Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

कळली ना तू मला

Read Later
कळली ना तू मला

विषय- स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

 

शीर्षक- कळली ना..तू मला

 

ती....हसत आहे हसत आहे हसत आहे. का? तिचे तिलाच कळेना! बघणार्‍याला बोध ही होईना. का बरे, रडत रडत हसते आहे ही. काल पर्यंत पेटून उठलेली बाई, आज जेव्हा तिच्या मनासारखे झाले. तेव्हा वेड्यागत का हसत आहे?

 

शेवटी, कुणी तरी तिला विचारलेच,"झाले नां मनासारखे?

मग पेढे वाटायच्या ऐवजी तू रडत का आहेस? तूच म्हणत होतीस नां, 'ज्या दिवशी डीवोर्स होईल मी पंगत बसवेन, ढोल ताशे वाजवीन,' मग हे आनंदाश्रू आहेत की....चेहर्‍यावरुन काही कळेना, बोल नां?"

 

काय बोलणार होती ती?

शब्द आज मुके जाहले

का, मी वळूनी पाहिले

जीवन कोपास वाहिले

का, मी वळूनी पाहिले

प्रेम अस्मितेस वाहिले

का, मी वळूनी पाहिले

 

हसता हसता की रडता रडता अचानक अश्रूही आटले.

फटफटलेल्या डोळ्यांत आठवणींचे काहूर माजले. आपलेच सूर आज बेसूर वाटले. न्याय मागणे का भेसूर दिसले. आज अचानक मी स्वस्त झाले. दगलबाजांचे भाव चढले.

 

प्रेमळ, मायाळू, आज्ञाधारी वैष्णवी. आईवडील, आजीआजोबा, आणि दादाची लाडकी भारी! कशाचीच ददात नाही घरी. पण, लाडकी असूनही लाडावलेली अजिबात नाही. 

'आपलं ते मनापासून जपावं' बाळकडू ल्यायलेली.

 

खुप स्वप्नं उराशी बाळगून सासरी आली. सासरी एकुलती एक मोठी सून म्हणून मान मरातब भरभरुन मिळाला. नवर्‍याच्या मनातील कोंदणात स्थानही मिळवले. यथावकाश दोन गोंडस लेकरांची आई झाली. आता तर माहेरचाही जणू विसर पडत होता, एवढी आपल्या संसारात मग्न झाली. सुपर वूमन बनून घरदार सांभाळू लागली. आपल्या धुंदीत सासरला समर्पित जीवन जगू लागली. 

 

आजचा दिवस जणू तिचा नव्हता. पापणीही फडफडत काही सांगत होती. येणार्‍या वादळाची जणू थोडी पुर्वसूचना तिला देत होती. विश्वासाने वावरणार्‍या मनाला तिचा इशारा काही कळला नाही. मग जे होणार होते त्याला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही.

 

पहाटे पहाटे घरातील स्टडी टेबल आवरता आवरता सहजच नवर्‍याच्या मोबाईल वर फ्लॅश होणार्‍या मेसेजेसने लक्ष वेधले. एक, दोन, तीन....अघटीत घडले.

हात जिथल्या तिथेच थांबले. हे काय फ्लॅश झाले?

तिचा, तिने बघितलेल्या मेसेजवर विश्वास बसत नव्हता! भांबावलेल्या भावनेने "काम" केले. 

टेबल लॅम्पला चकनाचूर केले.

काहीतरी अघटीत घडले. घाबरुन नवर्‍याने बाहेर धाव घेतली.

अगं काय झाले? काही लागले तर नाही ना तुला? कसा पडला हा खाली? लक्ष कुठे आहे राणी? काळजी शब्दा शब्दांतून व्यक्त होत होती. घरातील सम्राज्ञी हे नाटक बघत होती.

 

तुटलेला लॅम्पचे तुकडे त्याने, उचलून हातात घेतले. अजून काही बोलणार तेव्हढ्यात लक्ष तिच्या चेहर्‍याकडे गेले. एवढा दुःखी आत्मा तिचा त्याने, पुर्वी कधी बघितला नव्हता. क्षणभर चाट पडून तो सावरला. तिच्या बावरलेल्या मनाला दिलासा देऊ लागला.

 

"अगं तुटला तर तुटला लॅम्प, त्यात काय एवढे! दुसरा आणू.

नाहीतरी हा जूना झाला होता. प्रकाशही कमी झाला होता. रंग ही उडाला होता. मधे मधे आचके ही द्यायचा. धक्का मारुन मारुन माझे काम करायचा. जाऊ दे ह्याला बासनात टाकू. मस्तपैकी नवीन आणू." तिच्या पाठीवर सांत्वनाची थाप मारत हसून बाहेर गेला.

 

पांढर्‍या पडलेल्या चेहर्‍याला तिने आरश्यात निहारले. ह्याने लॅम्प संबंधी भाष्य केले की माझ्यासंबंधी!

'आरश्यात मेसेज फ्लॅश होत होते.

कालची रात्र मी कधीच विसरणार नाही.

तसा तू रांगडा गडी आहेस.

आज जरा लवकर ये घरी.'

हाय हाय रे, स्वतःला निहारत होती. कोलमडून पडू पाहत होती. मध्येच लक्ष भिंतीकडे गेले. लग्नातल्या फोटोला लागले होते जाळे. झटक्याने ती स्टूल वर चढली. आपल्या पदराने फ्रेम पुसू लागली. बर्‍याच दिवसात फ्रेम पुसली नव्हती, म्हणून फ्रेमच्या आत फोटोवर थोडी "कसर" लागली होती.

 

बहूतेक उशीरा लक्ष गेले. फ्रेम उघडून पदराने पुसण्याचा प्रयास फसला. फोटो अगदी मधोमध फाटला. सरसर जलधारा गालावरुन वाहू लागल्या. डोक्यातील विचार कुठे"कसर"राहिली शोधू लागल्या.

 

मी तर ह्याच्याच घरात बंद होते. मात्र नवर्‍यासाठी थोडी मंद होते. पण मी ह्याच्याच गोकुळात दंग होते. हाच का गुन्हा माझा? हिंमत झाली कशी दगा करायची. आता कमी करणार नाही मी, शिक्षा तयाची. 

 

गेली लाडकी पदर खोचून कायद्याच्या दारी. सासर-माहेर सारे गळ घाली. नवराही मग लोटांगण घाली. तूच माझी "असली" घरवाली-नको मजला बाहेरवाली. "मी असताना पाय घसरलाच का? माझा घसरला तर माफ करशील का?"

 

वर्षे गेली खटला चालवून. आता गंमतच बघेन. 

बस, उद्या एक सही देवून! 

विजयी मुद्रेने गोडधोड बनवले. मुलांनी गुपचुप पोटात टाकले. निकाला आधीच,"गड जिंकल्याची भावना" चेहर्‍यावरील आनंद मावळू देत नव्हती. स्वाक्षरी करुन कागद हाती घेउन घरी आली. मोठ्यांने हाळी दिली. आज मी विजयी झाली. डिवोर्स देउन, त्याला धडा शिकवून मी घरी आली.

 

ऐकणारे घरात कुणी नव्हते. समोर एक वहीचा कागद हवेने फडफडत होता. वाचता मजकूर समजले. अस्मितेचा तिचा प्रश्न, हां तिच्या पिल्यांना मान्य नव्हता. "घेतल होतं ना लोटांगण. जोडले होते नां हात! केला ना पश्चाताप! मग, तू का अडली. तुझी जिद्द नडली. लाडक्या पित्याचा दुःखी चेहरा बघवत नाही. तुझा आनंद तुलाच वाहिला. तू येऊ शकतेस बाबांकडे आम्हाला भेटायला!"

 

तेव्हढ्यात पुन्हा कुणी तरी म्हंटले, "झाले नां गं मनासारखे? आहेस ना आनंदी? मग....हे अश्रू कसले?"

 

बघा बघा, ती हसत आहे, हसत आहे आणि हसता हसता रडत आहे, रडत आहे....

 

बरं, सांगा ना! स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

 

संगीता अनंत थोरात

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

29/07/22

०००

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//