कादंबरी भाग ६

Story Of A Girl
कादंबरी भाग ६

मागील भागाचा सारांश: भूमी कादंबरीला मदत का करत आहे? हे तिने सांगितले. भूमीने स्वतःबद्दलची माहितीही कादंबरीला सांगितली. भूमीच्या मदतीने कादंबरीला नोकरी मिळाली होती. कादंबरी आनंदी राहू लागली होती.

आता बघूया पुढे….

"तुझा रुसवा जाण्यासाठी मला कोणती शिक्षा भोगावी लागेल?" कादंबरीने भूमी समोर उभे राहून विचारले.

"तुला माझ्यासोबत दुबईला यावं लागेल." भूमीने अतिशय शांतपणे उत्तर दिले.

"काय म्हणालीस?" कादंबरी जोरात म्हणाली.

"दोन महिन्याने आमच्या कंपनीचं एक वर्कशॉप दुबईला आहे. जवळपास आठ ते दहा दिवस मी दुबईला जाणार आहे. तू माझ्यासोबत दुबईला येणार आहेस, त्या निमित्ताने तुझी दुबई फिरुन होईल." भूमीने ओठ रुंदावून सांगितले.

कादंबरीच्या जवळ एक खुर्ची होती, त्यात ती बसून म्हणाली,
"भूमी, दुबई म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाण्यासारखे आहे का? रात्री ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी गेलं. दुबईला जायचं म्हटल्यावर पासपोर्ट लागेल, जो माझ्याकडे नाहीये. दुसरं म्हणजे खर्च खूप येईल."

"कादंबरी, पासपोर्ट एवढ्या महिनाभरात येऊन जाईल, त्याची तू काळजी करु नकोस. खर्चाचं म्हणशील, तर तू गेल्या सहा महिन्यांपासून कमवते आहेस. तिकीट आणि व्हिसा त्यात होऊन जाईल. दुबईत रहाण्यासाठी कंपनीने माझ्यासाठी हॉटेलची रुम बुक केलेली आहे. नाश्ता आणि दोन वेळेचं जेवण आपल्याला मोफत मिळेल. आता फक्त प्रश्न तिथे फिरताना येणाऱ्या खर्चाचा आहे, तर ते पैसे मी तुला देते. मला हळूहळू परत देऊन टाक." भूमीने कादंबरी सर्व शंकांचे निरसन केले.

"ते सगळं ठीक आहे, पण मला एवढी सुट्टी मिळेल का?" कादंबरीने विचारले.

"यार कादंबरी, तुझे प्रश्न संपतचं नाहीत. आजपासून सुट्टी टाकून ठेवलीस, तर नक्कीच मिळेल." भूमीने सांगितले.

"पासपोर्ट काढायला कोणते कागदपत्रे लागतात? ते सांग. मी रात्री काढून ठेवते. मी कितीही नाही म्हणाले तरी तू थोडीच ऐकणार आहेस. एक नंबरची हट्टी आहेस." कादंबरी भूमीचे गाल ओढून स्वयंपाक घरात पळून गेली.

दुसऱ्या दिवशी भूमीने कादंबरीचे सर्व कागदपत्रं घेऊन पासपोर्ट साठी अर्ज केला. पंधरा दिवसांनी इंटरव्ह्यूची तारीख मिळाली होती. कादंबरीने कंपनीत सुट्टीसाठी अर्ज दिला होता, कादंबरीचा परफॉर्मन्स बघून कंपनीचे मालक तिच्यावर खुश होते, त्यांनी लगेच तिच्या सुट्टीचा अर्ज मंजूर केला.

"भूमी, आमच्या सरांनी माझ्या सुट्टीचा अर्ज मंजूर केला." कादंबरीने खुश होऊन भूमीला सांगितले.

"अरे वा, एकदम मस्त. आता तर कसलीच काळजी राहिली नाही. आता पंधरा दिवसांनी तुझा इंटरव्ह्यू आहे, तो झाला की, दोन ते तीन दिवसांनी पोलिस व्हेरिफिकेशन होईल. पुढील एका आठवड्याच्या आत तुझा पासपोर्ट घरी येऊन जाईल. मग आपण तिकीट बुक करुयात. जाण्याच्या आठ दिवस आधी व्हिसासाठी अर्ज करुयात, पुढील चोवीस तासात व्हिसा येऊन जाईल.

आता हे सगळं ट्रॅव्हलिंगचं झालं. दुबईला जाण्यासाठी कपड्यांची शॉपिंग करावी लागेल. जीन्स, टॉप, वनपीस हे सगळे घ्यायचे आहेत." भूमीने सगळं काही सविस्तरपणे सांगितले.

यावर कादंबरी म्हणाली,
"भूमी, आता मागेच खरेदी केली होती. आता पुन्हा नवीन कपडे कशाला घ्यायचे?"

"कादंबरी बाळा, आपण दुबईत एकदाच जाणार आहोत, निदान तू तरी. मला काम असलं की मी जातचं राहिलं. तिकडे गेल्यावर छान फोटो काढायचे. आठवणी गोळा करायच्या. तुझ्याकडे जे कपडे आहेत, तेही कपडे तू तिकडे घालू शकतेस, पण नवीन कपडे घातलेत, तर त्याने सकारात्मकता येते. थोडं वेगळं काहीतरी वाटतं. हा एक वेगळा अनुभव घ्यायला काही हरकत नाही ना?" भूमीने सांगितले.

कादंबरी हात जोडून म्हणाली,
"हे भूमी माते, माझंच चुकतं, मीच तुला नको ते प्रश्न विचारते. तुला कीर्तन करायला विषयचं लागतो."

भूमी जोरजोरात हसली, मग ती म्हणाली,
"मी आणि माता! माझं बोलणं ते कीर्तन? वा, काय उपमा दिलीस."

भूमीचं हसणं बघून कादंबरीही हसायला लागली.

"तुझ्यासोबत खिदळत बसून चालणार नाही. मला स्वयंपाक करायचा आहे." कादंबरी आपल्या जागेवरुन उठत म्हणाली.

"कादंबरी, आज आपण बाहेर काहीतरी खायला जाऊयात. आज स्वयंपाकाला सुट्टी." भूमीने जाहीर करुन टाकले.

"जेव्हा बघावं तेव्हा बाहेरचं खायचं असतं आणि म्हणे मला बारीक व्हायचंय." कादंबरी रागात म्हणाली.

"ये मुली, माझ्या आईचा डायलॉग चोरायचा नाही बरं." भूमीने आपली प्रतिक्रिया दिली.

"भूमी, साठे मॅडम तुला कधीच भेटायला येत नाहीत का?" कादंबरीने विचारले.

"पहिली गोष्ट म्हणजे मला अश्या अवस्थेत आईला बघवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने मला भेटायला येणं हे बाबांना आवडत नाही." भूमीने उत्तर दिले.

"पण का?" कादंबरीने आश्चर्याने विचारले.

"मी निवडलेलं प्रोफेशन बाबांना कधीच आवडलं नाही. पाय फ्रॅक्चर झाला, त्यावेळी मी जवळपास दोन महिने घरी होते, तेव्हा बाबांचं जे काही बोलणं ऐकलं, त्यावरुन पुन्हा त्या घरात पाय ठेवायचा नाही, हे ठरवलं होतं. बाबांचं म्हणणं होतं की, एखाद्या अपंग मुलासोबत लग्न करुन घे. मला ते मान्य नव्हतं. आमचं दोघांचं एके दिवशी खूप वाजलं आणि मी रागात बॅग भरुन इकडे निघून आले. त्या दिवसापासून आमच्यात काहीच संवाद झाला नाहीये. आई वरचेवर फोन करुन माझी चौकशी करत असते." डोळ्यातील पाणी पुसत भूमीने सांगितले.

"आपल्या जवळचे लोकं आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा मनाला खूप यातना होतात. माझी आई महिन्यातून एखाद्या वेळेस फोन करते, पण आई मला घरी कधीच ये म्हणत नाही. आता मागच्या महिन्यात आईचा फोन आला नव्हता, म्हणून मी फोन केला, तर फोन बाबांनी उचलला. पुन्हा या घरात फोन करायचा नाही, असं सांगितलं.

पुढच्या दोन ते तीन दिवसांनी आईचा फोन आला होता. तिला सांगून टाकलं की, मी पुन्हा स्वतःहून तुला फोन करणार नाही. हे असं काही ऐकलं की, खूप त्रास होतो." कादंबरीच्याही डोळयात पाणी आले होते.

"आपण आपल्या रडकथांवर काय रडत बसलो? आज आपण रिक्षाने स्टेट बॅंकेजवळच्या चौपाटीवर जाऊयात. तिथली प्रसिद्ध दाबेली खाऊयात. पाणीपुरी, चायनीज, पावभाजी असं बरंच काही मिळतं. सगळं खाऊन झाल्यावर कापसेची कुल्फी खाऊयात." भूमी चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली.
—---------------------------------------------------
एके दिवशी संध्याकाळी कादंबरी कंपनीतून नेटकीच आलेली होती. भूमी लॅपटॉप मध्ये आपलं काम करत बसलेली होती.

"भूमी, उद्या सकाळी १० वाजता पोलिस स्टेशनला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे." कादंबरीने भूमीला माहिती दिली.

"कंपनीतून सुट्टी घेतली का?" भूमीने लॅपटॉप मध्ये बघून विचारले.

"दोन तास उशीर होईल, असं सांगितलं आहे." कादंबरीने उत्तर दिले.

"नेमकी माझी त्यावेळेस महत्त्वाची मिटिंग आहे, नाहीतर मी तुझ्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये आले असते." भूमीने लॅपटॉप मधून मान वर काढून सांगितले.

"अग, काही हरकत नाही. तसंही तू माझ्यासोबत यायला पाहिजे, म्हणून मी तुला सांगितलं नव्हतं. मी एकटी पोलिस स्टेशनला जाईल. हाही अनुभव एकटीने घेऊन बघते." कादंबरी म्हणाली.

यावर भूमी टाळी वाजवून म्हणाली,
"ये हुई ना बात. आता कशी माझी मैत्रीण शोभते आहेस. तुझ्यात हळूहळू होणारा बदल माझ्यासाठी अभिमानास्पद आहे."

"हम्मम, पण याचं सगळं श्रेय तुला जातं. तुझ्याशी बोलत काय बसले? तू तुझं काम कर. मी जरा स्वयंपाकाचं बघते." कादंबरी बोलून किचनमध्ये निघून गेली.

दुसऱ्या दिवशी कादंबरी एकटीचं पोलिस स्टेशनला गेली होती. पोलिस व्हेरिफिकेशन झाल्यावर ती तेथून थेट कंपनीत गेली. पुढील चार ते पाच दिवसांत कादंबरीचा पासपोर्ट पोस्टाने घरी आला होता. पासपोर्ट आल्यावर भूमीने लगेच तिचेही तिकीट बुक करुन टाकले.

"भूमी, मला एक सांग. माझ्याकडे अजून व्हिसा नाहीये, तरी तिकीट कसे बुक झाले?" कादंबरीला प्रश्न पडला होता.

"अग, व्हिसा मिळण्यासाठी तिकीट लागतं. तुझा किंवा माझा हा ट्रॅव्हलिंग व्हिसा आहे. पासपोर्ट असला की तिकीट बुक होतं आणि व्हिसा मिळण्यासाठी पासपोर्ट आणि तिकीट दोन्ही लागतं. व्हिसासाठी आपल्याला वेगळ्या साईजचा फोटो लागेल. येत्या दोन ते तीन दिवसात आपण फोटो काढायला जाऊयात. आपले सगळे कागदपत्रं व्हिसा काढणाऱ्याकडे पाठवून ठेवते, म्हणजे वेळेत व्हिसा मिळून जाईल. आता आपली शॉपिंग कधी करायची? ते ठरवून ठेव." भूमीने कादंबरीला समजावून सांगितले.

कादंबरी तिकीटावर वेळ बघत होती, ते बघून ती म्हणाली,
"हे काय यार, मला विमानातून ढग बघायचे होते. आकाशात उडतानाचा आनंद घ्यायचा होता. दोन्ही विमानं रात्रीची आहेत. आता रात्रीच्या वेळी मला ढग दिसणार नाही."

यावर भूमी हसून म्हणाली,
"आपण भारतात कुठेतरी जाऊयात, मग तुझी ढग बघण्याची इच्छा पूर्ण करुयात."

"मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे, म्हणून माझी ही इच्छा आहे. तुला तो आनंद कळणार नाही. तू माझी उडव?" कादंबरी लटक्या रागात बोलत असतानाच भूमीचा फोन वाजला आणि दोघींचं संभाषण तिथेच थांबलं.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all