कादंबरी भाग ३

Story Of A Girl
कादंबरी भाग ३

मागील भागाचा सारांश: कादंबरीला शेखरने स्वतःच्या हाताने जेऊ घातले. कादंबरीच्या मनात जे साचलेलं होतं, ते तिने त्याच्याजवळ मोकळं केलं. शेखरची अपेक्षा होती की, कादंबरीने त्याच्या आईची बाजू समजून घ्यावी. कादंबरीचे वडील व भाऊ तिच्या घरी आले होते, तिच्या सासूबाई ऐकत नसल्याने कादंबरीला तिच्या माहेरी जावे लागले. तिचा भाऊ, वडील कोणीच तिच्याशी बोलले नव्हते. माहेरी गेल्यावरही सगळंच बदलल होतं.

आता बघूया पुढे….

कादंबरी आपल्या रुममध्ये विचार करत बसलेली होती. तिला घरात आल्यापासून कोणी पाणी-चहा काहीच विचारले नव्हते. आपलंच माहेर, आपलीच माणसं तिला परक्यासारखी भासत होती.

"कादंबरी, तू केव्हा आलीस? अग मी मंदिरात गेले होते." आई तिच्या रुममध्ये येऊन म्हणाली.

"दहा-पंधरा मिनिटे झाले असतील." कादंबरीने उत्तर दिले.

"मी रोहिणीला तुझ्यासाठी चहा बनवायला सांगते. चहा घेतला की तुला जरा तरतरी येईल." आई म्हणाली.

"आई, तुही माझ्याशी बोलणं टाळणार आहेस का?" कादंबरीने विचारले.

"अग बाळा, तू एवढ्यात आली आहेस. आधीच तुझ्या मनावर इतका ताण असेल, त्यात लगेच तोच विषय काढून मला तुला त्रास होऊ द्यायचा नाहीये." आईने सांगितले.

"चला म्हणजे कोणालातरी माझी काळजी आहे." कादंबरी म्हणाली.

"बाळा, असं का बोलते आहेस? ह्या घरातील सर्वांनाचं तुझी काळजी आहे." आई म्हणाली.

"आई, बाबा आणि अजय दादा माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाही. माझी मनस्थिती काय असेल? हाही प्रश्न त्यांना पडला नव्हता. उलट आता माझ्यामुळे त्यांची किती बदनामी होईल? हा प्रश्न त्यांना पडला आहे. मी कायमस्वरुपी इथेच राहिल याचं दादाला टेन्शन आलं आहे.

घरात आल्यावर रोहिणी वहिनीने मला पाणी सुद्धा विचारलं नाही. माझी रुम सुद्धा बदलण्यात आली. आई, हे घर माझं राहिलंच नाहीये का?" कादंबरीने पाणावलेल्या डोळ्यांनी प्रश्न विचारला.

"पुरुष लोकं हे असेच असतात. त्या दोघांनाही तुझ्याबद्दल वाईट वाटत असेल, पण ते तसं तुला बोलून दाखवणार नाही. रोहिणी किचनमध्ये कामाच्या गडबडीत असेल, म्हणून तुझ्याशी बोलली नसेल. तुझ्या रुममध्ये आधीच मुलांची खेळणी ठेवली होती. तू नको ते विचार डोक्यात आणू नकोस. मी तुझ्यासाठी चहा आणते." आई एवढं बोलून रुममधून निघून गेली.

कादंबरी मनातल्या मनात म्हणाली,
"आई, तू स्वतःला फसवते आहेस की मला? निदान स्वतःसोबत तरी खरं बोल. माझ्या प्रश्नांची उत्तरे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीच बदलणार नाही. हे मात्र नक्की की, मी इथं राहिलेलं आई सोडून कोणालाच आवडणार नाही."

कादंबरी रुमच्या बाहेर फक्त जेवण करण्यासाठी पडत होती. आई व्यतिरिक्त घरातील कोणीही तिच्याशी मनमोकळं बोलत नव्हतं. रुमच्या बाहेर पडल्यावर सगळ्यांचे भावनाशून्य चेहरे बघून तिला त्रास होत होता, म्हणून तिने रुमच्या बाहेर पडणं बंद केलं होतं. कादंबरी आतून खचत चालली होती.

माहेरी येऊन कादंबरीला जवळपास महिना होत आला होता. शेखरचा एकदाही फोन आला नव्हता. कादंबरीने स्वतःहून शेखरला फोन करणे टाळले होते.

एके दिवशी शेखरने घटस्फोटाची नोटीस कादंबरीच्या घरी पाठवली होती. बाहेरचा गोंधळ ऐकून कादंबरी रुमच्या बाहेर गेली. तिचा दादा मोठमोठ्याने तिच्या व शेखरच्या नावाने बडबड करत होता.

"आई, काय झालंय?" कादंबरीने विचारले.

"शेखर रावांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे." आईने उत्तर दिले.

कादंबरी काही बोलणार तेवढ्यात अजय तिच्याजवळ येऊन म्हणाला,
"हे बघ कादंबरी, केस कोर्टात उभी राहिली, तर वकीलावर वायफळ खर्च होईल. या घरात मी एकटा कमावणारा आहे. आई-बाबांची औषधे, मुलांच्या शाळेच्या भरमसाठ फी, एवढ्या माणसांना लागणारा घरखर्च हे करता करता मला नाकी नऊ येत आहेत. तुझ्यासाठी खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीयेत.

कोर्टाच्या बाहेर आपण ही केस मिटवून घेऊयात. तू घटस्फोटाच्या कागदावर सही करुन टाक."

आपला भाऊ असं बोलतो आहे, म्हटल्यावर ती यावर काय बोलू शकणार होती? अजयचं बोलणं ऐकून कादंबरी आपल्या रुममध्ये निघून गेली. रुममध्ये गेल्यावर तिने शेखरला फोन केला,

"हॅलो शेखर, तुम्ही आई-पप्पांना समजावणार होतात ना? घटस्फोटाची नोटीस का पाठवली?" कादंबरीने विचारले.

"कादंबरी, मी माझ्या आई-पप्पांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईला तू या घरात परत येणं मान्य नव्हतं. मी त्यांना दुखावू शकत नाही. माझ्याकडे तुला घटस्फोट देण्यावाचून काहीच मार्ग उरला नव्हता. मी हे सगळं स्विकारलं आहे, तुही स्विकार म्हणजे तुला त्रास होणार नाही. इथून पुढे मला फोन करु नकोस." एवढं बोलून शेखरने फोन बंद केला.

कादंबरी अजयच्या आणि शेखरच्या बोलण्याचा विचार करत बसली होती. आज तिच्या बाजूने कोणीच उभं नव्हतं. ज्या भावाला आधार म्हणून बघत आली होती, तो तिला आधार दयायला तयार नव्हता. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, हातात हात घालून संसाराची सुरुवात केली, तोही आज तिला सोडायला तयार झाला होता. कादंबरी शून्यात बघत बसलेली होती.

"कादंबरी, कसला विचार करत आहेस?" आईने रुममध्ये येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारले.

"आई, अजय दादा एवढं सगळं बोलला, पण तू किंवा बाबा काहीच बोलले नाहीत. मी तुम्हाला माझा आधार समजत होते, पण तुम्हीही माझी साथ दिली नाही. शेखर माझ्यासमोर एक बोलायचे आणि त्यांच्या आई-वडिलांसमोर वेगळंच बोलायचे. आता तर त्यांनीही माझी साथ सोडली." कादंबरीने भरलेल्या आवाजात सांगितले.

"कादंबरी, वेळच अशी आहे की, तिथे मीही काहीच बोलू शकत नाहीये. या घरातील कर्ता पुरुष अजय आहे, त्याच्या मनाविरुद्ध बोलून कसं चालेल? शेवटी तोच आमच्या म्हातारपणाची काठी आहे." आई म्हणाली.

"आई, माझं कॉलेज झाल्यावर मला नोकरी करायची होती. स्वतःच्या पायावर उभं रहायचं होतं. मी कॉलेजमध्ये पहिली आले होते. तुझ्या व बाबांच्या इच्छेखातर मी शेखरसोबत लग्न केलं.

लग्न झाल्यावर नोकरी कर असं तुच म्हणाली होतीस. शेखरच्या आई-वडिलांनी मला नोकरी करण्यास मनाई केली. आजरोजी मी जर नोकरी करत असते, तर तुमच्या दोघांच्या म्हातारपणाची काठी मीही होऊ शकले असते." कादंबरी म्हणाली.

कादंबरीच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी आईकडे शब्द नव्हते. आई चेहरा पाडून काही न बोलता रुममधून निघून गेली.

पुढच्या काही दिवसांत कोर्टात जाऊन कादंबरीने घटस्फोटाच्या कागदावर सही केली. शेखरकडे वर मान करुन सुद्धा तिने बघितले नाही. शेखरला लग्नाच्या बंधनातून कादंबरीने मुक्त केले होते.

अजय व रोहिणीला कादंबरीचे घरात राहणे खटकत होते. कादंबरीचे बाबा तिच्यासोबत एकही शब्द बोलत नव्हते. कादंबरीची आई तिच्याशी तेवढ्यापुरतं बोलायची.

एके दिवशी कादंबरी व तिची आई जेवण करत डायनिंग टेबलच्या इथे बसल्या होत्या. रोहिणी तिथे येऊन म्हणाली,

"ताई, आज संध्याकाळी माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत. त्या घरी येतील, तेव्हा तुम्ही कुठेतरी बाहेर जाल का? तुम्ही घरी असल्या की, त्या काहीतरी चर्चा करत बसतील."

कादंबरीने आपल्या आईकडे बघितले. आतातरी आई काहीतरी बोलेल अशी आशा तिला होती.

"वहिनी, इतकं आडून सांगण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला माझी लाज वाटते, ते सरळ सांगितलं तरी चालेल. वहिनी, तुमच्या सगळ्यांच्या नजराचं सगळं काही सांगून जात आहे. तुमच्या मैत्रिणी घरी येतील, तेव्हा मी घरी नसेल. काही काळजी करु नका. शेवटी हे घर तुमचं आहे. मला तुम्ही इथे राहू देत आहात, हेच खूप आहे." कादंबरी एवढं बोलून जेवणाच्या ताटावरुन उठून गेली.

संध्याकाळी रोहिणीच्या मैत्रिणी घरी येण्याच्या आत कादंबरी घरातून बाहेर पडली. घरातून बाहेर पडताना तिला तिच्या आईने विचारले
"कादंबरी, आता तू कुठे जाणार आहेस?"

"रस्ता दिसेल तिकडे जाईल. तू काळजी करु नकोस. रात्री घरी परत येता येईल, एवढंच लांब जाईल. तुला न सांगता लांब कुठे निघून जाणार नाही." कादंबरी उत्तर देऊन घराबाहेर पडली.

कादंबरी माहेरी आल्यापासून पहिल्यांदा घराबाहेर पडली होती. नेमकं कुठे जावं? याचा विचार करत असतानाच कादंबरीच्या नजरेस मंदिर पडले. मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडण्यात तिला काहीच रस नव्हता.

मंदिराचा परिसर बऱ्यापैकी मोठा होता. मंदिराच्या चहूबाजूंनी हिरवीगार झाडे होती. झाडांच्या सावलीत बसण्यासाठी सिमेंटची बाकडे ठेवण्यात आली होती. कादंबरी एका कोपऱ्यातील झाडाखालच्या बाकड्यावर जाऊन बसली. मंदिरात गावातील लोकांची ये-जा सुरु होती.

लहान मुलं मंदिराच्या प्रांगणात खेळत होती. कादंबरी मात्र जिथे कोणीच बसलेलं नाही, तिथे जाऊन बसली. निसर्गरम्य वातावरणात येऊन तिच्या मनाला बरं वाटत होतं.

"मी इथे बसू का?" हा आवाज आल्यावर कादंबरीने मान वर करुन बघितले. कादंबरीच्या चेहऱ्यावर आपसूकचं हसू उमटले.

कादंबरीला कोण भेटलं असेल? बघूया पुढील भागात….