सार्वजनिक व्हॅलेंटाईन डे ( कथा क्रमांक1)

अशा अजब गजब विनोदी गोष्टी ज्या ऐकल्यावर आपण हसू थांबवूच शकणार नाही.

सार्वजनिक व्हॅलेंटाईन डे ( कथा क्रमांक 1 )

माझ्या मोठं मोठ्या विचारांनीच मला बऱ्याच वेळा अडचणीत टाकलेलं आहे. म्हणजे कसं ना की मला संकुचित विचारच करता येत नाही. आपलं परकं हा कधी विचारच माझ्या मनाला स्पर्श करत नाही. पण त्या मुळे मी हळू हळू थोर होतं चाललो आहे हे माझ्या लक्षातच आलं नाही. आणि आलं तेंव्हा बराच उशीर होवून गेला होता. सर्वच थोर माणसांना समाजाने नेहमीच त्रास दिलेला आहे. त्यांच्या विचारांची खोली जाणून न घेता त्यांच्या कडे नेहमी जाणून बुजून उपेक्षित ठेवलं गेलेलं आहे. हे तुम्हीही  वरून  दाखवता येत नसलं तरी मनातून मान्य करतच असाल याची मला खात्री आहे.

त्या मुळे तुमचा पेपर, तुमचा टीव्ही, तुमची गाडी, तुमच्या घरची बामची बाटली, थर्मामीटर, शेकायची पिशवी मला आपले पणा मुळे परक्याची वाटतच नाही कधी. त्या मुळे आमच्या घरात पुस्तकं, ताट वाट्या, साचे अशा अनेक इतरांच्या वस्तू आम्ही खूप जपून ठेवतो. आणि कसं ना की एखादा आपली वस्तू आपल्या गरजेला देतो म्हणून त्याला घडी घडी उठवून वारंवार मागणं मला आवडत नाही.म्हणून मी त्या वस्तू माझ्या जवळच काळजी पूर्वक ठेवून घेतो. पण लोकं नेहमी उलटा विचार करतात.

पोटात एक असतं आणि तोंडावर एक बोलतात. मागे मी शेजाऱ्याला गाडी मागितली. आता गाडी म्हणजे काही फार मोठी खायची गोष्ट आहे का. त्या दिवशी बायकोला रात्रीच्या शेवटच्या शो ला घेऊन जायचं होतं.कारण तिचा वाढदिवस होता. एक तर ती कधी लवकर मला पिक्चरला जाऊ या असं म्हणतं नाही. म्हणून मी पण म्हटलं जाऊ या. येव्हढया रात्री रिक्षा मिळाली नसती. पायी येणं शक्य नव्हतं. म्हणून या माणसाला मी गाडी मागितली.

तर या उलट्या काळजाच्या निर्दय माणसाने मला , चक्क गाडीत पेट्रोल नाहीये, त्याच्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे अशी क्षुल्लक क्षुल्लक कारणं सांगून कटवायचा प्रयत्न केला. बघा आता, कसे लोकं असतात तर.

मी मात्र असा कधीच वागत नाही. मागे मी मोबाईल घेतला होता. एकदम नवीनच आला होता मार्केट मध्ये. काळाकुळकळीत आणि एक अर्ध्या इंचाची शेंडी असलेला. एखाद्या वरवंट्याच्या आकाराचा मोबाईल होता तो. त्या वेळी इनकमिंग, आउटगोइंग काहीच फ्री नव्हतं. त्या महागाईच्या काळात पण मी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून झाडून झटकून सगळ्या मित्रांच्या मैत्रिणींना, आमच्या बिल्डिंग मध्ये सगळ्यांना, सगळे नातेवाईक यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे चे मेसेज पाठवून दिले होते. अर्थात यात माझा काय स्वार्थ होता तुम्हीच सांगा, एकदा मी मित्राला विचारले,

"अरे आज, व्हॅलेंटाईन डे आहे माहिती आहे ना ?"

"हो ना, काय करावं." तो मित्र असाह्यपणे म्हणाला.

" अरे मग, तुझ्या मैत्रिणीला हैप्पी व्हॅलेंटाईन डे चा मेसेज पाठव ना . अशाने संबंध दृढ होतील. हे दिवस काय टाइम पास म्हणून निर्माण केलेले आहेत का. आपणच ते पाळले नाही तर संकृतीचा काय उपयोग. पौरात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा संगम होणं हाच या सणामागे उद्देश असतो " माझा सल्ला.

" अरे पण, माझ्या जवळ मोबाईल नाही.तिच्या जवळ पण नाही. तिच्या बाबांकडे आहे. " मित्राने  अडचण सांगितली.

" अरे, तिच्या बाबांचा नंबर आहे ना तुझ्या कडे. मग ते देतीलच ना मेसेज तुझा तिला. चल दे नंबर, घे माझा मोबाईल" मी त्याला उदार मनाने माझा फोन दिला

असं एक एक करत बहुतेक मी माझ्या सगळ्यां मित्रांच्या मैत्रिणींना आणि ओळखीच्या सगळया लोकांना माझ्या फोन वरून "हॅपी व्हॅलेंटाईन डे " चे मेसेज पाठवून दिले. त्यात आमच्या कडे पूजेला येणारे गुरुजी, आमचे साहेब, त्यांची मिसेस, वगैरे सगळे सगळेच आले. आता माझ्या मनात जर पाप असतं किंवा वाईट विचार असते तर माझ्या पदरचा पैसा खर्च करून मी कशाला हा उपद्व्याप केला असता. फोन जरी माझा असला तरी पाठवणारा माझा मित्र होता ना, पण नाही. अनेक मित्रांनी त्या दिवसापासून माझ्याशी बोलणं सोडलं. काही जणांचं नेमकं त्याच दिवशी ब्रेक अप झालं, काही जणांना पोलिसांनी तुडवलं, काहींचे दात आणि हात पाय त्यांच्या मैत्रिणींच्या भावाने किंवा वडिलांनी तोडले. आणि या सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावर फोडलं गेलं. खरंच आजकाल चांगुलपणाची दुनियाच राहिलेली नाही.

त्या दिवशी संध्याकाळी तर कमालच झाली. हिच्या त्या लग्नात गुलाबी साडी नेसलेल्या मामेबहिणीचा फोन आला, " हे हो काय जीजू ss, आता नाही असं चालायचं गडे.फोन वर अजिबात व्हॅलेंटाईन डे विश करायचं नाही. स्वतः यायचं. ताईला घाबरता की काय. समोर तर तुम्ही काहीच बोलत नाही. पण तुमच्या मनात काय आहे ते मी चांगलंच ओळखते. कम ऑन जीजू, प्यार किया तो डरना क्या... " आणि चक्क जोरजोरात गाणे म्हणायला लागली. मी तर घामाघूमच झालो. आणि तोंड तर अजून उतरल्यासारखं झालं. मी आपलं, "अग हळू, हळू " असं हळूच म्हणायला आणि बायकोने माझ्या कोपऱ्यात जाऊन बोलण्याकडे बघायला एकच वेळ झाली.

" कोणाचा फोन आहे हो, बघू. " तिने असं म्हटल्याबरोबर , मी मित्राचा आहे असं बोले पर्यंत तिने फोन हिसकला आणि बोलायला सुरुवात केली. हिच्या त्या बहिणीला कोणाशी काय बोलाव याचा काही पासपोसच नाही.

" अग ताई, जीजू कसले रोमँटिक आहेत. मला बघ ना आठवण ठेवून व्हॅलेंटाईन डे विश केलं. कसलं भारी वाटलं माहित आहे..." तिचा फोन ऐकता ऐकता बायकोचा गुलाबी चेहरा लालबुंद कधी झाला होता कळलंच नाही.

रागारागात तिने तो मोबाईल दाणकन खाली फेकला. तो पडला मुळी माझ्या पायावर. मी ओय ओय करत एक पाय वर धरून थयथय , एक पाय नाचव रे गोविंदा नाचं करायला लागलो.

"तिचा नंबर बरा तुमच्या जवळ आहे हो. माझ्या भावाचा आहे का सेव्ह केलेला. नसेलच म्हणा..." बायकोच स्वगत सुरु झालं. काय बोलणार.

मला सांगा, असे विचार करणं चुकीचं असतं का.असंच एकदा नवीन बिल्डिंग मध्ये राहायला आलो तेंव्हा सगळ्या बिल्डिंग मध्ये एकता आणि बंधुता वाढावी या दृष्टीने मी या व्हॅलेंटाईन डे ला एक अभिनव उपक्रम राबवायचं  ठरवलं.

आमच्या बिल्डिंगच्या समोर अजून एक  बिल्डिंग होती. सगळेच जण नवीन असल्याने मी सहज म्हणून इकडे तिकडे फिरून मन रमवत असे. ओळख वाढवत असे.

त्या समोरच्या बिल्डिंग मागच्या बाजूला सहज फिरत फिरत गेलो तर डोळेच फिरून जातील अशी अप्रतिम रंगीबेरंगी गुलाबाच्या फुलांची बाग होती. कसली सुंदर दिसतं होती ती फुलं.  त्या वेळी बागेत कुणीच नव्हतं. मग मी चांगल्या विचाराने एकूण एक फुल तोडलं आणि नंतर जोडीने (हो उगाच कोणाच्या मनात माझ्या शुद्ध हेतू बद्दल शंका येवू नये म्हणून बायकोला सोबत घेऊन ) आमच्या बिल्डिंग मधल्या प्रत्येक घरोघरी जाऊन गुलाबांची फुलं देऊन हॅपी व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देऊन आलो.

त्या दिवशी बऱ्याच घरांमधनं माझ्या रसिकपणा वरून भांडण झाली. "बघा, माणूस या वयात पण कसा सगळ्यांसाठी आठवण ठेवून फुलं घेऊन आला. शिका जरा काहीतरी... " एव्हढं सणासुदीला सगळ्या घरांमधून मात्र दणादणा भांडे आपटल्याचे आवाज येत होते. बिल्डिंग मधले सगळे नवरे माझ्याकडे आगलाव्या म्हणून पाहात होते. काहींनी तर माझा निषेध म्हणून गुलाबाच्या पाकळ्या पॅसेज मध्ये फेकल्या होत्या.

त्याचं वेळी तेव्हढ्यात समोरच्या बिल्डिंग मधून कोणीतरी जोरजोरात आरोळ्या मारत आहे असा आवाज आला. अशा वेळी आमच्या बिल्डिंग मध्ये मात्र असा एकोपा खूप आहे. हा, जर कोणी चोर चोर म्हणून ओरडलं तर भले जास्त कोणी बाहेर येणार नाही पण असं कोणी कोणाला शिव्या देतांना किंवा भांडतांना आवाज आला तर  जिथून असतील तिथून जसे असतील तसे सगळे जण धावत एकत्र येतात.

समोरच्या बिल्डिंग मधून आवाज येत होता. म्हणून प्रत्येक घरातल्या मी दिलेली फुलं डोक्यात खोचलेल्या चांगल्या पंधरा वीस बायका त्या समोरच्या बिल्डिंगच्या आवारात जमा झाल्या.

एक माणूस हातात दगड घेऊन, वेगळ्याच भाषेत शिवीगाळ करत होता, एका हाताने छाती पिटत होता. त्याला त्याची बहूतेक बायकोच असावी त्याची साथ देत होती. तो काय बोलत होता ते कळत नव्हतं म्हणून माझी बायको पुढे होवून हिंदीत विचारायला गेली.

" क्या हुआ भैया. क्यू चिल्ला रहे हो." तिने विचारलं आणि तिला बघितल्यावर तो अजूनच पिसाळला.

सगळ्या बायकांकडे बघितल्यावर प्रत्येकीच्या डोक्यात फुलं पाहून तर तो कोणालाच आवरेनासा झाला.

"ये सब फुलं कहासे मिले, तुम लोगो को. कहा है वो फुल चोर, उसको मै छोडूंगा नहीं l उसका सर फोड दूंगा l मै पुलिस कम्प्लेंट करुंगा l "असं त्याने म्हटल्याबरोबर सगळ्यांना हायस वाटलं.
सगळा रोख माझ्या कडे वळला. आणि ते प्रकरण मी हातापाया पडून कसं बस मिटवलं. पण त्या दिवसापासून बिल्डिंग मध्ये मला फुल्ल चोर म्हणून ओळखायला लागले.

म्हणून म्हणतो इतकंही जास्त चांगलं आणि साधं राहणं चांगलं नसतं कधी. त्या दिवसापासून मी तरी कानाला खडा लावून ठेवला आहे व्हॅलेंटाईन डे ला फक्त सख्ख्या बायकोलाच फुलं देवून विश करायचं.

🎭 Series Post

View all