कजरी. भाग -१

एका कोवळ्या मुलीची कथा!

आपण वाचत आहात एका गोंड आदिवासी कुटुंबातील गोड मुलीची कथा, कजरी.


कजरी.

भाग - एक.


"कजरीऽऽ" सावित्रीचा आवाज रानात गुंजत होता. "कुठं हायसा?"


तिच्या चेहऱ्यावरची भीती बघून कजरीला मजा येत होती.


"कजरीऽऽ बाय ये ना गं."


आता मात्र तिला राहवले नाही. तिचे कावरेबावरे भाव बघून कमरेभर गवतात लपून बसलेली ती हळूच बाहेर आली.


"भोऽऽ" पाठीमागून येत सावित्रीच्या कानात ती ओरडली.


"आँऽऽ, घाबरली ना बाय."


"याल घाबरली. याल घाबरली." (आई घाबरली.) कजरी टाळ्या वाजवून उड्या मारायला लागली.


तोच सावित्रीने तिला पकडले. "याल ला घाबरवण्यात मजा येते होय? इकडं माझा जीव टांगणीला लागला होता. अशी नको ना बाय मला सोडून जात जाऊ." सावित्रीने तिचा कान हळूच पिळला.


"याल, किती गं प्रेम आहे तुझं माझ्यावर." तिचा मुका घेत कजरी म्हणाली.


"लई, लई, लई.. म्हणजे लईच प्रेम आहे बघ. माझ्या काळजाचा तुकडा हाईस तू कजरी." तिची पापी घेत सावित्री म्हणाली.

"लवकर चल. बाबो आला असेल तुझा." ती म्हणाली.


 कजरी "हर्राऽ हर्राऽ" करत शेळ्यांना गावरस्त्याकडे वळवून आईच्या समोर समोर उड्या मारीत घराकडे निघाली.

*****

कजरी.. एक आठ -नऊ वर्षाची अल्लड पोरं. सावळीच. पण नाकी डोळी नीटस. कोरीव भुवयांची, डोळे… काळेभोर! अगदी काजळ भरल्याप्रमाणे.

म्हणूनच सावित्रीने तिचे नाव ठेवले, काजळी, काजरी.. तिच आपली कजरी!

येताना गाववेशीवर तिला पालापाचोळयाने शाकारलेली एक झोपडी दिसली.

"याल, हिद बोना रोन आंदू? (आई, हे गं कोणाचं घर?) कोण राहतं हिथं?"


"कोण नाही. चल पटकन." सावित्री आपली पावलं भराभरा टाकत म्हणाली.


"कोण नाही कसं? झोपडी हाय तर कोणतरी आसलंच ना?" तिने पुन्हा विचारले.


"आगं. मोठी झालीस का कळेलच तुला. चल गुमान." तिला पुढे रेटत सावित्री म्हणाली.


"मोठीच तर हाय मी. आजून किती मोठी?" ती निरागसपणे म्हणाली.


"बाय माझे.. आता कसं सांगू? आजून उलुकशी मोठी झालीस का आपोआपच कळेल." ती तिला समजावत म्हणाली.


तिचे काही समाधान झाले नाही. घरी बाप आला. तिनं धावत जावून विचारलं,"बाबो मी मोठी झाले ना?"


"हो तर. माझी कजरी लय मोठी झाली. माझ्या कमरेवर यायला लागलीय." तो हसून म्हणाला.


ती गोंधळून पुन्हा यालकडे गेली.

"याल.. एवढी मोठी होऊनही मला नाय कळलं गं. वेशीवरच्या त्या घरात कोण राहात असन?" ती विचार करत म्हणाली.


सावित्रीने डोक्याला हात मारला.

"आत्ता? अजून खूळ गेलंच नाही होय डोक्यातून? कळल बाय तुला बी लवकरच कळल. बाईच्या जातीचं भोग तुला बी भोगा तर लागलंच." ती खिन्न होत म्हणाली.

याल काय बोलतेय कजरीला कळेना. ती बाबोसोबत भाकरी खायला बसली.


दोन दिवसानंतर दारात एक नेटकी स्त्री उभी दिसली. कजरीची नजर तिच्यावर स्थिरावली. त्या काळ्या डोळ्यांची भुरळ त्या स्त्रीलाही पडली

"काय गं मुली निवा बती परोल मंदा?" (काय गं मुली नाव काय तुझं..?) तिने विचारले.


आपल्या भाषेत बोलतेय म्हणून कुतूहलानं कजरी तिच्याजवळ गेली.

"नावा परोल कजरी मंदा." (माझं नाव कजरी.) ती तिच्याचकडे पाहत म्हणाली.


"वा गं! मस्त नाव आहे. डोळे किती सुंदर आहेत गं तुझे? मला आवडलीस तू. आणि तुझे काजळी डोळेसुद्धा." ती स्मित करून म्हणाली.


"निवा बती परोल मंदा?" हसून कजरीनेही तिला विचारले.


कोण असेल ती स्त्री? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr.Vrunda F. (वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all