कजरी. भाग -२

कथा एका कोवळ्या कळीची

कजरी.

भाग -दोन.


"वा गं! मस्त नाव आहे. डोळे किती सुंदर आहेत गं तुझे? मला आवडलीस तू. आणि तुझे काजळी डोळेसुद्धा."


"निवा बती परोल मंदा?" हसून कजरीनेही तिला विचारले.


"नावा शारदा. (मी शारदा.) इथल्या शाळेतील नवी शिक्षिका. तू जातेस शाळेत?" शारदाने विचारले.

कजरीने नकारार्थी मान हलवली.

"का गं?"

"मला नाय आवडत शाळा. मास्तर मारतात तिथले. आणि माझी याल कुठं गेलती शाळेत?" आपले काजळी डोळे शारदावर रोखत ती म्हणाली.


"मी नाही मारणार. येशील?"


शारदा तिला आवडली.

"याल, मी जाऊ शाळेला? ह्या बाई मारणार नाही म्हणत्यात."

कजरी विचारत होती. सवित्रीनं होकार भरला. आणि आता कजरी शाळेत जायला लागली.


वर्षे सरली. दिवसामागून कजरीचं शरीर आकार घ्यायला लागले. आणि एक दिवस न्हाणीघरातून तिची किंकाळी बाहेर आली.


"कजरीऽऽ काय झालं?" सावित्री धावत तिकडे गेली.


"याल, नंतूर! (आई, रक्त!) मला रगत येत हाये." रडत रडत ती बोलत होती. तिच्या पोटात पण दुखायला लागले होते.

न्हाणीघरात येऊन सावित्रीने पाहिले आणि ती जे समजायचे ते समजली. हसून तिने कजरीला डोक्यावरून आंघोळ घातली.क जरीला समजेना, मला त्रास होतोय अनं याल का एवढी आनंदी?


"आवं, ऐकता का? शहरात जावून कजरीसाठी नवा कपडा आणाल आनं बांगडया, टिकल्या.." तिची यादी संपत नव्हती.

ती नवऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजली. तोही लगबगीने शहरात गेला.


सायंकाळी कजरीच्या दारासमोर मांडव टाकला होता. कजरीच्या अंगावर नवा ड्रेस, दागिने, हातात बांगडया आणिक काय काय होतं.


यालने तिला ओवाळले अनं हातावर एक दागिना ठेवला. गावातील बायकांनीही तिच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. ह्या सगळ्याचा अर्थ तिला उमगेना. पण मनोमन ती सुखावली. पोटात त्रास होताच. रक्तही येत होतं. तरी अचानक मिळालेल्या नव्या वस्तूंनी ती आनंदली होती.


"कजरी, मोठी झालीस की गं तू." यालने तिच्या गालावरून हात फिरवून बोटं मोडली.

कालच्या एवढीच तर आहे मी नी आज अचानक मोठी कशी झाले याचा कजरीला अंदाज येईना.

ती शाळेत आली नाही म्हणून शारदा तिच्या घरी आली.

"घरी कसला कार्यक्रम आहे का?" अंगणातला मांडव पाहून तिने विचारले.

तिच्या हातावर गोडाचं ठेवत सावित्री हळूच म्हणाली. "मूर्सेनाल,(मॅडम ) कजरी मोठी झालीय आज. आता पाच सहा दिवस काही येणार नाही शाळेला."


"तिला कळतोय याचा अर्थ?" शारदाने विचारले.


"त्यात काय कळायचं? काही दिवसांनी आपोआपच कळंल."

कजरीला कळत तर काही नव्हतं. पण आवडत मात्र सारं होतं.


******


"आय एवढं रगत का येतंय मला?" दुसऱ्या महिन्यातही तेच, म्हणून कजरी विचारत होती.


"बाय गं आंघोळ कर नी चल माझ्यासंग." तिच्या कुठल्याच प्रश्नांना योग्य उत्तर न देता ती कजरीला घेऊन गेली.


त्याच ठिकाणी, गाववेशीपासच्या झोपडीजवळ.

"याल हितं का आणलंस मला?" ती विचारत होती.

"कजरी, आता पुढचे पाच सहा दिवस इथेच राहायचे.या पिशवीमधी कापडं, गोधडी आणि धान्य आहे. खायचं आणि इथंचं झोपायचं." सावित्री तिथून निघून गेली.


ज्या झोपडीचे लहानपणी कुतूहल वाटत होते तिथे कजरी आज प्रवेशली होती. कुबट वास..दुसऱ्या दोन बायकांचे वाळत घातलेले ओलसर कपडे.

पोटातील दुखणे वेगळेच पण तिथल्या वातावरणाने तिला गळल्यासारखं वाटायला लागलं. रात्री झोपली कशीबशी.

सकाळी उठली तर रक्ताने पूर्ण माखली होती. मागच्या महिन्यात असं झालं तर याल किती आनंदी होती. नवे कपडे, खाऊ, भेटवस्तू..सगळं कसं हवंस वाटत होतं. आणि आता यालनंचं तिला इथं पाठवलं.. तिच्यापासून दूर.


कुठे आणून ठेवलंय सावित्रीने कजरीला? वाचा पुढील भागात.

:

क्रमश:

©®Dr.Vrunda F. (वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.



🎭 Series Post

View all