काळ आला होता पण ...

ही कथा आहे एका आर्मी मधल्या अभिमानी स्त्रीची

शीर्षक : काळ आला होता पण ... 

विषय : काळ आला होता पण ... 

फेरी : राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा 


        हॉस्पिटलच्या बेडवर पडून खिडकीबाहेरच जग बघत , रेवा डोळ्यांतील आसवे कशी बशी लपवण्याचा प्रयत्न करत होती .



           "रेवा , बरं वाटतंय का आता तुला ? पाय दुखतोय का अजून तुझा ? हे बघ , डॉक्टर आता येतीलच राऊंडला . तेव्हा बघू काय म्हणताय ते . "

पप्पा त्यांच्या आर्मी मध्ये असलेल्या मुलीला विचारत होते . 

"हो पप्पा , आता बरी आहे मी ."

थोड्याच वेळात रेवाला भेटायला तिचे आर्मी ऑफिसर आले .
" लेफ्टनंट विराज देशमुख "

" हाय मिस रेवा , कशी तब्येत आहे आता तुमची . चेहऱ्यावरून तर तुम्ही एकदम फ्रेश दिसताय . "


"येस सर , मी एकदम ठणठणीत आहे . तुम्ही म्हणाल तर उद्याच जॉईन होते मी पुन्हा ."

"अरे अरे , अजून तुम्हांला आरामाची गरज आहे . पण तुमचा कॉन्फिडन्स बघता लवकरच पुन्हा जॉईन व्हाल तुम्ही ,अशी नक्कीच खात्री वाटतेय आता . "

" बरं तुम्ही दोघे बोला , मी आलोच मेडिसिन घेऊन." पप्पा बाहेर जात बोलले .

" विराज , मी ठीक होईल ना लवकर ?"

" रेवा , तुला काहीही झालेलं नाहीये . बस थोडे दिवस आरामाची गरज आहे . मग सगळं ठीक होईल ."

            विराज आणि रेवाची ट्रेनिंग एकाच वेळेस पूर्ण झालेली . त्यांच पोस्टिंग पण एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झालेलं . त्यामुळे दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली होती .

             कुटुंबापासून दूर असूनही ते दोघे एकमेकांना प्रत्येक अडचणीत साथ देत होते . नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि थोड्याच दिवसानंतर ते लग्नही करणार होते . पण काळाने घात केला आणि रेवाचे दोन्ही पाय हल्ल्यामध्ये निकामी झाले . ती कधीच तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नव्हती .
पण ही गोष्ट रेवाला सांगायला अजून कोणाची हिंमत होत नव्हती .

           त्यासाठीच खास विराज आज आला होता . काहीही झाले तरी आपल्याला हिंमत करून हे धाडस करावेच लागणार आहे . आज नाही तर उद्या , कधी ना कधी तिला हे कळणारच आहे . त्यामुळे विराज सगळी हिंमत एकवटून आज तिच्याशी बोलायला आलेला .

         विराज तिला समजावत होता , पण मनातून तो ही शॉक होता तिला अस बेडवर पडलेलं बघून . एक स्वतंत्र विचारांची धाडसी मुलगी , कधीही कोणत्याच गोष्टीला घाबरली नाही ती , प्रत्येक युद्धात जातीने पुढे असणारी . पण आज तिची अशी अवस्था कोणालाच बघवत नव्हती . 

          रेवा , एक तडफदार मुलगी . आर्मी मध्ये भरती व्हायचं स्वप्न होत तीच ,आणि झालीही . पहिल पोस्टिंग तिला जम्मू काश्मीर मध्ये मिळालेलं . सगळ्या मुला मुलींमध्ये आर्मीत कधीच भेदभाव केला जात नाही , दोघेही समान मानले जातात . ट्रेनिंगच तसे दिले जाते त्यांना , त्यामुळे ती खुप भक्कमपणे आपली कामगिरी बजावत असे .

             एक दिवशी रात्री तिला एक टास्क देण्यात आले , संपूर्ण ठिकाणी चेकिंगसाठी जावे लागणार होते . पहारा द्यायचा होता , ती बेसावध असतांना त्यावेळेस अचानक फायरिंग सुरू झाली . सगळीकडून नुसता गोळ्यांचा वर्षाव होत होता . त्यांनी पोझिशन घेऊन शत्रूवर फायरिंग सुरू केली . एकामागून एक चालूच होते .
               ती रागात पुढे जाऊन एकावर हल्ला करणार तोच अचानक तिच्या पायांवर कोणीतरी गोळ्या झाडल्या . ती जागच्या जागी खाली कोसळली . तिला लगेच टीममधील दुसऱ्या कमांडरने आपल्या खांद्यावर घेत बाजूला आणून बसवले . तिचे दोन्ही पाय रक्ताने अक्षरशः भिजले होते . बेशुद्धावस्थेत सुद्धा ती ," शत्रूला मारा त्यांचा पूर्ण नाश करा " असेच बोलत होती . तिच्या संपूर्ण टीमने मिळून सगळ्यांना चित करून टाकले .

         तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले , तोपर्यंत तिचे दोन्ही पाय निकामी झाले होते . कदाचित ते कापावे सुद्धा लागतील असे डॉक्टरांचे म्हणणे होते . नातेवाईकांना तिच्या घरच्यांना कळवण्यात आले . त्यांना पोहोचायला दोन दिवस तरी लागतील . तोपर्यंत तिचे ऑपरेशन झाले होते . आणि तिचे दोन्ही पाय आता नव्हते .

         रेवाला जागेवरून उठता येत नव्हतं , तिला प्रत्येक गोष्टीत नर्सची गरज लागत होती . तिला हे सगळं नको वाटत होतं . एकदा तर ती चिडली सुद्धा होती त्या नर्स वर , पण नर्सने एकदम शांतपणे बोलत तिला नॉर्मल केले .

         विराजला आता तिला सांगायलाच हवं , म्हणून तो दुपारी तिच्याजवळ अशाच इकडच्या गप्पा झाल्यावर बोलला ,
" रेवा , तुला माहितीये तुझ्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या ."

     " हो विराज , पण त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये .
पण मला माझे पाय का दिसत नाहीये , मला जाणवत ही नाहीयेत ते . विराज प्लिज सांग काहीतरी."
रेवा अगदी रडकुंडीला येऊन विचारत होती .

   " रेवा , तुझे दोन्ही पाय निकामी झालेत . त्यामुळे .... ...!"

"काय विराज ...!
काय झालं माझ्या पायांना ?
बोल ना पटकन . सांग लवकर मला . "

" तुझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली नाहीयेत आता . "

" काय ......????"

रेवा जवळजवळ संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ऐकू येईल इतकी जोरात किंचाळली . ती रडून रडून बेहाल झाली होती . तिला आवरणे कठीण जात होते .


       तिला सावरायला पाहिजे म्हणून विराज तिच्या जवळ जात तिला कुशीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता . पण ती लवकर शांत होतच नव्हती .

         कशी होणार , एका आर्मी मध्ये असलेल्या मुलीचं स्वप्न अजून पूर्ण कुठे झालं होतं . तिला अजून खूप लढाई जिंकायची होती . पण ते अर्धचं राहील होत आता .

        हळूहळू रेवा नॉर्मल होत होती . विराज येतच होता तिला वरचेवर भेटायला . तिला आता व्हीलचेअर वर बसवून सगळीकडे जायला लागत होते . मनातून ती पूर्णपणे खचली होती . तिला तोच कॉन्फिडन्स पुन्हा मिळवून द्यायला विराज मदत करत होता . आणि त्यासोबतच तिचे आईवडील ही होतेच .

       आज रेवा पूर्णपणे बरी झालेली होती . तिला लवकरच घरी सोडण्यात येणार होते . पण ती व्हीलचेअर बघून तिला जीव अगदी नकोसा वाटायचा . विराजला ती नेहमी म्हणायची , " माझा जीव गेला असता तरी चालले असते , पण ही व्हीलचेअर नकोय मला विराज ."

विराजला हे ऐकून खूप दुःख व्हायचं . पण त्याशिवाय ईलाज नव्हता .

         " विराज , मला हे अस जगणं नकोय . आता आपलं लग्न ही होऊ शकत नाही . तू प्लिज एखादी चांगली मुलगी बघून लग्न कर आणि सेटल हो ."

          तिच्या अशा बोलण्याने विराजला खूप वाईट वाटले . तो म्हणाला देखील तिला , " रेवा , मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच ."

          " विराज , मी स्वतःच देखील काहीही काम करू शकत नाही आणि लग्न झाल्यावर काय करणार आहे आपल्यासाठी . फक्त तुझ्यावर एक ओझं बनून नाही राहायचं मला . "

     "   रेवा , आपण लग्न करणार आहोत . कुठल्याही परिस्थितीत , हे वचन दिले होते ना आपण एकमेकांना . मग तू कशी काय माघार घेतेस आता ."

            रेवा खूप रडली , तिला काहीच कळत नव्हते . पण विराजने तिला सावरले . प्रत्येक वेळी तिची समजूत काढली आणि शेवटी तो इतकंच बोलला , " रेवा तुला तुझ्या पायावर उभं करण्याचं वचन देतो मी .. मग तर झालं ?"

         थोडयाच दिवसांनी ती पूर्णपणे बरी झाल्यावर जखम भरल्यावर तिला एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले . जिथे नकली पाय बनवून देतील आणि त्यावर रेवा उभी सुद्धा राहू शकते . त्याला प्रोस्थेटिक असे म्हणतात . जेव्हा तिथले डॉक्टर बोलले . तेव्हा रेवा पेक्षा विराजच जास्त खुश झाला .

           काही महिन्यांनी ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर जेव्हा रेवाला तो पाय बसवण्यात आला . त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक भलताच कॉन्फिडन्स दिसत होता . ती खुप म्हणजे खूप खुश दिसत होती .

         ते म्हणतात ना , आर्मी वाल्यांचा रुबाब कधीच जात नाही . अगदी तसेच काहीसे वाटत होते सगळ्यांना .
ती हळूहळू तिची स्वतःची कामं स्वतः करण्याचा प्रयत्न करत होती .

त्यांनतर तिला तिच्या जम्मू मधील कामगिरी बद्दल मेडल मिळालं . तिथे ती बोलली ,

             " तुमच्या अंगावर फौजीचा ड्रेस असेल किंवा नसेल , पण तुम्ही एक फौजी आहात , अजूनही आहे आणि फौजी बनुनच राहणार . तुम्ही तुमच्या वर्दी पासून दूर असाल पण तुमचा अँटीट्यूड , तुमचं प्रशिक्षण कधीच तुमच्या पासून वेगळ होऊ शकत नाही . ही गोष्ट मला विराजने शिकवली . त्याचे मी खूप खूप आभार मानते . जय हिंद . जय भारत ."

          काळ आला होता , पण तरीसुद्धा त्यावर मात करून रेवा आज स्वतःच्या पायावर उभी होती , अभिमानाने .


सौं तृप्ती कोष्टी 

जिल्हा - सांगली , सातारा