, असं काकांना वाटलं. सकाळी दहाच्या सुमारास इन्स्पे. डावले दुसऱ्या केसेस पाहत होते. तेवढ्यात एका करड्या आवाजाच्या व्यक्तीने त्यांना अभिवादन केले. " गुड मॉर्निंग, डावले साहेब. " असं म्हणत एक कणखर हात डावलेंच्या हातात घुसला. ते होते. एसीपी वागळे. काकांना चेहरा दिसला नाही पण आवाज ओळखीचा वाटला. डावले साहेब उभे राहिले. आणि वागळे साहेबांना बसण्याची खूण करीत बसले. आज तुम्ही इकडे कसे काय, असं विचारणार एवढ्यात वागळेच म्हणाले, " मी उद्या रिटायर होतोय. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे. तुम्हाला यायचंय आणि श्रीकांतनाही. ते दिसत नाहीत कुठे? " असं म्हंटल्यावर डावले एका केस मध्ये फार व्यग्र असल्याचे म्हणाले. मग त्यांनी वागळे सरांना किशाच्या केसचा तपशील सांगितला. त्यावर थोडं इकडचं तिकडचं बोलणं झालं. तरीही वागळे सरांनी त्यांना पार्टीला येण्याचा आग्रह केला. आणि खातं कसं आपल्या बाबतीत दुर्लक्ष करतं हे त्यांनी डावलेना सांगितलं. नाहीतर त्यांना पुढची बढती केव्हाच मिळाली असती. आणि आहे त्या पदावर निवृत्त व्हावं लागलं नसतं. तेवढ्यात फोन आला. तो गर्दम साहेबांचा होता. " डावले, त्या ऍप्रुव्हरचं नाव काय म्हणालात? " डावले म्हणाले, " रामचंद्र भास्कर कामथे " त्यावर साहेब म्हणाले, " ठीक आहे त्याला घेऊन जाऊन तपासाचे धागे नीट जुळवा म्हणजे लवकर काम होईल. आत्ताच कमिशनर साहेबांचा फोन आलाय त्यांनी दोन तीन केसेस मध्ये लवकर कारवाई करायला सांगितली आहे. बँकेवर खातेदारांनी पैशासाठी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यात पोलिसांचा तपास पूर्ण झाला की नाही ते लागेल. "... डावले येस सर म्हणाले. फोन बंद झाला. पण वागळे म्हणाले, " हा कामथे आरोपी आहे, त्याला मी चांगलाच ओळखतो. कुठे आहे तो? बोलवा. " डावलेना आश्चर्य वाटलं. पण त्यांनी काकांना बोलवून घेतलं. (अंग दुखत असल्याने )कसे तरी उभे राहत काका आले. त्यांना पाहून वागळे कडकपणे म्हणाले, " काय रे चार वर्ष आत जाऊन आलास तरी अजून तुझे धंदे चालूच आहेत? " मग डावलेंकडे वळून ते म्हणाले, " याला मी चांगलाच ओळखतो. याच्या नम्र बोलण्यावर जाऊ नका. सावध राहा. " मग डावलेंनी काकांना घेऊन जाण्यास सांगितले. काकांना घरी आलेल्या रेडची आठवण झाली. हेच वागळे घरी आले होते. आणि नाही नाही ते बोलले होते. काकांची उरली सुरली आशा संपली. आता काय कपाळ सुटका होणार? ते डोक्याला हात लावून बसून राहिले. थोड्या वेळाने वागळे गेले. अजूनही बाकीचे सगळे लोळत पडले होते. काकांनी कोणाचही लक्ष नाही असं पाहून लपवलेला मोबाइल काढला आणि चालू केला. पाच सहा मेसेजेस तरी होते. एक दोन साधनाचे , एक दोन नीताचे एक दोन संजीव जांभळेचे होते. आणि एक गुड्डीचा पण होता. त्यांनी मेसेज वाचला आणि काढून टाकला. काका कुठे आहेत हे त्याने विचारले होते. बहुतेक मेसेज बातमी पेपरात यायच्या आधीचा असावा. त्यांनी परत फोन बंद करून ठेवला. एका लहानश्या उंदराच्या बिळात ते मोबाइल ठेवीत होते. दिवस कसातरी जात होता. बारा वाजून गेले होते. थोड्याच वेळात श्रीकांत सर आले आणि डावलेना आनंद झालेला दिसला. इकडची तिकडची खुशाली झाल्यावर डावले म्हणाले, " मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय पण आपण जेवायला जाऊ तेव्हा बोलू..... " एवढ्यात आरोपींसाठी जेवण आलं. काकांना आश्चर्य वाटलं. आता कुठे साडेबारा होत होते. आता कुठे कोठडीतले सगळे उठले होते. जेवणाची ताटं उठताक्षणीच पाहता त्यांनाही जरा आश्चर्य वाटलेले दिसले. एक वाजेपर्यंत त्यांची जेवणं झाली. सूर्या अजून विचारात होता. तेवढ्यात नेटके कोठडीत डोकावून काकांना म्हणाले, " भरपूर जेवून घे. रात्री तुला आत घ्यायचंय. " ते ऐकून बाकीच्यांना बरं वाटलं. मग ते सूर्याकडे वळून म्हणाले, " फार जोर आहे नाही तुझ्यात? काय रे ए पाटील. साला पाटीलचा कटील झालास काय? तुला काय वाटलं आम्ही विसरू? पण तुझ्या सारख्यांची जन्मकुंडली असते आमच्याकडे. भेटू रात्री. " मग ते गेले. थोड्या वेळात श्रीकांत आणि डावले पण बाहेर गेले. एवढ्या मरम्मत झालेल्या शरीराने पण अकडा आणि राजासाब आगपेटीच्या काड्यांचा जुगार खेळत होते. कसं ते त्यांनाच माहीत. ती त्यांची वेळ घालवण्याची नेहमीची पद्धत असावी. ते पाहून सूर्या करवादला, " ए बंद कर दे यार...... " त्यावर अकडा म्हणाला " ये तेरा हापिस नही सरकारी जेल है. चूप कर भोसडीके. तेरी वजहसे सब हुवा है. " हे ऐकल्यावर सूर्या उठला आणि आपला दुखरा हात सांभाळीत त्याने अकड्याला एक कानफटात मारली. " त्या बरोबर बाहेर उभा असलेला हवालदार ओरडला, " चुप बसा ए *****नो, लाथ घालू का एकेकाच्या **वर? " मग ते थांबले.

अजूनही पोलिसांना किशाच्या वाळकेश्वरच्या फ्लॅटचा पत्ता मिळालेला नव्हता. आणि इतरही माहिती अर्धवट होती. रात्र झाली. काहीच वेगळं घडत नव्हतं. पोलिस स्टेशनातलं रूटीन चालू होतं. डावले जेवून आले होते. त्यांना श्रीकांतसरांनी बरीच माहिती दिली होती. केसकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी सांगितला होता. हळू हळू रात्रीचे दहा वाजत आले. बहुतेक जण आता पेंगायला लागले होते. राजासाब, अकडा आणि इतर जुगार खेळण्यात मग्न होते. काकांना झोप येत होती. तेवढ्यात नेटके आणि

देखणे आत आले आणि जुगार खेळणाऱ्यांना बेदम मारहाण करू लागले. " तुम्हाला काय तुमचा अड्डा वाटला का रे? मग पुन्हा काकांना सोडून बाकीच्यांना चार्जरूममध्ये घेऊन गेले. दहा पंधरा मिनिटातच त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. विशेषतः सूर्याच्या. त्याला उलटा टांगून त्याची मरम्म्त चालू होती. त्याच्याकडून त्यांना वाळकेश्वरच्या फ्लॅटचा पत्ता पाहिजे होता. बाकीच्याकडून सोल्या, डॉक्टर, गुड्डी, मिस्चिफ यांचे
पत्ते तर मिळाले. सूर्याला मारता मारता नेटके म्हणाले, " चल, तुला नाही ना सांगायचं, नको सांगूस. पण या तुझ्या पायाला काय झालंय रे? कोणी सोलला होता का जळला होता.? " सूर्याने त्यावर उत्तर न दिल्याने त्याला परत मारायला सुरुवात केली. एकीकडे त्यांची बडबड चालली होती. " साला तू पाटील ना रे? मग कधीपासून कटील झालास? शाळेत तरी गेला होतास का? वकील झालास? हरामखोर लेकाचा
दुनियेला फसवशील रे पण आम्हाला नाही. " शेवटी कंटाळून वाळकेश्वरच्या फ्लॅटचा अर्धवट पत्त्ता त्याने सांगितला. तशी नेटके म्हणाले, " अरे वा सुधारलास की तू. आता सगळंच सांग की भाड्या " पण सूर्यापेक्षा नेटके दमल्यामुळे त्यांनी आजच्यापुरता नाद सोडला. मग त्याला आणि इतरांना बाहेर काढून कोठडीत डांबीत म्हणाले, " स्साला तुमची मरम्म्त केली की परत जेवायची गरज भासते. तुझा बाप पैसे देणार का रे ए
पाटला? " असे म्हणून त्याला त्यांनी लाथ मारली. मग काकांना बाहेर बोलावले.. थरथरणाऱ्या काकांचे डोळे भीतीमुळे मोठे झाले. डावले म्हणाले, " हे बघ उद्यापासून तू आमच्या बरोबर यायचं आणि जे बोललास ते सगळं दाखवायचं. खोटं निघालं ना तर पाटीलची अवस्था जी झाली, ती तुझी करू. मग तू काढशील उरलेलं आयुष्य जेलमधे. "... त्यावर काका अजिजीने म्हणाले, " नाही सर, मी नक्की सगळं सांगीन आणि दाखवेन सुद्धा.

..... .................. ................. ................ ................... ......................

साधनाने बँकेकडे इतर खातेदारांबरोबर स्वतःचे पैसेही मागितले. मग सगळ्यांनी मिळून बँकेवर केस केली. न्याय मिळायला बराच वेळ लागेल याची तिला कल्पना होती. काकांच्या एकूण वागण्याचा ती विचार करीत होती. पहिल्यापासूनच ते किशाच्या टोळीत सामील झालेले होते. दरोड्याचीही त्यांना कल्पना होतीच. म्हणून तर ते पळून जाण्याची भाषा करीत होते. बरं झालं असली
काही अवचट कृती त्यांच्या नादी लागून आपण केली नाही ते. त्यांना भेटायला जाण्याचा प्रश्नच नव्हता. पेपरातली बातमी सोनाने कधी वाचली कुणास ठाऊक. पण ती त्यांना निरपराध समजत होती. ते नक्की घरी परत येतील याची तिला खात्री होती. पण काका माफीचा साक्षीदार का होत नाहीत याचं साधनाला आश्चर्य वाटलं होतं. पेपरातल्या बातमी प्रमाणे प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती पोलिसांना सापडली होती. मग ती कोण होती? याचा तिला प्रश्न पडला होता. खरंतर काका असायला हवे होते. किंवा हा पोलिसांचा गुगली असावा. कोणावरही भरवसा ठेवणं कठीण होतं. साधनाला आता अधांतरी वाटत होतं. काकांना भेटायला जायला हवं हे एकदा तिच्या मनात येऊन गेलं. पण "एकदाच". मन तिला बहकवू लागलं. काय हरकत आहे गेलीस तर. सोनालासुद्धा ते निरपराध वाटतात. तू ते निरपराध असल्याचं समजून का नाही विचार करीत? हळू हळू विचार प्रबळ होऊ लागला. पण त्यांना भेटायला न जाण्याचं तिने ठामपणे ठरवलं. अगदी सोना हट्टाला पेटली तरी. कशीतरी ती
ऑफिसमधलं काम उरकत होती. दुपारचे चार वाजत होते. तिचा कामात मूड लागेना म्हणून तिने गडाची परवानगी घेऊन लवकर घरी जाण्याचं ठरवलं.......... आणि ती निघाली. तसं घरी जाऊन काही काम होतं असंही नव्हतं. तिने सोनासाठी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतल्या. आपले सुरक्षित ठेवलेले पैसे आता गेले असल्याचे तिच्या लक्षात आलं. सुरुवातीला तिला त्याचं काही वाटलं नाही. पण आता तिला भविष्याची काळजी वाटू लागली. तिला हे नुकसान काकांमुळेच झालं असं मन सांगू लागलं. निराश मन:स्थितीत तिला ते खरं वाटू लागलं. ती घरात शिरली आणि सोनाने तिला विचारले, " काय म्हणाले काका? केव्हा येतील? " तिला साधना त्यांना भेटून आली असच वाटत होतं. मग साधनाने उत्तर न देता नवीन पदार्थ करण्याची तयारी करीत म्हंटले, " अगं आज ना मी एक वेगळीच रेसिपी वाचल्ये ती करणार आहे. बघ तुला आवडते का. " तिने काकांचा विषय टाळला. पण सोना तशी सोडणार नव्हती. ती चिडून म्हणाली, " आधी हे सांग तू काकांना भेटायला गेली होतीस का नाही? " .......... आता मात्र साधना तुटकपणे म्हणाली, " नाही. मला नाही वाटत त्यांना भेटावं. आपण त्यांना विसरावं हे बरं. ते नव्हते तेव्हा राहत होतो ना आपण? " तिचा तुटकपणा पाहून सोना स्वतःच्या खोलीत जाऊन दार बंद करून झोपून राहिली. तिला मात्र काकांचा चांगलेपणा आठवत होता. वडिलासारखी पुरूष व्यक्ती तिला हवी हवीशी वाटत होती. मम्मीला काय माहीत आहे? ती स्वतः शी म्हणाली. दोघीच जणींमध्ये घरात काय मजा येणार? इतर मित्र मैत्रिणींचे बाबा त्यांना शाळेतून घेऊन जात असत. किंवा निदान ते शाळेत त्यांना सोडायला तरी जात असत. आपण एकट्याच शाळेत जातो आणि येतो. आता ती मोठी होत होती. तिला आपल्याला वडील नसल्याचं जाणवत होतं. वडलांच्या अस्तित्वात ती काकांना पाहत होती. तसं तिची आणि काकांची ओळख फार जुनी नव्हती. पण प्रेम लागायला काही दिवसही पुरे होतात. याचा विचार साधनाने केला नाही. सोनाने त्यांना सहजपणे विसरावं असं तिला वाटत होतं. पण लहान मुलांना त्यांच्या भावविश्वातून एकदम कोणालाही काढून टाकायला किंवा सामावून घ्यायला जमत नाही. ती त्यांना चिकटून होती. तिला त्यांचा स्वभाव आणि तेही आवडले होते. नेहमी मायेने वागणारे ते तिच्या मनातून जायला तयार होईनात. साधनाने तिला आवडणारा पदार्थ तयार तर केला. साधारण तास दीड तास त्यात गेला. मग तिने तिला समजावण्याचे ठरवले. ती दरवाज्या उघडून आत आली. आणि सोनाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. तिचा हात झिडकारून सोना म्हणाली, " चल ना मम्मी आपण काकांना भेटून येऊ. ते खूप चांगले आहेत ग. " ..... ती ऐकत नाही असे पाहून साधना म्हणाली, " ते नक्की कुठे आहेत हे माहीत नाही. ते आधी पाहावं लागेल. मग जाऊ केव्हातरी. आणि हो कदाचित त्यांच्या सुनेला माहीत असेल, पण माझ्याजवळ तिचा नंबरही नाही आणि पत्ताही. फक्त नाव आहे. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. " तिला वाटलं सोना थांबेल. पण तिने वेगळाच पवित्रा घेतला. अगं आपण त्यांच्या ऑफिसमधून चौकशी करून पाहूया ना. "...... आता मात्र साधना वैतागली. " हे बघ सोना जर आपल्याला कोणाकडून त्यांचा राहण्याचा पत्ता मिळाला तर आपण नक्कीच जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू शकतो. आता तू जेवून घे बरं. " ती उठली. पण सोना तिच्या मागे जायला तयार होईना. तिला समजावून सांगणं कठीण आहे लक्षात येऊन तिने दोघींची ताटं वाढली. आणि ती स्वतः जेवायला बसली. थोड्यावेळाने सोनापण आली. जास्त संवाद न होता त्यांची जेवणं झाली. खरंतर काहीच घडत नव्हतं.

साधनाला माहीत होतं जे घडायचं ते घडून गेलेलं आहे. आता फक्त परिणाम पाहायचं तिच्या हाती होतं. तेही ती विसरली असती. पण तिचे पैसे अडकले होते. ज्या ज्या वेळी तिला आपल्या पैशांची आठवण होईल त्या त्या वेळी तिला काकांची आठवण होणारच होती. फार विचार न करता तिने झोपण्याची तयारी केली. तेवढ्यात सोना आली आणि म्हणाली, " मम्मी, पेपरात बातमी आली होती
म्हणजे काकांना कोणत्या पोलिस स्टेशन मध्ये ठेवलेलं आहे ते कळेल ना. थांब मी पेपर आणते. " ती पेपर आणायला गेली. मग मात्र साधना ओरडली, " काय चाललंय तुझं, आपल्याला काही करायचंय, त्यांना कुठे ठेवलंय ते शोधून. तुला माहीत आहे, पोलिस फार विचित्र असतात. ते विचारायला गेलं तर आपल्यालाच पकडतील. " सोनाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, " जाऊ दे चल. तुला काका नकोच आहेत. " आणि ती झोपायला गेली. मात्र मनोमन स्वतःच जाऊन काकांना शोधण्याचा तिने निर्धार केला. रात्र चुळबुळत गेली. सकाळी दोघी उठल्या. सोनाने कोणताही हट्ट न करता शाळेची तयारी केली. त्या दोघी शाळेत जाण्यासाठी निघणार एवढ्यात बेल वाजली. साधनाने दरवाज्या उघडला. दारात साठे मामा होते. तिला का कोण जाणे हा माणूस आवडत नसे. ते बऱ्याच लोकांना आवडत नव्हते तसंच तिलाही. आपण तर सोसायटीचे पैसे वेळेवर दिलेत. मग हे कशाला आलेत. ते आत येत म्हणाले, " मेहता मॅडम, मी सोसायटीच्या कामासाठी आलो नाही. पण आपल्या सगळ्यांचेच पैसे बँकेत अडकलेत त्या बाबत तुमची एका अर्जावर सही हवी होती. कोर्टाला तो सादर करायचाय. त्यांनी कागद पुढे केला. साधनाने न वाचताच सही केली. तेव्हा ते म्हणाले, " कशाबद्दल ते नाही विचारलंत? अशी न वाचता सही करत जाऊ नका. " त्यावर ती म्हणाली, "तुम्ही लिहिलंय ना मग तुम्ही थाडेच फसवणार आहात? मला सध्या वेळही नाही. " .... त्यावर साठे म्हणाले, " एक विचारू का? असं म्हणून तिच्या रुकाराची वाट न पाहता ते म्हणाले, " तुमच्याकडे गेले काही दिवस एक गृहस्थ येत असत त्यांचं काय नाव हो? " त्यांना एक दोन वेळा दरोडा पडण्याच्या आदल्या रात्री सरडे बाईंच्या दरवाज्याकडे बराच वेळ पाहताना पाहिलंय म्हणून विचारलं. " आता मात्र ते काकांबद्दल विचारीत होते हे तिला कळलं. पण आपण त्या गावचेच नाही, असं दाखवून ती म्हणाली, " मामा, येणारा माणूस इथून बाहेर पडल्यावर कुठे पाहत बसतो हे पाहण्या इतका मला वेळ नाही. निघा तुम्ही. मला हिला शाळेत पोहोचवायचंय. " असं म्हंटल्यावर मामा
निघाले. पण त्यांच्या डोक्यातला वळवळणारा किडा थांबला नाही. काहीतरी त्या माणसाचा संबंध आहे. तो माणूस हिच्याकडे बऱ्याच वेळा आलेला त्यांनी पाहिलेला होता. ते निघून गेले. मग साधना सोनाला शाळेत सोडण्यासाठी निघाली. तिला बसमध्ये बसवून ती घरी परत आली. खरच काकांना शोधलं तर काय हरकत आहे, असं तिला वाटू लागलं, वातमी वरून तरी ते लॅमिंगटन रोड पो. स्टेशनाच्या ताब्यात असावेत असं तिला वाटलं .

दहा दिवसांचा रिमांड असल्याने आजकाल रात्री सगळ्यांना आत घेत असत. आणि काकांना मात्र दिवसभर भटकवीत असत. ते पहिल्यापासून जसं आठवेल तसं दाखवीत होते. त्यांनी मुंब्रा येथील जवाबी चाचाची जागा पण दाखवली. आता फक्त त्यांना सापळा रचून उरलेल्या सगळ्यांना पकडण्याच ठरलं होतं. काकांनासुद्धा पोलिसांबरोबर भटकणं एवढं सोपं जात नव्हतं. पण आता त्यांची पोलिसांशी चांगलीच दोस्ती झाली होती. जेवणामध्ये आता हळू हळू फरक पडत होता. मग एक दिवस त्यांनी उरलेल्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र त्याचा तपशील काकांना सांगण्यात आला नाही. आता फक्त तो पूर्णत्वास नेणं बाकी होतं. पोलीस आता निमित्त पाहतं होते. आणि त्यांना ते लवकरच सापडलं. दहा दिवसांचा रिमांड पुन्हा वाढवून मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे जे करायचं ते लवकर करावं लागणार असा अलिखित दबाव पोलिसांवर होता. पण ते आपल्या कामात निष्णात होते. अचानक एक दिवस किक्ला, सोल्या, गुड्डी,
मिस्चिफ यांच्या एका मीटिंगची खबर पोलिसांना लागली. काकांबद्दल कमिशनर साहेबांकडे मीटिंगही झाली. आणि आता जवळजवळ पक्कं ठरलं की काका हे माफीचे साक्षीदार होतील. रोज या केसवर डावले साहेब आणि त्यांच्या ग्रुपच्या मीटिंगा खंडागळे साहेबांकडे होऊ लागल्या.
अजूनही काकांना त्याच कोठडीत ठेवलं जात होतं........

.
एक दिवस नीताला रमेशचा फोन आला की तो काही दिवसांसाठी घरी येणार होता. आता तिला काकांच्या बाबतीत काय ते कायमचं ठरवता येणार होतं. पेपरात आता बातम्या येणं बंद झालं. तसंही नीताला आजूबाजूची माणसं नवीन असल्याने कोणीच काही विचारलं नाही. आणि अचानक निलूचा फोन आला की ती इतक्या वर्षांनी येणार आहे. नीताला समजेना काय प्रतिक्रिया द्यावी.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all