कामथे काका (भाग २३)

कौंटरकडे जाणाऱ्या सॅमसनकडे.........

**********************


कौंटरकडे जाणाऱ्या सॅमसनकडे बारकाईने लक्ष ठेवीत मिस्चिफने आपले पिस्तूल रोखलेलेच ठेवले. त्याला कौंटरवर तिरक्या लावलेल्या आरशाने उघडलेल्या खणातले पिस्तूल दिसले. तशी धावतच मिस्चिफने कौंटर गाठले. सॅमसनच्या मानेला पिस्तुलाची नळी लावीत तो म्हणाला, " गेम नही खेलना, अब भी मै शार्प शूटर हूं. " दिसणाऱ्या पिस्तुलाकडे अधाशी पणे बघत सॅमसनने दुसरा खण उघडला. त्यातली बंडलं काढण्या आधी त्याने मिस्चिफला समोरच्या एका लांबोळक्या दिसणाऱ्या रूममध्ये एका टेबलाकडे बसायला सांगितले. पण मिस्चिफ हुशार होता. तो म्हणाला, " ऐसा नही होगा ब्रो. तेरा ये पैसेका खाना पूरा उठाके ले जायेंगे और तू मेरेको ये पैसा ब्रिफकेसमे भर के देगा , चल पाव उठा तेरा. " ते ऐकल्यावर सॅमसन कौंटरच्या मागे गेला. चुपचाप त्याने खण काढून हातात घेतला. खण चांगलाच खोल होता. जड खण सांभाळीत तो मिस्चिफने कव्हर केलेल्या अवस्थेत खोलीत शिरला. चार वेटर होते , पण एकालाही त्यांच्यामध्ये पडण्याचे धैर्य झाले नाही. रागाने सॅमसनच्या कपाळावरची हिरवी शीर फुगली होती . मग त्याच्या लक्षात आलं , ते फक्त तीन लाख होते. पण हा घाईमध्ये फसला तर फसला. आणि झालंही तसंच. सगळी बंडलं काढून सॅमसनने एका ब्रीफकेसमध्ये ठेवली. मग मिस्चिफने आणखी एक गोष्ट केली. त्याला त्याचं पिस्तूलही केसमधे ठेवायला सांगितलं. केस बंद झाली. वर असलेल्या आणखी एका खणात सॅमसनने त्याच्याकडे
असलेल्या गोळ्या दिल्या. सॅमसनचे पिस्तूल आत ठेवताना मिस्चिफने ते भरलेले असल्याची खात्री करून घेतली होती. मग सॅमसनने त्याला आपल्या मेव्हण्याचा पत्ता दिला मेव्हण्याचं नाव डेविड आवासकर होतं. तो जुहूला राहत होता. समाधानाने मिस्चिफ खूश झाला. मग तो लबाड हसून म्हणाला, " देख सॅमसन आपून तेरेको तकलीफ देना नही चाहता. अब अपने दोस्तको थोडा ड्रिंक तो पिला सकता है ना ? " निः शस्त्र
सॅमसनने वेटरला खूण केली दोन लहान ड्रिंक्स टेबलावर आली. आलेला वेटर जरा जास्त वेळ मिस्चिफकडे पाहत बसला. त्यावर मिस्चिफने त्याच्या कानशिलावर पिस्तुलाचा प्रहार करून त्याला खाली पाडले. " स्साला , हमको घूरता है , मारना चाहता है क्या ? .....मग सॅमसनकडे वळून म्हणाला.... तेरा ये कुत्ता बहोत वफादारी दिखाने जा राहा था. " ..... ड्रिंक संपल्यावर ब्रीफकेस घेऊन हातातलं पिस्तूल तसंच धरून निघाला . हरलेल्या अवस्थेत बसलेला सॅमसन काहीच करू शकला नाही. मात्र पाचाच्या ठिकाणी तीन लाख दिल्याचं समाधान त्याला मिळालं. मग त्याच्या मनात एक विचार आला, त्याने ताबडतोब फोन लावला. " डेविड , आजकल तेरा धंदा बहोत ठंडा चल राहा है ना, एक कस्टमर भेज राहा हूं. सिर्फ उसको पाच बोलना , और जितना लाया है उतना निकाल लेना. ये काम जल्दी होना चाहिये. वो आदमी पुलिसको वाँटेड है. " त्याचं वर्णन आणि नावही त्याने सांगितलं. तो कदाचित नाव वेगळं सांगेल हेही सांगायला विसरला नाही. त्याच्याबद्दल त्याने इतरही माहिती दिली. तरीही सॅमसनचं टेन्शन जाईना. मग मात्र त्याने स्वतःसाठी लार्ज ड्रिंक बनवून घेतलं आणि सावकाश पीत बसला. त्याचा अचानक कामामधला इंटरेस्ट गेला. त्याने वेटरला कौंटर सांभाळायला सांगितलं. मग त्याने एका वेगळयाच सिम कार्डचा वापर करून पोलिसांना माहिती दिली. यावेळी त्याने स्वतःचे नाव फिरोझ सांगितलं. आता तो स्वस्थ बसला. फोन डावलेंनी घेतला होता. ते लगेचच माय डिअर बारमध्ये जायला निघाले. तरी त्यांना अकरा वाजून गेले. सखारामचा फोन येणार होता, पण हा कुणा फिरोझचा आला होता. त्यांना आता कोणताच चान्स घ्यायचा नव्हता. रिमांडचे कमी दिवस त्यांना अस्वस्थ करीत होते. नाहीतर त्यांनी अशा माहितीचा उगम शोधला असता. सॅमसनची काय कथा होती ती डावलेंनी ऐकली आणि त्यांनी सॅमसनला आत्ता परेशान करण्यापेक्षा आपण लगेचच डेविडच्या घर जाणं बरं राहील असा विचार करून ते त्याला म्हणाले, " आत्ता मी चाललोय, पण परत येईन तेव्हा तुलाही घेऊन जाईन, मला आता तू पाहिजे आहेस.
माझ्या परवानगीशिवाय कुठेही बाहेर जाऊ नकोस, समजलयं ? " असं म्हणून ते निघाले. सॅमसनही ही बला सध्यातरी थोडक्यात टळली हे लक्षात ठेवून त्यांची अट त्याने मान्य केली व मिस्चिफसारखा हलकट माणूस पकडला जाणं जरूरीचं आहे याची जाणीव त्याला झाली.

************ ******************* ****************** ****************

रात्रीचे दहा वाजून गेले होते. बाहेर पडल्या पडल्या त्याला आता नक्की कुठे जावे हे कळेना. आत्ताच जुहूला जावे तर हे ओझं घेऊन जावं लागेल . अण्णाकडे गेलो तर पैसे द्यावे लागतील , पण आणलेले पैसे थोडे बाजूलाही काढून ठेवता येतील. उरलेले डेविडला देता येतील. आणि तसेच डेविडकडे गेलो तर सगळे पैसे द्यावे लागतील. एक दोन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आपल्याला लागणारे पैसे काढून घेऊ. म्हणून तो एका समोरच्याच फालतू हॉटेलमध्ये गेला. कोपऱ्यातलं टेबल पकडून कौंटरवरून दिसणार नाही अशा रितीने त्याने ब्रीफकेसच कव्हर उघडलं. तो बसताच वेटर आला. पुन्हा त्याने कव्हर लावून घेतले. त्याला ऑर्डर देणं भाग होतं. तशी भूकही लागली होती. त्याने जी ऑर्डर उशिरा येईल ती दिली. मग पुन्हा कव्हर उघडून खिशातून काढलेल्या प्लास्टिक पिशवी मध्ये दोन बंडलं आणि गोळ्या पण भरल्या. दोन बंडलं खोचलेल्या शर्टाच्या आत सरकवली. ब्रीफकेस लॉक केली. आणि पिस्तूल खिशात ठेवून ऑर्डरची वाट तो पाहू लागला. एकदम समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या सखारामच्या संशयात भर पडली. हा माणूस इकडे तिकडे पाहून ब्रीफकेस का उघडतोय याचा त्याला संशय आला. खरंतर सखारामला या केसवर काम करण्याचा उत्साह जास्त होता, म्हणूनच त्याच्या आग्रहामुळे डावलेंनी त्याची तब्येत ठीक नसतानाही त्याला परवानगी दिली. आता सखारामला खात्यात फार भाव आला होता. जो आजपर्यंत कधी मिळाला नाही. त्याने आणलेल्या माहिती मुळे केस पक्की होण्यास मदत झाली होती. पण श्रीकांत सरांकडून केस काढून घेतलेली त्याला आवडली नाही. मागवलेलं टोमॅटो ऑम्लेट मिस्चिफने बकाबक खात संपवलं नंतर दुसरं काहीतरी मागवलं. मग साडेदहाच्या सुमारास बिल देऊन तो बाहेर पडला. त्याच्या मागोमाग सखारामही बाहेर पडला. हा माणूस वेगळा दिसतोय या आधारावर सखाराम त्याचा पाठलाग करू लागला. मिस्चिफ चालत समोरच्या फुटपाथवर गेला आणि त्याने टॅक्सी पकडली. डेविड जुहू चौपाटीजवळच्या रियल स्टार बिल्डिंगच्या पाचव्या माळ्यावर राहत होता. तासाभराने टॅक्सी बिल्डिंगच्या समोर थांबली. लांबून सखारामनेही टॅक्सी थांबवली. आणि तो पायीच निघाला. मिस्चिफने टॅक्सी सोडली. तो बिल्डिंगमध्ये शिरला. सिक्युरिटी गार्डने हटकताच त्याने फ्लॅट नंबर आणि नाव सांगितलं. रजिस्टरमध्ये त्याने खोट्या नावाने सही केली. जी त्याला परत करायला सांगितली असती तर कधीच जमली नसती. लिफ्टजवळ तो पोहोचला. थोड्याच वेळात फ्लॅट नं. ५०४ बेल त्याने वाजवली. आतल्या लोखंडी दरवाज्याच्या फटीमधून पाहून डेविडने दरवाजा उघडला. मिस्चिफला दरवाजा उघडताना दिसला पण उघडणारा दिसलाच नाही. त्याला दरवाज्या ऑटोमॅटिक आहे की काय अशी शंका आली. पण त्याने खाली बघितल्यावर समजलं की उघडणारा डेविड जेमतेम चार फूट असल्याने त्याला दिसला नाही. लहानशा तुळतुळीत टक्कल असलेल्या डोक्यावर शेंडिच्या ठिकाणी ज्यू घालतात ती गोल पण काळी स्क्ल कॅप घातली होती. रंग लालसर गोरा होता. चेहरा सुंदर होता. लबाड लांबट तपकिरी रंगाचे डोळे मान वर करून त्याच्याकडे पाहत होते. जेमतेम तोंडावर हसू आणून डेविडच म्हणाला, " भीतर ये मित्रा. तुका सॅमसननी पाठवलान ?" मिस्चिफने मान डोलवली आणि तो आत शिरला. समोरच एका म्हाताऱ्या टिपीकल ज्यू माणसाचा सोनेरी फ्रेम असलेला फोटो होता. ते त्याचे वडील असावेत. त्याच्यासमोर दोन खास ज्यू लोक वापरतात त्या मेणबत्त्या जळत होत्या. खोलीत थोडा सोनेरी पिवळ्या रंगाचा प्रकाश होता. एक उत्तम प्रतीचं टेबल असून त्याच्यामागे एक लाल रंगाची मऊ , दोन पायऱ्या असलेली खुर्ची होती. ती बहुतेक डेविडने स्वतःला बसण्यासाठी खास बनवून घेतली असावी. त्यावर तो बसला. आणि आपल्या समोरच्या खुर्चीत त्याने मिस्चिफला बसायला सांगितले. जसं मिस्चिफ त्याचं निरीक्षण करीत होता तसं तोही त्याचं निरीक्षण करीत होता. आता मिस्चिफने आपलं खरं नाव सांगण्याचं ठरवलं. मिस्चिफची भिरभिरती नजर पाहून तो म्हणाला, " स्वस्थ बोस की रे. गेट सेटल्ड मॅन. " मिस्चिफला काही कळलं नाही . मग डेविडने त्याला त्याच्या भावजीचा फोन आल्याचं सांगितलं. मग आपलं काम कसं कठीण आहे आणि आजकाल सरकार किती काळजीपूर्वक पासपोर्ट देतं, त्याला किती पैसे खर्च करावे लागतात , तसंच त्याने व्हिसा पुराणही लावलं. तो म्हणाला एकवेळ पासपोर्ट खोटा चालतो पण व्हिसा कसा खोटा बनवणार . मग त्याने ड्रॉवर उघडला आणि काही कोरे आणि डमी पासपोर्ट काढून दाखवले. मग तो म्हणाला, " हे समद मी हातान बनवतो हां. एकदम परफेक्ट जॉब. कळणार पण नाही कोणाला पासपोर्ट नंबर रद्द केलेला नाहीतर दोनदा वापरलेला आहे ते. विद्यार्थी म्हणून तुजा पासपोर्ट बनेल हां . तुजं नशीब खोटं असेल तर तू मरणार नक्की . " कोणतीही भीडभाड न बाळगता त्याने सगळी माहिती दिली. प्रतिक्रियेकरता त्याने मिस्चिफकडे ...... काहीच बोलला नाही. त्याला मरायचं नव्हतं. म्हणून तर तो दरोड्यानंतरही जिवंत होता. तसा डेविड कमर्शियल आर्टिस्ट होता. पण डोकं पहिल्यापासून उलट्या धंद्यात चांगलं चालायचं. तशा त्याने सुरुवातीला दोन तीन जाहिरात कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या पण जास्त मेहनत आणि बेताचे पैसे हे काही त्याचं स्वप्न नव्हतं, म्ह्णून त्याने त्याच्या भावजीना धंद्यात मदत केली आणि अल्पावधीतच चांगलीच माया

जमवली.

मग पैशाचा प्रश्न आला. डेविड तसा स्पष्टवक्ता होता. त्याला भावजींनी सांगितलेलं आठवलं. पण त्याने स्वतःचा विचार केला. आजकाल सरकार दरबारीही पैशाची फार मागणी वाढली असल्याने धंदा मंद होता. आणि लोकांचा कल त्यातल्या त्यात नवीन गुन्हेगारांचा कल पण जास्त धोका न पत्करण्याचा असल्याने त्याने तीन लाख तर तीन लाख हा विचार करून मिस्चिफचे काम त्यात करण्याचे ठरवले. मिस्चिफला हे मान्य झालं. त्याने त्याच्या पुढ्यात बॅग सरकवली. डेविडने ती उघडून पाहिली. लक्ष्मीच्या दर्शनाने तो समाधान पावला. मग तो म्हणाला, " हे बघ तुला एक मित्र म्हणून सल्ला देतो, तू एअरनी कित्याक जातंस ? बोटीनसून जा की . जास्त त्रास नाही होणार. बिगारी कामगार म्हणून एखाद्या ओळखीच्या कंत्राटदारास सांगतो , तो काम करेल. बघ विचार कर. " पण मिस्चिफ मानायला तयार नव्हता. शेवटी
एअरने जायचं नक्की ठरलं. मग डेविड उठून म्हणाला, " बोस की रे जरा, ड्रिंक घेऊन जा . " त्याने मिस्चिफ हो नाही म्हणायच्या आत दोन ग्लास काढले. त्यात व्हिस्की भरली आणि बर्फ टाकला. मग ग्लास त्याच्याकडे सरकवीत तो म्हणाला, " कच्चीच आहे , सोडा नाही मित्रा " दोघेही चिअर्स म्हणून ग्लास तोंडाला लावणार तोच खाली कार थांबल्याचा आवाज झाला. डेविडने उठून मागच्याच बाजूला असलेल्या खिडकीचा पडदा सरकवून बाहेर पाहिले. तसें तो कधी पाहत नाही. पण आज पाहिलं आणि त्याला पोलिसांची जीप थांबल्याचं दिसलं.
तो व्हिस्की पटकन गिळत सावध होत म्हणाला, " पोलिस ! आत्ताच कसे आले ?" असं म्हटल्याबरोबर मिस्चिफने ब्रीफकेसमधला पिस्तूल डेविड मागे वळण्याच्या आत काढून घेतलं. तेच त्याच्यावर रोखीत मिस्चिफ म्हणाला, " तुम अपने जीजा जैसेही हो. तुमनेही पुलिसको बुलाया है " डेविड त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, " तुका काय वाटला मी माजा लुकसान करून घेईन ? तुज्या बरोबर माजा पण जीव जाईल की रे दादा. ते तेवडं पिस्तूल खाली कर हां. " मिस्चिफने पिस्तूल खाली केले. मग मात्र डेविड कामाला लागला. ड्रावरमधल्या सगळेच कोरे खोटे पासपोर्टाचे नमुने, काहीचे घेतलेले फोटो आणि इतर कागदपत्र त्याने लाइटर पेटवून जाळायला सुरुवात केली. खोलीत चांगलाच जळकट वास पसरला. पण डेविडला त्याची पर्वा नव्हती. त्याचा हा प्लान पहिल्यापासून त्याने तयार ठेवला होता. कारण असली इमर्जन्सी केव्हाही आली असती याची त्याला कल्पना होती. ........ ते पाहून मिस्चिफ म्हणाला, " और मेरा पासपोर्ट ? " त्यावर डेविड हसून म्हणाला, "अब हम दोनो भूल जायेंगे , ये तेरे पैसेकी केस उठा , अब मै जिंदा नही रहूंगा. " कपाळावरचा घाम टिपीत तो म्हणाला............. मिस्चिफने पटकन ब्रीफकेस उचलली आणि तो आतल्या खोलीत गेला. पण डेविड शांतपणे खुर्चीत बसून राहिला. त्याने मग एकवार मोझेसचं स्मरण केलं. आपलं टेबल सरकवीत त्याने मुख्य दरवाज्यापाशी आणलं . ते दरवाज्याला आतल्या बाजूने चिकटवून ठेवलं. आणि खणात ठेवलेले खिळे घेऊन दरवाज्याच्या चौकटीला दोन दोन खिळे टेबलाच्या पायामधून मारून ते खिळवले. जरी दरवाज्या फोडला तरी काही वेळ पोलिसांना आत यायला नक्कीच लागेल. तोपर्यंत आपण जिवंत राहत नाही हे नक्की. मग त्याने उजव्या बाजूचा खण उघडून तो हातात पिस्तूल धरून बसला. ती मागे उडणारी गन होती. आता फक्त पोलीस आत शिरले की स्वतःवर गोळी झाडून घायची की काम झालं. आपण आणि आपले क्लायंटस पोलिसांच्या हाती लागणार नाहीत.

**********************************************

सखारामला बिल्डिंगमध्ये शिरायला काहीच अडचण आली नाही. त्याने वॉचमनला व्हिजिट रजिस्टर दाखवायला सांगितलं. त्यात नुकतीच झालेली नोंद त्याने पाहिली. ती करणाऱ्याचे नाव धड कळत नव्हते. पण फ्लॅट नं. ५०४ एवढे कळल्यामुळे त्याने लिफ्ट बोलावली. वॉचमन मदत करायला तयार होता. पण त्याने वॉचमनची मदत नाकारली. तो लिफ्टमधे घुसला. त्याने पाचव्या मजल्याचे बटण दाबले लिफ्ट वर जाऊ लागली. पण मध्येच काही कारणाने तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या मध्ये अडकली. तिचा सायरन चालू झाला. अधून मधून कोणीतरी हातोडीने काहीतरी ठोकत असल्याचा आवाज आला , पण त्याचं त्याला फक्त आश्चर्य वातलं.. वॉचमनने कशीतरी ती लिफ्ट सुरू केली . सखाराम पाचव्या मजल्यावर पोहोचला. आणि त्याने ५०४ची बेल वाजवली. पण कोणीच उघडलं नाही. आतून कसलाच आवाज त्याला ऐकू आला नाही. तेव्हा नेमका मिस्चिफ आत दडला होता, आणि डेविड हातात पिस्तूल घेऊन खुर्चीत बसला होता. पुन्हा पुन्हा बेल वाजवूनही कोणीच दरवाज्या उघडेना , तेव्हा त्याने डावलेंना फोन केला. त्यावेळी ते रियल स्टार बिल्डींगच्या आवारात शिरत होते. त्यामुळे त्यांनी फोन बंद केला. वॉचमनला कळेना , सारखे पोलीस का येतायत. अर्थातच त्याने तसे विचारले नाही. पण सखाराम आल्याचं मात्र सांगितलं. त्यांना दुसरी लिफ्ट दाखवून त्याने पाचव्या मजल्यावर जाण्यास मदत केली.


(क्र म शः)

🎭 Series Post

View all