दुपारचा प्रहर होता. दासी आऊसाहेबांना पंखा घालत होती. समोर एक ज्योतिषी बसलेले होते. तेवढ्यात महाराजांनी प्रवेश केला. सुर्यासम तेजस्वी चेहरा , मस्तकी चंद्रकोर , गरूडासम सरळ नाक , रेखीव दाढीमिश्या , गळ्यात कवड्यांची माळ , डोक्यावर जिरेटोप , हातात सोन्याचे जाडजूड कडे , अंगावर पांढरी शाही वस्त्रे आणि खोलवर बुडालेले त्वरा आणि महत्वकांक्षा दर्शवणारे नेत्रे ऐसे ते मनमोहक राजस रूप होते. स्वभावात राजेपण लहानपणीपासूनच होते. सर्वानी लगेच महाराजांना उठून मुजरा केला. महाराजांनी आऊसाहेबांचे चरणस्पर्श केले.
" कैसे येणे केले ज्योतिषीबुवा ?" महाराजांनी विचारले.
" महाराज ग्रहण येणार आहे. " ज्योतिष म्हणाले.
" कुठून ? विजापूरहून की आग्र्याहून ?" महाराजांनी भुवया वर करत विचारले.
" ते ग्रहण असते तर आमची काय गरज असती ? स्वराज्याला ग्रहण काही नवे नाही. अफजल , सिद्धी , शाहिस्तेखान , फतेह , कारतरब असे कितीतरी ग्रहण मावळ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर मोडून काढले. " ज्योतिष म्हणाले.
" लाखमोलाच बोललात. आपली ग्रहनक्षत्रांवर जैसी पकड तैसीच वाणीवरही आहे. " महाराज म्हणाले.
" धन्यवाद महाराज. सूर्यग्रहण येत आहे. आऊसाहेबांना दानधर्म करायचे आहे. मुहूर्त शोधत होतो. " ज्योतिषी म्हणाले.
" शिवबा , सूर्यग्रहण उग्र असल्याचे कळते. मनसोक्त दानधर्म करावे म्हणतो. " आऊसाहेब पदर सावरत म्हणाल्या.
" जरूर. पण कशाचे दान करायचे ? अन्नदान तर तुम्ही खूप केले. कितीतरी अधिकाऱ्यांच्या लेकीच्या लग्नात गडावरून अन्न गेले. कितीतरी कलावंतांना , शिल्पकारांना आपण बक्षीस म्हणून द्रव्यदान केले. धरणे बांधून पाण्याची समस्या सोडवली. गावे , जमिनी दान करून निर्वासित लोकांचे पुनर्वसन केले. वस्त्रदान म्हणाल तर आपल्या पदराखाली आज पूर्ण स्वराज्य आनंदाने नांदत आहे." महाराज म्हणाले.
" मग कशाचे दान करायचे ?" आऊसाहेबांनी हसत विचारले.
" सुवर्णतुळा. महाबळेश्वरला आपली सुवर्णतुळा करायचे योजले आहे. " महाराज म्हणाले.
" या वयात ? नको. लोक काय म्हणतील. म्हातारी या वयात तराजूत बसली. " आऊसाहेब हसल्या.
" रयत आपले कार्य जाणते. आऊसाहेब , तुम्ही नसता तर हे स्वराज्य नसते. आम्हाला तुम्हीच घडवले आहे. आपली तुळा करणे म्हणजे हिऱ्याला सोन्याने मोजल्यासम. शिवाजी , नेतोजी , येसाजी , तानाजी , बहिर्जी यांना स्वराज्याचे ध्येय देऊन त्यांना जोडणारा धागा म्हणजे तुम्हीच. तुम्ही परीस आहात ज्याने आम्हा सर्वांच्या जीवनाचे सोने केले. " महाराज नम्रतेने म्हणाले.
आऊसाहेबांची नेत्रे पाणावली.
◆◆◆
महाबळेश्वर स्थान निश्चित झाले. राजगडावरून विपुल सोने रवाना झाले. मोठा रुपेरी तराजू उभारण्यात आला. पहाटेचा समय होता. लोकांनी गर्दी केली. काहीजण दान मिळण्याच्या आशेने तर काहीजण फक्त राजकुटुंबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. आऊसाहेबांनी पांढरी साडी घातली होती. मुखावर विशेष प्रसन्नता होती. महाराजसाहेबांचा राणीवसा , लहानगे शंभूराजे , स्वतः महाराजसाहेब , पंतप्रधान मोरोपंत , अण्णाजी , चिटणीस , सरनोबत नेतोजी पालकर , कुडतोजीराव , सुभेदार तानाजी , येसाजी कंक , सोनोपंत अशी अनेक मातब्बर मंडळी प्रत्यक्ष हजर होती. गार वारा सुटला होता. पंचगंगा नदी झुळझुळ वाहत होती. दाट हिरवीगार वनराई मनाला मोहिनी घालत होती. शंभूमहादेवाच्या मंदिरातून घंटानाद सुरु झाला. पंडितांनी तराजूची पूजा केली. मंत्रजप सुरू झाले. महाराज , पुतळाबाई आणि शंभूराजांनी आऊसाहेबांचे हात धरून त्यांना तराजूच्या एका पारड्यात बसवले. आऊसाहेबांवर हळद-तांदूळ शिंपडले गेले. मंत्रजप सुरूच होते. मग सोयराबाई पुढे आल्या आणि त्यांनी सोन्याच्या मोहरा भरलेली एक थैली दुसऱ्या पारड्यात ठेवली. लगेच आऊसाहेबांचे आशीर्वाद घेतले.
" सरनोबत. " महाराजांनी हातानेच इशारा केला.
नेतोजीराव पुढे आले. त्यांनी सोन्याचे पुतळे ठेवले. शंभूराजेही पुढे आले. शंभूराजे यांचे रूप ते काय वर्णावे ? वेरुळच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे मालोजीराजे भोसले यांचे पंतू , साडेतीन वर्षे निजामशाही झुंजवणारे महापराक्रमी सरलष्कर शहाजीराजे भोसले यांचे नातू , युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र शंभूराजे यांना पाहिले की प्रत्यक्ष महादेवच कैलाश उतरून बालरूपात अवतरले आहेत असे वाटायचे. मग बाकीचेही मंडळीही आपापल्यापरीने दुसरे पारडे भरू लागली.
हळूहळू दुसरे पारडे सोन्याने भरले. आऊसाहेब ज्या पारड्यात बसल्या होत्या ते पारडे वर गेले. आऊसाहेब खाली उतरल्या.
हळूहळू दुसरे पारडे सोन्याने भरले. आऊसाहेब ज्या पारड्यात बसल्या होत्या ते पारडे वर गेले. आऊसाहेब खाली उतरल्या.
" सोनोपंतकाका , बसणे. " महाराज म्हणाले.
" नाही राजे. आम्ही चाकर. " सोनोपंत हात जोडून म्हणाले.
" तुम्ही , कान्होजी जेधे , बाजी पासलकर , माणकोजी दहातोंडे , दादोजीआजोबा ही सर्व मंडळी स्वराज्यासाठी चंदनासारखी झिजली. तेव्हा कुठे आता सुखसमृद्धीचा सुगंध दरवळत आहे. स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर वाढत नाही. कधीकधी वाणी आणि कलमही चालवावी लागते. तुमच्यासारखे मुत्सद्दी वकील स्वराज्यास लाभले हे स्वराज्याचे भाग्य. तुमच्या कार्याचा सरकारने केलेला हा सन्मान समजा. " महाराज म्हणाले.
" सोनोपंतकाका ऐकत नाहीत. चिटणीस , एक आज्ञापत्र लिहून द्या. " तानाजीराव म्हणाले.
सर्वजण हसले. सोनोपंतांचीही सुवर्णतुला झाली. मग दानधर्म करण्यास प्रारंभ झाला. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आले.
" आऊसाहेब , आपल्या डोळ्यात आसवे ?" शंभूराजांनी विचारले.
" शंभूराजे , जुने दिवस आठवले. त्याकाळी स्त्रियांच्या अब्रूला चिंध्याचीही किंमत नसे. दरबारात मराठी सरदार कापले जात. पुणे शत्रूंनी बेचिराख केले होते. घरे-वाडे सर्वकाही जळून खाक झाले. गाढवाचे नांगर फिरवण्यात आले. " आऊसाहेब म्हणाल्या.
" पण नंतर आपण परत सुव्यवस्था आणली आणि सोन्याचा नांगर फिरवला. आऊसाहेब , आज आम्हाला पुतळामातोश्री यांनी सांगितलेली कथा आठवली. देवी सत्यभामा एकदा श्रीकृष्ण यांची सुवर्णतुळा करायचे ठरवते. द्रव्य संपले तरी पारडे हलेना. मग नारदमुनी देवी सत्यभामाला तुळशीपत्र ठेवायला सांगतात आणि मग पारडे हलते. आम्हीही आज तोच प्रयोग करावे म्हणले. पण नंतर वाटले की आमच्या आऊसाहेब स्वतःच तुळशीवृंदावनासम पवित्र आहेत. पारडे हलणार नाही. आम्हाला खरच तुमचा नातू असल्याचा खूप अभिमान वाटतो. आम्ही एकदिवस दिल्ली जिंकून तुम्हाला दिल्लीच्या तख्तावर बसवू. " लहानगे शंभूराजे म्हणाले.
आऊसाहेबांनी मायेने त्यांना उराशी कवटाळले.
सोहळा झाल्यावर सर्वजण प्रसन्न होऊन राजगडावर परतले. महाराज सदरेवर आले.
" महाराज , सोहळा उत्तम झाला. " मोरोपंत म्हणाले.
" सूर्यग्रहण तर केवळ निमित्त. खरे कारण काही औरच होते. महाराजसाहेबांच्या निधनानंतर आऊसाहेब हताश झाल्या होत्या. ती ऊर्जा दिसत नव्हती. म्हणून हा घाट. आऊसाहेबांच्या प्रसन्नतेसाठी आम्ही काहीही करू शकतो. " महाराज म्हणाले.
" योग्य केले महाराज. एक लहान मुलगा तिथे आईसोबत आला होता. म्हणतो कसा , " आई , मी मोठा झाल्यावर मावळा होईल. तुला लुगडं घेऊन देईल. महाराज जस आऊसाहेबांची सेवा करतात तशीच तुझीपण सेवा करणार. " सुभेदार तानाजी म्हणाले.
" आतापर्यंत बायकोसाठी ताजमहाल बांधणारे राजे-बादशहा बघितले. पण आईसाठी सुवर्णतुला करणारा मातृभक्त राजा म्हणजे एकच. " कुडतोजीराव म्हणाले.
" आपल्या सर्वांची माऊली म्हणजे ही मायभूमी. तिचीही सेवा करा. त्या माऊलीसाठी एकत्र येणे ज्या लेकरांना कळले त्यालाच कळले की जगातला सर्वात मोठा स्वार्थ तोच. " महाराज म्हणाले.
" महाराज , आता आदर्श मुलगा म्हणजे कसा याचे उदाहरण सांगण्यासाठी रामायण-महाभारतात घुसण्याची गरज नाही. तुम्हीच कलियुगातले श्रवणकुमार. ज्याला बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्याला लेक कळली तो वैदेहीचा पिता राजा जनक झाला. ज्याला प्रेयसी कळली तो राधेचा कृष्ण झाला. ज्याला आई कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. " सरनोबत नेतोजीराव म्हणाले.
समाप्त