Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

काळ आला होता पण...

Read Later
काळ आला होता पण...


काळ आला होता पण...!

विषय:- लघुकथा

अलिबाग रोड

"आज वातावरण खरंच खूप रोमँटिक आहे ना?" रावीने  आयुषला विचारले.

"माझ्या मनातले बोललीस बघ , आज खरचं खूप रोमँटिक वातावरण आहे. मला तर असे झालंय की कधी एकदा फार्महाऊसवर पोहचतोय आणि तुला घट्ट मिठीत घेतोय."

आयुषने असे बोलता बोलता तिच्या हातावर हात ठेवला. त्याचवेळेस त्याच्या गाडीच्या बाजूने एक ट्रक वेगाने निघून गेला.

"आयुष तू समोर लक्ष देऊन गाडी चालव. आता घातपात झाला असता बघ."

रावी त्याला बोलली तसे आयुष हसू लागला.

"खतरोंसे खेलना तो मेरी आदत है."
आयुषने असे बोलून तिला डोळा मारला.

"हा ते तर दिसतेय. उगाच का कुणी बायकोला खोटं सांगून असे गर्लफ्रेंड बरोबर फिरायला येते का?" रावीचे बोलणे ऐकून आयुषच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली.

"अग! आज बायकोचे नावच काढू नकोस. आज मूड एकदम चांगला आहे, तो मला तिला आठवून खराब करायचा नाही."

"इतकी वाईट आहे का तुझी बायको ?"

"ती बायको नाही सायको आहे सायको. लग्न झाल्यापासून फक्त संशय घेत आली माझ्यावर. अशी असते का बायको सांग ना? तुला भेटून फक्त ४ दिवस झालेत तरीही त्या चार दिवसांत तू मला किती प्रेम दिलेस."

"अजून कुठे काय दिले? आपलं तर सर्वच बाकी आहे ना अजून?"

रावी असे बोलून मादकपणे हसली. तिचे ते हसणे बघून आयुषच्या पोटात गुदगुल्या झाल्या. त्याच वेळेस त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने बघितले तर त्याच्या बायकोचा कॉल येत होता.

"बघ , तुला म्हंटले ना चांगल्या क्षणी नको त्या माणसाला आठवण नको जाऊस."

"का, काय झाले?"

"काय होणार? शैतान का नाम लिया और शैतान हाजीर."

"म्हणजे?"

"शैतानचाच कॉल .... म्हणजे बायकोचाच कॉल येतोय. एक मिनिट हा तू काहीच बोलू नकोस."

आयुषने असे बोलून तिचा कॉल उचलला.

"हा बोल."

"कुठे आहात?"

बायकोने त्याला विचारले तसे आयुषने तिचा कॉल स्पीकर मोडवर टाकला जेणेकरून त्यांचे ते बोलणे रावी पण ऐकू शकेल.

"कुठे म्हणजे? कामानिमित्ताने बाहेर जाणार आहे, तुला सांगितले होते मी?"

"कोण कोण आहे तुमच्याबरोबर?"

"नंदिनी , आता हे जरा अतीच होतंय हा. हे सर्व थांबव आधी. मी एकदा घराबाहेर पडलो की मला सारखा कॉल करून चौकशी करत बसायचं नाही. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तू काही ईडीची अधिकारी नाहीस, समजले का?" आयुष तिच्यावर चांगलाच भडकला.

"कधी येणार घरी?"

"काम पूर्ण झाल्यावर. आता सारखा कॉल करू नकोस." आयुषने असे बोलून कॉल कट केला.

"काय मग, बरोबर बोललो ना मी? काम पूर्ण झाल्यावरच जाऊया ना ?" आयुष रावीकडे बघून बोलला. तसे तिला एक फ्लायिंग किस पण दिला. ज्याने रावी जास्तच लाजून गेली.

"तू लाजतेस तेव्हा किती हॉट दिसतेस ग? खरंच इंद्र दरबारातल्या अप्सरा पण तुझ्यासमोर फिक्या पडतील."

"पुरे आता, अजून स्तुती नको. लवकर फार्म हाऊसवर पोहचू. मला तर असे वाटू लागलय की तुम्ही गाडीतच सुरू व्हाल."

"तुझी तशी इच्छा असेल तर मला काही हरकत नाही."

"माझी तशी काही इच्छा नाही. मला निवांत आवडते, घाईघाईने नाही."

"काय?" असे बोलून आयुष गालातल्या गालात हसला.

"चूप हा आयुष, तू जास्तच चावट बोलतोस."

असे बोलून रावीने त्याच्या हातावर एक फटका मारला.

"बायकोशी पण असेच चावट बोलतोस का?" रावीने त्याला विचारले तसे आयुष पुन्हा तिला बोलला.

"अग कुणाचे नाव घेतलेस तू? तुला सांगितले ना तिचे नाव नको घेत जाऊस . बघ पुन्हा तिचा कॉल येईल डोकं खायला."

तो असे बोलला खरे पण तिचा कॉल आला नाही कारण ती आता गाडी चालवण्यात बिझी होती. तिची काळ्या रंगाची होंडा सिटी आयुषच्या गाडीच्या बरोबर अर्ध्या मागे धावत होती. तिने मुद्दामून तिच्या मैत्रिणीची गाडी आणली होती जेणेकरून आयुषला संशय येऊ नये. आदल्या दिवशी रात्री तिने आयुषला रावी बरोबर चोरून बोलतांना ऐकले होते. तेव्हाच तिने मनाशी पक्के केले होते की काहीही करून रंगेहात आयुषला दुसऱ्या मुलीबरोबर पकडायचे म्हणजे घटस्फोट घेतांना काही अडचण येणार नाही. त्याच उद्देशाने ती सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडली. बाहेर निघतांना तिने आयुषला आईकडे जातेय असे खोटे सांगितले. ती खोटं बोलून डायरेक्ट तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. जी जवळच राहत होती. मग तिचीच गाडी घेऊन ती घराच्या बाहेर आयुषची वाट बघत राहिली. आयुष तयार होऊन घराबाहेर पडला तसे ती त्याचा पाठलाग करू लागली. वाटेत आयुषने रावीला पण पिक केले जे बघून तिची चांगलीच सटकली.

दोघांच्याही गाड्या सुसाट हायवेवरून धावत होत्या. आयुषला थोडी पण कल्पना नव्हती की त्याची बायको त्याचा पाठलाग करतेय. तो त्याच्याच रोमँटिक दुनितेय मस्त होता. काही वेळाने आयुष रावीच्या फार्म हाऊसवर पोहचला.

"हे आहे का तुझे फार्म हाऊस? खूप छान आहे ग."

आयुष तिला असे बोलला तसे रावी त्याला बोलली-

"बाहेरचा नजारा बघूनच इतका खुश झालास? खरी मज्जा तर आतमध्ये आहे."

"आता राहवत नाही. चल लवकर उतर गाडीतून. कधी एकदाचे बेडरूममध्ये जातोय असे झालंय मला."

आयुष असे बोलून गाडीतून खाली उतरला. त्याच वेळेस त्याचे लक्ष मागे दूर उभ्या असलेल्या त्या काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडीवर पडली. मग मात्र तो त्याच्या त्या रोमँटिक दुनियेतून बाहेर आला. कुणीतरी त्याचा पाठलाग करतोय इतके समजायला त्याला वेळ गेला नाही.

"चल मग, आत बेडरूममध्ये जायचे ना?" तिने हसतच  त्याला विचारले.

"रावी, माझ्याकडेच बघ. चुकूनही मागे वळून बघू नकोस."

"का? काय झाले? कोण आहे मागे?"

"कुणीतरी आपला पाठलाग केलाय.  तू एक काम कर, माझ्यापासून थोडं दूरच उभी रहा. आपण आता एकमेकांशी असे वागू जसे काही तू या फार्म हाऊसची मालकीण आहेस आणि मी बायर."

"पण का?"

"प्लीज, मी तुझ्या पाया पडतो. तो जो कुणी माणूस आहे त्याला नक्की माझ्या बायकोनेच पाठवले असेल त्यामुळे मला आता तरी कुठलीच रिस्क घ्यायची नाही."

आयुषचे ते बोलणे ऐकून रावीचा चेहराच पडला. त्याचवेळेस गाडीच्या साईड मिररवर आयुषचे लक्ष गेले आणि त्याच्या छातीतच धडधडायला लागले कारण पाठलाग करणारे दुसरे कुणी नसून त्याची बायकोच होती. ती हळू हळू लपत छपत त्यांच्याजवळ येत होती. तिनेही ठरवले होते की जसा तिचा नवरा आत घरात घुसला तसा त्याच्यावर हल्ला बोल करायचा.

"तुमचा हा फार्म हाऊस खूपच छान आहे, आवडला मला."

आयुष मुद्दामून मोठ्याने बोलला जेणेकरून त्याच्या बायकोला त्याचे बोलणे ऐकू जाईल.

"बरोबर ३ दिवसांनी माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हा फार्म हाऊस मला तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. त्यामुळे मॅडम तुम्ही या फार्म हाऊसची फायनल किंमत सांगा."

आयुषचे ते बोलणे ऐकून त्याच्या बायकोला एक सुखद धक्का बसला.  तसे ती ही विचारात पडली.

"हे मी काय ऐकतेय? मी ऐकतेय ते खरे आहे का? हे मला माझ्या वाढदिवशी इतके मोठे सरप्राईज देणार आहेत? माझा इतका विचार करतायत ते? आणि मी मूर्खासारखी त्यांच्यावर संशय घेत राहिले. बस पण आता अजुन नाही. इथून चुपचाप निघून गेलेलेच बरे."

असा विचार करत ती गाडीत जाऊन बसली. गाडीच्या काचा काळ्या रंगाच्या असल्याने बाहेरच्या व्यक्तीला आतला माणूस दिसत नव्हता. आयुष अजून ५ मिनिटे बाहेरच उभा राहून रावीशी बोलला आणि मग चुपचाप एकटाच गाडीत जाऊन बसला.

"सॉरी, नेक्स्ट टाईम. मी आता निघतो नाहीतर माझे काही खरे नाही."

रावीला असे सांगितले आणि गाडी सुरू करून तिथून निघून गेला. त्याच्या मागे त्याच्या बायकोची गाडी पण निघाली. रावी मात्र एकटीच तिथे थांबली.

गाडीत असतांना त्याला त्याच्या बायकोचा कॉल आला. त्याने तो लगेचच उचलला.

"हा बोल."

"आज जेवणाला काय बनवू?" त्याच्या बायकोने त्याला विचारले.

"काहीपण बनव . तुझ्या आवडीचे."

"नको, आज मी तुमच्याच आवडीचे जेवण बनवणार."

"ठीक आहे रे बाबा,  ठेवू का आता?"

"ओके बाय. सांभाळून घरी या."

"हो रे बाबा."

असे बोलून आयुषने कॉल कट केला. कॉल कट करताच त्याने सुटकेचा एक दीर्घ श्वास घेतला. त्याच वेळेस त्याचे लक्ष हायवेवरील एका बोर्डवर गेली ज्यावर लिहिले होते-

\"काळ आला होता पण वेळ आली नव्हती\"

तो बोर्ड वाचून तो मनातल्या मनात बोलला. \"खरंच देवा आज बायको काळ बनून आलीच होती. तू वाचवलेस रे देवा\"

इकडे रावी आत बंगल्यातील बेडरूममध्ये गेली. त्याचवेळेस तिला मागून तिच्या बॉयफ्रेंडने पकडले पण तिने त्याचे हात झटकून दिले.

"अग जाऊंदे इतके का चिडतेस? हा नाही तर दुसरा कुणी बकरा भेटेलच ना? उगाच का या फार्म हाऊसमध्ये इतके मुडदे गाळलेत."

"जानू, इतकी मेहनत केली त्या माणसाला पटवण्यासाठी, सर्व काही पाण्यात गेले. त्याच्या हातात बघितले? १० बोटांमध्ये दहा सोन्याच्या अंगठ्या होत्या. गळ्यात जवळपास १५ तोळे सोने होते. त्याच्याजवळ इतका पैसा होता की हा शेवटचा खून करून आपण फॉरेनला सेटल झालो असतो."

"एक बोलू तूला?"

"काय?"

"त्याचा काळ आला होता पण त्याची वेळ आली नव्हती."


कथा समाप्त


© ®राजेश चव्हाण

ठाणे विभाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Rajesh Chavan

Job

Love to write

//