एका लेखकाचा अंत ( विनोदी कथा 7 )

मनात नसलं तरी हसायला भाग पाडणाऱ्या कथा
एका लेखकाचा अंत

मी खूप लहानपणीच लेखक होणार अशी चिन्ह दिसायला लागली होती. मला लिहिण्या मध्ये फारच रस होता. आणि माझ्या लिहिण्याची दखल सगळ्या लोकांना घ्यावीच लागे अशा प्रकारच माझं क्रांतिकारी लिखाण असायचं. पण अचानकच मला हे लिखाण थांबवावं लागलं. त्याचीच ही दर्दभरी कथा.

आमच्या शाळेत व्हरांडयात एक फळा होता. त्या फळ्यावर शनिवारी दुपारी प्रत्येकाला एक सुविचार आणि एक बातमी लिहावी लागे. त्या दिवशी माझा नंबर होता. खडू आणण्यासाठी मी शाळेच्या ऑफिस मध्ये गेलो.

आमच्या ड्रॉईंगच्या मॅडम आणि पीटीचे सर असे दोघच तिथं बसलेले होते. त्या दोघांच माझ्या कडे लक्ष नव्हतं. सरांचा आवाज नेहमी ग्राऊंडवर ओरडून बोलाव लागत असल्याने आधीच असाही मोठाच होता आणि आता तर  समोर मॅडम असल्यामुळे म्हणा खूपच मोठा झाला  होता. म्हणजे अगदी छान पैकी ऐकू येत होता. मी अनेक वेळा पाहिलं आहे की पिटीचे सर ड्रॉईंगच्या मॅडम वर इम्प्रेशन मारायची एकही संधी सोडत नाही.
सर म्हणत होते.

"  मॅडम, तुम्ही त्या  हेड सरांना उगाचच एव्हढं घाबरता. तो तुम्हाला नुसतं घाबरवत असतो. त्याला म्हणावं एव्हढया मोठ्या आवाजात स्वतःच्या बायको समोर एकदा जरी बोलून दाखवलं ना तर तूला खरा हेडमास्तर म्हणू आम्ही. जास्तच त्रास द्यायला लागला ना तर सरळ त्याच्या बायकोला जाऊन सांगा. घरी नुसता नंदीबैला सारखी मुंडी हलवत असतो हा. पक्का लबाड आहे तो. माझ्या आता जर तो समोर असताना तर त्याला दाखवला असता माझा हिसका. " सर त्वेषाने बोलतं होते.

" नाही हो सर. असं काही करू नका. माझा अजून प्रोबेशन पिरियड पण संपला नाहीये. त्या मुळे खूप टेन्शन येतं हो. इथे माझं जवळच कोणीच नाहीये. भर वर्गात येवून सगळ्या मुलांसमोर ते ओरडले की वाईट वाटत हो खूप. "

असं म्हणत मॅडमने आपली पर्स उघडली आणि छोटासा रुमाल काढून डोळे पुसले. सर पण  जागेवरून उठले मॅडम च्या खुर्चीच्या मागे जाऊन उभे राहात ते म्हणाले,

" मॅडम याचा अर्थ तुम्ही मला परकं समजता. "

" नाही हो.सर, तुम्हीच तर माझे जवळचे मित्र आहात. "

"मग इथे तुमचं जवळच कोणीच नाही असं का म्हणता ? संकट काळी जो कामास येतो तोच खरा मित्र असतो. "

सर, मॅडम च्या खांद्यावर थोपटणार होते तेव्हढ्यात त्यांना मी दिसलो. ते एकदम चवताळून म्हणाले.

" हरामखोर, काय हवं आहे रे  तुला ? "
अर्थात ते मला उद्देशून म्हणाले पण मॅडम उगीचच दचकल्या.

" सर खडू पाहिजे होता, फळ्या वर  सुविचार, बातमी लिहायची आहे."

" अरे घे ना बाळं, रंगीत खडू पण घे पाहिजे असेल तर, आणि छान अक्षरात लिहून काढ सुविचार आणि बातमी "

सरांच्या आवाजात अचानक गोडवा कसा काय निर्माण झाला. कळेच ना. मागे वळून पाहिलं तर माझ्या मागे आमचे हेडमास्तर  उभे होते. मला वाटलं आता पीटीचे सर त्यांच्या अंगावर  मॅडम साठी धावून जातील आणि मग धमाल पाहायला मिळेल. पण तसं काहीच झालं नाही. उलट पिटीचे  सर एकदम प्रसन्न आवाजात हेडसरांना म्हणाले,

" काहीही म्हणा सर, तुम्ही आल्यापासून शाळेत खूप छान सुधारणा होऊन राहिल्या आहेत. मला एक सूचना द्यावीशी वाटते की फळ्यावर बातम्या पण शाळे संबंधीतच लिहायला सांगाव्या मुलांना. त्या मुळे त्यांचे प्रॉब्लेम पण आपल्याला समजतील आणि तशा सुधारणा करता येतं जातील.तुम्हाला काय वाटतं मॅडम ? "

"इश्श, मला काय विचारता, चांगलीच गोष्ट आहे ही." मॅडम जेव्हढं लाजता येईल तेव्हढं लाजून म्हणाल्या.

हेड सर एकदम खूष झाले. पीटीच्या सरांना म्हणाले,  "सर, एकदम छान सूचना दिली तुम्ही.शुभस्य शीघ्रम." आणि मग माझ्या कडे वळून म्हणाले," बाळा, जा आज पासूनच सुरवात कर. तुला शाळेसंबंधी काही बातमी किंवा सूचना असल्या तर कोणालाही न घाबरता  फळ्यावर लिहून ठेव. मी त्या वर जातीने लक्ष घालून सुधारणा करेन." असं बोलून ते निघून गेले.

हे बातमी पत्र शनिवारी दुपारी लिहावं लागे. शाळा सुटल्या नंतर. सगळे घरी निघून गेले. सगळी शाळा रिकामी झाली. मला फळ्यावर काय लिहावं ते समजत नव्हतं. शाळे संबंधित बातमी लिहायची होती. काय लिहावं बरं मी विचार करायला लागलो
मला अचानक आठवलं अरेच्या, ड्रॉईंगच्या मॅडम आणि  पिटीच्या  सरांच्या बोलण्यातून ज्या बातम्या समजल्या  होत्या त्याच लिहून टाकू या ना.

आणि मग मी लिहिलेली बातमी अशी होती.

आमच्या खात्रीलायक वार्ताहराकडून  : आपल्या शाळेचे हेडमास्तर सर एक नंबरचा लबाड  माणूस असून ते ड्रॉईंगच्या मॅडमला जाणून बुजून त्रास देतं असतात. पण संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो.या म्हणी नुसार या पुढे पिटीचे सर  मॅडमला सर्व प्रकारची मदत करणार आहेत. आमच्या खात्रीलायक वार्ताहराकडून समजते की हेड सर बायको पुढे निव्वळ नंदीबैला सारखी मान हलवत असतात.

निरनिराळ्या रंगीत खडूने मी ही बातमी मस्त पैकी ठळक अक्षरात लिहून काढली. आणि दूरवरून पण वेडीवाकडी मान करून फळा वाचता येतो की नाही हे पाहून घरी गेलो.
--------
बातमी खरोखरच खळबळ जनक असावी. कारण सोमवारी सगळी शाळा फळ्यासमोर जमली होती. शिपायाने तातडीने फळा पुसून टाकला होता.

ड्रॉईंगच्या मॅडम, पीटीचे सर आणि हेड सर मला मारून मारून, शिव्या देऊन देऊन, थकून शेवटी स्वतःच्याच डोक्यावर बुक्क्या मारत बसले होते.

त्या नंतर मी दिसलो की पिटीच्या सरांचा चेहरा हिंस्त्र व्हायचा. मग मीच ते दिसले की रस्ता बदलवायचो. ड्रॉईंगच्या मॅडमच उलट झालं होतं. त्या मी दिसलो की तोंड फिरवून घ्यायच्या. मग मी ठरवलं की हेड सरांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागायची.

एक दिवस संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो. सर घरी नव्हते. त्यांची बायको एकटीच घरी होती. आणि एक  मुलंगा पेपर वाचत बसली होता दुसरी मुलगी रेडिओ ऐकत बसली होती. एक घरकाम करणारी बाई फरशा पुसत होती. मॅडम ने दार उघडलं,

" मे आय कम इन मॅडम." मी अत्यंत नम्रपणे शाळेत एक हात पुढे करून विचारतात तसं विचारलं.

" ये ना आत, कोण हवय, बाळं तुला."

"आमचे हेड सर इथेच राहतात ना. मी त्यांची माफी मागायला आलो आहे."  

" माफी ? आणि ती कशा साठी रे. अगोदर तू उभा का बस ना. हे बघ, काय झालं ते तू मला मी नीट सांग मी सरांना समजावून सांगेन. ते आता घरात नाहीयेत.ते चक्कीवर पीठ आणायला गेले आहेत. "

" नको मॅडम, मी ते आले की त्यांच्याशीच बोलेन."

" त्यांच्याशी तर बोलच पण मला अगोदर काय झालं ते तर सांगशील की नाही. तू काही खोडी काढली होती का त्यांची. "

" नाही मॅडम, उलट त्यांनीच मला त्या दिवशी बातमी लिहायला सांगितलं होतं. आणि मी , पीटीचे  सर आणि ड्रॉईंगच्या मॅडम त्यांच्या बद्दल काय काय बोलत होते ते फळ्यावर लिहून काढलं. तर सरांनी उलट मलाच मारलं. "

" पण असं काय लिहीलं होतं रे तू," मॅडम ने माझ्या पाठीवरून हात फिरवत विचारलं.त्यांचा प्रेमळ स्वभाव पाहून  माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं.

"जे पीटीचे सर आणि ड्रॉईंगच्या  मॅडम आपसात बोलत होते तेच लिहीलं मी, माझं काय चुकलं मॅडम  ?"

हळूहळू माझ्या बोलण्यात सगळ्यांना कुतूहल वाटायला लागलं. मुलाने पेपर बाजूला ठेऊन दिला. मुलीने रेडिओ बंद केला. मोलकरीण फारशा पुसणं अर्धवट सोडून मी काय सांगतो तिकडे लक्ष देऊन ऐकायच्या पोज मध्ये थांबली.

एव्हढं, सगळे मनापासून आग्रह करता म्हटल्यावर मी अगदी पहिल्या पासून काय घडलं, कसं घडलं ते सांगायला सुरुवात केली.

"पिटीचे सर ड्रॉईंगच्या मॅडमला  सांगत होते की आपले हेड सर एक नंबरचे लबाड आहेत. बायको समोर त्यांच काहीच चालत नाही..." मी गोष्ट सांगण्यात एव्हढा गुंग होऊन गेलो होतो की हेड सर केंव्हा समोर येवून उभे होते तेच मला कळलं नाही.

त्यांना पहिल्या बरोबर मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सर्कशीतल्या वाघा सारखा त्यांचा चेहरा चवताळलेला दिसला.

"तू इथे कशाला आला आहे." त्यांनी किंकाळी फोडून विचारलं.

" त्याच्यावर ओरडू नका. उगीच. तो आला म्हणून मला कळाले तरी तुमचे धंदे." अचानक मॅडम कडाडल्या आणि सरांचा आवाज एकदम मऊ पडला.

त्यांचा मुलगा, मुलगी आणि मोलकरीण तोंडाला हात लावून हसत होते. मॅडम ने कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि एकदम कर्कश्य आवाजात विचारलं," एवढ्याच साठी जाता काहो तुम्ही शाळेत. आणि मी म्हणते  घरातल्या गोष्टी शाळेत समजतातच कश्या."

मॅडम चा आवाज ऐकून सरांचा चेहरा भयभीत झाला आणि ते इतके थरथरायला लागले की त्यांच्या हातातला पिठाचा डब्बा खालीच पडुन गेला. घरभर पीठ झालं. पंखा सुरु होता म्हणून ते इकडं तिकडं उडायला लागलं.

आता या ठिकाणी थांबण्यात काही अर्थ नाही असं समजून मी त्या गोंधळाचा फायदा घेऊन धूम घराकडे पळालो.

दुसऱ्या दिवशी, मी ठरवलं की ऑफिस मध्ये जाऊन त्यांची माफी मागायची. पण मला त्यांनी पहिल्या बरोबर एकदम भीषण मुद्रा केली आणि एकदम शाळेच्या प्युनच्या नावाने भयानक मोठ्या आवाजात आरोळी मारली, तो एकदम पळत आला.

" या हरामखोराला अगोदर बाहेर काढ." सर किंचाळले.

मला सांगा, एखाद्याची माफी मागायला जाण चुकीची गोष्ट आहे का. जगात माणुसकीच शिल्लक राहिलेली नाहीये. खरं म्हणजे हे जग चांगल्या लोकांसाठी नाहीच आहे.

माझ्या हातावर पट्ट्या मारण्या एव्हढा कोणता गुन्हा मी केला होता. तेच मला समजत नव्हतं.
पण एक गोष्ट कळली होती की मी काहीही न लिहिणं हीच शहाणपणाची गोष्ट आहे. त्या दिवसांपासून मी परीक्षेत पेपरवर पण काहीच लिहीत नसतो. जगात खऱ्या गोष्टीला किंमत नसते हेच खरं.

त्या दिवशी तिन्ही सरांचा खूप मार खाल्यानंतर आता तर माझा शिक्षण पद्धती आणि शिक्षक या दोन्ही गोष्टींवरचा विश्वासच उडून गेला आहे.

🎭 Series Post

View all