कळा ज्या लागल्या जीवा भाग 6 (अंतिम)

marathi story

कळा ज्या लागल्या जीवा भाग  ६(अंतिम)

part 1

part 2

part 3

part 4

part 5
कशासाठी करतंय  ह्रदय हा अट्टाहास...
दाबून ठेवलेल्या भावनेत फक्त तुझाच वास!!
काय अन् नेमकं घडतंय कसं
कसा खोलू मी माझ्या प्रेमाचा हा प्रवास
भेटशील ना ग् जेंव्हा ;
डोळे भरून पहायचंय तुला
धडधडणा-या स्पंदनांना
मोकळं करायचंय जरा!!..
का,कधी, केंव्हा !
याचं उत्तर देणं
नाहीच ग् जमणार मला
अलगद सामावशील न्
जेंव्हा ह्या मिठीत!
मनाची घालमेल थांबेलच बघ तेंव्हा!...
कळा लागल्या ह्या जीवा
कसा सोसला हा मी भार !
मिठीत घेऊन सांगेन तुला
ऎकशील ना ग् तूही
नकळत हुंदके देत माझं
सगळंच काही!

 
" लवकर ये... मी वाट बघतेय !" हे अमृताचे शब्द कानावर पडल्यावर अश्रूंचा बांध मोकळा करत मोठया कष्टाने असीमनं फोन कट केला…

"कसं सांगू ग् तुला की नेमकं काय होतंय मला ?
तू भेटलीस ना ...की कवितेसारखं सगळंकाही असंच व्यक्त होणारे मी म्हणत असीम खिडकीत येत एक दिर्घ श्वास सोडत मनापासून ओरडला;
अमृताssssss ......

इकडे "आह्"! म्हणत अमृता दचकली. "अरेच्या! मधूनच हा गार वारा कसा सुटला अन् ही खिडकी कशी उघडी राहीली" म्हणत उठून खिडकीजवळ आली….वारा जोराचा पण आल्हाददायक होता. क्षणातच ..अंगावर शहारे आले अन् जणूकाही कोणीतरी तिला स्पर्श करतंय असा भास झाला….ती असीमच्या विचारात गुंतली!!

आठवडा कसा आणि कधी जाणार ह्याच विचारात दोघे होते. 

असीमला मायदेशी येण्याचे वेध लागले होते म्हणूनच की काय कुठेही कसलाही वेळ न दवडता तो काम करत होता.
काम करत असताना असच एकदा;

"आई ग् ssss कसली रग रागलीये खांद्यापासून ह्या पूर्ण हाताला" म्हणत त्याने खांद्यापासून हात झटकला.

"What happened Sir?
Any problem"?

 त्याची कलीग त्याला म्हणालीही ...

पण… " Nothing ....!
I am ok... !!"
म्हणत, असीम परत कामाला लागला...

खरंतर असीमचा खांदा आणि पाठ सारखीच भरून येत होती.… पण तो प्रत्येकवेळी त्याकडे दुर्लक्ष करत राहिला. या वेळी त्याला कोणतंही आणि कसलंही कारण मधे आणायचं नव्हतं!!!

लंडन ऑफिसच्या सगळ्या जबाबदा-या पूर्ण करून त्याने स्वतःची ट्रान्सफर India त करुन घेतली... तो मायदेशी परतण्यास तयार झाला.

अमृताचा आठवडाही जड गेला… अखेर तो दिवस उजाडला...

अमृताचं मन कधीच असीमजवळ जाऊन पोचलं होतं.
 सुट्टी टाकून मनसोक्तपणे असीमसोबत बागडायचं तिनं ठरवलं होतं...

"अरेच्या ! आपल्याला झोप कशी लागली" म्हणत असीमने विमानातून बाहेर डोकावलं तर तो मायदेशी पोहोचला होता. आवराआवर करत त्याने मुंबईच्या एअरपोर्टवर पाऊल ठेवलं अन् त्याचे डोळे अमृताला शोधू लागले...

"किती वेळ झाला कुठे राहिली ही?
म्हणत जराशा त्राग्यानेच त्याने आपल्या मोबाईलवरून अमृताला फोन लावला.

रिंग जात होती पण नो रिप्लाय!..
इतका वेळची हुरहुर आता काळजीत बदलली... मनात नको ते विचार येऊ लागले...

'अमृताने गडबडीत समीरला होकार तर दिला नसेल ना? परागच्या वेळेसारखाच काही वेडेपणा तर केला नसेल ना? ...
अमृताsssssगं ! म्हणत, त्याचं मन भितीनं काळवंडलं!!..  तो एयरपोर्टमधून बाहेर पडला.. श्र्वासांसारखीच त्याची नजरही अमृताच्या शोधात लांब धापा टाकत होती... एव्हाना त्याचा खांदा परत भरून आला होता... दरदरून घामही फुटला… इतक्यात समोरून अमृता मुंबईच्या गर्दीतून वाट काढत येताना दिसली!!..."

"असीम"!... तीने हातातला बुके वर करत त्याला हाक दिली.

 शुभ्र पांढऱ्या फ्राॅक मधे ती लांबूनही विलक्षण सुंदर दिसत होती. असाच एकदा काॅलेजला असताना रूपालीमध्ये  तिने डिंपल कपाडीआसारखा ड्रेस घातलेला… तिच्या सौंदर्याने तो तेंव्हाही घायाळ झाला होता…  आणि आजही!!”

"चेहरा है या चाँद खीला है"!

गाण्याची आठवण होत होती…
पण अंगाचा घाम अजून वाढला... खांद्याची कळ खाली सरकली अन्
अमृता धुसर दिसायला लागली… तो आनंदाने ओरडला....
"अमृताssss".....

अन् त्याच वेळी… संवेदनांची साथ सोडत त्याचं शरीर खाली कोसळलं!!..

कोण पडलं? 
काय झालं ?
पिलाय का? 
बरेच प्रश्न!!...

"अरे गाडी आणा हा बेशुद्ध पडलाय हॉस्पिटलमध्ये नेऊ" म्हणत सगळे असीमच्या मदतीला धावू लागले.

समोरचं सगळंकाही बघत अमृता गार पडली होती. इतका वेळ गर्दीतून सांभाळत आणलेला फुलांचा बुके आता येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायाखालून तुडवला जात होता.
असीमच्या भेटीसाठीची डोळ्यातली इतक्या दिवसांची आतुरता आता अश्रुंनी घेतली होती.

"असीमssss!! " अमृता त्याच्याजवळ पोहोचली.

इतक्यात गाडी आली.. असीमला आपल्या मांडीवर झोपवत अमृता हाॅस्पीटलला पोहोचली….


…. वाॅर्डबाॅय ने बेल वाजवली. Emergency ! .....
डाॅक्टर आले चेक केलं अन् सगळी सूत्र पटापटा हलू लागली.

असीमला ICU त शीफ्ट करण्यात आलं.

अमृता त्याला बाहेरून अधाशासारखी पहात होती.
असीम बेडवर निपचित पडून होता.
आत बरंच काही बोलणं चालू होतं.
अमृताला काहीच कळत नव्हतं ..

Come on fast....

Nasal O2 ....
Intracath...
ECG ...
Catheter...
Injections ....
Cardiac monitor ...

अन् बरंच काही!
लागलीच असीमचा देह मशिन्स अन् नळ्यांनी भरला गेला...

"Madam"!
Please Fill this consent form....!

मागून आलेल्या नर्सच्या आवाजाने अमृता भानावर आली….
"तुमच्या पेशंटवर ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू झाली आहे...आमचे सर तुम्हाला बाकी माहिती देतीलच... तुम्ही हा फाॅर्म भरून द्या…!

डाॅक्टरांच्या केबीनमधे जायच्या आधी अमृताने तिथल्या नावावर नजर टाकली.
Dr. Sushrut R. Mane.
CARDIOLOGIST.

" Please Come!
बसा!
तुम्ही एकट्याच आहात का?"
पन्नास पंच्चावन्न वर्षाच्या डाॅक्टरांनी अमृताला मोठ्या आस्थेनं विचारलं.
It's;  "MI"! …
"Myocardial infarction"! ....
सामान्य भाषेत सांगायचं तर Heart attack आलाय त्यांना ....

डाॅक्टरांचे शब्द अमृताच्या कानात शीसासारखे रुतत होते. मगाचपासूनचा दाबून ठेवलेला हुंदका तिच्या गालावर ओघळू लागला होता.

अरे बेटा! 
शांत हो !....
त्रासदायक आहेच पण आपण त्याला बरं करू शकतो. लगेच ट्रीटमेंट सुरु झालीये त्यामुळे फार असं नुकसान टाळलंय आपण...
पुढचे काही दिवस रिस्की आहेतच पण त्याची बाॅडी ट्रीटमेंट ला चांगला रिसपाॅन्स देत आहे" म्हणत डाॅक्टरांनी पुढच्या ट्रीटमेंटची आखणी सांगत अमृताला आश्वस्त केलं...

अमृताने फोन करून असिमच्या घरी कळवलं...

"असीमला ICU च्या ह्या काचेतून पहायला, आपण इतके दिवस थांबलो होतो का?" म्हणत अमृता त्याच्या शरीराच्या हालचाली न्याहाळत होती...


ट्रीटमेंट चालू होती .. असीमचं शरीर साथ देत होतं. दिवस त्यातच गेला अन् असीमला शुध्द येऊ लागली...

अरे!  काय आहे हे? ...
मी इतका जड का झालोय मला माझं शरीर उचलता का येत नाहीये? आणि कसली ही मशीन? सलाईन ! म्हणजे मी हाॅस्पीटलला आहे ?...."

असीमला अर्धवट समजत होतं…

पांढऱ्या शुभ्र फ्राॅकमधली अमृता अन् तिला पहात-पहातच आपण वेदनेनं धाडकन आपटलो होतो…
असीमला बोलायचं होतं पण तो अर्धवट शुध्दीत होता. त्याची जीभ, डोळे अन् शरीर त्याची साथ देत नव्हते. तो पडून होता. सलाईनच्या बाटलीतले थेंब टपटपत होते. मशीन आवाज करत होती. नर्स डाॅक्टर त्यांचं काम करत होते.
अन् आता त्याला समजत होतं की काही क्षणांची किंमत कधीच करता येत नाही.
गेलेले क्षण परत येत नाही. कधीकधी काही गोष्टी त्याच त्या वेळेत करायच्या असतात नंतर त्यासाठी वेळ मिळेलच असं नाही... क्षणांना जीतकं साठवू पाहतो तितके ते रेतीसारखे हातातून निसटत जातात!!

असीमला आठवत होतं....
अमृताच्या तोंडून असीम नावाचा गजर ....
नाक उडवत शायनिंग करणारी अमृता ....
पायाला लागून त्याने तीला उचलून घेतलेली त्याची ती निरागस मैत्रीण !...
कट्टर प्रतिस्पर्धी ते बेस्ट फ्रेंड !...
मैत्री गमावण्याच्या भावनेने त्याच्या मनाची झालेली घालमेल!..
पराग आणि अमृताचं नातं!..

"शर्वरीसोबत नात्यात येऊनही आपण सतत  अमृता सोबतच राहीलो "!
तरीही भावनांची ही कळ आपल्याला का समजली नसावी? ....
असीमची घालमेल वाढत होती.
वाढलेला BP ; माॅनीटरने वाजवला.
परत इंजेक्शन्स अन् त्याला गुंगी चढत गेली.

का इतका त्रास होतोय ह्याला? म्हणत, अमृताचं मन था-यावर नव्हतं….

तिचं मन शाळेतल्या बारटक्के सरांच्या क्लासमधे गेलं. "बझार" च्या स्पेलिंगवर आपल्यावर हसणा-या त्या मुलाच्या आपण किती जवळ गेलो आपल्याला कळालंच नाही....

"गणपती बाप्पा मोरया"! करत त्याने जेंव्हा काळजीने उचलून घेतलं तेंव्हा आपण रागाने त्यालाच गुद्दे घातले होते हे आठवून अमृताला हळूच हसू आलं.

पराग त्यावेळचं आपलं आकर्षण होता तरीही मूर्खपणा करत मी हट्टाला पेटले होते….
कोण होतं तेंव्हा सावरणारं?
असीम!  होय फक्त असीमच!

सगळंच कसं कळायचं ह्याला? 
माझं दुखणं-खुपणं अन् अगदी हट्टही!
मैत्रीतही अगदी लहान मुलीसारखं आपल्याला सांभाळलं...
इगो, करिअर करता-करता किती
काय - काय मागे सुटलं गेलं हे लक्षातच कसं नाही आलं आपल्याला?....

काय म्हणाला होता असीम त्यादिवशी? ...
"तुला काही कळणारच नाही की,  तुझ्यासाठीही कोणीतरी थांबलं आहे"!....."असीम रे"!!..
मी वेडीच आहे रे !
पण निदान तू तरी काहीतरी बोलला असतास तर? .....

अमृताचे डोळे रडून सुजले होते…
उभी राहून पायांना रग लागली होती..
ती तिथल्या बाकडावर बसली अन् तीची नजर समोर ठेवलेल्या वृत्तपत्रावरच्या चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळीवर गेली...

"नेहमीच डोक्याने विचार करु नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा"....

चारोळी वाचताच इतका वेळचा तिच्या भावनांचा कल्लोळ आता शांत झाला होता.
अन् तीला फक्त असीमचे फोनवरचे ते वाक्य आठवत होते.
'अमृता!  तू कोणालाही कमीट करणार नाहीयेस..!  मला बोलायचंय तुझ्याशी ....
मी येतोय'! .....
अमृताला सारंकाही आता स्पष्ट झालं होतं.
करिअरच्या इतक्या उंचावर असूनही आपल्यात कोणती पोकळी राहीली हे तीला समजलं होतं.

हाॅस्पीटलच्या त्या वातावरणातही तीला  सोनेरी किरणं दिसत होती.तिचं मन आता शांत झालं होतं…

दुसऱ्या दिवशी सकाळीच अमृता ऑफिसला पोहोचली…
सरळ मुद्दयावर येत,
सर! .... सध्या मला काम करणं शक्य नाही.
इगोमुळे, करीअरच्या नको तेवढं मागे लागून मी खूप काही गमावलं...
पण आता नाही...
माझ्यासाठीचे काही वर्ष फक्त मला ही पोकळी भरून काढायची आहे.
अमृता तिच्या बॉसला म्हणाली..

”Are you serious???!
यशाच्या शिखरावर असताना तू असा वेडेपणा कशी करू शकतेस अमृता?...
चल!  डन! 
तू तुला हवं तसं इथे डिल कर ...
कोणीही तुला काहीच बोलणार नाही.
पण सोडून जाण्याची गोष्ट तू करू नकोस.
प्लीज!" बॉस म्हणाले…

"सर ! आपल्या ठरलेल्या काॅन्ट्रॅकप्रमाणे मी असा ब्रेक घेऊ शकते.
तर मग आता ok! मी परत जाॅईन करेन पण माझ्यासाठीची काही वर्ष तुम्ही मला द्याल?”.. अमृता म्हणाली.

कंपनीच्या हेड साठी ही दिलासादायक बाब होती.
कारण अमृताला पूर्णपणे गमावणं त्यांना नको होतं. अमृताने त्यांना काही गोष्टी कमीट केल्या अन् ती मुक्त होत तिथून निघाली.

एव्हाना असीमला शुध्द आली होती... शरीर ब-यापैकी त्याला साथ देत होतं….
बेड उंच करून त्याला अप पोझीशनमधे झोपवलं होतं...
असीम ICU च्या काचेबाहेर नजर लावून होता ...अन् त्याला ती दिसली!….

" रडायचं नाही " असं ठरवूनही असीमजवळ पोहोचताच अमृताला गलबलून आलं… तिची आणि असीमची अखेर भेट होत होती!...

चेस्ट लिड असूनही आवेगाने अमृताने असीमला मिठी मारली अन् तो त्याच्या कवितेतल्या काही ओळी पुटपुटू लागला...

"कळा लागल्या ह्या जीवा
कसा सोसला हा मी भार !
मिठीत घेऊन सांगेन तुला
ऎकशील ना ग् तूही !
नकळत हुंदके देत माझं
सगळंचकाही"!

एव्हाना आभाळ स्वच्छ झालं होतं. दोघांचं नातं आता पूर्णत्व घेत होतं.
कविता पुढे सरकत होती अन् दोघांची मिठी घट्ट होत गेली.
समाप्त !
©SunitaChoudhari.

आपला अभिप्राय लिखाणाची प्रेरणा देतात.कथा आणि हा भाग वाचून आपले कौतुक अन् सूचना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
धन्यवाद!