कादंबरी भाग ४

Story Of A Girl
कादंबरी भाग ४

मागील भागाचा सारांश: कादंबरीची आई सोडून घरातील इतर कोणीच तिच्यासोबत बोलत नव्हते. शेखरने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अजयने तिला स्पष्टपणे सांगितले की, कोर्टात केस लढवायला त्याच्याकडे पैसे नाहीयेत, तर घटस्फोटाच्या कागदावर सही करुन दे. कादंबरीने शेखरला लग्नाच्या बंधनातून मुक्तता दिली. रोहिणीच्या मैत्रिणी घरी येणार असल्याने तिने कादंबरीला त्या वेळेत बाहेर जाण्यास सांगितले.

आता बघूया पुढे….

"मी इथे बसू का?" हा आवाज आल्यावर कादंबरीने मान वर करुन बघितले. कादंबरीच्या चेहऱ्यावर आपसूकचं हसू उमटले.

"साठे मॅडम, बसा ना." कादंबरी म्हणाली.

"कॉलेजच्या सगळ्यात हुशार मुलीला मॅडमची आठवण आहे म्हणायची." साठे मॅडम खाली बसत म्हणाल्या.

"मॅडम, मी तुम्हाला कशी विसरु शकते? कॉलेजचे ते सोनेरी दिवस, तुम्ही सगळे गुरुजनवर्ग यापैकी कोणालाच मी विसरले नाहीये." कादंबरी म्हणाली.

"लोकांच्या गराड्यात राहणारी कादंबरी आज एकटी का बसली आहे? कादंबरीच्या डोळयात जे तेज होतं, ते कुठे हरवलं?" साठे मॅडमने विचारलं.

कादंबरीने नकारार्थी मान हलवली. साठे मॅडमला लगेच आपली व्यथा कशी सांगावी? हे तिला कळत नव्हते.

"कादंबरी, मंदिरात येताना मी तुला बघितलं होतं. देवाच्या गाभाऱ्यात न जाता तू सरळ इथे कोपऱ्यात येऊन बसलीस, तेव्हाच तुझं काहीतरी बिनसलं आहे, हे मला जाणवलं. तू तुझ्या मनातील साचलेलं दुःख मला सांगितलं, तर कदाचित मी तुझी काही मदत करु शकेल. दुःख घोकत बसलीस, तर तुलाच त्याचा सर्वात जास्त त्रास होईल. तुझं दुःख मी समजून घेण्यायोग्य तुला वाटत असेल, तर तू मला सगळं काही सांगशील." साठे मॅडम म्हणाल्या.

कादंबरीने लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास साठे मॅडमला सांगितला. बोलता बोलता कादंबरीला भरुन आले होते. कादंबरीच्या खांद्यावर हात ठेवून साठे मॅडम म्हणाल्या,

"कादंबरी, जे झालं ते फार भयानक होतं, त्यावर मी काहीच बोलू इच्छित नाहीये. आता तू पुढे काय करायचं ठरवलं आहे?" साठे मॅडमने विचारले.

"मॅडम, काहीच सुचत नाहीये. या सगळ्यातून मार्ग कसा काढावा? हेही कळत नाहीये. अजय दादा आणि बाबा माझ्याशी बोलत नाहीयेत, नाहीतर त्यांच्या मदतीने एखादी नोकरी शोधली असती. मॅडम, माझ्याकडे कामाचा काहीच अनुभव नाहीये. मी एकटी कुठे बाहेर गेलेच नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे. मार्गच सापडत नाहीये. मला इथे राहण्याची इच्छा होत नाही आणि दुसरीकडे जाऊन कुठे राहू? हेही कळत नाहीये." कादंबरीने सांगितले.

"कादंबरी, मार्ग आपोआप सापडत नाही, तो शोधावा लागतो. घरात हातावर हात धरुन बसशील, तर रस्ता कसा काय शोधशील? घरातून बाहेर पड आणि स्वतःच स्वतःचा मार्ग शोध.

माझ्या मुलीला भूमीला तू ओळखत असशीलच ना? ती आपल्या कॉलेजमध्ये नव्हती, पण ती माझी मुलगी म्हणून तुला माहीत असेल. ती नाशिकला एकटी राहते. तिचा स्वतःचा फ्लॅट आहे. तू भूमीकडे राहू शकतेस. तू तिच्याकडे रहायला गेलीस, तर तिला आनंदच होईल. भूमीचा पत्ता आणि फोन नंबर मी तुला देते. भूमीकडे जाऊन रहा, तिथे तुला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लागेल. भूमी तुला तुझ्या पायावर उभं रहायला नक्की मदत करेल. मी भूमीला तू तिच्याकडे जाणार असल्याचे कळवते." साठे मॅडम म्हणाल्या.

"मी आणि नाशिकमध्ये?" कादंबरीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

"कादंबरी, तो मंदिराच्या बाहेरील माणूस बघितलास. देवाने त्याचे पाय हिरावून घेतले, पण त्याला आवाज सुंदर दिलाय. तो गाणे म्हणून लोकांचं मनोरंजन करतो आणि त्याबदल्यात लोकं त्याला पैसे देतात.

आपल्याकडे काय नाही? याचा विचार न करता काय आहे? याचा विचार करुन जगलीस, तर सुखी होशील. मागचा पुढचा विचार न करता नाशिकला भूमीकडे जा." साठे मॅडमने कादंबरीला समजावून सांगितले.

कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला. साठे मॅडमने एका कागदावर भूमीचा फोन नंबर आणि पत्ता लिहून तिच्याकडे तो कागद दिला. साठे मॅडम आपल्या जागेवरुन उठताना म्हणाल्या,

"आज आपली इथे भेट व्हावी, ही देवाचीच इच्छा असेल. गाभाऱ्यात जाऊन त्याचा आशिर्वाद घे. माणसावर रागावण्याचा हक्क आपल्याला असतो. देवावर रागावण्याचा हक्क आपल्याला नसतो, हे कायम लक्षात ठेव. तुला माझ्यामार्फत पुढे जाण्याचा मार्ग मिळावा, ही त्याचीच इच्छा असेल."

साठे मॅडम निघून गेल्यावर कादंबरीने गाभाऱ्यात जाऊन देवाचे दर्शन घेतले.

घरी गेल्यावर ती नाशिकला जाणार असल्याचे तिने आईला सांगितले. कादंबरी नाशिकला जाणार हे कळल्यावर रोहिणी व अजय मनोमन खुश झाले होते. आपली एकटी मुलगी परक्या शहरात जाऊन राहणार ही कल्पना करुन तिच्या आईला भीती वाटू लागली होती. आईला कादंबरीची काळजी वाटून सुद्धा ती तिला थांबवू शकत नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःला आवश्यक लागणारं सामान घेऊन कादंबरी घराबाहेर पडली. कादंबरीच्या आईने थोडे पैसे तिला दिले होते. नाशिकच्या बसमध्ये बसून ती रवाना झाली. कादंबरी तिच्या आयुष्यातील पहिला प्रवास एकटीने करत होती. आज खऱ्या अर्थाने कादंबरी स्वातंत्र्य उपभोगत होती.

नाशिकच्या बसस्थानकावर उतरल्यावर कादंबरीने भूमीला फोन केला. पुढील काही वेळातच ती तिला घ्यायला आली होती. भूमी चारचाकी गाडी घेऊन आली होती. कादंबरी व भूमी एकमेकींना ओळखत असल्याने त्या एकमेकींकडे बघून हसल्या होत्या.

"कादंबरी, प्रवासात काही खाल्लं होतंस का?" भूमीने कादंबरीला गाडीत बसल्यावर विचारले.

"नाही." कादंबरीने उत्तर दिले.

"मीही कामाच्या गडबडीत काहीच खाल्लं नाहीये. आपण घरी जाण्याच्या आधी काहीतरी खाऊयात आणि मग घरी जाऊ." भूमीने गाडी चालवता चालवता सांगितले.

कादंबरीने मान हलवून होकार दर्शवला. कादंबरीने गाडी एका हॉटेलजवळ थांबवली. गाडीतून खाली उतरल्यावर भूमीला लंगडत चालताना बघून कादंबरीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले होते, पण त्यावेळी भूमीला लगेच त्याबद्दल काही विचारणे तिला योग्य वाटले नाही.

"कादंबरी, हे हॉटेल शिवसागर, माझं सगळ्यात आवडतं हॉटेल. इथे सगळे साऊथ इंडियन पदार्थ चविष्ट मिळतात. एकदा इथला तवा पुलाव चाखून बघ. वरच्या मजल्यावर थाळी मिळते, तीही मस्तचं असते. बरं पहिले ऑर्डर देऊयात, मग गप्पा मारुयात." भूमीने कादंबरीला हॉटेलची ओळख करुन दिली.

भूमीच्या बोलण्यावरुन तिला खाण्यापिण्याची किती आवड आहे, हे समजून येते. भूमीने कादंबरीला विचारुन पदार्थांची ऑर्डर दिली.

"भूमी, तुझ्या पायाला काय झालंय?" कादंबरीने तिला पडलेला प्रश्न विचारला.

"मला ट्रेकिंग करायला खूप आवडायचं. आवडायचं यासाठी की आता कितीही इच्छा असून मी ट्रेकिंग करु शकत नाही. एका डोंगरावरुन पडले आणि पाय मोडून घेतला. पायात सळई टाकलेली आहे. गाडी ऑटोमॅटीक असल्याने माझ्या पायाला काहीच त्रास होत नाही. तू पुढचा प्रश्न हाच विचारला असता, म्हणून सांगितलं." भूमीने चेहऱ्यावर हसू आणून सांगितले.

वेटर ऑर्डर घेऊन आल्यावर भूमी व कादंबरीने आपलं लक्ष खाण्यावर केंद्रीत केले.

"इथले पदार्थ खरंच खूप चविष्ट आहेत." खाऊन झाल्यावर कादंबरीने आपली प्रतिक्रिया दिली.

"कादंबरी, हा परिसर पाथर्डी फाट्याचा आहे. आपलं घर इथून थोडं मागील बाजूस आहे, ते आश्विन नगर मध्ये येतं. तुला जेव्हाही कधी इथे येऊन खाण्याची इच्छा झाली की, तू इथे येऊन खाऊ शकतेस. आपलं घर इथून पायी चालण्याच्या अंतरावर आहे." भूमीने कादंबरीला आजूबाजूच्या परिसराची ओळख करुन दिली.

बिल देऊन कादंबरी व भूमी हॉटेल मधून बाहेर पडल्या. भूमीने गाडी घराच्या दिशेने घेतली. गाडी पार्किंग मध्ये लावून कादंबरी व भूमी निघाल्या होत्या.

"भूमी, घरी पाहुणे घेऊन आलीस वाटतं?" रस्त्यात भेटलेल्या एका काकूंनी तिला विचारले.

"सावंत काकू, ही कादंबरी माझी मावस बहीण आहे. आता ही माझ्यासोबत माझ्याच घरी राहणार आहे." भूमीने पुढे चालता चालता सांगितले.

घरात गेल्यावर भूमी कादंबरीला म्हणाली,
"कादंबरी,आपल्याला खाली जी बाई भेटली होती, ती चालतं बोलतं वर्तमानपत्र आहे. तिला काहीच खरं सांगायचं नाही. तिच्याशी जास्त वेळ गप्पा मारत बसायच्या नाही. आता एव्हाना पूर्ण सोसायटीला तू माझी मावस बहीण आहे, हे कळून गेलं असेल. तू फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी कडक आल्याचा चहा बनवते."

कादंबरी फ्रेश होऊन आली होती. भूमी चहाचे दोन कप घेऊन आली. चहा पिता पिता भूमी कादंबरीला म्हणाली,
"कादंबरी, मला आईकडून तुझ्याबद्दल सगळं काही कळलं आहे. मला त्या विषयावर बोलून तुला त्रास द्यायचा नाहीये. आता जे झालं त्यावर विचार करत बसू नकोस. आयुष्यात बरंच काही करण्यासारखं आहे. तुला तुझ्या आईचा फोन आला तर फक्त तिच्याबद्दल बोलायचं, बाकी लोकांची चौकशी करायची नाही. ज्या लोकांना तुझी काही पडली नाहीये, त्यांचा विचार करायचा नाही.

आता दुसरी गोष्ट तुला नोकरी मिळेपर्यंत होणाऱ्या खर्चाची चिंता करु नकोस. तुझा पगार झाल्यावर मला मोठी पार्टी दे. आपण संध्याकाळी बसून तुझा बायोडाटा तयार करुयात. मी एक दोन ओळखीच्या कंपनीत तुझ्या नोकरीसाठी बोलून ठेवलंय, पण त्यांना बायोडाटा पाहिजे आहे. लवकरच तुला नोकरी मिळेल, अशी मला खात्री वाटतेय."

"भूमी, एक प्रश्न विचारु?" कादंबरीने विचारले.

"हो, विचार ना." भूमीने उत्तर दिले.

"माझा आणि तुमचा म्हणावा असा काहीच संबंध नाहीये. साठे मॅडमची एक विद्यार्थिनी एवढीच काय ती माझी ओळख, तरीही तू माझी एवढी मदत का करत आहेस?" कादंबरीने तिच्या मनातील प्रश्न विचारला.

भूमी या प्रश्नाचे काय उत्तर देईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all