कादंबरी भाग ८

Story Of A Girl
कादंबरी भाग ८

मागील भागाचा सारांश: कादंबरीने ती दुबईला जाणार असल्याचे फोन करुन आईला कळवले, पण आईला फारसा आनंद झाला नसल्याचे जाणवल्याने ती नाराज झाली होती. दुबईला जायचा दिवस उजाडल्यावर साठे मॅडमने फोन करुन कादंबरीला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कादंबरीने विमानाच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेतला.

आता बघूया पुढे……

दुबईच्या बॉर्डर पलीकडे विमान गेल्यावर कादंबरीला मोबाईलमध्ये भारतातील एक वेळ दिसत होती आणि दुसरी वेळ दुबईतील दिसत होती. भारत आणि दुबईतील वेळेत दीड तासांचा फरक होता. पुढील काही वेळेत दुबईतील विमानतळावर विमान उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली. भूमी झोपेतून उठली होती.

"कादंबरी, तू झोपली नव्हती का?" भूमीने आळस देत विचारले.

"मला झोपच येत नव्हती. तू गाढ झोपली होतीस." कादंबरीने सांगितले.

"तुला विमानाच्या प्रवासाची सवय नसेल, म्हणून असं होतं असेल. मला सवय लागली आहे. विमानात झोप लागली नाही, तर डोकं जड होतं." भूमी म्हणाली.

विमान दुबईच्या विमानतळावर उतरल्यावर सगळे प्रवाशी एकेक करुन विमानाच्या बाहेर पडत होते.

"भूमी, आपल्या बॅग्स आपल्याला कुठून मिळतील?" कादंबरीला प्रश्न पडला होता.

"आपण विमानात असताना बेल्ट नंबर १८ सांगितलाय ना, तिथे जाऊन घ्याव्या लागतील. आता आपल्याला टर्मिनल १ ला जावे लागेल. समोर जी मेट्रो दिसत आहे ना? त्यात बसून टर्मिनल १ ला जावं लागेल." भूमीने कादंबरीला माहिती दिली.

मेट्रो आल्यावर भूमी व कादंबरी त्यात बसून टर्मिनल १ ला गेल्या. मेट्रोत बसल्यावर कादंबरी म्हणाली,
"मी पहिल्यांदा मेट्रोत बसत आहे. किती मस्त आणि स्वच्छ आहे."

"ह्या मेट्रोला ड्रायव्हर नाहीये. ही ऑटोमॅटिक आहे." भूमीने सांगितलं.

मेट्रोतून उतरुन बेल्ट क्रमांक १८ला जाण्याआधी पुन्हा त्यांची तपासणी झाली. तिथेही त्यांचे पासपोर्ट, व्हिसा तपासण्यात आले. कॅमेरात फोटो काढण्यात आले. दोघींना दोन पाकीट देण्यात आले.

"ह्या पाकिटात काय असेल ग?" कादंबरीला प्रश्न पडला होता.

"इथले सिमकार्ड आहेत." भूमीने पुढे चालता चालता उत्तर दिले.

"तुला बरीच माहिती आहे ग." कादंबरी म्हणाली.

"आमच्या कंपनीतील मागे एकजण येऊन गेला त्यानेच ही माहिती पुरवली होती." बोलता बोलता त्या बेल्ट १८ जवळ येऊन पोहोचल्या होत्या. आपापल्या बॅग ओळखून कादंबरीने त्या ट्रॉलीत ठेवल्या.

"कादंबरी, गेटच्या बाहेर कॅब ड्रायव्हर हातात माझ्या नावाची पाटी घेऊन उभा असेल. त्याकडे लक्ष ठेव बरं."

कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला. गेटच्या बाहेर असल्यावर भूमीच्या नावाची पाटी घेऊन एक ड्रायव्हर उभा होता. भूमीने आपले आयकार्ड दाखवले, तेव्हा त्याने त्यांच्या सामानाची ट्रॉली आपल्या हातात घेतली. ड्रायव्हर त्यांना त्याच्या कॅबपर्यंत घेऊन गेला.

"मॅडम, प्रवास कसा झाला?" कॅबमध्ये बसल्यावर ड्रायव्हरने विचारले.

"आमचा प्रवास छान झाला. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का?" भूमीला प्रश्न पडला होता.

"वडील गुजराती आणि आई मराठी म्हणून मला मराठी बोलता येतं." ड्रायव्हरने सांगितले.

"आपल्याला हॉटेलवर पोहोचायला किती वेळ लागेल?" कादंबरीने विचारले.

"मॅडम, एक तास लागेल." ड्रायव्हरने उत्तर दिले.

रस्त्याच्या दुतर्फा दिसणाऱ्या उंच इमारतींचे निरीक्षण कादंबरी करत होती.

"कादंबरी, भूक लागली असेल ना?" भूमीने विचारले.

"हो ग. भूकही लागली आहे आणि डोळेही जड पडले आहेत." कादंबरीने उत्तर दिले.

"हॉटेलवर गेल्यावर काहीतरी ऑर्डर करुयात. तू थोडीही झोपली नाहीस, म्हणून डोळे जड पडले असतील." भूमी म्हणाली.

आजूबाजूला दिसणाऱ्या इमारती बघून कादंबरीला एकेक प्रश्न पडत होते आणि भूमी त्या प्रश्नांची न थकता उत्तरं देत होती. बोलता बोलता कॅब हॉटेल जवळ येऊन थांबली. हॉटेल मधील गार्ड येऊन बॅग घेऊन गेल्या.

रिसेप्शनला जाऊन भूमीने आपलं बुकींग कन्फर्म केलं आणि रुममध्ये जाण्याआधी जेवणाची ऑर्डर दिली. रुममध्ये गेल्यावर कादंबरी हॉटेलच्या प्रशस्त रुमचे निरीक्षण करत बसली होती. भूमी व कादंबरी दोघी फ्रेश झाल्या.

ऑर्डर केलेले जेवण रुममध्ये आले होते. दोघींनाही दाबून भूक लागल्याने त्यांनी आपले लक्ष जेवणाकडे केंद्रीत केले. जेवण झाल्यावर भूमीने हॉटेलच्या वायफायचा पासवर्ड मागवून घेतला. नेट चालू केल्यावर भूमीला धडाधड मॅसेज येत होते. भूमी एकेक मॅसेज वाचत होती.

"कादंबरी, उद्या दुपारी 2 वाजता मला वर्कशॉपसाठी जावे लागणार आहे. सकाळी आपल्याला मिळालेल्या सीमला रिचार्ज मारुन घेऊयात. उद्या दुपारी १२ वाजता तू डेझर्ट सफारीला जाणार आहेस. गाडी हॉटेलच्या खाली येऊन तुला घेऊन जाईल आणि रात्री आणून सोडेल." भूमीने कादंबरीला सगळी माहिती दिली.

"तू माझ्यासोबत येणार नाहीयेस का?" कादंबरीने आश्चर्याने विचारले.

"नाही. माझी वाट बघत बसलीस, तर तुला पूर्ण सुट्टी इथेच रुममध्ये बसून घालवावी लागेल. मला माझ्या कामातून वेळ मिळाला, तर मी तुला जॉईन करेल. आता फक्त तुला इथल्या पैशाबद्दल माहिती द्यायची राहिली. आपल्याकडे पैश्यांचे एकक जसे रुपया आहे, तसे इकडे दिरम आहे. एक दिरम म्हणजे २२ रुपये आणि वर काहीतरी पैसे असतात. उद्या सकाळी मी तुला जाताना ५०० दिरम देऊन ठेवते. जसे लागतील तसे खर्च कर. प्रत्येक ठिकाणी रुपयात बेरीज करत बसू नकोस.

दुसऱ्या देशात फिरायला आली आहेस, तर पैसे खर्च करताना जास्त विचार करु नकोस." भूमीने सांगितले.

"बरं. आता आपण दोघींनी झोपायला हवं. तरच सकाळी झोप पूर्ण होईल." कादंबरी म्हणाली.

पुढील काही वेळेत कादंबरी व भूमी या दोघीही झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भूमीने वेटरला सांगून दोघींच्या दुबईच्या नंबरवर रिचार्ज करुन घेतले.

भूमी वर्कशॉपला जाण्याची तयारी करत होती, तर कादंबरी डेझर्ट सफारीला जाण्याची तयारी करत होती.

"कादंबरी, जाताना आठवणीने गॉगल घेऊन जा. तिथे वाळवंटात गॉगल घालून फोटो काढ. सहप्रवासी जे असतील त्यांना फोटो काढायला सांगायचं. पूर्ण इंग्लिश बोलता आलं नाही, तरी इकडे सगळ्यांना हिंदी कळतं. तुला भाषेची काहीच अडचण येणार नाही." भूमी लॅपटॉप मध्ये बघून बोलत होती.

"हो. मी भरपूर फोटो काढेल. मी युट्यूबवर डेझर्ट सफारीचा व्हिडीओ बघितला होता, त्यात डून बॅशिंग आहे, ते जरा कठीणच वाटतंय ग." कादंबरी म्हणाली.

"हो, पण मजा येते. मी स्वतः अनुभवलं नाहीये, पण तसं ऐकलं आहे." भूमीने सांगितले.

डेझर्ट सफारीला जाण्याआधी कादंबरीने हॉटेलवर नाश्ता करुन घेतला होता. तिकडे गेल्यावर भूक लागल्यावर खाण्यासाठी डब्यात रव्याचे लाडू तिने घेतले होते.

बरोबर १२ वाजता गाडी हॉटेलच्या खाली आल्यावर कादंबरी भूमीचा निरोप घेऊन खाली उतरली. गाडीत बसून ती डेझर्ट सफारीच्या दिशेने रवाना झाली.

डेझर्ट सफारीची गाडी एकेक स्टॉपवर थांबत होती, त्यात लोकं बसत होते. कादंबरी खिडकीच्या बाजूला बसली होती. खिडकीतून बाहेर बघून आपले मन रमवत होती. अनोळखी लोकांमध्ये तिचा हा पहिला प्रवास होता.

साधारण एक ते दीड तासाने गाडी वाळवंटात जाऊन रस्त्याच्या कडेला थांबली. गाडीतील सगळे प्रवासी खाली उतरले. कॅम्पपर्यंत जाण्यासाठी वेगळ्या गाड्या होत्या. स्कॉर्पिओची वाट बघत सगळे प्रवासी थांबले होते. कादंबरीला कोणाशी बोलावे तेच कळत नव्हते.

"एक्स्क्यूज मी, माझा एक फोटो काढाल का?" कादंबरीला मराठीतून आवाज आल्याने तिने आश्चर्याने मागे वळून बघितले.

कादंबरी समोर एक बत्तीस-तेहतीस वर्षांचा मुलगा डोळ्याला गॉगल लावून उभा होता.

"तुम्हाला कसं कळलं की, मी महाराष्ट्रीयन असेल म्हणून?" कादंबरीने त्याला विचारले.

तो मुलगा हसून म्हणाला,
"तुम्ही कोणाशी तरी आत्ता फोनवर बोलत होत्या ना."

तेव्हा कादंबरीला आठवले की, ती भूमीसोबत फोनवर बोलली होती.

कादंबरीने त्या मुलाच्या हातातून त्याचा मोबाईल घेतला आणि त्याचे तीन ते चार फोटो काढले.

"तुमचे फोटो काढायचे असतील, तर मी काढतो." तो मुलगा म्हणाला.

कादंबरीने त्याच्याकडे आपला मोबाईल दिला. पर्समधून गॉगल काढून डोळ्यावर चढवला. कादंबरीने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. कादंबरीचा मोबाईल तिला देताना तो मुलगा म्हणाला,
"तुमचं नाव कादंबरी आहे का?"

कादंबरीने त्याच्याकडे डोळे मोठे करुन बघितले. 'हा मुलगा आपल्याला नावाने कसा ओळखू शकतो?' हा प्रश्न तिच्या नजरेत होता.

"माझ्याकडे असं एकटक बघत राहणार की, काही बोलणार आहात?" तो मुलगा बोलत असतानाच गाडीचा ड्रायव्हर त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,
"सर, मॅडम आप उस गाडी में बैठ लो. दो जगह खाली हैं."

तो मुलगा व कादंबरी स्कॉर्पिओ मध्ये जाऊन बसले. ड्रायव्हरने सीट बेल्ट बांधून घ्यायला सांगितले. स्कॉर्पिओ गाडी आता वाळवंटातून रस्ता काढत निघाली होती. मध्येच एखाद्या उंचवट्यावरुन गाडी घातली की, गाडीतील सगळेजण उंच उडायचे. गाडी खाली उतरली की पुन्हा सगळेजण खाली बसायचे. गाडी वाळूतून चालत असल्याने काचेवर धुरळा उडायचा आणि त्या धुरळ्यातून ड्रायव्हर गाडी पुढे घेऊन जायचा.

कादंबरीला सुरुवातीला भीती वाटत होती, पण नंतर मजा वाटायला लागली होती. गाडी वर उडाली की, तिच्या पोटात भीतीने गोळा उठायचा. चढउतार करत गाडी कॅम्पपर्यंत पोहोचली होती. कादंबरीला डून बॅशिंग आवडले होते. गाडीतून खाली उतरल्यावर समोर सफेद कापडाच्या राहुट्या होत्या. बाहेर तिकडचे उंट, घोडा, वाळवंटात चालणाऱ्या गाड्या उभ्या होत्या.

"कादंबरी, इकडे तुम्हीही एकट्या आला आहात आणि मीही एकटाच आलेलो आहे. आपण एकमेकांसोबत ओळख करुन घेतली, तर तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि मलाही." तो मुलगा कादंबरीला पुढे जाण्यापासून थांबवत म्हणाला.

"माझं नाव तुम्हाला कसं माहीत? मी तुम्हाला याआधी कधीच भेटलेले नाहीये." कादंबरीने कपाळावर आठ्या आणत विचारले.

तो मुलगा कोण असेल? तो कादंबरीला कसा ओळखत असेल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all