कालाय तस्मै नमः

काळ आला होता
चांदगढ़ राज्यातला दिनमणी हा राजवाडा एके काळी सगळ्यांचा चर्चेचा विषय होता. आता राजेशाहीची प्रथा निकालात निघाली असली तरी राजवाड्याची भव्यता, सौंदर्य आणि इतर सारी कामं इमाने इतबारे परंपरागत चालूच होती. तीन बाजूंनी वनराजीने वेष्टित ही वास्तू सहसा पाहणाऱ्याच्या दृष्टीपथात येत नसे. ती एखाद्या मुग्ध नायिकेप्रमाणे विलोभनीय वाटे.
 
राजनंदिनी म्हणजे अक्कासाहेब, यशोवर्धन म्हणजे त्यांचे चिरंजीव, सुरबाला ह्या यशोवर्धनच्या भार्या, आणि राजवर्धन हे लाडके युवराज- यशोवर्धन आणि सुरबालाचे एकुलते एक चिरंजीव- इतकीच माणसं ह्या वाड्यात वास्तव्याला होती.
 
यशोवर्धन यांच्या दोन स्टील फॅक्टरी होत्या आणि त्या चांगल्या चालत होत्या. त्यांचं नाव सर्वत्र गाजत होतं. यशोवर्धन बहुदा तिथे जास्त आणि वाड्यात कमी असायचे.
 
त्या दिवशी दहा वर्षाचे राजवर्धन बाहेरून परत आले. आणि त्यांना दिसली ती केतकी रंगाची, दोन वेण्या घातलेली परकर पोलकं परिधान केलेली एक गोड पण चंचल मुलगी. ती फुलपाखरांच्या मागे धावत होती. पहिल्यांदाच ह्या वाड्यात कोणी त्यांच्या बरोबरीचं आलं होतं. ते लगेच आनंदाने पुढे होत म्हणाले, "नमस्कार! कोण तुम्ही?"

त्या बाहुलीने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, "मी कां सांगू मी कोण? आधी तू सांग तू कोण?"

त्यावर राजवर्धन आश्चर्यचकित झाले. आजवर त्यांच्याशी अशा प्रकारे कोणीच बोललं नव्हतं. 

तरीही ते म्हणाले, "आम्ही युवराज राजवर्धन म्हणजे छोटे सरकार."

आता ती बाहुली तोंडावर हात ठेवून हसत बोलली, "एवढे मोठे नाव असते का कोणाचे?"

"पण आमचे आहे. बरं, आपलं नाव काय आहे?" असं राजवर्धनने विचारताच ती बाहुली बोलली, "माझं नाव लतिका. फक्त लतिका"

त्यांच्यातील हे संभाषण अक्कासाहेब ऐकत होत्या. त्या हसतच म्हणाल्या. " युवराज ! त्या आमच्या भावाची नात आहेत. आणि आता इथेच राहणार आहेत."

" पण अक्कासाहेब ह्या भांडखोर वाटत आहेत." 
असं युवराजांनी म्हणताच अक्कासाहेब हसू लागल्या.

 लतिका बोलली,
"हो कां? मग मी कट्टी." 

आणि आता तर अक्कासाहेबांचं हसू थांबेचना. युवराज रागातच आत निघून गेले.

ही पहिली भेट. नंतर नेहमीच भांडत, हसत, चिडवत सतत भेटी घडतच राहिल्या कारण लतिका आता त्या वाड्यातच राहू लागली होती. ती ही राजवर्धन बरोबर शाळेत जाऊ लागली. जातीची प्रतिभावान लतिका शाळेत लगेच लोकप्रिय झाली. तिच्या अभ्यासाबरोबर,गायन,नृत्य आणि चित्रकला ह्या गुणांची कीर्ती कस्तुरी सुगंधाप्रमाणे सर्वत्र पसरू लागली. राजवर्धन ही बुद्धीमान होतेच, पण ते शांत आणि गंभीर प्रवृत्तीचे असल्याने बहुधा आपल्याच कोशात असत. त्या उलट लतिका. सतत चिवचिव.

हळूहळू दोघंही मोठी होत होती. सुरबाला चौकस लक्ष ठेवून असायच्या. त्यांचं लतिका आणि राजवर्धन ह्यांच्या हालचालींवर लक्ष असायचं. लतिका तारुण्यात पदार्पण करत होती आणि तिचं सौंदर्य तेज धरत होतं. कोणाला ही भुरळ पडेल अश्या अनाघ्रात सौंदर्याची ती स्वामिनी होती. राजवर्धन तिच्याशी भांडत, तिला चिडवत तिच्यात गुंतत चालले होते आणि सुरबालाच्या हे लक्षात येताच त्यांनी राजवर्धनला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पाठविण्याचा निर्णय घेतला. अर्थातच हा निर्णय कोणालाच मान्य नव्हता. पण त्यांच्या पुढे कोणाचेच काही चालले नाही आणि राजवर्धन अमेरिकेत गेले. पण जाताना ते अक्कासाहेबांना काही सांगून गेले होते.

लतिकाला काही दिवस बरं वाटलं. ती तसं अक्कासाहेबांना म्हणालीही.

" बरं झालं.छोटे सरकार अमेरिकेत गेले. किती शिष्टासारखे वागायचे .सतत काही न् काही कारणांवरून मला चिडवत रहायचे. आता मी मस्त राहेन, कुठे ही फिरेन, कधी ही धावेन. नाहीतर सारखं त्यांचं लक्ष असायचं माझ्यावर."

पण दोन दिवसातच तिला विचित्र वाटू लागलं. जिथे तिथे राजवर्धनचा भास होऊ लागला. उद्यानात रोज गाणं म्हणणारी ती, दोन दोन दिवस उद्यानाकडे फिरकेनाशी झाली. गाणं जणू रुसून बसलं होतं. तिची ही अवस्था सगळ्यांबरोबर यशोवर्धनच्याही लक्षात आली. ते प्रेमाने विचारपूस करत म्हणायचे, "बेटा ! आपली तब्येत नरम दिसते. बरं वाटत नसेल तर दुखणं अंगावर काढू नका. आपण आमची जबाबदारी आहात."

पण लतिका मात्र
"नाही ! मला काहीच होत नाही."
 म्हणून टाळायची. अक्कासाहेब आणि सुरबाला ह्यांनी तिचा रोग बरोबर ओळखला होता. आता सुरबाला तिच्या शिक्षणाबरोबर तिच्या लग्नाचा ही विचार करायला लागल्या. पण अक्कासाहेबांच्या मनात वेगळाच विचार होता. तसा विचार त्यांनी यशोवर्धन ह्यांना बोलून दाखवताच ते ही आनंदाने तयार झाले. वहिनी साहेबांना ते पटलं नसलं तरी ती राजवर्धन ह्यांचीच इच्छा आहे असं कळल्यावर त्यांचं कोणी ऐकून घेतलं नाही.

लतिकाला हे कळताच आनंद आणि आश्चर्य वाटले. अक्कासाहेब हसून म्हणाल्या,
"बरं का राणी सरकार, आमचे छोटे सरकार आम्हांला सगळं सांगतात. आमच्या पासून काहीच लपवत नाहीत आणि तुमचं वागणं आम्हांला सगळं सांगत असतं. मग काय आम्हीही इथली खबर अमेरिकेत पोहोचवली आणि बघा आपल्या गालावर कशी लाली आली."

"काहीतरीच अक्कासाहेब" म्हणत लतिका सरळ उद्यानात पळाली. सगळ्या निसर्गाला सांगू लागली, "ऐकलंत का ? तुमचे शिष्ट छोटे सरकार म्हणे आमचे होणार . इश्श ! काहीतरीच! आता चिडवणार कोण?" 
आणि तिने स्वतःच स्वतःचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला.

राजवर्धन परत आले. लतिका आणि त्यांची नजर भेट झाली. दोघं एकमेकांच्या तरुण रूपावर आनंद मिश्रित आश्चर्यात होते.
लग्नाचा मुहूर्त निघाला. पाहुणे मंडळी आली. लतिका बिना आई बापाची पोरं. पण तिचे पितामह म्हणजे अक्का साहेबांचे भ्राता आले.
वाडा नव्या नवरी प्रमाणे नटला. होमाचे धूर, सनईचे सूर, भटजींचे मंत्रोच्चार ह्यात राजवर्धन आणि लतिका सप्तपदी चालून विवाह बंधनात बांधले गेले. 

नव्या नवलाईचे दिवस मजेत जात होते. लतिकाने आपोआपच आपला अल्लडपणा सोडून घराण्याला शोभेल असं सौम्य, समंजस रूप धारण केलं. हे रुप तिच्या सौंदर्याला उभारी देत होतं. राजवर्धन कामाला जात पण मन सतत लतिका भोवती रुंजी घालत असे. दोघंही प्रेम रंगी रंगून गेले होते. राघू मैने प्रमाणे त्यांचे प्रेम वाड्याच्या कानाकोपऱ्याला दिसत होतं. वाडाही प्रेमरसात चिंब भिजत होता.

दिवस महिन्यात बदलत होते. सुरबाला सोडून सगळे आनंदात होते. पण नियती मात्र खदखदून हसत होती. कोणाला कळो अथवा न कळो तिला सर्व कळत होतं. 

घरात नवा पाहुणा येणार ही चाहूल लागली आणि वाड्यात आनंदाला उधाण आलं. सुरबाला ही थोड्या निवळू लागल्या. 

त्यादिवशी राजवर्धन लतिका सोबत फिरायला गेले. थंड वारं, संध्याकाळची रम्य वेळ, दोघं कारमध्ये गाणी लावून एका धुंदीत जात असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीपासून बाजूला होण्याच्या नादात दुसऱ्या गाडीवर आपटले आणि अपघाताची बातमी वाऱ्यासारखी वाड्यावर पोहोचली.

अंगातील त्राण गेल्यासारखं झालं. तरीही सर्व हाॅस्पिटलमध्ये धावले. अपघात जबरदस्त होता. राजवर्धनचं काही खरं नव्हतं. सुरबालाचा स्वर बिघडला.

" म्हणून मला ह्या नको होत्या पण तेंव्हा आमचं कोणी ऐकलं नाही. आता युवराजांचं काय होणार? देवा तुझ्यावरच भार माझ्या पोराचा."

आणि लतिका? ती ही जखमी झालीच होती. शरीरानेच नाही तर मनाने ही. तिचं मातृत्व हरवलं होतं. त्यातही तिला राजवर्धनची काळजी होती. त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये चालणारी गडबड तिला वेगळेच संकेत देत होती.

दोन दिवस राजवर्धन बेशुद्ध होते. त्यांच्या डोक्यावर जोरात मार लागला होता. डॉक्टरही काळजीत होते. सगळ्यांची रया गेली होती. आता काय होईल ते सांगता येण्या सारखं नव्हतं.

आणि 
आणि अचानक राजवर्धन बोलले, "अक्का साहेब! लतिकाला रागवा. त्या बघा आम्हांला जिन्या वरून ढकलतील."

राजवर्धन शुद्धीवर आले म्हणून सगळे आनंदले असून ही त्यांचं बोलणं ऐकून हादरले होते राजवर्धन ह्यांची स्मृती गेली होती. ते आपल्या बालपणीच्या काळात पोहोचले होते.

काळ आला होता पण….

तो काही विचित्र देणगी देऊन गेला होता.

पण लतिका कोणाला ही हार जाणारी नव्हती. ती राजवर्धन ह्यांच्यासाठी लहान लतिका झाली. सौभाग्य अलंकारांचा त्याग करून,ती परकर पोलकं घालू लागली आणि परत उद्यानात आणि वाड्यात लहान पोरीसारखी बागडू लागली. राजवर्धन तिच्यासोबत खेळत असायचे आणि आनंदात असायचे. अक्का साहेब, यशोवर्धन , सुरबाला आणि वाड्यातील सगळेच कारभारी हे अश्रूपूरित डोळ्यांनी बघत असायचे. 

अधूनमधून राजवर्धनचा स्पर्श लतिकाला मोरपीस फिरल्या सारखा वाटायचा पण त्यात निव्वळ बालपण असायचं आणि लतिका उसासा टाकून शांत असायची. रात्र रात्र डोळे टक्क उघडे ठेवून ती आपल्या नियतीशी झगडायची.

अधूनमधून हॉस्पिटलमध्ये राजवर्धन ह्यांना तपासणी करून घ्यायला जावं लागायचं. एकदा ते अशीच तपासणी करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेले असता, डॉक्टरांनी एकांतात घरच्यांना सल्ला दिला, 

"जे घडल्यामुळे राजवर्धन ह्यांची स्मृती गेली होती. तीच घटना परत घडली तर स्मृती येण्याची शक्यता आहे. ह्या ट्रीटमेंटला शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात. आपण घरी जाऊन विचार करावा. काय जे ठरेल ते मला कळवा. आपण पुढे काय करायचं ते ठरवू."

 वाड्यावर सल्ला मसलती झाल्या आणि हो नाही म्हणता म्हणता ती ट्रीटमेंट राजवर्धन ह्यांना द्याची हे नक्की झालं.

एके दिवशी संध्याकाळी राजवर्धन आणि लतिका गाडीने फिरायला निघाले. लतिकाने त्या दिवशी साडी नेसली, सर्व सौभाग्य अलंकार घातले. ती गाडीत येऊन बसली आणि अगोदरच येऊन बसलेले राजवर्धन जोर जोराने हसू लागले आणि म्हणाले,

"अरे ! तुम्ही काय आईसाहेब आहात का? किती मजेदार दिसत आहात.काढा हे सगळं."
त्यांची कशीतरी समजूत घालून ती दोघं फिरायला निघाली. ड्रायवर गाडी चालवत होता. गाणी लागली होती. बाहेर शांत वारं चाललं होतं .
आणि ठरल्याप्रमाणे समोरून एक गाडी आली. ड्रायवरने आपली गाडी वळवली, करकचून ब्रेक दाबले, गाडीने सरळ दुसऱ्या गाडीला धडक दिली, आणि ड्रायव्हरच्या गाडी वरून ताबा सुटला. गाडी गटांगळ्या खात बाजूच्या झाडांवरून फरफटत उलटीसुलटी होत एका झाडाला आदळली. काही क्षणातच गाडीला आग लागली आणि सगळंच संपलं.

आता वाड्यावर कोणीच नसतं. अक्का साहेब त्या बातमीने धक्का बसून गेल्या. यशोवर्धन आणि सुरबाला सगळं सोडून परदेशी निघून गेले. 
काही वेळातच होत्याच नव्हतं झालं होतं.


©️ राधा गर्दे
कोल्हापूर