काळ आला होता पण..

Marathi Katha
टिम-भंडारा
राज्यस्तरीय करंडक लघुकथा 
का? (काळ आला होता पण)

"डॉक्टर, डॉक्टर, काय झालंय माझ्या मुलाला प्लीज सांगाना. खूप मार लागलंय का हो, होईल ना तो लवकर बरा, काही क्रिटिकल तर नाही ना?" एकुलत्या एका मुलाची अशी दयनीय मरणासन्न अवस्था बघून पाटील काका भांबावून गेले होते आणि डॉक्टरांवर प्रश्नांचा भडिमार करत होते. पाटील काकुंचे तर अश्रू काही केल्या थांबतच नव्हते.

"हे बघा काका,आम्ही आमचे प्रयत्न करतोय, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास सध्या मी काहीच सांगू शकत नाही.तुमच्या मुलाच्या डोक्याला जबर मार लागला आहे  देवाला प्रार्थना करा की सगळं ठीक होवो."

डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून काकूंनी एकच आक्रोश केला आणि कोलमडून पडल्या. काकांनी कसेबसे त्यांना सावरले खरे पण तेही आतून कोलमडलेच होते, मूकपणे अश्रू ढाळत होते, कारण त्यांना त्यांच्या मुलासाठी त्यांच्या पत्नीसाठी खंबीर राहणं भाग होतं.

भरपूर डॉक्टर्स पालथे घालून, उपासतापास, नवस, पूजा-पाठ केल्यानंतर लग्नाच्या तब्बल सहा वर्षांनी पाटील दाम्पत्याला एकुलते एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी कौतुकाने त्याचे नाव ठेवले आकाश.गोरापान, उंचपुरा, राजबिंडा आकाश.त्याने वडिलांचा खंबीरपणा आणि आईचा प्रेमळ आणि भावूक स्वभावही घेतला हाेता. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या आकाशने एमबीए करून एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी पटकावली.एखाद्या उच्चशिक्षित लग्नाळू मुलाला येतात तशी अनेक स्थळे त्यालाही येऊ लागली. नातेवाईकांनी त्याच्यामागे मॅट्रिमोनियल साइट्सवर नाव नोंदविण्यासाठी तगादा लावला तेव्हा त्याने त्याचे नाव तिथेही नोंदवून घेतले.त्यांच्या समाजातील विवाह पुस्तिकेतही पाटील काकांनी त्याचा बायोडाटा दिला. एक दिवस पाटील काकांचा मोबाईल खणाणला.

"हॅलो" पाटील काका 
"हॅलो, पाटील साहेब ना, मी नागपूरहून दीनानाथ बोकडे बोलतोय. तुमच्या मुलाचा बायोडाटा पाहिला विवाह पुस्तिकेत. तुम्ही पुस्तिकेत दिलेल्या अपेक्षांप्रमाणे माझी मुलगी बसते. तुमची हरकत नसेल तर उद्या मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवायचा का? 
आकाश नुकताच मुंबईहून काही दिवसांच्या रजेवर घरी आलेला होता. पाटील काकांनी काकू आणि आकाशला विचारून लगेच होकार कळवला. दुसर्‍या दिवशी तिघेही मुलगी बघायला गेले. मुलीचा हजरजबाबीपणा, तिची बोलण्याची पद्धत, शिक्षण सर्वांना आवडले.दिसायला आकाशपेक्षा जरा डावीच होती पण आकाशने तिच्या रुपाला जास्त महत्त्व न देता तिच्यातला चुणचुणीतपणा पाहून होकार दिला.

लवकरच त्यांचा साखरपुडाही आटोपला.मुंबईत नोकरीला असलेला आकाश नागपूरला आला की दोघेही फिरायला जात. फोनवर बोलणं रोजच होत असे. स्नेहल जशीजशी आकाशच्या सहवासात येत होती तशा तिच्या बऱ्याचशा सवयी त्याला खटकायला लागल्या.तिचे नेहमीचे होणारे मूड स्विंग्स, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडून आकांडतांडव करणे, तिचा अतिशय तापट स्वभाव जो तिने साखरपुड्याआधी पराकाष्ठेने दाबून ठेवला होता तो आता त्याच्यासमोर यायला लागला. तिच्या या  स्वभावाची आकाशने त्यांच्या आईबाबांना जाणीव करून दिली.

"आई बाबा मला काही बोलायचेय तुमच्याशी." आकाश

"बोल ना बाळा." बाबा

"साखरपुडा झाल्यापासून स्नेहलचा स्वभाव फार विचित्र होत चाललाय.आताच जर असं असेल तर लग्नानंतर काय होईल?"

"आकाश, अरे बाळा तुम्ही आजकालची मुलं  छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करता. आजकाल मुलं मुली लग्नाआधीच एकमेकांशी तासनतास गप्पा मारता आणि मग बोलता हे खटकतंय ते खटकतंय.अरे आमच्या काळी तर आम्ही एकमेकांसोबत बोलणं तर दूरच पण लग्नाआधी एकमेकांना बघतही नव्हतो तरी इतकी वर्षे संसार केलाच ना! अरे प्रत्येक नात्यात थोडं कमीजास्त होतच असतं. समजून घे तिला आणि लग्न तोडण्याचा विचारही मनात आणू नकोस. साखरपुडा झालाय तुमचा हल्लीच्या पध्दतीप्रमाणे एकदम साग्रसंगीत. लग्न तोडण्याचा विचार जरी केला ना तरी तुरुंगात जाण्याची वेळ येईल आपल्यावर." असे म्हणत काका खो-खो हसायला लागले. 

हे सगळं ऐकून आकाश गप्प बसला. त्यालाही वाटले की आपण स्नेहलच्या स्वभावाबाबत उगाच टोकाचा विचार करतोय. होईल सगळं ठीक. इकडे पाटील काकूंनी पण त्याला समजावले पण त्यांच्या मनातही एक कुणकुण लागली ती ही की स्नेहलचे वडील लग्न लवकर आटोपण्याचा हट्ट का धरत आहेत. कारण पसंती झाल्यावर लगोलग दोनच दिवसांत साखरपुडा पार पडला आणि आता महिन्याभरातच लग्न म्हणताहेत.

पसंती कळल्यापासून महिन्याभरातच देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने त्यांचा दिमाखदार विवाहसोहळा पार पडला. एकुलत्या एका नव्या सूनेचं पाटीलकाकूंनी खूप कोडकौतुक केलं. तसं त्यांनी  मनाशी ठरवलं होतं की स्नेहलला सून नाही तर लेकच मानणार. लग्नानंतरच्या चौथ्या दिवशीच दोघेही जम्मू काश्मीरला फिरायला गेले. दहा दिवसांनी दोघेही हनीमूनहून परत आले.
मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव चटकन टिपणाऱ्या पाटीलकाकूंना मात्र एक गोष्ट खटकली ती ही की नुकतंच लग्न झालेला, फिरून आलेला नवरा मुलगा आनंदी दिसायला हवा पण आकाश मात्र वरून जरी सगळं ओके आहे असं दाखवायचा प्रयत्न करीत होता पण त्याला आतून काहीतरी कुरतडत होतं. त्याला त्याच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जॉईन व्हायला अजून सहा-सात दिवसांचा अवकाश होता पण दुसऱ्याच दिवशी तो स्नेहलसोबत मुंबईला निघाला.हे सगळं पाहून काकाकाकूंना जरा विचित्रच वाटलं पण कदाचित प्रायव्हसीसाठी जात असतील असे समजून ते काही बोलले नाही.

मुलगा मुंबईत नोकरीनिमित्त असल्याने त्याच्या लग्नाआधी काका-काकू आकाशला दिवसातून एकदा तरी फोन करायचे, पण आताशा त्यांनी फोन केलेला आकाशला आवडेनासे झाले. खूप व्यस्त असल्याची कारणं सांगू लागला. एकुलत्या एका मुलाचं असं तुटक वागणं पाहून काकाकाकूंना खूप वाईट वाटलं, पण त्यांच्या संसारात ढवळाढवळ नको म्हणून त्यांनी फोन करणेही कमी केले.बघताबघता लग्नाला सहा महिने झाले परंतु या सहा महिन्यांत आकाश एकदाही आईबाबांना भेटायला आला नाही की त्याने त्यांना मुंबईलाही बोलावले नाही आणि अचानक एक दिवस पाटील दाम्पत्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन केला.

"तुम्ही आकाश पाटीलचे वडील बोलताय का?

"हो, आपण कोण?"

"मी कोण ते महत्त्वाचे नाही. त्वरित मुंबईला निघून या. तुमचा मुलगा आकाशला जीवनधन हॉस्पिटलमध्ये भरती केलंय."

हे ऐकून काकांचे अवसानच गळाले पण स्वतःला आणि काकूंना कसेबसे सावरून त्यांनी मुंबईतले ते हॉस्पिटल गाठले.

"पाटील काका डोन्ट वरी. तुमच्या प्रार्थना देवाने ऐकल्या. तुमचा मुलगा आता आऊट ऑफ डेंजर आहे." डॉक्टर

काका-काकूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला.दोन दिवसांपासून आकाशच्या जीवनमरणाचा लपंडाव सुरू होता, पण आतापर्यंत त्याची अर्धांगिनी स्नेहलचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. काकूंनी तिला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता.तिच्या आईवडीलांना फोन केला तेही फोन उचलत नव्हते. त्यांच्या मनात शंका आली की स्नेहलचंही काही बरंवाईट तर झालं नसेल ना? सध्या आकाशलाही काही विचारता येणार नव्हते कारण तो पूर्णतः बरा व्हायचा होता.

चारच दिवसांत आकाश पूर्णतः बरा झाल्यानंतर काकूंनी स्नेहल बद्दल विचारले.
"अगं आई, माझ्या मारेकऱ्यांनीच मजवर  मलमपट्टी लावावी असे वाटते का तुला?"आकाश कुत्सितपणे हसत बोलला.
हे ऐकताच काका-काकूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

"काय, म्हणजे स्नेहलने केलं हे सगळं?"

"फक्त स्नेहलचं नाही तर तिचा प्रियकरही सामील होता या सगळ्यांत.मला मारून माझी संपत्ती हडपण्याचा डाव होता दोघांचा आणि या सगळ्याला तिच्या आईवडिलांचाही पाठिंबा होता. लग्न झाल्यापासूनच तिने मला सर्व सुखांपासून वंचित ठेवले. ती माझ्याशीच इतकं तुटक वागायची तर तुमच्याशी कशी वागली असती म्हणून मी तुम्हाला मुंबईला येण्याचा कधीच आग्रह केला नाही. माझ्या पगारातील नव्वद टक्के पैसे तिच्या नावावर करण्याचा आग्रह धरला होता तिने आणि मी जेव्हा याला नकार दिला तेव्हा मानसिक आणि शारीरिक छळाचा पाेलिस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करून मला तिने एक महिन्याचा तुरुंगवासही घडविला.पण लगेच तिच्या लक्षात आले की सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीलाच आपण डांबून ठेवले, तेव्हा तिने एफआयआर मागे घेतली. पण नंतर मात्र तुझ्या आईवडिलांना हुंडा आणि छळाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबेल असं मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून रकमा वसूल केल्या.आणि मी मात्र तिला घाबरत राहिलो आणि काहीही करु शकलो नाही."

"तिची तिजोरी भरत गेलो आणि मी मात्र पुरता कंगाल झालो. मानसिक आणि शारीरिक छळ तर माझा होत होता पण कायद्याची साथ मात्र तिला मिळत होती.साखरपुडा झाल्यानंतर आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा ती मला नेहमी प्रॉपर्टीबद्दल विचारायची. भाबडेपणाने मी तिला सगळं सांगितलं होतं की आईबाबांनी माझ्या नावे काय काय करून ठेवलंय.तिला आता तुम्ही कमावलेल्या संपत्तीचाही हव्यास सुटला आणि मला पुन्हा  तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन ती प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला.पण यावेळी मात्र मी तिचं काहीच ऐकलं नाही.तिला सरळ सांगितलं की तुला जे करायचे ते कर, पण  आता मात्र मी तुला बधणार नाही."

"त्यामुळे ती प्रॉपर्टी हडपण्याचा तिच्यापुढे एकच मार्ग होता तो म्हणजे मला मारण्याचा. कारण तिला माहिती होतं की  पतीच्या  मृत्यूनंतर पत्नीलाच त्याची प्रॉपर्टी मिळते."

"जवळपास वीस दिवसांपूर्वीपासून तिचं माझ्याशी वागणं  बदललं. ती अचानकपणे चांगली वागायला लागली. तिने केलेल्या चुकांची तिने माझ्यासमोर माफीही मागितली.तिच्यात झालेला बदल पाहून मीही सुखावलो आणि तिला निर्मळ मनाने माफही केले. दहा दिवसांपूर्वी तिचे आईवडील मुंबईला आले आणि त्यांनी महाबळेश्वरला फिरायला जाण्याचा प्लॅन केला.
तिथे गेल्यावर तिचा प्रियकरही तिथे आला. तिने त्याची तिचा मित्र म्हणून ओळख करून दिली.आम्ही सर्व टेकडीवरून फिरत असताना अचानकच दोघांनीही मला दरीत ढकलले आणि पळ काढला. काळ आला होता पण दैव बलवत्तर म्हणून मी दरीत न कोसळता एका झाडाच्या फांदीला लटकलो.मार लागला होता पण अजूनही शुद्धीतच होतो.काही वेळानंतर दुसरे टुरिस्ट त्या ठिकाणी फिरायला आल्यावर त्यांनी मला पाहिले आणि त्या भल्या माणसांनी मला कसेबसे बाहेर काढले.बस्स इतकंच मला आठवतं त्यानंतर कदाचित माझी शुद्ध हरपली."

हे सगळं ऐकून काका-काकूंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं.आपल्याच मुलाच्या आयुष्यात असं का घडलं म्हणून त्यांनी देवाला प्रश्न विचारला.

त्यांचे अश्रू पाहून आकाशालाही रडू आवरलं नाही.आईला बिलगून तो खूप रडायला लागला.

थोड्या वेळाने पोलीसही आकाशची स्टेटमेंट घ्यायला आले.ते तेच इन्स्पेक्टर होते ज्यांनी स्नेहलच्या खोट्या एफआयआरमुळे आकाशला तुरुंगात टाकले होते.आकाशने सुरवातीपासूनचं सगळं कथानक इन्स्पेक्टरला कथन केला.इन्स्पेक्टर साहेबही हे सगळे ऐकून चक्रावून गेले.

"अच्छा तर त्या बाईने खोटी एफआयआर नोंदवली होती तर." इन्स्पेक्टर 

"हो इन्स्पेक्टरसाहेब,पण पुरुषाचं कोण ऐकतो.शेवटी न केलेल्या गुन्ह्यासाठी मी तुरुंगवास भोगलाच ना.इन्स्पेक्टरसाहेब प्रत्येकच पुरुष वाईट नसतो.काही निरपराध पुरुषही कायद्याच्या कचाट्यात सापडून भरडले जात आहेत, त्याचेच मी एक उदाहरण."

"सॉरी पाटील साहेब पण तुम्हालाही माहिती आहे की आमच्या हाती काहीच नसतं.अशा अनेक खोट्या केसेस येतात पण आम्हाला आमचं कर्तव्य हे करावंच लागतं."
इन्स्पेक्टर साहेबांनी स्टेटमेंट घेतलं आणि ते गेले.

पाटील काका काकू डॉक्टरांशी बोलायला गेले.

आकाश त्याच्या बेडवर गच्च डोळे मिटून पडून होता.त्याच्या मनात अनेक "का?" ची प्रश्नमालिका धुमसत होती.

का प्रत्येक पुरूषाला एकाच तराजूत तोलले जाते?
का प्रत्येक स्त्रीच्या अवहेलनेला पुरुषांनाच जबाबदार धरलं जातं?
का माझ्यासारखे पुरुष कुठलाही गुन्हा केला नसतानाही   हकनाक बळी ठरताहेत?
का वागली माझ्याशी स्नेहल अशी?
का पुरुषांच्या बाजूचाही विचार केला जात नाही स्त्रियांच्या   बाजूने असलेल्या कायद्यात?

©®श्रुती चकोले बावनकर , भंडारा