कालवाकालव

ह्लरदयातली कालवाकालव

#कालवाकालव

मी अजय सावंत,कणकवलीत कॉलेज होतं माझं. आमच्या गावापासून कणकवली फार लांब. सकाळच्या पहिल्या गाडीची आम्ही भरडावर वाट बघत थांबायचो. भरडावर रानफुलं फुललेली असायची. नुकत्याच पडलेल्या दवाने पायाखालचं गवत अगदी गारगार लागायचं. 

आमच्या घराकडून शेताच्या वाटेने भरडावर जाताना हे ओलशार गवत अंगाला बिलगायचं. मधेच एक लहान व्हाळी आहे. तिचं नितळ पाणी झुळझुळु वहातं. पहाटेच्या शांततेत तो आवाज कानांना गोड वाटतो. थंड पाण्यात लांब लांब ढेंगा टाकत आम्ही काठावर यायचो नि भरडाच्या दिशेने चालू लागायचो. 

गाव हळूहळू जागं व्हायचं. गळ्यात घुंगरं बांधलेली गाईगुरं एका रांगेत  चरायला निघायची. घुंगरांचा तो मंजुळ नाद कानाला सुखावायचा. आमचा मोती माझ्यामागे यायचा,माझा सोबती म्हणून. दूर डोंगरांच्या कुशीतून सुर्यनारायणाचं आगमन व्हायचं. आकाशात रंगांची रंगपंचमी दिसायची.

सराईत कानांना दुरुन गाडीचा आवाज ऐकू यायचा. धुळ उडवत दिमाखात आमची एसटी यायची,लाल रंगाची. आम्ही चारपाचजणं कॉलेजात जाणारे नि इतर माणसं चढायची. मी डावीकडच्या ठरलेल्या सीटवर जाऊन बसायचो.

माझ्या नियमित कॉलेजात जाण्याला तसं हळवं कारण होतं. पुष्पलता..आमच्या स्टॉपवरच चढायची ती,तिच्यासोबत अजून दोघीतिघी असायच्या पण मला पुष्पलता आवडू लागली होती. मी स्टॉपवर गेलो की तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचो. 

पुष्पलता दोन जाडजुड वेण्या हेलकावत पाणंदीतून येताना दिसायची. तिचं घर भरडाच्या जवळच होतं. तेल लावून चापूनचोपून विंचरलेले केस,त्यावर माळलेला तो घट्ट अबोलीचा वळेसर,त्या फुलांचे ते गजऱ्यातून डोकावणारे मोत्याचे देठ,तिच्या हातातली काकणं,चेहऱ्याला लावलेल्या मिना खाकी पावडरचा सुगंध,डोळ्यात रेखाटलेलं काजळ,नाकात चमकणारी चमकी,कानात लटकणारे सोन्याचे झुमके. मला तिच्याकडे बघतच रहावसं वाटायचं. 

मित्रांचा डोळा चुकवून मी तिच्याकडे पहात असायचो. ती कंडक्टरांना तिकिटासाठी पैसे देऊ लागली की वाटायचं,हिचं तिकिट आपण काढावं. कधी मैत्रिणींशी तिच्या गप्पा सुरु असायच्या तर कधी खिडकीतून बाहेरची हिरवळ बघत बसायची.

पुष्पलतापेक्षा मी दोन वर्षाने मोठा होतो. रिसेसमधे तिच्या वर्गासमोर येरझारा घालायचो. तिलाही माझं तिच्यात गुंतणं आता कळू लागलं होतं व तिच्या मैत्रिणींनादेखील. मी वर्गाबाहेर दिसताच पुष्पेच्या मैत्रिणी तिच्या कानाजवळ वाकून बोलायच्या व खुसुखुसु हसायच्या. पुष्पा लाजेने मान खाली घालायची. 

रविवारची पुष्पा नदीवर जायची कपडे धुवायला. मी ती संधी गाठून पोहायला जायचो. ती कपडे धुत असायची,मी तिला दिसेल असा नदीत पोहत असायचो. तिच्यासोबत तिची आई असायची पण तिला यातलं काही कळत नव्हतं.

 एके दिवशी पुष्पा एकटीच खडकाजवळ भेटली. मी तिला अडवलं व प्रपोज केलं. पुष्पा म्हणाली,"कसं शक्य आहे हे? अरे तुम्ही लोक साधा चहासुद्धा घेत नाही आमच्या घरी. ठाकरं नं आम्ही. भावाच्या लग्नात पाहिलं मी. आई सगळं सामान तुमच्या माणसांना देत होती. मग तुमच्या माणसांनी स्वैंपाक केला जो सगळेजण जेवले. लहानपणापासून बघत आलेय हे मी. तुमच्यातल्या माझ्या मैत्रिणी पाणीसुद्धा पीत नाहीत आमच्या घरी तेंव्हा हा खुळा नाद सोड." 

मी पुष्पाला काही सांगायला जाणार तोच त्यावाटेने जाणाऱ्या एका इसमाने आमचं बोलणं ऐकलं नि दोनात चार घालून माझ्या तात्यांना सांगितलं. तात्यांचा चाबूक होता,खुंटीवर लटकवलेला. 

मी घरात प्रवेशताच तात्यांनी  माझ्या पाठीवर सपासप फटके मारायला सुरुवात केली. विचारत होते..प्रेम करतोस..ठाकराच्या पोरीबरोबर..लाज नाही वाटत. दिवसाढवळ्या भेटतोस तिला.  तात्यांच्या बोलण्यातून मला माझ्या चुकीचा उलगडा होत होता. 

माझी आक्का मला सोडवायला आली तर तिच्यावरही एक फटका बसला. शेवटी दमूनथकून ते देवघरात जाऊन बसले. जाताना आईस सांगून गेले,चिरंजीवांस समजवा म्हणून. माझी पाठ,हातपाय काळेनिळे पडलेले. मी माझ्या खोलीत एका कोनाड्यात बसून होतो. 

कधी मध्यरात्री आई जेवणाचं ताट घेऊन आली. मी नको म्हंटलं. तिने बळेबळे मला चार घास भरवले नंतर माझ्या वळांवर तेल लावलं. आई म्हणाली,"राजेश,विसर त्या पुष्पलताला. तुझं प्रेम निव्वळ अशक्य आहे राजा."

मी म्हंटलं,"आई, तात्या स्वतःला सुधारणावादी म्हणवतात मग हा दिव्याखाली अंधार नाही का गं?" आई माझे केस कुरवाळत राहिली. तिच्या मांडीवरच मला नीज आली.

पुष्पेला माझ्या तात्यांच्या रोषाबद्दल समजलं असावं. ती माझ्याकडे ढुंकुनही पाहिनासी झाली. ती बारावीला होती. तिच्या परीक्षा लवकर संपल्या. मग तर दिसेनासीच झाली. नदीवर कपडे धुण्यास आता तिची वहिनी येऊ लागली.

 मी शेवटच्या वर्षाला गेलो. पुष्पा बारावीत खूप चांगल्या मार्कांनी पास जाली. आमच्या कॉलेजात सायन्य विभागातून दुसरी आली ती. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तिने एमबीबीएसला प्रवेश घेतला. ती कोल्हापूरला गेली.

 मी तात्यांदेखत आईस म्हणालो,"तात्या,पुष्पाने एमबीबीएसला प्रवेश घेतला." तात्या म्हणाले,"कितीबी शिकली तरी ती ठाकरच. आपली बरोबरी नाय करु शकत ती."

मी पुढे एमएससी,बीएड केलं. प्राध्यापकाची नोकरी मिळाली. शहरात राहू लागलो. तात्यांनी लग्नाचं टुमणं लावलं. तात्यांच्या बरोबरीचा व्याही त्यांनी शोधून काढला व माझी लग्नगाठ मोहिनीशी बांधली गेली. 

मोहिनी दिसायला पुष्पलतेहून उजवी होती. गोरीपान,काळ्याभोर डोळ्यांची,लांबसडक केसांची..पण तरी मनाच्या कप्प्यात पुष्पलता होतीच. कधी वाटायचं मी मोहिनीवर अन्याय तर करत नाही ना! 

मोहिनी निरागस होती. साधंसरळ आयुष्य होतं तिचं. बघताबघता दोन मुलांचा बाप झालो. मोहिनीही घरी शिकवण्या घ्यायची. माझं कॉलेज संपल्यावर मी एक गाळा भाड्याने घेतला होता तिथे ट्युशन घेत होतो. आईवडील अधेमधे यायचे. 

कधी गावी गेलो की मी तिथल्या जीवलग मित्रांकडे पुष्पलतेची चौकशी करायचो. तिचं लग्न होऊन ती मुंबईत स्थायिक झाली असं कानावर आलं होतं. मला तिचा पत्ता शोधून काढावा,आता लग्नानंतर ती कशी दिसते हे पहावसं वाटायचं खरं पण तितकी हिंमत नव्हती माझ्यात.

मुलं मोठी होत होती. त्यांची शाळा,अभ्यास,स्वैंपाक यात मोहिनी गुरफटून गेली. अगदी अवतार असायचा तिचा. भांडी घासताना कठड्याला लागून गाऊन ओला झाल्याने त्या जागी कडक झालेला,रंग उडालेला असायचा. केस कसेतरी गुंडाळून ठेवायची. सतरांदा तिला नीट रहा म्हणून सांगायचो पण तिचं आपलं ठरलेलं..झालं आता लग्न,आता कशाला नटायचंथटायचं. 

मी चिडायचो तिच्यावर. सगळ्या वस्तू मला हातात लागायच्या. अगदी माझी अंतर्वस्त्र जागेवर मिळाली नाही तर घर डोक्यावर घ्यायचो. मोहिनीला गावंढळ,बेअक्कल,अजागळ असं बरंच काही म्हणायचो. ती बरेचदा निमुटपणे ऐकून घ्यायची. 

मला वाटायचं,तिनं माझ्याशी भांडावं,मला जाब विचारावा पण छे. ती तेवढं महत्त्व देत नव्हती मला. मुलांच्या अभ्यासात गर्क व्हायची. बऱ्याचदा घरात अभ्यासासाठी जमलेली बालगोपाळांची गर्दी पाहून मी तिला म्हणायचो,"बंद कर या शिकवण्या वगैरे. तुझ्या शिकवण्यांवर घर चालत नाही आपलं." ती मंद हसायची.

एकदा चालताबोलता निघून गेली मोहिनी माझ्या आयुष्यातून. तापाचं निमित्त झालं. अगदी दोन दिवसांत खेळ संपला. त्यानंतर आईवडील माझ्याकडे रहायला आले.

 सगळ्या कामांना बाई लावली..अगदी सकाळचा केर काढण्यापासून ते रात्रीची भांडी घासेपर्यंत. मुलांनाही ट्युशन लावली. या सगळ्याला बरीच रक्कम खर्च होत होती. मोहिनीच्या कष्टांच मोल मला ती गेल्यावर कळलं. 

दोघं मुलं चिराग व पराग अगदी आईसारखी शांत निघाली. मन लावून अभ्यास करत होती. मला वडील आडूनआडून दुसरं लग्न करतोस का विचारायचे पण मला पुन्हा त्या फंदात पडायचं नव्हतं. संध्याकाळचा स्वैंपाक मी स्वतः बनवू लागलो. तेवढाच आईला आराम.

बघताबघता मुलं मोठी झाली. चिरागने त्याच्या लग्नाचा विषय काढला. प्रेमात पडला होता पठ्ठ्या. मी त्याच्या पसंतीला होकार दिला. मोठी सुनबाई खरंच खूप छान मिळाली. ती घरात आल्यापासून घर पुन्हा हसू लागलं.

 तात्या आता थकत चालले होते. एका मित्राने सुचवलेल्या डॉक्टरकडे त्यांना घेऊन गेलो. जवळजवळ दोन तासाने नंबर लागला. केबिनचं दार उघडताच माझे पाय जणू जमिनीला खिळले. पुष्पलता होती डॉक्टरच्या खुर्चीत. अगदी जशीच्या तशी. इतक्या वर्षांत काही विशेष बदल झाला नव्हता तिच्यात. जणू चिरतरुण्याचं वरदान लाभलेलं तिला. 

पुष्पलताने ओळखलं आम्हाला. तात्यांना तपासलं. काही टेस्ट करवून घेतल्या.

 आम्ही निघताना म्हणाली,"तात्या चहा मागवते. माझ्या हातचा नाहीय. तुम्हाला प्यायला काहीच हरकत नाही." तात्यांनी तिच्यासमोर हात जोडले व म्हणाले,"चुकलो पोरी. जातपात पाळत बसलो. तुम्हा चीमण्या जीवांच्या प्रेमाची होळी केली मी माझ्या नासक्या विचारांपायी. पुष्पलता खिन्न हसली. 

अजुनही तिच्या मनात मी होतो,आहे हे कुठेतरी जाणवलं नि काळजात कालवाकालव झाली.

------सौ.गीता गजानन गरुड.