कजरी.

वाचा कहाणी एका गोड मुलीची.

कजरी.
(आपण वाचत आहात एका गोंड आदिवासी कुटुंबातील गोड मुलीची लघुकथा..… कजरी..! )


*********************

" कजरी ss.. "

सावित्रीचा आवाज रानात गुंजत होता.

" कुठं हायसा..? "


तिच्या चेहऱ्यावरची भीती बघून कजरीला मजा येत होती.

" कजरी.. Ss
बाय ये ना गं… "

आता मात्र तिला राहवलं नाही.

तिचे कावरेबावरे भाव बघून कमरेभर गवतात लपून बसलेली ती हळूच बाहेर आली.

" भो ss "

पाठीमागून येत सावित्रीच्या कानात ती ओरडली.

" आँ ss घाबरली ना बाय.. "


" याल घाबरली..
याल घाबरली… "
(आई घाबरली.)


कजरी टाळ्या वाजवून उड्या मारायला लागली.

तोच सावित्रीनं तिला पकडलं.

" याल ला घाबरवण्यात मजा येते होय.
इकडं माझा जीव टांगणीला लागला होता.
अशी नको ना बाय मला सोडून जात जावू.. "

सावित्रीनं तिचा कान हळूच पिळला.

" याल .. किती गं प्रेम आहे तुझं माझ्यावर. "

तिचा मुका घेत कजरी म्हणाली.


" लई.. लई..लई.. म्हणजे लईच प्रेम आहे बघ.

माझ्या काळजाचा तुकडा हाईस तू… कजरी. "

तिची पापी घेत सावित्री म्हणाली.

" लवकर चल. बाबो आला असेल तुझा.. "

ती म्हणाली.

कजरी    " हर्राs हर्राs"      करत शेळ्यांना गावरस्त्याकडे वळवून आईच्या समोर समोर उड्या मारीत घराकडे निघाली.


कजरी..
एक आठ -नऊ वर्षाची अल्लड पोरं.
सावळीच.. पण नाकी डोळी नीटस..
कोरीव भुवयांची..!
डोळे… काळेभोर..!
अगदी काजळ भरल्याप्रमाणे…!!

म्हणूनच सावित्रीनं नाव ठेवलं…
काजळी… काजरी…

तिच आपली कजरी..!


येताना गाववेशीवर तिला पालापाचोळयानं शाकारलेली एक झोपडी दिसली.

" याल.. हिद बोना रोन आंदू?

(आई..हे गं कोणाचं घर..? )

कोण राहतं हिथं..? "

" कोण नाही. चल पटकन. "

सावित्री आपली पावलं भराभरा टाकत म्हणाली.

" कोण नाही कसं? झोपडी हाय तर कोणतरी आसलंच ना? "

तिनं पुन्हा विचारलं.

" आगं..! मोठी झालीस का कळेलच तूला. चल गुमान. "

तिला पुढे रेटत सावित्री म्हणाली.

" मोठीच तर हाय मी..! आजून किती मोठी? "

ती निरागसपणे म्हणाली.

" बाय माझे.. आता कसं सांगू..?
आजून उलुकशी मोठी झालीस का आपोआपच कळेल.
ती तिला समजावत म्हणाली.

तिचं काही समाधान झालं नाही.

घरी बाप आला.. तिनं धावत जावून विचारलं..

" बाबो मी मोठी झाले ना. "

" हो तर..! माझी कजरी लय मोठी झाली..!
माझ्या कमरेवर यायला लागलीय. "

तो हसून म्हणाला.

ती गोंधळून पुन्हा यालकडे गेली.

" याल .. एवढी मोठी होऊनही मला नाय कळलं गं..
वेशीवरच्या त्या घरात कोण राहात असन..? "

ती विचार करत म्हणाली.

सावित्रीनं डोक्याला हात मारला.

" आत्ता..? अजून खूळ गेलंच नाही होय डोक्यातून.
कळल बाय तूला बी लवकरच कळल.
बाईच्या जातीचं भोग तूला बी भोगा तर लागलंच."

ती खिन्न होत म्हणाली.

याल काय बोलतेय कजरीला कळेना.
ती बाबोसोबत भाकरी खायला बसली.

दोन दिवसानंतर दारात एक नेटकी स्त्री दिसली.

कजरीची नजर तिच्यावर स्थिरावली.

त्या काळ्या डोळ्यांची भुरळ त्या स्त्रीलाही पडली.

" काय गं मुली निवा बती परोल मंदा .? "
(काय गं मुली नाव काय तुझं..?)

तिनं विचारलं.

आपल्या भाषेत बोलतेय म्हणून कुतूहलानं कजरी तिच्याजवळ गेली.

" नावा परोल कजरी मंदा... "
( माझं नाव कजरी.)


ती तिच्याचकडं पाहत म्हणाली.

" वा गं!
मस्त नाव आहे.
डोळे किती सुंदर आहेत गं तुझे..?
मला आवडलीस तू. आणि तुझे काजळी डोळेसुद्धा..! "

" निवा बती परोल मंदा ? "
कजरीनंही विचारलं.

" नावा शारदा.
(मी शारदा.)

इथल्या शाळेतील नवी शिक्षिका.
तू जातेस शाळेत? "

शारदानं विचारलं.

कजरीनं नकारार्थी मान हलवली.

" का गं? "

" मला नाय आवडत शाळा. मास्तर मारतात तिथले. आणि माझी याल कुठं गेलती शाळेत? "

आपले काजळी डोळे शारदावर रोखत ती म्हणाली.

" मी नाही मारणार...

येशील? "


शारदा तिला आवडली.

" याल .. मी जावू शाळेला..?
ह्या बाई मारणार नाही म्हणत्यात. "

-कजरी.


सावित्रीनं होकार भरला.

कजरी शाळेत जायला लागली.

वर्षे सरली.

दिवसामागून कजरीचं शरीर आकार घ्यायला लागलं.

आणि एक दिवस…
न्हाणीघरातून तिची किंकाळी बाहेर आली.

"... कजरीss काय झालं ? "


सावित्री धावत तिकडे गेली.

" याल .. नंतूर..!
( आई… रक्त..!)

मला रगत येत हाये.."

रडत रडत ती बोलत होती.
तिच्या पोटात पण दुखायला लागलं होतं.


न्हाणीघरात येऊन सावित्रीनं पाहिलं आणि ती जे समजायचं ते समजली.

हसून तिनं कजरीला डोक्यावरून आंघोळ घातली.

कजरीला समजेना..
मला त्रास होतोय अनं याल का एवढी आनंदी?


" आवं.. ऐकता का? शहरात जावून कजरीसाठी नवा कपडा आणाल आनं बांगडया.. टिकल्या… "
तिची यादी संपत नव्हती.


ती नवऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजली. तोही लगबगीने शहरात गेला.


… सायंकाळी कजरीच्या दारासमोर मांडव टाकला होता.
कजरी च्या अंगावर नवा ड्रेस, दागिने.. हातात बांगडया आणिक काय काय होतं.

यालनं तिला ओवाळलं.अनं हातावर एक दागिना ठेवला.

गावातील बायकांनीही तिच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या.

ह्या सगळ्याचा अर्थ तिला उमगेना. पण मनोमन ती सुखावली.
पोटात त्रास होताच. रक्तही येत होतं..
तरी अचानक मिळालेल्या नव्या वस्तूंनी ती आनंदली होती.

" कजरी... मोठी झालीस की गं तू..! "

यालनं बोटं मोडली.

कालच्या एवढीच तर आहे मी नी आज अचानक मोठी कशी झाले याचा कजरीला अंदाज येईना.

ती शाळेत आली नाही म्हणून शारदा तिच्या घरी आली.

" घरी कसला कार्यक्रम आहे का? "
अंगणातला मांडव पाहुन तिनं विचारलं.

तिच्या हातावर गोडाचं ठेवत सावित्री हळूच म्हणाली.

"मूर्सेनाल.... कजरी मोठी झालीय आज. आता पाच सहा दिवस काही येणार नाही शाळेला. ".

" तिला कळतोय याचा अर्थ? "
शारदाने विचारलं.

" त्यात काय कळायचं..? काही दिवसांनी आपोआपच कळलं .


… कजरीला कळत तर काही नव्हतं.. पण आवडत मात्र सारं होतं.



" आय एवढं रगत का येतंय मला..?? "

दुसऱ्या महिन्यातही तेच..
म्हणून कजरी विचारत होती.

" बाय गं आंघोळ कर नी चल माझ्यासंग.. "
तिच्या कुठल्याच प्रश्नांना योग्य उत्तरं न देता ती कजरीला घेऊन गेली…


त्याच ठिकाणी..

गाववेशीपासच्या झोपडीजवळ….

"याल हितं का आणलंस मला..? "
ती विचारत होती.

" कजरी.. आता पुढचे पाच सहा दिवस इथेच राहायचे.
या पिशवीमधी कापडं, गोधडी आणि धान्य आहे..

खायचं आणि इथंचं झोपायचं."

सावित्री तिथून निघून गेली.

ज्या झोपडीचं लहानपणी कुतूहल वाटत होतं तिथं कजरी आज प्रवेशली होती…


कुबट वास..

दुसऱ्या दोन बायकांचे वाळत घातलेले ओलसर कपडे..

पोटातील दुखणे वेगळेच.. पण तिथल्या वातावरणाने तिला गळल्यासारखं वाटायला लागलं.
रात्री झोपली कशीबशी...

सकाळी उठली तर रक्ताने पूर्ण माखली होती.

मागच्या महिन्यात असं झालं तर याल किती आनंदी होती.

नवे कपडे, खाऊ, भेटवस्तू..

सगळं कसं हवंस वाटत होतं.


आणि आता यालनंचं तिला इथं पाठवलं..

तिच्यापासून दूर.

शरीरातील बदलांना अजून स्वीकारू न शकलेली ती.. रडायलाच लागली.

" मोठी झाल्यावर होतं असं. मग चार दिवस इथं येऊन राहायचं.
कुरमाघर म्हणतात याला. चार दिवसाचं हेच आपलं घर.. "

तिथली एक सांगत होती.

" आपल्या घरी का नाही राहायचं ..?? "

" कारण हे चार दिवस अपवित्र असतो आपण. "

ती गोंधळली.

ती काय बोलतेय ह्याचा अर्थ नाही समजला कजरीला..

तिला आठवलं..
आपली याल देखील अशीच महिन्याचे चार दिवस घरी नसते.

लहानच असते तर किती बरं झालं असतं..? उगाच मोठी झाले मी.
तिच्या मनात आलं.

सहाव्या दिवशी ती परतली..

सावित्रीनं अंगावर गोमूत्र शिंपडून तिला आत घेतलं.


आणि..
पुन्हा पंधरा दिवसांनी तिला कुरमा मध्ये जावं लागलं.


मागचे सहा दिवस कजरी शाळेत नव्हती..तेव्हा काय झालं असेल ते शारदा समजली.
पण पुन्हा पंधरा दिवसांनी गैरहजर राहिली तशी ती तिच्या घरी गेली.
" मूर्सेनाल.. इमा...? "
(मॅडम.. तुम्ही..?)

शारदा हसली.

" सावित्री ताई कजरी कुठे आहे? "


" कुरमा मध्ये. "
ती म्हणाली.


" अगं पंधरा दिवसापूर्वीच तर गेली होती. "

" हो मॅडमजी.. पण पुन्हा सुरु झालं तर काय करणार. दिली पाठवून."
-सावित्री.

" ह्या दिवसात तिला भेटलीस कधी..? "


" विटाळ असतं ते.. कसं जाणार? "


" वेडी आहेस का सावित्री ताई तू..? अगं बारा तेरा वर्षाची कोवळी पोर सात दिवसापासून तिथे आहे.

महिन्यात दोनदा पाळीला झाली आणि तू विटाळचं घेऊन बसलीस..? "

शारदा तिथून निघाली.

" मूर्सेनाल.. इमा बेके हंतनी?"
("मॅडम.. तुम्ही कुठे जाताय?")

" कुरमा..!"

शारदा उत्तरली.
सावित्रीच्या काळजात धस्स झालं..
आमच्या रीती - परंपरा..!

आनं ही मास्तरीण उगा का मधी पडते..??


" मूर्सेनाल… मूर्सेनाल.. "
करत तिही तिच्या मागोमाग गेली.


कुरमा किंवा कुरमाघार..


म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली आदिवासीनंची झोपडी.

मासिक पाळीच्या काळात प्रत्येक स्त्रीने कुराम्यातच राहायचं ही प्रथा आणि एकप्रकारे दंडकंच.
त्या काळात त्या स्त्रीला शिवायचं नाही हा जणू अलिखित नियम..

आणि…
ह्या सर्वाला झुगारून शारदा निघाली…
कुरम्याकडे..

" कजरी..
कजरी ss "

तिनं बाहेरूनच साद घातली.

काहीच प्रतिसाद येईना तेव्हा झोपडीत जायला निघाली.

" ओ मड्डम.. काय करताय? "

तिथून जाणाऱ्या एकाने हटकलं .

लोकं गोळा झाली.

शारदानं कुरम्याच्या आत पाऊल टाकलं.
तिथलं दृश्य बघून अंगावर काटाच आला तिच्या.
ओलसर.. कुबट वासाची ती अंधारी खोली…

खाली जमिनीवरच अंथरलेल्या चादरीवर कजरी निजली होती..रक्ताच्या सड्यात..

अती रक्तस्त्रावमुळं किती कापडं बदलवणार..? आणि कुठले..?
सोबत होती ती कापडं अजूनही ओलीच होती.


ती ओली..
तिची चादर ओली..
आणि ती जमीनही ओलीच…


अती रक्तस्त्राव आणि पोटातील वेदना..
दोन दिवसांपासून बिचारीने काही खाल्लेही नव्हते.

जेवणाची भांडी तशीच विखरून पडली होती.. आणि बाजूला एक बिस्कीटचा पुडा..

कजरीला त्या अवस्थेत पाहून शारदा गहिवरली.
बाहेरच्या लोकांची चीड आली तिला…

" कजरी.. कजरी.. "

तिनं हलवलं.
ती काही प्रतिसाद देईना.

कुणाच्या मदतीची अपेक्षा नव्हतीच तिला.

तिनंचं आपल्या दोन्ही हातावर कजरीला पकडलं आणि बाहेर आली.

"कजरी ss "

सावित्रीनं मोठ्याने हंबरडा फोडला.

" मूर्सेनाल.. काय झालंय हिला..? "

ती जवळ येत म्हणाली.

" अगं.. शिवू नकोस हिला.
विटाळ होईल. "
शारदा उपरोधाने बोलली.

तशी सावित्री खरंच दोन पावलं मागे सरली.

तिनं डोळे मिटले. त्या मिटल्या डोळ्यासमोर तिची उडया मारत खेळणारी बागडणारी कजरी होती.

रानात… गवताच्या आड लपलेली कजरी दोन क्षण दिसली नाही तर जीव कसा वरखाली झाला होता तिचा.


कुरमा म्हणजे काय हे माहित नसताना इथं यायला बघणारी कजरी.. आणि आता त्याच कुराम्यातून मरणासन्न अवस्थेत बाहेर आलेली कजरी..


तिनं खाडकन डोळे उघडले..


" नाही मुर्सेनाल.. जे होईल ते होऊ दे पण मला माझी कजरी पाहिजे.. "

तिला कवटाळून ती रडायला लागली.
" सावे.., येडी आहेस का..सगळ्या वस्तीला विटाळ होईल. "

गर्दीतून तिचा नवरा म्हणाला.


"होऊ दे विटाळ..
पण मला लेक पाहिजे माझी.."

ती नवऱ्यावर ओरडली..


पहिल्यांदा.


" हिला डॉक्टरकडे न्यावं लागेल सावित्री ताई.. चल लवकर."

गर्दीतून वाट काढत दोघीं बाहेर पडल्या.
गाडीवर बसवून शारदाने तिला शहरातल्या डॉक्टरकडे नेलं.

डॉक्टरनी सलाईन लावल्या…

रक्तस्त्राव बंद होण्याचं इंजेक्शन दिलं...

दोन तासांनी ती कोमेजलेली कळी फुलली थोडीशी .

आता तिला बरं वाटत होतं.



त्या निघाल्या.

" सावित्रीताई.. पाळी येणं म्हणजे काही अपवित्र नसतं गं.

ती तर देवाची निर्मिती..

मातृत्वाचं वरदान ते..

एका कळीचं फुलात रूपांतर होतानाची ही प्रक्रिया..

तिचा विटाळ कसा होईल अगं..?

ह्या दिवसात मुलींना चांगलं पौष्टिक खायला घालावं.

वापरण्यासाठी दिलेला कपडा उन्हात सुकवलेला आणि स्वच्छ असावा..

आत्ताच तिला आपल्या माणसांची गरज असते गं.

असं घरापासून लांब वस्तीबाहेर का ठेवायचं आपल्याच मुलीला… "


शारदा तिला समजावत होती..

तिला किती पटलं काय माहित..

कुरुमाजवळ गाडी थांबवायला लावली .

शारदाने गाडी तर थांबवली..


पण मनात आलं..
एवढं सांगूनही पालथ्या घड्यावर पाणीचं..


सावित्री कुरुमाजवळ जावून उभी राहिली..

मनात तिनं मोठयादेवाला माफी मागितली आणि वेड्यासारखी त्या झोपडीवर तुटून पडली..


पाहता पाहता ते कुरुमाघार नष्ट केलं.

येणारे जाणारे बघत होते..

" सावीला वेड लागलं…"

वाऱ्यासारखी वस्तीवर बातमी पसरली.
अख्खी वस्ती गोळा झाली ..

" सावित्री.. देवाचा रोष ओढावू नकोस.. "


गावातील जोगतीणीनं खडसावलं.


" ह्यापुढे नाही राहणार कोणी हितं... "

तीही निर्धारानं म्हणाली.


...आणि फडापेन (मोठादेव ) नाही कोपणार ..

मी शिवलं कजरीला..

..मूर्सेनाल नं शिवलं अनं त्या डाक्टरीन बाईनंही…
कोणालाच काही नाही झालं.

आज माझी लेक हितं मरता मरता वाचली..
उदया तुमची लेक असेल..

..बायांनो..

लेकीबाळीनां ह्या दिवसात घरीच ठेवा.. आपल्या हक्काच्या माणसांजवळ! "

ती हात जोडून उभी होती..

गर्दीतील कितींना पटलं माहित नाही..
पण तिला विरोध करायला कोणीच पुढं आलं नाही.


शारदा भरल्या डोळ्यांनी हे बघत होती…


कजरीनं आनंदाने आपल्या यालची पापी घेतली.. आणि घराकडे निघाली.


सावित्रीला मात्र दोन वर्षांपूर्वीचीच कजरी दिसत होती..
शेळयांच्या मागे उड्या मारत धावणारी…!


** समाप्त **

कुरमा किंवा कुरमाघर ही एक प्रथा आहे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावातली.
मासिक पाळी म्हणजे विटाळ.. अपवित्र..
ते टाळण्यासाठी वस्तीबाहेर उभारलेल्या झोपडीत म्हणजे कुरम्यात स्त्रियांना राहावं लागतं ते चार दिवस.
तिथे ना पुरेसा प्रकाश असतो ना कसली सोय.
त्या अंधारात त्या कुबट वासात ते चार दिवस काढायचे.
कधी विंचू सापाची भीती तर कधी अतिस्त्रावानं मृत्यू..
पण तक्रार करायची नाही.

ह्या प्रथेविषयी आवाज उठवायचं म्हणून ही छोटीशी कथा.
हे फक्त गावातच घडतं असं नाही..
शहरात.. आपल्या शेजारी पाजारी.. कदाचित आपल्या घरीही हे घडत असेल.
हां.. कदाचित कुरमा नसेल ही..!
पण खरंच या दिवसात स्त्रीला वेगळे ठेवणं आवश्यक आहे का? हा जळजळीत प्रश्न उरतोच.
ही कथा वाचून शंभरपैकी एकाची मानसिकता बदलली तरी माझ्या लेखणीची सार्थकता..!

ह्या कथेची नायिका आहे कजरी..
वयात आल्यावर तिनंच सगळं भोगलं.
ह्या कथेची नायिका आहे शारदा..
कारण कुरमाघराची प्रथा आणि विटाळ दोन्ही चुकीचं हे तिनं पटवून दिलं..

पण ह्या कथेची खरी नायिका म्हणजे.. सावित्री..

प्रथा परंपरेच्या विळख्यात अडकूनही तिनं बदलाची सुरुवात केली.. स्वतःच्या घरापासून..!

जिच्या हाती पाळण्याची दोरी! ती जगाते उद्धारी!!

ह्या महात्मा फुलेंच्या विचारांना जागली ती..
***************

डॉ. वृंदा फुलकर.
9420446116