त्यापैकीच एक अविस्मरणीय प्रसंग, आजही आठवला तरी माझ्या अंगाचा थरकाप उडतो.
तर हा प्रसंग घडला, ते वर्ष होते २००२ चे. आम्ही कल्याणला रहात असताना, रहात असलेल्या बिल्डिंगमध्येच, आम्ही वन रूम किचन मधून, टू रूम किचन मध्ये शिफ्ट व्हायला उत्सुक होतो.
त्या दिवशी आमच्या घराची वास्तुशांती होती. सकाळी पाच वाजताच पूजेला सुरुवात झाली होती. सात ब्राम्हण पूजेसाठी बोलवण्यात आले होते. मास्टर बेडरूम मध्ये नवग्रह आणि सत्यनारायण पूजेसाठी एकूण दहा चौरंग मांडण्यात आले होते. पूजा अगदी साग्रसंगीत पार पडली होती.
सकाळी पूजेच्या वेळी, घरात आमच्या व्यतिरिक्त, जवळच राहणारे माझे आई वडील फक्त हजर होते. इतर नातेवाईक आणि मित्र परिवार यांना दुपारी चारच्या नंतर तीर्थप्रसाद घेण्यासाठी आमत्रंण दिले होते.
साधारण संध्याकाळी पाचच्या नंतर हळूहळू पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती.
माझ्या घरात पहिल्यांदाच, अशा धार्मिक कार्यक्रमा निम्मित, माझे सासर-माहेर कडील नातेवाईक आणि आमच्या दोघांचा मित्र परिवार एकत्र आला होता.
मी एवढया मोठया प्रमाणात मांडलेल्या पूजेचा थाट पाहून सर्वच चकित होत होते. आधीच्या घरापेक्षा नवीन घर ऐसपैस असल्यामुळे सर्वांना ते आवडले होते. भिंती पडद्याच्या रंगसंगती आणि फर्निचर पाहून आमचे कौतुक होत होते.
वास्तुशांती पूजेचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. नवीन घरातचं प्रसादाचा सर्व स्वयंपाक करून, नवीन घरातच सर्व पाहुण्यांना जेवायला घातलेले चांगले असते. असे ब्राम्हणाने आम्हाला सांगितले होते.
मास्टर बेडरूम मध्ये पूर्ण पूजा मांडली गेली होती. तर दुसऱ्या बेडरूम मध्ये माझ्या दोन लहान मुली सोबत, आलेली बच्चे कंपनी खेळत होती. हॉलमध्ये पाहुणे मंडळी गप्पात रंगली होती.
दोन्ही रूम आणि हॉलच्या मानाने, किचन तसे आकाराने लहानच होते.
माझ्या पतीचे म्हणणे होते की, आमचे जुने घर जे त्याच मजल्यावर अगदी नवीन घराला एक घर सोडून खेटून होते, तिथे सर्व स्वयपांक करावा आणि सर्वांच्या जेवणाची सोय सुद्धा तिथेच करावी. म्हणजे नवीन घरात येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी होणार नाही आणि घरात वावरताना अडचणही वाटणार नाही. हे व्यवहारिक दृष्ट्या मला अगदी बरोबर वाटत होते.
परंतु शास्त्रानुसार, नवीन घरातच पूजेचा स्वयंपाक करावा आणि येणाऱ्या पाहुण्यांना जेवायला घालावे. असे पूजा सांगणाऱ्या ब्राम्हणांनी तर सांगितले होतेच, त्या व्यतिरिक्त, मला आमच्या नात्यातल्या एक दोन ज्येष्ठ स्त्रियांनी आणि ऑफिस मधील मैत्रीणींनी सुद्धा सांगितले होते.
त्यानुसार मी " नवीन घरातच सर्व पूजेचा स्वयंपाक करायचा आणि सर्वांना जेवायला घालायचे नाहीतर केलेल्या पूजेला काही अर्थ नाही." असे माझ्या अहोंना म्हंटल्यावर त्यांनी "कर तुला काय करायचे आहे ते.", असे म्हणून नाईलाजाने त्यासाठी ते तयार झाले.
सर्व काही शास्त्रानुसार होत आहे, हे पाहून मला खूप समाधान वाटत होते.
संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत, आयत्या वेळी तळाव्यात म्हणून पुऱ्या आणि पापड व्यतिरिक्त सर्व स्वयंपाक तयार झाला होता.
सात वाजता, स्वयंपाक करणाऱ्या मावशीने, पुऱ्या जास्त प्रमाणात लाटायच्या असल्या कारणाने, किचनमध्येच दोन्ही बाजूच्या कॅबिनेटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत, खाली बसून पुऱ्या लाटायला घेतल्या.
छोट्या सिंगल गॅस सिलेंडर स्टोव्हवर पुऱ्या तळण्यासाठी, मोठ्या कढईत तेल तापवायला ठेवले होते. लाटता लाटता त्यांनी पुऱ्या तळायला सुरुवात केली होती.
आम्ही दोघेजण हॉलमध्ये आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पांमध्ये रमलो होतो. तेवढ्यात अचानक आतल्या बाजूला असलेल्या किचनमधून, ओरडण्याचा आवाज आणि आगीच्या भडक्याचा उजेड बाहेरपर्यंत दिसू लागला.
घाबरून आम्ही सर्वजण आत किचनच्या दिशेने गेलो तर, आगीचा भडका वर छतापर्यंत पोहचला होता आणि स्वयंपाक करणाऱ्या मावशी आगीच्या उसळलेल्या ज्वाळामध्ये अजिबात दिसत नव्हत्या.
आग लागलेली पाहून, चक्कर येऊन मी खाली पडणार तोच कोणीतरी मला मागे खेचले होते. मी हॉलमध्ये सुरक्षित जागी येऊन पडले होते.
मला चक्कर येण्यापूर्वी, एक दोन सेकंदाच्या अवधीत मी माझ्या भावोजींना किचनमध्ये आगीच्या ज्वाळातून जाताना पाहिले होते आणि माणसांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता.
माझ्या तोंडावर पाणी शिंपडून मला जागे केले तेव्हा, माझ्या दोन्ही मुली, माझ्याजवळ बसून रडत होत्या. माझे डॉक्टर दिर माझ्या हाताची नाडी तपासत होते.
अजूनही मी घाबरलेली होती. माझे बी पी लो झाले होते. माझे पती मला लिंबू सरबत पाजत होते.
आता बऱ्यापैकी सर्व शांत झाले होते. पण मी अजूनही भेदरलेल्या अवस्थेतच होते. " आग … किचन मध्ये … आग " मला धीर द्यायला जवळ बसलेल्या माझ्या पतीला मी घाबरत घाबरत विचारलें.
" आग विझवली .... कुणाला काही झाले नाही .... सगळे व्यवस्थित आहे ..... सर्वजण सुखरूप आहेत ..... काही टेन्शन घेऊ नकोस " असे म्हणत त्यांनी मला समाजवले.
" भावोजी " मी पुन्हा विचारले.
" मी आहे इथे. मला काही नाही झाले. ", असे म्हणत भावोजी, माझ्या मोठ्या बहिणीचे पती माझ्या समोर येऊन उभे राहिले.
त्यांना बघून माझ्या जीवात जीव आला आणि मला स्वयंपाक करणाऱ्या मावशींची आठवण झाली.
" त्याही अगदी सुखरूप आहेत. माझ्या सारखीच त्यांनाही आगीची थोडीशी धग लागली. त्यांनाही कुठे भाजले नाही. ", भावोजी म्हणाले.
" ताई मी बरी आहे. टेन्शन घेऊ नका.", किचन मधूनच पुऱ्या तळता तळता मावशींनीही आवाज दिला.
मी डोळे मिटून एक सुटकेचा निःश्वास सोडला. एक मोठे संकट टळले होते. थोडक्यात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणून बसल्या जागीच देवाला, हात जोडून नमस्कार केला आणि आभार मानले.
त्याचे झाले असे होते की, किचनच्या दरवाज्याच्या बाजूला, वर एक सज्जा होता. त्यावर पाण्याची टाकी बसवली होती. संध्याकाळी साडेसात वाजता नळाला पाणी आल्यावर, ती आपोआप भरली जायची आणि टाकी भरून झाल्यावर, त्यात पाणी भरायचे आपोआप बंद व्हायचे.
त्यासाठी किचनमध्येच, बेसिनच्या बाजूला एक कॉक बसवला होता.
परंतु, तो कॉक पूजेच्या दिवसाच्या दोन तीन दिवस आधीच नादुरुस्त झाला होता. नादुरुस्त कॉक प्लबंर कडून दोनदा रिपेअर करूनही तो काम करत नव्हता. तो बदलून नवीन कॉक बसविण्यास प्लबंरला सांगितले असता, दुसऱ्या दिवशी घेऊन येतो म्हणाला होता. परंतु काही कारणाने तो आला नव्हता.
त्यामुळे आम्ही टाकी भरल्याचा अंदाज घेऊन, कॉक हाताने बंद करत होतो.
त्या दिवशी पाहुण्यांच्या गोधंळात, साडेसात वाजता नळाला पाणी आल्याचे, आमच्या दोघापैकी कोणाच्याचं लक्षात आले नाही.
त्यामुळे टाकी पूर्ण भरून झाल्यावर, ऑटो कॉक काम करत नसल्यामुळे, टाकी ओव्हर फ्लो झाली होती. तेच पाणी, खाली पुऱ्या तळत असलेल्या उकळत्या तेलात पडून आगीचा भडका उडाला होता.
प्रसंगावधान राखून, त्या आगीच्या ज्वाळांमधून माझे भावोजी, बेसिन जवळचा कॉक बंद करायला गेले होते. त्यामुळे वरून पाणी पडायचे हळूहळू कमी झाले आणि थोड्याच वेळात आग आटोक्यात आली होती.
पुऱ्या तळणाऱ्या मावशी अंगकाठीने अगदीच बारीक असल्याने, मागे जाऊन बेसिन आणि वॉशिंग मशीन मधल्या गॅप मध्ये जाऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे त्याही सहीसलामत वाचल्या होत्या.
सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नव्हती. परंतु माझ्या मनात, झाल्या प्रकारची भीती मात्र कायमची बसली.
सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यतला खूप मोठा धडा या प्रसंगातून मला मिळाला तो म्हणजे धार्मिक शास्त्र कितीही महत्वाचे असले तरी माणसांची सुरक्षितता सर्वात जास्त महत्वाची.
एकंदर सगळ्याच बाबतीत मी, धार्मिक शास्त्र किंवा दिखाव्यापेक्षा व्यावहारिक आणि सुरक्षितेच्या दृष्टीने जे योग्य आहे, त्याचा स्वीकार करायला लागले.
त्याचेच उदाहरण सांगायचे म्हणजे, जेमतेम दिड वर्षे त्या घरात आम्ही काढल्यानंतर, आम्ही दोन्ही घरे विकून आणि बँकेतून लोन काढून, ऑफिसला जाण्यायेण्यास जास्त सोयीस्कर म्हणून मुंबईत अंधेरी येथे घर घेतले.
या घरात मात्र अगदी साधेपणाने वास्तुपूजा केली. पाहुण्यांसाठी जवळच्याच हॉटेल मधून जेवण मागवले होते.
===============================
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगातून, मी घेतलेला धडा आवडला असल्यास, नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ?