Login

काही पाने उलगडलीय

खरंतर आता कुठे आयुष्याच्या पुस्तकाची पाने उलगडायला सुरुवात झालीय. पहिली काही पाने उलगडलीय ती तेव्हढीच का होईना  त्यातील काही भाग आज आपल्या समोर मांडते.
काही पाने उलगडलीय


लहानपणी शाळेत जातांना पप्पांकडे 'खोबऱ्या गोळ्या' घेण्यासाठी पन्नास पैशांचा हट्ट करणारी आज पैसे जपून खर्च करायला शिकलीय. रात्री कधीच गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारी आज स्वतः कथा लिहायला शिकलीय. बालपण किती छान असतं ना. लहानपणी वाटायचं कधी एकदाचे मोठे होतोय पण आता असं वाटतंय की ते बालपणच भारी होते. कधी कधी तर वाटते पुन्हा लहान व्हावे आणि जगावे ते क्षण पुन्हा मनसोक्त. लहानपणी शाळेत मॅडम रागावतील म्हणून अभ्यास करायचे. पण आता मात्र करिअर साठी.
खरंतर आता कुठे आयुष्याच्या पुस्तकाची पाने उलगडायला सुरुवात झालीय. पहिली काही पाने उलगडलीय ती तेव्हढीच का होईना  त्यातील काही भाग आज आपल्या समोर मांडते.
माझा जन्म दिंडोरी येथे झाला. आई गृहिणी आणि वडील शेतकरी आहेत. आमचं  छोटंसं घर शेतातच आहे. त्यामुळे शेती मातीतच लहानची मोठी झाले.
माझे दहावीपर्यंतचे शिक्षण आमच्याच छोट्याश्या निळवंडी गावातील शाळेत झाले. (निळवंडी हे गाव नाशिक जिह्यातील दिंडोरी तालुक्यात आहे.)
त्यानंतरचे माझे पदवीपर्यंतचे शिक्षण दिंडोरी येथे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठात झाले. पदवी नंतर लगेचच स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली आहे. 
माझ्या वडिलांना अभंग ऐकायची आणि गायची भारी आवड आहे. तीच गोडी मला आणि माझ्या मोठ्या भावालाही लागली. लहानपणी एकदा वडिलांनी घरी नवीन हार्मोनियम आणली. त्यांनी आणि भाऊने क्लास सुद्धा लावले. मलाही खूप इच्छा होती. त्यासाठी मी खूप हट्ट करायचे. पण मी अजून लहान आहे असं सांगून माझी समजूत काढली जाई. मी चौथीत असतांना माझ्या आजोबांचे (आईच्या वडिलांचे) वर्षश्राद्ध होते. त्या कार्यक्रमात मी अभंग गायले. सर्वांनी माझे खूप कौतुक केले होते. इतक्या जास्त लोकांसमोर मी पहिल्यांदाच गायले होते. तेव्हा खूप मोठी गायिका व्हायचं स्वप्न मी पाहिलं होतं. परंतु माझे गाण्याचे स्वप्न हे मी जसजशी मोठी होत गेले, तसे ते मागे सुटत गेले.
काही दिवसांनी मी आमच्या शाळेत तोच अभंग परिपाठाच्या वेळी गायला. मग शाळेकडून गायन स्पर्धेसाठी माझी निवड करण्यात आली. तेव्हापासून स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात झाली ती अजूनही सुरूच आहे. परंतु तेव्हाच्या स्पर्धेत आणि आताच्या स्पर्धेत खूप फरक आहे. कारण तेव्हा स्पर्धा जिंकून शाबासकी मिळविण्यासाठी सहभाग घ्यायचे, पण आता मात्र भविष्य चांगलं असावं म्हणून.. आता खऱ्या अर्थाने आयुष्याच्या स्पर्धेत उतरलेय, कारण आताचे दिवस पुढे असू नये म्हणून..  तेव्हा तर मी फक्त स्पर्धेत सहभागी झालेय म्हणून घरच्यांना माझे कौतुक वाटायचे पण आता मी जिंकलायलाच हवी अशी त्यांची खूप अपेक्षा आहे.
ह्या वेळी मी पहिल्यांदा माझ्या घरापासून इतकी दूर राहायला आलेय. खरंतर क्लासेस  करण्यासाठी वेगळ्या शहरात जाण्यची परवानगी मला खूप उशिराने मिळाली. त्यात आई वडिलांपेक्षा नातेवाईकांनी घरापासून दूर पाठवण्याचा खूप विरोध केला होता. पण घरच्यांना मी सर्व काही नीट समजावून सांगितले. आणि माझे म्हणणे त्यांना पटवून दिले. त्यामुळे त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि अजूनही करत आहेत. माझ्या आई वडिलांना कितीही मोठी आर्थिक अडचण आली तरी त्याची झळ कधी माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचू दिली नाही. जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा पहिल्यांदा मला आपलं घर काय असतं ते समजलं. परंतु नातेवाईकांचं काय करायचं हे कळेना. घरच्यांनी साथ दिली म्हणून मला क्लासेसची परवानगी तर मिळाली पण माझ्या काही नातेवाईकांना  असं झालंय कधी एकदाचं माझं लग्न लावून देताय. काही तर अडून बोलत असतात. माझ्या आई वडिलांना फोन करून मला घरी बोलावून घ्यायला सांगत असतात. हे सगळं कितीही मनाला लागत असलं तरी दुर्लक्ष करावं लागतं.
त्यात मी जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षेच्या सागरात उतरले तेव्हा समजले की इथे तर खूपच जास्त स्पर्धा आहे.
ह्या अति स्पर्धेच्या प्रवाहात माझ्या नावेला अपयशाच्या लाटा पुन्हा माघे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात समाज नावाची वादळे तर ती बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एकटा आत्मविश्वास नावाचा नावाडी जोरजोराने वल्हे मारत नावेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्याला माहित आहे कधीना कधीतरी यश नावाचा किनारा नक्कीच आपल्याला मिळणार आहे.