कळा ज्या लागल्या जीवा (भाग-१) टीम मारवा

This is love story

कळा ज्या लागल्या जीवा -

भाग १

आपल्या आयुष्यात कोण व्यक्ती याव्यात यावर आपले काय नियंत्रण आहे?.... काहीच नाही!

देव म्हणा... दैव म्हणा...नशीब म्हणा..आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अगदी मिनीटभरासाठी येतात आणि पुन्हा जन्मभर आपण त्यांना भेटत नाही. काही व्यक्ती मात्र आपल्याला आयुष्यभर पुरतात!..

असंच एक नातं! ' असीम ' आणि ' अमृता' यांचं!!......मैत्रीचं!!

चला… या दोघांशी ओळख करून घेऊया!!..

असीम आणि अमृता दोघे एकाच वर्षी म्हणजे १९७० मधे जन्मले. योगायोगाने त्यांचा वाढदिवस एकाच महिन्यात एका पाठोपाठ एक येणारा..चौदा आॕगस्ट ला असीम आणि सोळा आॕगस्टला अमृताचा. म्हणजे दोघांच्या वयात दोनच दिवसाचे अंतर!

खरे तर त्यांना अगदी बाल मित्र म्हणता येणार नाही. कारण ते पहिल्यांदा भेटले ते थेट पाचवीच्या वर्गात! चौथीपर्यंत अमृताची फॕमिली साता-याला होती. मुलांच्या शिक्षणासाठी तिच्या आई बाबांनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला व ते एरंडवण्यात रहायला आले. असीमची फॕमिली कर्वेरोडला दशभूजा गणपती जवळ रहायची. तेंव्हा कर्वेरोडच्या एस.एन.डी.टी ला पुणे संपायचं. शाळाही कर्वे रोडवरच! दोघेही आपापल्या घरुन चालतच शाळेला यायचे. 

'विमलाबाई गरवारे ' शाळेत दोघे पाचवीला एकाच वर्गात एकत्र आले. दोघेही हुशार. वर्गात पहिल्या तीन नंबरात  असायचे. 

दोघांमधे हुशार मुलांमधे असते तशी एक सुप्त स्पर्धा होती. त्यात मुलं विरुद्ध मुली असे वर्गाचे दोन गट होते. मुलींचा सगळा पाठींबा अमृताला होता तर मुले साहजिकच  असीमला आपला म्होरक्या मानायचे. 

असीमची आणि आमृताची पहिलीच सलामी मजेदार होती!

इंग्रजीचा तास होता. स्वतः मुख्याध्यापक... बारटक्के सर हा वर्ग घ्यायचे. सेमी इंग्लीश मेडियम असल्याने असीम पहिलीपासून इंग्रजी शिकत आला होता. अमृता मात्र साता-यात चौथीपर्यंत मराठी शाळेत होती. त्यामुळे साहजिकच तिला इंग्रजी जरा जड जायचं.. तर झालं असं की...

त्यादिवशी बारटक्के सर स्पेलिंग घेत होते.

एका धड्यात आलेल्या ' बझार' शब्दाचे स्पेलींग त्यांनी आमृताला विचारले…

तिने उत्तर दिले 'B a z a r'..

तसा संधीची वाट पाहणारा असीम खुदकन हसला!

अमृताने त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला...तिने दोन्ही हाताची घडी घालत विचारलं, "काय चुकीचं आहे यात..?"

असीम हसत म्हणाला,  

'तू बाजार चे स्पेलींग सांगितलस.. आपल्याला 'बझार' चे स्पेलींग विचारलय सरांनी...which is BAZAAR. दोन्ही शब्दांत फरक आहे... म्हणून मी हसलो!.."

अमृता ताडकन उठून असीमला बोलली,"आपण बोलीभाषेत  बाजार म्हणतो..बझार म्हणतो का? आपण जो शब्द कधी वापरतच नाही त्याचे स्पेलींग सांगण्यात काय अर्थ आहे? माझ्या मते मी बरोबरच स्पेलींग सांगितलंय!" 

बारटक्के सर त्यांची ही शाब्दिक जुगलबंदी कुतूहलाने व कौतुकाने ऐकत होते. शेवटी त्यांनी दोघांना थांबवलं व म्हणाले ," हे पहा तुम्ही दोघे आपल्या  जागी बरोबर आहात! इंग्रजी भाषा ही adaptive आहे. म्हणजे ती बदलांना सामावून घेते... शेवटी आज आपण शिकतोय ती तरी  क्लासिकल शेक्सपिअरीन  इंग्लिश कुठाय?!! कुणी सांगावं!..कदाचित आजपासून पंचवीस-तीस वर्षांनी इंग्रजी, मराठी व हिंदी असे मिसळून  लिहीण्याची  एखादी खिचडी पद्धत सुद्धा आपल्यासमोर येइल आणि आपणही ती आत्मसात करु!  सांगायचं तात्पर्य इतकच..keep questioning the status quo?... जे रुढ आहे त्याला डोळे झाकून स्विकारु नका. कदाचित नव्या आवर्तनाची सुरवात तुमच्या पासूनच होणार असेल. नाही का अमृता आणि असीम?' 

बारटक्के सरांचे हे काळाच्या पुढचे बोलणे या दोन्ही मुलांच्या डोक्यावरुन गेले. पण 'Keep questioning the status quo' मात्र दोघांच्या मनात कायमचे बिंबले गेले!! 

अमृता आणि असीम मधली स्पर्धा उत्तरोत्तर वाढतच गेली... वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा ते अगदी चाचणी.. सहामाही परिक्षेपर्यंत, सारी स्पर्धा जणू या दोघांमधेच असायची… स्पर्धा इतकी टोकाची की दोघे एकमेकांशी पहिले सहा महिने बोलले देखील नव्हते!.. नंतर नंतर तर ते एकमेकांकडे पहायचेही नाहीत. अमृता आणि असीम यांच्यातली ही खुन्नस ही शाळेतल्या शिक्षकांमधेही चर्चेचा विषय होती...

मुख्याध्यापक बारटक्के सरांच्या कानावर ही गोष्ट गेली तेंव्हा ते हसून म्हणाले.. 'Rivalry brings the best out of the rivals' फक्त दोघातली ही स्पर्धा निखळ रहावी म्हणजे झालं'!

सहामाहीचा रिझल्ट लागला... अमृता फक्त एका टक्क्याने असीमच्या पुढे जात वर्गात पहिली आली!...बाईंकडून मार्कशिट घेताना तिने असीमकडे मुद्दाम एक नजर  टाकली आणि आपली मान झटकली. असीमला मनातून वाटलं जणू अमृताने मान नाही त्यालाच झटकलय!... तो आतून खूप चिडला... मनाशी एवढच म्हणाला…"अमृता..थांब तू..वार्षिक परिक्षेत पाहतो तुला!…" 

त्यादिवशी मधल्या सुट्टीत डबा खाताना तो तिच्या शेजारी जाउन बसला. अचानक त्याच्या बाजूला बसण्याने ती आधी बावचळली..मग हसली.

असीमने तिचे अभिनंदन केले

'अभिनंदन अमृता..!!'

'थँक यू..असीम..!'

'गणितात नेहमीच आउट आॕफ आउट कसे मिळवतेस तू..क्लास लावलाहेस का?

'छे...नाही रे..क्लासबीस नाही..माझी आई घेते माझा अभ्यास..' 

'सॉलिड ना! गणितात शंभर पैकी शंभर..भारी वाटत असेल ना तुला..?!!' 

'आणि तुला इंग्रजीत 90 मिळालेत त्याचं काय? मला फक्त पंचाहत्तर आहेत..'

'हो पण मराठी मेडियममधून येउन पंचाहत्तर म्हणजे भारीच आहेत..'

'भारी वगैरे काही नाही..तू फक्त पाच मर्कांनी माझ्या मागे होतास. वार्षिक परिक्षेत पहिला यायची मनात पूर्ण तयारी झाली असेल ना तुझी?'

असीम चोरी पकडली गेल्यासारखा ओशाळून हसला... 

'पण तू पहिला नंबर दिलास तर ना..?'

'नाहीच देणार..वाट बघ...'

दोघेही खळाळून हसले…

असे संवाद त्यांच्यात अधेमधे होतच रहायचे आणि हा सामना रंगत जायचा...

दुस-या सत्रात शाळेत गॅदरिंगची धामधुम सुरु झाली. 

असीम नेहमी गॅदरिंगमधे दिवाकरांच्या एकपात्री नाट्यछटा सादर करायचा. आणि त्याच्या खड्या आवाजात..अभिनयासहीत तो जेंव्हा जेव्हा नाट्यछटा सादर करायचा तेंव्हा तेव्हा हमखास टाळ्या घ्यायचा!. त्यामुळे गॅदरिंगमधली असीमची नाट्यछटा हे खास आकर्षण असायचे!!.. ते याही वर्षी होते. 

निदान या विभागात तरी अमृता आपल्या स्पर्धेला नसणार अशी त्याची समजूत होती. पण  मुलांच्या  आॕडीशनच्या गर्दीत अमृताला पाहून तो आणखीनच चकीत झाला!!

'तू इथेही आहेसच का..?' तो तिच्या शेजारी जाउन हळूच बोलला. 

'मग?... टॅलेंट काय तुझ्यातच आहे का फक्त?'

'चला म्हणजे माझ्यात टॅलेंट आहे हे तरी मान्य केलस आमृता तू…!!'

अमृताने त्याच्याकडे लटक्या रागाने पाहिले आणि त्याच्या पाठीत एकहलका धपाटा घातला…

'ए.. असं काही नाही बरका!!..'

असं म्हणत हसत ती समोर बघू लागली. 

 असीमने आपल्या नाट्यछटेची आॕडीशन दिली. एक दोन किरकोळ चुका सोडल्या तर त्याचे आॕडिशन छान झाले. 

आॕडीशन करुन परत मुलांमधे परतताना तो मुद्दाम अमृताच्या जवळून चालत गेला. तिने टाळ्या वाजवत वाजवत हाताच्या बोटांनी मोर दाखवत 'छानच' असा इशारा केला आणि त्याचा अहंकार सुखावला. 

पण त्याचा  तो आनंद थोडा वेळच टिकला. कारण अमृताचा टर्न आला तेंव्हा तीने थेट 'आपकी नजरोने समझा' हे हिंदी गाणे सराईतपणे आणि वाद्यांशिवाय गात सर्वांची वाहवा मिळवली. मुख्य कार्यक्रमात वाद्यांबरोबर तर तिचे हे गाणे सुपरहीट होणार यात शंकाच नव्हती!.. ईथेही अमृता त्याला मात देणार होती. 

त्याच दिवशी आॕडीशन संपवून जाताना जी घटना घडली ती दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देणारी ठरली...

दुस-या मजल्यावरच्या सांस्कृतिक सभागृहातून आॕडीशन संपवून मुले घाईघाईत निघाली होती… संध्याकाळची वेळ.. पहिल्या मजल्यावरचा जिना उतरताना थोडा कमी उजेड होता आणि अमृताचा पाय पायरीवरुन सटकला. ती सर्व वजन डाव्या पायावर घेऊन पायरीवरुन पडली. तिच्या मैत्रीणी धावल्या ..  त्यांनी तिला उठवून बसवले. पण अमृताला पाय उचलून चालताच येईना!... बहुधा डावा पाय फ्रॕक्चर झाला होता. तिला पटकन उचलून रिक्षात बसवून तिच्या घरी नेणं आवश्यक होतं. 

मुली वरती अजून सांस्कृतिक सभागृहात असणा-या सरांना बोलवायला धावल्या…

तेवढ्यात खाली गेलेला असीम धावत वर आला. त्याने अमृताला धीर दिला. तिचा पाय गुडघ्याखाली हालवून पाहिला. तिला मोठी कळ आली तसा त्याने तिला काही सांगितले. तिला हात दिला व तिच्या संमतीने तिला दोन्ही हातात व्यवस्थित उचलले व पाय-यांवरुन खाली घेउन आला. अमृताला लाजल्यासारखं झालं..

'असीम..सगळे बघताहेत आपल्याकडे..मला लाज वाटतेय..'

'अमृता..अगं मलाही लाज वाटतेय..पण तुला उचलून रिक्षात कोणाला तरी बसवायलाच लागणार होतं..म्हणून मीच ते केलं..'

आणि मग तो ओरडला 

'गणपती बप्पाss'

सगळी मुलं मुली हसत हसत म्हणाली 

'मोरयाsss!!'

अमृताने रागाने  एक गुद्दा त्याच्या पाठीत घातला.

अमृताला खाली घेउन आल्यावर  ग्राउँड ओलांडून तो शाळेच्या गेटपर्यंत घेउन आला. मुलांनी थांबवलेल्या रिक्षात त्याने अमृताला बसवले. बरोबर तिच्या अजून दोन मैत्रीणींना बसवून तिला घरी पाठवले. रिक्षातून जाताना अमृताला फक्त असीम दिसत होता. 

असीम आणि अमृता यांच्या 'फ्रेंड्स फाॕर लाईफ' या नात्याची ती सुरवात ठरली. 

पायाला झालेल्या फ्रॕक्चरमुळे अमृता जवळ जवळ एक महिना प्लॕस्टरमधे होती. तिला शाळेत येणे शक्य नव्हते. 

त्यामुळे तो त्याच्या अभ्यासाच्या वह्या क्रमाक्रमाने अमृताच्या मैत्रीणींकरवी अमृताला पाठावायचा. अमृता ते तिच्या वहीत लिहून काढायची आणि वही परत पाठवायची. एकदाही अमृताला न भेटता, बोलता असीम महिनाभर त्याच्या वह्या अमृताला पाठवत राहिला. 

मधल्या काळात स्नेहसंमेलन पार पडले. असीमच्या 'बोलावणं आल्याशिवाय नाही' या दिवाकरांच्या  नाट्यछटेने यावेळीही प्रचंड टाळ्या घेतल्या. प्रेक्षकांत खास त्याची नाट्यछटा पहायला प्लॕस्टर वागवत आलेली अमृता भारावून बराच वेळ टाळ्या वाजवत होती. 

अभ्यासात एकमेकांचे कट्टर स्पर्धक असलेले अमृता आणि असीम एकमेकांचे जवळचे मित्र कसे बनले ही विमलाबाई गरवारे शाळेत एक आख्यायिका बनून गेली. पुढे पाच वर्षे म्हणजे दहावीची परिक्षा देई पर्यंत त्यांच्यात इर्षा पुन्हा कधी उत्पन्न झाली नाही. उलट दुस-याने आपल्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवावेत म्हणून ते आटापीटा करत रहायचे. 

दहावीला शाळेतून दोघेही बोर्डात आले आणि शाळेच्या बोर्डवर बरोबरीने त्यांची नावे झळकली. बोर्डाच्या मेरीट लिस्टचे प्रमाणपत्र व मार्कलिस्ट घेतानाही ते दोघे हातात हात घालून स्टेजवर गेले व एकत्रच फोटो काढले. असीम फक्त दोन मार्कांनी तिच्या पुढे होता!! 

'शेवटी बोर्डाच्या परिक्षेत मी तुझ्या पुढे गेलोच की नाही!!...' असीम चिडवत म्हणाला...

तसे नाक उडवत अमृताने उत्तर दिले..

'काय करणार!!..दोन दिवसांनी मोठा आहेस ना माझ्यापेक्षा!!..त्याचाच मान ठेउन तुला पुढे जाउ दिले मी!!..'

मुख्याध्यापक बारटक्के सरांना त्यांच्या मैत्रीचा तो नजारा पाहून फार बरे वाटले. त्यांना पाच वर्षापूर्वीची त्या दोघांची खुन्नस आठवली. 

'Great rivalry turned into great friendship...' त्या दोघांना स्टेजवरुन एकत्र खाली उतरताना पाहून ते शेजारच्या बापट सरांना म्हणाले. 

१९८५ सालच्या जून महिन्यात पेपरमधे फोटोसह एकत्र झळकलेले ' अमृता व असीम '..दोघे यशाच्या व आनंदाच्या शिखरावरही एकत्र उभे होते!!

पुढे या मित्रांची वाटचाल एकत्रपणे होणार की त्यांच्या वाटा  वेगळ्या होणार हे मात्र काळ लवकरच ठरवणार होता...

काय होतं काळाच्या उदरात..?

©सुनील गोबुरे.

कसा असेल असीम आणि अमृताचा पुढचा प्रवास?... वाचूया पुढच्या भागात!.. स्वामिनी सोबत... तोपर्यंत लाईक आणि कमेंट करायला विसरू नका!!

🎭 Series Post

View all