जी एं ची काजळमाया - एक गूढ वाचन प्रवास

Critical analysis of tbe book Kajalmaya


स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी !

विषय - वाचाल तर वाचाल- पुस्तक समिक्षा

शीर्षक - काजळमाया- एक गूढ वाचन प्रवास
लेखक - जी. ए. कुलकर्णी
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

लेख - स्वाती बालूरकर , सखी


काजळमाया - एक गूढ वाचन प्रवास

पुस्तकाचं रसग्रहण किंवा अर्थग्रहण व समीक्षा करण्यासाठी ती पुस्तकं खूप शांतपणे वाचावी लागतात. काही पुस्तकं अशीच प्रवासात किंवा थोडी थोडी वाचलेली असतात ती आतपर्यंत पोहोचत नाहीत असा माझं अनुभव आहे.
वाचन हा जरी छंद असला तरीही यादरम्यान डिजीटल वाचनच जास्त होतंय.
भारावल्यासारखे तर ते दिवस होते १९८९ -९४ दहावी ते ग्रॅजुएशनपर्यंतचे जेव्हा बैठक लावून पानीपत , युगंधर , छावा , स्वामी , ययाती, नाचगं घुमा , सांगते ऐका , उपरा अशी खूप पुस्तकं वाचली. सुमती क्षेत्रमाडे, दुर्गाबाई ,पुलं, आणि अनंत तिबिले यांची खूप पुस्तकं वाचली. त्याचं रसग्रहण करणं सुचलं नाही कधी. मराठीचे शिक्षक स्वतः चांगले वाचक  होते त्यामुळे ते पुस्तकांची नावे  सुचवायचे.


मग वपु नावाने मनावर जे गारूड केलं ते मात्र कायमच राहिलं ,आजतागायत उतरलं नाही. वपूंच्या काही पुस्तकांची तर २-३ वेळा वाचन -यात्रा झालीय.  वपु नेहमीसाठी आवडते लेखक  झाले.


महत्वाचं वाचन म्हणजे त्यावेळी दरवर्षी येणार्‍या दिवाळी अंकातल्या कथा.


१९९३-९४ मधे ( २० व्या वर्षी )मात्र मी प्रत्येक कथा वाचली की त्याबद्दल लिहून ठेवायला सुरूवात केली होती. त्यामुळे एक वैचारिक पातळी वाढली होती.


पण १९९४ पासून २५-२६ वर्षे मराठी वाचन कमी झालं , म्हणजे परप्रांतातगेल्याने किंवा प्राथमिकता बदलल्याने  बंदच झालं म्हणाना. 

एक हिन्दी शिक्षिका म्हणून  करीयर निवडलं व ते इंग्रजी माध्यामाच्या शाळेत त्यामुळे स्वयं विकासा साठी हिन्दी व इंग्रजीचं विपुल वाचन झालं.


तर मुद्दा असा की प्रसिद्ध लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्याबद्दल आमचे  शाळेतले  शिक्षक सांगायचे की ते खूप अवघड लिहितात , भाषा जड असते, पचायला कठिण असतं वगैरे वगैरे. म्हणजे त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आणि त्यांच्या लिखाणाबद्दल खूप वाचलं पण त्यांचं मूळ लिखाण मात्र वाचलं नव्हतं .


मग ठरवून एकेक कथासंग्रह  कुठूनही मिळवून वाचायला सुरूवात केली.

पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन पण थोडं वाचलं की ते डोक्यावरून जायला लागलं.


मग काजळमाया कथासंग्रह तर वाचायचाच असं ठरवलं आणि तो कॉलेजातल्या ग्रंथालयातून मिळवला.
मग तो शांत निवांत व पचवत वाचला. माझ्या बुद्धिच्या मानाने किती आकलन झालं ते सांगणं कठिण . . . पण खूप सुंदर अनुभव होता.

त्यातली "अंजन "कथा सर्वात गाजलेली आहे.

मुळात जी.एं.ची भाषा वाचताना आपला म्हणजे  वाचकांचा  कस लागतो अन शेवटी प्रत्येक कथा एक हुरहुर लावून जाते ही त्यांची विशेषता.

प्रत्येक कथेचा शेवट हा अनपेक्षित होतो आणि वाचक थक्क राहून जातो. काही आकलनीय तर काही अनाकलनीय !

त्यातल्या दोन कथांबद्दल मला काय वाटलं ते मी लिहीत आहे.

पहिली कथा- प्रदक्षिणा

एका पात्राला केंद्रस्थानी कल्पून त्याच्याभोवती नात्यांचे सुटसुटीत धागे विणायचे आणि जेव्हा हे नाते दुरावण्याची वेळ येते तेव्हा ती नाती इतक्या गुंतागुंतीची व अविश्वसनीय होऊन जातात की आपण संभ्रमित होतो.

 
शांताक्काच्या मनाची कल्पना करवत नाही.
पतीला थोर माणूस समजून , त्याच्या सोबत तीस वर्षे राहूनही, तो गेल्यावर त्याच्याबद्दल जे काही सत्य उमगतं त्यानंतर तीस वर्षांचा तो मानसिक डोलारा ढासळतो आणि ज्या बहिणीला आयुष्यभर वेंधळी समजत राहिली ती कुंकवाची भागीदारीण होती हे कळतं  ,ते  किती मोठं दुर्दैव ! पोटच्या सख्या मुलाकडूनच शांताक्काला गलिच्छ आरोप व चारित्र्यावर शिंतोडे उडवून घ्यावे लागतात आणि तिला स्वतःचं पातिव्रत्य पटवून देता येवू नये ही विडंबना !
ज्या दिराला आयुष्य भर गुन्हेगार समजत राहीली त्या दिराने जाताजाता खर्‍या गुन्हेगाराचं नाव सांगावं . . . आणि ते अविश्वसनीय वाटावं आणि मग सगळंच असह्य होत जावं असं काहीसं घडतं!.


ज्या माणसाला सगळेजण महान मानतात त्या नवर्‍याने स्वतःच्या लग्नाच्या बायकोसाठी फुटकी कवडीही मागे ठेवू नये, हे किती त्रासदायक !


तोच माणूस किती ढोंगी , बहुरूपी, स्वार्थी, दुटप्पी होता हे त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या माघारी कळावं ही पण असहाय्य गोष्ट!


शुन्यातून निघून,  पुन्हा शून्यातच मिळून,  शून्य बनून राहण्याची जाणीव. . . . म्हणजे जिथून सुरूवात केली,  तिथेच शेवटी येवून राहण्याचं दुर्भाग्य नशीबी असावं . . . म्हणजेच एक प्रदक्षिणा पूर्ण झाली . . .असं काहीसं आकलन माझ्या लघुबुद्धिला झालं.


आता २० वर्षानंतर पुन्हा हे पुस्तक वाचण्याची इच्छा आहे,  वाचेन तेव्हा प्रत्येक कथा कदाचित मला नव्याने कळेल असं वाटतंय.

यासंग्रहातली पुढची एक गूढगम्य कथा म्हणजे "ठिपका".


एका ठिपक्याच्या हव्यासापायी व मंदिरासाठी  शामण्णा ची अनाकलनीय धडपड व  अशाश्वत प्रयत्न, त्याचाच विचित्र झालेला अंत व त्या प्रवासादरम्यान घडलेल्या त्या घटना. . . . वर्णनातीत आहेत. . . तो साधू , ते भाकित मग कवट्यांचा खेळ आणि राख. . . म्हणजे कळतं पण कळत नाही अशी गूढ रहस्य मयी कथा म्हणजे ठिपका!

याच संग्रहातील काही अन्य कथा ,  स्वप्न , कळसुत्र, पुनरपि, भोवरा, शेवटचे हिरवे पान, दूत, वंश,  गुलाम , रत्न , कसाब  !

सगळ्याच   एकापेक्षा एक गूढ व सुंदर. 

अशा कथांसाठी वाचावा असा कथासंग्रह!


गूढ व रहस्य कथा आवडणारांनी अवश्य वाचावं असं पुस्तक- काजळमाया!

सध्या इतकंच, पुन्हा भेटूयात पुढील लेखनात.

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - २३ .१०. २२