कजरी. भाग -३

कथा एका कोवळ्या कळीची.

कजरी.

भाग -तीन.


सकाळी उठली तर रक्ताने पूर्ण माखली होती. मागच्या महिन्यात असं झालं तर याल किती आनंदी होती. नवे कपडे, खाऊ, भेटवस्तू..सगळं कसं हवंस वाटत होतं.

आणि आता यालनंचं तिला इथं पाठवलं.. तिच्यापासून दूर.

शरीरातील बदलांना अजून स्वीकारू न शकलेली ती, रडायलाच लागली.

"मोठी झाल्यावर होतं असं. मग चार दिवस इथं येऊन राहायचं. कुरमाघर म्हणतात याला. चार दिवसाचं हेच आपलं घर.." तिथली एक सांगत होती.


"आपल्या घरी का नाही राहायचं?" ती रडत रडत विचारत होती.


"कारण हे चार दिवस अपवित्र असतो आपण."

ती गोंधळली. ती काय बोलतेय ह्याचा अर्थ नाही समजला कजरीला. तिला आठवले, आपली याल देखील अशीच महिन्याचे चार दिवस घरी नसते.

'लहानच असते तर किती बरं झालं असतं? उगाच मोठी झाले मी.' तिच्या मनात आले.


सहाव्या दिवशी ती परतली. सावित्रीने अंगावर गोमूत्र शिंपडून तिला आत घेतले. आणि.. पुन्हा पंधरा दिवसांनी तिला कुरमा मध्ये जावे लागले.


मागचे सहा दिवस कजरी शाळेत नव्हती, तेव्हा काय झालं असेल ते शारदा समजली. पण पुन्हा पंधरा दिवसांनी गैरहजर राहिली तशी ती तिच्या घरी गेली.


"मूर्सेनाल, इमा?" (मॅडम, तुम्ही?)


शारदा हसली. "सावित्री ताई कजरी कुठे आहे?"


"कुरमा मध्ये." ती म्हणाली.


"अगं पंधरा दिवसापूर्वीच तर गेली होती."


"हो मॅडमजी. पण पुन्हा सुरु झालं तर काय करणार. दिली पाठवून." सावित्री.


"ह्या दिवसात तिला भेटलीस कधी?"


"विटाळ असतं ते. कसं जाणार?"


"वेडी आहेस का सावित्री ताई तू? अगं बारा तेरा वर्षाची कोवळी पोर सात दिवसापासून तिथे आहे. महिन्यात दोनदा पाळीला झाली आणि तू विटाळचं घेऊन बसलीस?" शारदा तिथून निघाली.


 "मूर्सेनाल, इमा बेके हंतनी?" ("मॅडम, तुम्ही कुठे जाताय?") ती विचारत होती.


"कुरमा." शारदा उत्तरली.


सावित्रीच्या काळजात धस्स झालं. 'आमच्या रीती अन आमच्या परंपरा..! आनं ही मास्तरीण उगा का मधी पडते?'

"मूर्सेनाल, मूर्सेनाल.." हाका देत तिही तिच्या मागोमाग गेली.


कुरमा किंवा कुरमाघार..म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली आदिवासींची झोपडी. मासिक पाळीच्या काळात प्रत्येक स्त्रीने कुराम्यातच राहायचं ही प्रथा आणि एकप्रकारे दंडकंच. त्या काळात त्या स्त्रीला शिवायचं नाही हा जणू अलिखित नियम.

आणि ह्या सर्वाला झुगारून कुरम्याकडे शारदा निघाली..


"कजरी, कजरीऽ" तिने बाहेरूनच साद घातली. काहीच प्रतिसाद येईना तेव्हा झोपडीत जायला निघाली.


"ओ मड्डम, काय करताय?" तिथून जाणाऱ्या एकाने हटकले.

लोकं गोळा झाली.


शारदाने कुरम्याच्या आत पाऊल टाकले. तिथल दृश्य बघून अंगावर काटाच आला तिच्या.

ओलसर.. कुबट वासाची ती अंधारी खोली. खाली जमिनीवरच अंथरलेल्या चादरीवर कजरी निजली होती, रक्ताच्या सड्यात. अती रक्तस्त्रावमुळं किती कापडं बदलवणार? आणि कुठले? सोबत होती ती कापडं अजूनही ओलीच होती.


ती ओली..

तिची चादर ओली..

आणि ती जमीनही ओलीच!

अती रक्तस्त्राव आणि पोटातील वेदना. दोन दिवसांपासून बिचारीने काही खाल्लेही नव्हते. जेवणाची भांडी तशीच विखरून पडली होती. आणि बाजूला एक बिस्कीटचा पुडा.

कजरीला त्या अवस्थेत पाहून शारदा गहिवरली. बाहेरच्या लोकांची चीड आली तिला.


"कजरी, कजरी.." तिने हलवलं. ती काही प्रतिसाद देईना. कुणाच्या मदतीची अपेक्षा नव्हतीच तिला.

तिनेच आपल्या दोन्ही हातावर कजरीला पकडले आणि बाहेर आली.

"कजरीऽऽ" सावित्रीने मोठ्याने हंबरडा फोडला. "मूर्सेनाल, काय झालंय हिला?" तिने जवळ येत विचारले.

काय झाले कजरीला? वाचा पुढील अंतिम भागात.

:

क्रमश:

©®Dr.Vrunda F. (वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all