कादंबरी भाग ५

Story Of A Girl
कादंबरी भाग ५

मागील भागाचा सारांश: मंदिराच्या प्रांगणात कादंबरीची भेट साठे मॅडम सोबत झाली होती. कादंबरीने आपली व्यथा मॅडमपुढे मांडली. साठे मॅडमने तिला त्यांच्या मुलीकडे भूमीकडे नाशिकला जाऊन तिकडे नोकरी करण्यास सुचवले. कादंबरीने मॅडमने दाखवलेल्या मार्गावर चालायचे ठरवले. कादंबरी भूमीकडे नाशिकला गेली.

आता बघूया पुढे….

"माझा आणि तुमचा म्हणावा असा काहीच संबंध नाहीये. साठे मॅडमची एक विद्यार्थिनी एवढीच काय ती माझी ओळख, तरीही तू माझी एवढी मदत का करत आहेस?" कादंबरीने तिच्या मनातील प्रश्न विचारला.

यावर भूमी म्हणाली,
"कादंबरी, तू हुशार होतीस, कॉलेजमध्ये पहिली आली होती, हे मला आईकडून कळलं होतं. तुलाही पुढे काहीतरी करण्याची जिद्द होती, पण सभोवतालच्या परिस्थितीमुळे तसं घडलं नाही. आजरोजी तुला एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याची गरज आहे आणि त्या प्रवासात जर मी वाटाड्या बनून मार्ग दाखवू शकले, तर माझ्यासारखी भाग्यवान मीच.

अडलेल्या नडलेल्यांची मदत करणे, आपलं कर्तव्य आहे, अशी आई नेहमी सांगत असते. आपल्यात दुसरं कुठलं नातं नसलं, तरी माणुसकीचे नाते आहेच ना. आपण दोघी चांगल्या मैत्रिणी होऊ शकू. आता ही झाली या सगळ्यामागील फिलॉसॉफी. आता मी तुला मदत करण्यामागील खरं कारण सांगते.

तू शेवटच्या वर्षात असताना सबमिशनच्या आदल्या दिवशी तुझं जर्नल हरवलं होतं. तू एक रात्र जागून जर्नल पूर्ण केलं होतं. तुला हे आठवत आहे का?"

"हो. ती रात्र मी कशी विसरु शकेल. रात्रभर जर्नल लिहून हात किती दुखत होता. जर्नल हरवलं म्हणून मी किती रडले होते, पण इथे त्या जर्नलचा काय संबंध?" कादंबरीने आश्चर्याने विचारले.

"संबंध आहे, कारण ते जर्नल मी चोरलं होतं. तू लायब्ररीत अभ्यास करत असताना हळूच तुझ्या बॅगमधून काढलं होतं. ते जर्नल मी शिवसाठी चोरलं होतं. मला तो आवडत होता, त्यालाही मी आवडावी म्हणून तो उपद्व्याप केला होता." भूमीने सांगितले.

"अग, तो किती उडानटप्पू मुलगा होता. तू त्याच्यासाठी माझं जर्नल चोरलं होतं. तू तर आमच्या कॉलेजमध्ये नव्हतीस ना, मग तुझी आणि शिवची ओळख कशी काय झाली?" कादंबरी म्हणाली.

"शिव माझ्या मैत्रिणीच्या घराशेजारी राहत होता. मला त्याची उडानटप्पूगिरी आवडत होती. शिव पास व्हावा, म्हणून मी तो मूर्खपणा केला होता. शिव नापास झाला आणि सगळंच संपलं." भूमीने सांगितले.

"शिव आणि तुझ्यात काही होतं का? तो नापास झाल्यामुळे काय संपलं?" कादंबरीने विचारले.

"शिवला मी कधीच आवडत नव्हते. मी त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होते. शिव नापास झाल्यावर मला न सांगता गाव सोडून गेला होता. मी त्याच्या आठवणीत खूप रडले होते, तेव्हा माझ्या मैत्रिणीने सांगितलं की, शिवला आधीपासूनच दोन गर्लफ्रेंड होत्या. शिव पास व्हावा, म्हणून मी त्याची खूप मदत केली होती, त्याने त्या उपकारांची जाण सुद्धा ठेवली नव्हती. माणसांची पारख नसणारं अल्लड वय होतं." भूमीने उत्तर दिले.

"शिव मिळाला नाही, म्हणून तू आजवर लग्न केलं नाही का?" कादंबरी म्हणाली.

"नाही ग, मला फिरायला खूप आवडायचं. मी एक सोलो ट्रीप केली होती आणि त्यानंतर एकटं फिरण्याची आवड निर्माण तयार झाली. कम्प्युटर इंजिनिअर झाल्याने जिथे फिरायचे, तेथील फोटो, व्हिडीओ काढून ते व्यवस्थित एडिट करुन सोशल मीडियावर पोस्ट करत होते.

माझ्या फोटोज व व्हिडिओजला बरेच लाईक्स मिळायला लागले होते, त्यात एका ट्रॅव्हलिंग कंपनीने माझ्याशी संपर्क केला आणि त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. पगार चांगला मिळणार होता आणि त्यात आवडीचे काम असल्याने मी लगेच होकार दिला.

चालू कंपनीतील नोकरी सोडून ट्रॅव्हलिंग कंपनी जॉईन केली. आईने माझ्या कुठल्याही कामाला कधीच विरोध केला नाही. मी लग्न करावे, ही आईची इच्छा होती. आईने माझ्यासाठी बरीचं स्थळं बघितली होती, त्यात एकाने माझ्या नोकरीला समजून घेतले आणि स्विकारण्याची तयारी दाखवली. साखरपुडा झाल्यावर ट्रेकिंगचे शूटिंग करण्यासाठी एका डोंगरावर गेले होते, तिकडे पडले आणि पाय फ्रॅक्चर झाला.

मी पुन्हा नॉर्मल चालू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितले, ते ऐकून त्याने साखरपुडा मोडला. मला त्या काळात मानसिक त्रास बराच झाला, त्यामुळे मी तुझा त्रास समजू शकते. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि आज मी माझी सर्व कामे स्वतः करु शकते.

पायामुळे फिरायला जाता येत नाही, पण त्या कंपनीने मला घरातूनच जे काम करता येईल, ते काम दिलं आहे. व्हिडीओ एडिट करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे. माझ्या कामाचा फॉरमॅट तुला हळूहळू कळेलच.

मी जशी आहे तशी स्विकारणारा एखादा मुलगा भेटला, तर लग्न करण्याचा विचार करु शकते " भूमीने सगळं काही सविस्तरपणे सांगितले.

"आता शेवटचा प्रश्न, तू राहण्यासाठी नाशिक का निवडले?" कादंबरीने विचारले.

भूमी हसून म्हणाली,
"मुंबई आणि पुण्यात खूपच गर्दी गोंधळ झाला आहे. माणसांची गर्दी वाढली आहे. तिथलं आयुष्य अतिवेगवान झालं आहे. नाशिक तसं थोडं शांत आहे. इथला वेग कमी आहे. काही घ्यायचं असल्यास जास्त लांबचा प्रवास करावा लागत नाही. मी नाशिकच्या प्रेमात पडले आहे, तुही नाशिकच्या प्रेमात पडशील. आजचा प्रश्नोत्तरांचा क्लास संपला असेल, तर मी जरा माझं काम करते. तू जरावेळ आराम कर."

कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला.

संध्याकाळी दोघींनी एकत्र बसून कादंबरीचा बायोडाटा तयार केला. भूमीने तिच्या ओळखीतल्या कंपनीत कादंबरीचा बायोडाटा पाठवला.

भूमीला घरी स्वयंपाक करण्याचा कंटाळा यायचा, पण स्वयंपाक करणे हे कादंबरीचे आवडते काम होते. कादंबरीने घरीच स्वयंपाक करण्याची तयारी दाखवली, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तिने केली. कादंबरीच्या हातचं जेवण करुन भूमीचे मन तृप्त झाले होते.

पुढच्या काही दिवसांतच कादंबरीला इंटरव्ह्यूसाठी एका कंपनीत बोलावण्यात आले होते. कादंबरीला नोकरी मिळाली होती. कंपनी अंबडमध्ये होती. भूमीच्या घरापासून जवळच अंतरावर होती, म्हणून कादंबरी पायी कंपनीत जायची.

कादंबरी कंपनीत जाताना स्वतःसाठी डबा बनवून न्यायची व भूमीसाठी स्वयंपाक करुन जायची. हळूहळू कादंबरी व भूमीची चांगलीच गट्टी जमली होती.

कादंबरी कंपनीत रुळली होती. कादंबरीला कंपनीतील काम आवडू लागले होते. कंपनीतील स्टाफसोबत तिचे सूर जुळू लागले होते. कंपनीत कोणालाच कादंबरीच्या भूतकाळाबद्दल काहीच कल्पना नव्हती.

कादंबरीला शनिवारी सुट्टी असायची. शनिवारी भूमी व कादंबरी बाहेर फिरायला जायच्या.

"भूमी, जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं, ही म्हण खोटी नाहीये." कादंबरी अशीच बोलता बोलता बोलून गेली.

"म्हणजे? तुला नेमकं काय म्हणायचं आहे?" भूमीने विचारले.

"भूमी, माझ्या आयुष्यात जर ते सगळं घडलं नसतं, तर आज मला हेही आयुष्य असतं, हे कधीच अनुभवायला मिळालं नसतं. सासर, माहेर सोडून कोणत्याच ठिकाणी मी गेलेले नव्हते. भूमी, मला सगळं जग फिरायचं आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथला अनुभव घ्यायचा." कादंबरी म्हणाली.

"तू सगळं जग फिरशील. मी तुला त्यासाठी मदत करेल. दर महिन्याला पगार आल्यावर त्यातील काही पैसे बाजूला टाकायचे, जास्त पैसे जमा झाले की, मग महिन्यातून- दोन महिन्यातून कुठेतरी फिरायला जायचं." भूमीने सांगितले.

"हो चालेल." कादंबरी म्हणाली.

कादंबरी स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागली होती. कादंबरीचा पहिला पगार झाल्यावर भूमीला तिने पार्टी दिली. भूमीच्या आग्रहाखातर कादंबरीने नवीन कपड्यांची खरेदी केली.

भूमी कादंबरीला पार्लरमध्ये घेऊन गेली. कादंबरीने कॉलेजनंतर पहिल्यांदा केस कापले होते. भूमीने कादंबरीच्या रुपाचा कायापालट करुन टाकला होता. कादंबरीच्या डोळयात आत्मविश्वासाची झलक दिसू लागली होती.

दररोज सकाळी लवकर उठून कादंबरी योगाच्या क्लासला जात होती. योगा करुन आल्यावर अंघोळ करुन स्वयंपाक बनवायची. डबा घेऊन कंपनीत जायची. कंपनीतून आल्यावर स्वयंपाक करायची आणि जेवण झाल्यावर जवळच असलेल्या मैदानावर जाऊन कानात हेडफोन घालून गाणे ऐकत ऐकत वॉक करायची. कादंबरीचं दररोजचं वेळापत्रक ठरलेलं होतं.

कादंबरीच्या उदास चेहऱ्यावर हसू फुलायला लागले होते. भूमी लॅपटॉपवर काम करत होती. कादंबरी गाणं गुणगुणत तिचं स्वयंपाक करत होती.

"आज आमच्या कादंबरी मॅडम खूपच खुशीत दिसत आहेत. काही विशेष कारण आहे का?" भूमीने आपल्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवत विचारले.

"हल्ली मी नेहमीच खुश असते. आज काही विशेष नाहीये." कादंबरीने स्वयंपाक घरातून ओरडून उत्तर दिले.

भूमी उठून स्वयंपाक घरात जाऊन तिच्या शेजारी ओट्याला खेटून उभी राहिली.
"कादंबरी, तुझ्या चेहऱ्यावरील हे हसू बघून खूप छान वाटतं. ज्या दिवशी तू नाशिकला आली होतीस, ती कादंबरी आणि आजची कादंबरी यात बराच मोठा बदल झाला आहे."

"हो आणि ह्या सर्वाचे क्रेडीट जाते माझ्या लाडक्या मैत्रिणीला भूमीला." कादंबरी भूमीचा गाल ओढत म्हणाली.

"कादंबरी, किती वेळेस सांगितलं की, माझा गाल ओढत जाऊ नकोस म्हणून." भूमी चिडून म्हणाली.

"भूमी, तू किती गोलू मोलू आहेस. तुला चिडवायला जाम मजा येते ग." कादंबरी हसून म्हणाली.

"माझा पाय फ्रॅक्चर होण्याआधी मी इतकी गोलू मोलू नव्हते, एकदम फिट अँड फाईन होते. आता या पायामुळे साधा वॉकही करता येत नाही." भूमी उदास चेहऱ्याने म्हणाली.

हातातील लाटणं बाजूला ठेवत कान पकडून कादंबरी म्हणाली,
"सॉरी यार, मला तुला दुखवायचं नव्हतं."

"आता या बदल्यात तुला शिक्षा भोगावी लागेल." भूमी स्वयंपाक घरातून बाहेर जाताना म्हणाली.

तव्यावरील पोळी भाजून बाजूला ठेवली, तव्याखालचा गॅस बंद करुन कादंबरी भूमीच्या पाठोपाठ हॉलमध्ये आली, तर भूमी गाल फुगवून बसलेली होती.

"तुझा रुसवा जाण्यासाठी मला कोणती शिक्षा भोगावी लागेल?" कादंबरीने भूमी समोर उभे राहून विचारले.

भूमी कादंबरीला काय शिक्षा देईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

पुढील सर्व भाग सबस्क्रिप्शन मध्ये असून सबस्क्रिप्शन साठी खालील नंबर वर gpay करुन सबस्क्रिप्शन घेऊ शकता, त्याच नंबरला आपला मेल आयडी पाठवा.
8087201815


🎭 Series Post

View all