कजरी. भाग -४(अंतिम भाग.)

कथा एका कोवळ्या कळीची

कजरी.

भाग - चार. (अंतिम)


"कजरीऽऽ" सावित्रीने मोठ्याने हंबरडा फोडला. "मूर्सेनाल, काय झालंय हिला?" तिने जवळ येत विचारले.


"अगं.. शिवू नकोस हिला. विटाळ होईल." शारदा उपरोधाने बोलली.


तशी सावित्री खरंच दोन पावलं मागे सरली. तिनं डोळे मिटले. त्या मिटल्या डोळ्यासमोर तिची उडया मारत खेळणारी बागडणारी कजरी होती.

रानात, गवताच्या आड लपलेली कजरी दोन क्षण दिसली नाही तर जीव कसा वरखाली झाला होता तिचा.

कुरमा म्हणजे काय हे माहित नसताना इथं यायला बघणारी कजरी आणि आता त्याच कुराम्यातून मरणासन्न अवस्थेत बाहेर आलेली कजरी.

तिने खाडकन डोळे उघडले. "नाही मुर्सेनाल. जे होईल ते होऊ दे पण मला माझी कजरी पाहिजे." तिला कवटाळून ती रडायला लागली.


"सावे, येडी आहेस का. सगळ्या वस्तीला विटाळ होईल." गर्दीतून तिचा नवरा म्हणाला.


"होऊ दे विटाळ. पण मला लेक पाहिजे माझी." ती पहिल्यांदा नवऱ्यावर ओरडली.


"हिला डॉक्टरकडे न्यावं लागेल सावित्री ताई. चल लवकर."


गर्दीतून वाट काढत दोघी बाहेर पडल्या. गाडीवर बसवून शारदाने तिला शहरातल्या डॉक्टरकडे नेले.डॉक्टरनी सलाईन लावल्या. रक्तस्त्राव कमी होण्याचे इंजेक्शन दिले. दोन तासांनी ती कोमेजलेली कळी फुलली थोडीशी.

आता तिला बरे वाटत होते. त्या घराकडे निघाल्या.


"सावित्रीताई, पाळी येणं म्हणजे काही अपवित्र नसतं गं. ती तर देवाची निर्मिती. मातृत्वाचं वरदान ते. एका कळीचे फुलात रूपांतर होतानाची ही प्रक्रिया. तिचा विटाळ कसा होईल अगं?ह्या दिवसात मुलींना चांगलं पौष्टिक खायला घालावं. वापरण्यासाठी दिलेला कपडा उन्हात सुकवलेला आणि स्वच्छ असावा. आत्ताच तिला आपल्या माणसांची गरज असते गं. असं घरापासून लांब वस्तीबाहेर का ठेवायचं आपल्याच मुलीला?" शारदा तिला समजावत होती.


तिला किती पटलं काय माहित, तिने कुरुमाजवळ गाडी थांबवायला लावली. शारदाने गाडी तर थांबवली, पण मनात आले. एवढं सांगूनही पालथ्या घड्यावर पाणीचं.


सावित्री कुरुमाजवळ जावून उभी राहिली. मनात तिने मोठयादेवाला माफी मागितली आणि वेड्यासारखी त्या झोपडीवर तुटून पडली. पाहता पाहता ते कुरुमाघार नष्ट केले. येणारे जाणारे बघत होते.


"सावीला वेड लागलं." वाऱ्यासारखी वस्तीवर बातमी पसरली. अख्खी वस्ती गोळा झाली.


"सावित्री, देवाचा रोष ओढावू नकोस." गावातील जोगतीणीने खडसावले.


"ह्यापुढे नाही राहणार कोणी हितं." तीही निर्धारानं म्हणाली.

"आणि फडापेन (मोठादेव ) नाही कोपणार. मी शिवलं कजरीला, मूर्सेनालनं शिवलं अनं त्या डाक्टरीन बाईनंही. कोणालाच काही नाही झालं.

आज माझी लेक हितं मरता मरता वाचली. उद्या तुमची लेक असेल. बायांनो लेकीबाळीना ह्या दिवसात घरीच ठेवा. आपल्या हक्काच्या माणसांजवळ!" ती हात जोडून उभी होती.


गर्दीतील कितींना हे पटलं माहित नाही. पण तिला विरोध करायला कोणीच पुढे आलं नाही. शारदा भरल्या डोळ्यांनी हे बघत होती.


कजरीने आनंदाने आपल्या यालची पापी घेतली आणि घराकडे निघाली. सावित्रीला मात्र दोन वर्षांपूर्वीचीच कजरी दिसत होती..शेळयांच्या मागे उड्या मारत धावणारी!


        ** समाप्त **

©®Dr. Vrunda F. ( वसुंधरा..)

कुरमा किंवा कुरमाघर ही एक प्रथा आहे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहूल गावातली.

मासिक पाळी म्हणजे विटाळ. अपवित्र. ते टाळण्यासाठी वस्तीबाहेर उभारलेल्या झोपडीत म्हणजे कुरम्यात स्त्रियांना राहावं लागतं ते चार दिवस. तिथे ना पुरेसा प्रकाश असतो ना कसली सोय. त्या अंधारात त्या कुबट वासात ते चार दिवस काढायचे. कधी विंचू सापाची भीती तर कधी अतिस्त्रावानं मृत्यू..पण तक्रार करायची नाही.

आताशा काही कुरमाघरामध्ये थोडया सुविधा आढळून येत आहेत. पण पूर्वी तसे नव्हते.

हे फक्त गावातच घडतं असं नाही. शहरात, आपल्या शेजारी पाजारी.. कदाचित आपल्या घरीही हे घडत असेल. हां, कदाचित कुरमा नसेलही पण खरंच या दिवसात स्त्रीला वेगळे ठेवणं आवश्यक आहे का? हा जळजळीत प्रश्न उरतोच.

ही कथा वाचून शंभरपैकी एकाची मानसिकता बदलली तरी माझ्या लेखणीची सार्थकता!


ह्या कथेची नायिका आहे कजरी. वयात आल्यावर तिनंच तर सगळं भोगलं.

ह्या कथेची नायिका आहे शारदा. कारण कुरमाघराची प्रथा आणि विटाळ दोन्ही चुकीचं हे तिने पटवून दिले.

पण ह्या कथेची खरी नायिका म्हणजे.. सावित्री.

प्रथा परंपरेच्या विळख्यात अडकूनही तिनं बदलाची सुरुवात केली.. स्वतःच्या घरापासून. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी!' ह्या महात्मा फुलेंच्या विचारांना जागली ती.

    ***************

©®Dr.Vrunda F.(वसुंधरा..) (सत्यकथेवर आधारित.)


🎭 Series Post

View all