Jan 23, 2021
माहितीपूर्ण

कागदाचा तुकडा

Read Later
कागदाचा तुकडा

     अगदी दोन तीन वर्षांची असल्यापासूच माझा 
कागदाशी संबंध आला . त्या कागदानेच नवीन आयुष्य जगायला शिकवले . अक्षरे फार काही बरी नव्हती आणि आताही नाही . पण लिहिणे गरजेचे असते . तरच आपण पास होतो ना ! पाटी पेन्सिल पासून सुरू झालेला हा प्रवास कागदावर कधी उमटला ते कळले देखील नाही  आणि त्या कागदाच्या तुकड्यावर अन्याय सुरू झाला . बाॅल पेन , शाईचा पेन , अगदी बारीक पाॅईंन्टेड पेन वापरून झाले . बिचारा तो कागदाचा तुकडा थकला . पण अक्षरे मात्र जैसे थे . 
    आमच्या लहानपणी तर आमचे बाबा पेपर प्रिंटींगचे काम करत होतो . त्यामुळे रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या कागदाचा संपर्क होत होता . त्या  एका कोऱ्या कागदावर छापून येणारी काळी अक्षरे मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने होती आणि घरात येणारा मेहनतीचा पैसा हा कागदाच्या स्वरुपातच यायचा . कोण पास होणार आणि कोण नापास होणार हे त्या कागदावर लिहून यायचे . खरं तर खूप दिवसांनंतर कागद हातात घेतले कि असे वाटते कि त्या कोऱ्या  करकरीत , अगदी पांढरा शुभ्र कागदावर काहीच लिहू नये. मन अगदी निर्मळ असते अगदी तसाच कोरा राहू द्यावा. 
   पण , कोणालातरी हिशेब करायला , तर कोणाला भाषण लिहायला , तर कोणाला एखादे छानसे काहीतरी  वाचलेले टिपून ठेवायला हवा असतो .तर कोणाला त्यातून सुंदर कलाकृती निर्माण करायची असते . त्याच कागदावर आई - वडीलांच्या आठवणींचा एक चेहरा जतन करून ठेवलेला असतो . कधी काळी आठवण आली तर डोळे भरून बघण्यासाठी. कितीही डिजीटल शिक्षण आले तरी नवीन विकत घेतलेल्या वहीचा आणि गप्प पुस्तकांचा येणारा सुगंध विसरू शकत नाही. 
     जुन्या कागदांचा पुन्हा उपयोग म्हणजे ..त्या उरलेल्या कोऱ्या पानांची परत एक छानशी वही शिवणे . तिही स्वत: च्या हाताने तयार केलेली . किती आनंद मिळायचा ..... एकच कित्ता गिरवला जायचा . 
     एकच कागदाचा तुकडा ...  अगदी जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूप्रमाणपत्रा पर्यंत हा कागदाचा तुकडा साथ देतो . आकाशी झेप घेणाऱ्या आणि हवेत हेलकावे घेणाऱ्या  पतंगाचा आपण एक हिस्सा बनतो . लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद एक टिपायचा असेल तर रंगीत कागदाची भिरभिरणारी भिंगरी दिली तरी पुरेसे होते . हा कागद किती जणांना जवळ आणतो . किती जणांना दूरही नेतो .  किती जणांचे आयुष्य फुलवतो तर किती जणांना दुखावतोही . संपत्तीचे वाटे त्या एका कागदावर लिहीले जाते .रंगीत खडूंच्या सहाय्याने  ओढलेल्या चार रेषा देखील आपले आयुष्य रंगीबेरंगी करून टाकतात . पूजेचे महत्त्व त्या एका कागदावर अवलंबून असते. 
     कुणाचे प्रेमाचे गुलाबी पत्र आठवणींचा एक थेंब अंगावर शहारे आणतो . तर कोणी या आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतो. जुन्या काळात निरोप देण्यासाठी पत्र ,खलिता यांचा वापरच करावा लागत होता . 
    
   कागदाचा एक तुकडा आयुष्याची खिडकी दाखवतो
     मनातल्या भावनांना त्याच्या हृदयात साथ देतो 
 अपुर्ण इच्छांचे डोंगर चढण्यास वाटाड्याचे काम करतो
  वेळ आली तर कागदाच्या कपट्या प्रमाणे उंच आकाशात झेप घेतो .

कागदाची हि गंमत न संपणारी आहे . त्यामुळे मला हा लेख कागदावर जतन करून ठेवावाच लागेल. 

लेख आवडल्यास एक लाइक करा. 

सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर औरंगाबाद