छत्री एक प्रेमकहाणी ( भाग सहा )

हसायला भाग पाडणाऱ्या गोष्टी
छत्री एक प्रेम कहाणी

त्या दिवशी धो धो पाऊस अक्षरशः कोसळत होता. मी कॉलेज सुटल्या वर चहा प्यायला म्हणून कॅन्टीन मध्ये गेलो. तिथं पाहिलं तर सगळ्याच जागा फुल्ल झालेल्या होत्या.फक्त एकच जागा रिकामी होती.आणि तिथं एक मुलगी बसलेली होती.

ती मुलगी खूपच सुंदर होती एव्हढं सांगून मी माझं वर्णन थांबवतो. कारण मी कुठंतरी वाचलं आहे की ज्याचं मन सुंदर असते त्याला सगळं जग सुंदर दिसते. त्या मुळे मला प्रत्येक मुलगी सुंदरच दिसते. स्वभावाचा दोष. त्याला मी तरी काय करणार.

रंग गोरापान, काळे काळे कुरळे केस, काळेकाळे  टप्पोरे टप्पोरे दोन डोळे, दोन कान, कानात प्रत्येकी एक डूल, डुलाला छोटे छोटे लोलक, नाजूक ओठ, ओठांवर दिसेल न दिसेल अशी लिपस्टिक (पण मला दिसली ), सरळ नाक, नाकात रिंग, बस बस जास्त वर्णन करत नाही .माझ्या पेक्षा तुम्हालाच जास्त चांगल्या प्रकारे कल्पना करता येईल. जास्तच माहिती पाहिजे असेल तर साड्यांच्या दुकानात ज्या हात लावला तरी काही करत नाही ना तशी सुंदर दिसणारी ही मुलगी होती. मी मुलींकडे अजिबात बघत नाही. त्या मुळे जास्त सांगता येत नाही.

मी देवळात जातो पण माझा देवावर विश्वास नाही. पण जेंव्हा ती एकटी बसलेली मुलगी आणि एकच शिल्लक असलेली जागा या गोष्टी समोर आल्या आणि मी केंव्हा आस्तिक होवून गेलो हे मलाच समजलं नाही.माझं एक तत्व आहे. मुलगी कितीही सुंदर असली तरी मी हावरटा सारखा लगेच बाजूला जाऊन बसत नाही. ही माझी स्वतःची मर्यादा आहे.  स्वतःने स्वतःवर घालून दिलेली बंधन आहेत. पण कधी कधी तत्वाला मुरड घालावी लागते. मला माझ्या मनाच्या विरुद्ध त्या मुलीसमोर जाऊन बसावं लागलं.

ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आलेली आहे. की मी कितीही शुद्ध विचाराचा असलो तरी लोकं त्यातून वाईटच अर्थ काढतातच काढतात .माझं असं समोर जाऊन बसणं पाहून  दुष्ट आणि वाईट विचारांची काही माणसं म्हणतात की बाजूला बसलेल्या माणसाच्या तोंडाकडे पाहणं हे समोरच्या माणसाकडे पाहण्याएव्हढ सोपं कधीच नसतं. बाजूच्या माणसाचं तोंड पाहायला तुम्हाला शुन्य डिग्री कोनातून मान पूर्ण फिरवून पाहावं लागतं त्या ऐवजी समोरच्या प्रेक्षणीय स्थळा ला समोरून कळत न कळत न्याहाळणं कितीतरी सोप्प असतं. म्हणून मी समोर जाऊन बसतो. असं लोकं म्हणतात. आता मारणाऱ्याचा हात धरता येतो पण  बोलणाऱ्यांची काय तोंड धरता येतात.

आता ती मुलगी, तिच्या मागे खिडकी, खिडकीतुन दिसतं असलेला पाऊस आणि तिच्या समोर असलेली रिकामी जागा हे सगळे मला परमेश्वरी इच्छेचे संकेत वाटले. आताच माझं वय जरी दिसली बाई की काढ पळ असं असलं तरी तेंव्हाच वय मात्र, दिसली बाई की बसलं प्रेम असं भोळं भाबड निरागस वय होतं. स्वभावच माझा असा साधा सरळ आहे. सगळे म्हणतच असतात की यांचं कसं होणार पुढे.

त्या मुळे माझ्या मनात नव्हतं तरी मला तिथं जावं लागलं आणि तरी माझे संस्कार आणि माझा मोठेपणा बघा ना, कॅन्टीन तिची काही खाजगी मालमत्ता नव्हती तरी मी तिला, एक्सक्यूज मी, इथं कोणी येणार आहे का,नाहीतर मी इथं बसलो तर चालेल का असं नम्रपणे विचारलं. त्या वर ती बसा ना असं रुक्षपणे म्हणाली आणि पडणाऱ्या पावसाकडे बघत राहिली.

मी तिच्या समोर बसलो होतो. तिच्या मागे खिडकी होती. मला निसर्ग आणि पाऊस खूप खूप आवडतो हे तुम्हाला सगळ्यांना चांगलेच माहित आहे. त्या मुळे मी तो निसर्गाचा अदभूत चमत्कार,  ते अलौकिक सौन्दर्य(मी पावसा बद्दल बोलतोय ), ते ओघळणारे पाण्याचे एक एक थेंब, सर्वत्र दाटलेला तो कुंद धुंद प्रकाश आणि पावसाचा तो ताशा वाजल्या सारखा आवाज ( मी अचानक कवी झाल्या सारखा बोलायला लागलो होतो की काय ) मी मंत्रमुग्ध झाल्या सारखा ऐकत होतो.मला काय झालं होतं कुणास ठाऊक. सगळ्या पृथ्वीवर मी आणि ती मुलगी असे दोघच आहोत असे चित्रंविचित्र भास मला व्हायला लागले.

मी कॅन्टीन वाल्या पोराला चहाची ऑर्डर दिली आणि तुम्ही
काय घेणार,असं तिला मानवतेच्या दृष्टीकोनातून विचारलं.तसा मी असं कोणाही  येऱ्या गबाळ्याला विचारत नसतो. पण माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही. म्हणून विचारलं. त्या वर तिने उत्तर न देता नुसतं इतक्या जळजळीत नजरेने बघितलं की मला खरोखरच चटका बसला. नंतर कळलं की मी चुकून टेबलवर आलेल्या चहाला न फुंकता तोंड लावलं होतं.मी मुकाट्यानं चहा पिला. नंतर उगाचच टेबलवर ठेका धरतं बसलो होतो.

बाहेर पाऊस धो धो पडतच होता. कॅन्टीन हळूहळू खाली होवून गेलं.बराच वेळ वाट पाहून ती पण उठून जायला लागली. ती उठून गेल्यावर माझा  पण त्या पावसातला इंटरेस्ट पूर्ण संपून गेला. छे छे, काय तो चिखल आणि काय तो वैताग, सगळी कडे ओलं ओलं, त्यात जर डोकं भिजलं तर सर्दी खोकला आणि ते गळणारे नाक आणि चारचौघात येणाऱ्या अपमानास्पद शिंका असे नकारात्मक विचार यायला लागले. का कुणास ठाऊक ती कॅन्टीन मधून उठून गेल्यावर सगळं कॅन्टीन मला ओसाड, भकास, उदास आणि ओकंबोकं वाटायला लागलं. इतकं डिप्रेशन आलं की मला तिथं क्षणभरही थांबू नये असं वाटायला लागलं.  मी पण लगेच तिथून बाहेर पडलो.

बाहेर येवून माझी ती छत्री उघडली.खरं तर मीपण कधी छत्री आणत नाही.पण त्या दिवशी थोडा थोडा पाऊस येत होता म्हणून मी देवळात गेलो होतो.माझ्या नशिबात असं काय लिहिलेलं आहे कुणास ठाऊक. पण मला देवळात गेलं की तीर्थ प्रसाद तर मिळतोच मिळतो. पण बऱ्याच वेळा बरोब्बर मापाची नवीन चप्पल मिळतेच मिळते.  आज एक लेडीज छत्री अशीच बेवारशी पडलेली दिसली.मला माहिती आहे. लोकांचा विचार अजिबात चांगला नसतो. नक्की कोणी ना कोणी ती लांबवली असती.  कोणी दुसऱ्या चोर लफंग्याने उचलून नेऊ नये म्हणून मी ती ताब्यात घेतली.असं काही नाही त्या छत्रीचा मालक किंवा मालकीण आली असती तर मी नक्की परत देवून टाकली असती.  मन शुद्ध असलं की देव सुद्धा साथ देतो. देवाचा प्रसाद म्हणून मी ती छत्री उचलली. कॉलेज ला आलो.

आणि बघा देवाची लीला. आज तीच छत्री कामाला येत होती. मी  बाहेर पाऊल टाकणार तेव्हढ्यात मला तीच मुलगी भिंतीच्या आडोशाला थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहात असलेली दिसली.मला तिला अशा हतबल अवस्थेत पाहणं फारच दुःखदायक वाटायला लागलं. माझं हृदय वेदनेने पिळवटून निघालं.

लोक म्हणतात मी खूप लबाड आहे. म्हाताऱ्या माणसांना मदत करत नाही. नाही आवडत मला. म्हातारीकोतारी माणसं अशी पावसात अडकली तर मला काहीच वाटत नाही, कारण त्यांनी अशा पावसात बाहेर पडायचंच नसतं.ती त्यांची मस्ती असते.  पण अशी एखादी असहाय्य  मुलगी जेंव्हा अडकून पडते आणि तेही एकटी दुकटी असतांना तेंव्हा कोणी काहीही म्हणो मी नेहमीच मदतीला निरपेक्ष पणे धावून जातो. आताही तेच झालं. माझं पाऊल पुढेच पडेना. समजा मी निर्दयपणे या मुलीला एकटं सोडून निघून गेलो तर एकवेळ समाजाचं सोडा पण माझं मन तरी मला क्षमा करेल का असे अनेक चांगले चांगले विचार माझ्या मनात यायला लागले. तिच्या जवळ छत्री नव्हती हे तर उघडंच होतं. ती मला मदत मागत नव्हती हा तिचा मोठेपणा होता. आता मी स्वतः हुन तिला मदत देउ करून माझा मोठेपणा दाखवणं गरजेचं होतं.माणुसकी दाखवण्याची ही अमूल्य संधी दवडू नये असं माझं मन मला सांगत होतं.

मी तिला ओळखत नव्हतो असं म्हणणं पण चुकीचं होतं कारण आताच नाही का तुम्हाला मी सांगितलं की  तिच्या समोरच मी गरम चहा गिळला होता आणि तोंड भाजून घेतलं होतं. असं वाटतं होतं की मी तिला जन्मजन्मां पासून ओळखतो आहे. तेच दोन डोळे, तेच दोन कान, तेच दोन हात सगळं काही तेच आणि तसंच. मग मी सगळ्या देवांना मनातल्या मनात प्रार्थना केली. की, हे माझं मंगल व्हावं म्हणून धो धो पाऊस पाडणाऱ्या सर्व देव देवतांनो मी एका अबला, असहाय्य, निरागस, गोंडस.... मुलीला निरपेक्ष मदत करायला जातं आहे. त्या कार्याला तुमचा आशीर्वाद राहू दया. आणि अशीच सेवा माझ्या हातून घडत राहो असा वर मला दया. काय आहे ना, देव असो वा नसो, प्रार्थनेत शक्ती असते. मग मी इकडं तिकडं बघितलं आणि हळूच तिला म्हणालो,

एक्सक्यूज मी, मी तुम्हाला काही मदत करू शकतो का.माझा आवाज एव्हढा गोड निघू शकतो ह्या वर माझाच विश्वास बसेना. तिलाही त्या आवाजातील मार्दव, गोडवा, काळजी, तळमळ, आपुलकी, विश्वास, सद्भावना जाणवली असावी. ( अजून परत वाचा,  मी त्यात प्रेम शब्द वापरलेला नाही. यावरून माझं शुद्ध मन आणि शुद्ध हेतूची कल्पना यावी ).

बघा ना, कधी थांबणार आहे हा पाऊस देव जाणे. घरी सगळे जण वाट बघत असतील. ती काळजीने त्या पडणाऱ्या पावसा कडे पाहात म्हणाली.

अहो त्यात काय विशेष. मी सोडतो ना तुम्हाला. मी पण तिकडेच राहतो. आहे ना छत्री माझ्याजवळ. कशाला काळजी करता. असं म्हणून मी तिला ती छत्री उघडून दिली.

अरेच्या,  तुमच्या जवळ लेडीज छत्री कशी काय आली. तिने सहज विचारलं.

काही नाही हो, सकाळी माझी छत्री उघडतच नव्हती म्हणून माझ्या बहिणीची घेऊन आलो. मी शुद्ध मनाने भल्या साठी जास्त नाही, थोडंसच खोटं बोललो.

तुम्हाला म्हणून खरं सांगतो, प्रत्यक्षात तिचं घरं माझ्या घरच्या पूर्ण विरुद्ध टोकाला होतं पण तिला उगीचच ऑकवर्ड वाटू नये म्हणून मी खोटं बोललो. एक एक पावलाला मी माझ्या घरापासून दूर दूर चाललो होतो. पण चांगली गोष्ट करतांना थोडं खोटं बोलणं पाप नसतं. हे मला माहित होतं.

अहो पण मला छत्री दिली तर तुमच काय, तुम्ही भिजाल ना.ती काळजीने म्हणाली.

मला वाटलं होतं की ती म्हणेल,  जाऊ या दोघ एकाच छत्रीत. पण नंतर लक्षात आलं की छत्री खरंच खूप छोटी होती.जर दोघ त्यात गेलो असतो तर दोघेही भिजलो असतो. मग काय उपयोग झाला असता आणि छत्री सगळ्या बाजूने उघडी पण असते. उगाच तिचं नाव खराब झालं असतं. माझं नाव खराब झालं असतं.

मला तिच्या विचारांचा मोठेपणा भावला. कसले उत्तुंग विचार करत होती ही मुलगी. माझा, एका अनोळखी मुलाचा, ज्याने आपल्याला छत्री दिली तर तो भिजेल या गोष्टीचा. मी तर तिच्या मनाच्या मोठेपणाने भारावून गेलो. छत्री तिच्या हातात देवून म्हणालो, तुम्ही छत्री घ्या. माझी काळजी करू नका. असंही  मी आज पावसात भिजत जाणारच होतो.

एक गोष्ट खूप विश्वासाने सांगतो, कोणालाच सांगू नका. छत्री देतांना चुकून, शपथ घेऊन सांगतो अगदी चुकून तिच्या हाताला माझा हात लागला. एकदा एका गायीच्या अंगाला नुसतं बोटं लावलं होतं तेंव्हा त्या गाईने सगळं अंग थरथरवलं होतं, बिलकुल तशीच थरथर माझ्या सगळ्या अंगात पसरली. एकदा गिझर मधून पडणाऱ्या पाण्याला हात लावला होता तेंव्हाही असाच झटका लागला होता. पण आपल्या मनात काही नसतं बर काही.

मग ती छत्री घेऊन पुढे आणि मी तिच्या मागे पावसात भिजत भिजत निथळत मागे मी असा प्रवास चालला होता. पाऊस एव्हढा जोरात कोसळत होता की रस्त्यावर पाणी साचायला लागलं होतं. ती चाललीच होती पुढे पुढे आणि मागे मागे मी.

पावसाळ्यात आपोआप शेवाळ जमत, किंवा रस्त्यावर डबकं साचत तशी तिच्या बद्दलची ओल,  आपुलकी, जिव्हाळा निर्माण होतं होता. ती पुढे चालली होती. मी मागे मागे.

थोड्यावेळाने तिचं घरं दिसलं. एक बंगल्या सारखं तीच गावाबाहेर घरं होतं. मला वाटलं आता ती मला आत बोलवणार. आणि म्हणणार,

अगोदर आत या. होवू दया किती पण उशीर. माझ्या साठी किती भिजलात तुम्ही. आधी ते डोकं कोरडं करून घ्या गडे, नाहीतर आजारी पडाल उगीच.असं नाही हं, आता गरम गरम चहा घेतल्या शिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही, आणि मग सगळ्यांशी ओळख करून देईल, बाबा, हेच बर का ते, ज्यांनी तुमच्या भिजलेल्या मुलीला भर पावसात घरी आणून सोडलं.

मग तिचे बाबा म्हणतील, छान आहे हं तुझी आवड, मग ती तुफान लाजत, लटक्या रागाने म्हणेल, इश्श्य, काहीतरीच काय बोलता हो बाबा. अशाने मी तुमच्याशी बोलणारच नाही जा.

असे स्वप्न पाहात पाहात मी चाललो होतो. तेवढ्यात तिच्या घराजवळ साठलेल्या पाण्यात माझा पाय कसा काय घसरला आणि मी चिखलात पूर्णपणे कसा भिजून गेलो, तेच कळलं नाही. तिला मी मागच्या मागे चिखलात घसरून पडलो आहे हे लक्षातच आलं नव्हतं. मी जेव्हढा उठायचा प्रयत्न करत होतो तेंव्हढा पुन्हा पुन्हा घसरून पडत होतो.

थोड्या वेळाने तिच्या बंगल्याचा दरवाजा उघडला गेल्याचा आवाज आला. त्याच बरोबर, तिच्या बहिणीचा जोरजोरात किंचाळून बोलल्याचा आवाज ऐकू आला,

अरे माझी हरवलेली छत्री तुझ्या जवळ कशी काय आली ग ताई. अग आज मी देवळात गेली होती ना तर बाहेर ठेवली होती. बाहेर येवून पाहते तर कोणी हलकटाने पळवली होती. तुला खरंच सांगते.त्या चोराचं नशीब खूप चांगलं होतं म्हणायचं. नाहीतर  तेंव्हा जर का तो भामटा मला सापडला असताना तर त्याला मी चिखलातच लोळवला असता. आणि अशी जन्माची अद्दल घडवली असती ना की पुन्हा घडी असं आयुष्यात करणार नाही.

तिची बहीण सात्विक संतापात शिव्या शाप देत होती. तिने मागे वळून पाहण्या आधीच मी तोंडाला अजून चिखल फासला आणि तिथून पळत सुटलो.

माझा हेतू ज्याची वस्तू त्याला ती मिळणं हाच होता. मूळ मालकाची छत्री त्याला परत मिळाली होती याचा मला खरंच सांगतो खूप आनंद झाला होता. पण उशीर झाला होता ना त्या मुळे मी घरी जाण्यासाठी पळत सुटलो होतो.बाकी काही नाही.

दुसऱ्या दिवशी पण मी त्या मुलीला, आपण काही तिच्या वर उपकार केले वगैरे सांगून परत भेटण्याचा आणि बोलण्याचा आणि इम्प्रेशन मारण्याचा  प्रयत्नपण केला नाही.माझा तसा हेतू नसतोच कधी. कारण आपण कोणा साठी एखादी गोष्ट केली आणि गावभर सांगितली की तिची किंमत शून्य होते. आता तुम्हाला म्हणून सहज सांगितलं,  त्यात काही दुसरा हेतू नाही.

🎭 Series Post

View all