Login

कादंबरी भाग ७

Story Of A Girl
कादंबरी भाग ७

मागील भागाचा सारांश: भूमीला कामानिमित्ताने दुबईला जायचे होते. तिने कादंबरीला आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. कादंबरी कडे पासपोर्ट नव्हता. भूमीच्या मदतीने कादंबरीने पासपोर्ट काढला आणि दुबईला जाण्याचे तिकीट बुक केले.

आता बघूया पुढे….

पाच-सहा दिवसांनी भूमी व कादंबरीने स्वतःसाठी कपड्यांची, बॅगची खरेदी केली. कादंबरी नाही म्हणत असताना भूमीने तिला बऱ्याच वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले.

दुबईला जायला पंधरा दिवस बाकी असताना व्हिसा आला होता. जवळपास सगळीच खरेदी करुन झाली होती. एके दिवशी कादंबरी उदास चेहऱ्याने खिडकीतून बाहेर बघत होती. कादंबरीला उदास बघून भूमीने विचारले,

"कादंबरी, खिडकीतून खाली काही पडलंय का?"

कादंबरीने आपली नजर भूमीकडे वळवली, मग ती म्हणाली,
"भूमी, मी कसलातरी गहन विचार करत आहे आणि तुला त्यातही गंमत करावी वाटतेय."

"अरे बापरे, कादंबरी मॅडम खरंच विचार करत होत्या. विचार करायला डोकं लागतं आणि ते तुझ्याकडे आहे, मला माहीतचं नव्हतं ग." भूमी हसत म्हणाली.

"भूमी, कृपया आत्ता गंमत नको. माझा मूड अजिबात चांगला नाहीये." कादंबरी अतिशय शांतपणे म्हणाली.

दोन्ही हाताने कान पकडून भूमी म्हणाली,
"बरं, गंमत करत नाही. चुकलं माझं, पण तू इथे खिडकीत किती वेळ ताटकळत उभी राहणार आहेस? जरा बसून तुझ्या डोक्यात काय सुरु आहे? हे सांगितलं तर बरं होईल."

कादंबरी जिथे उभी होती, त्याच कोपऱ्यात खाली बसली. कादंबरीच्या डोळयात पाणी आलं होतं. भूमी तिच्याजवळ जाऊन बसली आणि नजरेनेच कादंबरीला "काय झाले?" म्हणून तिने विचारले.

"आपण दुबईला जाणार आहोत, हे सांगण्यासाठी मी आईला फोन केला होता. मी विमानात पहिल्यांदा बसणार आहे, याचा मला खूप आनंद होत होता, तो व्यक्त करण्यासाठी मी तिला फोन केला होता. आईच्या बोलण्यावरुन तिला माझं दुबईला जाणं एवढं काही पटलेलं दिसलं नाही. मी जास्त काही बोललेच नाही. थोडक्यात बोलणं आटोपून मी फोन बंद केला." कादंबरीने डोळे पुसत सांगितले.

"एवढंच ना. अग आई काहीतरी वेगळ्या कामात असेल किंवा तिची मनस्थिती वेगळी असेल. एवढं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये." भूमीने कादंबरीला समजावून सांगितले.

"तुला माहितीये भूमी, माझं शिक्षण चालू असताना मला नोकरी करायची आहे, विमानात बसून जग फिरायचं आहे, हे स्वप्न आईला सांगितलं की, आईचं ठरलेलं ब्रीदवाक्य असायचं, 'लग्न झाल्यावर हवं ते कर.' भूमी, लग्न झाल्यावर खरंच हवं ते करता येतं का?

आता हे फक्त माझ्या आईचं वाक्य नाहीये, जवळपास सगळ्याच आया आपल्या मुलींना असं सांगत असतात. लग्न झाल्यावर त्या आयांच्या मनासारखं सगळ झालं होतं का? त्या त्यांच्या मुलींना लग्न झाल्यावरची आशा दाखवतात, त्यांनी स्वतःचं उदाहरण तरी डोळ्यापुढे ठेवायला हवं ना.

मला मान्य आहे की, प्रत्येक आईला आपल्या मुलीची काळजी वाटते, पण त्या काळजीपोटी त्या मुलीच्या मनाचा विचार का केला जात नाही?

मुलगा- मुलगी समान हे फक्त म्हणायला झालंय. अजूनही प्रत्येक घरात मुला-मुलीमध्ये भेदभाव केला जातो. मुलीला अजूनही मुलाइतकं स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. मुलगा रात्रीचा एकटा प्रवास करु शकतो, पण मुलगी एकटी प्रवास करु शकत नाही.

मुलीची इज्जत वाचावी, म्हणून तिला घरात बसायला सांगितलं जातं, मग मुलीची इज्जत वाचावी म्हणून मुलाला घरात बसवलं का जात नाही? मुलीचा आदर करावा, ही शिकवण मुलाला का दिली जात नाही?" कादंबरीला पडलेले प्रश्न ती भूमी समोर मांडत होती.

यावर भूमी थोडा विचार करुन म्हणाली,
"कादंबरी, तुला जे प्रश्न पडलेत, ते मलाही पडलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीच फायदा होणार नाही. आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो, तिथे हे असंच चालत आलं आहे. हळूहळू या सगळ्यात बदल होतो आहे. आपल्या पुढील काही पिढ्या हे स्वातंत्र्य नक्कीच अनुभवतील. आपण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच ना.

आता तू या सगळ्याचा विचार करुन मूड ऑफ करुन घेऊ नकोस. तुला लाडू करुन सोबत घ्यायचे आहेत, हे विसरली नाहीस ना? माझ्यासाठीही घे बरं."

"तुझं हे नेहमीचंच झालंय, आधी नाही म्हणते आणि नंतर मागत बसते. मला तुझा स्वभाव माहीत झाला आहे. मी तुझ्या वाट्याचे लाडू घेणारच होते." कादंबरीने सांगितले.

बोलता बोलता दुबईला जाण्याचा दिवस येऊन ठेपला होता.

"कादंबरी, सगळं सामान बॅगमध्ये भरलंय ना? सगळ्यात महत्त्वाचं तिकीट, पासपोर्ट आणि व्हिसा एकदा तपासून घे." भूमी आपली बॅग भरत असताना म्हणाली.

"भूमी, दुपारपासून पाचव्या वेळेस मला हा प्रश्न विचारला आहेस. मी सगळं व्यवस्थित ठेवलं आहे." कादंबरीने भूमीसमोर बॅग आणून ठेवत सांगितले.

भूमीचा मोबाईल वाजल्यावर तिने फोन स्पिकरवर ठेवला,
"कादंबरी, आईला तुझ्यासोबत बोलायचं आहे."

"बोला साठे मॅडम, काय म्हणत आहात?" कादंबरीने फोनजवळ येऊन विचारले.

"हॅपी जर्नी कादंबरी, हे आमचं भूत नेहमीचं इकडे तिकडे फिरत असतं. तू पहिल्यांदा विमानात बसून सातासमुद्रापार जाणार आहेस. मंदिरात भेटलेली तू आणि आज दुबईला जाणारी तू, यात किती मोठी तफावत आहे." साठे मॅडम म्हणाल्या.

साठे मॅडमचं बोलणं तोडत कादंबरी म्हणाली,
"मॅडम, त्या दिवशी मंदिरात तुम्ही भेटल्या नसत्या, तर आजचा दिवस माझ्या आयुष्यात कधीच उगवला नसता. तुमचे आणि भूमीचे आभार मानण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतील." कादंबरी म्हणाली.

"आई, ऐक ना. आम्हाला पुढच्या अर्ध्या तासात निघावं लागणार आहे. कादंबरीने अजून कपडे बदललेले नाहीत. एकतर हिचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरु झाला की, तीही रडेल आणि आपल्यालाही रडवेल. आता यावेळी ते परवडणार नाहीये. मी तुला विमानतळावर पोहचल्यावर फोन करते." भूमीने मध्येच बोलून फोन बंद केला.

"कादंबरी, आता पटकन कपडे घालून तयार हो. मी कॅबवाल्याला फोन करते." भूमी मोबाईल मध्ये बघता बघता म्हणाली.

कादंबरी पुढील दहा मिनिटात आतल्या रुममध्ये जाऊन तयार होऊन आली. भूमी कादंबरीकडे बघून म्हणाली,
"कादंबरी, काय दिसते आहेस यार! जीन्स, टॉपमध्ये एक वेगळीच कादंबरी दिसत आहेस."

भूमी कादंबरीकडे आ वासून बघत होती.
"आता आपल्याला उशीर होत नाहीये का?" कादंबरीने विचारले.

"काय जमाना आहे राव? तुझंच कौतुक करत आहे, तर तेही ऐकायला वेळ नाहीये." भूमी आपल्या जागेवरुन उठत म्हणाली.

भूमी आधीच तयार झालेली होती. कॅब बिल्डिंगच्या खाली येऊन उभी राहिल्यावर सगळ्या बॅग घेऊन घराला कुलूप लावून कादंबरी व भूमी कॅब मध्ये जाऊन बसल्या. कॅब घराच्या इथून निघाल्यावर भूमीने कादंबरी सोबत एक सेल्फी काढला आणि तो लगेच स्टेटसला टाकला, फोटोखाली कॅप्शन लिहिले "एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली."

विमान मुंबई वरुन असल्याने या दोघींना नाशिक-मुंबई हा प्रवास आधी करावा लागला. पुढील चार तासांत मुंबई विमानतळावर गाडी पोहोचली. कॅब मधून ड्रायव्हर सामान काढेपर्यंत कादंबरी जवळचं असलेली ट्रॉली घेऊन आली. ट्रॉलीवर बॅग चढवल्या. भूमीच्या पायामुळे तिने फक्त एक हलकी सॅक पाठीवर अडकवली होती.

विमातळाच्या प्रवेशद्वारात पासपोर्ट आणि तिकीटाची तपासणी झाल्यावर दोघीजणी आत गेल्या. भूमी कादंबरीला सगळं काही समजावून सांगत होती. विमान ज्या एअरलाईन्स कंपनीचे होते, त्या काऊंटरवर जाऊन बॅग सील केल्या, मग दुसऱ्या काऊंटरवर जाऊन सामानाच्या बॅग जमा करण्यात आल्या. त्या काऊंटरवर बोर्डिंग पास मिळाले होते.

पुढील काहीवेळ भूमी व कादंबरीने विमानतळाचे निरीक्षण केले. कादंबरीसाठी ते सगळं काही नवीन होतं. अर्ध्या तासाने भूमी व कादंबरी विमानाच्या दरवाजाकडे जाणाऱ्या रांगेत उभ्या राहिल्या. सगळे कागदपत्र तपासण्यात आले. कॅमेरात फोटो घेण्यात आला. व्हिसावर स्टॅम्प मारण्यात आला.

पुढे गेल्यावर मोबाईल, घड्याळ, कंबरेचा बेल्ट, लॅपटॉप, आपल्या जवळील पर्स एका ट्रे मध्ये ठेवण्यात आले. ते सगळं मशिनमधून तपासण्यात आलं. भूमी व कादंबरीची तपासणी एका स्त्री गार्डने मेटल डिटेक्टर फिरवून केली.

आपलं सगळं सामान घेऊन भूमी व कादंबरी एका बेंचवर जाऊन बसल्या. ज्या दरवाजातून त्यांना त्यांच्या विमानाकडे जावं लागणार होतं, तिथे जवळचं त्या बसल्या होत्या.

"कादंबरी, आपल्याकडे अजून एक तास वेळ आहे. तुला भूक लागली असेल ना, तर फूड कोर्ट मध्ये जाऊन काहीतरी खाऊन येऊ शकतो." भूमीने सुचवले.

"भूमी, मी घरुन निघताना पराठे घेतले होते, ते विसरलीस का? पराठे आणि एक लाडू खाऊन घेऊ. उगीच लगेच पैसे कशाला खर्च करायचे? तसंही मी ऐकलं आहे, विमानात आणि विमानतळावर खाद्यपदार्थ खूप महाग मिळतात." कादंबरी म्हणाली.

भूमीने मान हलवून होकार दर्शवला. दोघींनी पराठे आणि लाडू खाल्ला. पुढील काही वेळाने इमिग्रेशन सुरु झाले आणि दरवाजा उघडण्यात आला. बोर्डिंग पास आणि पासपोर्ट तपासून एकेक प्रवाश्याला दरवाजातून आत सोडले.

कादंबरीने सगळ्याचे बारकाईने निरीक्षण केले. विमानाच्या दरवाजात स्वागताला हवाईसुंदरी सज्ज होत्या. सीट नंबर शोधून कादंबरी व भूमी विमानात स्थानापन्न झाल्या. सीटबेल्ट कसा लावायचा? हे भूमीने कादंबरीला सांगितले होते. पुढील काही वेळात विमानाचे उड्डाण होणार होते. हवाईसुंदरीने सगळ्या प्रवाशांना सूचना दिल्या. कादंबरी खिडकीच्या बाजूला बसली होती.

विमान धावपट्टीवरुन धावता धावता विमानाचा अचानक वेग वाढून ते आकाशात कसं झेप घेतं? याचं निरीक्षण खिडकीतून बाहेर बघून कादंबरी करत होती. कादंबरीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून भूमीला छान वाटत होते. लहान मुलं बसमध्ये खिडकीच्या बाजूला बसून प्रवासाचा आनंद घेत असतात, तसाच आनंद कादंबरी विमानाच्या प्रवासाचा घेत होती.

"कादंबरी, तुला झोप येत नाहीये का? जरावेळ झोपून घे. आपल्याला दुबईला पोहाचायला अजून अडीच ते तीन तास लागतील. विमानतळावरुन हॉटेल किती दूर आहे? हे सांगता येणार नाही. थोडा आराम करुन घे." भूमीने सांगितले.

"तू झोप. मला झोप लागल्यावर मी झोपते." कादंबरीने चेहऱ्यावर हसू आणून सांगितले.

भूमी डोळे मिटून पडली होती. काही वेळाने कादंबरीचे डोळे जड पडल्यावर तिनेही झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही झोप लागत नव्हती. कादंबरीला झोप तरी कशी लागणार होती? उघड्या डोळ्याने बघितलेले तिचे स्वप्न पूर्ण होत होते. झोप येत नसल्याने कादंबरी कानात हेडफोन टाकून गाणे ऐकत बसली होती.

आयुष्याची इतकी वर्षे बसमध्ये कानात हेडफोन घालून गाणे ऐकत प्रवास करणारी कादंबरी आज विमानाचा प्रवास गाणे ऐकत करत होती आणि तेही स्वबळावर. कादंबरीला स्वतःचाच अभिमान वाटत होता. अशक्य वाटणारी गोष्ट कादंबरीने शक्य करुन दाखवली होती. अर्थात भूमी तिच्या सोबत असल्याने हे सगळ शक्य झालं होतं.