काहीही ( भाग तिसरा )

नेहमी ओळख दाखवणारी तू अशीच अनोळखी बनून बसून राहिलीस.


काहीही ( भाग तिसरा )

आज ती तू अचानक समोर दिसलीस आणि हे सर्व डोळ्यासमोर आठवून गेलं. माझ्यात खूप बदल झालेला होता. तुझ्यातही खूप बदल झालेले होते. अर्थात हा निसर्गक्रमच होता म्हणा. पण मनात कुठं तरी ईच्छा होती की सगळं जग बदललं तरी चालेल पण तू बदलायला नको. आणि प्रत्यक्षात तशी तू होतीच जशी होती तशी.

तेचं टपोरे पाणीदार डोळे, संगमरवरी त्वचा आणि लांबसडक काळेभोर केस, नाजूक जिवणी आणि मोत्यासारखे चमकदार दात.

मी खूप दिवसांनी गावाला आलो होतो. सगळया जून्या गोष्टी आठवत चाललो होतो आणि अचानक हिरव्यागार सावली सारखी तू समोर आलीस आणि चक्क माझ्याकडे बघून हसलीस.

मी दोन्हीं हात जोडून विचारलं,

" ओळखलंस की नाही मला"

त्या वर तू खट्याळ पणं हसत म्हटलं,

" तुझ्यासारख्या पळपुट्या मुलाला कोण विसरणार बरं"

" मी आणि पळपुटा? " मला काहीच समजेना.

" अरे वेड्या त्या दिवशी परीक्षे नंतर तू जो गायब झालास ते कळलेच नाही. असं पळून जाऊन समस्या सुटत नसतात. " तिने नको ती आठवण काढली. खरं म्हणजे मला ती गोष्ट आठवणं देखील त्रासदायक वाटत होतं. मी आपला उगाचच अंतर्मुख होऊन जून्या गोष्टी आठवत राहिलो. तिच्या या बोलण्यावर काय बोलावं तेच समजत नव्हतं.

" तू तरी कोठं गायब झाली होती ते तरी कोणाला माहिती होतं का ?" मी वातावरण थोडंसं हलक करत म्हणालो.

" माझं काय रे. मी आहे तिथंच आणि आहे तशीच आहे. तुझं सांग. तू काय करतोस. कुठं असतोस. मला सगळं ऐकायचं आहे " ती हट्टाने म्हणाली.

" सगळं सांगतो की. पण असं रस्त्यात उभ राहून कशा काय गप्पा मारायच्या. चल ईथ जवळच हॉटेल आहे. तिथं जाऊन काहीतरी खाऊ आणि खाता खाता गप्पा मारू या. " मी तिला हळूच सुचवलं.

त्या वर ती खळखळ हसत म्हणाली,

" अरे, ईतकं लाजत काय विचारतोस. चल की. मला देखील तुझ्यासोबत हॉटेल मधे यायचं आहे. आणि लोकांचं म्हणशील तर तू देखील छान गुटगुटीत झालेला आहे आणि मी तर छान पोक्त. अगदी राजरोस मैत्रीण म्हणून जरी मला तूझ्या घरी घेऊन गेलास तरी बायको देखील ऑब्जेक्शन घेणारं नाही. "

मग आम्ही दोघंही कधीकाळी ठरवलेल्या त्या हॉटेल मध्ये गेलो.  जेवणं मागवल. भरपूर गप्पा मारल्या. कोणाचा खरं देखील वाटणार नव्हतं की एके काळची ही कॉलेज क्विन आज माझ्या सारख्या साध्या माणसा सोबत गप्पा मारत होती.

कोणे एकेकाळी तिच्याही आयुष्यात प्रचंड वादळ आल होत. पण कोणतीच गोष्ट आयुष्यात कायम राहात नाही. मग ते सूख असो वा दुःख. म्हणून मी ती गोष्ट कटाक्षाने टाळत होतो.

बराच वेळ गप्पा मारल्या नंतर ती मला म्हणाली,

" गावाला परत जायच्या आधी ये ना एकदा घरी. मी वाट बघेल तूझी" आणि जाता जाता तिने पत्त्याचा कागद माझ्या हातात दिला.

दोन दिवसांनी माझं काम आटोपलं. जायच्या आधी वाटलं सहज तिला भेटून जावं. म्हणून त्या पत्त्यावर गेलो.

आणि मी कशासाठी आलो आहे हे सांगितलं. त्या बरोबर तिच्या आईने डोळ्याला पदर लावला. वडील म्हणाले, " काहीही काय सांगता आहात. अहो, दोन वर्षापूर्वीच तिने आत्महत्या केली होती. "

माझं सहज भिंतीवर लक्ष गेलं. तिथं तिचा हसरा फोटो टांगलेला होता आणि अंगावर तीच साडी घातलेली होती. जी काल तिने घातलेली होती.

( समाप्त )

🎭 Series Post

View all