कहो किनारे भी कभी मिलतें है?

Just romantic feeling


आज काही कामानिमित्त ती तिच्या जुन्या शहरात आली.
चिंतामणी नगरात मैत्रिणीच्या घरी उतरली व पटापट आवरून निघाली.
काम आटपलं अन अचानक त्याचा विचार मनात चमकून गेला.
पण यावेळी ठरवलं होतं त्याला कळवायचं नाही , कळलं तर तो भेटण्याचा हट्ट करणार आणि यावेळी तिच्याकडे पुरेसा वेळही नव्हता. रात्रीच्या गाडीने परत जायचं होतं

त्यामुळे "आलेय पण वेळ नव्हता सांगून, न भेटण्यापेक्षा ,न कळवलेलं बरं!" असा विचार करून तिने निर्णय पक्का केला आणि त्याला कळवलंच नाही.

संध्याकाळी 4- 5 वाजेच्या आसपास तिचं काम संपलं आणि ती परत आपल्या मैत्रिणीकडे आली.

फ्रेश झाली , चहाचा घोट घेताना सहजच त्याचा विचार मनात आला आणि काय आश्चर्य त्याचवेळी त्याचा फोन वाजला .

पहिली रिअॅक्शन - त्याला कुठून कळलं की मी आलेय ?

दुसरा विचार - त्यांनी मला कुठेतरी पाहिलंय आज!

विचार करत तिने कॉल उचलला-

" हॅलो बोल?"

"कशी आहेस?

" मी मजेतच आणि तू ?

"मी पण मजेतच!"

" अजून काय विशेष?"

"कुठे आहेस?"

काय सांगावं तिला वाटलं .

"तुझ्या शहरात ! आणि तू ?"

" चिंतामणी चौकात गाडी घेऊन उभा आहे बघ!"

ती एक क्षण चरकलीच.

तो येतोय की आलेला आहे ?

ती उठून बाल्कनीत गेली. चौकात नजर फिरवली. त्याची गाडी दिसली नाही.

"कुठेस रे?"

"तू बाल्कनीत जाऊन पाहिलंस की काय ? मजा आली ना ! "

"मी तुझ्या शहरात आले वाटलं का ? अशी गंमत करतोस."

" नाही गं राणी , तू खोटं कशाला बोलशील? तू आली असतीस तर मला नक्की कळवलं असतंस ना !"

" पण मी खरच आलेय रे इथे. . !"

"तू मस्करी करतेस, तर मी नाही करू शकत का ! आता बोल कुठे आहेस?"

"खरं सांगू का ? मला तुझ्याशी खोटं बोलता येत नाही. . आणि खोटं बोलले तर जास्त वेळ लपवता ही येत नाही."

"बोल आता ! काय खरं सांगायचं तुला ? हेच की तुझं माझ्यावर प्रेम नाही ?"

" अरे यार प्लीज प्रत्येक वेळी हेच काय बोलतोस?”

“आपले ठरले होते नाही का ! पुन्हा ती चूक करतो . गंमत केली, बोल ना.”

“अरे मी खरंच इथे आलेली आहे . भेटणे शक्य होणार नाही, वेळच नाही, मग मी तुला कळवलं नाही .”

“मला भेटायच नव्ह्तं की मला सांगायचं नव्हतं?”

“तसं नाही मी ठरवलं होतं की वेळ नाहीय तर कळवायचं नाही. . . पण तुझा फोन आला.”


" बघ बरं तुला मी जे नेहमी म्हणतो की आपलं खूप सुंदर कनेक्शन आहे,टेलीपथी की अजुन काही , तुझा विश्वास नसतो”

“नाही रे मला या सगळ्यात नाही पडायचे आता,

"मलाही पडायचं नव्हतं पण मी ठरवून करू शकतोय का हे ? कितीदा बोलणं झालय आपलं"

"मला नाही वाटत असं सगळं जे तुला वाटतं."
"मान्य! त्या गोष्टीला मी कधीच मान्य केलंय . हट्ट नाही पण मला जे वाटतं ते वाटतं, त्यात मला काही चूक वाटत नाही"

“पण जाऊ दे न नकोच आज . . आपली भेट होणार नाही."

" का गं काय झालं ?"

"म्हणजे तू ज्या अपेक्षेने मला भेटतोस तशी मी तुला कधीच भेटत नाही. "

"ते मला माहिती आहे , पण तू भेटतेस तरी !"

"माझं माझ्या नवर्‍यावर खूप प्रेम आहे."

"असणारच ना! माझ्या बायकोचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मला माहित आहे. तुझा एक नवरा आहे, तुझ्यासोबत तो कसा आहे, त्याने मला काही फरक पडत नाही"
"पण हे सगळं?"
"तुझाही त्याच्यावर खूप जीव आहे ,माझंही तसंच आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला ते असो की नसो मला काही फरक पडत नाही."

"अरे पण तू त्याला कधीच पाहिलं नाहीस तरीही. . "

"मला माहित आहे सगळं. . कळतं तुझ्या देहबोलीतून . .

"मी तुला भेटते तेव्हा फक्त शारीरिक आकर्षण असतं का रे तुला ?"

"तुला नाराज करू नये तर माझं मन नाराज होतं पण भेटावं वाट तंच तुला!"

"तशी ओढ नाही रे मला तुझी. . जशी तुला माझी आहे . .

"माहित आहे, सगळं माहित आहे. हॅपी जर्नी , गाडी किती वाजता आहे?"
"रात्री ९ ला! थँक्यू . बाय . ठेवते फोन."

पावणे नऊला ती बोगीजवळ उभी. गाडीत चढण्याच्या तयारीत, अचानक हातातली बॅग हल्की वाटली. त्याने उचलली होती.
त्याने गाडीत बसवलं. बाहेर येवून खिडकीजवळ उभा राहिला.

एक माझा कोल्डड्रिंक ची बाटली , पाण्याची बाटली व अंगूरची कॅरी बैग हातात दिली.
"तुला सगळंच कसं रे कळतं?"
" असू दे गं !" त्याने खिडकी तून तिचा हात हातात घेतला व किस केलं.
"किती दिवस रे हे असं!" तिने हात पटकन आत घेतला.
"असू दे ना, चालू दे. . प्रवाह आहे तोपर्यंत ! तूच लिहिली होतीस ना कॉलेजच्या मॅगझिन मधे. . कविता. . ती दो किनारे! \"दोनों ओर दोनों चलतें है. . कहो किनारे भी कभी मिलते हैं ?\" येतो. काळजी घे!"

गाडी हलली, तो ही निघाला. . .
खरच समांतर असलेला किनारा दूर गेल्यागत वाटलं . . क्षणभर!

\"किनारा दूर गेला की नदीचं पात्र मोठं होतं\"
तिने स्वतःचीच समजूत घातली.
समाप्त

©® स्वाती बालूरकर , सखी
दिनांक - ०४. ०५. २०२२


🎭 Series Post

View all