कमळी...

The Matured Understanding Of Illiterate Househelp Woman

कमळी घाईघाईतच सगळे काम आवरत होती. मोठ्या मुलाची शाळेची सहल जाणार होती; म्हणून त्याला खूप सूचना देत होती.

कमळी :- केशवा.. सगळं घेतलं आहे ना.. खाऊ वाटून खा. बाई जिथं नेतील तिथंच जायचं. उगा उंडारायचं नाय..

केशव :- पन आई मला तर पाठवितीय तू सहलीला.. पन तुला सुट्टी हाय का..

कमळी :- सुट्टी असायला तुझी आई मास्तर नाय.. कामवाली हाय..

केशव :- पन आई बा पन न्हाय घरात.. गेलाय जिल्ह्याच्या गावी.. नक्षीला एकटं ठेवशील घरला..? लहान हाय ती..

कमळी :- मोट्टा भाऊ बोलला बग तुझा नक्षी.. अरे केशा मी तिला आज कामावर संगती घेऊन जाती.. अनि लवकर येईन.. पाटलाच्या घरीच आज काम करणार हाय फक्त..

केशव :- नक्षी.. पहिला नंबर काढाचा हाय ना शाळेत.. पाढे पाठ करून ठेव.. अभ्यास पन कर.. मी उद्या घेईल तुझा अभ्यास... तुला न्यायचं होतं पन तुझी सहल पुढच्या महिन्यात यगळी ठेवुली हाय.. नायतर अपन सोबतच असतो.. तुला काय कळलं नाय ना ती सृष्टी ताई हाय.. ती खूप हुशार आहे.. तिला विचार.. आई तिनेच बग मला पाढे शिकवले होते..

नक्षत्रा :- हो दादा.. तू पन आज मज्जा कर.. आल्यावर सांग काय केलतंस ते.. मंग मी जाईन तर तेच करीन...

कमळीने आपल्या दोन्ही लेकरांच्या डोक्यावर मायेने हात फिरवला..

कमळी मुलाला सोडून कामाला येते. पाटलांच्या घरात चर्चा सुरू होती. तिने एकही शब्द न ऐकता स्वयंपाकघर गाठले आणि कामाला सुरुवात केली. तिच्या बाजूला तिची लेक नक्षत्रा मोठ्या आवाजात पुस्तक वाचत होती ; म्हणून तिला बाहेरचे नीट ऐकू येत नव्हते.. ती आपली गपगुमान कामं करत होती..


रावसाहेब पाटलांच्या वाड्यात आज वातावरण जरा जास्तच गरम होते. खुद्द रावसाहेब, त्यांची पत्नी राधिका, वृद्ध आई म्हणजेच जयंताबाई आणि जुळी मुले शुभम आणि सृष्टी असे हे पंचकोनी कुटुंब होते. शुभम घराण्याचा कुलदीपक म्हणून जरा अतीच लाडवलेला आणि सृष्टी पाटलाच्या घरची मुलगी म्हणून जरा जास्तच कडक शिस्तीत लहानची मोठी झाली होती. वडिलांकडून आलेले सुंदर रूप आणि आईकडून आलेली हुशारी यामुळे सृष्टी शाळेत किंवा कॉलेजला पहिल्या तीन पैकी असायची. बारावीच्या परीक्षेत तर ती पूर्ण जिल्ह्यातून पहिली आली होती तेही विज्ञान शाखेतून.. तेच शुभम बारावी नापास झाला होता. शुभम मुलगा असल्याने आई आणि आजीचे त्याच्याकडे अति झुकते माप होते. सृष्टीला इंजिनीरिंग करायचे होते.त्यासाठी तिला जिल्ह्याच्या गावी जावे लागणार होते. तसें म्हणायला गेले तर त्या गावी तिचे मामा आणि आत्या दोघांचेही घर होते, म्हणून तिच्या राहण्याचा प्रश्न नव्हताच..रावसाहेब पण तिला प्रोत्साहन देत होते पण आई आणि बायको दोघीच्या विरुद्ध ते काहीच करू शकत नव्हते.. लेकीला "घरीच स्वतःचा स्वतः अभ्यास कर आणि गावातल्याच कॉलेज मधून BCOM कर " असे बोलून ते निघून गेले.

पाटील आपल्या कामाला निघून गेले. त्यांची आई वगैरे सगळे आपल्या आपल्या कामत व्यस्त झाले. थोड्या वेळाने त्यांची मोलकरीण कमळी ताई तिच्या मुलीला सोबत घेऊन भाजी चिरत होती.
एकीकडे कमळी काम करत होती तर दुसरीकडे मोठ्या आवाजात मुलीला वाचन करण्यासाठी सांगत होती. घर मालकीण कामवाल्या बाईला तिच्या मुलीला कशी कौतुकाने अभ्यास करायला बसवते हे बघते.

मालकीण बाई :- काय गं कमळे, ही तुझी मुलगी एकुलती एक आहे का..

कामवाली :- आवो बाईसायब.. ही धाकली. थोरल्या केशवाच्या पाठीवरची. नक्षत्रा... नवसाची हाय पोर..

मालकीण बाई :- अगं मुलगी तर आहे. त्यात काय कौतुक. आणि(तिच्या शाळेच्या गणवेशाकडे बघत )इतक्या महागड्या शाळेत का घातले तिला..? साध्या शाळेत पाठव कि.. सासरी जाईल उद्या.. तुझा सगळा पैसा वाया..

कामवाली :- असं आज्याबत न्हाई बाईसाहेब.. मी आणि माझा धनी दोन्ही पोरांना सारखा जीव लावतो.. दोघांस्नी मीच पोटात ठेवलं. मग बाकी दोघांमध फरक का करू..?तुमीबी बगा ना.. शुभम दादा अन सृष्टी ताई जुळी हायत. ताई दादापेक्षा लय हुशार.. तुमी कधी केला का फरक त्यांच्यामधी.. पोरगा काय पोरगी काय... मी तर माया नक्षत्रेला सांगलं हाय.. मोठी झालीस कि सृष्टी ताईसारकी हो.. (लेकीकडे बघत ) अगो.. आमच्या गप्पा काय ऐकतेस.. वाच मोठयानी.. नंतर पाढे पाठ कर...

हे ऐकून मालकीणीला आठवते कि तिने थोड्या वेळापूर्वी तिच्या विधुळ्या मुलाचे दोष लपवण्यासाठी तिच्या मुलीच्या इंजिनीरिंग कॉलेज ला ऍडमिशन घेण्यासाठी नकार दिला होता.. जि गोष्ट शिकली सवरली असून घर मालकीण पाटलीणबाईना कळली नव्हती ती त्या अंगठेबहाद्दार कामवालीला उमागली होती
©®ऋचा निलिमा