कळी खुलली राधा हसली

ईरा : शब्दांची वारी लेखणीला प्यारी

कथेचे नाव : कळी खुलली राधा हसली
    
विषय : आणि ती हसली 

फेरी : राज्यस्तरीय लघूकथा स्पर्धा 

    "अग ये राधे आवरलं का नाही तुझं काम ?"  घरातून सासूबाई ओरडल्या." सारखं - सारखं एकच काम करुन बाकीचं काम कुणी करायची …! इथं काय मोलकरीण ठेवलियां ?"  असं नुसतं बरळत सासूबाई राधाची नेहमी परिक्षा घ्यायची.राधा पहाटे लवकर उठायची.उठल की पहिला जनावारांचा गोठा गाठायची.जनावारांचे शेण , धारा यातचं तिचा सकाळचा वेळ जायचा.लगेच तिला जेवणघरात स्वयंपाकात जुंपलेलं असायचं.कामाच्या या रहाटगाडग्यात राधा पुरती अडकून पडलेली असायची.क्षणाचीही  उसंत नसायची…!! लगेच काम जोडलेलं असायचेचं.कामाच्या या त्रासाने राधा दमून जायाची पण काय करणार …! सासूच्या अविवेकी वागण्यामुळे तिला सारे सहन करायला लागत होते.पती शिवा अत्यंत साधाभोळा असलेमुळे आईच्या शब्दापुढे जात नसे.राधा एका मानसिक दबावाखाली जीवन जगत होती.

      राधा गरीब शेतक-याची मुलगी.आपल्याच गावातील शिवा नावाच्या शेतक-याशी विवाहबद्ध झाली होती.राधा , शिवा , सासूबाई असं जेमतेम तीन माणसांच कुटुंब …!! तोकड्या जमिनीचा तुकडा त्यावर गुजरान करण अवघड त्यामुळे मोलमजूरी करुनच घर चालवावे लागत होते.शिवाचे वडिल गंभीर आजारामुळे लवकरच देवाघरी गेले.शिवाला सगळा भार सांभाळावा लागत होता.सोबत राधाची भरभक्कम साथ होती.दोन जनावारांचा सांभाळ आणि मोलमजूरी यावर घराची भिस्त चालू होती.जनावारांना चा-याची सोय शिवा व राधा करत होते.म्हैशींच्या दुधावर त्यांचा संसार चालला होता.घरातला सगळा पसारा आवरुन राधा दुस-यांच्या शेतात कामाला जात असत.राधा प्रत्येक कामात तरबेज होती.शेतातील काम ती सहजतेने करत होती.भांगलणी , खुरपणी यामध्ये राधा जीवापाड दुस-यांच्या शेतात राबतं होती.राधाच्या या प्रामाणिकपणामुळे तिला दररोज शेतात काम करण्यासाठी माणसांची रिघ लागायची.त्यामुळे राधा कायम कामात असायची.

       राधाची सासूबाई म्हणजे विचित्र रसायन होतं.कधी कुणाचा अपमान करील हे सांगता येत नव्हतं.नेहमी आपलाच तोरा ती मिरवत असत.घरात सगळ आपल्याच म्हणण्याने चाललं पाहिजे असं तिला वाटे.अंगाने जाड , खणखणीत आवाज , बोलण्याचा झपाटा यामुळे राधाची सासूबाई दिसताच प्रभाव पडे.आजूबाजूला व शेजारपाजा-यात सासूबाईचा वेगळाच दरारा होता.हेच नशीब राधाच्या पदरात पडलं होतं पण राधानं आपल्यापरीने ते पेललं होतं …!!

       राधाची सासूबाई प्रत्येक कामात लक्ष घालायची , कोणतेही काम प्रेमाणे न सांगता दरडावून सांगायची.
   " तुला काम करायची मोडच नाही…! " " हातात घेतलेलं काम लगबगीनं आवरावं आणि मोकळ व्हावं हे तुला कधी जमलचं नाही." सासूबाईचा हा राधाला बोलण्याचा ठोका कायम ठरलेला होता.बसल्या जागेवरुन ती नुसतं हुकुम सोडत होती.
  " राधा , घराची साफसफाई कर आणि जेवणाच लवकर बघ आणि ती शेजारची शेवंता भांगलाय बोलवाय आलती बघ …! " सगळ  आवरुन जा लवकर ..! ' सासूबाईचे हे कानावर शब्द पडताच राधा अधाशासारख काम फस्त करायची ..! कामाचा हा दररोजचा ताण तिच्या शरीराने नेहमीच अंगीकारला होता.आपला जन्म केवळ कामासाठीच झाला आहे का ? असा प्रश्न तिला नेहमी पडत होता.संसाराचे हे नेहमीचे रडगाणे राधाच्या मनांत कायमचं रुजलेलं होतं.

      राधा आणि शिवाच्या लग्नाला सहा - सात वर्ष झाली होती.संसार छान चालला होता.दोघांच्या विचारात तसा सन्मवयही बरा होता.शिवाला आपल्या आईचं वागणं पटत नव्हतं पण घरात सारखं वाद बरे नव्हेत या हेतूने शिवा सगळं माहित असूनही गप्प बसत होता.राधा आणि शिवाला एकच चिंता सतावत होती ती म्हणजे त्यांच्या संसार वेलीवर अजून फूल उमलेलं नव्हतं…! याच कारणाने शिवा अस्वस्थ होत होता.त्याच्या वागण्यात ही अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती.पण राधाबरोबर तो मिळूनमिसळून वागत होता.तिला समजून घेत होता म्हणून राधाला त्याचा फार मोठा आधार होता.राधाला पण आपल्याला मूल नाही याचे शल्य होते.मनाची घालमेल , चिंता आणि सासूबाईचा दररोजचा शब्दांचा भडीमार या सगळ्याला राधा कंटाळली होती.बायकांचे सतत मूलाबद्दल विचारले जाणारे प्रश्न , समाजात कुठे जाईल तिथं होणारी मानहानी हे सगळं राधा पचवत होती आणि निर्धाराने  येईल त्या प्रसंगाला तोंड देत होती.गलितगात्र झालेली राधा कधी - कधी काम करता - करता थांबत असतं.मग शिवा म्हणे " अग ये राधे , कुठ हरवलीसं ..! देव समदं ठिक करेल घे आमचं. "  मग राधा खडबडून जागी व्हायची आणि " तुमच्यासारखं  धनी मिळालं म्हणून बरं नाही तर जन्माचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नव्हतं..!" कधीतरी अशा सुसंवादाने  राधा  , शिवा जीवनात आनंद घेत होती परंतू मूल नसल्याची खंत हृदयाला सतत बोचत होतीच.

      राधाला ब-याच डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु होती परंतू अजूनही कांही फरक पडलेला नव्हता.एकदिवस गावातील डॉक्टर पवारांनी अचूक निदानासाठी शहरातील डॉक्टरांना भेटण्यास सांगितले.राधा व शिवा त्या डॉक्टरांना भेटण्यास गेले.डॉक्टरांनी अगोदरचे सर्व रिपोर्ट पाहिले व स्वतः राधाला योग्य उपचार सुरु केले.राधाकडेच दोष होता तो नविन तंत्रज्ञानाने डॉक्टरांनी दूर केला व डॉक्टरांनी त्यांना आशावादी राहण्यास सांगितले. मनांत एक नवी पालवी घेऊन राधा व शिवा घरी आले.त्या दिवसापासून राधाच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक बदल जाणवू लागला.सासूबाई कांहीही बोलली तरी राधा  लक्ष देत नव्हती.राधाला आता बाळ होण्याचे वेध लागले होते. 
  
     असेच दिवस सरत होते.राधाला अखेर ती गोड बातमी समजली.राधाला बाळ होण्याची चाहूल लागली.राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला.राधा प्रफुल्लित  मनाने वावरु लागली.शिवालासुद्धा आनंद झाला होता.आपल्या हट्टी स्वभावाने  त्रस्त करणारी सासूबाई राधाच्या गोड बातमीने सुखावली होती.राधा स्वतःची काळजी व्यवस्थित घेत होती.शिवाही तिला साथ देत होता.कोणतेही काम शिवा व सासूबाई करत होत्या.सासूबाईच्या स्वभावातील बदल विस्मयकारक होता.ती राधावर प्रेम करु लागली.आपल्या घरात बाळ येणार या भावनेनं सासूबाई आनंदली होती.बघता - बघता राधाचे प्रसुतीचे दिवस जवळ आले.राधाला अचानक कळा सुरु झाल्या.तातडीने राधाला दवाखान्यात नेण्यात आले.थोड्याच वेळात बाळ रडण्याचा आवाज आला.राधाची नैसर्गिक प्रसुती झाली होती.राधाने गोंडस मुलीला जन्म दिला होता.मुलाचे ते रुप पाहून राधा खूप आनंदली होती. आपले मुल होण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.शिवा आणि सासूबाई आनंदउत्सव साजरा करण्यात दंग होते.राधा आपल्या कळीचे खुललेले रुप पाहून मनोमन हसली होती…!!

                     ©®नामदेवपाटील 
                       जिल्हा कोल्हापूर