आजकाल मी घेत नाही ( कथा 2 )

अफलातून विनोदी कथा
परवा आमच्या गल्लीत मला वगळून एक जोरदार मिटिंग झाली. मला वगळण्याचं कारण जेंव्हा सोनालीने दही मागतांना सांगितलं त्या मुळे माझ्या बायकोच तर डोकंच फिरून गेलं.खर म्हणजे आमच्या चाळीला माझा अभिमान वाटत असे. कारणं मी घरकाम वगैरे आटोपून  क्लास वगैरे घायचो. त्या मुळे काही अडाणी लोक मला मास्तर पण म्हणतं. आता सोनालीने मुद्दामून सांगते आहे असं न दाखवता.

" काका, काल सगळ्या चाळीतल्या लोकांची मिटिंग झाली. त्यात तुम्ही नव्हता वाटतं. कारणं माझे मिस्टर म्हणतं होते की काकांना मुद्दाम नाही बोलावले "

हे ऐकल्यावर बायकोने टीपेचा आणि खवचटपणाचा विशिष्ट वेळी लावावा लागतो तो ठेवणीतला स्वर लावत विचारलं," का ग बाई, माझ्या नवऱ्याने काय घोडं मारलंय इतरांचं. बाकी इतर वेळी बरे हे हवे असतात ग. मागच्या वेळी बऱ्याच घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या वेळी त्या चाळीतल्या लोकांसाठी अन्न, धान्य,कपडे जमा करण्यासाठी माझ्या नवऱ्याला झोळी धरून सगळ्यात पुढे उभं केलं होतं तुम्ही लोकांनी. काय तर म्हणे काका तुमचा चेहरा पहिला की लोकांचा हात खिशातून काहीतरी काढून देण्या साठीच जातो. इतके केविलवाणे दिसता तुम्ही. सगळे एक नंबरचे लबाड आहेत. गणपतीची वर्गणी मागायलाही माझाच नवरा सोबत लागतो तुम्हाला. आणि काल अशी काय मिटिंग होती की ह्यांना बोलावण्याची पण गरज नाही पडली. बघूनच घेते मी आता एकेकाला "

भले बायको मला घरामध्ये काहीही बोलो, किंवा एक अक्षर ना बोलू देवो, किंवा भलेही सगळी कामं करून घेवो पण माझा कोणी असा अपमान केला रे केला की तिचं डोकं फिरून जातं. जणू काही माझा अपमान करायचा हक्क कायद्याने फक्त तिलाच दिलेला आहे या बद्दल तिची खूप खात्री आहे.

" काकू कालच दुध शीळ होतं का हो. रागावू नका,पण दही जरा बरोबर नाही लागलं म्हणून विचारते. " इतर वेळी सोनाली असं काही बोलली की हिचा पारा चढून जातं असे. पण आज सोनाली कडून बातमी काढायची होती ना. म्हणून बायको तिला जास्त आपुलकीने म्हणाली,

" अग सोनाली, बस ना जरा. तुला नेहमी घाईच असते.बस जरा चहा टाकते तूझ्या साठी. पण एक सांग ना कसली मिटिंग झाली ग काल . आणि यांना का नाही बोलावलं त्या मीटिंगला. का यांच्याच विरोधात होती मिटिंग ? "
त्या बरोबर दोन्ही हातांनी आपले कान पकडून सोनाली म्हणाली,

" नाही हो काकू, काकांच्या विरोधात कशाला असेल मिटिंग. काकांसारखा देव माणूस तर शोधून सापडणार नाही. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तर तुमच्या साठी नाटकाची काढलेली दोन तिकीट त्यांनी मी मागितल्या बरोबर देऊन टाकली मला आणि म्हणाले नाहीतरी काकूला नाटकात इंटरेस्ट पण नाहीये एव्हढा. आम्ही पिक्चरला पण जावू शकतो "

माझ्या हातातून घाटपांडेचा पेपर दचकल्यामुळे एव्हढा जोरात खाली पडला की चक्क आवाज झाला. नंतर कळालं की नुसताच पेपर नाही तर पाण्याचा ग्लास दणकन जमिनीवर पडला होता. सोनालीने गप्प बसाव म्हणून मी मनोमन देवाला नवस करत होतो पण नेमकं आज सोनालीला माझं कौतुक करण्याचा उत्साहच आला होता.

" अहो, खरच ना काकांसारखा देव माणूस शोधून सापडणार नाही. कितीतरी वेळा मी रस्त्याने
एकटी येतं असली की काका मला रिक्षानेच घेऊन येतात. बाजारात भेटले तर पिशव्यांना हात पण लावू देत नाही. अगदी घरापर्यंत पोहोचवून देतात. एकदा तर तुम्ही गावी गेल्या होता तेंव्हा तर त्यांनी माझ्या साठी बंब पेटवण्या साठी लाकडं पण फोडून दिली होती. एकदा तर हे आणि मी हॉटेल मध्ये गेलो होतो तेंव्हा आम्हाला नं कळत आमचं हॉटेलच बिलंही परस्पर भरून टाकलं होतं. एकदा तर चार तास रांगेत उभं राहून रिझर्वेशन पण काढून दिलं होतं. खरंच ना, आम्हाला तर काकांचा खूप आधार आहे. हे तर नेहमी म्हणतात की काकांचे उपकार या जन्मात फेडायचा आपण विचारच करायचा नाही आता. "

जसं जशी सोनाली माझं कौतुक करत होती तसं तसा आमच्या दोघांच्या तोंडाचे रंग बदलत होते. बायकोचा चेहरा डोळ्यांसकट लाल लाल दिसतं होता तर माझा मूळचा काळा रंग क्षणोक्षणी काळा ठीक्कर पडत चालला होता. शेवटी वातावरण हलक करण्यासाठी मी केविलवाण हसण्याचा प्रयत्न करत म्हटलं,

" अग सोनाली, शेजाऱ धर्म असतो हा. त्यात काय विशेष... कर्तव्यच असतं ते. " मी असं बोलतांना बायको कडे चोरून बघितलं तर फेब्रिकेशनचं वेल्डिंग करतांना कशा ठीणग्या पडतात ना तसे तिचे डोळे आग ओकताहेत असे मला वाटले.

" मग तुमच्या सारख्या सर्वगुण संम्पन्न माणसाला या लोकांनी का वगळलं हो. सांगा ना " बायकोने बोलता बोलता रुक्मिणी सारखे कमरेवर हात ठेवले.

" आता मला काय माहित " मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो.

" काकू, अहो एव्हढा त्रागा करण्यासारखं काही नाही त्यात. आमचे हे म्हणाले की काका त्यातले नसल्याने त्यांना बोलावण्यात काही अर्थच नव्हता. " सोनाली माझ्या बाजूने बोलली.

" त्यातले म्हणजे काय ग बाई. हे बघ सोनाली तू साफ साफ सांगून टाक बरं कसली मिटिंग होती. आणि यांना का वगळलं गेलं "

" काकू, स्पष्टच सांगते. परवा पासून श्रावण सुरु होणार आहे. तेंव्हा आता श्रावणात सगळ्यांचं खाण पिणं पूर्णपणे बंद होणार आहे. म्हणून या वर्षी चाळीतल्या सगळ्या पुरुषांनी असं ठरवलं आहे की वर्गणी काढून पार्टी करायची. आता सांगा यांत काका भाग तरी घेऊ शकता का.काका घासफूस खाणारे  " सोनालीने असं म्हटल्या बरोबर समोर हिरवगार मैदान पसरलेलं आहे आणि मी निवांतपणे त्या मैदानावर चरतो आहे असं चित्रं माझ्या डोळ्यसमोर चमकून गेलं.

सोनालीने कारणं सांगितल्या बरोबर आमच्या दोघांचीही तोंड एकाच वेळी उतरली.यावर काय बोलावं हे हिला काहीच सुचेना.यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रसंग आमच्या जीवाला किती लागला असेल. सोनाली तर निघून गेली. मला वाटलं आता लवकरच रणकंदन सुरु होईल. पण झालं उलटंच. बायको काहीच बोलली नाही. मुकाट्यानं कामं करत राहिली.शेवटी मलाच ती शांतता असह्य झाली. मी तिला थोडी लाडी गोडी लावत म्हणालो,

" अग जावू दे ग. एव्हढं काय मनाला लावून घेतेस. नाहीतरी आपण खात पीत नाहीच तर ते लोक कशाला बोलावतील आपल्याला मीटिंगला "

" तुम्हाला खरंच आत्मसन्मान नावाची म्हणून काही गोष्टच नाहीये. सगळ्या चाळीतले लोक आपल्या फ्रिज मधला बर्फ नेतात आणि मस्त लाईफ एन्जॉय करतात. खरच तुम्हाला यांत काहीच कमीपणा वाटत नाही काहो. माणसाने कसं प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असावं. आता माझा भाऊच बघा ना, जिकडे जातो तिकडे पूर्णपणे मिसळून जातो. कधी गर्व केलाय का त्याने त्या गोष्टीचा "

तिचं बंधू पुराण सुरु होण्याच्या आधीच मी खवचट पणे म्हणालो,

" मग मी आता त्यांच्या सोबत बसून दारू पिऊ का "

" मी म्हणते प्या. पण त्यांच्या सामोरं नको. आपलं नाव मी जे कमावून ठेवलं आहे ते मातीत मिसळू नका. कोणीतरी छान दर्दी व्यक्ती शोधा छान एन्जॉय करा. मला पण सांगा त्यात एव्हढा काय आनंद असतो ते. प्याल ना माझ्या साठी. तुम्हाला कोणी असं अडाणी आणि अरसिक समजून वाळीत टाकलेलं मला नाही आवडतं हो. " तिचा स्वर फारच कातर झालेला होता.

मला अचानक माझी बायको महान वाटायला लागली. मग आम्ही दोघांनी खूप गंभीरपणे या गोष्टीवर चर्चा केली, म्हणजे कोणा माहितीगार माणसांसोबत बसून मी दारू पिऊ शकेल आणि पूर्णपणे रोमांचक अनुभव घेऊ शकेल.

बरं या बाबतीत आम्ही दोघंही पूर्णपणे अनभिन्न होतो. कोणाचा सल्ला घ्यावा तेही समजतं नव्हतं.
दिवसभर आम्ही दोघंही टेन्शन मध्येच होतो. दोन दिवसावर गोष्ट येऊन धडकली होती. म्हणजे काय ना की माझ्या बायकोला कोणी, तुमचा नवरा काय बाई. तुम्ही म्हणता तसं वागतो असं म्हटलं की राग येतो. म्हणजे तसं मी वागावच अशी तिची ईच्छा असते पण समोरच्याने तसं बोलू नये अस तिला वाटतं. ती उलट इतर बायकांना सांगत असते, दिसतं तसं नसतं बरं. एकदा नुसतं वाटीभर मीठ वरणात पडलं होतं तर या माणसाने बोटं लावलं नाही. नको वाटतं अशा माणसा सोबत संसार करायला. केवळ मी आहे म्हणून टिकली. कसली हौस नाही की मौज नाही. वगैरे वगैरे.

कोणाला म्हणून सांगू नका बरं, आज मला गटारी अमावस्येला दारू पिण्याचा आग्रह करणारी ही बायको एकदा चुकून माझ्या मित्रांच सिगारेटच पाकीट माझ्या खिशात सापडलं होतं तेंव्हा तिने आकाश पाताळ एक केलं होतं. आणि त्या न पेटलेल्या सिगारेट पेक्षा जास्त धूर आणि जाळं आमच्या घरातून कित्येक दिवस निघत होता. पण जिथं सामाजिक सन्मानाची गोष्ट निर्माण होते तिथं तडजोड करायला माझ्या बायकोला अजिबात आवडतं नाही. अशा वेळी ती माझ्या सामोरं नेहमी तिच्या पत्रकार भावाचं उदाहरणं ठेवते. हिचा हा भाऊ म्हणजे सगळ्या मानव जाती साठी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. म्हणजे अगदी पारदर्शी जिथं जाणार तिथं अगदी असं मिळून मिसळून राहणार की कोणाला खरच वाटणार नाही की ही व्यक्ती इतकी थोर असेल म्हणून. त्याचा सल्ला घ्यावा की काय यावर आम्ही चर्चा करत होतो.

कारणं अगदी सुरवाती पासून आमची सुरवात होती. म्हणजे अगदी दारू कुठे मिळते, कशी प्यावी लागते इथपासून ते कोणा सोबत प्यावी इथपर्यंत. पण लगेच हिच्या भावाला विचारणं म्हणजे आपलं अज्ञान दाखवण्या सारखं होतं.

आमच्या आपसात गप्पा सुरु असतांनाच आमची भांडेघासणारी सखुबाई आली. आणि अवघ्या पाच दहा मिनिटात भांडी घासून आमच्या संभाषणात भाग घेत म्हणाली,

" काय ताई, साहेबांना दारू प्यायची आहे व्हय " तिला आमची काळजी कशी कळली हेच क्षणभर आम्हाला समजलं नाही. तीच म्हणाली, "बाई भांडी घासतांना कोण काय बोलतं या कडं समदं लक्ष ठेवावं लागतं. माणसं आपुन समजतो तितकी चांगली नसतात बगा. " मग तिने तिचे रोमांचक अनुभव सांगितले आणि म्हणाली, "माझ्या घरवाल्याला विचारा ना. ते बेणं रोज दारू पिऊन येतं घरी. पन लय वंगाळ गोट हाय बाई ती. कुठून आवदसा सुचली सायबाला तुमच्या. "

"तसं काही ग, सहज केवढ्याला येते कशी लागते यांना एकदा पिऊन पाहायची होती " बायकोने अलगद माझं नाव मधे घालून दिलं. त्यावर तिने माझ्याकडे इतक्या विचित्रं नजरेने पाहिलं की मी खाली मान घालून बसलो.

" कसला खर्च दहा रुपयात माझा नवरा आणून देईल की. आणू का उद्या तुमच्या साठी. "

दारू एव्हढी स्वस्त असते हेच मला माहित नव्हतं. पण एव्हढी स्वस्त असेल तर रोज देखील प्यायला हरकत नाही असा मी मनोमन निर्णय घेतला.

पण घाई घाईत निर्णय घेण्याऐवजी अजून इकडे तिकडे चौकशी करावी असा विचार करून आम्ही सखूबाईला म्हटलं की मी तुम्हाला उद्या नक्की सांगतो.

नंतर त्या बाजूच्या घाटपांडे कडे भांडी घासायला गेल्या. थोडया वेळाने घाटपांडे बाई, सोनालीच्या घरात गेल्या, नंतर त्या दोघी कावळे बाईंकडे गेल्या. मी सहज गॅलरीत गेलो आणि खाली पाहिलं तर आमच्या घराकडे बघत बऱ्याच लोकांच्या गुपचूप चर्चा चाललेल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो. पण कामात लक्षच लागेना. तसंही माझा कामं करण्याचा उत्साह आधीच जास्त असल्याने कोणाला जास्त फरक पडला नाही. उलट कामात सतत चुका होतं होत्या त्या मुळे साहेबांना मी नॉर्मलच वाटतं होतो. त्यांच्याच केबिनमधे बसून ते मला डिक्टेशन देत होते तेंव्हा दोघांचा चहा आला. त्या वेळी देखील माझ्या डोक्यात दारुबद्दलचेच विचार सुरु होते.आता मला वाचून आणि ऐकून एव्हढंच माहिती होतं की दारू पिण्याच्या आधी चिअर्स म्हणायचं असतं आणि ती घटाघट प्यायची नसते. दारू हळू हळू पीत असतांना सोबत जे खावं लागतं त्याला चकणा म्हणतात. त्या मुळे  अचानक भान न राहून मी साहेबांना, " चिअर्स " म्हणालो. आणि विचारलं, " साहेब, चहा सोबत काय बिस्कीटाचाच चकणा की काय. माझं बोलणं ऐकल्या बरोबर साहेबांच्या हातातला चहाचा कप इतक्या जोरात हिंदकळला की त्यांच्या शर्टावर चहा सांडला आणि ते चकण्या नजरेने माझ्याकडे बघत म्हणाले," काय जोशी उद्या काही प्रोग्राम आहे की काय " मी नुसतीच दात चावल्या सारखं लाजल्या सारखं केलं आणि खाली मान घालून बसलो.

" अहो, लाजायचं काय त्यात. काही होतं नाही एखाद्या वेळेस घेतली तर. " आमचे साहेब स्वतःच हे बोलताहेत ह्या गोष्टीवर माझाच माझ्या कानावर विश्वास बसेना. आमचं असं बोलणं सुरु असतांना प्यून आत आला. ऑफिसच्या वेळेत मी पूर्ण वेळ जागा होतो त्या मुळे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे ही गोष्ट आमच्या शिपायाच्या लक्षात आली होती. आम्ही दोघं दारूसारख्या लोकप्रिय विषयावर बोलतं आहोत हे पाहून तो देखील अधिकार वाणीने म्हणाला माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, " साहेब, उद्या संध्याकाळी मला जरा लवकर सोडाल का. उद्या गटारी अमावस्या आहे. " नंतर हळू हळू एकेक स्टाफ येऊन परवानगी घ्यायला लागला. इतके सगळे जण लवकर जाणार म्हटल्यावर गटारी अमावस्या हा सांस्कृतिक राष्ट्रीय सण म्हणून सुट्टी जाहीर करावी की काय असं साहेबांना वाटायला लागलं. मी त्यांचा पीए असल्याने त्यांनी मला विचारलं. मी मानेनेच होकार दिला. लगेच साहेबांनी सुट्टीचं एक सर्क्यूलर काढलं. त्या दिवशी ऑफिसचा उत्साह काय वर्णन करावा. लोकांनी एकमेकांना फक्त मिठ्याच मारायचं बाकी ठेवलं.

" मग काय जोशी, बसायचं का उद्या आपण " साहेबांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने मला विचारलं.

" सर, उद्या तर सुट्टी जाहीर केली आहे ना आपण. मग कसं बसायचं " मी निरागसपणे विचारलं.

" अहो, ऑफिसमध्ये कामाला नाही. संध्याकाळी मस्तपैकी एन्जॉय करत बसू "

माझा माझ्या कानावरच विश्वास बसेना. मी कुठं आणि साहेब कुठं. नेहमी माझ्याशी बोलतांना रेकून बोलणारे साहेब आज असं काही बोलत होते की त्यांच्या स्वरात एव्हढा गोडवा आणि आपुलकी आहे, हे मला खरच वाटेना. आणि अशा थोर साहेबासोबत दारू पिण्याने आपलं समाजातलं स्थान किती उंचावेल या विचारांनीच माझं हृदय भरून आलं.

मग आम्ही दोघांनी कुठं जायचं, केंव्हा जायचं, काय आणि किती प्यायचं याचा पक्का प्लॅन केला. साहेब मला घ्यायला आणि सोडून द्यायला पण येणार होते. त्या मुळे चिंता नव्हती.

संध्याकाळी मी घरी गेलो. आनंदात शीळ घालतं उगाचच बायकोच्या केसांशी खेळल्या सारखं केलं. सगळ्या पोरींच्या डोक्यावर खुशीत टपल्या मारल्या त्या मुळे आमच्या हिला मी आताच दारू पिऊन आलो आहे की काय असा संशय आला. पोरी पण आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिल्या. मग मी बायकोला हळूच ऑफिसमध्ये झालेली गोष्ट सांगितली. तेंव्हा लगेच तिने देवाला हात जोडले. आणि म्हणाली, " बरं झालं बाई तुम्हाला दारू प्यायला चांगली सोबत मिळाली. फक्त आता एक करायचं गटारीत पडून आणि शिव्यागाळ करत यायचं नाही बरं घरी. अगदी या कानाची खबर त्या कानाला लागायला नको. देवा परमेश्वरा उद्याचा दिवस सुखरूप पार पडू दे. मी यांना यांच्या कष्टाचे अकरा रुपये पेटीत टाकायला सांगेन. " बायकोने नवस पण केला.

मला माझ्या बायकोचा,आमच्या निरागस कुटुंबाचा अभिमान वाटला. आपला नवरा कुठंच कमी पडू नये म्हणून आग्रह करणाऱ्या माझ्या बायकोबद्दल मला अतोनात प्रेम दाटून आलं. मी थोडा लाडात येणारंच होतो, तेव्हढ्यात ही ओरडली, " जास्त हिडगे चाळे करू नका. आपल्याला सात पोरी आणि एक पोरगा आहे याचं भान राहू द्या " मग मी लगेच भानावर आलो.

इकडे आमच्या गल्लीतले सगळेजण मिळून प्रोग्राम बनवत असतांना ही मात्र मला अनेक सूचना देत होती. " गटारीच्या आसपास बसून दारू पिऊ नका, झेपेल तितकीच प्या, झिंगत आणि आरडा ओरडा न करता येवू नका. कोणालाच संशय येणार नाही असं वागा. माझं नाव खराब करू नका."

संध्याकाळी साहेब मला घ्यायला आले. त्या वेळी, " साहेब दोघांचा डबा देऊ का सोबत.आत्ता चार पोळ्या आणि भाजी बनवून देते. थोडं श्रीखंड पण देते. " असं हिने म्हटल्यावर साहेब गालातल्या गालात हसले. " वहिनी, काळजी करू नका. आज जोशी बुवा आमचे पाहुणे आहेत. " तरी तिने माझ्या जवळ, अडीअडचणीला राहू द्या असं म्हणत एक पिशवीत पोळी भाजी दिलीच.

मग आम्ही दोघं निघालो. गावा बाहेरच्या एका हॉटेल मध्ये आम्ही गेलो. सगळीकडे मंद दिवे लागलेले होते. प्रत्येक टेबल बुक होता. साहेबांच्या सोबत असल्याने मी उगाचच ताठ चालत होतो. आम्ही दोघं एका रिझर्व केलेल्या टेबलवर बसल्यावर एक माझ्या पेक्षा रुबाबदार दिसणारा वेटर आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, " साहेब, काय आणू "

त्याने मला साहेब म्हटलेलं असल्याने, त्याला मी नवखा वाटू नये म्हणून एकदम रुबाबात ऑर्डर दिली. " दोन बाटल्या दारू आण " माझी ऑर्डर ऐकल्यावर तो एकदम दचकलाच.

साहेबांनी त्याला काहीतरी वेगवेगळी नाव सांगितली आणि ऑर्डर दिली.

" जोशी बुवा, तुम्ही आज पहिल्यांदा घेताहात ना. तर तुम्ही व्होडका घ्या. वासही येणारं नाही आणि त्रासही होणार नाही. " मला हा प्रकारचं माहिती नव्हता. मी म्हणालो, " साहेब तुम्ही म्हणाल तसं "  मग आमच्या सामोरं वेटरने दोन पाण्याचे ग्लास भरून आणले. साहेबांनी अहो, अहो, हळू हळू असं म्हणे पर्यंत मी पाणी समजून घटाघट पिऊन टाकलं. नंतर लक्षात आलं ते पाणी नव्हतं. साहेब माझ्या सामोरं डोक्याला हात लावून बसले होते, आणि अधून मधून डोलत होते असं मला वाटलं. मी पुन्हा वेटरला आवाज दिला आणि परत ऑर्डर दिली. तो ग्लास भरून घेऊन येई पर्यंत मी पिशवीतला डब्बा काढला. बायकोने श्रीखंड पुऱ्या सोबत दिल्या होत्या. मी साहेबांना आग्रह करायला लागलो. त्या वेळी ते फारच केविलवाणे दिसतं होते. मला सारखे, जोशी प्लीज, जरा शांत राहता का. असं म्हणत होते. मग मी शहाण्या मुलासारखं त्यांचं ऐकायचं ठरवलं.

हळू हळू सगळं वातावरण बदलल्या सारखं वाटायला लागलं. सगळे शांतपणे बसलेले होते. मला अचानक आठवलं. हॉटेलचा मालक बिचारा एकटा बसलेला होता. आपण सगळे पीत आहोत आणि हा एकटा असा निवांत बसलेला पाहून मला त्याची दया आली. मी कसाबसा वेटरला म्हणालो, तूझ्या मालकाला बोलावं. तो मालक पण लगेच हात जोडून येस सर, व्हॉट ह्यापण्ड सर असं म्हणाला. तेंव्हा मी त्याला आम्हाला कपंनी द्यायला रिक्वेस्ट केली. तो विनयाने नाही म्हणतं होता. पण मी जबरदस्ती त्याला आग्रह करत होतो. तो सॉरी सर, नो सर , थँक्यू सर असं म्हणत निघून गेला. दारू पोटात गेल्याने आम्ही देखील समजदार झालो होतो. जेवणाची ताट येई पर्यंत आम्ही ऑफिस मधल्या बायकांबद्दल गप्पा मारल्या. जेवणाचं ताट सामोरं आल्यावर, मला एकदम संस्कार आठवले.

मी हातात पाणी घेऊन ताटा भोवती फिरवले आणि , " वदनी कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे " हा श्लोक दणदणीत आवाजात म्हणायला सुरुवात केली. क्षणभर वातावरण कसे भारले गेले. अनेक दारू पिऊन तर्र झालेले अनेक लोक माझ्या पाया पडून गेले.
साहेब मात्र त्या वेळी माझा आणि त्यांचा काहीच संबंध नसल्या सारखे वागत होते. कुठल्या तरी जन्मी केलेल्या पापाच फळ आपण भोगतो आहोत असा त्यांचा चेहरा झाला होता. जेंव्हा ते मला आटोपत घ्यायचा आग्रह करायला लागले. तो तो मला जास्त उत्साह चढत होता. आपण समजतो तितके जग वाईट नाही आणि आपल्यातही काही कमी नाही असा एक प्रचंड आत्मविश्वास माझ्या मध्ये निर्माण झाला. साहेबांनी कसं बस मला त्या हॉटेल मधून बाहेर काढलं. मी साहेबांना त्यांनी कसं वागायला हवं वगैरे बरच काही ऐकवत होतो आणि ते निमूट पणे ऐकून घेत होते.

आमची गाडी आमच्या घराकडे वळली तेंव्हा मला कोपऱ्यावर खूप गर्दी जमा झालेली दिसली. एक घरंदाज माणसाला एक दारू पिलेला माणूस दादागिरी करत शिव्या गाळ करत होता. मला एकदम आठवलं, हाच तो गुंड माणूस होता. ज्याला आमच्या एरियातले लोक खूप घाबरायचे. त्याच्या हातात एक चांदीच कडं होतं. खिशात चाकू होता. तो दिसला की लोक रस्ता बदलवून घेत. आज तो माणूस माझ्या सामोरं एका माणसाला त्याच्या बायको पोरांसमोर शिव्यागाळ करत असतांना पाहिल्यावर माझं एकदम पित्त खवळल. हाच क्षण होता त्याला धडा शिकवायचा. बरेच लोक जमलेले होते. चांगलीच गर्दी जमली होती. पण कोणाचीच त्याला काही बोलायची हिम्मत होतं नव्हती. मी साहेबांना म्हटलं, " साहेब, मला इथंच उतरवा. आज मी बघतोच याच्या कडे " बाह्या वर करत मी बोललो. साहेबांनी मला, " नको हो, जोशी बुवा, जावू दया ना. द्या सोडून त्याला. " असा सल्ला दिला. पण मी कुठं ऐकायला बसलोय. मी गाडीतून खाली उतरलो. आणि रुबाबात त्या माणसाजवळ गेलो. एकदम ओरडून त्याला म्हणालो,

" अहो, मिस्टर काय नाटकं लावलं आहे हो तुम्ही. बंद करा हे सगळं. एक मिनिटं थांबा मी पोलिसांनाच फोन लावतो. दिवसेंदिवस तुमची दादागिरी खूप वाढत चालली आहे. " माझा आवेश पाहून तोही भांबावला आणि मग लोकांनाही चढला.सगळे म्हणायला लागले, " चला पोलिसात तक्रार देऊ. "

मग काय विचारता, त्या गर्दीत एक स्थानिक राजकारणी नेता होता. त्याला माझा पुढाकार सहन झाला नाही. लगेच तो पुढे सरसावला.

" चला, मी पण येतो पोलीस स्टेशन वर. तिथं ओळख आहे आपली. " असं म्हणतं आम्हा वीस पंचवीस लोकांचा घोळका पोलीस स्टेशन वर जायला निघाला.

पण जसं जसे पोलीस स्टेशन जवळ यायला लागले  तसं तसे लोक मागच्या मागे एकेक करून नाहीसे व्हायला लागले. प्रत्यक्ष पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जेंव्हा पोहोचलो तेंव्हा ज्याला शिव्या दिल्या होत्या तो माणूस, तो स्थानिक कार्यकर्ता आणि एकटा मी असे तिघेच हजर होतो. पण तरीही मी कोणाला घाबरलो नव्हतो. आमच्या सांगण्या नुसार पोलिसांनी त्या माणसाला आमच्या सामोरं पकडून आणले. तो पूर्ण नशेत होता. मागे पुढे झुलत होता. त्याने टक लावून आम्हा तिघांकडे पायापासून डोक्यापर्यंत नीट निरखून पाहिले. त्याची ती नजर मला फार भयंकर वाटत होती.

शेवटी पोलीस इन्स्पेक्टरने आम्हाला समजवून सांगितले की, आज गटारी अमावशा आहे. तो काय करत होता यांची त्याला शुद्ध पण नाही. पण तुम्ही आता तक्रार केली आणि नंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली तर तो तुम्हाला अजून त्रास देईल. त्या पेक्षा आम्ही त्याला दम देतो. तुम्ही केस करू नका.

पोलीस त्याला दम द्यायला लागले तेंव्हा तो माझ्या कडे बारकाईने पाहात होता. हळू हळू मी काय केलं हे मला समजल्यावर मलाच थंडी भरली. कसलं धाडस करून बसलो होतो मी.

घरी यायला मला बराच उशीर झाला होता. बायकोला ही खूप चिंता लागली. गल्लीतल्या सगळ्या बायकांना जमा करून ती माझी काळजी करत वाट बघत होती, " देवा, यांना सुखरूप घरी येवू दे. मीच मेली वाईट आहे. मीच आग्रह केला त्यांना. नाहीतर ते दारू पिणारच नव्हते. "

" वहिनी दारू पिऊन आलेला माणूस बायकोला मारहाण पण करतो म्हणे " एका अनुभवी बाईने माहिती दिली आणि नेमकी त्याचं वेळी माझी एन्ट्री गल्लीत झाली.

जेंव्हा मी उशीर झाल्याचं कारण सांगितलं तेंव्हा मात्र सगळ्यांना थंडी भरली. कशाला तुम्ही हे रिकामं कामं केलं हो जोशी बुवा. आता तो माणूस तुम्हाला सोडणार नाही बघा. त्याच्यावर आधीच तीन हॉफ मर्डर, एक फुल्ल मर्डर, चार दोन त्रुटीयांश मर्डरचे आरोप आहेत.कशाला तुम्ही उगाच पंगा घेतला त्या माणसाशी. " असं बोलणं ऐकल्यावर मी हळू हळू शुद्धीवर यायला लागलो आणि आपण कसलं धाडस करून बसलो याची मला जाणीव झाली.

दुसऱ्या दिवशी साहेब पण मला नमस्कार करून म्हणाले, " मी खरोखरचं गाढवं आहे जोशी बुवा "

" हो साहेब, ही गोष्ट तर माझ्या कधीच लक्षात आली आहे " माझं बोलणं ऐकल्यावर साहेबांचा चेहरा एव्हढा वेडा वाकडा झाला की मला वाटलं त्यांना आकडीच येते की काय.

पण माझ्या सामोरं गंभीर प्रश्न उभा राहिलेला होता. त्या गुंडाने घरी जातांना माझ्यावर हल्ला केला तर काय करायचं. त्या धाकाने मी जास्तीत जास्त वेळ ऑफिस मध्येच काढायला लागलो. नंतर रस्त्याने लागणाऱ्या प्रत्येक देवाला नवस करत उशिरा घरी यायचो. पण असे किती दिवस चालणार ना.

रविवारचा दिवस होता. आम्ही सगळे घरीच होतो. आणि अचानक दारात दरवाज्याच्या दोन्ही फ्रेम वर हात ठेवून तो गुंड दारात उभा राहिला. त्याच्या हातातल चांदीचं कडं चमकत होतं. त्याला पाहिल्या बरोबर मी ताडकन उठलो आणि झपाट्याने बाथरूम मध्ये पळालो. नंतर बाहेर येऊन कसं बस त्याला म्हणालो, " या या शेठ "

त्यावर तो तसाच उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, " मास्तर, दहावीचा क्लास कधी सुरु होणार आहे. माझ्या पोरीला पाठवायचं आहे. पण पास व्हायला पाहिजे बरं. "

माझा जीव एकदम भांड्यात पडला. याचा अर्थ त्याने मला पोलीस स्टेशन मध्ये पाहिले होते पण ओळखलं मात्र नव्हतं. मी एकदम सुटकेचा निश्वास टाकला आणि कोणी कितीही पाया पडला, पैसे देतो म्हटलं तरी आज पासून कधीही दारू प्यायची नाही असा निश्चय केला.

हे सर्व मी शुद्धीवर असतांना लिहिलेलं आहे.खोटं वाटतं असेल तर बघा विचारून मला.

🎭 Series Post

View all