Login

काळ आला होता पण वेळ नाही..!

मधमाशांच्या हल्ल्यातून आपला आणि आजीचा जीव वाचवताना आलेला थरारक अनुभव.


       हॉस्पिटलच्या दारातून साधारण २०-२२ वर्षाचा तरुण कसाबसा आत शिरला. तोंडावर शेकडो पांढरे काटे, आणि मानेवर ५० ते ६०जिवंत मधमाशा बसलेल्या होत्या. त्याने सांगितलं मधमाश्यांनी हल्ला केला आणि तो तिथेच खाली बसला त्याला गरगरायला सुरुवात झाली होती. प्रसंगाचे भान ठेवून कसलाही विचार न करता डॉक्टरांनी लगेच त्याच्या अंगावरचे काटे काढायला सुरुवात केली. सोबत असणाऱ्या २ नर्स ना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या. इलेक्ट्रिक बॅट च्या सहाय्याने मानेवरील मधमाशांना मारण्यात आले. इतक्यात काही सुचायच्या आतच पाठीमागून ७०-७५ वयाच्या आजीला आत आणण्यात आलं. आजीची अवस्था त्याहून बिकट होती. "माझी आजी आहे. तिला आधी उपचार द्या, मला नंतर बघा". स्वतःचे भान हरपून जात असतानाही हा आपल्या आजी ची काळजी करत होता. बेशुद्ध अवस्थेतील आजीला थेट ICU वॉर्ड मध्ये नेण्यात आलं. तातडीने उपचार सुरू केले. तरुणाची शुद्ध हरपली होती. त्याच्या मोबाईलवर फोन येत होता. वार्डबॉय ने उचलला, "हॅलो, शारदा क्लिनिक उंब्रज मधून बोलतोय." समोरून त्याचे वडील बोलत होते, "हॅलो, कुठे आहे, कसा आहे,माझा मुलगा आहे तो, मी येतोय, दहा मिनिटांतच पोहोचतो." "हो,या आम्ही त्याला आणि आजीला ऍडमिट करून घेत आहोत, तोपर्यंत तुम्ही या". डॉक्टर: "सिस्टर, लवकरात लवकर उपचारासाठी घ्या. खूप क्रिटिकल अवस्था आहे दोन्ही पेशंटची"."येस डॉक्टर". कसलाही विचार न करता उपचाराला सुरुवात झाली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्यावर काय अवस्था झाली असेल, विचार न केलेलाच बरा. त्यात विषारी जातीच्या, आग्या मोहोळ जातीच्या या मधमाशा. आता डॉक्टरांपुढे आव्हान होते. एक नाही तर दोन जीव वाचवायचे होते. ICU मध्ये उपचार सुरु झाले. तेव्हाच या तरुणाचे वडील आणि काका दवाखान्यात पोहोचले. त्यांना आत सोडले नाही. उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं.ते आल्यावरच केसपपेर तयार करण्यात आला. पेशंटचे नाव, गाव, पत्ता लिहून घेतला. त्या तरुणाचं नाव: सोमनाथ लोहार. आणि आजीच नाव: मालन लोहार. काय आणि कसे झाले हे अजून पर्यंत कोणालाच माहिती नव्हतं. फक्त एवढंच माहिती होतं, मधमाशा चावल्या आहेत. दरम्यान डॉक्टरांनी दोघांचे पल्स रेट तपासून पहिला. तर तो कमी होत चालला होता. आता मात्र चिंता वाढली. दोन्ही पेशंटची तब्बेत खालावत चालली होती. ३ तास उपचार सुरू होते. डॉक्टरांनी इकडे तिकडे फोन करून माहिती घेऊन जमेल त्या पद्धतीने आपले प्रयत्न चालू ठेवले. आता हळू हळू पेशंट प्रतिसाद देत होते. सोमनाथ ला तब्बल ४ तासांनी शुद्ध आली. तो इकडे तिकडे पाहू लागला. "मी इथे कसा आलो? माझी आजी कुठे आहे?". तो अजूनही घाबरला होता. नर्सनी डॉक्टरांना बोलावून घेतलं. "डॉक्टर, पेशंट शुद्धीवर आला." लगेच डॉक्टर आले आणि पेशंट ला तपासून पाहिले. पल्स रेट पहिला. अजूनही चिंता होती. त्याला उलट्या होत होत्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी कराडला न हलवण्याचा निर्णय घेतला आणि कराडच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना उंब्रजला दाखल होण्यास विनंती केली. रात्री १ च्या सुमारास त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी पुन्हा उपचार सुरू केले.सगळीकडे तणावाचे वातावरण होते. त्यात आजीला दम्याचा त्रास होता. तिला धाप लागत होती. आणि ती खूप घाबरली होती. ही रात्र डॉक्टरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती.दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चेकअप झाले. लक्ष्मीपूजन चा दिवस होता. दवाखाण्यातही आज पूजा होती. सर्वत्र दिवाळीची हालचाल चालू होती.पण सर्वांचं लक्ष केवळ या दोघांकडे होतं.आता हळू हळू सुधारणा होत होती.पल्स रेट नॉर्मल होत होता.
सकाळी उठल्यावर तो सतत आजी बद्दल विचारत होता. त्याला स्वतःपेक्षा आजीची जास्त चिंता वाटत होती. डॉक्टर त्याच्यासोबत बोलू लागले; "बेटा, तुझं नाव काय?" "सोमनाथ" तो बोलला. "काय करतोस? शिकतोयस का?" "नाही, मी पुण्याला नोकरीला आहे. सर्वेअर आहे. शिक्षण झालंय माझं." "ओके, पण तू इथे कसा आलास? काही आठवतंय का?डॉक्टर म्हणाले." " मी दिवाळीसाठी आलोय पाटण ला. माझ्या आजीला आणायला वाठारला गेलो होतो. संध्याकाळी ४:३० च्या सुमारास वडोली जवळ पोहोचलो. पूल ओलांडून पुढे आलो. उंब्रज पासून २ किलोमीटर अलीकडे होतो. घरी जायचं म्हणून खुप खुश होतो. आणि आजी काहीतरी सांगून हसत होती. इतक्यात अचानक आमच्या अंगावर मधमाशांचा गठ्ठा पडला. काही समजायच्या आतच माशांनी कडकडून चावायला सुरुवात केली. काही कळायच्या आतच हजारो मधमाशा आमच्यावर तुटून पडल्या. संपूर्ण चेहरा मधमाशांनी भरला होता समोरचे काहीच दिसत नव्हते. कशीतरी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी केली.आणी पळू लागलो पण आजी पळू शकत नव्हती. तिला दम्याचा त्रास. साधं चालायला पण जमत नव्हतं. मी पुन्हा तिच्या जवळ गेलो. दोघांच्याही अंगावर संपूर्ण आच्छादन झाले होते. माशा कचकचून चावा घेत होत्या. सहन होण्यापलीकडे वेदना होत होत्या. आजी जिवाच्या आकांताने ओरडत होती. तिला उभे राहायची पण ताकद उरली नाही. ती खाली बसली आणि माशा हकलण्याचा प्रयत्न करत होती. नाकावरून मूठ भरून काढायची पुन्हा माश्या कानावर असायच्या, कानावर अक्षरशः मोठयाने मधमाश्यांच्या गोंगाटाचा आवाज येत होता.तो इतका तीव्र होता की, बाहेरचा कसलाच आवाज येत नव्हता. कानावरून मूठ भरायची आणि त्यांना बाजूला काढले तरी अजून तेवढ्याच माशा पुन्हा चावायच्या. आजी चे सगळे प्रयत्न फोल ठरत होते. तिला गरगरायला लागलं. इकडे मलाही माशा चावत होत्या. मी पण बचावासाठी प्रयत्न करीत होतो. आजी आता रस्त्यावर आडवी झाली. तिथेच रस्त्यावर लोळायला लागली आणि मदतीसाठी ओरडू लागली. "विठ्ठला, पांडुरंगा वाचव रे " तिला सोडून मी रस्त्यावर मदत मागू लागलो. पण समोरचे दृश्य पाहून कुणी मदत करायला धजावत नव्हते. दोन्ही बाजूला गाड्या २०० ते ३०० फुटांवर थांबल्या होत्या. आमची अवस्था पाहून एक जण आपली गाडी घेऊन पुढे आले. गाडीची काच खाली केली. पण काही माशांनी आत शिरकाव करताच ते "सॉरी" म्हणून निघून गेले. आजीला पाण्याची मदतही मिळू शकत नव्हती. मी आता हतबल झालो. तिथेच खाली बसलो. सगळी आशा संपली. आता समोर फक्त मृत्यू दिसत होता. सगळं संपलं होत.
डोक्यात पुन्हा आई वडिलांचा विचार आला. तसाच उठलो. आजी ला उठवलं तिला गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा रस्त्यावर कोसळली. आता काय करावं काहीच सुचेना. इकडे मधमाशा चावतच होत्या. मी पुन्हा मदतीसाठी धावू लागलो. काहीही करून आपल्याला जीव वाचवला पाहिजे एवढंच डोक्यात होतं. मी थांबलो तर आजीचा पण जीव जाईल आणि माझा पण. म्हणून मी माझे प्रयत्न चालू ठेवले. तेवढ्यात एक ओम्नी गाडी माझ्या जवळ आली त्यांना मी विनंती केली. त्या गाडीत एक आजोबा होते. त्यांनी परिस्थिती ओळखून मदत करण्यास सांगितले. गाडीत असणाऱ्या सर्वांना पुढे उतरवून गाडी माझ्याजवळ आली. मी आजीला उचलून गाडीत ठेवलं आणि त्यांना पुढे जायला सांगितलं. आणि मी दुचाकीवरून निघालो थोडं पुढे आल्यावर लक्षात आलं, घरी कळवायला हवं. पण माझा मोबाइल घटनास्थळीच पडला होता. पुन्हा माघारी जाऊन. माझे पाकीट आणि मोबाईल घेतला बाकी साहित्य तिथेच पडलेलं. पिशवी,आजीची चप्पल सगळं तिथंच होतं. मी घरी बाबांना फोन करून सांगितलं उंब्रजला निघून या. आजी कशीतरी करते. मधमाशा चावल्या. इतकेच बोलून फोन ठेवला. आणि पुढे जाऊन एकाला विचारले दवाखाना कुठे आहे. त्याने सांगितले इथून सरळ हायवेजवळच आहे. मी पुढे गेलो मागून आजीला घेऊन ओम्नी येत होती. पुढे मला \"शारदा क्लिनिक\" नाव दिसले. आणि मी सरळ दवाखान्याच्या दारात गाडी नेली. आणि आत शिरलो".
आजी.. ? मधमाशा... ? डॉक्टर, माझी आजी कशी आहे? कुठे आहे? आमच्यावर मधमाशांनी हल्ला केला. आजी खूप कशीतरी करत होती. सांगा ना डॉक्टर माझी आजी कुठंय?" त्याची तंद्री तुटली. डॉक्टरांनी काहीच न बोलता त्याच्या बेडचा पडदा बाजूला सारत त्यांच्यापासून समोरच्या रांगेत असणाऱ्या तिरप्या दिशेने इशारा करत म्हणाले; "ती पहा तुझी \"आजी\"." त्याने पाहिले, 2 नर्स तिच्या जवळ होत्या. तिला औषध देणं चालू होतं.नर्सने आजीला तिकडे पाहण्याचा इशारा केला. आजी चा चेहरा खूप सुजला होता. त्याने सुरुवातीला तिला ओळखले नाही. त्याने एकदा डॉक्टरांकडे पाहिले डॉक्टरांनी डोळ्यांनीच ईशारा केला. तुझीच आजी आहे. तो पुन्हा आजीकडे पाहू लागला. सुजलेल्या गालातून आजीने एक स्मित आपल्या नातवाला दिलं. आणि एक हात वर उचलून आणि मान हलवून, मी सुखरूप असल्याचा ईशारा दिला. तेव्हा सोमनाथच्या जीवात जीव आला.
नंतर कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. दरम्यान कुणालाच भेटू दिले नव्हते. त्या दोघांकडे पाहून सगळ्यांनाच गहिवरून येत होतं. कसे सहन केले असेल. असा प्रश्न सगळ्यांना पडत होता. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणचे घटनास्थळी काय अवस्था झाली असेल दोघांची. फार भयानक प्रसंगातून बाहेर आले होते. आईने आपल्या लेकराला जवळ घेतलं. आई पण रडत होती. दोघांची अवस्था पाहून. दोघेही आता सुखरूप होते. धोका टळला होता. दोघेही आता चालू बोलू लागले होते. डॉक्टरांना शंका होती की , ४-५ दिवस तरी अतिदक्षता विभागात यांना ठेवावं लागेल की काय. पण लवकर बरे होतील. . शिवाय हा दवाखाना चालू होऊन १५ च दिवस झाले होते. आणि अतिदक्षता विभाग असणारे हे पहिलेच क्लिनिक होते. नाहीतर कराड शिवाय पर्याय नव्हता आणि तोपर्यंत या दोघांचा निभाव लागणे कठीण होते. डॉक्टर म्हणाले;" नशीबवान आहेत दोघे, मी आज पर्यंत च्या केसेस मध्ये अशी केस पहिल्यांदा पाहतोय, १०-१२ माशा चावल्या तरी माणसाचा निभाव लागणे कठीण ." "सोमनाथ; डॉक्टर, म्हणजे मी घरी जाऊ शकतो ना? मला लक्ष्मीपूजन घरी करायचंय." "हो, आता नक्की जाऊ शकतोस. तू तर सुपरमॅन निघालास." असे म्हणून दोघे हसू लागले. "खरंच डॉक्टर तुम्ही देवदूत बनून आलात , तुमच्या मुळे आज आम्ही वाचलो. आमच्यावर तर काळाने झडप घातली होती. म्हणतात ना काळ आला होता, पण वेळ नाही. ती वेळ तुमच्यामुळे नाही आली. तुमचा मी खूप ऋणी राहीन".



खरंच हा पुनर्जन्म म्हणावा लागेल. डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आज दोन जीव वाचले होते.


©ज्योती लोहार.