एके काळची कळी ( भाग 3 )

मनात नसलं तरी हसायला भाग पाडणाऱ्या गोष्टी

एके काळची कळी ( भाग 3 )


एके काळी माझी बायको पण कळीचं होती. आता या माझ्या बोलण्यावर तुम्ही कदाचीत विश्वास ठेवणार नाही. पण हे  सत्य आहे. पण तेंव्हा ती खरोखरच कळीसारखी नाजूक, कोमल आणि सुंदर होती. हो मी ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट करतोय. ती खरोखर इतकी सुंदर आणि नाजूक होती की उलट तिचे इतर नातेवाईकच तिला नेहमी , तू या माणसात लग्न करण्यासारखं पाहिलं तरी काय असा प्रश्न माझ्या बाबतीत माझ्या समोर  तेंव्हाही विचारायचे आणि आजही विचारतात.


सहज आठवलं म्हणून सांगतो. आमच्या घरी एकदा हिची मैत्रीण सहज गप्पा मारायला येऊन बसली होती. आता मी कसा ना, आपलं परकं न मानणारा साधा भोळा माणूस. तिची मैत्रीण असली म्हणून तुसडेपणाने न वागणारा. उलट जास्त आपुलकीने वागणारा आहे. म्हणजे माझा स्वभावच फार साधा आणि भोळा आहे.

त्या दिवशी मी पट्ट्यापट्ट्याचा पायजमा आणि आणि सॅंडो बनियान घालून त्यांच्या गप्पा मनलावून ऐकत बसलो होतो. म्हणजे असा नुसतं गप्पा नव्हतो ऐकत, दोघींसाठी चहाचं आधण ठेवलं होतं मी गॅस वर आणि कानावर सहज त्या दोघींचे संवाद कानावर पडला. आलेली मैत्रीण हिला सांगत होती,

"अग त्या कोपऱ्यावरची भुरी पाल माहिती आहे ना तुला, ती तीन पोरीनवाली. कशी नाकाने कांदे सोलायची माहिती आहे ना. सारखं म्हणायची माझ्या पोरी अशा आहेत, माझ्या पोरी तश्या आहेत. शेवटी पाहिलं ना काय झालं ते."


" काय झालं ग. ?" माझ्या बायकोने अती प्रश्नार्थक, जिज्ञासू विद्यार्थ्या सारखा चेहरा केला आणि सगळे पंचप्राण कानात आणून ऐकत राहिली.

" अग, चांगली चांगली स्थळ येत होती. पण ही असा नको, तसा नको, असं करत नाकारत राहिली. आणि शेवटी पाहिलं ना, गेली पळून एका लफंग्याचा हात धरून."

" अग सांगतेस काय. आणि मला कसं कळलं नाही " माझी बायको सातव आश्चर्य पहिल्या सारखा चेहरा करून भक्तिभावाने तृप्त झाल्या सारखी ऐकत होती. आता पुढील वाक्य त्या बाईने बोलायला आणि त्या दोघींसाठी चहाचे कप मी  घेऊन जायला एकच वेळ झाली. ती दुष्ट बाई, हो हो, दुष्टच, मी काही कोणाला घाबरत नाही. माझ्या बायकोला सांगत होती.

" अग, पळून जायचं पण काही नाही. पण निदान आपल्याला शोभेल अशा माणसासोबत तरी  जायचं ना."

" का काय झालं.चांगला नाही आहे का." इति बायको.

" अग, त्या माणसापेक्षा तुझे हे कितीतरी बरे आहेत म्हणावं दिसण्यात . " त्या बाईने मला चांगलं दिसण्याचं सर्टिफिकेट दिलं होतं का माणूस कसा नसावा याचा ती मला मापदंड समजत होती देव जाणे. बर, बायकोने तर भडकावं ना तर तीने पण, 

" सगळ्याचं गोष्टी काही आपल्या हातात नसतात बाई " असे हताश पणे म्हणून डोक्याला हात लावला. नंतर सर्वस्व लुटलं गेल्या सारखा भकास चेहरा केला. मी मात्र तिच्या चेहऱ्याकडे निरागस पण टकमक पाहात होतो.


तर एके काळची ही नाजूक कळी, जिचं वजन आता आम्हाला फक्त वखारीत करावं लागतं, कारण एकदा बाजारात वजन काटा घेऊन बसणाऱ्या आणि दोन रुपये घेऊन वजन करून देणाऱ्या माणसाच्या त्या गोल वजन काट्या वर आम्ही एकदा तीच वजन केलं होतं तर त्याच्या मशीनीचा काटा डायरेक्ट मशीन फोडून बाहेर आला होता. त्याचं बिचाऱ्याच रोजी रोटीचा धंदाच बुडाला होता. आता नुसताच रस्त्यावर बसून पैसे मागतो.

पण हीची वजन करण्याची हौस काही फिटत नाही. एकदा रेल्वे स्टेशन वरच्या गोल फिरणाऱ्या चकतीच्या भविष्या सकट वजन सांगणाऱ्या मशिनीवर वजन केलं होतं तर, अचानक ही त्या मशिनवर उभी राहिली, आत रुपया ढकलला आणि मशीनच्या आत काय गडबड झाली काय माहित, एकदम कडकड आवाज झाला, सगळे दिवे एक एक करत विझले आणि ते फिरणार चाक नॉन स्टॉप फिरायला लागलं. मशीन बंद पडली. अजूनही ती बंदच आहे. 


मागे एकदा बस मध्ये चढतांना हात सुटून गडबडीत ही एका माणसाच्या अंगावर पडली. रस्त्यावर खडी होती.तो माणूस एकदम दाबलाच गेला. ही माणुसकीने आणि अंगभूत संस्कारांनी म्हणाली,

" सॉरी हं भैया. गलतीसे हाथ छुट गया. अगले टाईम ऐसा नही होगा "


त्यावर तोच माणूस हात जोडून केविलवाण्या आवाजात म्हणाला,

" बाई सॉरी नंतर म्हणा.अगदी नाही म्हटल तरी चालेल. पणं आधी तुम्ही अंगावरून उठा . खाली दगड आहेत. बोचताहेत "


पण मला हे कोडं अजून सुटत नाही, की जिच्या सोबत रिक्षात बसलं तर तिसरी शीट, शाळेतल्या पोरांच्या दप्तरांसारखी बाहेर लटकत असते अशी ही बायको माहेरी गेली की, सासूबाई अजूनही डोळ्याला पदर लावून म्हणतात ,

" आशा अग किती वाळली आहेस, नवरा काही खाऊ घालतो का नाही तुला बाई. "


या प्रश्नाला उत्तर नसते. मी आपला गुन्हेगार असल्या सारखा उभा असतो.


पण हीच बायको अजूनही जेंव्हा माहेरून निघते तेंव्हा तशीच तिच्या बाबांच्या गळ्यात पडून रडते, तेंव्हा पूर्वीसारखीच लहान वाटते.

एकगोष्ट सांगतो, ज्या दिवशी माझं किडनीस्टोन च ऑपरेशन झालं होतं ना त्या वेळी हीच बायको रात्रंदिवस उशाशी बसून होती. त्या वेळी, लक्षात आलं की ही एकेकाळची असलेली नाजूक कळी आज आपल्या संसारातलं सगळ्यात सुंदर फुल आहे जे परमेश्वराने मला सांभाळायला दिलं आहे.

(खाजगी वितरणा साठी ही गोष्ट आहे. कृपया माझ्या घरी हे सांगून विश्वासघात करून फुलाने गळा कापू नये.)

🎭 Series Post

View all