Feb 24, 2024
जलद लेखन

कल्याणी भाग दोन

Read Later
कल्याणी भाग दोन


कल्याणी -"हो आणि तुम्ही काय देणार तुमच्या लाडक्या मनूला एम.बी.ला गोल्ड मेडल मिळालं म्हणून?"

बाबासाहेब -"एक गोड गोड पापा."
कल्याणी -"पप्पा मी आता मोठी झाली आहे. ती चीडकी मनू नाही राहिले!"


बाबासाहेब -"हो का! पण तुमच्या वागण्या बोलण्यावरून तसं वाटत तर नाहीये."


कल्याणी -"पप्पा मी आता चिडेन हं. जा आम्ही नाही बोलत."


बाबासाहेब -"बर ठीक आहे. नका बोलू. आम्हीही ही मर्सिडीज ची चाबी परत पाठवतो शोरूम मध्ये."


कल्याणी -"काय मर्सिडीज? आय लव यु पप्पा."

बाबासाहेब -"आय लव यु टू बाळा."


तर ही आहे कल्याणी बाळासाहेब इनामदारांची एकुलती एक मुलगी. लाडाकोडात वाढलेली,आई वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली, ती नुकतीच पुण्याहून एम.बी.ए. करून तिच्या घरी परतली होती. तिचे वडील बाळासाहेब इनामदार एक बडे राजकीय व्यक्तिमत्व आणि रणनीतीकार. राजकारणातला अनेक तपांचा अनुभव गाठीशी असल्याने, पक्षात त्यांचे चांगलेच वजन आणि त्यांच्या शब्दाला मान होता.

दुसऱ्या दिवशी कल्याणीची आत्या- बाबा साहेबांची बहीण अक्कासाहेब कल्याणीचा हात मागण्यासाठी बाळासाहेबांकडे आल्या होत्या. अक्कासाहेब हेही राजकारणातलं एक बड प्रस्थ, पण त्यांचा मुलगा धनराज अजून पर्यंत तरी मामा आणि स्वतःच्या आई इतका राजकारणात नावलौकिक मिळू शकला नव्हता. अक्कासाहेब आणि बाबासाहेब यांचे एकमेकांशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते आणि बाळासाहेब कधीही अक्का साहेबांच्या शब्दाबाहेर नव्हते. त्यामुळेच अक्का साहेबांनी केवळ शब्द टाकण्याची देर बाळासाहेब कल्याणी आणि धनराजच्या लग्नासाठी लगेच तयार झाले.


धनराज अक्का साहेबांचा एकुलता एक मुलगा. उनाड, टपोरी, अभ्यासात जेमतेम, पण पैसे भरून त्यानं इंजिनिअरिंगची पदवी पदरात पाडून घेतली होती, आणि बाबासाहेबांप्रमाणे राजकारणात स्वतःचे नशीब आजमावत होता. त्यामुळेच अक्का साहेबांनी धनराजच्या राजकीय वाटचालीसाठी आणि भवितव्यासाठी कल्याणीची शिडी वापरली होती.


बाबासाहेबांना कल्याणी आणि धनराजच्या विवाहाची फारच घाई झाली होती. त्यांचेही आता वय झालं होतं आणि त्यांना त्यांच्या जावयालाच स्वतःच्या राजकीय वाटचालीचा वारस करायचं होतं. त्यामुळे कल्याणीच्या मताला किंवा इच्छेला विवाहाच्या या व्यवहारात काहीच महत्त्व नव्हतं.
जरी ती साहेबांनी बाबासाहेबांची अतिशय लाडकी आणि एकुलता एक मुलगी असली तरी.

शेवटी न राहून कल्याणीच्या आईने बाबासाहेबांकडे या जबरदस्तीच्या विवाहाचा विषय काढलाच.

आई -"अहो मी काय म्हणते कल्याणीच्या लग्नाची तुम्हाला एवढी घाई काय आहे? आपली कल्याणी दिसायला सुंदर आहे. अभ्यासात हुशार आहे आणि धनराज तो तर सगळ्याच बाबतीत कल्याणी पेक्षा डावा आहे. अगदीच यथा तथा."

बाबासाहेब-"हे बघा तुम्ही तुमची बायकी अक्कल तुमच्या स्वयंपाक घरातच दाखवा. आमच्या समोर नाही! अक्कासाहेब म्हणत होत्या तेच बरोबर होतं. तुम्हाला जास्त बोलायची आम्ही सूटच नव्हती द्यायला पाहिजे. आमच्या निर्णयात तुमचं डोकं चालवू नका!"

आई -"अहो पण कल्याणीच्या- माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे!"

बाबासाहेब-"बास खूप बोललात! कल्याणीला काही आम्ही सुळावर नाही चढवणार आहोत! तीही आमची एकुलती एक मुलगी आहे आणि एक लक्षात ठेवा आम्ही जे ठरवतो त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. निघा!"

आज कल्याणी ने तिच्या वडिलांचे हे रूप प्रथमच पाहिले होते. जिन्यातून खाली येताना तिच्या आई-वडिलांचा हा संवाद तिच्या कानावर पडला होता आणि ती मुळापासून हादरून गेली होती.


रीती परंपरानुसार कल्याणीचा विवाह धनराज देशमुखांशी मोठ्या थाटामाटात पार पडला. एकीकडे मोठमोठे अधिकारी, बडे राजकीय नेते, सीने तारे-तारका,अनेक स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते, अगदी झाडून सारे मोठे मान्यवर विवाह उपस्थित होते. सगळीकडे उत्साहाला नुसते उधाण आले होते.लग्नाच्या मेजवानीचा प्रत्येक जण मनभरुन आनंद घेत होता. परंतु कल्याणी आणि तिची आई मात्र मनातून अगदी दुःखी होत्या.


कल्याणीने देशमुखांच्या उंबऱ्याचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. धनराज तर प्रथम रात्रीसाठी नुसता आतुरच नाही तर अगदी आसुसला होता. सत्यनारायणाची पूजा आणि होम हवन करून कल्याणी रात्री धनराज ची वाट पहात, तिच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होती. अपेक्षेप्रमाणे धनराज त्याच्या वेळेप्रमाणे उशिराच दारू पिऊन आला आणि एखादी एखाद्या उपाशी वाघ-लांडग्यासारखा कल्याणीवर अगदी तुटून पडला. कल्याणी ह्या प्रकाराने फार भांबवली आणी घाबरली होती. धनराजचं असं जनावरासारखा वागणं तिला आवडल नव्हतं आणि सहनही झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती तापाने फणफडणली होती.

कल्याणी मांडव परतण्यासाठी माहेरी गेल्यावर तिने झाला प्रकार तिच्या आईला सांगितला पण ह्या बाबतीत आता कुणीच काहीच करू शकत नव्हतं. इकडे धनराजच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी धनराज तणतणतच खोलीतून बाहेर आला.


धनराज -"अक्कासाहेब तरीही आम्ही तुम्हाला म्हटलं होतं, अशी कचकड्याची बाहुली आम्हाला नको. आपल्या रांगड्या मुलाची गरजही तुम्हाला समजली नाही?"


अक्कासाहेब -"धनराज तोंड आवरून आणि सांभाळून बोला. हे घर आहे बाजार नाही."


धनराज -"पण अक्कासाहेब!"

अक्कासाहेब -"बस पुरे आता! धनराज, आम्ही हे तुमच्या भल्यासाठीच केलं आहे."

धनराज(उपरोधिकपणे हसून) -"माझं भलं! एक कचकड्याची बाहुली! जीला मी पंधरा मिनिटात चोळामोळा केली. तिला माझ्या गळ्यात बांधून माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलात अन म्हणे माझे भलं केलं."


अक्कासाहेब (समजूतदारीच्या स्वरात)-"हे बघा, तुम्हाला खूप मोठा झालेला आम्हाला पाहायचा आहे. आयुष्यात काय तुम्ही मोर्चे, धरणे, आंदोलन आणि उपोषणच करणार आहात काय? बस झालं आता तुमच्या मामासाहेबांच्या बैठकीतला सतरंज्यांच्या घड्या घालणं. आता आम्हाला, तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत आणि मंत्र्यांच्या खुर्चीत बघायचं आहे. जरा डोकं आणि चित्त थार्यावर ठेवून वागा! समजलं?"

ठरल्याप्रमाणे अक्कासाहेब आणि धनराज ने बाबासाहेबांचा विश्वास संपादन केला. धनराज कल्याणी शी जरा नरमाईन वागू लागला. राजकारणात जे पद गेल्या दहा-पंधरा वर्षात धनराजला कार्यकर्ता म्हणून मिळालं नव्हतं ते बाबा साहेबांच्या आशीर्वादाने अगदी दोन महिन्यात मिळाल. धनराज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि पुढे सामाजिक न्याय आणि महिला व बाल विकास मंत्री.


©® राखी भावसार भांडेकर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//