Feb 24, 2024
जलद लेखन

कल्याणी अंतीम भाग

Read Later
कल्याणी अंतीम भाग


दरम्यानच्या काळात कल्याणीने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. पण दुसऱ्या बाळंतपणात काही गुंतागुंत निर्माण झाल्याने कल्याणी आता परत कधीच मूल जन्माला घालू शकत नव्हती.


त्याच दरम्यान ती हादरवून टाकणारी बातमी वर्तमानपत्र आणि टी.व्ही.वर झळकली. धनराजचे नाव एका महिलेसह जोडले गेले होते. तिने धनराजवर फारच चिखल फेक केली होती. धनराज पासून तिला एक मुलगाही होता.


या सगळ्या प्रकारामुळे धनराजचे मंत्रिपद तर धोक्यात आलेच शिवाय अक्कासाहेब आणि बाबासाहेबांनीही धनराजला चांगलेच धारेवर धरले. पण प्रसार माध्यमांसमोर धनराज ने सगळ्यांनाच धक्का बसेल असा वेगळाच खुलासा केला. पत्रकार परिषदेत धनराजने कबूल केले की, त्याने त्या महिलेसोबत (पूजा सोबत) नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. तिच्या मुलाला त्याने स्वतःचे नावही दिले होते.

एकंदरीतच धनराजचे विक्षिप्त वागणे आणि आता हे पूजा प्रकरण या सगळ्या घटनांमुळे कल्याणी अक्षरशः हादरून गेली होती. तिला तसंही कुठलंच वैवाहिक सुख मिळालं नव्हतं. धनराज प्रत्येकच वेळी रात्री तिचा अगदी पाला पाचोळा करून टाके आणि आता हे बाहेरचे प्रकरण. त्यामुळे खूप विचार करून कल्याणीने एक निश्चय केला. ती पूजाला भेटायला गेली.


पूजा -"नमस्कार, पण मी तुम्हाला ओळखलं नाही."

कल्याणी -"मी कल्याणी."

पूजा -"देशमुख? धनराज देशमुख यांच्या…"


कल्याणी -"मी त्यांची बायको होती. मला फक्त एका प्रश्नाचे उत्तर हवं आहे."

पूजा -"कुठल्या?"


कल्याणी -"तुम्ही धनराजच्या तावडीत कशा सापडल्या?" तुमची एवढी काय मजबुरी होती? तुमच्या काय समस्या होत्या आयुष्याच्या? तुमचे असे कोणते प्रश्न आणि गुंते होते की, तुम्ही एका विवाहित….."


पूजा -"खरंतर मला वाटलं होतं तुम्ही कधीच मला भेटायला येणार नाही. पण ठीक आहे. मी एक अल्पभूधारक शेतकऱ्याची मोठी मुलगी. गरिबी, उपासमार आमच्या पाचवीलाच पुजलेली. मी अभ्यासात हुशार होती. डी.एड.करून मला नोकरी करायची होती. माझ्या लहान बहिणीला डॉक्टर आणि भावाला इंजिनियर करायचे होते. एका चांगल्या स्थिरस्थावर आयुष्याचा स्वप्न होतं माझं. पण नियती कधीच आपल्या मनासारखं होऊ देत नाही ना!

तुम्हाला आठवत असेल सात वर्षांपूर्वी सलग दोन वर्ष ओला दुष्काळ पडला होता आणि त्यातच आमच्या गावाजवळचा मातीचा बंधारा फुटून आमच्या गावची शेत जमीन खरडली गेली होती. बाबांच्या डोक्यावर आधीच कर्ज होतं आणि त्यात ही खरडलेली जमीन. शेवटी त्यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. बाबांचं वय जास्त असल्याने आम्हाला कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही.

त्यादरम्यानच माझा डी.एड.ला नंबर लागला. पण फीचे पैसे माझ्याकडे नव्हते. तेव्हा मी देशमुख साहेबांना भेटले. त्यांनी मला फीचे पैसे दिले , पण बदल्यात माझी अब्रू घेतली. नंतर वारंवार मला ते बोलवत गेले. ह्या दरम्यानच आम्ही दोघं एकमेकात गुंतत गेलो. पण मग या सगळ्याचा फायदा घेत मी माझ्या बहिणीला डॉक्टर नाही पण डी.एड. करवलं, भावाला इंजिनियर.

चार वर्षांपूर्वी मला दिवस गेले. देशमुख साहेबांनी माझी गर्भलिंग तपासणी केली. मुलगा असल्याने त्यांनी मला इथ शहरात फ्लॅट घेऊन दिला. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. पण आताशा ते आणखीन एका स्त्रीमध्ये गुंतल्याचं माझ्या कानावर आलं आणि मी डोळ्यांनी पाहिलं म्हणूनच त्यांची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी आणि माझा बदला घेण्यासाठी त्यांची प्रसार माध्यमात सर्वांसमोर बदनामी केली. बस माझी कहाणी एवढीच आहे."

कल्याणीने ते सगळं निमुटपणे ऐकलं आणि एक निर्णय घेतला.


कल्याणी -"पूजा दोष तुझा किंवा तुझ्या मुलाचा नाही. पण माझी तुला एक विनंती आहे."

पूजा -"कुठली विनंती?"

कल्याणी -"मी माझ्या दोन मुलींना आणि तुझ्या मुलाला फक्त माझं नाव देणार आहे. मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाऊ? त्याचे शिक्षण, भविष्य मीच घडवणार. त्याकरता मला फक्त तुझी साथ हवी आहे."


पूजा -"पण देशमुख साहेब असं केल्याने मला कधीच जिवंत सोडणार नाही."

पूजा ने परत एक क्षण विचार केला."ठीक आहे तुम्ही जयला- माझ्या मुलाला घेऊन जा. माझ्या आयुष्याची तर राख रांगोळी झाली आहे. तशी त्याच्या आयुष्याची नको व्हायला."

कल्याणी -"येते मी."


कल्याणी जेव्हा देशमुखांच्या घरातून बाहेर पडत होती तेव्हा बाबासाहेब, अक्कासाहेब, धनराज सगळ्यांनी तिला अडवलं. पण कल्याणी आता थांबणार नव्हती.


अक्कासाहेब -"कल्याणी धनराज सारख्या मोठ्या मंत्र्यांवर चिखल फेक करायला या बायकांना काहीही वाटत नाही. त्या अगदी बाजारू असतात. अग दोन-चार हजारासाठी सुद्धा त्या मोठ्या लोकांची बदनामी करायला मागे पुढे पाहत नाही."


बाबासाहेब -"कल्याणी असं काय करतेस माझी मुलगी ना तू? माझा शहाणं बाळ ना! मागे परत फिर."


धनराज -"कल्याणी मी तुला हात जोडून विनंती करतो प्लीज घर सोडून जाऊ नकोस. जे झालं ते पुरे झालं. आता पुढच्या आयुष्यात मी तुझ्याशी एकनिष्ठ राहीन. उरलेलं आयुष्य अगदी इमाने एतबारे आपण सोबत घालवू."

कल्याणी -"पप्पा मी तुमची लाडकी मनू होती ना? लग्न ठरवताना तुम्ही माझा, माझ्या भावनांचा, माझ्या स्वप्नांचा जराही विचार केला नाही? अक्कासाहेब तुम्ही तुमच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी माझा एका शिडी सारखा वापर केलात आणि धनराज तुम्हाला? तुम्हाला तर बायको कधीच नको होती. तुम्हाला हवी होती फक्त एक शय्या सोबतीण. आणि तुमच्या घराण्याचं नाव पुढे चालवायला एक मुलगा आणि तुमचा राजकीय वारस. पण मी तुम्हाला एक मुलगा देऊ शकली नाही म्हणून तुम्ही असं केलंत?  तुम्ही तुमचं सुख बाहेर शोधलं. पण मी आता या सगळ्याला फार कंटाळून थकले आहे. मी माझ्या मुलांना नवीन भवितव्य देणार आहे. या तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून आणि बिगडी समाजापासून दुर नेणार आहे. येते मी मला शोधण्याचा प्रयत्न करू नका किंवा माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करू नका. तसं तुम्ही केलं तर, मी, माझ्या दोन मुली आणि पूजाचा मुलगा तुम्हाला कधीही नजरेस पडणार नाही. येते मी.
कल्याणीने रमा  मीरा आणि जय या आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले .


कल्याणीने अनाथ आणि अनौरस लहान मुलांसाठी बाल सदनची स्थापना केली आणि तिच्या या आश्रमात अनेक लहान मुलांना आश्रय तर मिळालाच पण त्यांचं भवितव्य ही सुरक्षित झालं.समाप्त.


©® राखी भावसार भांडेकर.**********************************************


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//